डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विंदा : वाङ्मयीन-सांस्कृतिक ध्येयवादाचे सर्जनशील प्रतिनिधी

कवी, बालसाहित्यकार, भाषांतरकार, ललित निबंधकार आणि समीक्षक या विंदांच्या पंचविध भूमिका. या पाचही भूमिकांमागील व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व एकच आणि ते आहे सांस्कृतिक शोधकाचे, सर्जनशील आत्मशोधकाचे. तो शोधक आणि आत्मशोधक सतत एकमेकांना एकमेकांच्या दर्पणात पाहून, तपासून, सुधारून, संस्कारून वाटचाल करीत आहेत. अगदी हातात हात घालून!

कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांना राष्ट्रीय प्रतिष्ठेचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार लाभल्याबद्दल साधना विश्वस्त तथा साधना परिवारातील सर्व लेखक, वाचक, हितचिंतक वा सर्वांच्या तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! विंदा करंदीकर हे 'साधना चे कविलेखकही आहेत; म्हणून या मनःपूर्वक अभिनंदनास अभिमानपूर्वकतेची जोड देत आहोत, अगदी मनापासून...! साने गुरुजी आणि त्यांनी सुरू केलेली साधना-चळवळ ज्या प्रकारच्या वाङ्मयीन-सांस्कृतिक ध्येयवादाचा पुरस्कार गेली अठ्ठावन्न वर्षे अखंडितपणे करीत आली. त्या वाङ्मयीन सांस्कृतिक ध्येयवादाचेच कविवर्य विंदा करंदीकर हे सर्जनशील प्रतिनिधी आहेत.

"देश, धर्म, रक्ताचे नाते । फोडित धरणे नि बंधारे 
भिजवित माती काळी गोरी । पहा धावते अखिल जगावर
जीवननौका नाचे त्यावर.../ स्वेदाची ही अखंड गंगा....//" 

विंदा करंदीकरांचे हे स्वेदगंगेचे आंतरभारतीय व विश्वभारतीय तत्त्वज्ञान वेगळ्या भाषेतील ‘साधना’ चेच तत्त्वज्ञान आहे, असे म्हणता येईल.

भारतीय ज्ञानपीठाच्या पुरस्कार-निवड समितीने म्हटले आहे, "विंदा करंदीकर यांचे प्रदीर्घ सर्जनशील जीवन हे ऐहिक संघर्ष आणि सौंदर्यात्मक आविष्काराच्या परिपूर्णतेसाठी अखंडपणे चालू असलेला शोध यांनी भरलेले आहे. आधुनिक मराठी कवींमध्ये विंदा करंदीकर हे सर्वांत मोठे प्रयोगशील आणि तेवढेच मोठे सर्वसमावेशक कवी होत. निबंधकार, समीक्षक तथा भाषांतरकर म्हणूनही या साहित्यिकाने केलेले योगदान लक्षणीय आहे. "

विंदा करंदीकरांच्या सुमारे साठ वर्षांच्या वाङ्मयीन निर्मितीचे सारभूत स्वरूप वरील अभिप्रायातून यथार्थपणे स्पष्ट झालेले आहे.

कवी, बालसाहित्यकार, भाषांतरकार, ललित निबंधकार आणि समीक्षक या विंदांच्या पंचविध भूमिका. या पाचही भूमिकांमागील व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व एकच आणि ते आहे सांस्कृतिक शोधकाचे, सर्जनशील आत्मशोधकाचे. तो शोधक आणि आत्मशोधक सतत एकमेकांना एकमेकांच्या दर्पणात पाहून, तपासून, सुधारून, संस्कारून वाटचाल करीत आहेत. अगदी हातात हात घालून! म्हणूनच...

"जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे ।
जिचा आत्मा एक आहे । ती जनता अमर आहे।" 

अशी साम्यवादी घोषणा करणारा हा कवी अखेर 'अष्टदर्शनां’ च्या व्यापक वैश्विक तत्त्वज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतो; नव्हे तिथवर आपणा सर्वांनाही ओढत घेऊन जातो. व्यथित मनुष्यजीवनाच्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्याने पाऊल टाकले, त्याला शेवटी आपण तत्त्वज्ञानाच्या 'धर्मक्षेत्रावर च उभे होतो, याचे तीव्र भान आल्याशिवाय राहात नाही. कवीची तत्त्वज्ञात आणि कवितेची तात्त्विक अवतारात परिणती होणे, हे श्रेष्ठ अभिजात कवित्वाचेच लक्षण होय; विंदा करंदीकर या वर्गाचे कवी आहेत.

कवित्वाच्या सामर्थ्याबरोबरच त्याच्या अंगभूत व्यक्तिविशिष्ट मर्यादा ओळखणारा, हा अनन्यसाधारण प्रतिभावंत होय. प्रयोगशीलतेनेही कुठे थांबावयाचे, हेही विंदांना ओळखता आले. क्रांतिकारक विचारप्रणाल्या कुठे अडतात, अडखळतात हेही त्यांनी जाणले. सर्जनाची प्रवृत्ती व निवृत्ती यांतील तारतम्यही त्यांनी जाणले. गर्जनच्या व गाजण्याच्या सीमारेषाही त्यांना दिसल्या. सांस्कृतिक शोध आणि सर्जनशीलतेचा आत्मशोध, यांच्यातील वाटा आणि वळणे तुडवीत गेलेला हा थोर सारस्वत आहे, यात शंकाच नाही.

बालसाहित्य हे कोणत्याही भाषेतील साहित्यक्षेत्रात सर्वांत महत्त्वाचे आणि सामान्यतः मराठीत तरी सर्वात उपेक्षित असे दालन आहे. विंदा करंदीकरांसारख्या प्रतिभाशाली कविवर्याने, या बालसाहित्याला मराठीत गुणवत्ता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. याच्या मागे मराठी साहित्य व्यवहाराबद्दल विंदांना जे व्यापक आणि सर्वांगीण असे भान होते, ते फार महत्त्वाचे आहे. शेवटी कोणत्याही गंभीर प्रकृतीचा साहित्यिक त्या भाषेतील वाङ्मयीन संस्कृतीला काही एक देणे लागतो, ही जाणीव फार महत्त्वाची आहे. विंदांच्या बालसाहित्यामध्ये त्यांच्या कवितेमागे आहे तेवढेच आणि तसलेच वाङ्मयीन गांभीर्यदेखील आहे. बालसाहित्य हा काही दुय्यम उत्पादनाचा किंवा निर्मितीचा भाग नाही. विंदांची ही दृष्टी कुठे तरी साने गुरुजींच्या वाङ्मयीन दृष्टीशी मिळतीजुळती आहे. बांधीलकी आणि गांभीर्य यांनी बालसाहित्याची आमरण जोपासना करणारा जो अल्पसंख्य असा मराठी लेखकवर्ग आहे, त्यात विंदांची गणना केली जाईल.

भाषांतर हे क्षेत्रही विंदांच्या साहित्य-संस्कृती विषयक गंभीर आणि जबाबदार भूमिकेचेच निदर्शक आहे. प्रत्येक मराठी लेखकाने एक-दोन चांगली भाषांतरे करावीत. असे विंदांचे म्हणणे आहे आणि हे म्हणणे, त्यांनी स्वतः ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, किंग लियर, फाउस्ट यांसारख्या भाषांतरीत कृतींतून स्वतः आचरून दाखविले आहे. ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभावाचे अर्वाचीनीकरण, हे तर विंदांच्या व्रतस्थ वाङ्मयीन भूमिकेचे नमुनेदार उदाहरण होय. साहित्यक्षेत्रात निर्मितीच्या गुणवत्तेचा तोल सांभाळणारे महत्त्वाचे पर्यायी साधन म्हणजे भाषांतर. स्वतंत्र ग्रंथनिर्मिती आणि भाषांतरित साहित्यकृती यांचा मेळ घालण्याची जबाबदारी, सध्याच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक पर्यावरणात फारच आवश्यक ठरते. या बाबतीतही साने गुरुजी आणि विंदा करंदीकर यांचे एकसंवादी नाते असल्याचे लक्षात येते.

‘परंपरा आणि नवता’ सारखे समीक्षालेखन करंदीकरांनी केले आहेच, साहित्यमूल्यांची समीक्षा हा त्यांचा मूळ इंग्रजी लेखसंग्रहही मराठीत आला आहे. समाज, त्यातील लहान-मोठे संघर्ष, त्यातले प्रक्षोभक उद्रेक, त्यातील समस्या, चळवळी, आंदोलने, आंतर्विरोध हे सर्व साहित्याचे घटक आहेत, अशी ठाम भूमिका समीक्षक म्हणून विंदा करंदीकरांनी घेतली आहे. खरे तर विंदांचे एकूण साहित्य, एक परम अर्थाने समीक्षाच आहे. साहित्य आणि समीक्षा या श्रेष्ठ लेखकाच्या बाबतीत एकरूप किंवा एकात्मच असतात. समाजातील व्यक्ती व व्यक्तीसमूह, तथा व्यक्ती व व्यक्तीसमूहातील समाज, हा साहित्याचा खरा आव्हानात्मक विषय आहे. सर्जनाचा एक प्रचंड मोठा अवकाश' विंदांच्या या भूमिकेतून दिसू लागतो. या विशाल अवकाशाचे आव्हान आणि आवाहन पेलणारा आज-उद्याचा मराठी साहित्यिक हीच खरी विंदा करंदीकरांची देणगी ठरेल!

गेल्या वर्षी अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही’ ला मिळालेला साहित्य अकादमी चा पुरस्कार आणि या वर्षी विंदा करंदीकरांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार, हे दोनही पुरस्कार मराठी कवी व कवितांचा सन्मान करणारे आहेत. 'ज्ञानपीठ' पुरस्कार निवड समितीने विंदांच्या ‘अष्टदर्शने’ चा उल्लेख गौरवाने केला आहे. अष्टदर्शने या अभंगरचनेत इहवादी, जीवनवादी व विज्ञानवादी अशा पश्चिमी आणि चार्वाकासारख्या भारतीय तत्त्वज्ञाच्या विचारांची निरुपणे केली आहेत. इहवाद हा विंदांचा स्थायीभाव होता.

विंदांसारख्या कवींमध्ये प्राचीन मराठी काव्यपरंपरेच्या तत्त्वधारांचे अनेक अंश जाणवतात हे खरे; तथापि विंदांची जवळची परंपरा मर्ढेकरांपासून मानली तर मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा रीतीने ही परंपरा मानावी लागेल. दलित काव्य व ग्रामीण परंपरा यातच येईल... मराठी भाषा ही राष्ट्रभाषा होऊ शकत नाही, तसंच विश्वभाषाही होऊ शकत नाही, हे दुर्दैवाने खरे असले तरी मराठी साहित्य आणि साहित्यिक हे राष्ट्रीय साहित्य व साहित्यिक, तसेच वैश्विक साहित्य व साहित्यिक होऊ शकतात याचा आत्मविश्वास विंदांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे निर्माण व्हावा, हेच त्या पुरस्काराचे महात्म्य आहे!

Tags: ज्ञानपीठ पुरस्कार काव्य कविता मराठी साहित्य विंदा करंदीकर Gyanpeeth Award Marathi Literature Poem Poetry Vinda Karandikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके