डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जगभर स्वतंत्र स्कॉटलंड निर्मितीच्या प्रक्रियेला प्रारंभ

इंग्लंडच्या विभाजनाच्या प्रक्रियेला प्रारंभ आता झाला आहे व मनात असो-नसो, ही प्रक्रिया रोखण्याचे सामर्थ्य इंग्लंडमध्ये नाही, कारण सामान्य स्कॉटिश माणसाला स्वातंत्र्य हवे आहे. सामान्य माणसांच्या संघटित शक्तीने दोन जर्मनींमधील 'बर्लिन वॉल' तुटू शकते, तर त्याच शक्तीमुळे इंग्लंडचे विभाजनही होऊ शकते. हेच या घटनांमधील खरे मर्म आहे!

इंग्लंडपासून फुटून स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळविण्याकडे स्कॉटलंडचा प्रवास चालू झाला आहे. इंग्लंडशी असलेले तणावपूर्व संबंध तोडण्यासाठी स्कॉटिश लोक अत्यंत उत्सुक आहेत. 1 मार्च 1979 रोजी स्कॉटलंडच्या स्वतंत्र अस्तित्वासंबंधी सार्वमत घेण्यात आले होते. तथापि, त्या सार्वमताला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी किमान आवश्यक एवढे मतदान झाले नाही. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या सार्वमताच्या वेळी मात्र अशी परिस्थिती नव्हती. 11 सप्टेंबर 1997 रोजी हे सार्वमत घेण्यात आले. 

सार्वमत दोन मुद्यांवर घेण्यात आले. एक म्हणजे, स्वतंत्र स्कॉटिश संसद असावी की असू नये व दुसरा मुद्दा म्हणजे त्या संसदेला कर आकारणीचे अधिकार असावेत की असू नयेत हा. एकूण लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतीयांश जणांनी स्वतंत्र स्कॉटिश संसदेच्या पारड्यात आपले मत टाकले. त्याबरोबरच त्या संसदेला व्यापक प्रमाणावर कायदे करण्याचा अधिकार असावा व त्यात आरोग्य, शिक्षण, आर्थिक विकास, न्याय व्यवस्था, कृषी, मासेमारी, वन, क्रीडा, कला इत्यादींचा समावेश असावा, या बाजूने आपले मत नोंदविले. आता 1999 सालच्या पूर्वार्धात स्कॉटिश संसदेसाठी निवडणुका होतील व 2000 साली ही संसद अस्तित्वात येईल व पूर्णतः कार्यान्वित होईल. तोपर्यंत स्कॉटलंडला विशेष बदल करता येणार नाहीत, पण बहुधा पुढचे, शतक जगाच्या नकाशावर इंग्लंड व स्कॉटलंड अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे पाहील.

वस्तुतः स्कॉटिश लोक, हे ब्रिटिश साम्राज्याच्या भव्य संरचनेचे अविभाज्य भाग होते. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली व आपले नशीब कमावले. मग इंग्लंडपासून फुटून निघण्याची भावना त्यांच्यात का उत्पन्न झाली? मार्गरेट थॅचर यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच स्कॉटलंडकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष हे या घटनेस कारणीभूत ठरले? त्यामुळे स्कॉटिश अस्मिता दुखावली गेली? की युरोपियन युनियनच्या निर्मितीमुळे व त्यातून मिळू शकणाऱ्या भरपूर आर्थिक साहाय्याच्या अमिषाने ही स्कॉटिश अस्मिता उचंबळून आली ? की या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून स्कॉटलंडमध्ये गेल्या काही वर्षापासून इंग्लंडसंबंधी दुर्भावनेचे पोषण झाले?

आज स्कॉटलंडला आर्थिक सुबत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्याचा परिणाम एकूण आर्थिक विकास खुंटण्यात होत आहे व बेकारीचे प्रमाण मोठे आहे. 1970 व 80 च्या दशकांमध्ये हजारोंच्या संख्येत नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या त्या तेलाशी संबंधित उद्योगात. तथापि 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर तेलाचे भाव उतरले. पेट्रोलनिर्मिती घसरली. व याचा परिणाम अनेकांच्या नोकऱ्या जाण्यात झाला. इस्पात व नौकाबांधणी उद्योग, हे उद्योग स्कॉटलंडचे आर्थिक आधार आहेत, पण तेही उतरती कळा लागल्यासारखे झाले आहेत. 

तथापि स्कॉटिश नागरिकांनी आशावाद सोडलेला नाही. स्कॉटलंडमधील मासेमारीचे उत्पन्न हे सध्या एकूण इंग्लंडच्या उत्पन्नापैकी दोन तृतीयांशाहून अधिक आहे. कृषीक्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे प्रगती होत आहे. वनोद्योगही महत्त्वाचा आहे. विणकाम उद्योगही विकसित आहे. ग्लासगो, एडिनबरो या ठिकाणांहून हवाई वाहतूकही सातत्याने वाढली आहे. त्या वाढणाऱ्या उद्योगांबरोबरच युरोपियन युनियनबरोबरील संबंधामुळे, आणखीही काही उद्योग पुनरुज्जीवित होतील, असा आशावाद अनेकांना वाटतो आहे. या उद्योगांमुळे स्कॉटलंडमधील लोकांची समृद्धी वाढेल, व अन्य युरोपीय राष्ट्रांप्रमाणे हे 'राष्ट्र' ही उसळी मारेल, अशी खात्री या आशावादामागे आहे. स्कॉटलंडने या दृष्टीने आत्तापासूनच आपला आर्थिक मार्ग इंग्लेडपेक्षा ब्रसेल्सशी (युरोपियन युनियन) जुळेल, अशा योजना आखल्या आहेत. युरोपियन युनियननेही स्कॉटलंडच्या या भूमिकेला चांगला प्रतिसाद दिला आहे. 

स्कॉटिश अस्मितेचे प्रतिबिंब केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय, कला व सांस्कृतिक क्षेत्रांतही पडले आहे. आपल्या इतिहासाबद्दल व संस्कृती बद्दल अनेक जण रुचीने व अभिमानाने अभ्यास करीत आहेत. विविध युरोपीय भाषा शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. 'आमचे उज्वल भवितव्य युरोपशी संबंध ठेवल्यानेच अबाधित राहणार आहे, इंग्लंडशी आमची तशी विशेष समानता नाही' असे उच्च रवाने सांगितले जात आहे. 

स्कॉटलंडची भूमिका इंग्लंडपासून फुटून निघण्याची आहे, त्याबरोबरच इंग्लंडलाही स्कॉटलंडशी संबंध ठेवण्याबद्दल कितपत उत्सुकता आहे, ही शंकाच आहे. एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ब्रिटनमधील एक प्राध्यापक टॉम टॉमलिन्सन यांचे विचार उद्घृत करण्यात आले आहेत. हे प्राध्यापक म्हणतात की स्कॉटलंड म्हणजे एक आर्थिक अडचणच आहे, त्यामुळे त्याशिवाय इंग्लंड पुढे जाऊ शकेल. 

गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वी विभाजित झालेले काही देश एकत्रही झाले व काही देश- जे एक होते, ते विभाजित झाले. जर्मनी एक झाला, तर रशिया विघटित झाला, जे विघटित झाले, त्यांच्यात सांस्कृतिक सुसूत्रता नव्हती. कोणीही त्यांना विघटनापासून थांबवू शकले नाहीत. जर्मनीसारखी राष्ट्रे दोन तुकड्यांतून एकत्र होतात, कारण एकत्र होण्याची सामान्य माणसाची इच्छा जबर असते, व तिला मुरड घालण्याची हिंमत ना राजकीय शक्तीत असते, ना आर्थिक शक्तीत. जगाचा नकाशा नवनवीन रूप धारण करत असतो. हे व्हायला नेहमी युद्धच व्हावे लागते असे नाही. जगाच्या कॅनव्हासवर घडणाऱ्या घडामोडी असे बदल घडवून आणत असतात. 

ब्रिटन व स्कॉटलंड यांच्यांत सीमा नव्हत्या कारण 'युनायटेड किंगडम' म्हणून हे भाग एकत्रच होते. पण अखेर सांस्कृतिक व वांशिक अस्मितांना कोणीही रोखू शकत नाही, स्कॉटलंडच्या स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नांमागे हीच कारणे आहेत. युरोपियन युनियनशी संबंध ठेवल्याने स्कॉटलंडचा आर्थिक विकास होईल हे खरे. पण स्वतंत्र होणारे केवळ तेवढेच सांगत नाहीत. 'आमचे बौद्धिक व सांस्कृतिक संबंध इंग्लंडशी नव्हेत, तर स्कॅन्डिव्हेनियन देशांशी आहेत.' यावरही स्कॉटिश लोक भर देतात. 

स्वतंत्र स्कॉटलंडची निर्मिती आता अपरिहार्य आहे. 1947 साली भारतातून काढता पाय घेताना ब्रिटिशांनी भारताची फाळणी केली. पुढे, संस्थाने भारतात विलीन न होता स्वतंत्र राहून भारताला कायमची डोकेदुखी व्हावी म्हणूनही प्रयत्न केले. अर्थात, ही संस्थाने विलीन झाली व ब्रिटिशांचा डाव फसला. पण देशाचे दोन तुकडे झाले, व राहिले. आता पन्नास वर्षांनी इंग्लंडच्या विभाजनाच्या प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे, व मनात असो नसो, ही प्रक्रिया रोखण्याचे सामर्थ्य इंग्लंडमध्ये नाही. कारण सामान्य स्कॉटिश माणसाला स्वातंत्र्य हवे आहे. सामान्य माणसांच्या संघटित शक्तीने दोन जर्मनींमधील 'बर्लिन वॉल' तुटू शकते, तर त्याच शक्तीमुळे इंग्लंडचे विभाजनही होऊ शकते. हेच या घटनांमधील खरे मर्म आहे !

Tags: राहुल गोखले राजकारण आंतरराष्ट्रीय घटना स्कॉटलंडची निर्मिती इंग्लंड स्कॉटलंड independence of Scotland internatioan affair politics Rahul gokhle Scotish Scotland England weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके