डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या देशात तीन गुरुजींनी या विषयात मूलभूत मांडणी करून त्याचं व्यापकत्व दाखवून दिलंय. या तिन्हीतले पहिले गुरुजी होते. रवींद्रनाथ टागोर, बंगालमध्ये त्यांनी शांतिनिकेतन ते विश्वभारती असा शिक्षणाच्या प्रवासाचा मानव विकासाचा पट मांडला होता. महाराष्ट्रात पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी ‘हसरे माझ्या मुला...’ पासून तर आंतरभारतीपर्यंतची दृष्टी शिक्षणाबद्दल समाजात पेरली आणि तिसरे गुरुजी माधवराव सदाशिव गोळवलकर यांनी वैदिक संस्कृती शिक्षणाचा, मूल्यांचा आग्रह धरला.

यावेळचं विधिमंडळाचं नागपूर अधिवेशन दुष्काळ, विदर्भ पॅकेज, शेतकरी आत्महत्या अशा विषयांनी गाजलं, वाजलं. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर बरसले. या गदारोळात शाळांच्या अंगणात सुरू असलेल्या एका संघर्षाकडे सत्ताधाऱ्यांचं, माध्यमांचं लक्ष थोडं कमी गेलेलं दिसलं. सत्ताधाऱ्यांनी तर तो संघर्ष उडवून लावल्यासारखं केलं. मात्र शाळांच्या अंगणात तो धगधतोय, शाळांच्या अंगणात काय संघर्ष सुरू आहे?

२०१३-१४ च्या शाळांतील विद्यार्थीसंख्येवर शिक्षण हक्क कायदा (आरटीईनुसार) निकष लावून शिक्षकांच्या संचमान्यता केल्या, त्याची अंमलबजावणी २०१४-१५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील ४० ते ४५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत, जवळपास ४५ हजार लोकांवर नोकऱ्या गमावण्याची टांगती तलवार आहे. या कारणाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या घरात असंतोष वाढतोय तो असंतोष शाळेच्या वर्ग-खोल्यात पोचलाय. स्टाफरूममध्ये माझी नोकरी जाणार की तुझी अशी चर्चा दबक्या, भेदरलेल्या आवाजात पहायला मिळतेय.

या असंतोषातून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात कपिल पाटील, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, धनंजय मुंडे, जोगेंद्र कवाडे, दत्ता सावंत, श्रीकांत देशपांडे, रामनाथ मोते, ना. गो. गाणार या आमदारांनी सरकारला घेरलं. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालवणारा सरकारचा जीआर ताबडतोब रद्द करावा अशी गळ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घातली.

शिक्षणमंत्री काही ठोस निर्णय घेत नाहीत, तोंडदेखली आश्वासनं देतात, शिक्षण खात्यातील अधिकारी मुजोरी करतात हे बघितल्यावर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या, त्यांनी निदर्शने, रास्ता रोको अशी आंदोलने केली. अधिवेशन सुरू असताना हा प्रश्न चिघळला. नांदेडचे अतिरिक्त कलाशिक्षक रमीज सय्यद यांनी आत्महत्या केली. आत्मह

त्यापूर्वी रमीज यांनी चिठ्ठी लिहिली, त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांना कारणीभूत धरलं.

रमीज हे अत्यंत संवेदनशील कलावंत शिक्षक होते. त्यांच्या अनेक चित्रांना राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत. राधा कृष्णावरील त्यांची अनेक चित्रं मनोवेधक आहेत. अजून वयाची पंचविशीही त्यांनी पार केलेली नव्हती. नोकरीच्या टांगत्या तलवारीला घाबरून/ वैतागून त्यांनी मरण पत्करलं. लोकभारतीचे अध्यक्ष आ. कपिल पाटील आणि मराठवाड्याचे शिक्षक आ. विक्रम काळे यांनी नांदेडला जाऊन सय्यद कुटुंबीयांची भेट घेतली. रमीजचे वडील सय्यद मोईजोद्दीन यांनी आमदारांजवळ हृदय पिळवटणाऱ्या भावना व्यक्त केल्या. सय्यद म्हणाले, ‘माझा मुलगा परत येणार नाही, पण त्याच्या इच्छेनुसार राज्यातील सेवामुक्त करण्यात आलेल्या हजारो कला, क्रीडा शिक्षकांना आता तरी सरकारने न्याय द्यावा.’

हायकोर्टाच्या निकालानुसार सरकारने वेळीच पावलं उचलली असती तर रमीजचा जीव गेला नसता. त्यामुळे त्याला जबाबदार असणारे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव यांच्यावर आयपीसी कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका कपिल पाटील यांनी विधान परिषदेत घेतली. शिक्षक भारती आणि इतर छोट्या-मोठ्या शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन या प्रश्नावर एक संयुक्त आघाडी बनविली आहे. या आघाडीने १२ डिसेंबर रोजी राज्यात शाळा बंद आंदोलन केलं. त्याला राज्यभर उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

शाळाबंद आंदोलनात मागण्या अशा होत्या…

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा, शाळांना अनुदान नाकारणारी फेरतपासणी स्थगित करावी, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना (अंध, अपंग, गतीमंद) नियमित विशेष शिक्षक द्यावेत. आयटीचे शिक्षक अनुदानित करावेत, विनाअनुदानीत शाळांना १०० टक्के अनुदान त्वरीत सुरू करावे. मुंबईत शाळा बंद आंदोलन करून शिक्षक परळच्या कामगार मैदानात हजारोंच्या संख्येने चीड व्यक्त करण्यासाठी जमले आणि दुपारी ४ वाजता सभा झाली. काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करणारे शिक्षक घोषणा देत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुंबईतील शिक्षण संस्था चालकांचे नेते प. म. राऊत होते. शिक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अमोल ढमढेरे यांनी सभेत शिक्षकांना सरप्लस (अतिरिक्त) करण्याची सरकारला इतकी घाई का? असा सवाल विचारला. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी या प्रश्नावर राज्यातील सर्व संघटनांनी सर्व भेद विसरून एक व्हावं असं आवाहन केलं.

कपिल पाटील या सभेत म्हणाले, ‘शिक्षकांचं हे आंदोलन शिक्षणमंत्री म्हणतात तसं पगारासाठी नाही, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावा या अधिकारासाठी आहे, शिक्षणमंत्री या विषयाकडे अत्यंत लाईटली पाहतात. उथळ बोलतात. हे क्लेशदायक आहे. शिक्षणमंत्र्यांना आणखी किती शिक्षकांच्या आत्महत्या हव्या आहेत.’

शिक्षकाचा हा संघर्ष आता शाळेच्या अंगणातून रस्त्यावर उतरणार आहे, कारण यापुढे शिक्षण हा विषय एका मोठ्या संघर्षाच्या केंद्रभागी राहणार अशी चिन्हं आहेत. लोकांची शिक्षण घेण्याची आकांक्षा आहे, शिक्षणाने पुढे जाण्याचे दरवाजे खुले होतात, हे आता साऱ्या समाजाला पटलंय. पण शिक्षण महाग होतंय, सरकार चांगल्या शाळांत शिकण्याचा गरिबांचा/ मध्यमवर्गीयांचा हक्क नाकारतंय. पालक म्हणतात, संस्थाचालक चोर आहेत. संस्थाचालक म्हणतात, ‘सरकार आम्हाला अनुदान देत नाही तर पैसा कुठून आणायचा? पालकांनी पैसा द्यावा आम्ही चांगले शिक्षक देतो.’ यात सरकारची चलाखी आहे, समाजात भांडणं लावून द्यायची आणि स्वत:ची जबाबदारी झटकायची. महाराष्ट्रात सुरू असलेला शाळांच्या अंगणातला संघर्ष इतर राज्यांतही दिसतोय. त्याचं प्रमाण कमी-अधिक आहे एवढंच. शिक्षण आणि त्याचा हक्क या विषयाकडे लाईटली बघून चालणार नाही.

आपल्या देशात तीन गुरुजींनी या विषयात मूलभूत मांडणी करून त्याचं व्यापकत्व दाखवून दिलंय. या तिन्हीतले पहिले गुरुजी होते रवींद्रनाथ टागोर, त्यांनी बंगालमध्ये शांतिनिकेतन ते विश्वभारती असा शिक्षणाच्या प्रवासाचा मानव विकासाचा पट मांडला होता. महाराष्ट्रात पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांनी ‘हसरे माझ्या मुला...’ पासून तर आंतरभारतीपर्यंतची दृष्टी शिक्षणाबद्दल समाजात पेरली. तिसरे गुरुजी माधवराव सदाशिव गोळवलकर यांनी वैदिक संस्कृती शिक्षणाचा, मूल्यांचा आग्रह धरला. गोळवलकर गुरुजींची वैदिक संस्कृती शिक्षणमूल्यांची मांडणी चातुर्वण्य व सनातन धर्माला केंद्र मानून केलेली होती. टागोर, साने गुरुजी यांच्या शिक्षणविषयक दृष्टीला समतावादी, मानवतावादी पाया आहे. गोळवलकर गुरुजींच्या वैदिक शिक्षणाला विषमतेची माया चिकटलेली दिसते अशी टीका सतत होत असते. आज देशात व काही राज्यांत गोळवलकर गुरुजींच्या विचारांची सरकारं आहेत, या सरकारांना शाळांच्या अंगणात सुरू असलेल्या संघर्षाला सामोरं जावं लागेल. तो संघर्ष ही सरकारं कशी शमवणार? स्वत:च्या तळहातावरचं भविष्य पाहणाऱ्या देशाच्या शिक्षणमंत्री (मनुष्यबळ विकासमंत्री) स्मृती इराणी या संघर्षात काय भूमिका बजावणार? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विनोद तावडे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील आग कशी शमवणार हे यापुढे आपल्याला दिसेल.  

Tags: शिक्षण राजा कांदळकर education raja kalandkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके