डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तो जवळ आला. आपण एस.टी. स्टॅण्डवर आहोत, सोबत मुले-मुली आहेत, फुल पब्लिक सभोवती आहे- हे सारे विसरून त्याने मला एका क्षणात साष्टांग नमस्कारच घातला. मी गोंधळलोच.

मी कार्वे येथील शाळेत बदलून गेलो. इयत्ता पाचवीचा वर्ग मला मिळाला. नापास झालेली तीन मुले त्या वर्गात होती. त्यांतील एक होता माणिक शिवाण्णा कोळगे.

मी त्याला उभे केले. ढगळे कपडे घातलेला, हातापायांच्या काड्या असलेला माणक्या उभा राहिला. त्याच्याकडे पाहताच हा जेमतेम परिस्थितीतील गरीब मुलगा आहे, हे जाणवत होतेच.

मी म्हटले, ‘‘माणिक तू, गतवर्षी नापास झालेला आहेस.’’

मुले ओरडली, ‘‘त्याचे हे पाचवीत तिसरे वर्ष आहे.’’

 मी विचारले, ‘‘तू दोन वर्षे नापास झालायस?’’

 माणिकने खाली बघत ‘होय’ म्हणून मुंडी हलवली.

मी म्हटले, ‘‘फक्त दोन वर्षेच नापास झालायस ना माणिक, असू देत. या वर्षी मी तुला पास करणार!’’

 माणिकचे डोळे आनंदाने चमकलेले मला दिसले. मी त्याच्याकडे कोणकोणती पुस्तके आहेत, हे पाहिले. त्याच्याजवळच्या पुस्तकाच्या निरगाण्या होत्या, वह्या अर्धवट लिहिलेल्या कोऱ्या होत्या. हस्ताक्षर पाहिले, ते कमालीचे अस्वच्छ होते. काना, मात्रा, वेलांटी नीट लिहिलेली नव्हती.

मी त्याला वाचायला लावले. तो एक-एक शब्द काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार चुकवून वाचू लागला. मी अंक वाचायला लावले, तर त्याला अंक ओळखता येत होते; पण मधले-मधले वाचता येत नव्हते.

मी त्याला सुवाच्य अक्षरात बाराखडी काढून दिली आणि खाली एक-एक अक्षर लिहून याच्या बाराखड्या पूर्ण कर म्हणून सांगितले. त्याच्याकडून ‘क’ची बाराखडी चार-पाच वेळा म्हणून घेतली आणि पंधरा ते वीस मिनिटांत सर्व बाराखड्या लिहून मला दाखवायला सांगितले.

मी इतर मुलांची तयारी बघू लागलो. प्रत्येकाकडून वाचून  घेतले. त्यांच्या वह्या पाहिल्या. लेखनातील त्यांचे दोष, वाचनातील त्यांच्या त्रुटी शांत शब्दांत विद्यार्थ्यांना समजावत होतो. तेवढ्यात माणिक बाराखडी पूर्ण करून आला. त्या वेळी माझे लक्ष गेले- तो पायाने फेंगडा होता. लहानपणी त्याला पोलिओ झाला असावा. त्यामुळे त्याचे दोनही पाय आणि हातसुद्धा बारके झालेले असावेत. त्याने हस्ताक्षर जरा बरे काढलेले होते. मी त्याला पुन्हा म्हणत-म्हणत बाराखड्या लिहायला लावल्या. अजून आम्हा शिक्षकांचे तासांचे वेळापत्रक जुळत नव्हते, त्यामुळे एकेक वर्ग घेऊन आम्ही बसलो होतो. इतर मुलांचे लेखन-वाचन घेत असताना माणिकचे बाराखडी-लेखन, वाचन दिवसभर घेत राहिलो. शाळा सुटण्याअगोदर त्याचे एकेक शब्द लिहून, वाचून घेतले. तो बरोबर वाचत होता.

मी म्हणालो, ‘‘माणिक, बघ. एक दिवस मनापासून अभ्यास केलास, तर तुला सर्व अक्षरे चांगली लिहिता आणि वाचता येऊ लागली. तू असाच वर्षभर अभ्यास केलास, तर चांगल्या मार्कांनी नक्की पास होशील.’’

 त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला. म्हणाला, ‘‘होय गुरुजी, मी रोज शाळेत येईन आणि अभ्याससुद्धा करीन.’’

तो तीन-चार दिवस शाळेत आला. त्याला पुस्तकातील दोनअक्षरी शब्द लिहायला, वाचायला लावले. नंतर तीनअक्षरी शब्द, चार-अक्षरी शब्द त्याने भरपूर लिहून-वाचून दाखविले. हे सर्व त्याला पूर्वीच येत असावे; पण मला जमतच नाही, हा मनाचा न्यूनगंड आणि थोडीशी मन-मेंदूवर पडलेली धूळ झटकली तसा तो लिहू-वाचू लागला. पण चार दिवसांनी तो शाळेतच आला नाही.

त्याची दोन-तीन दिवस वाट पाहिली. तो आलाच नाही. मी चौकशी केली तर एक विद्यार्थी म्हणाला, ‘‘गुरुजी, माणक्या आमच्या भावाबरोबर शाळेत होता. आमचा भाऊ सातवीत आहे. तो कायम असाच शाळेत गैरहजर राहतो. ओढ्यातून मासे पकड, व्हले मार... कुत्री घेऊन पुढल्या पसरलेल्या माळावरून हिंड आणि घोरपड मारून आणअसे धंदे करतो.’’

‘‘आपण त्याच्या वडिलांना भेटून सांगू.’’ मी म्हणालो.

मुले म्हणाली, ‘‘गुरुजी, त्याचे वडील कडकलक्ष्मी आहेत. एवढ्या मोठ्या जाड चाबकाचे फटकारे अंगावर मारतात. देवी त्यांच्या अंगात येते. पण आता ते इथे नसतात.  ते आणि त्यांची बायको- म्हणजे माणक्याची आई दूर तिकडे कोकणात कडकलक्ष्मीचा खेळ खेळत हिंडतात. नाचणी, तांदूळ गोळा करतात आणि हिकडं घेऊन येतात.’’

‘‘मग इथे माणिक कुणाजवळ असतो?’’

‘‘इथं त्याचा थोरला भाऊ आणि वहिनी असते. भाऊ भंगार गोळा करून विकतो. वहिनी दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाते. ते माणक्याला ‘शाळेत जा’ म्हणतात, पण माणक्या कुणाचंच ऐकत न्हाई.’’

मुलांनी त्याचा सर्व सातबारा मला ऐकवला. पुढे आणखी तीन-चार दिवस गेले, पण माणिक शाळेत आला नाही. मी ठरवले, त्याच्या घरी जायचे.

‘‘रविवारी मी माणिकला भेटायला जातोय, तुम्ही शाळेत या. आपण मिळून त्याच्या घरी जाऊ’’ मी वर्गातील काही विद्यार्थ्यांना सांगितले.

सकाळी नऊ वाजता शाळेत गेलो, तर दोन विद्यार्थी माझी वाटच पाहत बसलेले होते. आम्ही मिळून माणिकच्या घरी जायला निघालो. बेघर लोकांना ओढ्याच्या पलीकडे गायरानातील प्लॉट वाटण्यात आले होते. त्यात माणिकच्या वडिलांनी एक प्लॉट आणि त्यावर बेघरांसाठीच्या योजनेतून मिळवलेले घर होते. माझ्यासोबतचे मदने आणि जाधव हे दोन विद्यार्थी माहिती पुरवत होते.

दारातील एका उंच झाडाला टेकून माणिकचा भाऊ बसलेला होता. दारात एक शेळी बांधलेली होती. जवळच भंगार साठवलेले दिसत होते. घर जसे जवळ आले, तसा माणिक खिडकीत आला. ते मुलांनी मला दाखवले. पण आम्ही एका वळणावरून वळतोय तोवर लंगडत-लंगडत माणिक ओढ्याकडे धावत गेलेला दिसला. मुले म्हणाली, ‘‘गुरुजी, बघा बघा- माणक्या आपल्याला बघून पळून चाललाय.’’

मी म्हटले, ‘‘जाऊ दे. आपण त्याच्या घरी त्याच्या भावाला भेटू आणि परत येऊ.’’

आम्ही त्याच्या दारात गेलो. आम्हाला बघून माणिकचा भाऊ उठला. ‘या-या’ म्हणाला. त्याने घरात जाऊन चटई आणली. ती अंगणात अंथरली. त्याचा भाऊ नुकताच भंगार गोळा करून आलेला असावा, कारण जवळच उभ्या सायकलीवर भंगार बांधलेले होते. शेळीच्या मुताचा वास अंगणभर पसरला होता.

चटईवर बसलो. माणिकच्या वहिनीने तांब्या भरून आणून दिला. हे माणिकचे गुरुजी आहेत, मुलांनी सांगितले. ‘‘माणक्या आता इथंच होता... कुठं गेला...?’’

माणिकचा भाऊ म्हणाला. तर वहिनी घरातून म्हणाली, ‘‘गुरुजी आलेलं बघितलं, तसा ओढ्याकडे पळून गेला.’’

मी म्हटलं, ‘‘माणिक शाळेत येत नाही. त्याला आपण दररोज शाळेत पाठवावं म्हणून आलोय.’’

‘‘गुरुजी, माणक्या हाय अपंग. याला एखादा कामधंदा पण व्हायचा न्हाय, म्हणून म्हणतोय शाळा शीक बाबा... शिक्षण घेतलं तर काय तरी ज्ञान येईल. नोकरी लागली तर बरंच झालं. न्हाय लागली, तर एखाद दुसरा धंदा सुरू करील. पण ते पोरगं ऐकतंय कुठं? काय तरी निमित्त काढतंय आणि घरीच राहतंय. बरं, आई-बाप मागनी मागाय कोकणात जात्याती; आम्ही आमच्या पोटाच्या मागं. रोज काय तरी हातपाय हालवलं तरच ताटात जेवाण. न्हाय तर पाणी पिऊन झोपाय लागतंय... पण काय ह्या पोराच्या डोक्यातच शिरंना... आता मी तरी काय करू... शेवटी तो आणि त्याचं नशीब...’’ त्याचा भाऊ वैतागानं बोलला.

तेवढ्यात आपल्या मळकट शर्टाच्या पंख्यात पाच-सहा गारसलेले पेरू आणि लालभडक दोन डाळिंबं घेऊन फेंगडत माणिक आला. आमच्यासमोर त्याने आपल्या ओट्यातील पेरू व डाळिंबं ओतली आणि हसत उभा राहिला. म्हणाला, ‘‘गुरुजी पहिल्यांदा घरी येताना दिसलं म्हणून पळत जाऊन ओढ्यातील झाडावरून पेरू आणि डालिंब घेऊन आलोय.’’

मी श्रीराम नव्हतो, पण माणिकने आणलेले पेरू आणि डाळिंबांत शबरीच्या बोरांचा भक्तिभाव नक्की होता. मी त्यांतील एक पेरू उचलला आणि माझ्यासोबत आलेल्या विद्यार्थ्याला तो धुऊन फोडून आणायला सांगितले.

माणिक, त्याचा भाऊ आणि वहिनी यांना सांगितले, ‘‘माणिकला तो शिक्षण घेतोय तोपर्यंत सरकारची अपंग स्कॉलरशिप मिळेल. त्याचा एस.टी., रेल्वेचा प्रवास फक्त पंचवीस टक्के रकमेत होईल. शिवाय अपंग म्हणून त्याला नक्की नोकरी मिळेल. पण त्यासाठी सिव्हिल सर्जनचे अपंग सर्टिफिकेट मिळवावे लागेल. आणि त्यासाठी त्याला दररोज शाळेत यावे लागेल.’’

माणिकने दररोज शाळेत यायचे कबूल केले. त्याप्रमाणे तो दररोज शाळेत येऊ लागला. त्याचे अपंग सर्टिफिकेट काढण्यासाठी एक दिवस त्याला विट्याला घेऊन आलो. विट्यातील ‘फासे फोटोग्राफर’चे मालक संजय फासे कोणाही अपंगाचे सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे चार  फोटो फुकट काढून देतात. त्यांना भेटून माणिकचे फोटो काढले. त्याच वेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याचे अपंग सर्टिफिकेट मिळवले. आता या सर्टिफिकेटवरून सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट मिळते; पण सिव्हिल सर्जन सांगलीत जिल्ह्याच्या ठिकाणी होते.

माणिकला घेऊन सांगली सिव्हिलला जा’ असे अनेक निरोप त्याच्या भावाला पाठवले, पण तो पठ्‌ठ्‌या काही केल्या जाईना. समाजकल्याणने पंचवीस ऑगस्टच्या आत सर्व अपंग मुलांचे फॉर्म भरावेत, अशी पेपरला जाहिरात दिली. मग मात्र माणिकच्या घरी जाऊन त्याच्या भावाला सांगून आलो. आता 15 ऑगस्ट ही तारीख संपून गेली होती. दुसरे दिवशी माणिक म्हणाला, ‘‘गुरुजी, आमचा भाऊ काय सांगलीला येणार नाही. तो म्हणतो, सिव्हिल हॉस्पिटल किती मोठे आहे! तिथे मला काही सर्टिफिकेट आणणे जमायचे नाही.’’

मग एका गुरुवारी मी शाळेत रजा भरून माणिकला बरोबर घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. जोगिंदर सिंग नावाचे सिव्हिल सर्जन होते. त्यांना भेटलो. माणिक गरीब मुलगा असून मी त्याचा शिक्षक त्याच्या प्रेमापोटी त्याला घेऊन आल्याचे सांगितले.

जोगिंदर सिंगनी ताबडतोब सर्टिफिकेट दिलेच; पण माणिकचे हातांचे, पायांचे, कमरेचे मागून-पुढून पाच-सहा एक्स-रे काढले. माणिकला काही प्रश्न विचारले आणि मला त्यांनी हिंदीतून सांगितले, ‘‘हा मुलगा खूपच ठिकाणी लंगडतोय. याची तीन ठिकाणी ऑपरेशन्स केली, तर हा आहे त्यापेक्षा बराचसा चांगला होईल. त्याचे वय लहान आहे तोपर्यंत सर्व ऑपरेशन्स यशस्वी होतील. त्याच्या पालकांस समजावून सांगा. त्यांची सहमती मिळाली, तर इथेच सर्व ऑपरेशन्स अगदी मोफत करता येतील. मी वैयक्तिक लक्ष घालून सर्व ऑपरेशन्स करून देईन. गुरुजी, अत्यंत गरीब मुलाची सेवा केल्याचे पुण्य तुमच्यामुळे मला मिळेल.’’

सिव्हिल सर्जनची माणुसकी बघून मी चाट पडलो. सांगली एस.टी. स्टँडवर फॉर्म भरून दिला आणि माणिकचा अपंग पास घेतला. येताना एस.टी. कंडक्टरने त्याचे पंचवीस टक्केच तिकिटाचे पैसे घेतले. त्याचा समाजकल्याण अपंग स्कॉलरशिपचा फॉर्म भरून तो झेड.पी. समाजकल्याणकडे पाठविला.

सिव्हिल सर्जनचे बोलणे माणिकने लक्षपूर्वक ऐकले होते. तो मुलांना सांगत होता, ‘‘डॉक्टर म्हणालेत याची दोन-तीन ऑफरेशनं करून देतो; मग हा इतर मुलांसारखा चालेल, धावेल, क्रिकेटसुद्धा खेळेल.’’

मुले मला विचारायला यायची, ‘‘गुरुजी, माणक्याची दोन तीन ऑफरेशनं केली तर तो आमच्यासारखा चालेल, पळेल, क्रिकेट खेळेल... माणक्या आम्हांला सांगतोय.’’

मी ‘हो’ म्हणायचो.

सप्टेंबर गेला. ऑक्टोबर संपता-संपता सहामाही परीक्षा झाली. माणिक सर्व विषयांत पास झाला होता. दिवाळी सुट्टी लागली. मी मुलांना सुट्टीचा अभ्यास सांगितला. शाळा सुटायची घंटा वाजली. सर्व मुले हुर्रेऽऽऽ करीत वर्गातून अत्यानंदाने पळाली. वर्गाच्या खिडक्या व्यवस्थित लावून त्या आतून गजाबरोबर सुतळीने बांधून घेतल्या. वर्गाला कुलूप लावले. स्टाफरूममध्ये जाऊन सर्व साहित्य माझ्या कप्प्यात ठेवून, इतर शिक्षकांच्या बरोबर पाच-दहा मिनिटे बोलून आम्ही सर्व जण घराकडे निघालो.

मी माझी मोटारसायकल ठेवली होती तिथे गेलो, तर माझ्या गाडीला स्वत:चे दप्तर अडकवून माणिक उभा राहिलेला.

मी विचारले, ‘‘का रे माणिक, अजून का थांबला आहेस?’’

तो म्हणाला, ‘‘गुरुजी, कडकलक्ष्मीची मागणी मागून माझे आई-वडील दिवाळीला घरी येतात. ते घरी आले, तर मी तुम्हाला फोन करीन. मला तुमचा नंबर द्या. मी फोन केल्यावर तुम्ही घरी या. वडिलांना माझ्या ऑफरेशनबद्दल समजावून सांगा. तुम्ही सांगितल्यावर त्यांना पटेल. दिवाळी सुट्टीत माझे ऑफरेशन होईल, म्हणजे शाळा पण बुडायची न्हायी आणि माझ्या अभ्यास पण बुडायचा न्हायी.’’

त्याच्या डोळ्यांत मला कमालीचा आर्जवीपणा वाटला. मी स्वत:च त्याच्या दप्तरातील वही काढली अन्‌ त्यावरील शेवटच्या पानावर माझा नंबर लिहून दिला आणि सांगितले, ‘‘माणिक तू फक्त फोन कर. मी तुझ्या आई-वडिलांना समजावून सांगण्यासाठी तुझ्या घरी येतो आणि आजपासून तू तुझा अभ्यास कर म्हणजे ऑपरेशनमध्ये अभ्यास बुडेल तो भरून निघेल.’’

‘‘हो गुरुजी- हो गुरुजी!’’ म्हणत माणिक निघून गेला.

भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी माणिकचा फोन आला. गावातल्या एस.टी.डी.वरून त्याने फोन लावला होता. म्हणाला, ‘‘गुरुजी, उद्या आमच्या घरी याल का?  दिवाळीला माझे आई-वडील आले आहेत.’’

 मी माणिकच्या घरी गेलो. उन्हातान्हात, पाऊसवाऱ्यात कडकलक्ष्मीची ढोलकी वाजवून आणि डोक्यावरून तिचा गाडा वाहून रापलेली, थकलेली माणिकची आई भेटली. पलीकडच्या एका झाडाखाली त्याचे वडील झोपलेले होते. माणिकने ते खूप दारू प्यायलेत, असे हाताने खुणावले. ‘‘माणिक ऑपरेशनने एकदम चांगला नाही, पण आता जो फेंगडत चालतो त्यापेक्षा खूप बरा होईल. त्याला ताठ चालता येईल, असे सिव्हिल हॉस्पिटलच्या मोठ्या डॉक्टरांचे मत आहे आणि त्यासाठी पैसे लागणार नाहीत. पेशंटची आणि सोबत गेलेल्या एका माणसाची जेवणाची सोय सरकारतर्फे होईल. लागणारी औषधेही सरकार देईल.’’ मी त्या माऊलीला सांगितले.

तिच्या डोळ्यांत पाणीच तरळले. म्हणाली, ‘‘गुरुजी, एवढे आमच्या गरिबासाठी करा. तुमचे लई उपकार व्हतील. आम्हांला त्यो दवाखाना सापडायचा न्हाय. तुम्हीच तेवढं ऑफरेशन करून द्या.’’

मी सिव्हिल सर्जनचा फोन आणला होता. मी त्यांना फोन लावून माणिकची आठवण करून दिली. त्यांनी दुसरे दिवशी पेशन्टला पाणीही न देता सकाळी लवकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन या असे सांगितले.

आई-वडील दोघे ऑपरेशनच्या वेळी लागतात, हे त्या माऊलीला मी सांगितले. दुसरे दिवशी सकाळी सातच्या एस.टी.ने मी येतो, आपण इथल्या एस.टी. स्टॉपवर थांबा व एस.टी.त चढा, असे सांगून मी परत घरी आलो.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी विट्याहून सांगलीला जाणारी सातची एस.टी. पकडून मी निघालो. वाटेत माणिकचे गाव लागले. डोक्याला भरपूर केस टॉवेलात बांधलेले व मिशांचे आकडे ओठांवर शोभणारे वडील आणि आई व माणिक बसस्टॉपवर थांबलेले होते. ते एस.टी.त चढले.

सुदैवाने सिव्हिल सर्जन भेटले. त्यांनी माणिकला पुन्हा काही डॉक्टरांच्या समवेत तपासले आणि ऑपरेशनसाठी घेतले.

त्याचे आता कमरेचे एक मेजर ऑपरेशन करणार होते. चार-सहा दिवसांनी दुसरे ऑपरेशन आणि नंतरच्या सहा दिवसांनी तिसरे ऑपरेशन करणार होते.

दुपारी एक वाजता माणिकला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढून एका स्पेशल रूममध्ये ठेवले. तो शुद्धीवर आल्यानंतर, ‘तू लवकर बरा होशील, चांगला होशील’ वगैरे शब्दांचे सांत्वन करून त्याला काही फळे देऊन मी घरी परत आलो.

दिवाळी सुट्टीत हॉस्पिटलमध्ये तीन-चार वेळा मी माणिकशी फोनवरून बोलून त्याला धीर दिला. सुट्टीनंतर महिनाभराने माणिक शाळेत आला. आता तो पूर्वीपेक्षा किती तरी पटींनी चांगला झाला होता. अजूनही तो अपंग होताच, पण बऱ्यापैकी ताठ उभा राहू शकत होता. चालू शकत होता. माणिक अभ्यासाला लागला. त्याला अपंग स्कॉलरशिपही मिळाली. तो पाचवी, सहावी, सातवी पास झाला.

कार्वेहून माझी दुसरीकडे बदली झाली. माणिकने त्या वेळी हायस्कूलला ॲडमिशन घेतली होती. मधली चारपाच वर्षे मी नव्या गावात नव्या शैक्षणिक समस्यांना तोंड देत राहिलो. एक दिवस मी मुक्तांगण वाचनालयाच्या व्याख्यानमालेत येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विटा एस.टी. स्टॅण्डवर गेलो होतो. समवेत काही सहकारी मित्र होते.

 मी दिसताच एस.टी.साठी उभे राहिलेले काही तरुण विद्यार्थी माझ्याकडे धावत आले. ते सर्व जण माझे कार्वे गावचे विद्यार्थी होते. ते एकदम म्हणाले, ‘‘गुरुजी, आम्ही बारावी पास झालो.’’

मी म्हणालो, ‘‘अभिनंदन!’’

तेवढ्यात ते पुन्हा म्हणाले, ‘‘गुरुजी, तुमचा माणक्या पण चांगल्या मार्कांनी पास झाला.’’ असे म्हणून ते पळत आले त्या दिशेला त्यांनी पाहिले. मीही पाहिले. माणिक हसतहसत माझ्याकडे येत होता.

तो जवळ आला. आपण एस.टी. स्टॅण्डवर आहोत, सोबत मुले-मुली आहेत, फुल पब्लिक सभोवती आहे- हे सारे विसरून त्याने मला एका क्षणात साष्टांग नमस्कारच घातला. मी गोंधळलोच. त्याला वर उठवले. माझे हात हातात धरून तो म्हणाला, ‘‘गुरुजी, तुमचा माणिक बारावी पास झाला.’’ एकाच वेळी माझ्या आणि त्याच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. हे आनंदाश्रू होते. (नंतर माणिकने एमपीएसची परीक्षा दिली आणि तो क्लास वन अधिकारी झाला. सध्या तो बृहन्मुंबई महानगरपालिकेत पर्यावरण विभागात कार्यरत आहे.)

Tags: शाळेतील दिवस शाळा रघुराज मेटकरी माणिक माझे विद्यार्थी school days school Raghuraj Metkari Manik Maze Vidyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके