डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साने गुरुजींची पुनर्भेट : काहीसा संवाद - काहीसा सामना

गुरुजींशी झालेली पुनर्भेट हा काहीसा संवाद व बराचसा सामना आहे. परंतु हा सामना गुरुजींशी नाही, तर त्यांच्याच संदर्भात पण माझ्या स्वतःशी आहे. भावी पिढ्यांना कमी-अधिक तीव्रोत्कट अंतःसंघर्षाचा वारसा देणे, हे एक महापुरुषाचे लक्षणच असावे! 

पूज्य साने गुरुजींच्या पुनर्भेटीचा योग तीन-साडेतीन वर्षांपूर्वी आला, त्यामागे आदरणीय (आता कै.) श्री. अनंतराव कुलकर्णी यांची प्रेरणा, मित्रवर्य रत्नाकरांची उपक्रमशीलता व मित्रवर्य अनिरुद्धांची योजकता या सर्व गोष्टी होत्या. गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त 'निवडक साने गुरुजी’ या प्रकल्पाचे काम मी अंतःस्फूर्तीने तत्काळ स्वीकारले. या झटपट होकारामागे नेमके भाव व प्रभाव काय होते, गुरुजींचे तेजोवलय कितपत होते आणि मला आप्तवत असलेला काँटिनेंटल परिवार कितपत होता, हे आता व इथे सांगणे आवश्यक नाही. 

गुरुजींची पहिली भेट शालेय जीवनात झाली. साधारणपणे या भेटीचा कालावधी 1940 ते 1950 हे दशक म्हणता येईल. पन्नाशीच्या पुढील दशकात फुटकळ समीक्षापर लेख व ललित निबंध यांच्या रूपाने ‘साधने'शी छोटीशी गाठभेट होत राहिली. साठोत्तरी कालखंडापासून पुढे या दोन्ही प्रकारच्या गाठीभेटी बंद झाल्या. म्हणजे ‘निवडक साने गुरुजी’च्या निमित्ताने चाळीस-पंचेचाळीस वर्षांनंतर मी गुरुजींना पुनरपि भेटत होतो. या दोन भेटींच्या मधून दरम्यान खूपच पाणी वाहून गेले होते. हे खरे तर पुराचे पाणी होते. नवे साहित्य, नवे साहित्यिक, नवी अभिरुची, नवी समाजव्यवस्था, नवीन सौदर्यव्यवस्था, नवीन साहित्यव्यवस्था.... इत्यादींमुळे खळाळत राहिलेले ते पुराचे पाणी होते. या जोरदार वाहत्या प्रवाहात स्थिर उभे राहणे हीच मुख्य समस्या होती व ती इतकी तीव्र व जटिल होती की मागे वळून पाहण्यास उसंत लाभणे मुश्किल होते. साने गुरुजींच्या हयातीच्या काळात म्हणजे या शतकाच्या पूर्वार्धातही बहुधा थोड्याशा फरकाने अशीच परिस्थिती होती. आपल्या देशाचे व समाजाचे विसावे शतक हे बहुधा ओहोटी नसलेती समुद्राची वादळी भरती ठरले! स्मृतिकोशात ‘सोनसाखळी’च्या रूपाने, ‘गोड’ व ‘आवडत्या’ गोष्टींच्या रूपाने आणि मुख्य म्हणजे ‘श्यामची आई’च्या रूपाने गुरुजींचा सहवास टिकून होता. पण हे आतले गुरुजींचे दालन पुन्हा उघडण्यासाठी खरे तर फुरसतही नव्हती व निकडही जाणवत नव्हती. 1975 मध्ये म्हणजे गुरुजींच्या निधनानंतर पंचवीस वर्षांनी त्यांचे सविस्तर चरित्र राजा मंगळवेढेकरांनी प्रसिद्ध केले.

हे चरित्र मौलिक असूनही, ते वाचण्यासाठी मला सुमारे वीस वर्षे तरी सवड झाली नाही. ते वाचल्यानंतर मात्र या चरित्रग्रंथाने गुरुजींच्या पुनर्भेटीसाठी एक व्यापक संदर्भव्यूह मला केवळ उपलब्ध करून दिला असे नव्हे, तर गुरुजींच्या जीवनकार्याचे व वाङ्मयाचे पुनर्मूल्यमापन करण्याची निकड किती मोठी आहे. हेही पटवून दिले. गुरुजींच्या पुनर्भेटीचा माहौलच बदलून गेलेला होता. माझ्या मनातील गुरुजींचे मळलेले स्मारक उजळून लखलखीत होत होते आणि त्याच्या आसपासचा अंतरंगातला तोवरचा निःशब्द अवकाश काहीतरी सांगण्यास आतुर झालेला होता. एक नवे गुरुजी व एक नवा जाधव यांची हो भेट होती.

गांधीयुगातील प्रारूप
एका माणसाने दुसरा माणूस कधीही, केव्हाही व कुठेही सांगोपांग समजून घेणे व देणे, याला एक स्वायत्त सांस्कृतिक मूल्य आहे. समजावून घ्यावयाचा माणूस जेवढा मोठा, तेवढी मोठी या मूल्याची गुणवत्ता. गुरुजींच्या दुसऱ्या भेटीतून मला या गोष्टीचा मोठा थरारक प्रत्यय आला. मराठी साहित्य व संस्कृती यांचे एक नमुनेदार असे गांधीयुगातील प्रारूप या भेटीतून काहीसे उमटू लागल्याचे जाणवले. या भेटीने एका संपन्न महापुरुषाचा परिसस्पर्श लाभून, माझ्या जीवनविषयक जाणिवांचे जग सुवर्णमय झाले. या भेटीने एका अतिश्रीमंत माणसात माझे रूपांतर घडवून आणले. आखी एक ; गांधीयुगातील (1920-1950) मराठी साहित्य व समाज यांना आपण यथार्थपणे जाणून घेतलेले नाही, या सांस्कृतिक दुर्लक्षाचे अधोरेखन गुरुजींच्या दुसऱ्या मुलाखतीने ठळकपणे केले. समकालीनांनी समकालीनांकडे केलेले दुर्लक्ष समजू शकते. मात्र उत्तरकालीनांनी अशा दुर्लक्षांकडे पुनरपि वळून त्याची काही एक वैचारिक व्यवस्था करणे आवश्यक ठरते. मी गुरुजींचा एक उत्तरकालीन म्हणून या जबाबदारीची जाणीवही गुरुजींच्या दुसऱ्या भेटीने मला करून दिली. आपल्या जबाबदाऱ्यांची निदान जाणीव होणे, ही गोष्टही माणसाला आतून संपन्न व जागृत करणारी ठरते.

गुरुजींच्या पुनर्भेटीने हाही ‘तोहफा’ मला देऊन टाकला. सुमारे पन्नास वर्षांच्या लांब अंतरावर उभ्या असणाऱ्या गुरुजींचे जीवन आणि वाङ्मय वाचणे ही एक मोठी परीक्षा असते. आणि कोणतीही परीक्षा ही गृहपाठाचा अटळ कंटाळवाणेपणा कठोर मनोनिग्रहाने काबूत ठेवण्याची खरीखुरी परीक्षा असते. काठावर तरी पास होण्याइतपत तयारी करून अशी परीक्षा मी दिली आहे, असे नम्रपणे नमूद केले पाहिजे. गुरुजींच्या कथासमष्टीने मला रमविले हे खरेच; पण या रममाणतेत बालवयातील सहचर आठवणींचा खट्टामिठा मेवाही होताच. त्या गोष्टी वाचताना मनाने धरलेले करुणार्त पालुपद ‘आय रिमेंबर आय रिमेंबर’ हेच होते. गुरुजींच्या गोष्टींनी त्या काळी खूप रडविले होते आणि खूप खूप सुखविलेही होते. गोष्टींच्या पुनर्भेटीने माझ्या बालपणीचे काहीसे दुखरे व्याकूळ गोकुळ मनोमन उभे केले. गुरुजींच्या गोष्टींची समग्र गाथा ही प्रत्येक नव्या पिढीतील गोकुळवासी कृष्ण सवंगड्यांसाठी आहे व तिला म्हणूनच 'जरणमरण' नाही. हेही लक्षात आले. वाढत्या वयानुसार माणसाला जगण्याच्या कुरुक्षेत्रावर जावे लागते; पण खूप मागे राहिलेले त्याचे गोकुळ जपून ठेवण्याचे कार्य गुरुजींची कथासमष्टी काम करीत राहील याची खात्री पटून गेली. समाजात सतत हजर असणारे गोष्टीरूप निर्व्याज बालपण म्हणजे गुरुजींच्या गोष्टी.

‘श्यामची आई’तील संस्कारव्यूह तपशिलांतून जुना, पण तत्त्वतः जुना न होणारा आहे. हेही हे कथन पुन्हा वाचताना जाणवले. माणसाच्या मुलांचे संगोधन-संवर्धन इतर इतर सजीवांच्या तुलनेने सध्याच्या पाळणागृहाच्या व फ्लॅटच्या संस्कृतीतही वाढणाऱ्या ‘श्याम’ मंडळींची कुणीतरी ‘श्यामची आई' होणे इष्ट ठरते. ‘श्यामच्या आई’मधील एके काळचा वास्तवदर्शी संस्कारव्यूह आता नैतिक प्रतीकात्मक संस्कारव्यूहात आपण नकळतपणे बदलून घेतो. त्याचप्रमाणे आज-उद्याच्या डगमगत्या कुटुंबसंस्थेला काही तारक तत्त्वेही 'श्यामची आई' देऊ शकते. मुख्य म्हणजे व्यक्तिवादी आधुनिकतेचा लंबक मानवतावादी समाजशीलतेच्या टोकाबाहेर जाऊ न देणारा एक मूलगामी नियंत्रक संस्कारही 'श्यामची आई' करते. या कथनाची खास देशीय मंत्रतंत्रकला हा तर एक मोलाचा उद्बोधक अभ्यास होय. या कथनाचे खरे आव्हान संस्कारव्यूहाइतकेच अस्सल देशी कथनमीमांसेच्या मांडणीच्या दृष्टीनेही आहे, हेही लक्षात येते. 

‘भारतीय संस्कृती’ची दुसरी भेट काहीशा अवघडल्या संवादाची! गुरुजींच्या मांडणीचे नेमके परिप्रेक्ष्य धुंडाळण्याची सक्ती एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने तशी सक्ती म्हणजे भावना व विचार यांचा गोफ उलगडण्याची! पश्चिमी आधुनिक संस्कृती व मूल्ये आणि भारतीय संस्कृती व मूल्ये यांत नकळतपणे मेळ घालण्याचा हा प्रयत्न पुरेसा शास्त्रीय नाही व निखालस अशास्त्रीयही नाही. गुरुजींनी भारतीय संस्कृतीची ही गोष्ट तर सांगतली नाही? मग ही ललित साहित्यकृती की विचारप्रबंध? पण हे प्रश्नही पश्चिमी निकषांचेच! देशी गोष्ट व देशी प्रबंध असे नाहीतच काय? भारतीय संस्कृतीला अखेर कुठे बसवायचे? आधुनिक मराठी मीमांसकांनी रानडे, फुले, आगरकर, सावरकर, विवेकानंद इत्यादी भारतीय संस्कृतीच्या भाष्यकारांत गुरुजींना स्थान दिलेले नाही. याचा अर्थ काय करावयाचा? थोडक्यात, पहिल्या भेटीत समजलेली वा समजल्यासारखी वाटलेली गुरुजींची 'भारतीय संस्कृती' दुसऱ्या भेटीत मात्र खूपच दुर्बोध ठरली. दुर्बोधता ही नेहमीच वस्तुगत नसते, तर ती व्यक्तिगतही असते; हेही येथे नोंदविले पाहिजेच. गुरुजींनी अवघे जीवनच गोष्टीरूपातून पाहिले; भारतीय संस्कृतीचीही त्यांनी जणू गोष्टच केली. या गोष्टीरूपाचे वैशिष्ट्य असे की तिच्यात गोष्ट सांगणारी नेहमी आईच असते व ऐकणारा श्याम असतो. खरे तर मनुष्यजीवनाचा ओघ व अंतिम अर्थपूर्ण आकृतिबंध गोष्टीरूपाचाच आहे. भारतीय परंपरेतील अद्वैतादी अनेक संकल्पना या गुरुजींच्या लेखी एका गोड गोष्टीतील पात्रेच ठरल्या. अशा पात्रांच्या गोड गोष्टी म्हणजे त्यांचे 'भारतीय संस्कृती' हे लेखन! हे लेखन एका विशिष्ट अर्थाने 'काव्यात्म' आहे. रोमॅटिक आहे. कारण ही दोन्ही गुरुजींच्या लेखी एकरूपच आहेत.

अस्वस्थ समाधान
गुरुजींच्या पुनर्भेटीतून माझ्या कुवतीप्रमाणे मला जे काही लाभले, ते समजून घेण्याचा व देण्याचा प्रयत्न मी यापूर्वी इतरत्र केला आहे. (उदा. ‘निवडक साने गुरुजी’ची प्रस्तावना व त्यातील काही नोंदी - काही निरीक्षणे हे प्रकरण 'अंतर्नाद' मासिकाच्या ऑगस्ट 1999 च्या अंकातील लेख, साने गुरुजी, सुसंगतीचा अन्वयार्थ हा लेख इत्यादी.) त्याची पुनरावृत्ती इथे करीत नाही. हा प्रयत्न संपलेला नाही. 'श्यामची आई’चा सूक्ष्म अभ्यास मला खुणावत असतो. तीच गोष्ट गुरुजींच्या साहित्यविचारांची. साठोत्तरी परिवर्तनवादी साहित्याविचारांशी गुरुजींचे थेट नाते जुळले. साने गुरुजी व गोळवलकर गुरुजी या दोन समकालीन गुरुजीपरंपरांचा समाजशास्त्रीय अभ्यासही मला वेधक वाटतो. गुरुजांची काहीशी जन्मजात वाटणारी आत्मिक दुर्बलता, 'पापोऽहं पापात्मा पापयोनि पापसंभव' यासारखे त्यांच्या मनोमनीचे आमरण आक्रंदन, त्यांचे ब्रह्मचर्य व स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्यांचे महापुरुषाचे तत्त्वज्ञान, त्यांचा प्राणार्पण निर्णय आणि या सर्वांचा त्यांच्या कोकणस्थ जिवटचिवट अशा जन्मसिद्ध प्रकृतीशी असणारा अन्वय/व्यतिरेक यांसारखे काहीसे मानसशास्त्रीय प्रश्नही जाणवतात व गुरुजी हे आपल्याला मुळीसुद्धा समजले नाहीत, हे लक्षात येते. न समजण्याइतके तरी ते समजत आहे वाटतात, यातच मला एक अस्वस्थ समाधान प्राप्त होते. 

कधीकधी मात्र गुरुजी सुबोधपणे पुढे येतात; आपण किती सहजसोपे आहोत, हे सुचवू लागतात. गुरुजींनी आपल्या जीवन वाङ्मयातून उभारलेला ध्वज 'श्यामच्या आई’तील नैतिक आदिबंधाचा एक शुभ्र पट्टा वरच्या बाजूस झळकतो. मधल्या पट्टीत अश्रुनारायणाची प्रतिमा आहे. आणि तळाशी बहुजनांशी व बालकुमारांशी बोलणारी संस्कृतीची गोष्टीरूप गाथा आहे. गोष्टीरूप हाही एक सांस्कृतिक पण पुरातन आदिबंध आहे. गोष्ट हा एक आपल्या समग्र संस्कृतीचा मायक्रोकॉझम आहे. संस्कृतीचे अवघे ब्रह्मांड गोष्टीरूप पिंडातून पाहण्याची व प्रकट करण्याची आपली पुराणप्रसिद्ध परंपरा आहे. म्हणून आपल्या गोष्टीरूपाच्या आकृतिबंधात तत्त्वज्ञान, नीती, धर्म, समाज, शासन जड-चेतन सृष्टी, अध्यात्म, कायदा हे सर्व काही असते व एकात्म होऊन येते. आधुनिकांनी मानलेले अध्यात्म व ऐहिकता, धर्ममूल्ये व धर्मनिरपेक्ष मूल्ये, तत्त्वज्ञान-नीती वगैरे आणि कलावाङ्मय यांच्यातील द्वैत आमच्या सांस्कृतिक व कलावाङ्मयीन परंपरेतील नव्हे. गुरुजीचे जीवन काय, जीवनकार्य काय आहे. वाड्मय काय, हे सर्व त्या परंपरेचे द्योतक आहे. म्हणून त्या परंपरेला जेवढी व जेथवर प्रस्तुतता संभवते, तेवढी व तेथवर प्रस्तुतता 'गुरुजी' नावाच्या सांस्कृतिक अस्तित्वातही आहेच आहे; ही वा या प्रकारची गुरुजींची सुबोध प्रतिमा खूप सुखावून जाते. खूपसे सांगून जाते. पण पुन्हा माझे किरटे आधुनिक मानस चुळबूळ करू लागते व हळूहळू ही सुबोध प्रतिमा धुक्यात शिरू लागते... त्या धूसर होत जाणाऱ्या प्रतिमेकडे बघताना बोचणारी जाणीव एवढीच असते की गुरुजींची संगती लावणे म्हणजे आपल्याच आत्मविसंगतीचा गुंता उकलत राहणे.. ! 

शेवटी एक खंत व्यक्त करावीशी वाटते; गुरुजींची पुनर्भेट घेण्यास मी जी चाळीस-पंचेचाळीस वर्षे घेतली ती फार मोठी चूक होती असे आता वाटते. गुरुजीचे वाङ्मय मी वाचत राहिलो असतो तर मराठी भाषा व भावना अधिक चांगल्या प्रकारे समजल्या असत्या व हाताळताही आल्या असत्या, असे वाटते. भावनेच्या सोबतीनेच भाषा व आशय यांना स्वच्छ-स्पष्ट स्वरूप लाभते. जिवंतपण व प्रत्ययकारिता प्राप्त होते. विश्लेषण विचारांनी अस्तित्वाचे अर्थ माहीत होतात; तर भावनेमुळे ते अर्थ आत्मसात करण्यास प्रेरणा मिळते. 

गुरुजींशी झालेली पुनर्भेट हा काहीसा संवाद व बराचसा सामना... कंन्फ्रेंटेशन आहे, याची उत्तरोत्तर तीव्र होत गेलेली जाणीवही इथे नमूद केली पाहिजे; परंतु हा सामना गुरुजींशी नाही, तर त्यांच्याच संदर्भात पण माझ्या स्वतःशी आहे. भावी पिढ्यांना कमी-अधिक तीव्रोत्कट अंतःसंघर्षाचा वारसा देणे हे महापुरुषाचे एक लक्षणच असावे...! माझा एक अंतःसंघर्ष असा; 'श्यामची आई' ही एखाद्या 'भीमा'ची आई कशी होऊ शकेल, असा प्रश्न मी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या निळ्या पहाटेच्या प्रभेत मला व समाजालाही विचारला होता. आता वाटते, हा प्रश्न एका कविमनाचा की कसला? आईपण हे स्वयंभू की सापेक्ष? ते श्याममुळे ठरते की भीमामुळे?... काय सांगणार? गुरुर्जीसारख्या कुणासही एखाद्या पुनर्भेटीतून नव्हे, तर पुनर्भेटीच्या साखळीतून समजून घेता येते, हेही उमगले. अनेक संपर्कातूनही गुरुजींच्या जीवनकार्याची व वाङ्मयाची नवी नवी रूपे दाखविणारा ‘अजूबा’ उलगडत नाही हे खरेच. या ‘अजूबा’चे एक उदाहरण म्हणजे जगणे व मरणे यांचे गुरुजींचे समीकरण त्यांच्या दृष्टीने जगणे व मरणे यांत भेदच नव्हता. दुसऱ्यासाठी अन्न देणे, पैसे देणे, श्रम देणे, घाम व अबू देणे आणि दुसऱ्यांसाठी प्राण देणे, यात गुरुजींना कसलीच विसंगती वाटत नव्हती. एक प्रकारे त्यांचे हे एक व्यस्त असे अस्तित्ववादी जीवनभानच होते. या व्यस्त विसंगतीवर त्यांच्या उभ्या जिण्याची व वाङ्मयाची लौकिक संगती अधिष्ठित होती. आता याला गुरुजींचे जीवनविषयक अध्यात्म म्हणावयाचे की पाखंड? 

आधुनिक पश्चिमी, पण ग्राह्य अशा मूल्यांच्या स्वीकारासाठी भारतीय समाज, संस्कृती व वाङ्मय सक्षम करण्याचा गुरुजींनी प्रयत्न केला हे खरे, पण या प्रयत्नांत ते कळत-नकळतपणे एका रोमँटिक यूटोपियाच्या योगसाधनेत अडकले, असे वाटते. या योगसाधनेत गुंतलेले सगळेच महापुरुष कमी-अधिक स्वरूपात यशापयशाचे धनी ठरतात. गुरुजी अशा योगमार्गावरील एक योगच्युत वाटतात. या पाटण्याचा अर्थ करण्याची कुवत आता व इथे तरी माझ्यात नाही...!
 

Tags: ‘भारतीय संस्कृती’ ‘श्यामची आई’ वाङ्मयीन भेट पुनर्भेट 'bhartiya sanskruti' साने गुरुजी 'shyamchi aai' visit through literature revisit sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके