डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गावठाणचा हक्क मच्छीमारांना द्या!

शासनाच्या जाहीर धोरणाप्रमाणे गावठाणाची सोय करून यायला महसूल खाते बांधील आहे. सरकारी जागेतील मच्छीमारांच्या वस्त्या गावठाण म्हणून जाहीर करण्याबद्दल संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव केले पाहिजेत. ग्रामसभेतही असा महत्त्वाचा ठराव करता येईल.

मच्छीमार कोळ्यांना मासेमारीसाठी वेळी-अवेळी समुद्रात जावे लागते. मासेमारी केल्यानंतर त्यातील काही मासे किनाऱ्यावर सुकवावे लागतात. नादुरुस्त झालेली जाळी सुकवावी लागतात. नवीन जाळी किनारी बसूनच विणली जातात. होड्या जवळच नांगरलेल्या असतात. मच्छीमार कोळ्यांची दैनंदिन कामे समुद्र खाडी किनारी चालतात. तेव्हा मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना किनाऱ्याशेजारीच वस्ती करून राहाणे आवश्यक ठरते. त्यामुळे मच्छीमार कोळ्यांची मोठमोठी गावे, वस्त्या दाटीवाटीने समुद्र किनारी, खाडी किनारी, आढळून येतात. त्यांच्या या वस्त्या एक तर (अ) गावठाणांत (ब) सरकारी जागेत आणि (क) खाजगी जमिनीत आहेत. गावठाणे फार कमी आहेत. 

सरकारी जागेतील मच्छीमारांच्या वस्त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अधिकार असूनही, अद्याप गावठाण म्हणून जाहीर केलेल्या नाहीत. मच्छीमार कोळी हे अन्य मागासवर्गीयांपैकी आहेत. मच्छीमारी करणारे काही तर महादेव कोळी जमातीचे आदिवासीही आहेत. तेव्हा शासनाच्या जाहीर धोरणाप्रमाणे गावठाणाची सोय करून यायला महसूल खाते बांधील आहे. सरकारी जागेतील मच्छीमारांच्या वस्त्या गावठाण म्हणून जाहीर करण्याबद्दल संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव केले पाहिजेत. ग्रामसभेतही असा महत्त्वाचा ठराव करता येईल. सरकारी जागेतील अशा वस्त्यांतून राहणाऱ्या मच्छीमार समाजाने संघटित होऊन त्यांची वस्ती गावठाण म्हणून जाहीर करावी, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली पाहिजे. आणि त्यांनी वा मागणीचा चिकाटीने पाठपुरावा केला तर यामध्ये त्यांना त्यांची ही मागणी वाजवी आणि न्याय्य असल्याने हमखास यश प्राप्त होईल असा विश्वास वाटतो.

 मच्छीमारीला पाण्यातील शेती म्हणून मान्यता देण्यात द्यावी, शेतीसाठी ज्या सोयी, सवलती, कर्जे, अनुदाने आणि संरक्षण उपलब्ध शासन करून देते ते सर्व मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्यांना द्यावे अशी मागणी आहे. ही मागणी अद्याप महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली नाही. पण समजा पुढे-मागे ही मागणी रास्त ठरविण्यात आली, तरी त्याचा उपयोग मच्छीमार वस्त्या कायदेशीर ठरविण्यासाठी आणि त्यांतील घराखालील जागा त्यांच्या हक्कांची होण्यासाठी उपयुक्त ठरेल का, हा प्रश्न शिल्लक राहतो. मच्छीमार हे काहीही झाले तरी वस्त्यांच्या जमीन मालकांचे कुळ ठरणार नसल्याने मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदा 1948 च्या तरतुदीचा उपयोग त्यांना या कामी होऊ शकणार नाही. 

गुजराथ हद्दीला लागून असलेल्या डहाणूच्या किना-यापासून थेट गोवा हद्दीला लागून असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील रेडी बंदरापर्यंतचा समुद्र किनारा सुमारे 600 किलोमीटर लांबीचा आहे. मोठमोठ्या अनेक खाइया आहेत. समुद्र आणि खाडी किनाऱ्याला मच्छीमारांच्या शेकडोंनी वस्त्या आहेत. त्यातून शेकडो नव्हे हजारो मच्छीमार कुटुंबे राहतात. तेव्हा त्यांच्या कल्याणासाठी, सुस्थिरतेसाठी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 खाली प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी जागेतील या वस्त्या गावठाण म्हणून जाहीर करणे अत्यावश्यक आहे. खाजगी जागेत समुद्रकिनारी पिढ्यानपिढ्या घरे बांधून राहणाऱ्या मच्छीमारांच्या या घरांखालील जागा त्यांना तेथून  हुसकावून लावून कबजात घेणे कोणत्याही जमीन मालकाला कदापिही शक्य होईल असे वाटत नाही. 

वास्तवाचे भान असलेल्या कोणत्याही जमीन मालकाच्या डोक्यात हा विचारदेखील येणार नाही. या वस्त्यांचे कित्येक जमीन- मालक हे सुसंस्कृत, सधन आणि सहृदयी आहेत, आणि त्यांना योग्य प्रकारे आवाहन केले, आणि तेही वरिष्ठ महसूल अधिका-यांनी, तर ते त्यांच्या अशा वस्त्यांच्या जमिनीवरील हक्क सोडून देण्याची खूप शक्यता आहे. पण तसा प्रयत्न अद्याप झालेला नाही. तो होणे आवश्यक आहे. काही थोडे जमीनमालक स्वतः होऊन त्यांची जमीन विनंती करूनही मोफत देण्यास कदापि तयार होणार नाहीत. अशा बाबतीत शेवटचा उपाय म्हणून वस्ती खालील त्यांची जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित करणे क्रमप्राप्त ठरणार आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत समुद्र खाडी किनाऱ्यावरील खाजगी जमिनीतील मच्छीमार कोळ्यांच्या वस्त्यांच्या जागा सरकारने ताब्यात घेऊन गावठाण म्हणून जाहीर करणे निकडीचे आहे. हे केले तरच मच्छीमारांना ते राहात असलेल्या घरांखालील जागेवरील मालकीहक प्राप्त होऊ शकेल आणि त्यांना त्यांच्या घराच्या जागेबद्दल वाटणारी काळजी, अस्वस्थता आणि विवंचना दूर होईल.

Tags: महाराष्ट्र खाडी महसूल जिल्हाधिकारी मासेमारी रा. वि. भुस्कुटे Maharashtra Bay Revenue Collector Fishing R.V. Bhuskute weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके