माझे हे भाषण लक्षात राहील असे होणार नसेल तर तुम्हीसुद्धा ते लक्षात ठेवण्याची तसदी घेणार नाही. आताही तसे होणार असेल तर आपण आपल्यासमोरील इतर महत्त्वाची कामे करायला जाणे योग्य ठरेल. पण मी तसे करणार नाही. आपले भाषण लक्षात राहील की नाही याची फार पर्वा न करता, मी प्रमुख पाहुण्याचा धर्म निभावणार आहे आणि तुमच्यासमोर भाषण देणार आहे.

मित्रहो, पदवीदान समारंभाचे भाषण देण्यासाठी मला पुन्हा संस्थेत बोलावल्याबद्दल धन्यवाद. मी याच संस्थेतून तीस वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो. संस्थेने आम्हाला किती चांगल्या प्रकारे तयार केले आहे, याची तेव्हा जाणीव झालेली नसल्याने भविष्यात माझ्यासोर काय वाढून ठेवले आहे याविषयी माझ्या मनात अस्वस्थता होती. आमचे सर्व प्राध्यापक अतिशय निष्ठावान आणि व्यावसायिक दृष्टीने काम करणारे होते. आता मी इथे कोणत्याही एका प्राध्यापकाचे नाव घेणार नाही, कारण ते इतरांवर अन्याय करणारे ठरेल. पण त्यांनी आमच्याकडून खूप काम करून घेतले हे मात्र खरे. त्यांना हे माहित होते की, विद्यार्थ्यांना पुश करत राहिले तर त्यांची जी काही क्षमता आहे, तितके ते नक्कीच शिकू शकतात. आमच्या काळात कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट हे इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग डिपार्टमेंटचाच एक भाग होते. मला आजपर्यंत माहित असलेल्या लोकांपैकी काही अतिशय स्मार्ट लोकांना भेटण्याचे भाग्य मला तिथे लाभले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी म्हणून काम करताना आणि मार्क्स मिळवण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करताना खूप मेहनत, मैत्री आणि काही प्रमाणातले ‘भाग्य’ मला मिळाले.
अतिशय आव्हानात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी या तीन घटकांची गरज असते हे मला समजले. आयआयटी दिल्लीतील वातावरण तेव्हा (आणि मला वाटते आतासुद्धा) कधीच अभ्यासापुरते मर्यादित नव्हते. मुलांची खऱ्या अर्थाने वाढ तिथे होत राहते. आम्ही आयआयटीमध्ये आलो तेव्हा काही अपवाद वगळता सर्वजण अभ्यासू विद्यार्थी होतो. शाळेतील खेळांमध्ये आम्हाला फारशी संधी कधीच मिळत नसे आणि मिळाली तरी आमच्यासारख्या मुलांना लाँगऑनला उभे राहून, शाळेतील क्रिकेट स्टारने कधी सिक्स मारली तर तो बॉल आणणे हे काम मिळायचे. परंतु आयआयटीमध्ये आलेले सर्वच जण अभ्यासू असल्याने कोणीच खेळात एक्स्पर्ट नव्हते. त्यामुळे आम्हाला आयआयटीमध्ये आल्यावर नेट्समध्ये बॅटींग आणि बॉलिंग करायची संधी मिळाली. आयआयटीमधील प्रत्येकजण अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी करीत असायचा. फोटोग्राफी ते लेखन-प्रकाशन अशी ती रेंज असायची. अर्थात आम्हाला सर्वांना नाट्य विभागात रस असायचा, कारण तिथे मुला-मुलींना खूपच वेळ एकत्र घालवता यायचा! दुर्दैवाने मला अभिनयात फारशी गती नव्हती. त्यामुळे स्वतःचा (आणि स्वत:साठीचा) शोध घेण्यासाठी इतर पर्यायांकडे वळावे लागले. परंतु आयआयटीची गंमत अशी की, मला सहभागी होता येईल असे इतर अनेक पर्याय तिथे उपलब्ध होते.
आयआयटीमध्ये इतर सर्व उपक्रमांच्या बरोबरीने विद्यार्थी निवडणुकासुद्धा चालवायचे. मुले-मुली त्यात अतिशय उत्साहाने सहभागी व्हायची. त्या राजकारणात पुरेसे डावपेच खेळणे, रणनीती आखणे आणि एकमेकांचा विश्वासघात करणे वगैरे सर्व प्रकार व्हायचे. परंतु आयआयटीमधील विद्यार्थी राजकारणाला वैचारिकतेची जोड होती. म्हणजे देशातील इतर ठिकाणच्या विद्यार्थी राजकारणात जशी हिंसा होते, भ्रष्टाचार केला जातो तसे आयआयटीमधील राजकारण नव्हते. इथे असलेल्या छोट्या मतदारसंघात स्मार्ट मुलांमध्ये राहून त्यांनी आम्हाला मते का द्यावीत हे त्यांना पटवून द्यावे लागायचे. तसे करण्याने आपले म्हणणे समोरच्याला कसे पटवून द्यावे याची कलासुद्धा आम्ही शिकलो. ती वर्गात शिकलो. वर्गाच्या बाहेर स्क्वाश कोर्टवरही शिकलो. तरुणाईमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून कार्यक्रम घेणाऱ्या ‘स्पिक मेके’ या संस्थेने आयोजित केलेल्या व रात्रभर चालणाऱ्या कार्यक्रमांत शिकलो आणि गर्दीने ओथंबून वाहणाऱ्या रॉक संगीताच्या कोन्सर्टमध्येही शिकलो. आमच्यापैकी काहीजण कैलाश होस्टेलच्या बाहेर तासन्तास वेटींगमध्ये उभे राहत असत. जेव्हा काही वेळा आम्हाला आत जायची संधी मिळत असे, तेव्हा शरद ऋतूतील सुंदर रात्री आकाशातील चांदणे निरखत, मित्रांसोबत गप्पा मारत आम्ही वेळ घालवत असू.
आयआयटीमध्ये आल्यावर आमच्यातील भाबडेपणा गेला आणि त्याची जागा आत्मविश्वासाने भरलेल्या समजूतदारपणाने घेतली. आयआयटीमध्ये आलो तेव्हा आम्ही स्मार्ट मुले-मुली होतो. आणि बाहेर पडलो तेव्हा आमचे रूपांतर शहाण्या तरुण स्त्री-पुरुषांमध्ये झाले होते. मला याची खात्री आहे की, संस्थेत आमची जशी वाढ झाली तशीच तुमचीसुद्धा झाली असणार. येत्या काही वर्षांत तुम्ही संस्थेला त्याबद्दल धन्यवाद द्याल. आज इथे पदवीदान समारंभात बोलताना मला याची जाणीव आहे की, अशावेळी केलेले भाषण विसरले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भाषण करायला येणाऱ्या व्यक्तीसमोर एक प्रकारचा नैतिक पेच उभा राहतो. म्हणजे वक्ता काय बोलणार आहे हे श्रोत्यांच्या लक्षात राहणार नसेल तर वक्त्याने आपल्या शब्द निवडीसाठी फार मेहनत घ्यावी यासाठी काही प्रोत्साहन राहत नाही. त्यामुळे अर्थतज्ज्ञ ज्याला खराब इक्विलिब्रिअम म्हणतात तशी अवस्था तयार होते. म्हणजे असे की, माझे हे भाषण लक्षात राहण्यासारखे होणार नसेल तर तुम्हीसुद्धा ते लक्षात ठेवण्याची तसदी घेणार नाही. आताही तसे होणार असेल तर आपण आपली इतर महत्त्वाची कामे करायला जाणे योग्य ठरेल. पण मी तसे करणार नाही.
भाषण लक्षात राहील की नाही याची फार पर्वा न करता, मी प्रमुख पाहुण्याचा धर्म निभावणार आहे आणि तुमच्यासमोर भाषण देणार आहे. भारताच्या आर्थिक विकासासाठी वाद-संवादाची आणि प्रश्न विचारण्याची परंपरा का महत्त्वाची आहे, या विषयावर आज मी बोलणार आहे. रॉबर्ट सोलो यांना अर्थशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा सिद्धांत असा आहे की, आर्थिक वाढ व्हायची असेल तर केवळ उत्पादनासाठी आवश्यक घटक (श्रम आणि भांडवल) जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याने ती होत नसून, उत्पादनासाठी आवश्यक असलेले घटक अधिक कौशल्याने-चातुर्याने वापरल्याने अधिक आर्थिक वाढ साध्य होते. वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे नव्या कल्पना, उत्पादनाची नवी साधने, चांगल्या प्रकारची वाहतूक आणि जलद पुरवठा व्यवस्था इत्यादी घटकांमुळे अधिक प्रमाणातील आर्थिक वाढ साध्य होऊ शकते. अर्थात भारतासारख्या गरीब देशात अधिक लोकांना रोजगार देणे, कमी उत्पादकता असलेल्या शेतीमधून जास्त उत्पादकता असलेल्या उद्योगांकडे लोकांना वळवणे आणि कामासाठी आधुनिक साधने त्यांच्या हातात देणे अशा मार्गांनी काही काळ आर्थिक वाढ होऊ शकते. तुमच्यापैकी ज्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेतला असेल त्यांना हे माहीत असेल की, सर्वोच्च उत्पादकता साध्य करण्यापासून भारत खूप दूर आहे. इतका दूर आहे की, औद्यगिक दृष्ट्या प्रगत देशांचे अनुकरण करीत, तेथील तंत्रे आत्मसात करीतसुद्धा बराच काळ भारताची आर्थिक वाढ होऊ शकते. परंतु जास्त कौशल्यपूर्ण पद्धतीने काम केले तर उत्पादनाची जुनी तंत्रे मागे टाकून सर्वोच्च उत्पादकता वेगाने साध्य करण्यासाठी फार वेळ लागणार नाही.
आपल्या देशाच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात काही प्रमाणात हे साध्य झालेले आहे. म्हणजे जगातील सर्वोत्तम तंत्रे वापरून जेव्हा तुम्ही सर्वोच्च अशी उत्पादकता साध्य करता, तेव्हा त्यापुढील आर्थिक वाढीसाठी नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणणे आणि इतरांपेक्षा अधिक चांगले असणे हेच मार्ग समोर राहतात. आपल्या देशातील सॉफ्टवेअर कंपन्या हेच करायचा प्रयत्न करीत आहेत. याच संस्थेतून बाहेर पडलेले अनेक जण, (ज्यांच्याबरोबर तुम्ही भविष्यात काम कराल) विविध तंत्रवैज्ञानिक क्षेत्रांत देशाचे नेतृत्व करीत आहेत. इथे आपण ई-कॉमर्स क्षेत्राचे उदाहरण घेऊ. या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मार्केट्स तयार करणे, वाहतुकीची आणि पुरवठ्याची नवी यंत्रणा उभी करणे, आर्थिक व्यवहारांसाठी नवनवे पर्याय शोधणे अशा घडामोडी चालू आहेत. आज खेड्यातील ग्राहकालासुद्धा कपड्यांच्या शॉपिंगसाठी शहरातील ग्राहकांना असतात तेच पर्याय इंटरनेटमुळे उपलब्ध झाले आहेत. इंटरनेटमुळे देशातील सर्व दुकाने खेड्यातील व्यक्तीच्या आवाक्यात आली आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, आता खेड्यातील दुकाने कमी दर्जाच्या वस्तू विकू शकत नाहीत. ते आता नाशवंत माल आणि रोज जगायला आवश्यक अशा वस्तू विकण्यावर लक्ष देत आहेत. तसे करताना ग्राहकाला वस्तू वेळेत मिळावी यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत वेगवेगळी छोटी उपकंत्राटे काढून काम करीत आहेत.
नवनव्या कल्पनांद्वारे आणि उत्पादनाच्या पद्धतींद्वारे देशासाठी आर्थिक विकास घडवण्याचे काम आपले प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे इथे असा प्रश्न उद्भवू शकतो की, नवनव्या कल्पना येत राहाव्यात यासाठी देशाने आणि विशेषतः शैक्षणिक संस्थांनी काय करायला हवे? सर्वात पहिली गोष्ट अशी की, कल्पनेच्या विश्वात स्पर्धात्मकता असली पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा की, परंपरा आणि सत्तेचे अधिकार यांना कायम आव्हान मिळत राहायला हवे. तसे आव्हान दिले जावे यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. असे करताना कोणतेही मत अमान्य करण्यासाठी प्रत्यक्ष पुराव्यांचा आधार घ्यायला हवा, हे तत्त्वही आपण मान्य करायला हवे. असे केल्याने कोणतेही एक मत किंवा एक विचारधारा केवळ हातात सत्ता आहे म्हणून इतरांवर लादली जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी आणि सर्व कल्पनांची काळजीपूर्वक तपासणी करायला हवी. मग भले त्या कल्पना देशातून आलेल्या असोत किंवा देशाबाहेरून आलेल्या असोत, त्या कल्पनांचे आयुष्य शेकडो वर्षांचे असो किंवा केवळ काही मिनिटांचे असो, त्या कल्पना एखाद्या नवख्या विद्यार्थ्याकडून आलेल्या असोत किंवा एखाद्या जगप्रसिद्ध प्राध्यापकाकडून आलेल्या असोत. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमनचे फिजिक्सवरील लेक्चर्सचे पुस्तक तुम्ही पाहिले असेल. आमच्या काळात ते आयआयटीमध्ये प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक होते. विसाव्या शतकातील विख्यात विचारवंतांमध्ये फाईनमन यांची गणना केली जाते.
त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, प्रिन्स्टन विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हॉन्स्ड स्टडीज’मधील वातावरण त्यांना नीरस वाटले. आता तुम्हाला हे माहीतच असेल की, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जगातील सर्वोत्तम अभ्यासकांना आंतरविद्याशाखीय वातावरणात एकत्र आणून विविध समस्यांवर काम केले जाते. परंतु फाईनमन यांना तेथील वातावरण आवडले नाही, कारण तिथे त्यांच्यासमोर असे कोणी विद्यार्थी नव्हते जे त्यांना प्रश्न विचारतील, ज्यामुळे फाईनमन यांना आपल्या विचारांवर पुनर्विचार करता येईल आणि कदाचित नव्या सिद्धांतांचा शोध लागू शकेल. अनेकदा मूर्खपणाच्या वाटणाऱ्या प्रश्नांतून ही नव्या कल्पना उदयाला येऊ शकतात. आईनस्टाईनला आपला सापेक्षतावादाचा सिद्धांतसुद्धा अशाच एका मूर्खपणाच्या वाटणाऱ्या प्रश्नामधून शोधता आला. त्याच्या मनात विचार आला की, एखादी व्यक्ती जर प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करीत असेल तर तिला कसा अनुभव येईल? यातूनच पुढे विज्ञानात क्रांती घडवून आणणारा सापेक्षतावाद जन्माला आला. त्यामुळेच कोणत्याही कल्पनेकडे दुर्लक्ष करू नये, तर उलट सातत्याने तपासणी आणि चर्चा यांचा आधार घेऊन त्या कल्पनेची चिकित्सा केली जावी. कोणालाही पुरावे न देता सिद्धांत मांडू देता कामा नयेत. जर कल्पनेच्या क्षेत्रात अशी स्पर्धात्मकता राहिली नाही तर एका प्रकारचे वैचारिक साचलेपण येते.
यातूनच प्रश्न विचारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आवश्यक असा दुसरा घटक ‘संरक्षण’ हा समोर येतो. हे संरक्षण कोणत्याही एका कल्पनेसाठी किंवा परंपरेसाठी नसून प्रश्न विचारणे, आव्हान देणे यासाठीचे अपेक्षित आहे. इतरांना इजा होणार नाही ही मर्यादा बाळगून वेगळे वागण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवी. तसे वागणाऱ्यांनासुद्धा संरक्षण द्यायला हवे. अशा प्रकारचे संरक्षण दिले गेले तर ते समाजाच्या हिताचेच असते. कारण नावीन्यपूर्ण कल्पना मांडून बंडखोरी करणाऱ्यांमुळेच समाज पुढे जातो. रॉबर्ट सोलोने मांडलेली सर्वोच्च उत्पादकता साध्य करण्यासाठी आवश्यक कल्पना यातूनच येतात. सुदैवाने भारताने नेहमीच वादविवाद करण्याची आणि प्रत्येकाला वेगळे मत असण्याची परंपरा जपली आहे. काही जणांनी तर कायमस्वरूपी टिकून राहील अशी बांधकामे करून याचे जतन केले आहे. तामिळनाडू राज्यातील तंजावर येथील प्रसिद्ध बृहडेशेर मंदिर बांधले तेव्हा चोळ वंशातील राजराजा या सम्राटाने ते शैव पंथाचे मंदिर असूनसुद्धा विष्णू आणि ध्यानस्थ बुद्ध यांची शिल्पे त्या मंदिरात कोरली. या तिन्ही विचारधारांमध्ये मध्ययुगीन भारतात बराच वैचारिक संघर्ष होता किंवा दिल्लीत मुघल शहेनशहा अकबराने जेव्हा सर्व धर्मातील आणि पंथातील अभ्यासकांना आपल्या दरबारात बोलावून ‘अंतिम सत्य काय आहे’ यावर चर्चा घडवून आणली, तेव्हा प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देण्याची आणि त्यातून होणाऱ्या चर्चेला संरक्षण देण्याची हिंदू आणि बौद्ध राजांची परंपराच अकबर पुढे चालवत होता.
मग अशा वेळी समाजाच्या भावनांचे काय, असा प्रश्न इथे पडू शकतो. म्हणजे एखाद्या वैचारिक भूमिकेला आव्हान देणारे किंवा एखाद्या गटाच्या भावना दुखावणारे वर्तन आणि विचार यांच्यावर बंदी घालावी का? तसे कदाचित केले जाऊ शकते, परंतु अशा बंदी घालण्याने सर्व प्रकारची चर्चा कुंठित होऊ शकते. प्रत्येकाला आवडणार नाही असे विचार मांडणारे सभोवताली कोणी ना कोणी नेहमी असतातच. त्यामुळे न आवडणारे विचार सहन करणे आणि परस्परांविषयी आदर बाळगणे या मार्गांनी, विचारविश्वासाठी आवश्यक वातावरण सुधारत जाणे हा मार्ग जास्त योग्य आहे. ज्या वर्तनाने किंवा विचारांनी इतर गटांची खुलेपणाने स्पर्धा करण्याची क्षमता धोक्यात येते, कोणालातरी शारीरिक इजा होऊ शकते किंवा ज्यातून शाब्दिक अपमान होऊ शकतो ते वर्तन वा विचार याला मात्र परवानगी नसावी. उदाहरणार्थ, शारीरिक किंवा शाब्दिक अशा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाला समाजात स्थान असू नये. परंतु दुसऱ्या बाजूने पहिले तर विविध गटांनी आजूबाजूला छोट्या छोट्या गोष्टींत आणि प्रत्येकच वेळी अपमानस्पद काही आहे का, असे शोधायला जाऊ नये. कारण मानसशास्त्रानुसार, जर तुम्ही अशा प्रकारे अपमानास्पद गोष्टीच शोधायला लागलात तर तुम्हाला अनेक गोष्टी आजूबाजूला अगदी साध्या साध्या ठिकणीसुद्धा सापडू शकतील. म्हणून जर तुमच्या वर्तनाने किंवा कृत्याने मी दुखावलो जाणार असेन, पण इतर काही इजा होणार नसेल तर तुमच्या कृतीवर बंधने घालण्याची मर्यादापातळी फारच वरची असली पाहिजे. म्हणजे अगदी क्षुल्लक कारणासाठी बंधने घातली जाऊ नयेत. कारण अशी बंधने घालण्यामुळे जितका मी दुखावलो जाईन तितकेच तुम्हीसुद्धा दुखावले जाणार आहात. याचाच अर्थ अतिरिक्त प्रमाणात 'पोलिटिकली करेक्ट' असणे आणि अतिरिक्त प्रमाणात अनादर करण्याचे स्वातंत्र्य देणे, या दोन्हींमुळे समाजाची प्रगती खुंटते.
वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर माझ्या विचार करण्याच्या हक्कावर बंधने आणून, मी दुखावलो जाईल असे वागणे, तुम्ही शक्य आहे तोपर्यंत टाळायला हवे. जर तुम्ही तसे केलेच तर तसे करणे का आवश्यक आहे याची कारणे द्यायला हवीत. असे केल्याने आपली चर्चा पुढे जाईल आणि मग तो माझ्यावरील वैयक्तिक रीतीने केलेला हल्ला मानला जाणार नाही. माझ्या कल्पनांना आव्हान देणेसुद्धा प्रगतीच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे याचा विश्वास मला देऊन, तुम्ही सन्मानजनक पद्धतीने माझ्याशी वागायला हवे. दुसऱ्या बाजूला मीसुद्धा असे प्रयत्न करायला हवेत की, अगदी कमीतकमी विचार माझ्याशी वैयक्तिक रीतीने जोडले जातील. त्यामुळे होईल काय तर, त्या कल्पनांवरील हल्ला हा मला सहन न होणारा असा माझ्यावरील वैयक्तिक हल्ला वाटणार नाही. सहनशील असणे याचा अर्थ असा नव्हे की, माझ्या विचारांना कधी आव्हानच दिले जाऊ नये. सहनशील असणे म्हणजे समजूतदारपणे चर्चा होण्यासाठी आवश्यक असलेली अलिप्ततासुद्धा आपल्या अंगी असायला हवी. याच रांगेतला शेवटचा एक मुद्दा म्हणजे, इतरांविषयी आदर बाळगणे याचा अर्थ एखादी कल्पना एखाद्या गटाशी फारच जास्त प्रमाणात जोडलेली असते, तेव्हा त्या कल्पनेला आव्हान देताना आपण ते काम जास्त काळजीपूर्वक करायला हवे. सहनशील असण्याने चर्चेतून दुखावले जाण्याची शक्यता कमी कमी होत जाते. उलट त्याच्या जागी एक प्रकारचा आदरभाव येतो.
जर प्रत्येकवेळी एखादा विचार मांडल्याने मी दुखावलो जाणार असेन, तर बंडखोर लोकांना कायम तो विचार मांडायचा मोह होत राहील. ज्यांना समाजात अस्वस्थता निर्माण करायची आहे असे खोडसाळ लोक तर नक्कीच त्या विचाराचा प्रसार करतील. पण जर प्रत्येक वेळी मी दुखावलो गेलो नाही आणि बंडखोरांना हवे तसे न वागता उलट त्यांना त्यांच्या वर्तनामागचे कारण विचारले, तर आपल्या मतांचे समर्थन करण्यासाठी विचार करण्याचे कष्ट त्यांना घ्यावे लागतात. असे केल्याने बंडखोर लोकांची अडचण होते. म्हणजे मनात आले आणि ‘तो’ दुखावणारा विचार मांडला असे त्यांना करता येत नाही. तसेच प्रत्येक गटात असणाऱ्या खोडसाळ व्यक्तींच्या हातात वापरायला सोपे असे शस्त्र मिळत नाही. अशा रीतीने सहनशीलता आणि आदर यांच्यामुळे एक चांगला इक्विलिब्रीअम तयार होतो आणि या दोन्ही मूल्यांचा त्यातून प्रसार होतो. अमेरिकेतील एक उदाहरण देऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. अमेरिकेतील बंडखोर तरुण अमेरिकी राष्ट्रध्वज जाळत असत. अमेरिकेच्या युद्धांमध्ये लढलेल्या जुन्या पिढीसाठी ध्वज हे सर्वस्व होते. त्या जुन्या पिढीला राग यावा यासाठी बंडखोर तरुण पिढी ध्वज जाळत असे. अमेरिकी पोलिसांपैकी अनेकजण सैन्यात सेवा करून आले होते. त्यामुळे ध्वज जाळण्याच्या कृतीवर ते अधिकच हिंसक प्रतिक्रिया देत असत. बंडखोर तरुणांना आपले म्हणणे पुढे नेण्यासाठी नेमके हेच हवे होते. पण जसजसा काळ लोटत गेला, तसतसा अमेरिकी समाज ध्वज जाळण्याच्या कृतीविषयी अधिकाधिक सहनशील होत गेला. ध्वज जाळण्यामुळे काहीच फायदा होत नाही हे लक्षात येताच, समाजाला धक्का देण्यासाठी त्याचा वापर करण्याचे प्रमाणसुद्धा थांबले.
सारांश काय तर, समाज अधिकाधिक सहनशील होत गेला आणि कमीतकमी वेळा दुखावला जाईल इतकी समज आली, तर समाजाला दुखावणाऱ्या कृत्यांचे प्रमाणसुद्धा कमी होत जाते. महात्मा गांधींचे एक वचन सांगून हा मुद्दा आणखी स्पष्ट करता येईल: ‘परस्परांविषयी सहनशील राहून जगणे हा जगण्यासाठीचा एक गोल्डन रूल आहे. दोन व्यक्ती कधीच एकमेकांसारखा विचार करू शकणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्याकडे येणाऱ्या तुकड्या तुकड्यांमध्ये असलेले सत्य शोधायला हवे. तसेच हे शोधताना विविध व्ह्यू पॉर्इंट्स समजून घ्यायला हवेत.’ इथे मी माझे भाषण संपवतो. तुमच्यासारखे आयआयटीयन्स नवनव्या कल्पना मांडतील आणि भारताचे नेतृत्व करतील. तुम्ही जगत असलेल्या भारतात तुमच्या तांत्रिक क्षमतांचा पुरेसा वापर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. आम्ही जेव्हा इथून बाहेर पडलो त्या भारतात आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात अशी संधी उपलब्ध नव्हती. तुम्हाला अफाट महत्त्वाकांक्षा असतील, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. तुमच्यापैकी जे कोणी विचार करणे आणि जुन्याला आव्हान देणे चालू ठेवतील ते आयुष्यात यशस्वी होतील असे भविष्यसुद्धा वर्तवतो. पण बाहेरच्या जगात तुम्ही जातानासुद्धा आपल्या देशातील सहनशील आणि परस्परांविषयी आदर ठेवून चर्चा करण्याची परंपरा लक्षात ठेवा. त्या परंपरेला लक्षात ठेवून, तिच्यासाठी (वेळ आली तर) झगडा करून तुम्ही तुमच्या या महान संस्थेतील प्राध्यापकांचे आणि तुमच्या पालकांचे (ज्यांनी तुम्हाला इथे पाठवण्यासाठी इतके कष्ट घेतले) ऋण फेडू शकत असाल. अशा वागणुकीतूनच तुम्ही तुमच्या देशाचीसुद्धा सेवा करीत असाल. धन्यवाद आणि तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
(अनुवाद : संकल्प गुर्जर)
(मागील पाच वर्षांत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी असा ठसा उमटवला की, सी.डी.देशमुख यांच्यानंतरचा तडफदार गव्हर्नर अशी त्यांची ओळख ओपिनियन मेकर वर्गात रूढ झाली. गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपताना त्यांच्यासंदर्भात जे वाद-संवाद झाले, त्याकडे ते कसे पाहत असावेत याची झलक, 2015 च्या या भाषणातही पहायला मिळेल.)
Tags: रघुराम राजन भारतीय रिझर्व्ह बँक पदवीदान भाषण गव्हर्नर आयआयटी opinion maker convocation speech reserve bank governor governor IIT raghuram rajan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या