डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी देशभरातल्या सेवा दल सैनिकांना जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं. त्यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांची 23 एप्रिल रोजी ऑनलाइन मीटिंग घेतली. देशातील 135 मान्यवर, कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवा दल सैनिक मैदानात उतरले.

कोरोनाविरोधात देश लढत असताना राष्ट्र सेवा दलाचे सैनिक मागे कसे राहतील?

अनिकेत लोहिया बीड जिल्ह्यात पुढे आले, त्यांनी ऑक्सिजनची सुविधा असलेली 600 हून अधिक बेड्‌सची दोन कोविड सेंटर्स उभी केली. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना त्यातून दिलासा मिळाला.

खान्देशात जळगावला प्रतिभा शिंदे सक्रिय झाल्या. त्यांनी 128 बेड्‌सचं मोफत कोविड हॉस्पिटल चालवलं. हजारो रुग्ण त्यातून बरे होऊन घरी गेलेत. कोकणात अभिजित हेगशेट्ये पुढे सरसावले. त्यांच्या पुढाकाराने संगमेश्वर, देवरूख इथं मातृमंदिर संस्थेच्या माध्यमातून 30 बेड्‌सचे कोविड सेंटर सुरू झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा मोठा आधार मिळाला.

ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली, ठाण्यात डॉ. राहुल घुले यांनी चार तात्पुरती कोविड हॉस्पिटल्स उभी केली. 2500 हून अधिक बेड्‌सची व्यवस्था केली. राहुल हे मुंबई छात्रभारतीचे माजी अध्यक्ष. विद्यार्थिदशेपासून चळवळे. कोविडकाळात अहोरात्र कार्यरत आहेत.

डॉ. अभिनय दरवडे यांनी धुळ्यात कमाल केली. पहिल्या कोरोनालाटेत त्यांनी यूपी, बिहारला पायी जात असलेल्या मजुरांसाठी धुळ्याच्या हायवेवर दवाखाना थाटला. डीहायड्रेट झालेल्या 28 हजार मजुरांना मोफत तपासून त्यांनी मोफत औषधं दिली. त्यांचे वडील सेवा दल सैनिक. सेवेचं बाळकडू घरातून मिळालं. गेली दोन वर्षे ते कोविडरुग्णांना, गरजूंना सेवा देत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी शिक्षकांना सोबत घेऊन ऑक्सिजन सुविधा असलेल्या 60 बेड्‌सचं कोविड हॉस्पिटल उभारलं. महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झाला आहे. अकोले हा आदिवासी तालुका. आदिवासी रुग्णांना त्याचा मोठा लाभ झाला. मुंबईत अरविंद सावला यांनी अंधेरीला छोटं पण सुसज्ज असं कोविड सेंटर उभं केलं.

राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी देशभरातल्या सेवा दल सैनिकांना जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं. त्यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांची 23 एप्रिल रोजी ऑनलाइन मीटिंग घेतली. देशातील 135 मान्यवर, कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवा दल सैनिक मैदानात उतरले.

राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत रोहित ढाले आणि त्यांच्या टीमने एक लाखाहून अधिक मजुरांपर्यंत शिधा पोचवला होता. अडीच कोटी रुपयांहून अधिक मदत उभी राहिली. देणगीदारांकडून वस्तुरूपाने ही मदत आली. तांदूळ, पीठ, चहा पावडर, मीठ, डाळी, तेल, मसाले यांचे सव्वा लाख किट्‌स वाटण्यात आले. मुंबईतील भायखळ्याचे उद्योजक फारूख शेख यांचा या मदतीत मोठा वाटा होता. रक्तदान शिबिरांसारखे उपक्रम रोहित ढाले आणि त्यांच्या टीमने मुंबईत राबविले आहेत. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांचे या टीमला सतत मार्गदर्शन मिळत होते.

गोरेगावात दीपक सोनवणे याने भाकर फाउंडेशनमार्फत लोकवस्तीत काम केले. सदाभाऊ मगदूम यांनी मिरज, सांगली परिसरात मोफत ॲम्ब्युलन्सची सोय करवून दिली. नंदुरबारमध्ये संगीता हिरालाल पाटील, संगमनेरमध्ये दत्ता ढगे व अनिकेत घुले, मालेगावात नचिकेत कोळपकर, नाशिकमध्ये समाधान बागुल, नितीन मते यांनी काम केले. समाधानचे बंधू तर कोविडने मृत्युमुखी पडले, तरीही ते कम्युनिटी किचनमार्फत रुग्णांना, नातेवाइकांना जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करीत राहिले. मालेगावात मुख्याध्यापक विकास मंडल यांचे पहिल्या लाटेत मदतकार्य करत असताना संसर्ग होऊन निधन झाले. नाशिकच्या अनिता पगारे अशाच गेल्या. नाशिक पोलीसदलात शिपाई असणाऱ्या छात्रभारतीत घडलेल्या नझीम शेखनं कर्ज काढून ऑक्सिजन मशीन घेतलं, परिसरातील कोरोना रुग्णांना ते विनामूल्य देण्यात येतं. इंदापूरला गफूरभाई सय्यद यांनी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला. अमरावतीतला अमोल भिसेकर, संदीप तडस, मत्या वाकोडे यांनी कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे पुरविले. नागपूरला अतुल देशमुख, रत्नाताई ढोरे यांनी जेवणाचे पॅकेट्‌स वाटले. पुण्यात राकेश नेवासकर, फैय्याज इनामदार, साधना शिंदे, दत्ता पाकीरे यांनी मदतकार्य केलं. येवल्यात दिनकर दाणे यांनी काम केलं. महाराष्ट्रातील या टीमला राज्य कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांचं मार्गदर्शन मिळतं.

डॉ. गणेश देवी यांच्या आवाहनानुसार ‘फ्रायडे फ्लेम’ हा उपक्रम सुरू झाला. 7 मे 2021 रोजी त्याची सुरुवात झाली. देशभरातील मान्यवर सायंकाळी 6 वाजता ऑनलाइन जमले होते. त्यात नृत्यांगना मल्लिका साराभाई, अभिनेत्री नंदिता दास, कन्हैय्याकुमार, कविता लंकेश, डॉ. बाबा आढाव, निखिल वागळे, इंदिरा जयसिंग, एअर मार्शल मतेश्वरन, जयंती घोष, अंतरा देव सेन, डॉ. झहीर काझी, जयंती नटराजन असे विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहत एक दिवा/ मेणबत्ती पेटवून सर्व मान्यवरांनी जैविक व वैचारिक कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. टागोरांना अपेक्षित ‘भीतिमुक्त भारता’साठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

त्यानंतर दि. 14 मे 2021 रोजी देशभरात कोरोनाकाळात बातम्या कव्हर करताना बळी पडलेल्या पत्रकारांना सहवेदना व्यक्त करत मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढण्याचा संकल्प झाला. त्यापुढच्या शुक्रवारी 21 मे रोजी ‘हम देखेंगे’ अशी थीम घेऊन ऑनलाइन कार्यक्रम झाला. त्यात माजी आयएएस अधिकारी, नागरिक हक्क चळवळीचे नेते हर्ष मंदेर, मॅगसेसे पुरस्कार विजेते, शेतकरी हक्क चळवळीचे नेते संदीप पांडे, धार्मिक सद्‌भावासाठी लढणारे, खुदाई खिदमतगार संघटनेचे नेते फैसल खान, अर्थतज्ज्ञ हेमंत शहा, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सद्‌गोपाल हे मान्यवर सहभागी झाले होते. मान्यवरांची भाषणं आणि चळवळीची गाणी असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. या वेळी सध्या गाजणारं कोविड महामारीत केंद्र सरकारचं अपयश वेशीवर टांगणारं गुजराती कवयित्री पारूल कक्कर यांचं ‘शववाहिनी गंगा’ हे असंतोषाचं गाणं सादर झालं. ‘हम देखेंगे’ ही फैज अहमद फैज यांची गजल आणि संभाजी भगत यांचं गाणंही या वेळी सर्वांची दाद घेऊन गेलं. राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त नितीन वैद्य यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं.

डॉ. गणेश देवी यांनी गेली दोन वर्षं देशभरातल्या 22 राज्यांत सेवा दल नेलं आहे. गुजरातमध्ये दक्षिण छाटा, रेखा चौधरी, हे कोविड मदतकार्यात पुढे आहेत. राजस्थानमध्ये मदन मीना हे सक्रिय आहेत. ओडिशात राष्ट्र सेवा दलाच्या विश्वस्त बानी मंजिरी दास कार्यरत आहेत. उत्तराखंडमध्ये जब्बारसिंह, जम्मू काश्मीरमध्ये मोहम्मद फारूख, यूपीमध्ये सुरेंद्रकुमार गौतम, नागालँडमध्ये चेनीथंग हमत्सो, मेघालयात ग्लाडविन हे काम करीत आहेत. याशिवाय अनेक सेवा दल सैनिक कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मदतकार्यात पुढे होते, आहेत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके