डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काळा स्वातंत्र्यदिन (अंशत: संपादित)

आमचा आर्थिक स्तर सामान्य आहे. आणि भरीस भर म्हणून वरील तिन्ही वर्णांचा आम्हाला जातीय जाच सहन करावा लागतोय, तो वेगळाच. तेव्हा उद्या उठेल तो स्वतःला दलित म्हणेल नि आमच्या लढ्याची तीव्रता मारून टाकील. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दलित म्हणवून घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष दलित-उपेक्षित म्हणून जगणं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ब्राह्मणांच्या बाईचा कासोटा ब्राह्मणगावात सोडला जात नाही, तो सोडला जातो बौद्ध स्त्रीचा. आणि याला शिक्षा काय तर एक महिना शिक्षा किंवा पन्नास रुपड्या दंड! म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान केला तर- उठून उभा राहिला नाही तर- तीनशे रुपये दंड... आणि सोन्नागावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या-बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर पन्नास रुपये दंड... पण राष्ट्र हे लोकांचं बनतं. मग त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की राष्ट्राच्या प्रतीकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किमतीएवढी?

घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्र पण सुस्त मुंबईत काही घटना-घडामोडी घडताहेत! खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे! उदाहरणार्थ- धरणे, मोर्चे, घेराव वगैरे मार्गांनी विद्यार्थ्यांची चळवळ रस्त्यावर येऊन अंग धरत आहे! विद्यार्थ्यांचा उद्रेक रूप घेत आहे! स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी उत्सव काळा दिवस पाळण्याचे ठरत आहे! मुंबई ही महाराष्ट्राची नि भारताचे हृदय आणि मेंदू आहे! म्हणून महाराष्ट्रात बौद्धांवर आणि हरिजन- गिरिजनांवर झालेल्या अन्यायाचा पहिला पडसाद मुंबईरूपी हृदयात उमटला! तिचे ठोके चुकले, उलट- सुलट झाले. मुंबईचे ठोके चुकले म्हणजे सबंध मुंबई जागी झाली नाही! वृत्तपत्रांनी जाग आणण्याचे कार्य केले. आणि मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात : मुंबईरूपी हृदयात जे कप्पे-चोरकप्पे आहेत, त्यापैकी दलित साहित्यिक हा कप्पा प्रथम जागा झाला. दरम्यान, बॅ.कांबळे यांचेही पत्रक निघाले. त्यानंतर युवक आघाडी स्थापन झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासावर धरणे धरले. लगेच युक्रांद जागी झाली. मनुस्मृती जाळली आणि तो गट युवक आघाडीला मिळाला. त्यांच्याबरोबर बहुसंख्येने बावड्याला आला. तसंच समाजवादी युवक सभा, राष्ट्र सेवादल यांचे प्रतिनिधी सामील झाले. नंतर मग ज्यांना हृदय व मेंदू आहे ते कवी व विद्यार्थी कार्यकर्ते जागे होऊन आणि सर्व डाव्या  चळवळीतील तरुणांच्या उपसंघटना जाग्या होऊन विद्यार्थी संघर्ष समिती स्थापण्यात आली. मुंबई गर्जू लागली, बोलू लागली. आग ओकू लागली. कारण दरम्यान विधानसभेत गवळे-मोरे या बौद्ध तरुणांनी आग ओकली. मी म्हणेन सोलापूर गर्जत असेल तर मुंबई बरसत आहे, ओकत आहे!

2

दरम्यान, प्राध्यापक सदा कऱ्हाडे यांची ‘एका स्पृश्याची डायरी’ बाजारात आली. या कादंबरीत ब्राह्मण कसे अस्पृश्य ठरतात ते आर्थिक तत्त्वावर भर देऊन दाखवलं! म्हणजे धनवान ब्राह्मण गरीब ब्राह्मणांना अस्पृश्यांप्रमाणे वागणूक देतात! कादंबरी सामान्य, एकसुरी व भडक आहे; पण प्रतिपाद्य विषयातून हेच सिद्ध होते की, ब्राह्मण गटाचं आर्थिक तत्त्वावर दोन गटांत विभाजन झालंय. एक स्पृश्य : श्रीमंत ब्राह्मण. एक अस्पृश्य : गरीब ब्राह्मण. मी असं म्हणेन की, आजच्या मराठा समाजातही आर्थिक तत्त्वावर हे दोन म्हणजे स्पृश्य- अस्पृश्य गट आहेत! आणि तसेच वैश्य व शूद्र वर्गातही ते कमी-अधिक प्रमाणात अनुस्यूत आहेत! पण ब्राह्मणगाव किंवा बावडा प्रकरणी बौद्धांवर झालेल्या अन्यायात मुंबईतल्या त्याच लोकांची वस्ती असलेल्या, लेबर कॅम्पमधल्या दोन बौद्ध युवकांनीच प्रथम विधानसभेत आग का ओकली नि इतरांनी का नाही? याचे उत्तर ज्याचं जळतं त्यालाच कळतं. इतरांना याची आच लागतच नाही, म्हणून हे गप्प! नाही तर स्पृश्यांतल्या आर्थिक अस्पृश्यांनी याविरुद्ध आवाज उठवला असता- का उठवला नाही? कारण आर्थिक स्तरांनी हे जरी एका पातळीवर असले तरी, सामाजिक म्हणजेच जातीय पातळीवर हे उंच आहेत. प्रत्येक स्तरातल्या, वर्णातल्या आर्थिक अस्पृश्याला जातीय चौकट आडवी आली. म्हणून ती प्रथम मोडून टाकली पाहिजे. वरच्या स्तरातील अस्पृश्य आणि आम्ही एकाच पातळीवर असू, तर सामाजिक अर्थाने अस्पृश्य असणाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हे सुरुवातीला का बोंबलले नाहीत? यांना फक्त आर्थिक समता हवी आहे, सामाजिक नको- असाच याचा अर्थ नाही काय? म्हणजे परदुःख शीतल!

मराठीतले ललित साहित्यिक नि विचारवंत ‘सखाराम बार्इंडर’च्या बाजूने बोंबा मारतात, पत्रकं काढतात! बौद्धांवरील अन्यायाबाबत हे का गप्प बसतात? की, चाललंय हे यांना मंजूर आहे? वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या. कारण ती समाजाची गरज भागवते, असं म्हणणाऱ्या भागवतबार्इंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे- हा यांचा ‘पतितोद्धार’... तर अशी ही माणसं आपमतलबी. मुंबईत मिश्र वस्ती असून विचाराने जाती- जातीत विभागलेली. कारण माटुंगा लेबर कॅम्पमधले गवळे-मोरे फक्त बौद्धांवरील अत्याचाराने पेटतात. हे का पेटत नाहीत? हे आमचे भाईबंद नाहीत, देशबंधू नाहीत. आम्ही का परके आहोत का? मग का वेगळे राष्ट्र मागू नये? आणि मुंबईत मिश्र वस्ती तर तितक्या प्रमाणात कुठे आहे? भेंडीबाजार, माहिम, बांद्रे वगैरे मुस्लिम वस्त्या सोडल्यास गिरगाव, दादर, डोंबिवली, ठाणे, विलेपार्ले इथे बहुसंख्याक कोणाची वस्ती आहे? आणि नायगाव, वरळी, डिलाईल रोड, वडाळा, बॉम्बे सेंट्रलचा काही भाग येथे बहुसंख्याक कोण आहेत? याच मिश्र वस्त्या का? मुंबईत जातीयता आहे ती अशी. आणि गिरगावातल्या आंतरजातीय प्रेमावर मृत्यू हाच तोडगा ठरतो, उबाळे प्रकरणी सिद्ध होते. हा जातीय सलोखा का?

3

हे सर्व प्रश्न आजच्या तरुण मनाला पडले आहेत,पटले आहेत, म्हणून तर सर्व जाती-धर्मांचे तरुण संघर्ष समिती बांधतात नि ‘गवळे-मोरे यांना सोडा’ म्हणून मोर्चा काढतात. आकाश-पाताळ एक करतात. जातिनिर्मूलन युवक परिषदेला हजारोने जमतात. गवळे-मोरे यांचा सत्कार करतात. पंचविसावा स्वातंत्र्यदिन काळादिन पाळायचा घाट घालतात. खरं तर स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे झाली असे म्हटले जाते. पण या प्रजासत्ताक राज्यात आम्हाला- प्रजेला- सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य कुठंय? ब्रिटिश राजवटीत आमच्यावर जसे हल्ले होत होते, तसेच स्वराज्यातही- ब्रिटिश गेल्यानंतरही- होत आहेत. याचा अर्थ ब्रिटिश राजवट गेली तरी ब्रिटिश करायचे तेच अत्याचार लोकशाही यंत्रणा करत आहे. मग अजूनही ब्रिटिशांचे राज्य आहे, असे लोकांना का वाटू नये? पारतंत्र्यात आहोत, असे का वाटू नये? काल लोक ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करत, लढत. आज आम्ही स्वतःच्याच सरकारविरुद्ध लढतोय. याचा अर्थ ही लोकशाही नाही. लोकांकडून लोकांसाठी लोकांनीच केलेले राज्य असे याचे स्वरूप कुठे आहे? असे असते तर मग हा असंतोष असता का लोकांमध्ये? लोकांना हवा  असलेला संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागते, ही लोकशाही का? आणि हे बळी कोणी घेतले? ब्रिटिशांनी की स्वकीयांनी? एकूण परकीय राजसत्तेपेक्षा स्वकीय राजसत्ता अधिक घातक आहे! बरे, आम्ही निवडून दिलेले आमदार मत मागण्यासाठी आमच्या दारात येतात आणि आमच्या मागणीसाठी आम्ही विधानसभेच्या दारात तोंड वेंगाडत जावं, तर हे विधानसभेतून खाली उतरत नाहीत. भेटायला समोर येत नाहीत, पोलिसांना पुढे पाठवतात. तर हे कसले आमचे प्रतिनिधी? आणि हे काय आमचं दुःख थोडंच वेशीवर टांगणार आहेत? हे टांगणार नाहीत, हा अनुभव असल्यामुळेच गवळे-मोरे यांनी ही दुःखं-आग ओकून विधानसभेचे लक्ष खेचले ना? तरी त्यांना अटक. मग त्यांनी दुःख तरी कोणाला सांगायचं नि त्यांचा वाली तरी कोण?

बरं, या दोघांनी विधानसभेचा कसला हक्कभंग केला आणि विधानसभेला कसली बाधा आणली? अत्याचाराच्या प्रश्नावर लक्ष खेचून घेण्यासाठी विधानसभेच्या सज्जातील हवेत तोंडातलं रॉकेल ओतून त्याला काडी लावली, याने कोणाला इजा झाली? मग त्यांना का अटक? आणि विधानसभेचे नियम वेगळे का? ती काय आकाशातून पडली? ती लोकांनीच बनलेली आहे ना? लोकांचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी आहे ना? मग निवडून दिलेले आमदार हे काम करत नाहीत म्हणून जर लोकांनी ते हातात घेतलं, वेशीवर टांगलं तर तो गुन्हा ठरतो. वा रे राजवट! आणि या अटकेबद्दल सर्वांचे एकमत. म्हणूनच आमचं एकमत झालंय की, आम्ही निवडून दिलेला आमदार केव्हाही परत घेऊ शकतो. नाही तर पाच वर्षे हे लडदू असेच खुर्च्या तापवणार, पेंगणार, झोपणार. आणि म्हणूनच आमची मागणी रास्त आहे, ती म्हणजे शंकराव पाटील राजीनामा द्या. एका माननीय मंत्राच्या गावी असं घडतं, याचा अर्थ या मंत्रिपदाने हे गाव शेफारून गेलंय, बौद्धांवर बहिष्कार लादतंय- आणि यात शंकररावांचे बंधू शहाजीराव हे प्रमुख आरोपी! शंकरराव खरेखुरे जनतेचे प्रतिनिधी असतील, तर त्यांच्या गावात हा प्रकार घडला नसता. गावातला अल्पसंख्याक गट असंतुष्ट आहे आणि एका जरी माणसावर अन्याय होत असेल, तर त्या-त्या प्रदेशातल्या आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. शंकरराव तो का देत नाहीत? मग हे कसलं रामराज्य!

4

आता अल्पसंख्याक-अल्पसंख्याक म्हणून स्वतःला पददलित म्हणवून घेणारा एक वर्ग म्हणजे ब्राह्मण. प्राध्यापक सदा कऱ्हाडे यांनी स्वतःला आर्थिक अस्पृश्य म्हणवून घेतल्यानंतर, लगेच महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘पुण्याहून’ या सदरात श्री.ज. जोशींनी ब्राह्मण वर्ग अल्पसंख्य म्हणून कोंबला; तर यांचं आणि दलितांचं दुःख सारखे आहे का? हे अल्पसंख्य म्हणून आज राज्य- कारभारावर नसतील, पण कालपर्यंत कोण होते? आणि शासकीय यंत्रणेत ऑफिसर कोण आहेत? बँकांत 80 टक्के कोण आहेत? आमचं दुःख अधिक गहिरं आहे. ते निव्वळ राज्यकर्ते, आम्ही नाही याचा खेद मानत नाहीत; कारण आम्ही अल्पसंख्य ही वस्तुस्थिती. सहकारात ब्राह्मणांसारखे आमचे लागेबांधे नाहीत. शिक्षण संस्थांमध्ये नाहीत. आमचा आर्थिक स्तर सामान्य आहे. आणि भरीस भर म्हणून वरील तिन्ही वर्णांचा आम्हाला जातीय जाच सहन करावा लागतोय, तो वेगळाच. तेव्हा उद्या उठेल तो स्वतःला दलित म्हणेल नि आमच्या लढ्याची तीव्रता मारून टाकील. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दलित म्हणवून घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष दलित-उपेक्षित म्हणून जगणं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ब्राह्मणांच्या बाईचा कासोटा ब्राह्मणगावात सोडला जात नाही, तो सोडला जातो बौद्ध स्त्रीचा. आणि याला शिक्षा काय तर एक महिना शिक्षा किंवा पन्नास रुपड्या दंड! म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान केला तर- उठून उभा राहिला नाही तर- तीनशे रुपये दंड... आणि सोन्नागावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या- बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर पन्नास रुपये दंड... पण राष्ट्र हे लोकांचं बनतं. मग त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की राष्ट्राच्या प्रतीकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किमतीएवढी? या गुन्ह्याला म्हणूनच राष्ट्रध्वजाच्या अपमानाला होणाऱ्या दंडापेक्षा जबर शिक्षा हवी आहे. नपेक्षा लोकांत राष्ट्रप्रेम राहणार आहे काय?

लोक म्हणतात की, साखर कारखान्याची मस्ती चढलेला जमीनदार वर्ग या अत्याचाराच्या मुळाशी आहे. मला हे पटत नाही. या अत्याचारामागे सबंध स्पृश्य वर्ग आहे. चातुर्वर्ण्याला मानणारा प्रत्येक गधडा आहे. ब्राह्मणगावच्या बायकांची लुगडी फेडायला सांगणारा  धनगर काय साखर कारखानेवाला आहे? तर जमीनदाराबरोबरच वर्णव्यवस्थेच्या पाईकांचाही यात हात आहे. बरं, वर्णव्यवस्थेचा पाईक स्वतः तरी वर्णाश्रम धर्मानं नेमून दिलेली कार्ये करतो का? वृत्तपत्र वाचलं तर ब्राह्मणांची विहित कर्म सोडून व्यवसाय करणारे ब्राह्मण आहेत, तसंच क्षत्रियाचं लढण्याचं विहितकर्म सोडून, सैन्यात जायचं सोडून हा वर्ग वैश्य वृत्ती वाढवत आहे. साखर कारखान्यांच्या सौद्यात गुंतला आहे. वैश्याचंही यापेक्षा वेगळे नाही. स्वतःच चातुर्वण्याने नेमून दिलेली कामं टाळायची आणि दुसऱ्यांनी ती केली पाहिजेत, हा आग्रह धरायचा. मेलेली गुरं ओढा, नाही तर बहिष्कारहा काय प्रकार आहे? यांनी चातुर्वर्ण्याला संमत नसलेलं स्वातंत्र्य उपभोगायचं आणि आम्ही का नको? म्हणूनच बहिष्कार, अत्याचार हे आम्हाला गुलाम बनवू पाहणारे प्रकार आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणताहेत. आम्हाला या देशात स्वातंत्र्य नाही.

5

बरं, स्वतःला मराठे म्हणवणारे लोक तरी किती मुर्दाड! परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी (म्हणजेच महाराष्ट्र- पूर्वीचा) नि:क्षत्रिय केली असेल तर पृथ्वीवर हे क्षत्रिय आले कुठून?... तिसरं म्हणजे बिजज पुत्र आणि क्षेत्रज पुत्र, हे आर्यांचं लफडं. आपल्या क्षेत्रात जन्मला, आपल्या स्त्रीपोटी जन्मला म्हणून क्षेत्रज पुत्र. पण आपल्या बीजापासून न जन्मलेला अनौरस म्हणजे क्षेत्रिय : क्षत्रिय... जातीय संस्थेचा अंगीकार करताना आपण कुठल्या जातीत बसतो आणि कुणावर व का अन्याय करावा हे कळत नाही; त्यांचा अन्याय आंधळा आहे, रूढीगत आहे हे या नरपशूंना कळत नाही का? म्हणून चातुर्वर्ण्य तोडले पाहिजे. मुळापासून उखडलेच पाहिजे...

खरं म्हणजे महात्मा फुले यांच्यानंतर या देशात सुधारक झाले नि स्वातंत्र्यवीर झाले; पण फुल्यांना जे क्रांतिकारकत्व देता येतं, ते यांना देता येत नाही. फुल्यांनी हिंदू धर्माच्या पडेल रोगावर अचूक हात ठेवला, तर तिकडे दुर्लक्ष करून ही माणसं गीतारहस्य लिहीत बसली. आणि सुधारकांनी सकच्छ की विकच्छ यावर वाद माजवला. बालविवाहांना प्रतिबंध व विधवाविवाहाला मान्यता यासाठी हे लढले. फुले यांच्या आधीचे असून, हे अस्पृश्यतेविरुद्ध त्यांच्याप्रमाणे का लढले नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी- विशेषतः आगरकरांनी रूढीला जरूर धक्का दिला. पण त्या सुधारणा एक तर आमच्यासाठी नव्हत्या किंवा त्यांची चक्रं सतत प्रगतीच्या दिशेने फिरून आमच्यापर्यंत त्या आल्या नाहीत- कारण चातुर्वर्ण्य व्यवस्था.

आज पण जनावरांपेक्षा हीन वागणूक आम्हाला मिळते, याचा अर्थ एक तर आमच्यात किंवा स्पृश्य वर्गात तरी सुधारणा नाही. दुसरे म्हणजे, आपले मुख्यमंत्री काल-परवा आवाहन करते झाले की, लोकमान्यांच्याच निर्धाराने सामाजिक समतेसाठी लढून एकात्मता प्रस्थापित करू या. लोकमान्यांनी सामाजिक समतेसाठी निर्धाराने कधी झगडा दिला? उलट वेदोक्त प्रकरणात ते म्हणाले की, ‘शिवाजीच्या काळच्या मराठ्यांपेक्षा आजच्या मराठ्यांना जास्त हक्क मागायचा काय अधिकार आहे?’ हीच सामाजिक समता की तिच्याविरुद्धचे उदाहरण? तर त्यांना स्वराज्य हवं होतं, पण समता नको होती. म्हणून तर स्वातंत्र्यचळवळीत अर्धवट शिकलेले काही गुंड कोणत्याही गुन्ह्याखाली आत गेले आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यसैनिक म्हणून बाहेर आले. त्यांची बौद्धिक कुवत ती देशाची बौद्धिक पातळी. त्या लोकांनी राज्य चालवायचे, मंत्रिपदे भोगायची आणि त्यांच्या हाताखाली विद्वानांनी राबायचं, हुकूम पाळायचे. हीच लोकशाही. अशा धामधुमीत 25 वर्षे निघून गेली. ना आगरकरांची सुधारणा आम्हाला सुधारून गेली, ना टिळकांचं स्वराज्य आम्हाला स्वातंत्र्य देऊन गेलं. आम्ही आंबेडकरांच्या मागे जाऊन सुधारलो, तर हे लोकच आम्हांवर बहिष्कार टाकून, आमच्या बायकांची अब्रू लुटतात. एकूण, आम्ही सुधारू नये, ही यांची इच्छा. आणि आम्ही सुधारणार, हा सबंध समाज बदलणार- हे आमचे ध्येयवाक्य! आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे लोक, त्यांना सांगू की- तुम्ही पण स्वतंत्र नाही. कारण तुम्ही मोर्चा काढाल तरी दंडुके बसणार. हे सरकार आपलं नाही. ब्रिटिश गेले, पण त्यांची प्रवृत्ती राज्यकर्त्यांमध्ये जिवंत आहे. म्हणून आपण स्वतंत्र आहोत, हे चूक. स्वतंत्र ते आहेत जे आपणाला गुलामासारखे वागवतात. मग गुलामीत स्वातंत्र्य कसलं?

15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख अंशत: संपादित करून पुनर्मुद्रित करीत आहोत- संपादक  

Tags: दलित अत्याचार संयुक्त महाराष्ट्र सदा कऱ्हाडे शंकरराव चव्हाण महात्मा फुले लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर दुर्गा भागवत काळा दिवस राजे ढाले Dalit Atyachar Sanukt Maharashtr Sada Karhade Shankarrao Chvhan Mahatma Gandhi Lokmany Tilak Dr.Babasaheb Ambedkar Durga Bhagwat Kala Swantantr Din Raja Dhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Avinash Pawar- 28 Nov 2021

    जळजळीत वास्तव ! पूर्ण लेख वाचता आला असता तर बरे झाले असते.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके