डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

पुरुषार्थी पुरुषांच्या चरित्रकथा सांगून-लिहून गुरुजींनी चरित्रांतून प्रेरणा व स्फूर्ती मुलांनी घ्यावी अशा तळमळीतून चरित्रकथनाचे व चरित्रलेखनाचे काम एका महान ध्येयदृष्टीने आयुष्यभर केले. गुरुजींनी लिहिलेली चरित्रे वाचून अनेक तरुणांनी, मुलामुलींनी स्फूर्ती घेतली आणि स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व समाज परिवर्तनाच्या कामात झोकून घेतले.

पूज्य साने गुरुजी यांचा पिंड मूलतः शिक्षकाचा होता. आणि या शिक्षकाच्या संदर्भात निसर्गानेच एक उदात्त चमत्कार करून ठेवलेला होता. तो असा की, गुरुजींच्या पुरुष प्रकृतीमध्ये किंबहुना मातृत्वाचे जोमदार कलम केलेले होते. त्यामुळे साने गुरुजींच्या मनातला स्वयंभू शिक्षक हा उत्कट मातृधर्मी बनलेला होता! 

खरं तर, शिक्षक हा मातृधर्मीय असावा लागतो. आपल्या भोवतालच्या मुलाबाळांवर किंवा विद्यार्थ्यांवर त्याचे मातेसमान प्रेम असावे लागते. मातेच्या जिव्हाळ्यानेच व आस्थेनेच या मातृधर्मी शिक्षकाने या चिमण्या जीवांचे बौद्धिक भरणपोषण करावयाचे असते. त्यांच्या कोवळ्या जीवनाला आकार द्यावयाचा असतो. त्या लहानग्यांमधूनच उद्याचा नागरिक सिद्ध करावयाचा असतो. साने गुरुजींच्या ठायी ही ममतेची दृष्टी आणि नवसर्जनशील निर्मिण्याची सृष्टी मोठ्या जोमाने वसत होती. अमळनेरच्या शाळेत ते केवळ 6 वर्षेच 'पी.एस. साने सर म्हणून होते. आणि त्याच वेळेस ते तेथील वसतिगृहाचे रेक्टरही. आत्यंतिक मातृधर्माने त्यांनी तिन्ही गोष्टी सांभाळल्या होत्या. शालेय अभ्यासक्रमानुसार गुरुजी वर्गात शिकवीत असत. पण शिकवण्याचे त्यांनी आपले स्वतंत्र असे तंत्रच बनवले होते. गुरुजी या तंत्रामुळे फार फार विद्यार्थिप्रिय बनले होते. 

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची तर प्रत्यक्ष आईच बनले होते ते! त्यांची दुखणीभाणी, त्यांचे रुसवे-फुगवे तर ते मायेच्या भाषेने दूर करत असतच, पण मुलांना चांगले वळण कसे लागेल, त्यांचे जीवन सद्गुणी कसे बनेल याची काळजी घेत असत आणि त्यासाठी निरनिराळे प्रयोगही करत असत.  लेखणी आणि वाणी ही दोन प्रभावी आयुधे गुरुजींना उपजतच लाभलेली होती. वाणीने ते मुलांना विविध तऱ्हेच्या संस्कारी गोष्टी सांगून, माहिती देऊन त्यांचे मनोरंजन करीत असत. तर लेखणीनेसुद्धा त्यांनी हेच कार्य मोठ्या प्रभावीपणाने त्या वेळेपासून सुरू ठेवलेले होते. दररोज पहाटे उठून वहीच्या आकाराची आठ-दहा पाने लिहून ते 'छात्रालय दैनिक' तयार करत असत. गोष्टी, गाणी, निबंध, सुभाषिते, सणांची माहिती, देशभक्तीपर व्याख्याने असा विविध तऱ्हेचा मजूकर ते या दैनिकातून देत असत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा ध्यासच गुरुजींना लागलेला होता. या ध्यासानेच त्यांचा श्वास अरक्षणी झाला होता. 'जे जे आपणांसी ठावे’, इतकेच नाही तर ‘जे आपणांसीही ठाऊक नाही ते ठाऊक करून ते पिलांना द्यावे,’ अशी त्यांची धडपड असे. छात्रालय दैनिकावर विद्यार्थ्यांच्या उड्या पडत असत. या दैनिकातून गुरुजींनी चरित्रात्मक निबंध, गोष्टीही लिहिल्या होत्या. या दैनिकाच्या लोकप्रियतेतूनच पुढे 'विद्यार्थी’ नावाचे छापील मासिक निघू लागले. या मासिकातही अनेक विषयांबरोबरच ज्ञानश्रेष्ठ नचिकेत, थोर राजा अशोक, स्वामी विवेकानंद, जतींद्रनाथ दास, प्रख्यात समाजसुधारक आगरकर, शिवरामपंत परांजपे, दे.भ.लालाजी. कवीश्वर रवींद्रनाथ टागोर, प्रख्यात शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रॉय आदी आदर्श महापुरुषांची चरित्रेही गुरुजींनी आपल्या रुचकर, सुलभ सोप्या आणि रसाळ भाषेत लिहिली होती. या काळात गुरुजींनी केलेला आणखी एक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी छोट्या चरित्रलेखनाचा. 

1925 साली गुरुजींनी लिहिलेले ‘ना. गोखले चरित्र' हे मोठे चरित्र प्रसिद्ध झाले होते आणि त्याला पारितोषिकही लाभलेले होते. त्याचसाठी देशबंधू  चित्तरंजन दास यांचेही विस्तृत चरित्र परिश्रमपूर्वक लिहिले होते. परंतु त्यास कोणी प्रकाशक भेटला नाही म्हणून बराच काळ स्वप्नसिद्ध अवस्थेत राहिले. पुढे 1944 साली सेवा दल चरित्रमालेत त्यांनी जी काही छोटी चरित्रे लिहिली, त्या मालेत देशबंधू दास नावाचे छोटे चरित्र प्रसिद्ध झाले. ‘सर आशुतोष मुखर्जी यांचे चरित्र व कार्य’ हेदेखील एक मोठे चरित्र गुरुजींनी लिहिले होते. तेही अप्रसिद्धच  राहिले. त्यानंतर गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी चरित्रे लिहावयाची पण ती मोठी व विस्तृत न लिहिता छोटी लिहायची असे ठरविले. त्यानुसार गुरुजींनी सुधारकांचे अग्रणी, विद्वानांचे शिरोमणी, सुधारकांचे राजे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे चरित्र लिहिले आणि त्यांचे प्रकाशनही स्वतःच केले. 1926 साली गुरुजींनी पुरातत्त्व भूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र लिहिले. या चरित्रास गुरुजींचे गुरू प्रा. द. वा. पोतदार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे की, माझे प्रिय शिक्षक राजमान्य साने यांनी ‘थोर पुरुषांची चरित्रे’ लिहून प्रसिद्ध करण्याचे मोठे स्तुत्य काम केले आहे. त्यांच्या गोखले चरित्राचा पुरस्कार करण्याचा मान त्यांनी मला दिला. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे चरित्र प्रसिद्ध केले आणि आज ते राजवाडे यांचे चरित्र प्रसिद्ध करीत आहेत. चरित्रलेखनाचे कार्य राष्ट्रशिक्षणास अत्यंत उपयुक्त आहे आणि रा. साने यांनी या शाखेत भर टाकण्याचे काम केले आहे, याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोर आहे. 

या पुढच्या काळात गुरुजींनी 'सुशीलकुमार घोष', 'बेंजामिन फ्रँकलिन' आणि 'कविवर्य रवींद्रनाथ टागोर’ अशी तीन छोटी चरित्रे लिहिली. या चरित्रांव्यतिरिक्त गुरुजींनी अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिराचे संस्थापक कै. सावळाराम मास्तर यांचे अल्पसे चरित्र लिहिले. याशिवाय सखाराम महाराज यांचेही एक छोटेसे चरित्र गुरुजींनी लिहिले होते. त्यांच्या चरित्रलेखात राष्ट्रीय दृष्टी दिसून येते. त्या काळी राष्ट्रीय लढ्याच्या आघाडीवर बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रामुख्याने होते. राजकीय व समाजसुधारक, क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक, पंडित इत्यादी लोकजागृतीच्या व समाजप्रबोधनाच्या विविध क्षेत्रांत या प्रांतातून कर्तृत्व गाजवीत होते. त्यांचे चरित्र व कार्य लहान-थोरांपुढे ठेवून त्यांना तशा कार्याची स्फूर्ती व प्रेरणा मिळावी हाथ चरित्र लिहिण्यामागचा उद्देश होता. एक राष्ट्रीय कार्य म्हणून त्यांनी चरित्रलेखन केले.

या राष्ट्रकार्यात त्यांनी पुढे गोष्टीरूप गांधीजी, विनोबा भावे, श्री. शिवराय, महात्मा गौतम बुद्ध, आपले नेहरू, लोकमान्य टिळक, भगवान श्रीकृष्ण, इस्लामी संस्कृती (खंड 1 मोहम्मद पैगंबर चरित्र), महात्मा गांधी दर्शन आणि बापूजींच्या गोड गोष्टी (भाग 1 ते 6) अशी छोटी छोटी चरित्रे लिहिली होती.गुरुजींचा आणि गांधीजींचा अतूट असा भावबंध होता आणि म्हणूनच गुरुजींनी गांधींविषयी भरभरून लिहिले आहे. गुरुजींच्या जीवनाची सर्व जगाशी एकरूप होण्याची तगमग, गरिबांमधूनच ईश्वराचे दर्शन होणार, तोच जनार्दन अशी त्यांची भावना आणि गांधीजींच्या जीवनातली सामान्य जनतेशी एकरूप होण्याची तळमळ पाहून गुरुजी गांधीजींकडे आकर्षिले गेले होते. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘‘एक परार्धांश गांधी, एक परार्धांश रवींद्रनाथ टागोर आणि एक परार्धांश रामकृष्ण परमहंस माझ्या जीवनात उत्तरोत.’’ सेवा, कला आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम त्यांना अपेक्षित होता. 

राष्ट्र सेवा दलातील सेवकांना बौद्धिक शिदोरी म्हणून एक चरित्रमाला लिहिण्याचे ठरविले होते. या संकल्पात 'चले जाव’च्या लढ्यात ते कारावासात असताना त्यांनी ह्या चरित्रलेखनास सुरुवात केली होती. विनोबाजी भावे हे छोटे चरित्र त्यांनी कारागृहात लिहिले. या पुस्तकाच्या सुरुवातीस गुरुती जे 'दोन शब्द' लिहिले आहेत, त्यांत त्यांनी म्हटले आहे. "हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणारी कोणती संस्था? कोण मरत आहे? झिजत आहे? त्या काँग्रेसविषयी कोणाला प्रेम वाटणार नाही? अभिमान वाटणार नाही? क्षुद्र भांडणे दूर ठेवून हिंदुस्थानातील सर्व जातिजमातींचे निरपेक्ष बुद्धीने हित पाहणारी ही काँग्रेसच आहे. अखंड हिंदुस्थान हे काँग्रेसचे ध्येय आहे. काँग्रेस सर्वांना येथे सुखाने नांदू पाहते. अशा या काँग्रेस प्रेम व निष्ठा बाळगणाऱ्यांची सेवा दल ही संस्था आहे. सर्व मुलामुलींनी तरुण-तरुणींनी राष्ट्र सेवा दलात यावे, लहानांनी यावे. मोठ्यांनी यावे, विद्यार्थ्यांनी यावे. प्रौढांनी यावे, खेड्यातील जनतेने-शहरातील जनतेने यावे, शहरातील बंधू-भगिनींनी यावे. सेवा दलात आपली मुले आईबापांनी पाठवावीत. आईबापांनी दलाच्या क्रीडांगणावर जावे. मुलांना उत्साह द्यावा. शाळेतील शिक्षकांनी सेवा दलातील ध्येय घ्यावे. संकुचित जात्यंधतेचा व धर्माचा प्रचार करून पालकांनी व शिक्षकांनी मुलांची मने बिघडवू नयेत. ते पाप आहे.

"सेवा दलातील मुलामुलींना उदात्त विचार द्यायला हवेत, स्वस्त व सुंदर, उदार व उदात्त असे वाङ्मय त्यांच्यासाठी हवे, त्यासाठी सुंदर सुंदर गीते हवीत, संवाद हवेत. सर्व प्रकारचे वादसंवाद समजावून देणारी सोपी पुस्तके हवीत. कितीतरी काम आहे. योग्य माणसांनी, अधिकारी व्यक्तींनी सेवा दलासाठी प्रभावी वाङ्मय निर्मिले पाहिजे. तोपर्यंत अंधारात बसून मी माझी चिमणी लेखणी चालवीत राहीन, सेवा दलासाठी बिळात बसून चरित्रे लिहीत होतो. ही छोटी चरित्रे गोष्टीरूपच मी सांगणार आहे." आधुनिक महाराष्ट्रात मुले तिथे मुलांची गोष्ट, असे एक समीकरण गुरुजींनीच रूढ केले होते. मुलांच्या गोष्टीत त्यांचे जीवन संस्कारित करण्याची, त्यांना चारित्र्यवान बनविण्याची केवढी मोठी ताकद आहे याचे भान गुरुजींना होते आणि म्हणूनच त्यांनी मुलांना त्यांचे मनोरंजन करता करता त्यांचे जीवन चरित्र घडविण्याचा कळकळीने प्रयत्न केला. साने गुरुजींनी राष्ट्रकार्यात आणि समाजकार्यात हिरीरीने भाग घेऊन मोठमोठाली कामे पार पाडली. पण ही मोठाली कामे पार पाडत असतानासुद्धा प्रवासात वा तुरुंगात असतानासुद्धा त्याच्या चित्तापुढले महान मूल कधी ढळलेले नव्हते. तुरुंगातही तरुण सत्याग्रहींना गोष्टी सांगितल्या आणि बाहेरच्या असंख्य मुलांसाठी गोष्टी लिहिल्या.

या गोष्टी विविध प्रकारच्या आहेत. यात प्रामुख्याने चरित्रकथादेखील आहेत. पुरुषार्थी पुरुषांच्या चरित्रकथा सांगून लिहून गुरुजींनी चरित्रांतून प्रेरणा व स्फूर्ती मुलांनी घ्यावी अशा तळमळीतून चरित्रकथनाचे व चरित्रलेखनाचे काम एका महान ध्येयदृष्टीने आयुष्यभर केले. गुरुजींच्या ह्या प्रयत्नाला चांगलेच फळ त्या काळात लाभले होते. गुरुजींनी लिहिलेली चरित्रे वाचून अनेक तरुणांनी, मुलामुलींनी स्फूर्ती घेतली आणि स्वतःला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व समाजपरिवर्तनाच्या कामात झोकून घेतले. कितीतरी तरुण जिवावर उदार होऊन बेचाळीसच्या क्रांतीत सामील झाले. ब्रिटिश राज्ययंत्राला खीळ घालण्यासाठी अनेक धाडसाची कामे त्यांनी केली. बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. काही धारातीर्थी पडले. साहित्यातील सामर्थ्याची प्रचिती त्या काळी गुरुजींच्या साहित्यातून समाजाला आलेली होती. गुरुर्जीच्या साहित्यातून स्फूर्ती घेऊन कितीतरी तरुणांनी स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या निरलसतेने अद्यापपावेतो समाजकार्ये व देशसेवा चालूच ठेवली आहे. त्यांतील कोणी शाळा चालवत आहे, कोणी वाचनालये काढली आहेत. कोणी ग्रामीण भागात दवाखाने उघडले आहेत. कोणी श्रमदानात गुंतले आहेत. कोणी कथाकथनात रंगले आहेत. कोणी राष्ट्रीय गीतांनी व पोवाड्यांनी वातावरण ऊर्जस्वल बनविले आहे....

अशा नाना तऱ्हेने सेवेच्या क्षेत्रात गुरुजींची धडपडणारी मुले अव्याहत सद्भावनेने धडपडत आहेत. 'साने गुरुजींचे साहित्य' याविषयी लिहिताना आचार्य भागवत यांनी असे म्हटले आहे की, आधुनिक काळी महाराष्ट्रात समाजजीवनाशी सर्वांशाने समरस झालेला असा साहित्यकार कोण आहे? असा प्रश्न विचारल्यास साने गुरुजींकडे कोणीही बोट दाखवावे लागेल. महाराष्ट्रातील पहिला सत्याग्रही, साहित्य निर्माता म्हणून साने गुरुजींचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात चिरकाल प्रकाशात राहील! - श्री. ना. ग. गोरे यांनी म्हटले आहे की, आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास लिहिताना जनतेसाठी आपले अंतःकरण पिळून लिहिणारा एकच एक सारस्वत म्हणून गुरुजींचे नाव लिहावे लागेल.  - गुरुजींच्या लेखन-यशाचे मर्म त्यांच्या ठायी असलेल्या अंतरीच्या उदात्त उमाळ्यातच आहे. गुरुजी हा माणूस उदात्त उमाळ्याचा होता. हा उमाळा उपजतच असतो. तो विकत किंवा उसना घेता येत नाही. गुरुजींचे चरित्रलेखनही याच उदात्त उमाळ्यातून झालेले आहे आणि आजही ते तरुणांना दीपस्तंभासारखे प्रेरणा व स्फूर्ती देत आहे.
 

Tags: उद्याचा सुजाण नागरिक मुलांवर संस्कार उदात्त हेतू चरित्रलेखन tommorrows citizen साने गुरुजी rites on kids noble intension character writing sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके