डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

युवकांना पुरोगामी चळवळीची अॅलर्जी का?

पुरोगाम्यांनी ज्या समाजरचनेचं स्वप्न बाळगलं होतं, त्याच्या आज ठिकऱ्या उडताना दिसून येत आहेत. त्यांनी ज्या गोष्टींचा आग्रह धरला त्याच्या विपरीत घटना घडताना दिसतात. 1990 नंतर बाजार खुला-मोकाट करणारं धोरण रुजवलं गेलं आणि बाबरी मशिदीचा विस्फोट घडवला गेला. या दोन्ही गोष्टी येथील समाजासाठी विपरीत ठरल्या.

It is an established truism that young men of today are the countrymen of tomorrow, holding in their hands the high destinies of the land. They are the seeds that spring and bear fruit.

कुणा एका पाश्चात्य पंडितानं असं तरुणांविषयी म्हणून ठेवलं आहे. यावर कुणाचं दुमत होण्याचा संभव नाही. तरुणांचं इतकं महत्त्व जसं देशाच्या उभारणीत असतं, तसंच ते एखादी चळवळ फोफावण्यात आणि जिवंत ठेवण्यासाठीही असतं. आपल्याकडची पुरोगामी चळवळही त्याला अपवाद नाही. सुमारे 1990 पासून देशात पुरोगामी चळवळीतील तरुणांच्या भरतीला ओहोटी लागली आहे. हे आता दस्तुरखुद्द पुरोगाम्यांनीही मान्य केलं आहे. सर्व पुरोगामी पक्ष-संघटनांच्या युवक-विद्यार्थी आघाड्या आहेत. त्यांची शिबिरं, चर्चा, अधिवेशनं, मोर्चे, मेळावे, निदर्शनं असे कार्यक्रम होतात. पत्रकं निघतात. मात्र त्याचा प्रभाव पडत नाही. मुख्य प्रवाहातले तरुण या गोष्टींकडे आकर्षित होत नाहीत. फुटकळ तरुणांच्या गटांची प्रभावहीन कृती अशी या कार्यक्रमांची परिस्थिती असते. कुठेकुठे विद्यार्थी आंदोलनं होतातही; मात्र एकूणात या पुरोगामी चळवळीतल्या विद्यार्थी युवक संघटना सुस्तावलेल्या दिसत आहेत. साठ ते ऐंशीच्या दशकामध्ये महाराष्ट्रात युवक क्रांतीदल, एसएफआय, दलित पँथर, छात्रभारती, राष्ट्र सेवादल या युवक संघटनांमध्ये हजारोंनी युवक सहभागी होत. घडाधड मोर्चे निघत. आंदोलनं होत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जेरीस आणणाऱ्या चळवळी होत. आज मात्र परिस्थिती अशी नाही, असं दिसून येतं. पुरोगामी युवक-विद्यार्थी संघटनांमध्ये कम्युनिस्ट, शेकाप, समाजवादी पक्षांमध्ये तरुण नाहीत म्हणजे कुठल्याच राजकीय पक्ष-संघटनांत तरुण जात नाहीत, असं नव्हे. आज शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवकसंघ परिवार, काँग्रेसच्या छटांच्या पक्षांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे असं दिसतं. विविध धार्मिक संघटनांमध्ये तरुण मोठ्या संख्येनं काम करताना दिसतात. सनातन संस्कृती संस्था, पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार यांसारख्या संघटनांमध्ये शहर-खेड्यांतील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. याशिवाय नाणीजचे नरेंद्र महाराज, आसारामबापू, मुंबईचे अनिरुद्ध बापू जोशी महाराज, वामनराव पै यांसारख्या महाराजांच्या भक्तगणांमध्येही तरुणांचा मोठा सहभाग आहे असं दिसून येतं. यामागची कारणमीमांसा हा स्वतंत्र विषय आहे. त्याचा इथे विचार केलेला नाही. एक निरीक्षण मांडलं एवढंच. 

पुरोगाम्यांनी ज्या समाजरचनेचं स्वप्न बाळगलं होतं, त्याच्या आज ठिकऱ्या उडताना दिसून येत आहेत. त्यांनी ज्या गोष्टींचा आग्रह धरला त्याच्या विपरीत घटना घडताना दिसतात. 1990 नंतर बाजार खुला-मोकाट करणारं धोरण रुजवलं गेलं आणि बाबरी मशिदीचा विस्फोट घडवला गेला. या दोन्ही गोष्टी येथील समाजासाठी विपरीत ठरल्या. देशाला आणि आपल्या समाजाला वळण देणाऱ्या वरील दोन घटना घडत असताना पुरोगामी चळवळीच्या तरुण बुरुजाची पडझड झाली, ही कुणीही गांभीर्याने घ्यावी, अशी प्रक्रिया आहे. बाजार मोकाट होऊन शेतकरी-गरिबांच्या नरड्याभोवतीचे फास आवळणं सुरू झालं; तर बाबरी मशीद पाडत संघ परिवारानं स्वतःचा पाया घट्ट करून समाजावरचा पंजा घट्ट आवळणं सुरू ठेवलं. संघ परिवाराची सरशी ही तर देशाच्या बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांची वासलात लावणारी घटना.

थोडक्यात पुरोगाम्यांसाठी वाईट सिग्नल मिळत असल्याचं आणि त्यांच्या इराद्यांवर पाणी पडत असल्याचं आज दिसतंय. अशा काळात या चळवळीकडे तरुणांनी पाठ फिरविली. हे असं का घडलं? एकेकाळी ज्या चळवळीत हजारोंनी तरुण जात, त्या चळवळीची तरुणांना अॅलर्जी का वाटावी? तरुण या चळवळीकडे कसं बघतात? त्यांना या चळवळीचं, पक्ष संघटनांचं आकर्षण का वाटत नाही, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील शंभर प्रातिनिधिक तरुण तरुणींशी चर्चा केली. त्यांची मतं जाणून घेतली. हे तरुण कोकण, मुंबई, प. महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील आहेत. 20 ते 35 वयोगटातील हे तरुण समाजातल्या विविध धर्म व जाती-गटातले आहेत. कॉलेजात शिकणारे, शेती-व्यवसाय करणारे, विविध सेवा व्यवसायांतले, नोकरी करणारे, कॉम्प्युटर, मार्केटिंग अशा क्षेत्रांतील हे तरुण शहरं-खेडी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे आहेत. यांतले काही पुरोगामी चळवळीशी संपर्क असणारे आहेत. काही या चळवळींशी कधीही संपर्क न आलेले असे आहेत. पुरोगामी विचार चळवळींची तरुणांना अॅलर्जी का वाटतेय, याविषयी या तरुणांची जी मतं आहेत, ती इथे दिली आहेत. या मतांच्या आधारे अनुमान काढणं घाईचं होईल, कारण या तरुणांच्या संख्येचा आकडा तसा अगदी कमी आहे. मात्र काही ढोबळ मतं या चर्चेच्या आधारे मांडता येऊ शकतात. त्याआधारे तरुणांना पुरोगामी चळवळीचं आकर्षण का वाटत नाही. याबद्दलची कारणं कळायला मदत होऊ शकते.

तरुण न येण्याची कारणं

हर्षवर्धन जाधव हा पंचविशीतला एका कंपनीच्या उत्पादनाचं मार्केटिंग करणारा मुंबईतला तरुण. तो पुरोगामी चळवळीत तरुण का येत नाहीत याविषयी मत व्यक्त करताना म्हणतो, “आता माझंच बघा ना! मला स्वतःला चळवळीत काम करावंसं वाटतं. पण नोकरीमुळे वेळ मिळत नाही. नोकरी सोडून तर मी चळवळीचं काम करू शकत नाही. नोकरीशिवाय पोट कसं भरणार? माझे सर्व मित्र करिअर, पैसा महत्त्वाचं मानतात. मलाही तेच महत्त्वाचं वाटतं. पैसा नसेल तर आजच्या जगात कुणी कुणाला विचारत नाही. अगदी आई वडीलसुद्धा जास्ती पैसा कमावणार्या मुलांशीच चांगलं वागतात, अशी आज परिस्थिती आहे. नोकरी आहे. तर छोकरी मिळेल... लोक प्रतिष्ठा देतील, नातेवाईक विचारतील, असं आहे मी करियरवर जास्त लक्ष देतो. यातून वेळ मिळत नाही. मार्केटिंगच्या कामात कंपनीशीच लग्न लावून घ्यावं लागतं. कुटुंबासाठी, हौस-मौज करायलाच जर कमी वेळ मिळतो. तर चळवळीमध्ये कधी जाणार? समाजकार्य वगैरें कधी कसं करणार?" 

मार्केटिंगसारख्या व्यवसायात नोकरी करणारा, त्यात आकंठ बुडालेला आणि सामाजिक कामांना वेळच नसणारा हर्षवर्धन हा प्रातिनिधिक तरुण आहे. 1990 नंतर बाजार खुला होत जे नवे व्यवसाय विकसित झालेत, त्यांत नोकर्या करणार्यांची एक नवी जीवनशैली विकसित झाली. हे तरुण करिअर एके करिअर, असा विचार करतात. त्यांच्यावर जगण्याचा रेटाच इतका जबरदस्त आहे की त्याला सामोरं जाण्याशिवाय त्यांना दुसरा मार्गच दिसत नाहीए. हर्षवर्धनसारखे तरुण मोठ्या संख्येनं असं जगणं स्वीकारून त्या चक्रात जगत आहेत. आपल्याकडे चंगळवाद वाढतोय. त्याला स्वीकारीत हे चक्र सुरू आहे. या चक्रातल्या लोकांना स्वतःसाठीच वेळ नाही तर ते चळवळीला वेळ कसा देणार?

उपजीविकेचा प्रश्न

हर्षवर्धनसारखाच नोकरीच्या जंजाळात अडकलेला औरंगाबादचा विनय पाटील. तो कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काही दिवस संपर्कात आलेला. तो म्हणतो, "पुरोगामी चळवळीत जे लोक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या उपजीविकेविषयी काही विचार केलेला नसतो असं आढळतं. पूर्णवेळ कार्यकर्त्यांना मानधन देतात, पण ते अत्यल्प असतं. आज दोन-तीन माणसांच्या छोट्या कुटुंबाला दोन-अडीच हजार रुपये मानधन कसं पुरेल? पैशाअभावी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे हाल होतात. हे हाल जर इतर आसपासच्या तरुणांनी बघितले तर त्यांना पुरोगामी चळवळीत येऊन आपण बरबाद होऊ असं वाटतं. म्हणून माझ्यासारखे लोक या चळवळीपासून दूर पळाले तर चुकलं काय? याउलट, संघ परिवारातले लोक काही दिवस संघात वा त्यांच्या संघटना-संस्थांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय लावतात. अशा सोयी लावण्यासाठी त्यांनी बँका, विविध उद्योग, सेवाभावी संस्था, शाळा, कॉलेजेस यांची उभारणी केली आहे. पुरोगामी चळवळ यांपासून काही शिकली का? जर कार्यकर्त्याला असं वाटलं की, माझ्या उपजीविकेची काळजी संघटना घेतेय, तर तो त्या संघटनेसाठी झिजेलच ना? पुरोगाम्यांनी अशी खात्री किती तरुणांना दिली? तसं नसेल तर पुरोगाम्यांकडे तरुणांनी का यावं?"

कार्यकर्त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न पुरोगामी चळवळीतही नेहमीच कळीचा म्हणून चर्चेत असतो. शिवसेना, संघपरिवार, काँग्रेस छटांच्या संस्था- संघटना त्यांच्या विशिष्ट पद्धतीनं हा प्रश्न मार्गी लावतात. पुरोगाम्यांना मात्र हा प्रश्न सतत सतावत असतो. पुरोगामी नेत्यांनाही प्रामाणिकपणे आपल्या कार्यकर्त्यांना चांगलं जगता यावं, त्याचं कुटुंब सुखी राहावं असं वाटत असतं मात्र साधनांच्या अभावी ते जमत नाही असं दिसतं. यातून मार्ग कसा काढायचा, यावर हे नेते विचार करीत असणारच. मात्र अजूनही त्यांना तो मार्ग सापडलेला नाही, असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही.

शिवसेनेनं मुंबई व इतर ठिकाणीही कार्यकर्त्यांची सोय त्यांच्या पद्धतीनं केली. झुणका-भाकर केंद्रासारखे छोटे व्यवसाय सुरू करून देण्यापासून तर इतर विविध व्यवसाय धंद्यांना जागा मिळवून देण्यापर्यंत, कर्जाची सोय करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची काळजी या संघटनेनं घेतली असं दिसतं. त्यात अनेक गडबडी आहेत. तरी अशाप्रकारे ते लोकांना आकर्षित करत असतात. धरून ठेवतात. त्यात त्यांना यशही येतं.

काँग्रेसछटांच्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते घडविण्याची एक रूढ पद्धत आहे. ग्रामीण भागात या संघटनांचे साखर कारखाने, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग, दूध संघ, मार्केट कमिट्या, सहकारी बँका, शैक्षणिक संस्था असं घट्ट जाळं आहे. या जाळ्यात ते कार्यकर्त्या तरुणांना नोकऱ्या लावून जखडून ठेवतात. अगदी गावात काँग्रेसचा कार्यकर्ता कसा तयार होतो हे बघण्यासारखं आहे. काँग्रेसचा पुढारी स्पार्क असणाऱ्या तरुणाला ऊस लावायला सांगतो. साखर कारखाना, बँकांतून कर्ज देतो, यातून तो तरुण शेती-उद्योगाला लागतो. बाईक घेतो. घरात टीव्ही आणतो. सिमेंट काँक्रीटच्या घरात राहतो. जर्सी गाई पाळतो. डेअरीला दूध घालतो. हे करता करता तो काँग्रेसचा पंजा खिशाला लावतो आणि घट्ट कार्यकर्ता बनून जातो. हे समजून घेतलं तर कार्यकर्त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नाकडं पुरोगामी चळवळीनं गांभीर्यानं बघणं किती गरजेचं आहे, हे लक्षात यावं.

आत्मकेंद्रित नेतृत्व

सचिन आगवणे हा नागपूरचा स्वतःचा व्यवसाय करणारा तरुण. त्याचा पुरोगामी चळवळीशी संपर्क आहे. तो म्हणतो की, "पुरोगामी चळवळीत नव- नवे तरुण येत नाहीत कारण ही चळवळ आत्मकेंद्रित नेतृत्वाच्या पकडीत बंदिस्त होत आहे. अगोदरच ब्राह्मणी नेतृत्व. त्यात सगळे नेते मध्यमवर्गीय संस्कारातले. बहुतेकजण माझं चळवळीचं दुकान म्हणजे पूर्ण चळवळ असं मानणारे. त्यामुळे नेत्यांच्या अल्पसंतुष्ट, आत्मकेंद्री स्वभावाच्या मर्यादा पडून या चळवळीला अधोगतीकडे वाटचाल करावी लागत आहे. आज प्रत्येक तरुण विचार करतो. कोण नेता कसा, हे त्याला बरोबर कळतं. असे तरुण आत्मकेंद्रित नेत्यांच्या हातांखाली काम करणं कसं शक्य आहे? पुरोगामी चळवळीत विशेषतः समाजवादी चळवळीत ही आत्मकेंद्रीवृत्ती, टोकाचा, चळवळीस मारक असा व्यक्तीवाद हे दुखणं गंभीर आहे. ते समाजवादी नेत्यांमध्ये जुन्यांकडून नव्यांकडे संक्रमित होत असतं. संसर्गजन्य रोगासारखं हे दुखणं वाटावं अशी परिस्थिती आहे. अशा रोगाच्या संपर्कात तरुण स्वतःचं अस्तित्व, जगण्याचं सार्थक कसे शोधतील? म्हणून पुरोगामी चळवळीत तरुण का येत नाहीत, यांचा पुरोगामी नेत्यांनीच आत्मपरीक्षण करून स्वतःला सतत तपासत, नव्या काळाच्या संदर्भात जगत शोध घेतला पाहिजे."

नेतृत्वाबद्दलच्या मर्यादांवर बोलता बोलता सचिन समाजवाद्यांच्या संघटना दुर्बलतेकडे बोट दाखवतो. तो म्हणतो, "समाजवादी चळवळीतील माणसं सज्जन असतात. पण त्यांचा संघटनांवर विश्वास असावा की, नसावा अशी शंका मनात यावी, असं त्यांचं वर्तन असतं. म्हणजे ही माणसं विशेषतः त्या त्या ठिकाणचे नेते संघटना कमी महत्त्वाची मानतात आणि व्यक्तीला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे भक्कम संघटन होत नाही. संघटनांमध्ये जे नवे तरुण येतात त्यांच्या स्पष्ट वैचारिक जडणघडणीबद्दलही हे नेते बऱ्याचदा गांभीर्य दाखवत नाहीत, असा अनुभव आहे.

जड भाषा; उदास वातावरण 
विनोद सिरसाट हा पुण्यात शिकणारा नगरचा तरुण. त्याची मतं सचिनसारखीच आहेत. तो पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांच्या तरुणांशी संवाद साधण्याच्या भाषेबद्दल बोलतो. नव्यानं संघटनेत येणाऱ्या तरुणांशी पुरोगामी चळवळीतले नेते त्याच त्या विशिष्ट पठडीतल्यासारखं पांडित्यपूर्ण, अवघड भाषेत बोलतात. ही भाषा नव्यानं संघटनेत येणार्या तरुणांच्या ध्यानीमनी कोठेही नसते. त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टींचा- संकल्पनांचा स्पर्शही झालेला नसतो, त्या गोष्टी त्यांना सोप्या, खुसखुशीत सांगण्याऐवजी अवघड, कंटाळवाण्या, शुष्क भाषेत सांगून पुरोगामी नेते त्यांना चळवळीपासून एक प्रकारे पळवूनच लावतात. ही वस्तुस्थिती चळवळीला घातक ठरते. म्हणून पुरोगामी नेत्यांनी त्यांची भाषा मुळातून बदलवून ती तरुण पिढीशी काळानुरूप संवाद साधणारी ठेवणं गरजेचं आहे.

पुरोगाम्यांची शिबिरं, चर्चा, अभ्यासवर्ग, व्याख्यानं होतात. तिथंही या अवघड भाषेचा अनुभव अनेक तरुण घेतात. बहुतेक नेते, व्याख्याते हे जड बोलणारे असतात. अशा कार्यक्रमात प्रथम येणारे, नवे तरुण ही भाषा ऐकून कंटाळवाणं, उदास वातावरण बघून बिचकतात. असा अनुभव आल्याच विनोद सांगतो. 

यास्मीन शेख ही पुण्यातली तरुणी. तिच्या मते आज पुरोगामी चळवळीतल्या युवक-विद्यार्थी संघटना विद्यार्थी- तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडताना दिसत नाहीत. छोटी-मोठी आंदोलनं होतात. पण त्यांचा मुख्य प्रवाहातल्या तरुणांवर प्रभावही पडत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी एखादी संघटना सोडली तर तिचा तरुण माणसावर प्रभाव दिसत नाही. पूर्वी दलित पँथर, समाजवादी युवजन सभा, युक्रांद या संघटना आंदोलनं करत, त्यांचा महाराष्ट्रातल्या सर्व स्तरांतल्या विद्यार्थी- तरुण-तरुणींवर प्रभाव होता. आज अशी परिस्थिती आहे की अशा प्रकारच्या आंदोलनांची वानवाच दिसते. एकेकाळी संयुक्त महाराष्ट्र, नामांतर, आणीबाणी विरोध, या चळवळी पुरोगाम्यांनी संघटित केल्या. या आंदोलनांचा जनमानसांवर प्रभाव होता. या चळवळीत तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले. त्यातलेच काही पुढे नेते बनले. आज अशी स्थिती नाही. सध्या मुलं शाळा- कॉलेज आणि इतर सार्वजनिक उत्सवात ब्राह्मणी संस्कार स्वीकारतात. तरुणपणी बेकारी-विषमता या खाईची जाणीव होताच, त्यांना शिवसेना हे त्याच्यावरचं उत्तर वाटतं. कारण शिवसेना व त्या संघटनेचे नेते तरुणांशी वेगळ्या प्रकारे संवाद साधून त्यांची माथी भडकावतात. त्यातून त्या संघटनांकडे मोठ्या प्रमाणावर तरुण आकर्षित होतात. संघ परिवाराची, अ.भा.वि.प. सारखी विद्यार्थी संघटना सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं काम करत असते. सतत तरुण-तरुणींच्या संपर्कात असते. या संघटनेच्या या कामाच्या पद्धतीमुळे व तिच्याकडे असणाऱ्या साधनांच्या उपलब्धतेमुळे तरुणांची मोठी संख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर या संघटनेकडे नेहमी दिसून येते. मग पुरोगाम्यांना हे का जमू नये? संघ परिवाराची संस्कारभारती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पतित पावन संघटना या सतत तरुणांना आवडणाऱ्या उपक्रमांतून त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना संघटनेत ओढतात. पुण्यात ज्ञानप्रबोधिनी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ग्राहक पंचायत, चाणक्य मंडळ अशा संस्था तरुणांना संघविचार पाजून आपल्या चळवळीत ओढण्याचे काम सतत करत असतात.

संघ परिवाराचे विविध उपक्रम
वरील संस्थांपैकी संस्कारभारती या संघटनेच्या कार्यपद्धतीचा तर पुरोगाम्यांनी विशेष अभ्यास करण्याची गरज आहे. विविध सांस्कृतिक (त्यांच्या अर्थाचे) उपक्रम (उदा. रांगोळ्या काढणं, नाटकं, पथनाट्य, कलापथकं) या संस्थेमार्फत सुरू असतात. तरुणांना क्रेझ वाटेल अशा उपक्रमांतून, मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांतून ही संघटना संघ परिवारात तरुण-तरुणींना सतत ओढत असते. या प्रकारच्या फार कमी संघटना-संस्था पुरोगामी चळवळीकडे आहेत. या दृष्टीनं पुरोगाम्यांनी प्रयत्न करणं हिताचं राहील. पुरोगामी चळवळीत एकेकाळी जनवादी सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा होती. शाहीर अमर शेख यांचं कलापथक, राष्ट्र सेवादलाचं कलापथक होतं. विविध पुरोगामी पक्षांच्या जनसंघटनांकडे अशी कलापथकं, पथनाट्य ग्रूप असत. ती परंपरा आज जवळजवळ खंडित झालेली दिसते, असंही यास्मीन सांगते.

संघपरिवाराची समरसता मंच ही एक शाखा. या शाखेमार्फत तरुण लेखक, कवी, कथाकार घडविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जातात. याकडे सोलापूरचा रामप्रसाद नाईक हा तरुण लक्ष वेधतो. तो म्हणतो, पुरोगाम्यांनी असे उपक्रम का घेऊ नयेत? साहित्य व्यवहाराशी संबंधित तरुण यामुळे चळवळीकडे येऊ शकतात. अलीकडे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमार्फत तरुण लेखक-कवींना पुरोगामी चळवळीच्या व्यासपीठावर आणण्याचं काम सुरू आहे. असा एखादा अपवाद सोडला तर महाराष्ट्रव्यापी असं काम करताना कुणी दिसत नाही. अशी  खंत रामप्रसाद व्यक्त करतो. सांस्कृतिक उपक्रम, संगीत, साहित्य, खेळ, विविध कलाविष्कार या तरुणांना सतत आकर्षित करणार्या अंगांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यासारखी परिस्थिती आहे. याकडेही रामप्रसाद बोट दाखवतो.


ज्या शंभर तरुण-तरुणींशी पुरोगामी चळवळीत तरुण का येत नाहीत अशी चर्चा केली, त्यांतील बहुतेकांनी आपापली मते मांडली, जी महत्त्वाची मतं होती ती वर आली आहेतच. त्यातील इतर जणांची मतं वरील मतांसारखीच आहेत. इतर काही जणांना पुरोगामी चळवळ म्हणजे नेमकी कोणती चळवळ हे माहीतच नव्हतं. पुरोगामी संघटनांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती होती. पुरोगामी चळवळीबद्दल आम्हांला काहीही माहिती नाही असंही बऱ्याच जणांनी आडपडदा न ठेवता सांगितलं. ज्यांना पुरोगामी चळवळींबद्दल माहीत होतं, त्यांनी उदरनिर्वाहाचे प्रश्न बिकट होत असल्याने तरुण चळवळीत येत नाही; नोकरी शोधण्यात वेळ जातो; करिअरच्या मागे तरुण जातात; पैसा- केंद्रित जीवनामुळे सामाजिक बांधिलकीची तरुणांत वृत्ती नाही; चंगळवाद वाढल्याने समाजाबद्दल कुणाला काहीही देणंघेणं नाही; तरुण धार्मिक संघटनांकडे जात असल्यानं पुरोगामी चळवळीकडे येत नाहीत. संपूर्ण समाज व्यक्तीकेंद्री- स्वार्थ या मूल्याच्या भोवती घोटाळत असल्याने तरुण पिढी त्यात आकंठ बुडालेली आहे; यामुळे एकूण जगण्यातली शैली 'मी व माझे कुटुंब' इतकी संकुचित व उपभोगवादी बनलीय. या सर्व कारणांमुळे एकूणच ध्येयवाद ही गोष्ट टिंगलीचा विषय बनलीय. अशा तुकड्या तुकड्यांत तरुण तरुणींच्या प्रतिक्रिया आल्या. पुरोगामी चळवळीतले विचार व्यवहार, नेतृत्व, संघटन कार्यक्रम या मुद्यांकडेही काहींनी बोट दाखवून त्यांतील मर्यादा दाखवल्या.

विचारांची नव्या पद्धतीने मांडणी
तरुणांशी बोलताना आजचे तरुण तरुणी ध्येयवादाकडे, पुरोगामी चळवळीकडे का येत नाहीत, याविषयी जे. काही मुद्दे पुढे आले, त्याकडे तुकड्या तुकड्याने बघून चालणार नाही. आज जगभर माणसांच्या जीवनशैलीत मूलभूत बदल घडताना दिसत आहेत. जगण्याची शैली आमूलाग्र बदलत असताना कॉम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान ही ज्ञानाच्या विकासातली उपभोगातली महत्त्वाची साधनं बनली आहेत. सेवा, मनोरंजन, सुखाबद्दलच्या कल्पना ही क्षेत्र अधिक विस्तारत- व्यापक होत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या रेट्यात भारतही आकंठ बुडतोय. जग हे खेड़ होतंय की नाही, हे माहीत नाही पण संवादाच्या दृष्टीने जग कधी नव्हे इतकं, हाकेच्या अंतरावर आलंय. इंटरनेट, सॅटेलाईट टीव्ही आपल्या देशातही सर्वत्र व्यापला आहे. व्यापणार आहे. भारतीय माणसाला यामुळे जगभरची माणसं पहायला मिळतात. त्यांच्या रीतीभाती, कपडे, जगणं, संकटं दिसतात. या उलथापालथीमुळे आपली तरुण माणसं मुळातून बदलत आहेत. हे पुरोगाम्यांनी समजून घेतलं पाहिजे. यापुढच्या काळात भौतिक घटकांचा माणसांच्या जीवनावर प्रगाढ पगडा असणार; अशा काळात व्यवहार नावाची जादू महत्त्वाची ठरणार. म्हणून स्वप्नाळू कल्पना, त्या मांडणाऱ्या संघटना मुळात तरुणांना आकर्षित करूच शकणार नाहीत. हे बघितलं तर पुरोगाम्यांना त्यांच्या विचाराची मांडणी हे वास्तव मानस समजून घेऊन करावी लागणार हे उघड आहे. आज बहुतेक पुरोगामी मंडळी तरुणांना काय हवंय, यापेक्षा तरुणांना अमुक-तमूक हवं असलं पाहिजे अशी धारणा ठेवून तरुणांत काम करतात. त्यामुळे गल्लत होते. यामुळे होतं असं की, तरुणांना कदाचित वेगळंच काही हवं असावं आणि पुरोगामी वेगळंच बोलत असावेत असा विसंवाद होत आहे. की काय, असा अनुभव यावा अशी परिस्थिती आहे. तरुण संपन्न जीवन जगण्याच्या कल्पना घेऊन येतील; आणि त्यांना पुरोगामी जर अपरिग्रह हवा, सत्तेचा हव्यास नको, समाजासाठी कर्म करीत राहा. मात्र फळाची अपेक्षा धरू नका असं सांगतील, तर तिथे गोंधळ होतो. लोकांना हव्या असणाऱ्या गोष्टी जोवर पुरोगामी पुरवत होते तोवर पुरोगाम्यांची चलती होती. हे बघता आज ते जमत नाही म्हणूनच तरुण लोक पुरोगाम्यांपासून पळाले आणि... त्यांना पुरोगामी चळवळीची अॅलर्जी वाटू लागलीय की काय, असा निष्कर्ष कुणी काढला तर त्याचा विचार पुरोगाम्यांना करावा लागेल.

महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची बीजं नैसर्गिक म्हणता येतील इतकी घट्ट आहेत. ही चळवळ जातिभेदाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा, समतेचा संदेश देते. या अर्थाने ती संतांच्या आणि म.गांधी, फुले, आंबेडकरांचा वैचारिक जैविक वारसाच पुढे चालवते आहे. अशा महत्त्वाच्या चळवळीची कधी नव्हे एवढी गरज असताना तिला ओहोटी लागावी, तिची तरुणांना अॅलर्जी वाटावी असं काय घडतंय याचा शोध स्वतः पुरोगामीही घेत आहेतच. या लेखाच्या निमित्तानं तरुणांशी चर्चा करताना पुढे आलेले मुद्दे पुरोगाम्यांमध्येही चर्चेत असतात; नाही असे नाही. खरा प्रश्न आहे ही चळवळ वाढवण्यासाठी व चळवळीचं ध्येय गाठण्यासाठी तरुणांशी संवाद साधून त्यांना कार्यप्रवण करण्याचा. पुरोगामी नेते पक्ष-संघटना ते कसं करतात हे बघायला काही काळ वाट बघावी लागेल. त्यांनी तरुणांचे जथ्थे वाढवावेत. चळवळ वाढवावी. झडझडून कामाला लागावं. अशी या चळवळीशी निष्ठा असणार्या सगळ्यांचीच इच्छा आहे.
 

Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले रिपब्लिकन पार्टी प्रकाश आंबेडकर रामदास आठवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलित पॅंथर पुरोगामी चळवळ Dr. Babasaheb Ambedkar Mahatma Gandhi Mahatma Phule Republican Party Prakash Ambedkar Ramdas Athavale RSS Dalit Panther Progressive Movement weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके