तुमची दुर्मिळ असलेली बालगीतेही त्या एका डायरीत मिळाली. चांगली दहाबारा तरी आहेत. त्यांत पावसावरचे गाणे आहे, चांदणीवरचे आहे. नाल्यावरचे आहे, फुलांवरचे आहे, शाळेवरचे आहे. आणि पाणी तापवण्याच्या बंबावरदेखील आहे!
प्रिय पूज्य साने गुरुजी.
मागच्या पत्रात मी तुमच्या एका डायरीत गवसलेल्या आल्हाददायक खजिन्याचा उल्लेख केलेला आहे. हा खजिना आहे तुम्ही लिहिलेल्या काही बालगीतांचा. ही काही बालगीते वाचली आणि गंमत वाटली. आनंदही झाला.
मी तुमच्या गोष्टी वाचल्या-ऐकल्या. पण राहून राहून वाटत होते, गुरुजींनी आपल्या लहानग्यांसाठी का नाही बरं खूप खूप गाणी लिहिली!
तुमच्या ‘पत्री’ काव्यसंग्रहात प्रामुख्याने देव आणि देश यांच्या भक्तिपर अशाच कविता आहेत. त्यांत एखादी लहानपणची आठवण सांगणारी चिमणीच्या पिलावरची अत्यंत हृदयंगम अशी कविता जशी आढळते तशीच ‘हस रे माझ्या मुला’सारखी अत्यंत सुंदर कविताही आढळते.
चिमणी येऊन
नाचुन बागडून
काय म्हणे मला
चिव चिव करीन
चिंता हरीन
हस रे माझ्या मुला...
चिमणी तर तुमची आवडती! बालपणी रामच्या वहीत त्याचा श्याम चिमणीचेच चित्र काढीत असे. होय ना? श्यामने म्हटलेच आहे. ‘’चिवचिव करणारी चिमुकली चिमणी मला फार आवडत असे. चिमणी हे नाव मला फार आवडते. मला अजूनही चिमण्यांकडे बघत राहावे असे वाटते. चिमण्यांकडे कधी कधी घटका घटका मी पाहात राहिलो आहे... अशी ही माझ्या जीवनात येऊन बसलेली चिमणी, माझ्या जीवनात संगीत व आनंद आणणारी ही चिमणी, तिचे चित्र मी रामच्या वहीत काढीत असे. शिक्षक तिकडे शिकवीत असत, परंतु मी माझ्या हृदयातील चिमणी तेथे चितारीत असे. मी साध्या चिमणीचे चित्र काढीत नसे, तर पिलांसाठी चोचीत चारा घेऊन जाणारी मायाळू चिमणी मी काढीत असे.’’आठवते ना गुरुजी हे?
तर चिमणी ही तुमच्या प्रेमळ वत्सल, मातृहृदयी भावनांचे प्रतीकच होती. चिमणीचे सारे लक्ष आपल्या पिलांकडे असते. तुम्हीदेखील चिमणीच्याच मायेने, ममतेने मुलांवर प्रेम केले. नानासाहेब गोरे यांनी तर तुम्हांला ‘बालवाडीचा माळी’ म्हटले आहे! नानासाहेबांनीही तुमच्याप्रमाणेच आपल्या शुभ्राला कशी छान छान पत्रे लिहिली. तुम्ही इकडून गेल्यावर तुमच्या सुधालाही त्यांनी किती हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते! तुमच्यासंबंधी शुभ्राच्या एका पत्रात नानासाहेबांनी लिहिले आहे, ‘गुरुजींच्या तोंडावरचे हसू हे मुलाला पोटाशी घेऊन आनंदाने ऊर भरून आलेल्या मातेचेच हसू आहे. तसेच ऊबदार, तसेच निष्कपट, तसेच सात्विक. गुरुजींच्या विचारात व आचारात, बोलण्यात व लिहिण्यात हा भातृभाव ओतप्रोत भरलेला होता. आणि त्या भावनेच्याद्वाराच ते सर्वांशी मैत्री साधीत. नाशिक तुरुंगात मला ते एकदा म्हणाले होते की, ‘’मी मित्र जोडतो ते तुमच्यासारखा वादविवाद करून नव्हे. माझे मार्ग निराळे मी पटकन जाऊन डोळे धरीन किंवा तो आजारी असला तर त्याचे पाय चेपीन. स्वयंपाकघरात जाऊन कोशिंबीर करू लागेन किंवा ताटेवाट्या मांडू लागेन. मी माणसांच्या डोक्यात नाही रिघत, त्यांच्या मनात रिघतो!’’ महाराष्ट्रातल्या हजारो, लाखो मुलांच्या आईची भूक गुरुजींनी भागवली.’
गुरुजी, तुमचे मोठेपण अनेक प्रकारे सांगता येईल, पण मुलात मूल होऊन जाण्याची जी किमया तुम्हाला साधली होती, त्यासाठी जी साधना तुम्ही केली असेल ती खरोखरच अपूर्व होती! सर्व तऱ्हेच्या प्रौढपणातही मनाचे बाल्य जपणे मोठी गोष्ट आहे. ती तुम्हाला सहजभाव झाली होती. यात तुमचे श्रेष्ठत्व आहे! तुम्ही मुलांना गोष्टी सांगत असा, तुमच्या तोंडून गोष्टी ऐकणे हादेखील केवढा आनंदाचा आगळा वेगळा अनुभव होता! कधी कधी तुम्ही मुलांमध्ये बसून एक गाणेही म्हणायचे :
आम्ही सारी लहान मुले ।
जैशी ताजी सुंदर फुले ॥
जैसे किरण तेजाळ ।
होऊ देवाचे लडिवाळ ॥
तर तुमची दुर्मिळ असलेली बालगीतेही त्या एका डायरीत मिळाली. चांगली दहाबारा तरी आहेत. त्यांत पावसावरचे गाणे आहे, चांदणीवरचे आहे. नाल्यावरचे आहे, फुलांवरचे आहे, शाळेवरचे आहे. आणि पाणी तापवण्याच्या बंबावरदेखील आहे! गुरुजी, तुमची ही बालगाणी त्या काळात रूढ असलेल्या बालगाण्यांसारखीच आहेत. आज बालगीतांहून किंवा बडबडगीतांहून ती अर्थातच वेगळी आहेत. ‘अगडबंब! दोंदिलपोट्या हा बंब!’ हे पाण्याच्या बंबाचे तुम्ही केलेले वर्णन मात्र गंमतशीर आहे. बंबाला तुम्ही चक्क ‘शुंभ’ म्हटले आहे! हे वाचून हसू फुटल्याशिवाय राहात नाही. ‘पाण्याचा बंब’नामक आठवतंय का हे गाणं? नाही तर हे पाहाच :
अगडबंब!
दोंदिलपोट्या हा बंब ।।
गरम घालतो आतुन बंडी
बाहेरिल ना लागे थंडी
थंड जळाला उकळी फोडी, न विलंब ॥ दोंदिलपोट्या ॥
खाइ निखारे हा रसरशित
घटघट वरुनी पाणी पीत
कढत अशी मग धार सोडित हा शुंभ ॥ दोंदिलपोट्या ॥
सारे काही याला पचते
तक्रार कधी याची नसते
रात्री थोड्याशा राखेत, जणु शिवसांब ॥ दोंदिलपोट्या ।।
जरि तापट हा कधि न रागवे
गरम तयाचे पाणी घ्यावे
थंड तयाला आपण द्यावे, शिर-लंब॥ दोंदिलपोट्या ||
तसंच हे दुसरे ‘समुद्र नि चंद्र’ नावाचं गाणं :
आकाशी वर शशी फुले ।
सागर खाली उचंबळे ॥
प्रचंड लाटा पहा तरी
धावत येती किती तरी
गणिती आला जरि मोठा
शकेल मोजू ना लाटा
नाचत नाचत धावत खेळत
येती गर्जत फेसांची उधळीत फुले ॥
समुद्र अन् या चंद्राचे
काय बरे नाचे साचे
इंदु जन्मला सिंधुतूनी
गोष्ट सांगती अशी जुनी
बघुन शशिमुख म्हणून अतिसुख
करीत कवतुक सागर खाली उचंबळे ॥
‘चांदणी’ वर लिहिलेले हे गाणे पाहा.
चमक धमक तू चमक चांदणी ।
चमकशि रात्री संतत गगनी ॥
कोट्यवधी तू कोस सुदूर
तरिहि तेज तव ये पृथ्वीवर
घडवि कसा तुज तो परमेश्वर
येईल कधीहि न आम्हां समजूनी ॥
मी भूवरुनी तुजला पाहिन
जाइन हृदयी आनंदून
सतेज निर्मळ सुंदर जीवन
करोन तुजसम निशिदिन झटून ॥
रवि मावळता हळूच येशी
गाजावाजा मुळी न करशी
प्रकाश अपुला जगासि देशी
परार्थ जीवन परार्थ करशी ॥
निशा संपुनी उषा उजळता
दिनमणि येता पर्वतमाथा
काम न उरले अपुले आता
समजुन जाशी निमूट निघूनी
आणखीन ‘वारा’ नावाचे तुम्ही लिहिलेले हे बालगीत आठवतंय का पाहा!
राहतोसी तू सांग कुठे वाऱ्या
कुठे रात्रंदिन मारिशी भराऱ्या ।
तुझे आम्हा दिसले न जरी रूप
दिसे रात्रंदिन हालचाल खूप ॥
वाहतोसी तू कधी मंद मंद
आणितोसी तु सवे पुष्पगंध ।
कधी शीतल सुखदायि गोड येशी
कधी अंगाला परी झोंबतोशी ।।
कधी डोलविशी वृक्षलता वेली
फुले फुलवीशी करिशि खेळिमेळी ।
हळूच पाण्याला करून गुदगुल्यांना
तरल उठवीशी गोड तरंगांना ॥
परि प्रेमळ नव वृत्ति कधी लोपे
सकल सृष्टीवर चित तुझे कोपे ।
गंमत होता हळुवार तुझा हात
परी अनुभव विपरीत असा येत ॥
करित घों घों येतोस अता वाऱ्या
भीति उपजे जगतास हा साऱ्या
मोडतोडीमधि मोद तुला वाटे
उठति लोकांच्या तनुवरी काटे ॥
सपासप आता मारिसी तडाखे
सकळ दुनिया भयभीत मनी धाके ।
धडाधड आता पाडितोसि झाडे
दणादण अमुची हाणिसी कवाडे ॥
पर्वतापरि उठवून चंड लाटा
करिसी करणी तू भीषणा अचाटा ।
कितिक बोटींते कितिक तारवांते
क्षणो नेशी तू अब्धिच्या तळाते ॥
ताप देशी कधी बनुन नारसिंह
कधी मंगल तू मधुर सौख्यवाह ।
कधी आणुन जलदांस दृष्टि देशी
कधी त्यांना तू नाहिसेच करिसी ॥
तुझ्या वर्णाव्या सांग किती लीला
स्थैर चंचल तू बंधन ना तुला ।
कसे सांभाळित तुला मायबाप
देत असशिल तू त्यांस फार ताप ॥
आणखीही काही आहेत संवादात्मकसुद्धा. पण इथं देत नाही. तुमची ही बालगाणी, तुमच्या अन्य अप्रसिद्ध साहित्याप्रमाणेच प्रसिद्ध व्हायला हवीत!
तुमचा
राजा
Tags: साने गुरुजी राजा मंगळवेढेकर Sane Guruji Raja Mangalwedhekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या