डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सुप्रसिद्ध पत्रकार श्री.. अरुण शौरी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकामुळे लोकसभेत गहजब झाला हा ग्रंथ अभ्यासपूर्ण लिहिल्याचा आव आणलेल्या शौरीनी ग्रंथात अर्धसत्य सुद्धा सांगितलेले नाही. घटनासमितीतील आंबेडकरांची कामगिरी तर त्यांनी लक्षात घेतलेली नाहीच. उलट त्यांना स्वार्थी देशद्रोही आणि संधिसाधू ठरविण्याची प्रचंड खटपट केली आहे.

‘वरशिपिंग फॉल्स गॉडस्' या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात अरुण शौरी यांनी दलितांचे आराध्यदैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कुजकट-कडवट टीकाटिपणी केली आहे. हा ग्रंथ अभ्यासपूर्ण लिहिला असल्याचा आव आणला आहे. ब्रिटिशकालीन जतन करून ठेवलेल्या सरकारी कागदपत्रांचा एकतर्फी मुबलक वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वयंकेन्द्रित, देशाभिमान नसलेले सत्तापिपासू राष्ट्र विरोधक, ब्रिटिशांचे हस्तक होते अशी त्यांची भयानक प्रतिमा उभी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. या ग्रंथाचे काळजीपूर्वक परिशीलन केले तर पत्रकार अरुण शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रामुख्याने पुढील गंभीर आरोप केले आहेत :

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंकेन्द्रित, स्वार्थी, सत्तापिपासू होते.

2. स्वातंत्र्यचळवळीचे विरोधक होते.

3. भौतिक फायद्यासाठी त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली.

4. घटना मंजूर करून घेण्याकामी त्यांनी केवळ सूत्रसंचालक (पायलट) म्हणून काम केले. त्यांना घटनेचे शिल्पकार वगैरे कदापिही म्हणता येणार नाही.

5. बौद्ध धर्म स्वीकारणे हा त्यांचा केवळ संधिसाधुपणा होता.

पत्रकार अरुण शौरी हे हिंदुवादी भारतीय जनता पक्षाचे, त्यातही पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दलित वर्ग देवासमान मानतो त्यांची निंदानालस्ती करण्याची, त्यांच्या पुतळ्याची विटंबना करून दलितांना भडकावण्याची. समाजात फुटीरता वाढविण्याची कटकारस्थाने सध्या होत आहेत. अत्याचार, दडपशाही, तर काही ठिकाणी दलितांचे शिरकाणही होत आहे. महाराष्ट्रातील युती सरकारच्या पोलिसांनी नुकताच नाहक क्रूर गोळीबार करून दहा दलितांना ठार मारले आहे. या पार्श्वभूमीवर अरुण शौरींच्या या खोडसाळ पुस्तकाला एक वेगळेच राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे. 

पुस्तक जाळणे योग्य नाही 

या स्फोटक परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निंदानालस्ती करणाऱ्या अरुण शौरींच्या पुस्तकाची भडकलेल्या दलित तरुणांनी ठिकठिकाणी होळी केली तर ते समजण्यासारखे आहे. पण तसे करणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली, ज्या तत्त्वांचा पुरस्कार जन्मभर केला त्याविरुद्ध हे आहे. या परिस्थितीत ब्रिटिश सरकारच्या एकतर्फी कागदपत्रांचा आधार घेऊन पूर्वग्रह दूषित सत्याचा सहेतुक अपलाप करणाऱ्या विधानांचा एकतर थंड डोक्याने खरपूस समाचार घेणे आवश्यक आहे किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अद्वितीय युगपुरुषावर राजकीय हेतुने खोडसाळ, रटाळ भिकार पण प्रक्षोभक टीका करणाऱ्या अरुण शौरीच्या या पुस्तकाकडे साफ दुर्लक्ष करणे सूज्ञपणाचे ठरणार आहे. 

स्वार्थी व सत्तापिपासू होते 

सावरकरभक्त कै. धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला खात्रीपूर्वक पटते की डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभर स्वतःचा समाज आणि भारत देशाच्या हिताचाच केवळ ध्यास घेतला होता स्वतःच्या स्वार्थाचा यत्किंचितही विचार कधीही त्यांनी केला नाही. असे कित्येक प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन गेले की, त्यांनी थोडा संधिसाधुपणा केला असता, अन्य अनेकांप्रमाणे तत्वाशी थोडी तडजोड केली असती तर त्यांना अमाप आर्थिक लाभ आणि सत्ताही प्राप्त झाली असती. विलायतेतून परत आल्यावर बडोदे सरकारने त्यांची उच्चपदी नेमणूक केली होती. पण सवर्ण चपराशाने त्यांच्या टेबलावर लांबून फाइल फेकली. 

त्यांच्या स्वाभिमानाला डिवचले. त्यांनी राजीनामा दिला. इतर अनेकांप्रमाणे त्यांनी थोडे दुर्लक्ष केले असते, तर ते बडोदे संस्थानात स्वकर्तृत्वाने उच्चपदी निश्चितच पोहोचले असते. हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यात त्यांना अपयश आल्यानंतर तत्त्वासाठी त्यांनी राजीनामा दिला. केन्द्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदावर लाथ मारण्याची जाज्वल्य तत्वनिष्ठा त्यांच्या ठायी होती. त्यांच्यावर जो स्वार्थीपणाचा, सत्तापिपासूपणाचा वाह्मात आरोप केला आह, त्याला उत्तर देण्यास हे दोन प्रसंग पुरेसे आहेत असे वाटते. 

स्वातंत्र्यचळवळीचे विरोधक होते! 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये साहाय्य केल्याचे अनेक प्रसंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रामध्ये वर्णिले आहेत. अरुण शौरींनी योग्य पद्धतीने संशोधन केले असते तर त्यांना हे माहीत पडू शकले असते की जेव्हा 'चले जाव' चळवळ ऐन जोमात होती तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या राजकीय विचारसरणीनुसार व्हॉइसरॉयच्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. परंतु तेव्हाही अच्युत पटवर्धनांसारख्या विख्यात भूमिगत काँग्रेस पुढाऱ्याला स्वतःच्या निवासस्थानी आश्रय देण्याचे अतुलनीय धाडस त्यांच्याकडे होते. त्यांची ही कृती स्वातंत्र्य चळवळीला विरोधक होती असे अरुण शौरी म्हणणार आहेत का? राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटिशसत्तेविरुद्ध जो प्रखर हल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चला, त्याकडे अरुण शौरींनी सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे. 

‘ब्रिटिश सत्तेपूर्वी आम्ही देवळात प्रवेश करू शकत नव्हतो. पण आता तरी करू शकतो का? आमची अस्पृश्यता चालविण्यासाठी ब्रिटिश सरकारने काही केले आहे का? गावच्या विहिरीवर आम्ही पाणी भरू शकतो का? या कोणत्याच प्रश्नांना होकारार्थी उत्तर मिळत नाही. 150 वर्षे ब्रिटिशसत्तेला झाली आहेत. या सत्तेने कोणाचे काय भले केले आहे? ही भाषा ब्रिटिश हस्तकांची असू शकेल का? याचा साधा विचार विद्वान अरुणभाईनी केलेला नाही. विभक्त मतदार संघाविरोधात 1932 मध्ये महात्मा गांधींनी उपोषण सुरू केले. ते मरणासन्न झाले. तेव्हा डॉ. बाबासाहेबांनी स्वतःची मूळ भूमिका सोडली. पुणे करारावर सही केली. त्या वेळचे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. निश्चितपणे ओढवणाऱ्या मरणापासून गांधींचा जीव वाचवणे सामान्य माणुसकी म्हणून माझे कर्तव्य होते. 

1932 साली महात्मा गांधींचा जीव वाचवून डॉ. आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला जो हातभार लावला आहे त्याची कबुली प्रामाणिकपणे अरुण शौरींकडून मिळण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यांचा दृष्टिकोण पूर्वग्रहदूषित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशभक्तीबद्दल खुद्द महात्मा गांधींना काय वाटत होते. याबद्दल धनंजय कीर यांच्या चरित्रग्रंथात दिलेला दोघांमधला संवाद येथे देणे प्रस्तुत ठरेल. राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर मुंबईच्या मणिभुवनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना भेटले होते. तेथे त्यांच्यामध्ये हा संवाद झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गांधीजी, मला मायभूमी नाही! या उद्गाराने व्यथित होऊन डॉ. आंबेडकरांना मध्येच तोडत महात्मा गांधी म्हणाले 'तुम्हाला मायभूमी आहे. 

राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तुम्ही केलेल्या कार्याचे अहवाल मला मिळाले आहेत. त्यावरून मला माहीत पडले आहे की तुम्ही अव्वल दर्जाचे देशभक्त आहात.' राष्ट्रपिता महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशभक्तीबद्दल खुद्द स्वतः निर्वाळा दिला आहे. तेव्हा बिनबुद्धाच्या उथळ तकलादू पुराव्याच्या आधारावर डॉ. बाबासाहेबांना स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक ठरविणाऱ्या कुजकट मनोवृत्तीच्या अरुण शौरीची दलित समाजाने केवळ कीव करणेच योग्य ठरणार आहे. 

भौतिक लाभासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली 

राष्ट्रीय काँग्रेसशी, महात्मा गांधीशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रामाणिक आणि खरेखुरे राजकीय मतभेद होते. वैचारिक दृष्टिकोणातून महात्मा गांधींच्या हरिजन उच्चाराचे ते कडवे विरोधक होते. तसेच स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्यता कायम रहाणार असेल तर असे स्वातंत्र्य दलित समाजाला नको आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती ही वस्तुस्थिती आहे. या त्यांच्या आग्रही भूमिकेमुळे महात्मा गांधी अथवा राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता. सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्या काळातील हिंदुमहासभा यांचे काँग्रेसशी प्रामाणिक राजकीय मतभेद असल्याने राष्ट्रीय काँग्रेस व महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे हे स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक ठरत नाहीत. 

तोच मापदंड डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लावण्याचे साधे भान किंवा किमान समज अरुण शौरीना का नसावी याचे राहून राहून आश्चर्य वाटते. पंडित हदयनाय कुंझरु, पंडित मदनमोहन मालवीय, पंडित मोतीलाल नेहरू, बॅ. जीना, डॉ. वी. एन. सप्रू, लोकनायक अणे. डॉ. खरे, डॉ. मुंजे, एन. एम. जोशी, शामाप्रसाद मुखर्जी, बॅ. सावरकर वगैरे उदारमतवादी, हिंदुत्ववादी तत्कालीन नेत्यांनीही त्यांच्या तत्कालीन राजकीय भूमिकेला अनुसरून राष्ट्रीय काँग्रेस व महात्मा गांधी यांच्यापेक्षा भिन्न भूमिका घेतली होती. परंतु म्हणून त्यांनी भौतिक फायद्यासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली असे म्हणणे तद्दन मूर्खपणाचे आहे. असा काही आरोप या मान्यवर नेत्यांवर करण्याचा साधा विचारही अरुण शौरीच्या मनाला शिवणार नाही. 

परंतु दलित समाजाच्या हितरक्षणाचे कंकण बांधलेल्या डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्रीय काँग्रेस व महात्मा गांधींशी मतभेद असल्याने प्रामाणिकपणे वेगळी राजकीय भूमिका घेऊन इतरांप्रमाणेच मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिल, राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला तेव्हा मात्र भौतिक फायद्यासाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली असा आरोप त्यांच्यावर अरुण शौरींनी केला आहे. हिंदुत्ववादी, उदारमतवादी पुढाऱ्यांना आणि डॉ. बाबासाहेबांना भिन्न मापदंड लावणे तार्किकदृष्ट्या न पटणारे आहे. तेव्हा मग मनुवादाचा पुरस्कार करणाच्या, दलितद्वेष्ट्या कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक असलेल्या सवर्ण अरुण शौरीनी हा जावईशोध लावला आहे असे म्हणणे भाग पड़ते. प्रक्षोभक असत्य विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात सतत राहण्याचा शौरींचा हा एक स्टंट आहे. असा निष्कर्षही यातून निघू शकतो. 

घटनेचे शिल्पकार वगैरे डॉ. बाबासाहेब नव्हते

घटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका नव्हती असे अरुण शौरींनी त्यांच्या ग्रंथात पुन पुन्हा आवर्जून प्रतिपादन केले आहे. पुस्तकाचा बराच भाग त्यांनी यासाठी खर्ची घातला आहे. अनेक कागदपत्रे, विविध भाषणे उद्घृत करून हा मुद्दा सिद्ध करण्याचा अरुण शौरींनी कसोशीने प्रयत्न केला आहे एक मूलभूत बाब आम्ही प्रथम लक्षात घेतली पाहिजे की, भारतीय घटना आपण एकट्याने नाही भारतीय ‘घटनेचे शिल्पकार', 'भारतीय घटनेचे पितामह' असा जो वारंवार उल्लेख डॉ. आंबेडकर यांचा होतो, त्यामुळे अरुण शौरी भयंकर अस्वस्थ होतात... आपल्या पुस्तकात त्यामुळे ते वारंवार प्रश्न उपस्थित करतात की भारतीय घटनेचा कर्ता कोण? 

अरुण शौरीच्या मताने पायलट ज्याप्रमाणे सागरातले जहाज कुशलतेने गोदीत सुरक्षितपणे आणतो, त्याप्रमाणे घटना समितीकडून घटना मंजूर करून घेण्याचे डॉ. आंबेडकर यांचे मर्यादित स्वरूपाचे काम होते व त्यांनी ते पार पाडले, तेव्हा त्याबद्दल त्यांना 'घटनेचे शिल्पकार', 'घटनेचे पितामह' वगैरे ठरविणे चुकीचे आहे. अरुण शौरींची मते काहीही असोत त्यांना काहीही वाटत असू दे. डॉ. आंबेडकरांचे समकालीन डॉ. के. एम. मुन्शी यांच्या मते घटनेची उत्क्रांती आणि मसुदा तयार करण्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी केलेली अमूल्य भरीव भागीदारी समाजातील दुर्बल घटकांच्या तरफदारी इतकीच त्यांच्या विधायक जीवनाचे ज्वलंत द्योतक आहे. जसपाल रॉय यांनी प्रांजळपणे कबूल केले की डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात काही पूर्वग्रह होते. 

परंतु त्यांनी केलेल्या उपयुक्त देशभक्तीपूर्ण कार्यामुळे कालांतराने त्यांच्याबद्दल अतीव आदर त्यांना वाटू लागला ते म्हणतात. 'मी त्यांना सर्वोत्तम सच्चा देशभक्त मानतो कोणत्याही विधयाकडे ते विधायक दृष्टीने पाहतात. कित्येक असे प्रसंग उद्भवले की पूर्णतया कोंडी निर्माण झाली. अशा प्रसंगी त्यांनी काही सूचना केल्या त्यामुळे कोंडीतून मार्ग निघाला. घटना समितीचे दुसरे एक सदस्य आर. जगमोहन राव यांच्या मते घटनेचा मसूदा तयार करण्याच्या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकर यांनी सर्वसमावेशक कार्यवाहीत येऊ शकणारा घटनेचा एक मसूदा तयार केला आणि त्यामध्ये स्वतःच्या काही मताचा समावेश केला होता. डॉ. आंबेडकरांवर विविध विचारांचा प्रभाव होता परंतु त्यांनी स्वतःच्या मतांचा दुराग्रह न धरता तड़जोडही केल्या एवढेच नव्हे तर काही प्रसंगी स्वतःच्या मतामध्ये अमूलाग्र परिवर्तनही केले. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मते डॉ. आंबेडकर हे  'घटनेचे सुविख्यात शिल्पकार आहेत: पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, ज्यांनी घटना तयार होतानाचे प्रचंड कार्य, प्रक्रिया जवळून पाहिली. त्यात सहभाग घेतला, त्यांनीच जर डॉ. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे सुविख्यात शिल्पकार म्हणून संबोधले  आहे तर यावर आणखी काही भाष्य करण्याची जरुरीच राहात नाही. पण तरीही अरुण शौरीनी भलामोठा जाडा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये डॉ. आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार नव्हते असे बेंबीच्या देठापासून वारंवार ओरडून सांगितले तरी घडलेला इतिहास बदलता येणार आहे का? ते कोणी मानणार आहे का? भारतीय घटनेचा शिल्पकार / पितामह एक अद्वितीय विद्वान दलित होता या वस्तुस्थिती बद्दलच्या या आततायी दीर्थद्वेषी सवर्ण अरुण शौरीच्या विषारी जळफळाटीचे हीन दर्शन मात्र या ग्रंथातून सर्वांना येणार आहे. 

बौद्धधर्म स्वीकारणे हा केवळ संधिसाधुपणा होता 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारणे हा त्यांचा केवळ संधिसाधुपणा होता. हा अरुण शौरीचा आरोप समजण्यापलीकडला आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेऊन कोणता निश्चित स्वार्थ साधण्याची संधी त्यांनी साधली, याचा खुलासा या ग्रंथात कोठेही केलेला नाही. बौद्ध धर्म स्वीकारणे ही निव्वळ राजकीय कृती होती असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा ऐनवेळचा आणि शेवटच्या क्षणी घेतलेता अचानक निर्णय होता असे अरुण शैरीचे प्रतिपादन आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह हिंदू धर्माचाच जाहीरपणे त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला याबद्दल भयानक संताप हिंदुत्ववाद्यांना वाटतो ही या मागची खरी पोटदुखी आहे. 

डॉ. बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला हे चांगले माहीत आहे की, मे 1936 मध्ये मुंबई येथील जाहीर भाषणात डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते की, 'हा धर्म कायमचा सोडण्याचे मी ठरविले आहे. माझे हे धार्मिक परिवर्तन भौतिक हेतूने प्रेरीत झालेले नाही. अस्पृश्य राहूनही मिळवू शकणार नाही असे काहीही नाही. म्हणजेच अस्पृश्य असूनही मी सर्व काही करू शकतो. परंतु माझ्या धार्मिक परिवर्तनामागे एक आध्यात्मिक उत्कटता आहे. 'डॉ. बाबासाहेबांना बौद्ध धर्माचे आकर्षण कित्येक वर्षांपासून होते आणि हे सर्वांना ज्ञात होते. बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी कित्येक वर्षे आधी त्यांनी स्थापना केलेल्या कॉलेजला 'सिद्धार्थ' आणि 'मिलिंद' ही नावे त्यांनी दिली होती. तर दादरच्या त्यांच्या घराला त्यांनी 'राजगृह' हे नाव दिले होते. तेव्हा डॉक्टर साहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय अचानक आयत्या वेळी घेतला या आरोपात काहीच तथ्य नाही. 

खरे पाहता डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय न येता इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला असता तर काय झाले असते? याचा विचार होणे खरे तर आवश्यक ठरते. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म त्यांनी पसंत केला असता तर त्यांना करोडो रुपये निश्चितपणे मिळू शकले असते. तसेच तो निर्णय भारत देशाला सर्व दृष्टींनी घातक ठरला असता, भारत देशातच निर्माण झालेल्या, इथल्याच संस्कृतीत मातीत जोपासला गेलेला बौद्ध धर्म हिंदुधर्माला त्यातल्या त्यात जवळचा आहे. तेव्हा हा धर्म स्वीकारून डॉ. बाबासाहेबांनी भारतावर अनंत उपकार केलेले आहेत. 

या त्यांच्या निर्णयामध्ये भारताबद्दल वाटणाऱ्या त्यांच्या निर्व्याज अकृत्रिम प्रेमाचा आविष्कार प्रकट होतो. तसेच त्यांच्या उत्कृष्ट देशभक्तीची प्रचीती येते. पण याची जाणीव ठेवण्याची बौद्धिक कुवत, कट्टर हिंदुत्ववादी, कालबाह्य मनु संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या कूपमंडूक अरुण शौरीना कशी बरे असणार? आम्ही हेही चांगले ध्यानात घेतले पाहिजे की, दलितांना सतत गुलामीत ठेवणारी मनुस्मृती जाहीरपणे जाळणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध या मनुच्या शिष्याने खोटेनाटे, कडवट, प्रक्षोभक लिहून दलितांच्या आराध्य दैवताची भारतीय समाजात नाचक्की करण्याचा हीन प्रयत्न केला आहे.

Tags: कॉंग्रेस  गांधी सावरकर जसपाल रॉय पंडित नेहरू डॉ. के. एम. मुन्शी धनंजय कीर बौद्ध धर्म अरुण शौरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रा. वि. भुस्कुटे Jaspal Roy Congress Sawarakar Gandhi Pandit neharu Dr. K.M. Munshi Dhananjay Kir Boudha Dharm Arun Shouri Dr. Babasaheb Ambedkar R. V. Bhuskute weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके