डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

द्वितीयपुरुषी समाज आणि क्रांती

लोकशाही राबवू पाहणाऱ्या लोकांमधे असे अगतिकतेचे वातावरण पसरू लागले तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागू नये. फार काय, पंधरा वर्षे तरी निदान आणीबाणी जाहीर करावी म्हणजे देशाचा भरमसाट सुटलेला गाडा काहीसा ताळ्यावर येईल, गाडी पुन्हा रुळावर येईल असे पुष्कळ लोक म्हणू लागले आहेत.

 

सध्या सर्व देशभर कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सामान्य नागरिकास आपले जीवन कायमचे धोक्यात आहे असे वाटू लागले आहे. खुद्द मुंबईत दिवसाढवळ्या होणाऱ्या गुंडांच्या अत्याचारावरून आपण कायद्याच्या राज्यातून पेंढाऱ्यांच्या राज्यात तर जात नाही ना किंवा गेलो नाही ना, अशी शंका प्रत्येकाच्या मनात घर करून राहू पहात आहे.

कायद्याचे राज्य म्हणजे 'काय द्यायचे' राज्य सुरू झाले आहे. आपल्या कामासाठी कुठल्याही सार्वजनिक किंवा सरकारी यंत्रणेत जा. 'काय द्यायचे?' हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आढळतो. पूर्वी हे देण्याघेण्याचे व्यवहार गुप्तपणे 'अंडर द टेबल' तरी होत असत पण आता लोक इतके निढाविलेले दिसतात की देण्याघेण्याची बात उघड-उघड समोरासमोर 'ॲक्राॅस द टेबल' व्हायला लागली आहे. याचाच अर्थ कायद्याचे राज्य जाऊन लाचलुचपत, वशिला, चिठ्ठीचपाटीचे राज्य देशात सध्या अस्तित्वात आहे. कुठेही आणि कुणाकडेही जा घरोघरी या विषयावर चर्चा चाललेली आढळून येते. पण या चर्चेत प्रचलित परिस्थितीवर उपाय काय, याचा कोणी विचार करताना दिसत नाही. असंच चालायचं, आपण कोण काय करणार? असा सूर सर्वत्र ऐकू येतो.

लोकशाही राबवू पाहणाऱ्या लोकांमधे असे अगतिकतेचे वातावरण पसरू लागले तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागू नये. फार काय, पंधरा वर्षे तरी निदान आणीबाणी जाहीर करावी म्हणजे देशाचा भरमसाट सुटलेला गाडा काहीसा ताळ्यावर येईल, गाडी पुन्हा रुळावर येईल असे पुष्कळ लोक म्हणू लागले आहेत.

आणीबाणीचा उपाय जालीम खरा पण तितकाच धोकादायक! त्यातून काय उद्भवेल ते सांगता येत नाही.

प्रत्येक देशाची जशी कुवत तशी राज्ययंत्रणा तेथे निर्माण होते असे म्हणतात. त्या दृष्टीने पहाता आपल्या देशात चाललेली कायदा आणि सुव्यवस्था (?) देशांतील नागरिकांच्या एकंदर वर्तणुकीला साजेशीच आहे असे म्हटल्यास ते वावगे वाटू नये. सरकारच्यानावाने खडे फोडणारे असंख्य नागरिक प्रत्यक्षात कसे वागतात हे पाहिले म्हणजे असे वाटू लागते की लोकशाही, समाजवाद, क्रांती यांच्याबद्दल कितीही ओरडा केला तरी आपले लोक अजून संरजामशाहीच्या स्वप्नात गाडलेले आहेत.

सरकार नालायक, कबुल. पोलीस बेफिकीर; हेही कबूल. पण ज्या ठिकाणी किंवा ज्या संस्थेत सरकारचा फारसा संबंध येत नाही त्यांची तरी काय अवस्था आहे? आपली विश्वविद्यालयेच बघा. शिक्षक शिकवीत नाहीत, परीक्षा वेळेवर होत नाहीत, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हरवतात, ज्याला मास्तराची शिकवणी असेल त्याला परिक्षेत चांगले गुण मिळतात इत्यादी. बरे, विद्यार्थी, म्हणजे या देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, ते तरी कसे वागतात? क्षुल्लक कारणावरून संप, जाळपोळ, राष्ट्रीय संपत्तीची नासाडी हमखास चालू आहे. एका ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा न घेताच आम्हाला वरच्या वर्गात घालावे, अशी मागणी केल्याचे ऐकिवात आहे. मागणी अमान्य झाली तर अर्थातच संप, जाळपोळ, मालमत्तेची नासाडी इत्यादी प्रकार सुरू.

वस्तुस्थिती अशी आहे की आपला पिंड लोकशाहीचा नाही, सरंजामशाहीचाही नाही तर अतिपूर्वकाळात टोळ्या करून रहाणाऱ्या जमातींचा-ट्रायबल आहे असे दुःखाने मान्य करावे लागते. हिंदुस्तानचा इतिहास पाहिला तर त्यात याचे इगित आपल्याला सापडेल. राज्य म्हणजे राजाचे, तो करील तो कायदा, न्याय हवा असल्यास जहांगीरची घंटा वाजवावी नाहीतर एका राजाविरुद्ध बंड पुकारून दुसऱ्या राजाची कास धरावी! मोगल साम्राज्याच्या इतिहासात हे वेळोवेळी झालेले आपण पहातो.

अफगाण टोळ्या, तुर्की टोळ्या, इराणी टोळ्यांनी वेळोवेळी येऊन इथे राज्य केले. आपापसात पण झगडे केले. अकबर विरुद्ध जहांगीर, औरंगजेब विरुद्ध शहाजहान विरुद्ध दारा अशी इतिहासाची पुनरावृत्ती सारखी होत गलेली आपल्याला दिसते. इंग्रजांनी लोकशाहीचे शिक्षण आपल्याला दिले असे म्हणतात. पण ते किती वरवरचे, किती जुजबी! मोगलांप्रमाणे त्यांनी पण आपले बड़े जाणि छोटे लाट साहेब निर्माण करून ठेवले. कलेक्टर म्हणजे तर जिल्ह्याचा राजाच. अर्थातच साहेब काय म्हणतील, साहेबाला काय आवडेल, साहेब रागावेल का याचा विचार आम जनतेत सारखा सुरू असे. अर्थात आपण आज करतो तशी खाजगीत साहेबाची थट्टा, साहेबावरची नाखुशी पण प्रकट होत असे. पण सगळीकडे भीतीचे वातावरण, साहेबाच्या तोंडावर बोलण्याची कुणाची प्राज्ञा नाही.

या भीतीच्या वातावरणातून लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला प्रथम टिळकांनी आणि खास करून गांधींनी. कायदा उघडपणे मोडून त्यासाठी सर्वात जास्त शिक्षा मागणाऱ्या गांधींनी याची पराकाष्ठा केली, इतकी की जज्जसाहेबाला, अर्थातच तो इंग्रज, या माणसाला काय शिक्षा द्यावी याचा पेच पडला. गांधींच्या सर्व चळवळीमागील तत्त्वे जर तपासून पाहिली तर त्यांचा सर्व रोख लोकांच्या मनांतील भीती नाहीशी करण्यावर होता हे स्पष्ट व्हावे गुप्त चळवळीचा मार्ग त्यांनी टाकून दिला. त्यांचा सगळा कारभार उघड उघड सरकारच्या आणि लोकांच्या डोळ्यादेखत चालायचा. कायदा मोडायचा झाला तर सरकारला नोटीस आणि काही दिवसांची मुदत. मग सरकारने ऐकले नाही तर चळवळ, पुन्हा त्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे असे वाटले तर चळवळ बंद.

अशा दीर्घ आणि जन्मभर केलेल्या प्रयत्नांनी प्रत्यक्ष आपल्या उदाहरणांनी गांधींनी मातीतून माणसे उभी केली. स्वच्छ मनाची, साधनशुचिता मानणारी, कुठल्याही प्रलोभनास बळी न पडणारी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीतीचा लवलेश नसलेली. जो माणूस कशाची अपेक्षा करीत नाही, ज्याचे बिऱ्हाड-बाचके त्याच्या पाठीवर असते, जो अनिकेत आहे, त्याला भीती कसली?

गांधींच्यानंतर लोकांना निर्भय आणि स्वतःची जबाबदारी ओळखून ती पार पाडण्याला प्रवृत्त करावे असा प्रयत्न दोन व्यक्तींना केला. आचार्य विनोबांनी लोकांनी आपली जबाबदारी समजून घेऊन ती आपणच म्हणजे सरकारी मेहेरबानीवर किंवा यंत्रणेवर अवलंबून न राहता पार पाडावी या हेतूने लोकनीतीचा पुरस्कार केला, पण सर्व थरातले आणि सर्व विचाराचे लोक आपल्या छत्राखाली घेऊन त्यांना कामाला लावण्याची गांधींजींची शैली विनोबांच्याजवळ नाही. आपल्याजवळ असलेले वैचारिक मूल्यांचे गाठोडे लोकांच्यापुढे सोडून ते सूक्ष्मातच जाऊन बसले. जे भूदानाचे झाले तेच लोकनितीचे झाले!

दुसरा मोठा प्रयत्न जयप्रकाशजींनी केला. साम्यवादापासून सुरवात करून ते भूदान, जीवनदानापर्यंत येऊन पोचले आणि निर्वाणापूर्वी काही वर्षे त्यांनी समग्र क्रांतीचा विचार लोकांना दिला. समग्र क्रांतीचा अगदी साधा अर्थ काय! वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात लोकांनी आपली जबाबदारी ओळखून ती राजकीय सत्तेवर विसंबून न राहता किंवा त्या सत्तेचा अभिलाष न धरता पार पाडावी, असा मी समग्र क्रांतीचा अर्थ समजतो.

या समग्र क्रांतीची सुरवात कोठून करावी? ही क्रांती देशव्यापी करण्याचा प्रयत्न जयप्रकाशजींनी केला, त्यात त्यांची चूक झाली असे मला वाटते. व्यक्तीच्या जीवनान क्रांती झाल्याशिवाय समग्र क्रांती कशी होणार? मूळ आड्यातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? सामाजिक किंवा राजकीय क्रांतीचे सर्व प्रयत्न व्यक्तिगत क्रांतीतून व्हायला पाहिजेत खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये म्हणून तारस्वराने सांगणारे महाभाग चोऱ्याही करतात आणि खोटेही बोलतात. त्यांच्या मते व्यवहारात तसे करावे लागते.

गांधींनी याच गोष्टीवर नेमके बोट ठेवले होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना एक काळा बाजार करणारा व्यापारी गांधींना भेटायला गेला. तू काळा बाजार का करतोस? असे गांधींनी त्याला विचारले. बापूजी, महागाई इतकी वाढली आहे की काळा बाजार केल्याशिवाय मला जगणे अशक्य आहे असे तो म्हणाला. त्यावर गांधी म्हणाले, मग जगतोस कशाला? तू मेलास तर जग काही ओस पडणार नाही. गांधींच्या बोलण्याचा अर्थ असा की काळा बाजार करून म्हणजे वैयक्तिक स्वार्थ साधण्याऐवजी मेलेले बरे! अशी क्रांती ज्यांना अभिप्रेत आहे त्यांनी सुरवात अगदी लहान गोष्टी पासून करायला हवी. "अ फ्यू पीपल इन अ कन्ट्री हाऊस इज इनफ मटेरियल फॉर मी " असे प्रसिद्ध इंग्रज लेखिका जेन ऑस्टिन आपल्या कांदबरीच्या विषयाविषयी म्हणत असे. त्याचप्रमाणे क्रांतीला सुरवात केली पाहिजे.

आता पुण्याचीच गोष्ट घ्या. देशातले एक अत्यंत सुंदर शहर पुणे व्हावे असे मला वाटते. पण तसे ते व्हायचे तर नागरिकांनी त्या विषयी सक्रिय चळवळ उभारली पाहिजे. नगरपालिका सोडा. त्या विषयी पुढे बोलू, पण एकंदर पुण्याचे नागरिक कसे वागतात आपल्या दैनंदिन व्यवहारात हे जरा निरखून पहा कुठल्याही रस्त्यावर जरा बाजूला उभे राहून लोकांच्या गंमती पहाव्या. धक्के देऊन पुढे जाणे, सायकली भरधाव सोढणे, रस्त्याच्या मधे उभे राहून गप्पा मारणे, रिक्षाचे धक्का देऊन पळून जाणे, वाटेल तिथे आरडाओरडा करणे, पार्कमधे घाण करणे या गोष्टी करताना आपण काही चुकीचे करतो आहोत असे लोकांना वाटत नाही. अनेक वर्षे शहरात रहाणारी माणसे गावावरून आलेल्या अडाणी माणसासारखी वागतात. शहरी जीवन सुखाचे होण्यास प्रत्येकाने त्या जीवनाचे दंडक पाळले पाहिजेत.

माडखोलकरांच्या एका कादंबरीत द्वितीय पुरुषी देशभक्तांचा उल्लेख आहे. तू खादी वापर. तू सत्याग्रह कर, लोकांनी म्हणजे आपल्या खेरेज इतर लोकांनी, चळवळ केली पाहिजे असे सांगणारे ते द्वितीय पुरुषी देशभक्त! तसेच शहरी जीवनात काय किंवा सामाजिक अथवा राजकीय जीवनात काय, द्वितीय पुरुषाचा वापर करणारे लोक फार. लोक लाच घेतात, लोक पैसे खातात, लोक काम करीत नाहीत असे मोठया आवेशाने सांगणारी मंडळी स्वतःवर प्रसंग आला की तेच करतात.

पुन्हा एकदा पुण्याकडे वळू पुण्याचे रस्ते म्हणजे थोड्या-थोड्या अंतरावर पडलेले खड्डे, फाटलेल्या मोज्याला-होल्स सराउंडेड बाय साॅक्स अशा पद्धतीचे फुटपाथचे दगड तुटून फुटून खालीवर झालेले.गडकऱ्यांनी एकदा म्हटले होते की कुणाला शिक्षा करायची असली तर त्याला खाडिलकरांच्या मानापमान नाटकातील पदांचा अर्थ सांगायला लावावे. पुण्यात कुणाला शिक्षा करायची झाल्यास त्याला रात्रीच्या वेळी पुण्याच्या रस्त्यावरून चालत जायला लावावे.

जे रस्त्यांचे तेच कचरापेट्यांचे. माधवराव जोशांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या नाटकात लिहिलेल्या नांदीची आठवण अजून पण येते.

"नगरदेवते म्युनिसिपालिटे माधव तु वंदन | करितसे घालुनि लोटांगण"

कुणाला वाटेल की मी बरा नगरपालिकेची खरड काढतोय पण यात लोकांची जबाबदारी काय, याचा कोणी विचार करताना दिसत नाही. एक नागरिक पेटीत व्यवस्थित कचरा टाकत असला तर दहा नागरिक खुशाल भर रस्त्यावर पाट्या फेकून देतात. घर बांधायला काढले की रस्त्यावर वाळूचे आणि दगडाचे ढीग, अर्धा रस्ता व्यापला जातो मग अर्धा अधिक रस्ता बंद. पालिकेचा नोकरवर्गही तसाच. एकूण काय की द्वितीय पुरुषी समाजात कुठल्याही तऱ्हेची क्रांती होणे सुतराम शक्य नाही. जे गावात ते शहरात, जे शहरात ते समाजात आणि जे समाजात ते सरकारात. आता शहरी जीवनाच्या सुरक्षितेचा प्रश्न. रात्री बेरात्री, क्वचित दिवसासुद्धा लोक रस्त्यावर जाताना भितात. कोण, केव्हा सुरा दाखवील याचा नेम नाही. मग पोलिसाविरुद्ध हाकाटी सतत चालू रहाते.

हे सगळे राजकारणातले देशव्यापी खेळ खेळणाऱ्या पुढाऱ्यांना अगदी सामान्य आणि असंबद्ध वाटेल. रस्ते नीट केले, कचरा पेटीत टाकला म्हणजे काय क्रांती होते?

जरूर होते. कारण साधारण नागरिकाचा संबंध वर सांगितलेल्या साध्या गोष्टीशीच जास्त येतो. त्या गोष्टी नीट कशा कराव्या हे लोकांना समजले तर क्रांतीचे पहिले पाऊल पडले असे म्हणायला हरकत नसावी. आणीबाणी पुकारून शासनाने दंडा हाती घेतला तरी हे होईल पण ते भीतीच्या पोटी, लोकशाही शिक्षणाच्या द्वारे नाही. माझा एक मित्र नेहमी म्हणतो की, आपल्या लोकांना ढुंगणावर लाथाच मारायला हव्या असतात. ते खरे असले तर लोकशाही संपूर्ण क्रांती, लोकनीती याला काही अर्थच राहात नाही.

या भावनापूर्ण शब्दात अर्थ भरण्याचे काम लोकांनीच करायला हवे. आपल्या गावच्या प्रत्येक वॉर्डातून एक प्रतिनिधी आपण नगरपालिकेत पाठवतो प्रत्येक वाॅर्डातल्या लोकांनी आपापल्या समित्या स्थापून आपल्या प्रतिनिधीला कामाला धरले पाहिजे वारंवार त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे, जीवनवित्ताच्या सुरक्षिततेचेही तेच पोलिसांना ते करता आले नाही तर नागरिकांनी ते स्वतः केले पाहिजे. प्रत्येक वाॅर्डात सुरक्षासमित्या स्थापून शहरात गस्त घालण्याचे काम सुरु केले पाहिजे. या महायुद्धात अशा समित्या स्थापन झाल्या होत्या.

अशा समित्यांचा दुसरा उपयोग म्हणजे शेजारीपाजारी एकमेकाला ओळखू लागतात. शहरातल्या एकाकी जीवनाला संघशक्तीची जाणीव होते अशाच संघशक्तीतून मग एक लोकनीती तयार होते आणि आपल्या वाॅर्डाच्या प्रतिनिधीला जाब विचारण्यापासून सरकारलाही त्यांच्या कामाचा जाब विचारण्याची शक्ती निर्माण होते. सर्व बिनसरकारी संस्थांवर आणि चवळींवर सरकारची बारीक नजर असते. ते उगीच नाही. कारण लोकांची शक्ती स्वयंस्फूर्तीने सरकारच्या मदतीशिवाय जिथे जिथे वाढते तिथे तिथे चालू सरकारला शह देणारी एक प्रतिकारशक्ती देशात निर्माण होते. लोकशाही आणि सोठेशाही यातला फरक हाच. अशी लोकशक्तीची केंद्रे जितकी जास्त प्रमाणात वाढतील तितक्या प्रमाणात जयप्रकाशजींची संपूर्ण क्रांती यशस्वी होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थातून काही वर्षे काही काम केल्याशिवाय कुठल्याही माणसाला पार्लमेंटच्या निवडणुकीत उभे राहू देऊ नये असे प्रो. लास्की म्हणत. एका वेळी एकच पायरी मला पुरेशी आहे, असे गांधी म्हणत स्थानिक संस्थांतून, बिनसरकारी संस्थातून केलेले काम म्हणजेच पहिले पाऊल हजारो मैलाची वाटचाल या पहिल्या पावलापासूनच सुरू होत असते

Tags: भ्रष्टाचार लोकशाही साम्यवाद लोकनायक जयप्रकाश नारायण विनोबा भावे महात्मा गांधी communism corruption democracy Loknayak Jayprakash narayan Vinoba bhave Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके