डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वस्तू-माणूस संबंधातून कचराच निर्माण होतो...

रा. शं. दातार नाट्य-पुरस्कार : जत्रेतलं जायंट व्हील - हिमांशू स्मार्त

काळाचं अव्याहत आणि निर्भयपणे आपणावरून वाहणं, क्रमाक्रमानं व्यामिश्र आणि भयावह होत जाणं, आपल्या अवकाशाचा संकोच होत जाण्यातही भयावहता आकळण्याचा प्रयत्न करणं, तिच्यावर भाष्य करू पाहणं प्रचंड थकवणारं असतं. ते विलक्षण निष्ठेची, ऊर्जेची, सर्जकतेची मागणी करतं. अशी भरभक्कम किंमत मोजून, संवेदनशीलता पणाला लावून आपला काळ आणि अस्तित्वाचा तळ समजून घेण्याचा प्रयत्न करणारे लेखक दुर्मिळ आहेत. हिमांशू स्मार्त हे अशा विरळा लेखकांपैकी- आजच्या घडीचे- एक महत्त्वाचे लेखक आहेत. तेंडुलकर - आळेकर त्यानंतर चं. प्र. देशपांडे, शफाअत खान, राजीव नाईक, श्याम मनोहर, मकरंद साठे आणि त्यांच्यानंतरच्या तिसऱ्या पिढीतल्या मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक, धर्मकीर्ती सुमंत इ. महत्त्वाच्या नाटककारांमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे एक नाव.

प्रश्न : या मुलाखतीची सुरुवात आपण तुमच्या नाट्यलिखाणाच्या प्रेरणा काय होत्या, या प्रश्नापासून करू. कोल्हापूरसारख्या धडपणे अर्धनागरही म्हणता येणार नाही, अशा अत्यंत छोट्या शहरात त्या वेळी नाटकाची काय परिस्थिती होती?

- मी साधारणपणे 1993-94 मध्ये नाटक लिहायला लागलो. ‘निर्माण’ नावाची नाट्यसंस्था ‘काव्यसंध्या’ नावाचा काव्यवाचनाचा एक कार्यक्रम घ्यायची. त्यात कविता वाचायला गेलो आणि माझी कविता ॲप्रिशिएट झाली. मग त्यांच्या आग्रहावरून नाट्यसंस्थेला जॉइन झालो. गोखले कॉलेजमध्ये त्या वेळी मी आर्ट्‌सचं शिक्षण घेत होतो. त्या फेजमध्ये नाटकाचं ते वातावरण, तालमी-स्क्रिप्टवर काम करणं आकर्षक वाटायचं. मग हळूहळू अभिनय, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत करून पाहू लागलो. एकांकिकांच्या दौऱ्यांना फिरणं झालं आणि त्यातूनच आपण नाटक हाताळून पाहावं, असं वाटू लागलं. नाटकात आपण जे लिहितो; ते वेशभूषेसह संगीत, नेपथ्यासह सादर होणं, ही मला खेचून घेणारी गोष्ट वाटली. मग त्यातून पहिली एकांकिका ‘चौसष्ट चौकोनांचं वर्तुळ’ लिहिली.

प्रश्न : तुमच्या अगदी सुरुवातीच्या लिखाणापासूनच त्यावर ॲब्सर्डिटीचा प्रभाव जाणवतो. हा प्रभाव नेमका कसा पडला?

 - हो, माझ्या पहिल्या एकांकीकेवर (चौसष्ट चौकोनांचं वर्तुळ) ॲबसर्डीटीचे खूप मोठे संस्कार होते. त्या काळात नाटकाची जी वाचनं व्हायची- उदा.- आळेकर, श्याम मनोहर यांची नाटके - त्यांतून मला या शैलीचं आकर्षण वाटू लागलं. ‘चौसष्ट चौकोनाचं वर्तुळ’मध्येही बुद्धिबळाची टर्मिनॉलॉजी वापरून व्यक्तीच्या मनोव्यापाराचा मानसशास्त्रीय वेध घेण्याचा प्रयत्न मी केला होता; पण मला आत्ता विचार करताना ती खूप कच्ची, कुठलीच ग्रोथ नसणारी अशी वाटते. एका सणकीत लिहिलेली एकांकिका होती ती. आज कदाचित वेगळ्याच पद्धतीने हाताळली असती.

प्रश्न : सुरुवातीच्या नाट्यलिखाणातली ॲब्सर्डीटी उत्तरोत्तर प्रगल्भ आणि आशयानुकूल होत गेलेली दिसते. काही वेळा त्यातून येणाऱ्या दुर्बोधतेबाबतीतसुद्धा हेच म्हणता येईल. या दोन्ही टप्प्यांमधला फरक तुम्हाला कसा जाणवतो?

 - खूपच फरक आहे. पूर्वी लिखाणाच्या प्रारंभी केवळ अनाकलनीयतेचं आकर्षण असण्याच्या फेजमध्ये ‘हे नाटक समजत नाही’ असं कोणी म्हटलं, तर ते भूषणावह वाटायचं; ती कॉम्प्लिमेंट वाटायची. आत्ता तसं वाटत नाही; पण आता ‘समजत नाही’ हे अपयशसुद्धा वाटत नाही. आता माझी भूमिका अशी आहे की- त्या असंगततेतून जे दुवे सांधून दाखवलेले असतात, ते नाटक करणाऱ्यांनी व बघणाऱ्यांनी उलगडून पाहावेत. त्यातून साधणारं जीवनविषयक असं नाट्यविधान (जे जीवनाचा अनाकलनीय व्याप मांडू पाहतं) ते अनुभवण्याचा प्रयत्न करावा. त्यात सगळं सुबोध असणार नाही आणि हा प्रवास एकटा नाट्यलेखक करू शकणार नाही. दिग्दर्शक, नट, प्रकाशयोजनाकार आदी सगळ्यांबरोबरच यातला एक टप्पा प्रेक्षकांचाही असावा, असं वाटतं.

आशयाचं पातळ, सुलभीकृत, रेडिमेड रूप प्रेक्षकांच्या हाती येऊ नये आणि यासाठी या सर्वांच्या सहभागाची भूमिका महत्त्वाची वाटते. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की, प्रारंभी माझ्या लिखाणात आकर्षणातून येणारी काहीशी दुर्बोधता होती. म्हणजे  थेटपणे काही म्हटलं तर ते यथार्थवादी नुसतंच पापुद्र्यांचं होईल, अशी काहीशी भीती होती. आणि आता जीवन उत्तरोत्तर समजून घेतानाच त्याच्या अनाकलनीय व्यापाचा शोध घेत राहण्यातून आलेली भीती... अशा दोन पातळ्या जाणवतात.

प्रश्न : याला जोडूनच पण एक वेगळा प्रश्न विचारतो. नव्वदनंतरच्या कवितेत अतिशय मौलिक, आशयसंपृक्त असं काव्यलेखन तुम्ही केलं आहे. मात्र, अचानकच सांधा बदलून तुम्ही नाटकाकडे प्रकर्षाने वळलात. काव्यलेखन अलीकडे जवळपास थांबल्यासारखं झालं आहे. कवितेकडून नाटकाकडे - असा बदल कसा झाला?

 - सुरुवातीच्या काळात मी खूपच काव्यलेखन केलं आणि अलीकडे 2006 ला एक व 2014 मध्ये एक वगळता कवितालेखन केलेलं नाही. हे प्रमाण कमी होण्याचं एक कारण असं की, मी अधिक थेटपणे बोलणाऱ्या फॉर्मकडे वळलो. प्राध्यापक म्हणून वर्गात कविता शिकवताना, आजूबाजूला कवितेचं विश्व अनुभवताना असं लक्षात आलं की- कवितेची अभिरुची, कवितेनं धरून ठेवणं, हे एकूणच आपल्या समाजजीवनातून - सांस्कृतिक जीवनातूनच हद्दपार होत चाललंय. कविता शिकवताना मी जी उत्कटकता अनुभवतो, ती माझा आजचा विद्यार्थी अनुभवू शकत नाही. कवितेची एकूण वाङ्‌मयव्यवहारावरची पकडच कमी होत चाललीय.

1990 नंतरची मराठी कवितादेखील आवर्तात सापडल्याचं जाणवतं. (अभिव्यक्ती, रूपबंध या सर्वच बाबतींत.) या कोंडीचाही काही परिणाम माझ्यावर आहे. दुसरं मला असं जाणवतं की, आपली कविता लिहिण्यावरची पकड ढिली होत आहे. हे अर्थातच वेदनादायी असेल; कारण कवितेचं पेनिट्रेशन, कवितेचं टोक, गोळीबंदपणा नाटकाला कधीच येणार नाही- हेही तितकंच खरं आहे;

प्रश्न : नाटक आणि कविता हे त्या दृष्टीने संघर्ष करणारे फॉर्म आहेत का?

- हो. म्हणजे, माझ्या निर्मितिप्रक्रियेचा विचार करतो तेव्हा जाणवतं की, त्या दोन्ही रूपबंधांचा एकमेकांशी संघर्ष आहे. माझी कविता आणि नाटक एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असं वाटतं. हेही मघाच्या प्रश्नाचं एक उत्तर असू शकेल.

प्रश्न : तुमच्या घडण्याच्या काळात तुमच्या घरच्या वातावरणाचा, संस्कारांचा आणि समाज-सांस्कृतिक भवतालाचा कसा परिणाम झाला? अभिरुची घडत  जाण्याच्या प्रक्रियेवर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला?

- माझ्या घरातून अत्यंत समृद्ध असे दोन संस्कार ठळकपणे झालेले मला जाणवतात. एक म्हणजे, सिव्हिल इंजिनिअर असलेल्या माझ्या वडिलांच्या संग्रहात लोकप्रिय बेस्ट सेलर्सपासून ते सार्त्र, काफ्का, नेमाडे, सदानंद रेगेंपर्यंत वैविध्यपूर्ण पुस्तकं मला वारशानं मिळाली. वडील उत्तम वाचक होते. त्यामुळे माझं वाचनही खूपच लवकर सुरू झालं. पारंपरिक एस्केपिस्ट करणारे लेखन टाळून वास्तवाची पिसं काढणारे लेखक आणि त्यांचं लेखन पौगंडावस्थेतच मला वाचायला मिळालं.

दुसरा महत्त्वाचा संस्कार म्हणजे, शास्त्रीय संगीताची घरातूनच मिळालेली समृद्ध परंपरा. माझी आत्या आणि चुलतबहिणी शास्त्रीय संगीत गायच्या. त्या संगीताच्या ऐकण्यातून एका विशिष्ट अनुभवावर टिकून राहण्यासाठी लागणारा संयम मिळाला.

प्रश्न : नाटक लिहिताना कोणकोणत्या नाटककारांचा प्रभाव तुमच्यावर पडला? किंवा, एकूणच नाटकाची ओढ वाटायला लावणारे असे, लेखन आणि प्रभाव कोणते?

 - माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रकट ऐकलेलं नाटक म्हणजे, सतीश आळेकरांचं ‘महानिर्वाण’. मला आळेकर त्यात प्रचंड मोडतोड करताना दिसले आणि त्यानं मी हलून गेलो होतो. ज्या पद्धतीने त्यांनी सगळे चष्मे फोडून जुनं बघायला शिकवलं, ते मला प्रभावित करून गेलं. आळेकरांची दृष्टी नुसती तिरकस नव्हे, तर मानवी संबंधांकडे बघण्यासाठी अतिशय धारदार पवित्रा देणारी आहे. तिचा मोठा प्रभाव माझ्यावर पडला. त्यानंतर चं.प्र.देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर यांच्या नाटकांचाही माझ्यावर प्रभाव आहे.

प्रश्न : या सर्व पार्श्वभूमीवर नाट्यलेखक म्हणून नाटकाचा सूर आपल्याला सापडलाय, असं तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं?

- ‘पुंगीवाला’ आणि ‘ट्रिपल सीट’ या नाटकांवेळी तसं जाणवलं. काळाच्या क्रमानुसार ‘पुंगीवाला’मध्ये मला पहिल्यांदा जाणवलं की- नाट्यरूपावर माझे असे संस्कार, नाटकात कालावकाशाचं असणारं व्यवस्थापन आणि आशयाच्या प्रवासासाठी म्हणून केली जाणारी जीवनाच्या अंशांची निवड- या सर्व गोष्टी अंतर्भूत असतात. आशयाचं वहन पात्रं कसं कसं करतात, सगळ्या पात्रांच्या खांद्यांवरून वाहत जाणारा आशय शेवटी या प्रवाहांचा संगम होऊन त्याचा नाट्यानुभव कसा बनतो, याचं भान याच वेळी मला प्रकर्षानं आलं. या नाटकाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या रंगभूमीवर माझी दखल घ्यायला सुरुवात झाली. त्या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक प्रसन्न जी. कुलकर्णी यांनी ‘सामाजिक अंतर्विरोध मांडण्यासाठीची एक फार मोठी टोकदार शैली हिमांशूकडे आहे’, असे मत नोंदवले.

नाटक वाचून चं.प्रं.नी ‘संवादलेखनाची तुझी शैली अतिशय स्वतंत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली. या दोन प्रतिक्रिया आणि माझा स्वत:चा फील यातून स्वत:चं असं काही तरी सापडल्याची जाणीव झाली.

प्रश्न : ‘जत्रेतलं जायंट व्हील’ हे काहीसं कन्फेशनल नाटक वाटतं. या नाटकाच्या सुचण्याच्या प्रोसेसमध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनातला अनुभव येतो का?

- ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाटकाचा आरंभबिंदू कन्फेशनल आहे. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात असं हरवणं अनुभवलंय. कोल्हापूरमध्ये ‘बिग बझार’ पहिल्यांदा सुरू झाला, तेव्हा तो पाहायला मी माझ्या बायकोसह गेलो. तिथली खरेदीची व्यवस्था काय असेल, वस्तू मला कशा मिळतील- काहीच माहिती नव्हतं. एका अत्यंत मायावी जगात शिरण्याचा एक आकर्षक दरवाजा होता आणि त्याच्या आत सगळा उजेड-झगमगाट भरलेला होता. त्या दरवाजाच्या आत गेल्यावर इतकं रमायला झालं की, एकमेकांच्या सोबत राहण्याची अपरिहार्यता संपून गेली आणि ‘दिव्याखाली उजेड’ या नाटकात मला जे कल्पनेच्या पातळीवर जाणवत होतं, ते मी तिथं वास्तवात अनुभवलं... हा जो उजेड आहे त्या उजेडात केवळ वस्तूच दिसाव्यात- माणसं दिसूच नयेत, अशी एक व्यवस्था असते. ज्युझे सारामागूच्या ‘ब्लाइंडनेस’मध्ये जसं एक पांढरं आंधळेपण आहे, तसंच आंधळेपण इथेही अनुभवास येतं.

कुठल्याही हायपर स्टोअरला इतका उजेड केला जातो की, माणसं अदृश्य होतात आणि वस्तूच फक्त इमर्ज होऊन येतात. त्या वस्तूंच्या मायावी जगात हरवण्याशिवाय आपल्या हाती पर्यायच राहत नाही. मग हे हरवणं जास्तीत जास्त उत्कट कसं होतं जाईल, चमचमीत कसं होत जाईल, याच्या योजना जागोजाग केलेल्या असतात. जसा बिग बझार कोल्हापुरात आला तसं कोल्हापूरच एक हायपर स्टोअर बनलं. आणि एक छोटी मार्केटिंग स्पेस किंवा बाजार असणाऱ्या जागेनं अख्खं शहर व्यापलं. त्याचा झगमगाट शहरभर पसरला आणि त्या छोट्याशा कोपऱ्यात हरवणं हे माझं अख्ख्या शहरात हरवणंही व्हायला लागलं. म्हणजे माझं शहर आता इतकं चतुर बनलं की, ते कुठल्या कोपऱ्यात कुठली माणसं दडवून ठेवतं याचा पत्ता लागू देईना. पूर्वी असं व्हायचं नाही. पूर्वी मला संकेत जाणवायचे की, माझं माणूस अमुक-अमुक ठिकाणी असेल आणि ते अमुक करत असेल. त्यामुळे हरवण्याचे असे मायावी- भगभगीत उजेडातल्या वस्तूंनी भरलेले कोपरे आणि माणसाचं त्यात हरवून जाणं यातून ‘जत्रेतलं जायंट व्हील’ आकाराला आलं.

 प्रश्न : ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या शीर्षकामध्ये एक आकर्षक प्रतीकात्मकता जाणवते, ती नेमकी काय आहे?

 - जायंट व्हीलचा एक थरार आणि गंमतसुद्धा असते. एक तर त्याच्यात बसण्याअगोदर त्याच्या भव्यतेचा दबाव असतो आणि त्यावर मात करून प्रत्यक्ष पाळण्यात जाऊन आपण बसतो, तेव्हा जायंट व्हील आपल्याला क्रमाक्रमानं उंचीवर नेतं आणि एकदम ढकलून देतं... मग गती हळूहळू वाढत जाते... मग ते एकदम थांबतं आणि पुन्हा आपण क्रमाक्रमानं खाली येतो. हुरहूर आणि उत्कंठेचा हा जो हिंदकळता ताण आहे, तसाच तो हायपर स्टोअरमध्ये हरवल्यावर अनुभवता येतो. तिथं तुम्ही हरवण्यानं सुरुवात करता आणि हरवण्याचा एकेक टप्पा पार करत हरवण्याच्या उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचता. मग एकमेकांना शोधण्याच्या अपरिहार्यतेकडे ढकलले जाता, पुन्हा खाली येता. जायंट व्हीलचा जो थरार आहे, तोच इथेही जाणवतो.

मॉलमधल्या आकर्षक वस्तू, तिथली प्रलोभनं-आकर्षणं आणि त्या सगळ्या वस्तुसृष्टीला अधिकृत ठरवणारी माझी चाललेली धडपड... हे सगळंच खूप जीवघेणं आहे. वस्तुसृष्टीला अधिकृत ठरवण्यासाठी मी समर्थनं शोधायला लागतो. ती माझ्या शहरात का असली पाहिजे, माझ्या शहरात या वस्तू मिळणं हे माझ्या शहरातल्या व व्यक्तिगत जीवनासाठी कसं आवश्यक आहे, माझ्या शहराच्या उन्नत होण्याचं ते कसं लक्षण आहे- याचे आपण समर्थक होऊन बसतो. छोट्या दुकानाचा मी फक्त ग्राहक असतो. ठरावीक एका वस्तूचा; पण मॉलमध्ये गेल्यावर मात्र त्याच वस्तूचे एकाहून अधिक पर्याय असणं- अधिकृत ठरवण्याची वस्तुत: माझी नसणारी जबाबदारी मी विनाकारण खांद्यावर घेतो. या सर्वांविषयीचं प्रतीकात्मक अर्थानं सूचन ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या शीर्षकामधून होतं.

प्रश्न : ‘जत्रेतलं जायंट व्हील’मध्ये तुमच्या पिढीनं अनुभवलेलं माणसाला क्रमाक्रमाने नेस्तनाबूत करणारं हे जे वस्तू आणि माणसाचं नातं आहे, त्याचे सामाजिक- सांस्कृतिक संदर्भ काय आहेत? आणि भविष्यात वस्तूंच्या आक्रमणामुळे उद्‌भवू पाहणारे संभाव्य धोके काय आहेत?

- सत्तरीत जन्मलेल्या माझ्या पिढीनं वस्तूंनी माणसांना गिळताना पाहिलंय. रोप वाढावं तसं हे आक्रमण मोठं होताना पाहिलंय. त्यानंतरच्या पिढीला कदाचित हे आक्रमण भेदक वाटणार नाही. कारण या आक्रमणाचं मायाजाल स्थिर झाल्यानंतरच त्यांना जाण आली. माझ्या पिढीनं अत्यंत प्राथमिक मॅकेनिकल फेजमधल्या वस्तू बघितल्या आणि अतिशय उन्नत डिजिटल फेजमधल्या वस्तूदेखील. आम्ही जसा वॉकमन पाहिला तसंच एमपी थ्री प्लेअर्स, आयपॉडही पाहिले. टाइपरायटर पाहिला तसाच लॅपटॉप वगैरेसुद्धा. याचा जसा एका बाजूला अभिमान बाळगला जातो तसाच तो मला आमच्या पिढीला मिळालेला जोरदार शापही वाटतो. आम्ही एकेका कणानं आमचं जग वस्तूंच्या हातात जाताना पाहिलं आणि बाजाराच्या  प्रचार-पद्धतीतून आमच्या जीवनात वस्तू कशा आल्या, आम्ही वस्तूंसाठी कसे जगायला लागलो.

माझ्या जगण्यात वस्तू असणं ही गोष्ट नवी नाही, पण वस्तूचं असणं हे तिच्या उपयुक्ततेच्या पलीकडं जाऊन केवळ असण्याच्या पातळीवर मी त्या जस्टीफाय करू लागलो. वस्तूंच्या समर्थनासाठी माझी ऊर्जा खर्ची पडू लागली, तिथेच या धोक्यांची जाणीव होते. मला अशी भीती वाटते आहे की, या समर्थनांसाठी जी तत्त्वज्ञानं उभी राहिली, तिचे आपण प्रशंसक बनत चाललो आहोत आणि हे आता माणसाच्या अनुवंशातच जाऊन बसेल की काय, असंही वाटतं. सध्या हे साय-फायमध्ये होतंय. पण एक काळ असा येईल- तुमच्या जगण्याच्या सगळ्या प्रेरणा वस्तूच ठरवतील आणि वस्तूंच्या अस्तित्वासाठीच तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा, संवेदना, जाणिवा, मागण्या असतील. एके काळी ज्यांच्यासाठी तुम्ही वस्तू निर्माण केल्या, अशा गोष्टी वस्तूंकडूनच निर्मित होतील. आता असा फार भयानक मोठा धोका आहे. वस्तूंच्या निर्मितीसाठी आपण सृष्टीचं जे अमर्याद शोषण चालवलेलं आहे, त्यातून येणारा कंगालपणा आणि बकालपणा... कदाचित माझ्या पुढच्या काही नाटकांमधून या शोषणाचं विक्राळ स्वरूप येऊ शकेल.

म्हणजे आता आपण आपल्या प्रचंड वस्तुग्रस्त, सेवाग्रस्त अशा काळात आपल्या नात्यांचं, माणसांचं, सहजीवनाचं काय करणार आहोत- असे प्रश्न या काळाच्या संदर्भात आपल्याला विचारावे लागतील. जीवनातल्या नितळ, पारदर्शक आणि साध्या जगण्याच्या पद्धतीचा आता आपण शोध कसा घेणार आहोत, हा खरा प्रश्न आहे.

प्रश्न : तुमच्या या नाटकात संबंधांच्या दोन वेगवेगळ्या प्रतलांत आकाराला येणाऱ्या नात्याविषयीचं भाष्य आहे. वस्तू आणि माणूस यांचं एक आणि स्त्रीपुरुष यांचं दुसरं नातं. या दोन वेगवेगळ्या संबंधांतून तुम्हाला नेमके काय सुचवायचे आहे?

 - स्त्री-पुरुष संबंध ही सर्जक शक्ती आहे आणि वस्तू-माणूस हा संबंध ही असर्जक शक्ती आहे. वस्तू- माणूस संबंधांतून काहीच निर्माण होत नाही; कचराच निर्माण होतो. आणि स्त्री-पुरुष संबंधांतून मात्र जिवंत माणूस निर्माण होतो. अशी दोन द्वंद्वं आहेत. म्हणजे या नाटकात दोन स्त्रिया व दोन पुरुष आहेत. दोन्हीही भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर स्वत:चं नवं नातं समजू पाहताहेत, जोखू पाहताहेत आणि त्याच वेळी चिन्मय व केतकी एकमेकांशी असणारं नातं समजून घेत आहेत, त्याच वेळी ते वस्तूंच्या संबंधातसुद्धा येतात- असं नात्याचं एक नेटवर्क तयार होतं.

प्रश्न : मुलाखतीचा शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की, तुम्ही नाट्यलिखाणाबरोबर नाट्यशिक्षक म्हणूनही काम करता; तर तुमचं नाट्यशिक्षक असणं नाट्यलेखकाला मदत करतं का? आणि करत असेल, तर कोणत्या प्रकारची?

 - मी वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यविश्लेषण, नाट्यसमीक्षा, नाट्यप्रयोग आणि सौंदर्यशास्त्र शिकवतो. या सगळ्याची मदत नाट्यलेखनाला होते. नाटकाच्या रूपावर, दृश्य व्याकरणावर, भाषेवर जो विचार घडतो; त्यातून विद्यार्थ्यांना समजावून सांगताना स्वत:ची प्रक्रिया निर्माण होते. ती नाट्यरूपाविषयीचं भान पुढे न्यायला मदत करते. वेगवेगळ्या प्रकृतीच्या दिग्दर्शकांशी संवाद घडतो. नाटकाची सैद्धांतिक आणि सौंदर्यशास्त्रीय मांडणी करणाऱ्या राजीव नाईकांसारख्या लेखकाशी संवाद घडतो. हे सगळे खूप मुळातून मदत करणारे असते. ‘जत्रेतलं जायंट व्हील’चा प्रवीण भोळेनं केलेला अपारंपरिक शैलीतील प्रयोग पाहताना आपल्याच लेखनातील काही नव्या शक्यता जाणवतात.

विनोद दोशी फेलोशिपच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दहा ते बारा छोट्या शहरांमधील रंगभूमीच्या केलेल्या अभ्यासातून रंगचौकटीचा पारंपरिक मंच नाकारणारी आणि प्रत्यक्ष जीवनातील अवकाशाचा उपयोग नाटकासाठी करणारी एक रंगभूमी निकडीची आहे, हे मला जाणवले. कोल्हापुरात नाटकं शिकवत असताना मी विद्यार्थ्यांकडून ‘बे दुणे साडेतीन’ हा परिसर रंगभूमीचा एक प्रयोग घडवून आणला. हा प्रयोग एका प्रत्यक्ष इमारतीच्या अवकाशात घडला. त्या इमारतीचा पोर्च, गच्ची, गॅलरी, पायऱ्या, रॅम्प, दरवाजे, खिडक्या, इमारतीच्या अंतर्भागातील वेगवेगळ्या पोकळ्या यांच्या वापराने साकारला. हे नाट्यशिक्षक असल्यानेच मला करून पाहता आले आणि यातून कालअवकाशाच्या वेगळ्या शक्यता अजमावून पाहता आल्या.

हिमांशू स्मार्त यांची काही महत्त्वाची नाटके

1) ट्रिपल सीट - समूह आणि एकटा माणूस यांच्यातील एका द्वंद्वाविषयी हे नाटक बोलतं. एकटा माणूस रहदारीमधून ट्रिपल सीट गेल्याने पकडला जातो; पण पाणी प्रश्नावरून शहरातून निघालेल्या मोर्चाला मात्र ट्रिपल सीट जाण्यातून सूट मिळते. समूहाने गुन्हा करणे आणि एकट्या माणसाने गुन्हा करणे यांच्यातून उभा राहणारा संघर्ष एका सामाजिक व नैतिक पेचाला कसा जन्म देतो, याचे ‘ब्लॅक कॉमेडी’च्या अंगाने चित्रण.

2) बॅकअप (009718) - पृथ्वीचा बॅकअप घेण्याचा एक भव्य प्रकल्प सुरू आहे. योजनेनुसार एका नव्या पृथ्वीच्या निर्माणाचा आराखडा तयार होतोय. जुन्या पृथ्वीवरचे लोक त्यांना मिळालेल्या जगण्याविषयी असमाधानी आहेत. स्वत:च्या नीरस रूटीन आयुष्यावर त्यांना एक थ्रिलिंग उतारा हवाय. प्रकल्पाच्या निमित्ताने सहभागी सगळे लोक आपापल्या असमाधानाची कोंडी फोडण्यासाठी नव्या व्यवस्थेचे स्वप्न पाहतात. नव्या जगाचे प्रारूप ठरवण्यासाठी जुन्याचा बॅकअप ठेवला जातोय. अर्थात, नव्या पृथ्वीची निर्मिती हा नाटकाचा मुख्य विषय नाही. प्रकल्पाच्या निमित्ताने मानवी जगण्याच्या रचनेविषयी नाटक बोलते. नाटकाचा अविभाज्य भाग असलेल्या वैज्ञानिक संज्ञा आणि संकल्पना पाहता, ‘सायन्स-फिक्शन’ आणि वास्तव यांचे एकसंध दर्शन नाटकातून घडते.

3. वाटले होते काही मैल - मध्यमवर्गातून नवश्रीमंतीत गेलेल्या एका माणसाला खून करून बघायचाय आणि त्यासाठी योगायोगानं एका मुलीचं तो अपहरण करतो. खुनाचं प्लॅनिंग खूप करतो; पण प्रत्यक्ष खून करत नाही. माणूस जेव्हा वस्तूंच्या उपयुक्ततावादी गोष्टींच्या घेऱ्यात अडकतो; तेव्हा त्याच्या स्वत्वाचं काय होतं, हे मांडणारं नाटक.

4. मौन - भाषा या व्यवस्थेचाच त्रास होणाऱ्या माणसाची गोष्ट. बोलून वर्षानुवर्षे शब्दांना येणारे असंख्य अर्थ माणसांचे संभ्रमांचे पडदे कसे अधिकाधिक उभे करतात. भाषेतून आपल्यात जी भर पडते, त्यातून कचराच अधिक निर्माण होतोय आणि तो रिकामा नाही केला गेला, तर भाषेचा आजार उद्‌भवतो. म्हणून तो माणूस भाषेच्या पर्यायाला नाकारणाऱ्या आणि तरीही संवादी संकेतव्यवस्थेच्या शोधात आहे. मौनाच्या शोधात आहे.

मुलाखत: श्रीराम मोहिते

Tags: मुलाखत श्रीराम मोहिते हिमांशू स्मार्त जत्रेतलं जायंट व्हील रा. शं. दातार नाट्य-पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat shriram mohite himanshu smart jatretal giant wheel jatretal jayant vhil raa shan datar natya purskar Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हिमांशू स्मार्त
himshikhasmart@gmail.com

नाट्यलेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके