डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘बाबा’ च्या सहवासातील ‘ते’ दिवस

8 जाने. 2005 रोजी डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान डॉ. अनिल अवचट यांना प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाच्या पैलूंवबर प्रकाश टाकणारा एका तरुणाचा लेख…

---

संपूर्ण जग एकतीस डिसेंबरच्या रात्री आनंद व जल्लोष करून बेधुंद होऊन जगत असतं. त्याच रात्री कचराकुंडीमध्ये अन्नाचे तुकडे धुंडाळणाऱ्या आणि रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांचं दुःख त्याला अस्वस्थ करत असतं. आपल्याच मस्तीत जगणारे आपण, या लोकांकडे कधी अजाणतेपणे तर कधी ठरवून दुर्लक्ष करतो. पण बाबाला मात्र त्याचं अंतर्मन अशा लोकांची दखल घ्यायला लावतं. 'मी मजेत जगतो' असं तो सांगत असला तरीही, त्याच्या मनात खोलवर कुठेतरी हे सर्व सलत असतं, असं माझं निरीक्षण आहे.

"हॅलो."
"डॉ. अनिल अवचट आहेत?'

"बोलतोय...."

“सर, मी राहुल मोरे. 'रानडे इन्स्टिटयूट मधील पत्रकारितेचा विद्यार्थी. एका प्रोजेक्टसाठी तुमची मुलाखत घ्यायची इच्छा आहे…”

"उद्या सकाळी साडेसात वाजता ये! त्याआधी आलास तरी चालेल!"

"थॅक्यू सर."

रोज कॉलेजसाठी लवकर उठतोच, त्यात रविवारीही उठावं लागणार म्हणून खरं तर मी वैतागलो होतो, परंतु बऱ्याच दिवसांचं माझे स्वप्न पूर्ण होणार होतं... म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी सात-पंचवीसलाच त्यांच्या दारात उभा होतो.

दारात उभा होतो खरा, पण पायाला जाम गोळे आले होते. छाती धडधडत होती. एवढ्या मोठ्या माणसाला मी पहिल्यांदाच भेटत होतो. क्षणभर वाटलं, "उगीच आलो आपण, परत माघारी जावं पळून!' पण थांबलो... हिंमत करून दाराची कडी वाजवली. आतून आवाज आला, "आलोच हं, दोन मिनिटांत! आत येऊन बस." आत जाऊन बसलो.

माझी नजर घरभर फिरत होती. त्यांनी त्यांच्या 'स्वतःविषयी' या पुस्तकात आणि साप्ताहिक 'सकाळ’च्या एका दिवाळी अंकात 'सुनंदाला आठवताना' या लेखात घराच्या वर्णन केलेल्या खुणा मी शोधत होतो... घरात बऱ्यापैकी पसारा पडलेला होता... 'ओरिगामी'चे कागद घरभर पसरलेले होते... काही अर्धवट आकार तयार होऊन पडलेले होते. वेगवेगळी काष्ठशिल्पं मांडलेली होती, अगदी घरभर. त्यांच्या या दोन्ही छंदांबद्दल मी वाचलेलं होतंच...

थोडा वेळ गेला. पांढरा पायजमा, पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती समोर आली. दाढीमिशी आणि डोक्यावरील केसही पूर्ण पांढरे, क्षणभर मी दचकलोच! मला त्यांची भीतीही वाटली; पण ती क्षणभरच! दुसऱ्याच क्षणी गोड स्मितहास्य करीत त्यांनी माझे स्वागत केलं. मी थोडा 'रिलॅक्स' झालो.

बोला, काय विचारायचंय?" 

मी थोडा धीटपणेच म्हणालो, "डॉक्टर, तुमच्याबद्दल मला वाचून बरीच माहिती आहे. मुलाखतीमध्ये जे काही लिहायचंय, ते मी लिहीन! पण मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात, त्यासाठी मी आलोय!"

"ठीक आहे, चालेल! बोल, काय म्हणतोयस?"

"डॉक्टर, मला सर्वांत जास्त आकर्षण आहे ते तुमच्या मळलेली वाट सोडून जगलेल्या आयुष्याचं! मला त्याबद्दल ऐकायला आवडेल..."

"अरे वेगळ्या वाटेने वगैरे काही नाही. फक्त मला जे आवडलं, करावंसं वाटलं, ते मी केलं"

"पण डॉक्टर, तुमच्या बाबतीत वाचताना जाणवलं आणि कधीकधी आम्हांलाही या गोष्टींचा त्रास होतो की, आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवलं, तर सर्वात प्रथम विरोध होतो. घरातूनच! आपल्या पाल्याने नेहमीच्या रस्त्याने जावे, अशी पालकांची इच्छा असते..."
"बरोबर आहे! आई-वडिलांचा मुलांवर खूप जीव असतो, त्यामुळे त्यांच्याकडून विरोध होणे स्वाभाविक आहे, ते आपल्यापासून दूर जाणेही शक्य आहे, परंतु तुमचा मार्ग योग्य असतो आणि त्यात यश मिळत जाते तेव्हा दूर गेलेली माणसंही हळूहळू जवळ येतात. म्हणून त्या गोष्टींचं टेन्शन न घेता, आपण आपलं काम करत राहावं. यश हमखास मिळतंच!"

"डॉक्टर, आमच्या वयाच्या तरुणांना एका गोष्टीचं आकर्षण असतं, ते म्हणजे तुम्ही आणि मॅडम समरसून जगलेल्या सहजीवनाचे! तुमच्या ‘स्वतःविषयी’ पुस्तकातील 'मुक्काम पोस्ट नानापेठ' आणि 'संगोपन’ हे लेख मी अनेकदा वाचलेत...

"आमच्या सहजीवनाचं बरंचसं श्रेय सुनंदाला जातं. तिच्यामुळेच मी काहीतरी वेगळं करू शकलो. तुम्हांला आयुष्यात जोडीदाराची खंबीर साथ असेल, तर इतर कुणाचीही गरज पडत नाही. सुनंदाने मला तशी साथ दिली. मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करू दिलं..."

प्रांजळपणा, कसलाही मोठेपणा स्वतःकडे न घेता डॉक्टर बोलत होते. त्यामुळे मनावर असलेलं दडपण हळूहळू कमी झालं. त्यानंतर त्यांनी स्वतःच चहा केला, आम्ही तो घेतला. माझ्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. छंदांविषयी सांगितलं.

डॉक्टरांच्या जडणघडणीच्या काळातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘युक्रांद’ परंतु काही काळानंतर ते चळवळीपासून दूर झाले. त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "सामाजिक कार्य करायचं, समाजासाठी काहीतरी करायचं, हे तर मनात पक्कं होतं. फक्त दिशा निश्चित होत नव्हती... माझी भटकंती चालूच होती. शेवटी या निर्णयाप्रत आलो की, 'युक्रांदमधून बाहेर पडावं आणि लिखाणातून सामाजिक प्रश्न मांडावेत.' म्हणजे मूळ हेतू न बदलता त्यासाठीचा मार्ग बदलला इतकंच....

डॉक्टरांकडे मी त्यांचंच एक पुस्तक स्वाक्षरीसाठी घेऊन गेलो होतो; त्यावर स्वाक्षरी करताना ते म्हणाले, "डॉ.अवचट लिहू, की बाबा? तुला काय आवडेल?" मी म्हणालो, "मला तुम्हाला 'बाबा' म्हणायलाच आवडेल!"

त्यांनी सुरू केलेल्या 'मुक्तांगण' या संस्थेबद्दलही बरंच ऐकून, वाचून होतो. निघताना मी तो विषय काढला. 'मुक्तांगण’ ला भेट द्यायला मला आवडेल म्हणून सांगितलं. त्यांनी लगेच तयारी दाखवली. म्हणाले, "मी दर बुधवारी जातो. येणाऱ्या दुधवारी सकाळी 9 वाजता ये, आपण जाऊ!" मी खूष झालो, कारण मला पुन्हा त्यांना भेटता येणार होतं आणि विशेष म्हणजे ते मला त्यांच्या गाडीतून घेऊन जाणार होते. मी त्यांना म्हणालो, "मी तुम्हांला मंगळवारी फोन करतो, म्हणजे बुधवारी जाण्याबद्दल पक्कं ठरलं. ते 'हो' म्हणाले आणि निघताना म्हणाले, "राहूल, 'अहो बाबा' ऐवजी 'अरे बाबा' हाक मारलेलीच मला आवडते. तूही मला ‘अरे बाबा’च म्हणत जा." मी नुसताच हसलो आणि निघालो...

मंगळवारी सकाळी कॉलेजला जात असतानाच त्यांना फोन केला. बुधवारी 'मुक्तांगण'ला जाण्याबद्दल विचारलं तर म्हणाले, "ठीक आहे. उद्या जाऊ आपण! पण तू मला 'अरे' म्हणून माझ्याशी एकेरीत बोलायला हवंस!" मला ते जमणं शक्य नव्हतं.

मी त्यांना तसं बोललोही! तेव्हा अगदी गमतीदारपणे म्हणाले, "बघ, हं मी म्हणतो तसं म्हण. जमेल मुला. म्हण... 'अरे बाबा, आपण जाऊ या ना उद्या, मुक्तांगणला?" मी म्हणालो, अहो बाबा, आपण जाऊया ना, उद्या मुक्तांगणला?" यावर ते म्हणाले, "अरे 'बाबा' म्हण! 'अहो बाबा' नाही!" 

त्या दिवशी त्यांनी फोनवरून 'अरे बाबा' अक्षरशः माझ्याकडून वदवून घेतलं. त्यानंतर कॉलेजवर कँटीनमध्ये बसलो असताना आमच्या ग्रुपमध्ये ‘बाबा’चा आणि 'मुक्तांगण'चा विषय काढला. तेव्हा एक मैत्रीण म्हणाली, 'मलाही आवडेल डॉक्टरांना भेटायला. मी पण येऊ का तुझ्याबरोबर?' आम्ही बाबाला फोन केला. त्यांनी लगेचच मंजुरी दिली. माझी मैत्रीण जाम खूष झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे बाबांबरोबर त्यांच्या गाडीतून 'मुक्तांगण’ला भेट देण्यासाठी निघालो. गाडीत बसल्याबरोबर, मी त्यांच्याशी 'अहो-जाहो' करून बोलायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी मला थांबवलं आणि ‘अरे’ म्हणून हाक मारायला सांगितलं. मी तसं करत नाही. असं लक्षात आल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं. शेवटी नाईलाज झाला आणि मग ‘अरे बाबा तू आमच्याशी बोल ना!' असं म्हटल्यावर 'ते' म्हणजे 'तो' आमच्याशी बोलला. मी त्याला सांगितलं, 'बाबा माझी मैत्रीण गाणं सुरेख गाते. त्यानंतर आमचा प्रवास खूपच छान झाला. तेव्हा मला हेही कळलं की, बाबा गातोही छान! त्या दोघांनीही सुंदर सुंदर गाणी म्हटली. मी फक्त ऐकण्याचे काम केलं. त्यानंतरच्या काळात बाबाच्या झालेल्या भेटीमधून मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे बाबा आपल्याबरोबर असताना आपल्याच वयाचा होऊन जातो. मी कोणीतरी फार वेगळा आहे, असं तो अजिबात जाणवू देत नाही.

बाबाशी माझी छान गट्टी जमली. त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी त्याची अशीच गट्टी जमते. तो त्यांच्यातलाच एक होऊन जातो आणि मग प्रत्येकालाच तो आपला वाटतो.

दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जाण्यापूर्वी, बाबाला भेटून जावं, असं वाटलं; म्हणून मी फोन करून विचारलं, तर 'लगेच ये’ म्हणाला. घरी गेल्यावर मी त्याला म्हणालो, "अरे मी आलोय खरा, पण तुझे रूटीन डिस्टर्ब तर केलं नाही ना?" बाबा छान हसला आणि म्हणाला, "जी गोष्ट समोर येईल, करावीशी वाटेल, ती मी करतो! त्यामुळे माझं रूटीन वगैरे काही नसतं..."

एकदा बाबा आणि मी विद्यापीठाच्या मैदानावर गप्पा मारत बसलो होतो. जागतिकीकरणाचा, आधुनिकीकरणाचा आणि त्याकडे आकर्षित होणाऱ्या तरुण पिढीचा विषय निघाला. एकीकडे उड्डाणपूल बांधणारे आपण दुसरीकडे झोपडपट्ट्यांची संख्याही वाढवत आहोत, या विचाराने तो अगदी व्यथित झाला होता. तेव्हा बाबा म्हणाला, "एखादा देश किती प्रगत आणि आधुनिक आहे. हे ठरविण्यासाठी त्या देशात किती 'उड्डाणपूल' आहेत, हे पाहण्यापेक्षा त्या देशातील नागरिकांना दोन वेळचं जेवण पोटभर मिळतंय का, हे पहायला हवं! आपल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत... तेव्हा केवळ पाश्चात्त्यांच्या मागे धावण्यापेक्षा गांधीजींनी दाखविलेल्या मार्गावरून जाणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. परंतु आजची पिढी गांधीजींविषयी अभ्यास करण्याऐवजी त्यांची 'टिंगलटवाळी' करण्यातच धन्यता मानते.... 

जीवनाचा आस्वाद घेण्याऐवजी, आजची तरुण पिढी भौतिक सुखाच्या मागे धावताना पाहून बाबा नाराज होतो. बाबाच्या स्वतःच्या गरजा खूप कमी आहेत. जेव्हा मी त्याला 'मला मोबाईल घ्यावासा वाटतो' असं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, "एक लक्षात ठेव राहुल, स्वतःच्या गरजा जेवढ्या कमी ठेवशील तेवढं सुखी आणि समाधानी आयुष्य तू जगू शकशील! बाजारात मिळते किंवा इतरांकडे आहे, म्हणून एखादी वस्तू घेण्याअगोदर स्वतःची गरज ओळखायला शीक!" त्यानंतर मी मोबाईल घेण्याचा विचार मनातून काढून टाकला. बाबाबद्दल मला आणखी एका गोष्टीबाबत आकर्षण आहे. 'वेळ मिळत नाही' म्हणून कुरकुरणारे असंख्य लोक आजूबाजूला असताना, तो मात्र त्याचे छंद मनापासून जोपासतो. ‘ओरिगामी’ आणि 'काष्ठशिल्प' हे त्याचे छंद मला जास्त आवडले. त्याने कागदाचे बनवून दिलेले 'मोर' आणि 'बदक' मी आमच्या हॉलमध्ये ठेवलेत. बाबाच्या घरात त्याची अनेक 'काष्टशिल्प' आहेत. त्यातील मला विशेष आवडतात ते 'एका स्कूटरवर आई बाबा व त्यांची दोन मुले' आणि दुसरं शिल्प आहे- 'ज्यात एका बाकड्यावर तीन माणसं विसावली आहेत.' बाबाला विचारलं, "तू हे सर्व कुठे शिकलास?' तर तो म्हणाला, 'मी कुठलीच गोष्ट ठरवून शिकलो नाही.'

बाबा बासरीही अप्रतिम वाजवतो. बऱ्याचदा त्याच्याजवळ बसून मी बासरी ऐकली आहे. एकदा सुट्टीत घरी गेल्यानंतर दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी बाबाला फोन केला. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तर तो म्हणाला, "तुला बासरी ऐकवू का?" मला क्षणभर काही सुचलंच नाही. त्यानंतर त्याने फोनवर बासरी ऐकवली... तब्बल दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या घरात पाच ते सात मिनिटं, मंत्रमुग्ध करणारी बाबाने वाजवलेली बासरी मी ऐकत होतो... ती दिवाळी माझ्यासाठी आयुष्यभर 'संस्मरणीय' राहील! 

एकदा 31 डिसेंबर नंतर दोन-तीन दिवसांनी बाबाच्या घरी गेलो. एका स्केचवर त्याचे काम चालू होतं. 'कसा आहेस?' असं विचारल्यावर म्हणाला, 'मजेत!' इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर नुकतीच त्याने लिहिलेली कविता ऐकवली... 'संपूर्ण जग एकतीस डिसेंबरच्या रात्री आनंद व जल्लोष करून बेधुंद होऊन जगत असतं. त्याच रात्री कचराकुंडीमध्ये अन्नाचे तुकडे धुंडाळणाऱ्या आणि रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांचं दुःख त्याला अस्वस्थ करत असतं. आपल्याच मस्तीत जगणारे आपण, या लोकांकडे कधी अजाणतेपणे तर कधी ठरवून दुर्लक्ष करतो; पण बाबाला मात्र त्याचे अंतर्मन अशा लोकांची दखल घ्यायला लावतं. 'मी मजेत जगतो’ असं तो सांगत असला तरीही, त्याच्या मनात खोलवर कुठेतरी हे सर्व सलत असतं, असं माझे निरीक्षण आहे.

माझं पुण्यातील शिक्षण संपलं. पुढे काय, हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. घरच्यांचं काहीच म्हणणं नव्हतं! माझ्या करियरबद्दल, माझ्या भावी आयुष्याबद्दल निर्णय मलाच घ्यायचा होता. त्यासाठी लागणारी मदत आणि भावनिक आधार ते नेहमीच देत होते, यापुढेही देणारच होते! पण शेवटचा निर्णय मलाच घ्यायचा होता.... त्यामुळे मी चांगलाच गोंधळलो होतो. पुण्यातच थांबावं, की गावी जाऊन काही करावं हा निर्णय पक्का होत नव्हता. गोंधळलेल्या अवस्थेतच मी बाबाकडे गेलो. त्याच्या सान्निध्यात गेल्यावर जगातील सर्व चिंता संपल्यासारखं वाटतं... मी त्याला माझी एकंदर मानसिक अवस्था सांगितली. 'नकी काय करावं’ याचा गोंधळ त्याच्यासमोर मांडला. माझे बोलून होईपर्यंत तो अगदी शांत होता. संपूर्ण बाजू ऐकून घेतल्यावर तो म्हणाला, "राहूल, असा गोंधळून जाऊ नकोस, माझे मत मी तुला सांगतोय! पण ते मत आंधळेपणानं स्वीकारण्यापेक्षा, तू 'तुला नक्की काय हवंय’ ते आधी ठरव! तुला आनंद मिळेल असं आयुष्य जग. ज्या कामातून आनंदच मिळणार नाही असं काम, जास्त पैसे मिळणार म्हणून करण्यात काय अर्थ आहे? आयुष्यात पैशाला जास्त महत्त्व देऊ नकोस! जगण्यासाठी पैसा आवश्यकच आहे; परंतु पैशासाठी आपण जगायला लागतो तेव्हा, आपल्या आयुष्यातील आनंद संपलेला असतो! निर्णय घेताना या गोष्टीचा प्राधान्याने विचार कर!"

आमच्या या बाबाला एक लाख रुपयांचा डॉ. लाभसेटवार सन्मान त्याच्या साहित्यातील योगदानासाठी मिळाला, हे कळल्यावर त्याच्याबद्दल थोडं सांगावंसं वाटलं म्हणून लिहिलं…

Tags: पुरस्कार व्यसनमुक्ती समाजसेवा अनिल अवचट Award Addiction Social Service Anil Awachat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके