डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काँग्रेस ज्या राज्यात सत्तारुढ आहे. त्या राज्यातील कारभार स्पृहणीय नसल्यामुळे डावे, पुरोगामी व प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर असंतुष्ट आहेत. भाजपच्या गुजरातमधील प्रशासकीय कारभारावरील काँग्रेसची टीका अयोग्य नव्हती; पण आपले धोरण व त्याची अंमलबजावणी प्रशंसनीय आहे. असे, काँग्रेसला सर्व मुख्यमंत्र्यांना निवडणूक दौऱ्यात सामील करून घेऊन सुद्धा पटवून देणे शक्य झाले नाही.

गुजरातमधील निवडणुकांचा निकाल हा तत्त्वशून्य राजकारण करणाऱ्यांचा, वास्तवाकडे कानाडोळा करणाऱ्यांचा पराभव आहे. विद्वेष हेच प्रातःस्मरणीय मूल्य मानणाऱ्यांचा नीतीचा बुरखा घालणाऱ्यांचा तात्पुरता जय आहे. अस्सल लोकशाही, निःस्पृह धर्मनिरपेक्षता, समताधिष्ठित सामाजिक एकात्मता यांवर विश्वास ठेवणाऱ्या परंतु विखुरलेल्या राजकीय-सामाजिक शक्तींना तो गंभीर इशारा आहे. 

'शिशिर ऋतू संपला की वसंत ऋतू (क्रमाने) येतोच', अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे एक नेते व लोकसभेतील त्या पक्षाचे प्रमुख प्रतोद श्री. प्रियरंजनदास मुनशी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दिली आहे. सामाजिक प्रक्रियेत असा आशादायक क्रम येण्याकरिता कसोशीने आणि निःस्वार्थ बुद्धीने प्रयत्न करावे लागतात. याची विस्मृती या ज्येष्ठ नेत्याला झाली असावी. काँग्रेसने वर्चस्ववादी जागतिकीकरणासमोर शरणागती पत्करली; इतिहासाची विपर्यस्तपणे मांडणी करून, बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात येत होती, त्या वेळेस त्या दुष्कृत्यास पायबंद घालण्याची कामगिरी काँग्रेसने बजावली नाही; आणि मुस्लिम धर्मांध पुरुषांचा अनुनय करण्याकरिता मुस्लिम स्त्रियांना पोटगीचा रीतसर कायदेशीर हक्क नाकारला, त्याचवेळेस अलीकडल्या काळात काँग्रेसने आपला स्वार्थी संधिसाधूपणा प्रकट केला होता. काँग्रेस ज्या राज्यात सत्तारुढ आहे. त्या राज्यातील कारभार स्पृहणीय नसल्यामुळे डावे, पुरोगामी व प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर असंतुष्ट आहेत. भाजपच्या गुजरातमधील प्रशासकीय कारभारावरील काँग्रेसची टीका अयोग्य नव्हती; पण आपले धोरण व त्याची अंमलबजावणी प्रशंसनीय आहे. असे, काँग्रेसला सर्व मुख्यमंत्र्यांना निवडणूक दौऱ्यात सामील करून घेऊन सुद्धा पटवून देणे शक्य झाले नाही. त्यामुळे सचोटीचा कारभार (गुड गव्हर्नन्स) हा काँग्रेसचा निवडणूक प्रचारातील मुद्दा निष्प्रभ ठरला.

मतदारांनी धर्माधिष्ठित राजकारणालाच अधिक महत्त्व दिले. विशेष चिंतेची बाब आहे. ती ही, की अनुसूचित जातीकरिता असलेल्या राखीव मतदारसंघात सुद्धा निवडून आलेले बहुसंख्य उमेदवार हे या हिंदुत्व परिवाराचे आहेत. धर्मांध नेत्यानी केलेल्या प्रचाराला समर्थपणे उत्तर देण्यास काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व अन्य पक्ष अथवा व्यक्ती असमर्थ ठरल्या. 

धर्मांधतेचे आव्हान स्वीकारण्याकरिता ज्या महत्वाच्या गोष्टीची गरज होती, ती म्हणजे वास्तव स्वीकारणे; परंतु त्याची विपर्यस्त अथवा सत्यापलाप करणारी मांडणी नाकारणे; देशाच्या फाळणीचे खापर केवळ ब्रिटिश राज्यकार्त्यावर किंवा हिंदुत्ववाद्यांच्या विखारी प्रचारावर फोडणे, हे काँग्रेस व अन्य पुरोगामी सुद्धा बरीच वर्षे करीत आले आहेत. गुजरातमध्ये सुद्धा त्या राज्यातील नऊ टक्के मुसलमानांचे 90% हिंदूंना भय का वाटावे, असा प्रश्न विचारला गेला. तो प्रश्न चुकीचा नाही. परंतु देशातील 25% मुसलमान रक्तपात करून देशाची फाळणी करण्यात का व कसे यशस्वी झाले, या प्रश्नाचे उत्तर गुजरातमध्ये 9% मुसलमान आहेत असे सांगून मिळत नाही. मुसलमान नेत्यांनी फाळणीपूर्वी व त्यानंतर सुद्धा अंगीकारलेले आक्रमक धोरण निंदनीय होते आहे. ही भूमिका नि: संदिग्धपणे घेणे आवश्यक आहे. अशी स्पष्ट भूमिका जर घेतली, तरच गोध्रा हत्याकांड जरी घडले असले तरी त्याचा सूड घेणे लोकशाहीशी व आधुनिक मूल्यांशी विसंगत आहे. हे लोकांना पटवून देण्याची शक्यता निर्माण होईल. पाकिस्तानने धुमश्चक्रीत पकडल्या गेलेल्या भारतीय सैन्यदलातील जवानांचे नाक-डोळे -कान इत्यादी कापून हलाल करून त्यांचे मृतदेह दहशत पसरविण्याकरिता भारतीय सैन्याच्या ताब्यात दिले, याबद्दल पुरेसा तीव्र निषेध लक्षात येईल अशा पद्धतीने व्यक्त झाला नाही. तर ख्रिश्चन धर्मोपदेशक स्टेन्स व त्याचा मुलगा यांचा खून करण्याची किंवा अहमदाबादेतील माणुसकीशून्य कृत्यांची विकृती लोकांना सुन्न करून सोडीत नाही.

लोकांसमोर उभ्या राहिलेल्या तात्कालिक समस्यांकडे (मग तो भूकंप असो अथवा दंगे असोत) पार दुर्लक्ष करून मूलभूत समस्या व दीर्घकालीन उपाय यांबाबतचे विवेचन सुरु करणयात आले, तर ते विवेचन पटले तरी लोक स्वीकारण्यास तयार होत नाहीत. म्हणून गुजरातच्या निडणुकांचे विश्लेषण जाती-पातीची टक्केवारी, मतदानाचे गणित इत्यादी मांडून करणे अधुरे ठरेल. धर्मांधतेवर मात करण्याकरिता, लोकशाही रुजविण्याकरिता, तात्कालिक व दीर्घकालीन उपाय योजावे लागतील.

Tags: देशाची फाळणी शिशिर ऋतू प्रियरंजन दास श्री गुजरात निवडणूक निकाल रा.प.नेने Deshachi Falni Shishr Ruthu Sri. Priyranjandas Das Gujrat Nivadnuk Nikal R.P.Nene weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके