डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बंधुतेचा आचारव्यूह

बंधुता हे मानवी जीवनातील प्राचीनतम मूल्य आहे. समाजसेवेचे कार्य करताना कार्यकर्त्याने आपापली व्यक्तिगत जात-जमात, वर्ग, धर्म, राजकीय प्रणाली वगैरे विसरून सेवेचे कार्य करावे. मानव समाज स्वातंत्र्य, समता नि बंधुता यांच्या आदर्श व सुखावह व्यवस्थेत पदार्पण करणारच असेल, तर त्या वेळचे त्याचे पाय हे भोळ्याभाबड्या माणुसकीच्या मातीनेच घडलेले असतील; धर्म तत्त्वज्ञाने, तत्त्वप्रणाल्यांच्या मातीने नव्हे.

साहित्याची सेवा ही एक स्वतंत्र जबाबदारी आहे. समाजाची सेवा हीदेखील तशीच एक वेगळी जबाबदारी आहे आणि या दोन प्रकारच्या जवाबदाऱ्यांची पुन्हा एक तिसरी अशी परस्परसंबंध जबाबदारी आहे. असा हा त्रिविध जबाबदाऱ्यांचा व्यूह आहे, असे मला वाटते. या व्यूहाची विशेषतः समाजकार्य व साहित्य यांच्या परस्परसंबंध नात्याची काहीशी अंतःप्रेरित जाणीव बंधुता प्रतिष्ठानला व्हावी व या सेवाभावी संस्थेने प्रामुख्याने त्या अंतःप्रेरणेतूनच या साहित्य संमेलनाची योजना करावी, या गोष्टीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिकतेच्या विद्यमान टप्प्यावर आपल्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाच्या काही नव्या गरजा स्पष्टपणे आपणांस जाणवत आहेत. त्या गरजांना नेमकेपणाने ओळखणे, हीच खरी महत्त्वाची गरज आहे. या प्रतिष्ठानने आपल्या परीने ही गरज ओळखली व तिला 'बंधुता' हे नाव दिले.

बंधुतेचे मूल्यभान

बंधुता हे मानवी जीवनातील प्राचीनतम मूल्य आहे. मित्रतेच्या मूल्यातील जिवाभावाचा, जिव्हाळ्याचा नि जवळीकीचा गुणात्मक अंश वाढविला की, त्यालाच बंधुतेचे कौटुंबिक वजन व वलय प्राप्त होते. मानवता म्हणजे मित्रतेने, बंधुतेच्या वळणाने गाठलेली चरम सीमा. पण चरम सीमेवरती अनेक कल्पना अमूर्त होतात. अगोचर, अगम्य होतात, म्हणून मानवतेची सगुण साकार प्रचिती ज्यातून येते, ते बंधुतेचे मूल्य माणसाच्या आवाक्यात येते. निर्गुण मानवतेची सेवा बंधुतेच्या सगुण स्वरूपात आपण करू शकतो. आधुनिक मनुष्यसमाजात इहवादी मूल्यप्रणालींनी बंधुतेला धर्मकल्पनांच्या कक्षेबाहेर काढले व तिला व्यापक ग्राह्यता व प्रस्तुतता प्राप्त करून दिली.

फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगभर प्रभावी ठरलेल्या तत्त्वसरणीत 'बंधुता' हे एक तत्त्व होतेच. आंतरराष्ट्रीय साम्यवादाने कॉम्रेडशिपचे जे तत्त्व पुरस्कृत केले, ती बंधुतेचीच एक नवीन व्याख्या होती. साथी, भाई, बिरादर या संज्ञांनी बंधुतेचीच विशिष्ट रूपे प्रसृत केली. समाजसेवेच्या उपक्रमांत कार्यात व एकत्रपणे काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याने आपापली व्यक्तिगत जातजमात, वर्ग, धर्म, राजकीय प्रणाली वगैरे विसरून बंधुभावाने असावे; जात, धर्म, राजकारणनिरपेक्ष असे  समाजसेवा कार्याचे क्षेत्र राखावे. बंधुतेच्या आड येणाऱ्या सर्व बाबी सेवाभूमीवर विसराव्यात!
 
परिवर्तनवादी विचारव्यूहांचा पेच व सद्भावाच्या आचारव्यूहाची प्रस्तुतता
 

समाजातील भेदाभेद, उच्चनीचता, विषमता इत्यादींच्या मुळावरच घाव घातल्याखेरीज बंधुतेची खरी रूपे व सेवाकार्य यांची रुजवण होणार नाही, हे म्हणणे तत्त्वतः खरेच आहे. या प्रकारच्या मूलभूत परिवर्तनवादी विचारप्रणालीही पूर्वीपासून आजतागायत निर्माण होत आल्या, हेही आपण जाणतोच. गौतम बुद्ध, चार्वाक, ज्ञानोबा-तुकोबा, रूसो, कार्ल मार्क्स, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांची व त्यांनी प्रसृत केलेल्या दर्शनांची या संदर्भात सहजपणे आठवण व्हावी. तथापि त्यांची फलश्रुती काय आहे?

आज विसाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यावर बहुतांश अशा आजवरच्या दर्शनांची पिछेहाटच माणसाने घडवून आणली आहे; असाच निष्कर्ष आपणास दुर्दैवाने काढावा लागेल. या अनुषंगाने एक प्रतिपादन मला जाणकारांसाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मुख्यतः विचारार्थ करावेसे वाटते; अत्यंत अनिश्चित व बेभरवशाचा हा माणूस नावाचा प्राणी मातृभावाच्या, मानवतेच्या दृढ पाशात आणून कसा माणसाळवता येईल? यासाठी यापूर्वीही धर्म, तत्त्वज्ञाने, तत्त्वप्रणाली, विज्ञाने, चळवळी, आंदोलने, लढे लढायला शासनसत्ता व इतर सामाजिक सत्ता यांनी प्रयत्न केले, पण माणूस पुरेसा माणसाळला नाही. धर्मसत्ता, दंडसत्ता व दार्शनिक सत्ता यांच्या आटोक्यात हा माणूस नावाचा प्राणी आणता आला नाही.

या संदर्भात सर्वांत जास्त प्रामाणिक व थेट सायास दार्शनिकांनी केले, यात शंकाच नाही. अशा मूलभूत परिवर्तनवादी दर्शनांची व दार्शनिकांची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे व बहुधा यापुढेही चालत राहील. विसाव्या शतकाच्या या अंतिम टप्प्यावर मानवसमाजाच्या सांस्कृतिक परिवर्तनामागील परंपरागत दार्शनिक अधिष्ठानाचे गृहीतकच शंकास्पद ठरत आहे. हा मानवसमाज दर्शन व दार्शनिक, विचारप्रणाली व विचारवंत यांच्या उपकरणांनी व हत्यारांनी इष्ट त्या रूपात परिवर्तित होईल काय, परिवर्तनाची त्यांची प्रारूपे फलदायी ठरतील काय, त्यांच्या चळवळी व लढे यांतून अपेक्षित बदल होतील काय, अशा प्रकारचे प्रश्न माझ्यासारख्याला अस्वस्थ करीत राहतात. 

बंधुताप्रेरित व बंधुतासाधक समाजसेवा ही सद्भावनांवर, सदिच्छांवर अधिष्ठित आहे. ती तत्त्वज्ञाने व विचारप्रणाली यांवर अधिष्ठित नाही. बंधुतेचा हा आचारव्यूह आहे, विचारव्यूह नाही. त्यात भोळेभाबडेपणाही आहे. निरागस अ-विचारही आहे. त्यात सेवेची प्रेरणा आहे. सत्तेची व प्रभुत्वाची आकांक्षा नाही. त्यात माणसाची नाना दुःखे व संकटे समरसून पाहण्याची व निवारण्याची कळ आहे. माणसाच्या आधिव्याधी, अगतिकता, अपंगता, असहायता, अनाथता यांना सक्रिय प्रतिसाद देण्याची ओढ आहे. माणसाच्या व्यथावेदनांना माणुसकीच्याच विशुद्ध स्वरूपात ओळखण्याची असोशी आहे. माणसाच्या शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक, दुःखदैन्यांना माणूसपणाएवढीच जात असते. तेवढाच एक धर्म असतो.

तेवढाच देव व देश असतो. माझी अशी एक दृढ श्रद्धा आहे की, कधी काळी हा आपला मानवसमाज स्वातंत्र्य, समता नि बंधुता यांच्या आदर्श व सुखावह व्यवस्थेत पदार्पण करणारच असेल, तर त्या वेळचे त्याचे ते भाग्यवान पाय हे भोळ्याभाबड्या माणुसकीच्या मातीनेच घडलेले असतील; धर्म, तत्त्वज्ञाने, तत्त्वप्रणाली यांच्या मातीने नव्हे. जोपर्यंत आईबाप, मूल, बहीण, भाऊ, पती-पत्नी ही नैसर्गिक नाती टाळून माणसाला या जगात अवतरता येणार नाही, अस्तित्वात राहता येणार नाही; तोपर्यंत तरी नात्यांच्या भोळ्याभाबड्‌या बंधनात व जाणिवांतच मानव समाजाची मुक्तीही दडून राहील.

ही मुक्ती मी आध्यात्मिक अर्थाने म्हणत नाही, तर लौकिकाच्या अर्थाने. ही मुक्ती म्हणजे अटळ ठरणाऱ्या व्यथावेदनांतून बाहेर पाडणारी मुक्ती. माणसाचे माणूसपण म्हणजेच त्याची प्रकृती. ही प्रकृती माणसाची तथाकथित संस्कृती नव्हे, सेव्य मानणे, स्वतःला तिचा सेवक मानणे व जमेल तेवढी सेवा करणे या गोष्टी पापपुण्याच्या नाहीत, परोपकाराच्या नाहीत, कर्मविपाकाची फळे नाहीत हे स्वच्छपणे जाणून घेतले पाहिजे. सेव्य-सेवक-सेवा यांचा जन्म मानव्याच्या कुशीत होतो, धर्माच्या व संस्कृतीच्या नव्हे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. 

समाजकार्य व साहित्य यांच्यातील अनुबंधाची ऐतिहासिक अन्वर्थकता 

या संमेलनामागील भूमिका सर्वस्वी नवीन नसली, तरी तिच्यात एक प्रकारची ऐतिहासिक अन्वर्थकता आहे. या शतकाच्या उत्तरार्धात व विशेषतः राजकीयदृष्ट्‌या स्वतंत्र झालेल्या आपल्या समाजात आपले साहित्य व समाज ज्या प्रवृत्तींनी व जाणिवांनी उत्तरोत्तर प्रभावीत होत गेले, त्यांतून सामाजिक सेवाकार्य व साहित्य यांच्यातील अर्थपूर्ण नात्याचे भान ठळक होत गेले. स्वातंत्र्योत्तर प्रवृत्ती या प्राधान्याने परिवर्तनवादी होत्या आणि जाणिवा व्यापक मराठीभाषक लोकजीवनाशी व त्यातील आपत्ती विपत्तींशी भिडू पाहणाऱ्या अशा विस्तारशील होत्या.

‘एक गाव एक पाणवठा’, ग्रामायन, युवक क्रांती दल यांसारख्या उपक्रमांची व संघटनांची या संदर्भात सहज आठवण व्हावी. समाजकार्याच्या विकसनशील क्षेत्रात कितीतरी दालने आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृद्धांच्या समस्या, वेश्या व देवदासींचे प्रश्न, मूकबधिर तथा मनोरुग्णांचे प्रश्न, निराधार परित्यक्तांचे प्रश्न, विकलांगांचे प्रश्न, दारिद्र्‌यपीडितांचे व बेरोजगारांचे प्रश्न यांनी समाजसेवी कार्यक्षेत्र व्यापलेले आहे. साहित्यक्षेत्रातही साठोत्तरी कालखंडात दलित, ग्रामीण, जनवादी यांसारखे परिवर्तनवादी साहित्यप्रवाह सुरू झाले.

खरे तर स्वातंत्र्योत्तर अर्धशतकातील स्वयंसेवी क्षेत्रातील कार्य व उपक्रम तथा शासकीय क्षेत्रातीलही समाजसेवा व समाजकल्याण विभागातील कार्य व उपक्रम यांचा व्यवस्थित इतिहास लिहिणे अत्यंत निकडीचेही आहे व महत्त्वाचेही आहे. असा इतिहास उपलब्ध झाला, तर त्यातून समाजसेवाकार्याचे एक वास्तव व संपूर्ण आधारचित्र प्राप्त होईल. आपल्या सामाजिक संवेदनशीलतेचे स्वरूपही त्या इतिहासाधारे आपणांस कळू शकेल.

मनुष्य- जीवनातील विविध अर्थांनी ठरणारे जे जे सेवायोग्य आहे, दूर केले पाहिजे असे जे सोसणे आहे, त्याची प्रचिती साठोत्तरी कालखंडातील साहित्याने निर्विवादपणे दिलेली आहे. हे साहित्य केवळ रूढ ललित साहित्यप्रकारांतच आहे असे नाही तर सामाजिक दस्तऐवज, अनुभव व आठवणी, निबंध व अहवाल, चरित्रे व आत्मचरित्रे, शब्दचित्रे व प्रसंगचित्रे या प्रकारच्या ललितेतर वाङ्मयनिर्मितीमधून दिसून येते. महान साहित्याचा मांड ज्या व्यापक जीवनाच्या जाणिवांवर व विशाल वास्तवाच्या दर्शनावर उभा असतो, तो मांड दाखवून देण्याचे कार्य या साठोत्तरी साहित्याने केले आहे. या साहित्याचे जे काही कलात्मक संचित आहे, ते तसेच असण्यात आधीच्या कलावादाची इयत्ताही कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. 

माणूस हेच साहित्याचे आद्य व अंतिम आराध्य दैवत आहे. माणसाचे जीवनानुभव केवळ मनुष्यसापेक्ष राखण्याकडेच साहित्याची प्रवृत्ती असते. माणसाच्या अनुभवांना केवळ माणसाचे अनुभव म्हणून उभे करण्याची धडपड साहित्य करते. एका विशिष्ट अर्थाने माणसाच्या गोतावळ्यामधून फक्त माणसाचाच शोध घेण्याचा सायास करते. माणसाच्या अनुभवातील मनुष्यसापेक्षता फक्त अबाधित राखून धर्म, राजकारण, विचारप्रणाली, जातपात आदी स्वरूपाच्या सापेक्षतांना आवर घालते. एका परीने अनुभवांच्या या बाह्य उपाधींना निस्संदर्भ करते. म्हणूनच चांगले धर्मसाहित्य हे धर्मनिरपेक्षतेची व निखळ मानव्याचीच प्रचिती देते, चांगले राजकीय साहित्य हे राजकारण निरपेक्ष अशा माणूसपणाचाच प्रत्यय देते. बंधुता कार्य आणि भ्रातृभाव ही माणुसकीच्याच प्रचितीची रूपे आहेत, हे सांगण्याचीही गरज नाही आणि अशा बंधुतेचे आणि भ्रातृभावाचे नेमके संवेदन या जगात फक्त साहित्यकलेलाच असते.

भ्रातृभावाची सूक्ष्म प्रस्फुरणे साहित्यातूनच केवळ आजवर प्रकट होत आली आहेत व म्हणूनच मनुष्यसंस्कृतीत विश्वात्मक होण्याची क्षमता फक्त साहित्याजवळच असल्याचे सत्य पुन्हापुन्हा उद्घोषित करण्यात आले आहे. भ्रातृभावाचाच हा आविष्कार आहे, ही श्रद्धा साहित्याने आजन्म जतन केलेली आहे. एका दृष्टीने साहित्य ही भ्रातृधर्माचीच अभिव्यक्ती होय. मानवासकट असलेली या जगातील समग्र सजीव सृष्टी ही एक प्रकारच्या भ्रातृसंबंधातूनच अस्तित्वात आलेली व राहिलेली आहे. समाजाचे, व्यक्तीचे व संस्कृतीचे पारिस्थितिवैज्ञानिक (इकॉलॉजिकल) असे अद्ययावत आकलन आहे. त्यातूनही माणसाच्या जैविक भ्रातृभावाचे, परस्परावलंबनाचे सूत्रच अधोरेखित करण्यात आलेले आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे समस्यानिवारक असे निरंतर उपलब्ध असणारे साधन आहे. वेगवेगळ्या संदर्भांत वेळोवेळी हे साधन हाती घेण्याची गरज असते. 

विद्यमान पर्यावरणात विविध प्रकारच्या सत्ताकांक्षा प्रभावी ठरल्या आहेत. राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता, कलावाङ्मयीन सत्ता, धार्मिक सत्ता, ज्ञानविज्ञानाची सत्ता, कर्मकुशलतेची सत्ता यांसारख्या अनेक प्रकारच्या सत्ताकांक्षांनी माणसाचे अंतरंग व्यापून टाकलेले आहे. सत्तासंपादनाच्या रेसकोर्सवरील ही अश्वरूपे मनुष्यसंस्कृतीमधील एक अपूर्व वास्तव होय. कारण त्यात नैतिक सत्तेचा एकहीं शर्यतीचा घोडा नाही. नैतिक सत्ताकांक्षा आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. नैतिक सत्ता, संतसाधुत्व, यतिधर्म या कल्पना आज अनाकलनीय झालेल्या आहेत.

प्रत्येक समाजात त्याच्या परंपरेत कधी काळी या प्रकारची नैतिक सत्तास्थाने व्यक्तिरूपाने, आचाररूपाने अस्तित्वात होती. अशी सत्तास्थाने आपण कायदा व संविधाने यांच्या कृत्रिम यंत्रणेत दडपून टाकलेली आहेत. समाजातील व समाजाचे नैतिक मूल्यभान जोपर्यंत क्षीणबल आहे, नैतिक सत्तेची स्पृहाच जिथे उरलेली नाही, अशा काळात व परिस्थितीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे खरे अर्थ व महत्त्व कळणे व वळणे कसे शक्य आहे? मनुष्याच्या दुःखपरिहाराशी जातिवंत बांधिलकी नसेल, तर नैतिक सत्तेच्या सोपानाची पहिली पायरीदेखील आपण ओलांडू शकणार नाही. त्या पहिल्या पायरीकडे जाण्यासाठी भ्रातृभावाचे आचरण व भ्रातृभावाचे वाङ्मय आपणांस मदत करील अशी माझी श्रद्धा आहे.

(8 आणि 9 मे रोजी पुणे येथे भरलेल्या पहिल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनातील रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा)

Tags: अभिव्यक्ती स्वातंत्र्य भ्रातृभाव बंधुता राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन साहित्य विशेष freedom of expression brotherlyhood comredship rashtriya bandhuta sahitya sammelan literature special weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके