डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जातीच्या अस्मिता-प्रश्न पुढे आले की, भाजपचं धार्मिक कार्ड बोथट होतं, हे या निवडणुकीत जाणवतंय. गुजरात मॉडेल हे विकासाचं मॉडेल आहे, हे भाजपकडून उंच्चरवात सांगितलं जातंय, पण गुजरात मॉडेल म्हणजे रा.स्व.संघाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत धार्मिक ज्वर वाढवला गेला. त्यातून 2002 च्या दंगली, वंशसंहार घडवण्यात आला. आदिवासींना त्यांच्या मूळ अस्मिता, परंपरा विसरायला लावून त्यांचं संघीकरण केलं गेलं. त्यांना मुस्लिमद्वेष शिकवून गुजरात दंगलीत मारेकरी म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. पाटीदारसहित मध्यम, ओबीसी जातींना संघाचा विचार पाजून मुस्लिमद्वेषी बनवण्यात आलं. जैन हा खरं तर वेगळा धर्म, पण गुजरातचे जैन स्वत:चा धर्म कधी विसरले, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.  

गुजरातमधील बडोदा शहरात आणि आसपासच्या खेड्यांत फिरताना या वेळची विधानसभेची निवडणूक काही वेगळीच आहे, हे जाणवण्याशिवाय राहत नाही. गेली 22 वर्षे या राज्यात भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. बाबरी मशीद विध्वंसाच्या पंचविसाव्या वर्षातील डिसेंबर महिन्यात ती होतेय. बाबरी पाडणं, राम मंदिर बांधणं या आंदोलनाशी गुजरातचं नातं खूप प्रेमाचं आहे.

प्रेमाचं कसं? ‘राम मंदिर वही बनाएँगे’साठीची सोमानाथ ते अयोध्या ही यात्रा गुजरातच्या सोमनाथाच्या मंदिराचं दर्शन घेऊन लालकृष्ण अडवाणींनी सुरू केली. यात्रेचे मॅनेजर नरेंद्र मोदी होते गुजरातमध्ये. अडवाणींचं गुजरातशी नातंही घनिष्ठ आहे त्यांचा गांधीनगर लोकसभा मतदारसंघ गुजरातची राजधानी आहे. आणि इथंच सारी राज्य सरकारी ऑफिसं आहेत. अर्थात भाजपमध्ये आता 25 वर्षांनंतर त्या वेळचे हीरो असलेले अडवाणी अडगळीत आहेत. आणि मॅनेजर मोदी हे देशाचे पंतप्रधान व गुजरात निवडणुकीतील स्टार प्रचारक आहेत. गुजरातचा बेटा म्हणून त्यांची चलती आहे. निवडणूक होत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (अमित शहा), पंतप्रधान (मोदी) दोघेही गुजरातचे आहेत. गुजरातमध्ये आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता आहे. अशी परिस्थिती यापूर्वी झालेल्या 2002, 2007 आणि 2012 च्या गुजरात निवडणुकांत नव्हती. गुजरातवर केंद्र अन्याय करतंय, अशी आरोळी पूर्वी मारता येत होती. पंतप्रधान आपला, मुख्यमंत्री आपला, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आपला; तरीही या गुजरातच्या बेट्यांनी ‘अच्छे दिन’ काही आणलेले नाहीत, ही या निवडणुकीत गुजरातच्या मतदारांची तक्रार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेचे विशेष प्रतिनिधी निखिल देशमुख सांगत होते, ‘‘मी सौराष्ट्रात फिरलो. सरकारवर शेतकरी नाराज दिसले. शेतमालाच्या भावाचा प्रश्न राज्य व केंद्र सरकार सोडवू शकले नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, म्हणून तरुण वर्ग नाराज आहे. गुजरातच्या पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 89 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान झाले, ते जवळपास 70 टक्के. काही जिल्ह्यात तर 72 ते 75 टक्के असं भरघोस मतदान वाढलंय. मतदान जेव्हा वाढतं, तेव्हा ते काही हेतू ठेवून वाढत असतं. नवे मतदार मतदान करत आहेत. हे मतदान 22 वर्षांच्या सत्तेवर नाराजी व्यक्त करण्यावर असू शकतं. भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.’’

व्यापारी, शेतकरी, युवक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, मजूर, रिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले अशा विविध घटकांतील प्रतिनिधींशी बोलताना जाणवतं की, लोकांच्या मनात राग आहे. 22 वर्षांची सत्ता आहे, पण पदरात काही नाही- याबद्दल असंतोष आहे. विकासाचे दावे म्हणजे आकड्यांचे खेळ ठरत आहेत.

बडोद्यात भाजप कार्यकर्ते दिनेश पटेल भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बोलण्यात मुद्दे आले ते असे- 22 वर्षे सत्ता आहे भाजपची, त्यामुळे लोकांची अपेक्षा तर वाढणारच. त्यात नोटाबंदी, जीएसटी, पाटीदार आरक्षणाचा प्रश्न यामुळे लोकांमध्ये गैरसमज आहेत. पण लोकांचा काँग्रेसवर भरोसा नाही. गुजरातमध्ये काँग्रेसकडे भरोसा ठेवावं असं नेतृत्व नाही. त्यामुळे थोडी नाराजी- असंतोष असला, तरी लोक भाजपलाच मतदान करतात. गेली 22 वर्षे सत्ता होती, पुढेही राहील. सध्या भाजपची लढाई फक्त भाजपशीच आहे. काँग्रेस आमच्या खिजगणतीतही नाही. भाजपचे कार्यकर्ते भेटल्यावर फार बोलत नसले तरी लोक नाराज आहेत, हे मान्य करतात. मोदी केंद्रात गेल्यानंतर दोन वर्षांत दोन मुख्यमंत्री बदलले, लोकांची कामे झाली नाहीत- असे मुद्दे मांडतात. पण मोदी आहेत त्यांची जादू भाजपला तारेल, ही निवडणूक जिंकून देईल, असं भाजपच्या लोकांना वाटतंय. मोदींची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गुजरात त्यांना साथ देईल, असा भाजपचा दावा आहे.

भाजप नेते-कार्यकर्ते जिंकण्याच्या बाता करत असले, तरी मनातून हे लोक घाबरलेत याची चिन्हे जागोजागी दिसतात. हार्दिक पटेलच्या सभांना गर्दी होतेय. त्यात पाटीदार तरुणांची संख्या जास्त असते. हार्दिकच्या बदनामीचे अनेक प्रयोग करूनही त्याची लोकप्रियता काही कमी होत नाही. अल्पेश ठाकूर, जिग्नशे मेवानी यांना बघायला-ऐकायला लोक गर्दी करतात आणि भाजप नेत्यांच्या सभांना मात्र तेवढी गर्दी दिसत नाही. मोदींच्या पन्नास सभा घ्याव्या लागल्या. त्यातील अलीकडच्या काही सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या. एका ठिकाणी तर मोदींचे भाषण सुरू झाले आणि मैदान रिकामं व्हायला लागलं. त्यानंतर मोदींनी भाषण रेटलं तरी न्यूज चॅनेलच्या कॅमेऱ्यांवर मंचावरच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरची काळजी लपली नाही. रिकाम्या खुर्च्याही दिसल्याशिवाय राहिल्या नाहीत. ही चिन्हे काही वेगळे घडतेय याचा पुरावा म्हणता येतील. शिवाय मोदींचं तेच ते भाषण आता लोकांना पूर्वीसारखं आकर्षित करीत नाही.

गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षांत जातीचे प्रश्न पहिल्यांदा पुढे आहेत. यातही एक काव्यगत न्याय कसा आहे बघा- 1989 नंतर मंडल आयोगाची घोषणा तेव्हाचे पंतप्रधान व्ही.पी.सिंह यांनी केली आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया आंदोलनाच्या रूपाने गुजरातमध्येच उमटली होती. तेव्हा मंडल शिफारशींना पटेल/पाटीदार समाज विरोध करत होता; तोच समाज आज ओबीसींच्या सवलती मिळाव्यात, म्हणून रस्त्यावर उतरलाय. स्वत:ला ओबीसी ठरवण्यासाठी इरेला पेटलाय. याशिवाय ओबीसी संघटना अल्पेश ठाकूरच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधात एकत्रित आहेत. खरं तर पाटीदार आणि खरे ओबीसी यांचाही संघर्ष आहे, कारण ओबीसी समाजाचा पाटीदारांना आरक्षण द्यायला विरोध आहे; पण या निवडणुकीत ओबीसी आणि पाटीदार हे दोन्ही गट भाजपविरोधात काँग्रेसबरोबर आहेत. जिग्नेश मेवानी यांच्या रूपाने दलित समूहांना नेता मिळालाय. दलित समाजही भाजपविरुद्ध जाण्याच्या मूडमध्ये आहे. अल्पसंख्याक (विशेष मुस्लिम) समाजातील लोक गुजरातमध्ये भाजपविरोधात फारसे उघड बोलत नाहीत; पण जर मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज काँग्रेसबरोबर गेला तर मुस्लिम समाजही काँग्रेसला या वेळी मतदान करील, असं एका मुस्लिम रिक्षावाल्याने सांगितलं.

जातीच्या अस्मिता-प्रश्न पुढे आले की, भाजपचं धार्मिक कार्ड बोथट होतं, हे या निवडणुकीत जाणवतंय. गुजरात मॉडेल हे विकासाचं मॉडेल आहे, हे भाजपकडून उंच्चरवात सांगितलं जातंय, पण गुजरात मॉडेल म्हणजे रा.स्व.संघाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत धार्मिक ज्वर वाढवला गेला. त्यातून 2002 च्या दंगली, वंशसंहार घडवण्यात आला. आदिवासींना त्यांच्या मूळ अस्मिता, परंपरा विसरायला लावून त्यांचं संघीकरण केलं गेलं. त्यांना मुस्लिमद्वेष शिकवून गुजरात दंगलीत मारेकरी म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. पाटीदारसहित मध्यम, ओबीसी जातींना संघाचा विचार पाजून मुस्लिमद्वेषी बनवलं. जैन हा खरं तर वेगळा धर्म, पण गुजरातचे जैन स्वत:चा धर्म कधी विसरले, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. अमित शहा हे स्वत:ची जैनधर्मीय ओळख चतुरपणे लपवून वावरतात. त्याचं अनुकरण भाजपमधील बहुतेक जैनधर्मीय नेते करतात. शीख, ख्रिश्चन, पारशी या धर्मीयांचं अस्तित्व गुजरातमध्ये अल्प आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रक्रियेवर फारसा प्रभाव पडताना दिसत नाही.  

पाटीदार, ओबीसी, दलित हे समूह आपापल्या पीडा मांडत आहेत. भाजपच्या 22 वर्षांच्या सत्तेला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे संघ परिवाराला या निवडणुकीत धार्मिक धु्रवीकरण करून उन्माद वाढवता आलेला नाही. मुस्लिमांना टार्गेट करून मुस्लिमद्वेष वाढवण्यासाठीचा एखादा मुद्दाही भाजपच्या हाती पडलेला नाही. धार्मिक कार्ड वापरता येत नाही, हे कळून चुकल्यानंतर भाजपने राहुल गांधींच्या हिंदूपणाचा मुद्दा सोमनाथ मंदिराच्या दर्शनाच्या निमित्ताने तापवण्याचा प्रयत्न केला. राहुलच्या आजोबांनी- पं.नेहरू यांनी सोमनाथ मंदिराला कसा विरोध केला होता, मग सरदार पटेलांनी कसा पुढाकार घेऊन सोमनाथ मंदिर उभारणीत सिंहाचा वाटा उचलला तेव्हा कुठे आजचे मंदिर उभे राहिले- हे एका सभेत खुद्द मोदींनी कहाण्या रंगवून सांगितलं. इतर भाजपनेत्यांनी, प्रवक्त्यांनी ‘राहुल हिंदू आहेत की इतर कुणी?’ हा प्रश्न उभा करून ते हिंदू आहेत याबद्दल शंका उभ्या करण्याचा प्रयत्न केला, पण हा मुद्दा फुसका ठरला.

काँग्रेसमागे गुजरातमध्ये उभं राहिलेलं जातसमीकरण मोडण्यासाठी भाजपने राहुलचा धर्म हे कार्ड वापरलं. त्याला काँग्रेसने प्रतिसाद दिला की, राहुल हे जानवेधारी हिंदू असून शिवभक्त आहेत- त्याला राहुल हे काश्मिरी पंडित असण्याचा संदर्भ आहे. पं.नेहरूंचे घराणे हे काश्मिरी पंडितांतील. हे सर्व पंडित शिवभक्त असतात. शिवरात्री हा त्यांचा मोठा उत्सव. इंदिरा गांधी (राहुलची आजी) शिवरात्रीची पूजा थाटामाटात करत असत. जानवेधारी हिंदू या प्रतिक्रियेवरही चर्चा रंगली. पण एकूण, राहुलचा धर्म काढून भाजपला काँग्रेससोबतचं जातीगणित मोडायची संधी साधता आली नाही. काँग्रेसने हुशारीनं प्रचार पुन्हा वेड्या झालेल्या विकासावर नेला.

भाजपच्या या चतुर राजकारणाबद्दल बडोद्यात सयाजी बाग परिसरात भेटलेले रूपेश पंचाल हे काँग्रेस कार्यकर्ते सांगू लागले. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसने 22 वर्षांचा वनवास भोगलाय. भाजपनेते वनवासी काँग्रेसला जाब विचारताहेत. हा अजब- प्रकार या निवडणुकीत पाहायला मिळतोय. आपण सत्तेवर आहोत, हे सत्ताधारी विसरून गेलेत आणि विरोधी पक्ष जणू सत्तेत आहेत असा आभास निर्माण करून भाषणबाजी चालू आहे. मोदीजींनी स्वत: उत्तरं द्यावीत, गुजराती जनतेच्या प्रश्नांची. ते कुणाला जाब  विचारतात; काँग्रेसच्या राहुल गांधींचा धर्म काढायचा यांना काय अधिकार? मोदी हिंदू आहेत ना; मग हिंदू व्यापारी नोटाबंदी व जीएसटीमुळे बरबाद झाले, त्यांचं उत्तर कोण देणार? शेतमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून हिंदू शेतकरी अडचणीत आहेत. हिंदू एवढे अडचणीत असताना यांनी काय केलं? हे लोक हिंदू म्हणवून आजपर्यंत गुजराती जनतेला फसवत आलेत. या वेळी हिंदूंच्या लक्षात आलंय की, भाषणबाजीवर भुलायचं नाही. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी सांगतो, या राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. काँग्रेस जिंकणार आहे, तख्तपालट होणार आहे!’’

रूपेश पंचाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना भूकंप होईल असं आशावादी वाटणं स्वाभाविक आहे; पण विविध स्तरांतले लोक या वेळी मतदारांमध्ये खूप चीड आहे, हे सांगत आहेत. तेही दुर्लक्ष करून कसं चालेल?

चीड का आहे?

0 जीएसटीमुळे व्यापार आणि लघुउद्योगांवर नकारात्मक परिणाम झाल्याने गुजरातची अनौपचारिक अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे छोटे व्यापारी, मजूर संकटात आहेत. त्यातून बेरोजगारीचं संकट वाढलंय.

0 केंद्र सरकार फक्त अदानी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींना भांडवल, जमिनी, पाणी, वीज अशा सवलती देतं; त्यामुळे सामान्य माणसांना रोजगार मिळत नाही, हे उघड झालंय. त्यामुळे हे सरकार बड्या उद्योगपतींचं सरकार आहे, हे आता लोकांना कळू लागलंय. म्हणून गुजरात विकास मॉडेल म्हणजे अंबानी-अदानीचा विकास, हे गुजराती जनतेला कळून चुकलंय. मोदी गरिबांचे नाहीत, हे स्पष्ट झालंय.

0 गुजरातमध्ये बेरोजगारी वाढतेय. पाटीदार आंदोलन हा त्याचा परिणाम आहे. वैद्यकीय सेवा, शिक्षण खूप महागडं आहे. शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांना भाजप सरकार वाऱ्यावर सोडून देतंय. शैक्षणिक गुणवत्तेची बोंब आहे. सरकारी नोकर कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. त्यांच्यात नाराजी आहे.

0 केंद्र सरकारने गुजराती जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. नुसता नव्या घोषणा आणि भाषणांचा पूर आला आहे. हे ढोंग जनतेपुढे उघडलं पडलंय.

या मुद्यांवरून लोकांमध्ये असंतोष आहे; पण नरेंद्र मोदीजी त्यावर बोलणं, चर्चा करणं टाळत आहेत. मोदीजी वरील कळचे मुद्दे चर्चेला येऊ नयेत म्हणून भाषणात काय सांगत आहेत?

0 मी गरीब आहे... असं म्हणून रडून दाखवतात.

0 मी गुजरातचा बेटा आहे, मी चहा विकलेला आहे.

0 घराघरांत अफजल गुरू पैदा होईल, असं काँग्रेसवाले म्हणतात. त्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम आहे.

0 हाफीज सईदची सुटका झाल्यावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या.

0 हार्दिक पटेलच्या सेक्स सीडीवर मोदींच्या सभेत भाजप नेते टिंगलटवाळी करतात.

0 मी गुजराती पंतप्रधान आहे, म्हणून मला बळ द्या.

0 काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी मला ‘नीच’ म्हटले. मी मागास जातीत जन्मलो म्हणून नीच झालो काय? मी हरलो, तर गुजरात हरेल. मागासवर्गीय हरतील. 

अस्मिता, धर्म यांच्या नावाने सत्ताधाऱ्यांनी जनतेची डोकी भडकवायला सुरुवात केली की, त्यांना आर्थिक प्रश्नांवरचं लोकांचं लक्ष उडवायचंय असं खुशाल समाजावं. नेमकं हेच गुजरातमध्ये भाजपकडून मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

अमित शहा यांची ते तगडे इलेक्शन बूथ मॅनेजर म्हणून ख्याती आहे. त्यांच्या राजनीतीचा पराजय केवळ अशक्य, अशी गुजरातमध्ये आख्यायिका आहे. दुसरीकडे गुजरातच्या पोटात असंतोष आहे. या असंतोषाचं राजकीय भूकंपात रूपांतर होऊ शकतं. त्याची चाहूल, खुणा गुजरातमध्ये फिरताना जागोजागी दिसतात. असा भूकंप होऊ दे, अशी काँग्रेसवाल्यांची इच्छा आहे. गुजराती जनतेच्या पोटात खरं काय आहे- सत्तेविरोधी भूकंप की सत्तेला साथ, हे येत्या 18 डिसेंबर रोजी स्पष्ट होईलच.

Tags: राजा कांदळकर गुजरात गुजरात : राजकीय भूकंपाची चाहूल जिग्नशे मेवानी विधानसभा 2017 हार्दिक पटेल लालकृष्ण अडवाणी गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ Raja Kandalkar Gujraat : Rajkiya Bhukanpachi chahul Gujraat Vidhansabha 2017 Jignesh Mevani Hardik Patel Gujraat Aseembly Election 2017 Lalkrishna Advani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके