डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'साधना' : वाचनसंस्कृती अभियान

ज्ञान आणि विज्ञान या दोन चाकांवरच आधुनिक संस्कृतीची जीवनयात्रा चालू शकते. ज्ञान-वैज्ञानिक अशी दुपेडी वाचनसंस्कृती ही आजउद्याच्या काळाची ऐतिहासिक गरज होय. अशा दुपेडी वाचनसंस्कृतीच्या वाटचालीस खड्डे नसलेल्या दुतर्फा रहदारीच्या वाटा तयार करून देण्याचा सदर अभियानाचा प्रयत्न आहे. दुतर्फा रहदारी म्हणजे लेखकांकडून वाचकांकडे आणि वाचकांकडून लेखकांकडे अशी रहदारी.

मराठी भाषकांची संख्या साधारणपणे दहा कोटी. मराठी वाङ्मयाची परंपरा सुमारे आठनऊ शतकांची आणि अखंड. लेखन-संस्कृती ही तेवढ्याच वयाची आणि वाचनसंस्कृतीचे वयदेखील तेवढेच. प्रतिवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या मराठी पुस्तकांची संख्या साधारणपणे दोन- अडीच हजार. वृत्तपत्रे पुष्कळ व इतर नियतकालिकेही बऱ्यापैकी. लोकसंख्येच्या मानाने वृत्तपत्रांचा मराठी वाचक खूपच कमी. पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्या मराठी वाचकांची संख्या कमालीची तुटपुंजी. लेखनावर जगणे इथे कुणालाही अशक्य. पुस्तक प्रकाशन व्यवसायावर जगणे जेमतेम आणि मोठ्या खटाटोपाचे. यातच मराठी भाषा, शिक्षण यांची होऊ लागलेली पीछेहाट. मराठी भाषा, शिक्षण, लेखन, वाचन, संशोधन, ज्ञानविज्ञानप्रवर्तन याबाबतीत दिसणारे वाढते औदासिन्य. तरीही आणि तरीही शिक्षितांची वाढती संख्या, साहित्यसाक्षरांची वाढती संख्या, लेखनोत्सुक व्यक्तींची वाढती संख्या आणि वाचनोत्सुक व्यक्तींचीही वाढती संख्या हेही चित्र दिसतेच. लेखनोत्सुक आणि वाचनोत्सुक यांची सहजपणे गाठ पडावी व ती तशी पडण्यासाठी काही सुविधा, साधने, यंत्रणा निर्माण व्हावी, असे कुणाला वाटणार नाही? -'साधना'प्रणित वाचनसंस्कृती अभियान यासाठीच आहे.  

'साधना' प्रणित वाचनसंस्कृती अभियान हे कोणत्याही सांस्कृतिक-वाङ्मयीन पेचप्रसंगाची प्रतिक्रिया नाही; तर वेगाने बदलत्या अशा सांस्कृतिक वास्तवाच्या आतल्या हाकेला ऐकण्याचा व ऐकविण्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संप्रेषणाची इलेक्ट्रॉनिक दृक्-श्राव्य माध्यमे आपले कला-वाङ्मयीन संचित आणि सर्जन त्यांच्या विशिष्ट वाटांनी पुढे नेत आहेत. त्या वाटांना व वाटचालीला दुसरे चाक देऊन एकेरी होऊ पाहणारी सांस्कृतिक चित्रे व विचित्रे समतोल व सुविहीत राखण्यासाठी वाचन-संस्कृती अभियान प्रस्थान ठेवत आहे. लेखक-वाचक-प्रकाशक-वितरक-ग्रंथपाल यांच्या सादप्रतिसादांनी कृतिप्रवण होत राहणारी ग्रंथसंस्कृती ही समाजाच्या व्यापक वाङ्मयीन संस्कृतीचा एक प्रभावी घटक होय. अशा ग्रंथसंस्कृतीची कालोचित व्याख्या, वर्णन व प्रसार करणे आणि वाचनवृत्ती व वाचनसवयी यांचा गुणात्मक व संख्यात्मक विकास घडवून आणणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे म्हणता येईल.  

मध्ययुगीन काळातील म्हणजे मुद्रणपूर्व काळातील प्राधान्याने ग्रंथपठणाची असलेली परंपरा आधुनिक कालखंडाचे अपत्य होय. गद्याचा जन्म व मुद्रणकलेची सोय यांमुळे वाचनसंस्कृतीला जोराची चालना मिळाली. खरे तर प्रगत मनुष्य संस्कृतीत लेखन आणि वाचन या जुळ्या अपत्यांचा जन्म झाला. तथापि लेखन आपततः केले जाते; पण वाचन मात्र सहेतुकपणे व जाणीवपूर्वक करावे लागते, हा पेच या जुळ्या भावंडांच्या बाबतीत जन्मजात ठरला. सहेतुकपणे व जाणीवपूर्वक वाचन करावयाचे किंवा त्या प्रकारे वाचन करण्यास प्रवृत्त करावयाचे म्हणजे काय, हे प्रत्येक कालखंड आपापल्या रीतीने ठरवीत असतो. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे/प्रसंगी अखंडित वाचीत जावे' हा रामदासांनी आपल्या पुतण्यांना श्रेष्ठींच्या म्हणजे वडिलांच्या निधनोत्तर केलेला बोध सर्वपरिचित आहे. आधुनिक मराठी ग्रंथसंस्कृतीचा पाया घालण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच 'वाचन' हा निबंध लिहून समाजाला वाचनसंस्कृतीचे भान आणून दिले. ग्रंथवेड्या वाचकांची एक छोटीशीच पण अखंड परंपरा तेव्हापासून सुरू झाली. ग्रंथवेड म्हणजे वाचनवेड. या छोट्या पण प्रेरक अशा परंपरेची व्यवस्थित ओळख आजउद्याच्या वाचकांना करून दिल्यास आजउद्याच्या वाचनसंस्कृतीला मोठेच आत्मबळ प्राप्त होऊ शकेल. वाचन-संस्कृती अभियानाला याची जाणीव आहेच.  

आपले आदरणीय राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्ञानसंपन्न अशा युयुत्सू भारतीय समाजाचे स्वप्न व चित्र आपल्यापुढे ठेवले आहे. विज्ञान तथा तंत्रविद्यानिपुण अशा उद्याच्या समाजाची उभारणी कालोचितच असली तरी तिला सामाजिक विज्ञाने, इतिहास, तत्त्वज्ञान, ललित व वैचारिक वाङ्मय याही क्षेत्रांतील आविष्कारांची जोड देणे इष्ट व आवश्यक आहे. विज्ञान आंधळे आणि विज्ञानेतर वाङ्मय पांगळे असते असे म्हटले जाते, ते सारतः खरेच आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोन चाकांवरच आधुनिक संस्कृतीची जीवनयात्रा चालू शकते. ज्ञान-वैज्ञानिक अशी दुपेडी वाचनसंस्कृती ही आजउद्याच्या काळाची ऐतिहासिक गरज होय. अशा दुपेडी वाचनसंस्कृतीच्या वाटचालीस खड्डे नसलेल्या दुतर्फा रहदारीच्या वाटा तयार करून देण्याचा सदर अभियानाचा प्रयत्न आहे. दुतर्फा रहदारी म्हणजे लेखकांकडून वाचकांकडे आणि वाचकांकडून लेखकांकडे अशी रहदारी. 

वाचन संस्कृतीलाही एक बाह्य भौतिक वस्तुरूप असते; तथा तिला एक आंतरिक मूल्यात्मक असे अधिष्ठानही असते. विद्यमान काळातील मातृभाषिक, राष्ट्रभाषिक व आंतरराष्ट्रीय भाषिक अशा त्रिपदरी ग्रंथसंस्कृतीला सामोरे जाणे प्रत्येक प्रगतिशील समाजाला अपरिहार्य आहे. अशा बहुभाषिक वास्तवात आपली म्हणजे मराठी माणसांची वाचनसंस्कृती आपणास घडवायची आहे. पुस्तक कोणत्याही भाषेत असो; त्याचे वाचन व आकलन अंशतः भाषासापेक्ष पण बव्हंशी भाषानिरपेक्ष असते. याचा अर्थ वाचनप्रक्रिया अनेक अर्थांनी मौलिक जीवनमान व जीवनज्ञान देणारी ठरते. वाचन हा विषय आजउद्या समाज विज्ञानांच्या म्हणजे भाषाविज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, साहित्यशास्त्र यांच्या संशोधन क्षेत्रात प्रविष्ट होईल. वाचनाचे तंत्र आणि मंत्रही निर्माण होतील. लेखन व वाचन यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याचा उलगडा करण्याचाही प्रयत्न होत राहील. वाङ्मयीन संस्कृतीत बहुधा पहिल्यांदाच लेखन आणि वाचन तथा लेखक आणि वाचक एक समानतेच्या पातळीवर उभे राहिल्याचेही दिसू शकेल. 
ग्रंथसंस्कृतीच्या वा वाचनसंस्कृतीच्या एका क्रांतिकारक वळणावर आपण आज उभे आहोत. या वळणाचा शोधबोध सामान्य वाचकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न वाचनसंस्कृती अभियान करू पाहते आहे. 

ग्रंथवाचनाला पर्याय नाही; कधीही नव्हता आणि पुढे कधीही असणार नाही. पसायदानाच्या आठव्या ओवीत संत ज्ञानदेवांनी ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथवाचक विजयी व्हावेत, असेही एक पसायदान मागितले आहेच. महात्मा फुल्यांनी एका 'अखंडा'त म्हटले आहे:

"थोडे दिन तरी मद्य वर्ज करा। 
तोच पैसा भरा। ग्रंथासाठी।। 
ग्रंथ वाचिताना मनी शोध करा। 
देऊ नका थारा। वैरभावा।।".. 

मद्यपानादी वर्ज्य करा, त्यावर खर्च होणारा पैसा ग्रंथखरेदीसाठी वापरा आणि ग्रंथवाचक हा आत्मशोध असतो हे ओळखा, हा त्या महात्म्याचा संदेश आहे. जीवन जगायला परिस्थिती शिकवते; पण जीवन समजून घेण्याची शिकवण पुस्तके देतात आणि जीवन जगण्याची खरी सार्थकता ते जगणे समजून घेण्यातच असते व हेच कार्य वाचन-संस्कृतीला अभिप्रेत आहे. 

मनुष्याच्या चित्रविचित्र जिण्याचे अवघे ब्रह्मांड पुस्तकांच्या शब्दब्रह्मात साठवलेले असते. सातआठशे वर्षांच्या मराठी वाङ्मयपरंपरेतही असे ब्रह्मांड आहेच आहे व आजउद्याच्या नव्या ग्रंथनिर्मितीमध्ये ते असेलच. प्रगल्भ वाचनसंस्कृती हे आधुनिक सुसंस्कृत समाजाचे एक व्यवच्छेदक लक्षण होय. याचे भान राखून मराठी माणसांची वाचनसंस्कृती तिच्या विविध अंगोपांगांचा, गुणवत्तेचा तथा उणिवांचाही उलगडा करीत करीत प्रगल्भ, प्रभावी करणे हे या अभियानाचे ध्येय आहे. यास कालमर्यादा नाही; तर बदलत्या कालक्रमानुसार अखंडपणे आपली वाचनसंस्कृती प्रवाही व प्रगत राखण्याची महत्त्वाकांक्षा आहे. 

हीच वाचनसंस्कृतीची सर्वांना हाक आहे...!

Tags: आधुनिक संस्कृती. विष्णुशास्त्री चिपळूणकर महात्मा फुले रामदास स्वामी वाचन मानवी संस्कृती मध्ययुग पुस्तके मराठी साहित्य Vishnushastri Chiplunkar Mahatma Fule Ramdas Swami Reading Human Culture Middle age Books Marathi Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके