डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

थेट सभागृहातून (02 सप्टेंबर 2006)

चरित्राकडून किंवा चारित्र्याकडून साहित्याकडे तुम्ही किती मयदिपर्यंत जाऊ शकता? मदिपलीकडे फार जाऊ शकत नाही! तुम्हाला कुठेतरी थांबावं लागतं. मला असे काही अभ्यासक माहीत आहेत, जे जी.एं.च्या कथेमधलं ते मंदिर कुठं होतं, तो जटाधारी बाबा कुठे होता... याचा शोध घेणारे! काही साम्यस्थळं दिसतील; पण त्यावरुन मोठे निर्णायक निष्कर्ष काढता येणार नाहीत. खरं म्हणजे मोठ्या प्रतिभावंतांचं हेच लक्षण असतं की, त्याच्याबद्दल उगीच आपण वेड्यासारखं विचार करीत बसतो आणि त्यांचा रथ, दहा अंगुळे बर चाललेला असतो... तेव्हा अशा प्रकारचा जी.एं. हा एक प्रतिभावंत लेखक आहे.

'जी.एं.ची निवडक पत्रे'- खंड 3 व 4, या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात

प्रा. रा. ग. जाधव यांनी केलेलं भाषण स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे सभागृह, पुणे (10/7/2006, सार्ं 6 वा)

व्यासपीठावरील माझे सर्व मित्र-मैत्रिणी, मला ज्यांच्याबद्दल आदर आहे, ज्यांच्याशी परिचय आहे, असे माझ्यासमोर बसलेले अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ लेखक-कवी अभ्यासक आणि इतर सर्व बंधु-भगिनींनो!

जी.एं.च्या निवडक पत्रांच्या तिसऱ्या आणि चौथ्या खंडांचं प्रकाशन आत्ताच आपण केलं आहे. जी.एं. च्या मृत्यूनंतर लगेचच त्यांच्या निवडक पत्रांचा खंड काढण्यात यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. श्री.पु.भागवत आणि म.द.हातकणंगलेकर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता, पहिला खंड 1995 तर दुसरा खंड 1998 साली प्रकाशित झाला आणि आत्ता आपण तिसरा व चौथा हे दोन खंड प्रकाशित केले आहेत. या प्रकल्पपूर्तीनिमित्त मी या खंडांचे संपादक, प्रकाशक, प्रस्तावनाकार आणि ज्यांनी ही पत्रं उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे, आपणा सर्वांच्या तर्फे व माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या सर्वांच्या सहकार्याने फार मोठा ठेवा आपल्यासमोर उपलब्ध झाला आहे; मराठी वाङ्मयातला हा अमोल ठेवा आहे!

वास्तविक जी गोष्ट जी.एं.ना अजिबात आवडत नव्हती, मान्य नव्हती, ती गोष्ट आपण त्यांच्या जन्मदिनी करीत आहोत. जी.एं.ना नियतीचा एक प्रकारचा नेमेसीस (दंडशासन) अभिप्रेत होता, तोच जणू काही आपण पार पाडतो आहोत. जी.ए. हयात असते तर ही गोष्ट शक्यच नव्हती, पण आज याची खूप गरज आहे. साहित्यशिल्प निर्माण करणाऱ्यांविषयी आपल्या मनात एक प्रकारची कृतज्ञता वसत असते; ती प्रकट करावी, अशी इच्छा आपल्या मनात खोलवर असते. तो योग आशय सांस्कृतिक, नंदा पैठणकर व मौज प्रकाशन यांनी घडवून आणला, म्हणून त्यांचेही मी अभिनंदन करतो..

या तिसऱ्या व चौथ्या खंडात जी.एं.नी एकूण 36 व्यक्तींना लिहिलेली पत्रे आहेत. तिसऱ्या खंडात 17 व्यक्तींना लिहिलेली पत्रं आहेत, त्यामध्ये मुख्यत: सुभाष अवचट, जयवंत दळवी आणि माधव आचवल आहेत. चौथ्या खंडात 19 व्यक्तींना लिहिलेली पत्रं आहेत, त्यात वामन देवघरांपासून हातकणंगलेकरांपर्यंतची पत्रं आहेत. या दोन्ही खंडांना श्री. पुं.नी. एक संपादकीय लिहिलं आहे, ते आपण वाचालच! या चारही खंडांचे संपादन कशा प्रकारे केलं आहे, हे त्यात श्री. पुं. नी व्यवस्थित नमूद केले आहे. पत्रलेखनामध्ये अनेक दोष व मर्यादा असतात ते कसे काढले, ते करताना संकेत कोणते पाळले, (संशोधनाच्या व संपादनाच्या दृष्टीने) याबाबतही त्यांनी लिहिलंय, श्री.पुं.नी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. यापुढील काळातही जी.एं.ची आणखी काही पत्रं मिळण्याची शक्यता आहे ती पत्रं, या चारही खंडांच्या पुढील आवृत्त्यांत अंतर्भूत करण्यात येतील, असं सांगून आपणा सर्वांना व ज्यांच्याकडे जी.एं.ची पत्रं आहेत त्यांनाही दिलासा दिला आहे. श्री.पुं.नी एक महत्त्वाचं विधान त्या संपादकीयात केलं आहे. "अभ्यासकांपुढे व समीक्षकांपुढे सतत एक आव्हान आणि शिवधनुष्य म्हणून जी.ए. आहेत."... आता हे चार खंड उपलब्ध झाल्यानंतर मला असं वाटतंय की, या शिवधनुष्याचे दोन अर्थ आहेत. एक शिवधनुष्य 'कथालेखक जी. ए.' आणि दुसरं शिवधनुष्य 'पत्रलेखक जी.ए.'हे आहे. 

या ठिकाणी थोडीशी स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय माहिती सांगायला हरकत नाही. नंदाताईकडे मी अशी चौकशी केली की जी.एं.च्या कथा व बालसाहित्य यांची एकूण पृष्ठसंख्या किती? त्यांनी ती मला काढून दिली. स्वतंत्र कथा आणि बालसाहित्य यांची पृष्ठसंख्या 2424 आहे. या निवडक पत्रांच्या चार खंडांची पृष्ठसंख्या 1272 आहे. जी.एं.च्या मध्ये एक अनुवादक होता, त्यांनी अनुवादित केलेलं साहित्य खूप आहे. त्याची पृष्ठसंख्या आम्ही काढली, ती 2300 इतकी आहे, म्हणजे 2424, 1272 आणि 2300 पृष्ठे एवढा ऐवज ह्या प्रज्ञावंताने आपल्यापुढे ठेवलेला आहे. हे तीनही ऐवज आतून एकमेकांशी गुंतलेले आहेत! श्री.पु.ज्याला शिवधनुष्य म्हणताहेत ते शिवधनुष्य म्हणजे जी.ए.च्या मधला कथालेखक, अनुवादक व पत्रलेखक यांच्यातला अन्वयार्थ लावणं हे आहे.' आणि हे काम पुढील काळातील समीक्षकांना करावं लागेल! हे शिवधनुष्य स्थिर उभं आहे. श्री.पु.भागवत शब्द व क्रियाविशेषणं फार जपून वापरतात.

या दोनही खंडांचे आणखी एक नमूद करण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रस्तावना, पहिल्या दोन खंडांना गुरुवर्य ग.प्र.प्रधान यांची प्रस्तावना आहे; पण पहिल्या व दुसऱ्या खंडाला एकच प्रस्तावना आहे. विजय पाडळकरांनी तिसऱ्या व चौथ्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावना तशा नाहीत, पाडळकरांनी तिसऱ्या खंडाला 24 पानांची व चौथ्या खंडाला 22 पानांची प्रस्तावना लिहिली आहे. हे 24 आणि 22 मिळून 46 पानं हा सुद्धा अभ्यासकांपुढे एक प्रश्न आहे. जी.ए. च्या साहित्याची समीक्षा ही अभ्यासकांच्या समोर एक समस्या असतेच, पण मोठी समस्या ही आहे की जी.एं.च्यावर आधीच झालेली समीक्षा हीसुद्धा एक समस्या असते. दोन्हींचा अन्वय लावणं फार महत्त्वाचं आणि अवघड काम असतं. विजय पाडळकरांनी प्रस्तावनेत म्हटलंय की, मी न्यायाधीशाच्या भूमिकेतून या प्रस्तावना लिहिलेल्या नाहीत. जी.एं.चं साहित्य आकलन करून घेणारा, समजून घेणारा एक अभ्यासक, जिज्ञासू या नात्याने त्या प्रस्तावना लिहिल्या आहेत. विशेषत: चौथ्या खंडाची जी प्रस्तावना आहे त्यात- जी.ए.माणूस, जी.ए. कथा लेखक, जी.ए. पत्रलेखक, आणि या तिन्हींच्या मागे सूचित असलेलं त्यांचं जीवनविषयक, साहित्यविषयक तत्त्वज्ञान, यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

श्री.पुं.नी असं म्हटलं आहे की, प्रस्तावनारूपी शिवधनुष्य पेलवण्याचा पाडळकरांनी मनोभावे प्रयत्न केला आहे. चौथा खंड हा सांगता खंड आहे. त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात जी.एं.ची 10-12 चांगली छायाचित्रं आर्ट पेपरवर छापलेली आहेत, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चौथ्या खंडाला परिशिष्टं जोडलेली आहेत. त्यामध्ये नंदाताई व प्रभाताई या जी.एं.च्या बहिणींचे लेख दिले आहेत. म्हणजे पहा... सुहृद किंवा मित्र यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त झालेले जी.ए. आपल्यापुढे येतात, तसेच या दोन बहिणींनी लिहिलेल्या लेखातूनही अतिशय वेगळ्या प्रकारचा जी.ए. नावाचा माणूस आपल्यापुढे येतो. ते दोन्ही संबंध अतिशय गुंतागुंतीचे आहेत... मुळात जी.एं.ना गुंतागुत आवडत होतीच की. भाऊ म्हणून कसे होते, जी.ए.चं खाजगी जीवन कसं होतं, त्याचं दर्शन या दोन्ही बहिणींच्या लेखांतून घडतं. चौथ्या खंडाला आणखी दोन परिशिष्ट आहेत. या ठिकाणी सु.रा.चुनेकरांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी केलेली जी.ए.च्या साहित्याची कथांची सूची यात दिली आहे. जी.ए.ची कथा पहिल्यांदा कोणत्या मासिकात आली, आता ती कोणत्या संग्रहात आहे, अशी ही सूची अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

आता आपण जी.एं.च्या पुस्तकांबद्दल बोलत आहोत; पण या ठिकाणी कथालेखक जी.ए. हा आपला विषय नाही. आपला विषय आहे- पत्र लेखक जी.ए.. या दोन भूमिका अत्यंत वेगळ्या आहेत. या ठिकाणी असं सांगण्यात आलं की जी.ए. एकांतप्रिय होते. ते लोकांतप्रिय नव्हते. खरं म्हणजे सर्वच सर्जनशील माणसं एकांतप्रिय असतात. लोकांतप्रिय राहून असं लेखन करता येत नाही. साहित्यनिर्मिती व लेखन हा एकांताचाच व्यवहार असतो.

जी.ए.अनेकांना पत्र लिहीत असत. खरं म्हणजे मलासुद्धा त्यांचं एक पत्र आलं होतं, पण ते कुठेतरी गहाळ झालं, मला तेव्हा माहीत नव्हतं- मौज प्रकाशन पुढे त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रकाशित करणार आहे. तसं माहीत असतं तर मी ते पत्र जपून ठेवलं असतं. 'तळपट' या त्यांच्या कथेवर मी कुठेतरी लिहिलं होतं, तेव्हा त्यांचं छोटंसं पत्र मला आलं होतं. इतर समीक्षकांना त्यांची जशी पत्र येत तसंच ते होतं. माझ्यासारख्याशी ते दीर्घ पत्रव्यवहार करीत नसत, हा त्यांचा एक विवेक आहेच! तेव्हाच्या काळात अग्रेसर असे जे समीक्षक होते, त्यांना जी. एं.नी पत्रं लिहिली का, याचा शोध घेतला. माझ्या जातीच्या माणसांना जी.ए.कसं लिहीत होते, याची मला उत्सुकता होती. वा.ल.कुलकर्णींना त्यांनी लिहिलेलं एक पत्र तिसऱ्या खंडात आहे. त्यात त्यांनी लिहिलंय... 'माझ्या संग्रहात नवीन कथा नकोत, उलट आहे त्या संग्रहातल्याच अनेक कथा बाद कराव्यात अशा आहेत.' जी.एं.ना शोकात्म माणूस व शोकात्म जीवन यांचं जन्मजात आकर्षण होतं... विषयांतर हे जी.एं.च्या पत्रांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. वा.लं.ना लिहिलेल्या पत्रात जी.एं.नी रामस्वामी अय्यंगार या त्यांच्या इंग्रजीच्या प्रोफेसरचं थोडंसं चित्र काढलं आहे आणि 'हा एका शोकांतिकेचा नायक होता, त्याच्यावर मला कथा लिहायची आहे' असं म्हटलंय. युनिटी, टाइम प्लेस अॅन्ड अॅक्शन याच्यावरही त्यांनी टीका केली आहे. जी.ए. ह्या माणसामध्ये पत्रलेखन करताना सर्जनशीलतेची सर्व अंगे जिवंत, कार्यक्षम राहत असत. जी.ए. पत्रलेखक हा संपूर्ण माणूस आहे. त्यांची स्प्लीट पर्सनॅलिटी नाही. आपण पत्र लिहिताना एकच माणूस वापरत असतो, जी.एं.चं तसं नाही. समग्र जी.ए.लेखक असेल, वाचक असेल, रसिक असेल, भाऊ असेल, अभ्यासक असेल-एक माणूस!

जी.ए.नी एका ठिकाणी म्हटलंय- 'माझ्यामध्ये अनेक माणसं आहेत. वा.लं.ना लिहिलेलं पत्र छोटंसं आहे, एका समीक्षकाला लिहिलेलं पत्र आहे म्हणून सांगतो- त्यात जी.एं.नी म्हटलंय, "मी लेखक म्हणून फार थोडा आहे, वाचक मात्र जबरदस्त आहे' हे एका समीक्षकाला दिलेलं उत्तर आहे. 1272 पानांचा जी. एं. चा संपूर्ण पत्रव्यवहार हा त्यांच्या आतल्या वाचकाचा आत्माविष्कार आहे, त्यातल्या वाचकाचं विश्लेषण आहे. त्या वाचकाच्यामध्येसुद्धा एक समीक्षक आहे, परीक्षणकार आहे.

त्याच्यामध्येसुद्धा जीवनाचा विचार करणारा एक तत्त्वज्ञ आहे. हा जो सर्व पत्रव्यवहार आहे. तो वाङ्मयाचा साहित्याचा प्रकार आहे, असं मी तरी मानत नाही, म्हणजे कथा-कादंबरी- काव्य याप्रमाणे हे बायप्रॉडक्ट आहे, असं आपण म्हटलं तर जी.एं.च्या बाबतीत फार पंचाईत होते. कारण जी. एं. चं कथासाहित्य व पत्रसाहित्य यांत तरतमभाव कसा लावणार तुम्ही? त्याची एक प्रवृत्ती आहे, याची एक प्रवृत्ती आहे. दोन्ही भारावून टाकतात. एखादा लेखक वाचकांना झपाटून टाकतो हे मराठीतलं एकमेव उदाहरण आहे. हा वाचकवर्ग छोटासा आहे, तमाम वाचक वर्गाला जी.ए.झपाटून टाकत नाहीत. मी तर गंमतीनं असं म्हणेन की, जी.ए.हा मराठीतला एलिटिझम आहे; जी.एं.चा अभिजनवाद आहे. एक विशिष्ट असा वर्ग आहे- मला अनेक डॉक्टर, वकील माहीत आहेत, ज्यांना जी.एं. च्या कथा पाठ आहेत... कथा पाठ आहेत, कविता सोडा! आपल्या कविताही पाठ नसतात. जी.ए. हा झपाटलेला माणूस वाचकांनाही झपाटून टाकतो, हे आपण त्यांच्या कथांच्या बाबतीत म्हणतो, पण यापुढे असंही म्हणावं लागेल की, जी.ए.कुलकर्णींची पत्रंही वाचकांना झपाटून टाकण्याची किमया करतात.

विजय पाडळकरांनी तिसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेच्या शेवटी म्हटलं आहे की, "जी.एं.चा पत्रव्यवहार हे विलक्षण, रम्य, अद्भुत अशा प्रकारचं अरण्य आहे. या अरण्यात कधीही प्रवेश करावा- आपल्या पद्धतीने! तिथे रमावं आणि रानभूल उतरली तर बाहेर पडावं, नाहीतर तिथं गुंतून पडण्यातही आनंद आहे! Woods are lovely, dark and deep ची आठवण होते. या Woods are lovely, dark and deep मधून नेमकं काय सांगायचंय?... जी.ए.सारखे लेखक वाचकांना प्रॉब्लेम निर्माण करीत नाहीत, समीक्षकांना प्रॉब्लेम निर्माण करतात. अरण्याची इमेज/उपमा इथे त्यांनी चांगली वापरली आहे. ती रानभूल आहे!

पहिल्या खंडाची दुसरी आवृत्ती आली ना!... हेसुद्धा मराठीतलं एक आश्चर्य आहे. जी.एं.चे कथासंग्रह खपत नाहीत. सॉरी! म्हणजे मला नेमकं माहीत नाही. परंतु त्यांच्या तिसऱ्या खंडाचीही दुसरी आवृत्ती लगेच आली ना!... मी आता मोनिकाबाईना (गजेंद्रगडकर) म्हटलं. "हे सर्व लोकप्रिय ठरलं तर, यापुढच्या काळात सर्व लेखक लांबलचक पत्र लिहितील आणि मग मौज प्रकाशनाची पंचाईत होईल."

जी.एं.ची कथा आणि त्यांचे पत्रलेखन यांच्यामध्ये दुवा काय?... 'जी.एं.चं खाजगी जीवन व लेखन यांच्यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद होता; एक प्रकारचं जीवन आणि दुसऱ्या प्रकारचे लेखन असं जी.एं.च्या बाबतीत नव्हतं. असे म्हटलं जातं; पण ही सर्व विधानं तपासून घ्यावी लागतील. 'जी.एं.चं जीवन व लेखन यात अंतर नव्हतं.' हे जर खरं असेल तर त्यांचं जीवन, त्यांचे कथालेखन व पत्रलेखन यांच्यामध्ये दोन-तीन प्रकारचे पूल बांधता येतील, दुवे सांधता येतील. जी.एं.नी काही जीवनविषयक मूल्य मानली होती, त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं, एक व्हीजन होती, त्यांची जीवनमूल्यं आणि त्यांनी स्वीकारलेली कलामूल्यं, सौंदर्यमूल्यं, साहित्यमूल्यं ही त्यांच्या कथांमधून जशी स्पष्टपणे सूचीत झाली आहेत, तशी त्यांच्या पत्रांमधूनही आली आहेत... आणि हाही एक पूल बांधता येईल आपल्याला इकडून तिकडे जाता येईल! आपल्याला आणखी एक करता येईल. व्यक्ती, वास्तु, वातावरण, स्थलकाल असे काही वास्तवाचे तपशील त्यांच्या कथांमधून, खाजगी जीवनातून व पत्रांमधूनही सापडतील. ते पुन्हा एकदा तपासून पाहावे लागतील.

चरित्राकडून किंवा चारित्र्याकडून साहित्याकडे तुम्ही किती मर्यादेपर्यंत जाऊ शकता? मर्यादेपलीकडे फार जाऊ शकत नाही! तुम्हाला कुठेतरी थांबावं लागतं. मला असे काही अभ्यासक माहीत आहेत, जे जी.एं.च्या कथेमधलं ते मंदिर कुठं होतं, तो जटाधारी बाबा कुठे होता... याचा शोध घेणारे! काही साम्यस्थळं दिसतील; पण त्यावरुन मोठे निर्णायक निष्कर्ष काढता येणार नाहीत. खरं म्हणजे मोठ्या प्रतिभावंतांचे हेच लक्षण असतं की, त्याच्याबद्दल उगीच आपण वेड्यासारखं विचार करीत बसतो आणि त्यांचा रथ, दहा अंगुळे वर चाललेला असतो.... तेव्हा अशा प्रकारचा जी.ए. हा एक प्रतिभावंत लेखक आहे.

मराठीत अशा प्रकारच्या पत्रलेखनाचं आणखी एक उदाहरण मला माहीत आहे. ते म्हणजे सुलोचनाबाई देशमुख आणि नरहर कुरुंदकर यांच्यामधला पत्रव्यवहार. पण फरक असा आहे की ती पत्रं एकाच व्यक्तीला लिहिलेली आहेत. ती 'निवडक पत्रे' सुद्धा 1992 साली प्रसिद्ध झाली आणि त्याची दुसरी आवृत्ती 2003 साली आली. तो पत्रव्यवहारसुद्धा वैचारिक दर्जाचा आहे, आपल्यासारख्या रसिकांना तो भावेल!

हा जो वेडेपणा आहे ना जी.एं.च्या वाचकांचा, चाहत्यांचा... मला संगीताची आठवण येते. गायक, वादक असतात ना, तेही रसिकांना वेडे करतात. वेडेपणा! दुसरा शब्दच नाही. ते संगीतवेडे रसिक वाट्टेल ते करून, म्हणजे कर्ज काढून, चोऱ्या करून संगीतांच्या कार्यक्रमांना जात असतात. मला वाटतं संगीत कलेइतकी वेड लावणारी दुसरी कला नाही. पण जी.एं. चं वेड लागलेले अनेक वाचक मला माहीत आहेत! अक्षरश: वेड लागलेले! जी.एं.च्या कथांचं वेड! अशा प्रकारचा दुसरा साहित्यिक मराठीत नाही! त्यांची 'निवडक पत्र' हा वैचारिक ऐवज आहे! त्याचं आपण स्वागत करू या!

जास्त वेळ घ्यायला नको! आपणा सर्वांचे आभार मानतो!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके