डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्तरप्रदेशातील अकरा करोड मतदारांनी त्रिशंकू कौल देऊन हा प्रदेश आणखी संकटात टाकला आहे. कारण यापुढे उत्तरप्रदेशात राजकीय पक्ष विधानसभेचं आखाड्यात रूपांतर करतील. कुणासही बहुमत नसल्याने सरकार चागलं चालवणं मुश्किल होऊन बसेल. विधानसभेचं रूपांतर आखाड्यात आणि आर्थिक विकासाचा पार राडा असं चित्र पुढील काळात या राज्याचं असू शकतं.

उत्तरप्रदेशात भाजपाईंचा 'मूड' उधळला गेला आहे. उत्तरप्रदेश हा भाजपाईंचा वर्मस्थळ आहे. या वर्मावरच या विधानसभा निवडणुकांमुळे घाव घातला गेला आहे. उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाला 145 जागा मिळाल्या. तो पक्ष प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बसप आहे. त्या पक्षाला 99 जागा मिळाल्या आहेत. भाजपाई तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या परिस्थितीमुळे 403 आमदारांची विधानसभा त्रिशंकू झाली आहे. आपल्या घरातच भाजपाईंना मिळालेली चपराक फारच बोलकी आहे. ही चपराक मिळाल्याने भाजपाईंच्या गर्वाचे घर खाली झाले आहे.

हत्तीची दमदार चाल

उत्तरप्रदेशात बसपचं यश वाखाणण्याजोगं मानलं जात आहे. या निवडणुकीत बसप नेते कांशीराम आजारी होते. मायावती यांच्याकडे पक्षाच्या प्रचाराची सूत्रं होती. कोणताही नट किंवा नटी बसपच्या स्टेजवर नसायची. तरीही या पक्षाच्या सभा लाखोंनी व्हायच्या. एकेकाळचा दलितांचा पक्ष अशी बसपची ओळख असली तरी या निवडणुकीत बसपने 91 सवर्ण व 85 मुस्लिमांना तिकिटे देऊन भाजपची सवर्णमतांची तिजोरी फोडण्यात यश मिळवलं. समाजवादी पक्षाच्या मुस्लिम वोट बँकेवरही बसपने नाही म्हटलं तरी हात मारण्यात यश मिळवलं आहेच. 91 आमदारांना निवडून आणून मायावती 'कौन बनेगा सीएम’च्या खेळात सहभागी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील दलितांची 21 टक्क्यांची वोटबँक सांभाळत मायावतींनी मिळविलेलं यश म्हणूनच सर्वांच्या चर्चेच्या विषय झाल्यास नवल नाही. भाजप व सपच्या लोकांनी बसपची तिकिटं विकत घेतली असं बोललं जात असलं तरी अशा लोकांनाही बसपने निवडून आणलं हे महत्त्वाचे आहे. मायावतींचं यश वाखाणण्याजोगं असलं तरी त्या यशात काही धोकेही संभवतात.

हे धोके मुख्यतः आमदार फुटण्याच्या संदर्भातील आहेत. बसपमध्ये 25-30 आमदार असे आहेत की त्यांना सत्ता मिळण्याची चिन्हे दिसली नाहीत तर ते कोणत्याही क्षणी हत्तीवरून खाली उडी टाकू शकतात. उत्तरप्रदेशात त्रिशंकू परिस्थिती आहे. प्रत्येक पक्ष फोडाफोडीचं राजकारण करणार हे उघड आहे. या फोडाफोडीत सर्वात अगोदर बसपाचे लोक फुटतील हे आजच बोललं जाऊ लागले आहे. बसप-भाजप युती होईल की नाही, हे आज स्पष्ट होऊ शकले नसले तरी बसप आपल्या 99 आमदारांच्या जीवावर सत्तेत जाण्याचा आटापिटा करील हे मायावती ज्या त्वरेने दिल्लीत वावरत आहेत त्यावरून उघड होत आहे.

मुलायमसिंहाची सरशी

मुलायमसिंहाच्या समाजवादी पक्षाला उत्तरप्रदेशात (युपी) सर्वांत जास्त जागा मिळाल्या. हा पक्ष युपीच्या सत्तेचा प्रथम क्रमांकाचा दावेदार आहे. भाजपाईंच्या विरोधात गेली पाच वर्षे मुलायम सिंह यांनी जी विरोधी आघाडी उभारली होती, त्यामुळेच त्यांना हे यश मिळालं आहे. भाजपाईंनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांत आम्ही दहशतवादाचे कर्दनकाळ, मुस्लिमांना गप्प बसवणारे आणि पाकिस्तानला धडा शिकवणारे आहोत, अशी भाषा खुलेआम केली. उत्तरप्रदेशात मुस्लिमांना कोलूनही आम्ही सत्ता मिळवू, अशी भाषा खुद्द पंतप्रधान वाजपेयी यांच्या तोंडीही होती. लोकांना भावनिक आवाहनाची एकही संधी भाजपाईंनी सोडली नाही. राममंदिराचा प्रश्न अगदी निवडणुकीतच करून हिंदू वोट बँकेला हात जोडले. अयोध्येतील साधू-संतांचे आशीर्वाद घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री राजनाथसिंह हे प्रभू रामचंद्रांचे वंशज आहेत, अशीही आवाहने केली. रामाच्या वंशजाला गादीवर बसवण्यासाठी ब्राह्मणांनी क्षत्रियांना मदत करावी असा वाग्यज्ञही चालवला गेला. या सर्वांवर मुलायमसिंहांनी मात करून यश संपादन केलं आहे. मात्र ते बहुमत मिळवू शकले नाहीत. सध्याचा उत्तरप्रदेश त्रिशंकू समाजव्यवस्थेत विभागल्याने तेथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली आहे.

निवडणूक काळातच मुलायमसिंहाच्या बाजूने लोक जाणार, असा अंदाज येत होता. भाजपच्या पाच वर्षांच्या राज्यकारभाराला लोक भयंकर वैतागले होते. लोकांच्या जगण्याच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा 'मंदिरा'सारख्या भावनिक प्रश्नांवर लोकांना भुलवण्याचं राजकारण फार काळ चालू शकत नाही, हे उत्तर प्रदेशच्या जनतेने दाखवून दिलं आहे. या निवडणूक निकालांनी असंही दाखवून दिलं आहे की, भाजपच्या मंदिरवादी ढोंगीपणाला इथून पुढे हिंदूही भुलणार नाहीत, कारण गेल्या दहा वर्षांत मंदिराच्या प्रश्नाचा वापर भाजपने फक्त मते मिळविण्यासाठी केला. सत्तेत गेल्यानंतर मंदिर प्रश्न भाजपाई लोक विसरतात हे उत्तर प्रदेशातील लोकांनी वारंवार पाहिले आहे. संघ खानदानने मंदिर प्रश्नावर किती ढोंगी भूमिका घेतल्या, हे लोकांना माहीत होऊन चुकले आहे. त्यामुळे मंदिर प्रश्नाचा लाभ या निवडणुकीत भाजपला झाला नाही. ऐन निवडणुकीच्या काळात अयोध्येच्या साधूंनी आदळआपट केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. या गोष्टींचा उपयोग झालाच असेल तर भाजपाईंना धूळ चारण्यासाठीच झाला होता.

भाजपाईचं पानिपत

उत्तरप्रदेशातील निवडणुकांत भाजपाईचं पानीपत का झालं असावं? एक तर पाच वर्षांत भाजपने उत्तर प्रदेशचा काहीही विकास केला नाही. उदाहरणार्थ उत्तरप्रदेशात आजही हजारो खेडी रात्री पाच सहा तास अंधारात राहतात. हजारो तरुण दिल्ली मुंबईची वाट रोजगारासाठी धरतात. आज खुद्द उत्तरप्रदेशात करोडो तरुण बेकार आहेत. हे तरुण कारसेवक म्हणून काही भाजपने वापरले. पण रामाच्या नावावर जगता येत नाही, हे या तरुणांना कळून चुकलं. शेतकऱ्यांच्या शेतांत प्रचंड पिकं येतात. पण भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या तांदळाला, गव्हाला, बटाट्याला योग्य भाव देऊ शकलं नाही. त्यामुळे तेथील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारी नोकरांचे पगार नाहीत. त्यामुळे नोकरशाही या सरकारवर नाराज होती. भ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बिहार नंतर उत्तरप्रदेश असं बोललं जाऊ लागले होतं.

उत्तरप्रदेशात आग्रा, वाराणसी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांत पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळू नये अशी वाईट परिस्थिती भाजप सरकारच्या काळात होती. त्यामुळे उत्तरप्रदेशातील लोकांनी भाजपला नाकारलं. ही नकारार्थी मते मुलायमसिंहाच्या पक्षाला मिळाली. उत्तरप्रदेशात सरकार कुणाचं?

मुलायमसिंह, मायावती या दोघांपैकी कुणीतरी उत्तरप्रदेशात सरकार बनवील असं चित्र हा लेख लिहिताना दिसतंय. विधानसभा त्रिशंकू असल्याने या राज्यात सतत अस्थिरता राहील. असं आजचं चित्र आहे. कुणाचंही सरकार झालं तरी आमदार फोडाफोडीची प्रकरणं होणार हे उघड आहे. मुलायमसिंह, काँग्रेस, अपक्ष हे सर्वजण मिळून सरकार बनवू शकतात, ही एक शक्यता सध्या दिसतेय. दुसरी शक्यता बसपला भाजप पाठिंबा देईल आणि मायावती सरकार बनेल अशीही शक्यता आहे. आज तरी भाजप मायावती व सत्ता या दोघांपासूनही दूर राहण्याची भूमिका घेऊ पाहत आहे. तिसरी शक्यता अशीही बोलली जात आहे की जर कुणालाही सरकार बनवता आलं नाही तर उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट येऊ शकणारच नाही, असंही नाही.

उत्तरप्रदेश आखाडा होणार?

आज उत्तरप्रदेशात स्थिर सरकार कुणाचंही येणार नाही, हे उघड आहे. कुणाचंही सरकार आलं तरी ते अस्थिर असणार. राजकीय पक्षांची रामायणं सतत चालू राहतील. खरा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशचं भलं येणारं सरकार करू शकेल का? आज उत्तरप्रदेश हे एक कंगाल राज्य म्हणून पुढे येत आहे. हिंदूंची देवळं आणि चार-पाच पंतप्रधान देणारं राज्य यापलीकडे या राज्याची आज काहीही ओळख नाही असं दिसतंय. खरं तर उत्तरप्रदेशात सुपीक जमीन भरपूर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त नद्या आणि मुबलक पाणी या राज्यात आहे. प्रचंड मनुष्यबळही आहे. हे असूनही या राज्याचा पार 'राडा' किंवा आखाडा' झाला आहे. अकरा करोड मतदारांचा हा प्रदेश असून केंद्र सरकारलाही या राज्यात विकासकामं करण्यात अपयश आलय. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांवर येथील लोक नाराज होते. त्याची प्रचिती निवडणूक निकालावरून आली आहे. ती इतकी, की बसपला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील अकरा करोड़ मतदारांनी त्रिशंकु कौल देऊन हा प्रदेश आणखी संकटात टाकला आहे. कारण यापुढे उत्तरप्रदेशात राजकीय पक्ष विधानसभेचं आखाड्यात रूपांतर करतील. कुणासही बहुमत नसल्याने सरकार चागलं चालवणं मुश्किल होऊन बसेल. विधानसभेचं रूपांतर आखाड्यात आणि आर्थिक विकासाचा पार राडा असं चित्र पुढील काळात या राज्याचं असू शकतं. त्यात मुलायमसिंहाचं सरकार आलं तर विहिंप व संघ खानदान राममंदिराचा प्रश्न आणखी रेटणार- मुलायमसिंहही साधू- ढोंगी रामभक्तांना अडवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचं सरकार असताना समजा दहा लाख कारसेवक अयोध्येत आले असते. आता मुलायम सत्तेत असताना ती संख्या वीस लाखांवर जाईल. त्यातून अयोध्येचाही आखाडा होईल. आधीच मागास असणारं हे राज्य अस्थिरतेमुळे आखाडा प्रदेश बनल्यास म्हणूनच नवल ते काय?

Tags: राजा कांदळकर मुलायमसिंह यादव बसपा मायावती उत्तरप्रदेश निवडणूक-2002 BSP Mayawati Uttar Pradesh assembly election 2002 Raja kandalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके