डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘बछड्यांनो - आठवतात तुचे चेहरे। शेंगदाणे ठेवलेले डोळे। फुलांच्या परड्या रिकाम्या व्हाव्यात। तसे लवंडता अंगावर। आईस्क्रीम पसरावे तसे पसरता अंगभर। मग, इथल्या खिडक्यांनाही जाग येते’ (या शहरातल्या घराच्या उंबरठ्यावरून) अशा साध्यासोप्या रचनेतून भाषेवरची विलक्षण पकड प्रत्ययाला येते. हा लेखक मुळात कविप्रकृतीचाच आहे आणि त्याचं कवितालेखन अव्याहत चालू राहणं आवश्यक आहे, असंच सतत जाणवत राहतं. याशिवाय, आशुतोषने मराठी आणि इंग्रजीतून काही प्रमाणात समीक्षाही लिहिली आहे.

आशुतोष पोतदार हा आमच्या पिढीचा प्रतिनिधी. गेल्या दीड-दोन दशकात लिहिते झालेल्या आणि लेखनाविषयी गंभीर आस्था असलेल्यांपैकी एक ठळक नाव. नाटक-एकांकिका, कविता, कथा अशा अनेक प्रकारांत त्याने साहित्यनिर्मितीचा प्रयत्न केला आहे. आशुतोषचं आतापर्यंत फक्त एकच पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. फ्रेंच नाटककार जाँ जने याच्या ‘द मेडस्‌’ या नाटकाचं ‘कामवाल्या बाया’ या नावाने मराठी रूपांतर ही त्याच्या नावावरील ग्रंथबद्ध असलेली एकमेव नोंद. आम्ही मित्रांनीच पुढाकार घेऊन, जुळवाजुळव करून हे पुस्तक छापलं. खरं तर हे नाटक नामांकित प्रकाशकाकडून छापलं जाणं आवश्यक होतं. त्यामुळे अनेकांपर्यंत हे नाटक पोचलं असतं आणि आशुतोषने घेतलेल्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं चीज झालं असतं.

‘बडा प्रकाशक’ गाठण्यातल्या खटपटी वगैरे गोष्टींवर स्वतंत्रपणे लिहिता येईल. त्याचा पाल्हाळ लावण्याची इथे गरज नाही. फक्त अशा खटपटी करण्यात आशुतोषला उत्साह नाही, तो त्याचा स्वभाव नाही. अनाठायी प्रसिद्धीच्या मागे लागण्यात वेळ दवडण्यापेक्षा आपण आपल्या आवडीचे काम प्रामाणिकपणे करीत राहावं अशी त्याची साधी सोपी सरळ भूमिका आहे. ‘प्लाटर्फॉ’, ‘सुख’, ‘शेतकरी डॉट कॉ’ या एकांकिकांबरोबरच काही पथनाट्यांचं लेखन आशुतोषने केलं आहे. अगुस्त, स्तीन्दबर्ग, दरिओ फो अशा लेखकांची ‘आई दहशतवाद्याची’, ‘मिस जुली’ ही रूपांतरं मराठीत करून त्याने खूप मोलाचं काम करून ठेवलं आहे. अलीकडेच ‘ऐवजी’च्या एका अंकात त्याच्या एकदम आठ कविता छापून आल्या. कवितेचं एक नवं, प्रसन्न रूप समोर आलं. ही कविता शहरी जीवनातील अनुभव, जाणिवा आणि संवेदनशीलता प्रकट करणारी असली तरी ती तिथेच थांबत नाही. तर मानवाच्या मूलभूत शोकात्म परिस्थितीचा आणि नियतीचा ती शोध घेते. अपरिचित अशा अनुभवविश्वाच्या गाभ्याला स्पर्श करण्यासाठी कवितेची नवी भाषाच प्रकट होत जाते.

‘बछड्यांनो - आठवतात तुचे चेहरे। शेंगदाणे ठेवलेले डोळे। फुलांच्या परड्या रिकाम्या व्हाव्यात। तसे लवंडता अंगावर। आईस्क्रीम पसरावे तसे पसरता अंगभर। मग, इथल्या खिडक्यांनाही जाग येते’ (या शहरातल्या घराच्या उंबरठ्यावरून) अशा साध्यासोप्या रचनेतून भाषेवरची विलक्षण पकड प्रत्ययाला येते. हा लेखक मुळात कविप्रकृतीचाच आहे आणि त्याचं कवितालेखन अव्याहत चालू राहणं आवश्यक आहे, असंच सतत जाणवत राहतं. याशिवाय, आशुतोषने मराठी आणि इंग्रजीतून काही प्रमाणात समीक्षाही लिहिली आहे. गंभीर प्रवृत्तीचा लेखक लेखनातून आपल्या काळाविषयी बोलत असतो. एक प्रकारे सामाजिक पर्यावरणातील आपलं संवेदनशील अस्तित्व तो या निमित्ताने अधोरेखित करत असतो. आशुतोषने करून ठेवलेलं सर्व लेखन या बाजूने विचारात घेतलं तर नाटक, कथा, कविता असे अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार हाताळून स्वत:चे संवेदनशील अस्तित्व प्रकट करण्यातील त्याची प्रामाणिक धडपड सुस्पष्ट व्हावी. (‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या 2008च्या दिवाळी अंकात ‘आशुतोष की अल्टरनेटिव्ह आँखियोसे’... या शीर्षकाखाली आशुतोषने देशाच्या विविध भागांत फिरून टिपलेल्या तेथील आम जनजीवनाच्या छायाचित्रांची मालिकाच प्रसिद्ध झाली आहे! अभिव्यक्तीच्या या नव्या डायमेंशनची या ठिकाणी नोंद घेणं आवश्यक वाटतं.) ‘आनंदभोग मॉल’ हे आशुतोषचं पहिलंच स्वतंत्र संपूर्ण नाटक. वर्तानाला प्रतिक्रिया कशी द्यायची हा पेच या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या कालखंडावर जागतिकीकरणाची एक दाट छाया पसरलेली आहे. नव्या सांस्कृतिक वसाहतवादाने गेल्या काही वर्षांत प्रत्येकाच्या ‘जीवनशैली’मध्ये झपाट्याने बदल होत आहेत. खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष आणि अभिसरण साऱ्या जगभर सुरू आहे. एका बाजूला मार्केट इकॉनॉीच्या प्रलोभनांचा प्रचंड ताण शहरी मध्यमवर्गावर पडतोय; तर दुसऱ्या बाजूला खेड्यातील जगण्याचे संदर्भ बदलत गेले आहेत. शॉपिंग मॉल्स, हेल्थ क्लब्स, मल्टिप्लेक्स, सौंदर्य प्रसाधनं, मोबाईल्स, इंटरनेट अशा अनेक गोष्टींची संख्या वाढू लागली आहे. मध्यमवर्गास या गोष्टींचं अप्रूप वाटतं आहे. अशा गोष्टी जीवनावश्यकच आहेत असं पटवून देणारी समांतर व्यवस्थाही उभी राहते आहे. औद्योगिकीकरणात उपजीविकेचं साधन शोधण्यासाठी लोक खेडी सोडून शहराकडे पळत सुटले होते. शहरांचं खूप मोठे आकर्षण वाटत होतं. पण जागतिकीकरणात ही प्रक्रिया उलट बाजूने होते आहे. शहरेच एक एक करीत खेड्यांना गिळंकृत करीत सुटली आहेत. शहर आणि खेडी यांतील सीमारेषा धूसर होत चालली आहे. अशा या जोरदार घुसळणीतून कदाचित शतकानुशतकं घट्ट रुजून राहिलेली जातीयता पूर्णपणे नाहीशी होईल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात वेगळंच चित्र समोर येतं आहे. प्रत्येकाच्या हाडीमांसी खिळलेली जातीयता अधिकच प्रखर होत चाललीय. ‘आनंदभोग मॉल’ या नाटकात आजच्या या वास्तवाचा अनेक बाजूंनी विचार मांडला आहे. या नाटकात दोनच पात्रं आहेत. नवरा आणि बायको. डॉ. आनंद पाटील हा पेशाने डॉक्टर असलेला शहाण्णवकुळी मराठा तर त्याची जातीने ब्राह्मण व पेशाने प्राध्यापिका असलेली बायको. दोन्ही व्यक्तिरेखा उच्चविद्याविभूषित आणि मध्यमवर्गाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या. नवरा आणि बायकोची जात भिन्न भिन्न आहे. या दोन्ही जातींना समाजव्यवस्थेत राजकीय आणि सामाजिक सत्तास्थान उपभोगण्याची संधी मिळालेली आहे. वर्चस्वाचा सुप्त अहंकार या दोन्ही पात्रांत पुरेपूर भिनलेला आहे. अधिक वरचा आर्थिक स्तर गाठण्याची नवराबायकोची पुरेपूर धडपड सुरू आहे. बाहेर स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे मिळालेल्या छोट्याशा संधीचंही सोनं केलं तरच आपला टिकाव लागणार आहे याचीही त्यांना जाणीव आहे. कोणत्याही थराला जाण्याची आणि वाट्टेल ती तडजोड करण्याची त्यांनी मानसिक तयारी केली आहे. पण या स्पर्धेत टिकण्याच्या धडपडीत त्यांना स्वत:कडे मात्र नीट ‘कॉन्सन्ट्रेशन’ करता येत नाही. अगदी त्यांची ‘सेक्स संबंध’ ठेवण्यातील मजा हरवून गेली आहे. मोबाईल स्क्रीनवर मल्लिका शेरावत सारख्या उत्तान फिल्मी नायिकांना बघून उद्दीपित होण्याचा केविलवाणा प्रयत्न नवरा करतो आहे. निकोप शारीरिक संबंधांअभावी मूल होत नसल्याने दोघेही चिंतातुर झाले आहेत. कुण्या माँदेवीच्या नामाचा मंत्रोच्चार, बीजफलनाचा सुयोग्य मुहूर्त साधण्यासाठी चिनी कॅलेंडरचा वापर असेही यांचे उद्योग चालले आहेत. सेक्स रिलेशनमध्ये दुर्बल ठरलेल्या नवऱ्याची ‘फोर्स जमा झाल्यावर करायचं’ ही अगतिकतेतून आलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी अशी आहे. ऐहिक सुखाच्या धडपडीत आतील ‘ओरिजनल फोर्स’ हरवून बसलेले हे नवराबायको बाहेरून उसना फोर्स मिळविण्याच्या खटपटीत आहेत. दोघेही नवराबायको बाहेर समाजात वावरताना आधुनिक इमेज सांभाळत असले तरी आतल्या आत स्वजातीचा सुप्त अहंकार त्यांना टाकून देता आलेला नाही. संधी मिळताच हा अहंकार बाहेर फणकाऱ्याने पडतो. आंतरजातीय लग्न करून जणू आपण जोडलेल्या जातीवर उपकारच केलेत असा पलटवार करायला दोघेजण मागेपुढे बघत नाहीत. वैयक्तिक फायदे उपटताना मात्र जातीचा अभिमान गळून पडतो. एका अमेरिकन संस्थेचं अनुदान पदरात टाकून घेण्यासाठी आनंद पाटील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमोर लाळघोटेपणा करतो. ‘ख्रिस्तीयन’ आणि ‘क्षत्रिय मराठा’ यांतील इंग्रजी उच्चार साधर्म्य लक्षात आणून देत ‘आम्ही तुचेच कसे’ असं जोडून घेताना त्याला कुठेही अपराधीपणा वाटत नाही. तर दुसऱ्या बाजूला ‘मराठा’ शिक्षणसंस्थेत नोकरी मिळविण्यासाठी ‘मी तुच्यातली’ असं त्याची बायकोही सोयीनुसार ‘जात’ वापरते. गैरसोयीच्या ठिकाणी जातीचा अभिमान बाजूला ठेवण्याचं व्यावहारिक चातुर्य दोघेही दाखवतात. ‘आनंदभोग मॉल’ या नाटकाला आणखी एक केंद्र आहे ते म्हणजे पुरुषप्रधान मानसिकतेचं दर्शन. नाटकाचा नायक आनंद पाटील यास ‘मराठा’ असण्याचाच दुरभिमान नाही तर पुरुषी अहंकारही त्याच्या नसानसात ठासून भरलाय. ‘पुरुष’ मंडळींची स्वत:च्या पत्नीबरोबरची सलगी त्याला अजिबात आवडत नाही. त्याच्या बायकोशी तिचा विद्यार्थी मनमोकळी चर्चा करतो ही गोष्टही त्याला रुचत नाही, कारण तो विद्यार्थी असला तरी ‘पुरुष’ आहे. दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्याचे वडील प्रतिष्ठित ग्रामस्थ असल्याने, त्यांची शिफारस फायद्याची ठरणार असल्याने तो स्वत:हून सलगी वाढवितो आणि आपल्या दुटप्पी वागणुकीची प्रचिती देतो. वारंवार व्यावहारिक तडजोडी करीत, लबाडी करीत, लाचार होत भौतिक सुखं प्राप्त केली असली तरी या नवरा- बायकोचं मन बेचैन आहे. आतल्या आत एकप्रकारे उलघाल सुरू आहे. शिक्षणाने, आर्थिक सुबत्तेुळे आपण ‘आधुनिक’ होत असलो तरीही दुसऱ्या बाजूला परंपरेने लादून ठेवलेल्या जात-पात, धर्म, लिंग या गोष्टींच्या सापळ्यातून आपणास सुटता आलेलं नाही. या सर्व गोष्टींना बळी पडून जगण्यात दाखवेगिरी, खोटेपणा, भंपकपणा यामुळे आपण नैसर्गिक स्वत्व हरवत चाललो आहोत याची जाणीव होते. एक प्रकारची अपराधीपणाची ठुसठुस त्यांच्या मनाला कुरतडते आहे. अशा प्रकारच्या वास्तवापासून दूर पळून जाण्याचा मार्ग ते शोधत राहतात. स्वत:च्या अस्तित्वाला हरवून जाण्याचा एक पर्याय त्यांना सापडतो - तो म्हणजे ‘मॉल’च्या झगमगाटात आणि पैसा खर्च करण्यासाठी आतुर झालेल्या बिनचेहऱ्याच्या ग्राहकांच्या गर्दीत स्वत:ला हरवून द्यायचं. मॉलमधल्या सरकत्या जिन्यावरून वरवर चढत राहून अधिक उंची गाठायची. यातच त्यांना मुक्ती दिसते. पण ही खरोखरची मुक्ती आहे की पुन्हा नव्या सापळ्यात अडकणं? एका सापळ्यातून सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या नव्या सापळ्यात जेरबंद होणं? आनंद पाटीलने नाटकाच्या शेवटास या नव्या सापळ्याचं सूतोवाच करून ठेवलं आहेच. त्याला स्वप्नातील हा मॉल आपल्या गावच्या शेतातल्या आंब्याच्या चार डेरेदार झाडांवर उभा करायचा आहे. हा मॉल कसा बांधायचा याविषयीची त्याच्या मनातील कल्पना सांगताना पुन्हा तो जातीच्या अहंकारानेच बरबटलेली भाषा बोलतो - ‘कसा बांधायचा? अगं सिम्पलय. कुलकर्णी-जोशी आर्किटेक्ट ॲण्ड कंपनीला बोलवू. ते त्यांचा मेंदू वापरतील. आतापर्यंत ते बांधावर उभं राहून सगळं डिझायनिंगचं काम करत आलेत. बांधणी करायला आमचेच लोक. उन्हातान्हात राबून रापून, घाम गाळायचं त्यांनीच करावं. मैदानात उतरून अंगावर माती घेणार तर तेच. अगं तो बघ अंतू हेगडे. आता तो धोतरात नाहीये, पँटीत आहे. आणि तो श्रीपा काळोजी बघ. किती छान हार्मोनियम वाजवायचा. घुवायचा सूर. आता मॉलच्या एंट्रन्सवर वॉचमन म्हणून उभाय. आणि ती सोनाबाई गवंडी बघ. कसा पांढराशुभ्र टी शर्ट घालून आलीये. तुझ्या काकाच्या घरात भांडी घासायला यायची मागच्या दारात. घाम गाळतेय गं इथल्या एसीत स्वीपिंग करताना. परड्यातल्या कोनाड्यातला कप घेऊन मुकाटपणे उकिरड्याजवळ बसून चहा प्यायचा त्याचा मुलगा. बघ, अगं तो - तो चकचकीत लाल रंगाचा शर्ट घातलाय. फर्स्टक्लास ग्रॅज्युएट झालाय तो आणि ऐक की - फार छान गाणी म्हणतो तो - तो बघ कोल्ड्रिंगस्‌चे कॅन्स खांद्यावर घेऊन जातोय. ते बघ कार्सधून शॉपिंग करायला किती गर्दी झालीय - त्यांच्यासाठी गावाचा फील द्यायला हट रेस्टॉरंट पण बांधून झालंय...’ एकंदरीत वर्गश्रेष्ठत्वातून आलेला अहंकारीपणा आणि काहीही झालं तरी तथाकथित प्रगतीच्या टप्प्यावर जातीमधील नव्या उतरंडीची गुंतागुंत टोकदारपणे व्यक्त होते. माणसामाणसांतले तणाव कोणकोणत्या पातळ्यांवर पोहोचले आहेत याचा शोध घेण्याचा नेटका प्रयत्न ‘आनंदभोग मॉल’ या नाटकातून आशुतोषने केला आहे. मानवी जीवनातील व्यक्तीच्या वागण्याचं, अंतर्विरोधाचं, नाट्याचं आशुतोषला आकर्षण आहे. नवरा आणि बायको या दोन व्यक्तिरेखांच्या परस्परविरोधी वागण्यातील विलक्षण ताण कायम ठेवून मानवी वर्तनाचं खूपच छान चित्रण करण्यात तो कमालीचा यशस्वी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगावसारख्या छोट्याशा खेड्यातून लहानाचा मोठा झालेला आशुतोष आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात नोकरीच्या निमित्ताने इचलकरंजी, कोल्हापूर, बंगलोर अशा अनेक ठिकाणी फिरत राहिला. ग्रामीण, नागरी आणि महानगरी जीवनवास्तवाशी त्याचा अर्थातच प्रत्यक्ष संपर्क राहिला. त्यामुळे त्याला अनेक स्तरांवरील, वेगवेगळ्या भौगोलिक पर्यावरणातील भाषेचे पोत वापरणं सहज जमतं. त्याच्या लेखनातील प्रत्येक व्यक्तिरेखेला निश्चित वैशिष्ट्य आहे आणि ज्याचा त्याचा विक्षिप्तपणाही आहे. ‘आनंदभोग मॉल’ नाटकातील आनंद पाटील ही अस्सल ‘कोल्हापुरी’ व्यक्तिरेखा या दृष्टीने तपासून बघण्यासारखी आहे. ‘आनंदभोग मॉल’ हे नाटक आशय आणि आविष्कार या दोन्ही दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असंच आहे. आजच्या आणि नजीकच्या काळातील नवा नाट्यानुभव कोणता आणि कशा प्रकारचा असू शकतो या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं जातं. समोर येणारं वास्तव नाउमेद करणारं आहे. आपली इच्छा असो अथवा नसो, त्यापासून सुटका नाही. जागतिकीकरणामुळे ‘जग एक खेडे’ ही कल्पना पुढे येत असली तरी दुसऱ्या बाजूला व्यक्तीव्यक्तींमधला संवाद थांबला आहे. माणसाचं वस्तूत रूपांतर झालं. समाजकारणसत्ताक ारण यांचा चेहरामोहरा बदलला. हिंसा, दंगली, सत्ता, लालसा, चंगळवाद, धार्मिक वेडाचार, वंशद्वेष, बॉम्बस्फोट अशा गोष्टी परवलीच्या झाल्या. संपूर्ण कलाव्यवहार दहशतीखाली दबून चालला आहे. याबद्दल अस्वस्थ असणारे माझ्या पिढीतील अनेक जण आपआपल्या वकुबानुसार भवतालच्या बऱ्यावाईटपणाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. मात्र अशांची संख्या खूपच कमी आहे. ही गोष्ट आजच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजाशी सुसंगत नाही... 

Tags: महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार2011 आनंदभोग मॉल नाटक आशुतोष पोतदार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके