डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला माहीत आहे, मी शंभर टक्के नास्तिक आहे. पापपुण्याच्या तथाकथित आध्यात्मिक संकल्पनांची व्यर्थता जाणतो. शुभ- अशुभाची टर उडवतो. दैव, नशीब यांतला पोकळपणा समजतो पण आई म्हणायची, ‘माझा राजा सगळ्यांत हुषार आहे. पण त्याच्या हाताला यश नाही.’ या वाक्याचा मला आईसकट खूप संताप यायचा. खूप ओरडायचो. मग आई एखाद्या घाबरलेल्या लहान मुलीसारखी गप्प बसून राहायची

हॉस्पिटलच्या वऱ्हांड्यात आई व्हीलचेअरवर स्थिर, मूक, शांत बसलीय. मी तिला अस्वस्थ स्तब्धतेनं न्याहाळतोय. ती माझ्यावर डोळे स्थिरावून, पण तिची नजर मला भेदून आरपार दूर कुठेतरी दिगंतात. स्वतःचा अंतबिंदू शोधतेय की माझी प्रवासरेषा? आई! मी खूप घाबरलोय गं! मघापर्यंत तुझी नजर पाठराखिणीसारखी माझ्या अवघ्या अस्तित्वाला वेढून होती.

आता मात्र माझा देहही पोकळ झालाय, तुझी नजर आरपारून जाण्याइतका. माझ्यापासून अवघ्या तीन हातांवर तू आहेस, पण ते तीन हात अंतर आता मिटणार नाही कधीच, या भयानं व्यापलंय मला.

मघापर्यंत मी किती बिनधास्त, बेभान होतो. जगातल्या कुठल्याही समस्येला, संकटाला, आव्हानाला झेलण्याइतका मी सक्षम होतो (म्हणजे आहे) असा समज होता माझा काठोकाठ. सगे-सोयरे, आप्त, कुणीही राहिलं नाही सोबत तरी मी ‘एकटा’ समर्थ आहे अशा बुलंद आत्मविश्वासाच्या हवेनं भरलेली माझी टिचभर छाती. स्वतःच्या कर्तृत्वाची चढलेली एक आंधळी नशा.

पण या क्षणी तुझी नजर मला कळतेय, शोधतेय स्वतःचा अंतबिंदू, तेव्हा मी पार लोळागोळा होऊन गेलोय बघ! माझ्या सगळ्या घमेंडी सामर्थ्याचा मूलाधार, ऊर्जा तू होतीस या कठोर सत्याची जाणीव मला होते आहे.

मी किती दुबळा, असहाय, एकाकी आहे. तुझ्या निघण्याच्या तयारीपेक्षा ही जाणीव मला भयभीत करते आहे. तुझ्या अंतबिंदूच्या शोधाचा माझ्यासाठी हा भयकारी अन्वयार्थ आहे...

0 0

‘‘शिकलो असतो तर मीबी बालिस्टर झालो असतो.’’ कधीकधी आपल्या विद्वान, पुस्तकवेड्या आणि म्हणूनच चारचौघांवेगळ्या विक्षिप्त वाटणाऱ्या आपल्या प्राध्यापक नवऱ्याशी टुकीनं संसार करताना तिच्या सामान्य अपेक्षांचीही पूर्ती झाली नाही की त्राग्यानं म्हणायची.

डोक्यावरून तेल वाहून गावोगावच्या बाजारात विक्री करणाऱ्या खात्यापित्या पण कष्टकरी कुटुंबातून ती आलेली. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर घरातली आईनंतर एकुलती एक बाई म्हणून ‘चुली’ला परंपरेने दत्तक गेलेली. त्या दहाव्या अकराव्या वर्षीच आपल्या धाकट्या भावडांना सांभाळणारी ‘आक्का’ झाली. ‘घर सांभाळण्या’च्या बिरुदाखाली स्वयंपाक, धुणी-भांडी आणि घरातल्या लहानमोठ्या पुरुषांची हरकामी कामवाली झाली. 

मग पुरोगामी विचाराच्या प्राध्यापकाशी लग्न झाल्यानंतरही तिच्या या भूमिकेत काही फरक पडला नाही. सर्वच पारंपरिक भारतीय स्त्रियांप्रमाणे ती स्वतःचं अस्तित्व मुलाबाळांमध्ये शोधत जगली.

नवऱ्याच्या घरात तर सारं पुस्तकांचंच राज्य. लग्न झालं तेव्हा आप्पा शिकतच होते. शिक्षकाची नोकरीही करत होते. पुस्तकांनी जागं केलेलं सामाजिक भान त्यांना त्यांच्या पटलेल्या विचारांच्या समाजकारण-राजकारणात मग्न ठेवत होते.

स्त्रिया पददलित आहेत, पुरुषप्रधानतेच्या बळी आहेत वगैरे त्यांनी पुस्तकांतून पटवून घेतलं होतं. आपल्या सहकाऱ्यांबरोबर- स्त्री सहकाऱ्यांबरोबरही- ते याच्या समर्थनार्थ वाद घालत, सार्वजनिक सभासमारंभात भाषणं करीत. त्यांनी कधी आईला मारण्याचा पुरुषीपणा केला नाही. तिनं  कुठली वस्तू हवी-नको म्हटलं, त्याला अटकाव केला नाही. तिच्या आजारपणाच्या खर्चावर कधी कात्री लावली नाही. तिच्या भावंडांना मदत करायला नाही म्हटलं नाही.

या बदल्यात तिनं आप्पांची कधी गैरसोय होऊ दिली नाही. दिवसभरातच काय, रात्री दोन वाजताही म्हणतील तेवढा चहा, आणतील तेवढ्या पाहुण्यांचं जेवण, बाजारहाट, घरातल्यांची आजारपणं, घराची साफसफाई, नवरा देईल तेवढ्या पैशात घरखर्च आणि नवऱ्याचा अस्ताव्यस्तपणा पुन्हापुन्हा सुव्यवस्थित करण्याची सरबराई. शिवाय आम्हा पाच (खरं तर सहा- आई म्हणायची, ‘पहिला डाव देवाला दिला.’) भावंडांना जन्म देऊन आमचा अजूनही सांभाळ...

आप्पा स्त्री-मुक्तीचे समर्थक होते. आई अधूनमधून म्हणायची, ‘बाईचा जन्म शेजं-भोजंपुरताच रे बाबा!’ ती घराचं बाईपण निभवत होती. आम्ही तिचं आईपण मिरवत होतो.

0 0

वाचायला सुरुवात झाली आणि आम्ही संस्कारक्षम वयाचे झालो असावे बहुतेक. कारण वाचनप्रिय आप्पांना माहिती होतं ‘सर्वोत्तम संस्कार पुस्तकांनी होतात.’ त्यांनी ‘श्यामची आई’ वाचायला दिलं. आम्ही सर्व भावंडांनी वयोज्येष्ठतेनुसार ओळीनं वाचलं.

आईनंही वाचलं. म्हणाली, ‘भाड्यांनो, जरा घ्या काही यातली अक्कल.’ आईनं बहुधा ‘आईचा श्याम’ वाचला असावा तिला आम्ही ‘श्याम’ व्हावंसं वाटलं असावं. आम्हांला मात्र नक्कीच ती श्यामची ‘आई’ व्हावी असं वाटलं नाही.

आमच्या वाढण्याला तिचं स्वतःचं आईपण पुरेसं होतं. नव्हे, पुरून उरणारं होतं. तिचा मार खात होतो. अभ्यासाचा त्रागा सोसून घेत होतो. प्रसंगी त्यासाठी शिव्याही खात होतो. कारण आईला आम्ही आम्हांला हवं असलेलं काहीही मागू शकत होतो, सांगू शकत होतो, हव्या त्या गोष्टींचा हट्ट करू शकत होतो, मागणी पूर्ण होईपर्यंत लावून धरू शकत होतो.

खरं सांगायचं तर आईला आम्ही मुळीच भीत नव्हतो. मात्र आप्पांच्या रागाच्या नुसतं आठवणीनं थरकापायचो. आई आमचा हक्क होती. आप्पा मेहेरबानी. आम्हां कुणाही भावंडांना श्यामच्या आईची मातबरी वाटली नाही हे खरंय.

आम्ही भावंडं आपापसात (आज लुटुपुटीची वाटतात पण त्या वेळी अगदी मनापासून) भांडत, मारामाऱ्या करतच वाढलो. पण आजही आमच्यात जी एक अदृश्य घट्ट ओढ आहे एकमेकांबद्दल, त्यालाच संगोपन म्हणतात बहुतेक. आणि हे संगोपन आईशिवाय कुणाला शक्य आहे?

आई हा या नात्याचा केंद्रबिंदू आणि परीघही आहे. या केंद्रबिंदूभोवतीच्या अवकाशाला कवेत घेणारा. आईनं कधी तोंडानं ‘माझा बाळ’ म्हटलेलं आठवत नाही, पण तिनं दिलेला प्रत्येक घास ‘माझ्या बाळासाठीच’ असा गजर मात्र देहभर करतो आताही. आमचं वाढणं, आईशिवाय शक्यच नव्हतं या जगात!

0 0

आई ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरून आली होती, ते जग खेडवळ, अडाणी, पोटाच्या फिकिरीत जीवघेणं राबणाऱ्या माणसांचं होतं. जगण्याच्या धडपडीतून येणारा साळढाळपणा, रांगडेपणा पुरेपूर होता. श्रमासाठी लागणाऱ्या मोकळ्या शारीर हालचालींपासून, केवळ संवादासाठी नव्हे तर भावनांच्या मोकळिकीसाठी भाषेचा सैलपणा या दुनियेत होता.

आई नवऱ्याच्या पांढरपेशा जगात जेव्हा प्रवेशली असेल तेव्हा ठाऊक नाही की बावरली असेल, भांबावली असेल की गोंधळून गेली असेल? कारण या तथाकथित सभ्य पांढरपेशा जगात सुसंस्कृततेच्या नावाखाली भाषेपासून हालचालीपर्यंत साऱ्याच स्वातंत्र्याचा काटेकोर संकोच.

पण जेव्हापासून आई आठवतेय, या दोन्ही जगांत ती अगदी लीलया वावरायची. आप्पांच्या वर्तुळातील सारेच तसे उच्चभ्रू वगैरे स्तरांतले. त्यांच्या बायकाही आईच्या मानाने ‘उच्चशिक्षित’ आणि म्हणून उंचावरच्या. पण आई त्यांच्यात मिसळून इतकी सराईत बोलायची की आम्हा मुलांना आपली आई या सर्व करकरीत काकूंमध्ये अगदीच ‘आगंतुक’ आहे असं कधी पुसट जाणवलंही नाही. इतकं बेमालूम तिचं निरीक्षण आणि मग त्याची अचूक नक्कल. आईचा हा अद्वितीय गुण आता लक्षात येतोय.

याचंच विकसित रूप म्हणजे तिचं ‘सुगरणपण’, जो या बाकीच्या आमच्या करकरीत काकूंनाही निःसंशय वरचढ होता. आई नवेनवे पदार्थ त्या पदार्थांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांसह असे अस्सल बनवायची की तिच्या प्रादेशिकतेबद्दल खाणाऱ्यांच्या पैजा.

कधीही (अगदी पिढ्यान्‌पिढ्या) मांसाहार न केलेल्या आईचं मांस-मच्छी बनवणं तर तिच्या शाकाहारी असण्यावर आणि पार्श्वभूमीवरही शंकेची मोहोर उठवायचं.

खाद्यपदार्थ बनवताना कलावंताची एकतानता, संशोधकाची चिकित्सा, गणितज्ज्ञाचा काटेकोरपणा, तत्त्वज्ञाची सत्यान्वेषिता तर कार्यकर्त्यांची बांधिलकी असावी लागते. हे तिनं कधी तोंडानं सांगितलं नाही. पण ती एखादा पदार्थ बनवायला लागली की या साऱ्या वृत्ती एक समयावच्छेदेकरून प्रकट व्हायच्या.

तिचं सर्वोत्तम वैशिष्ट्य हे की पदार्थ बनवताना त्याला आवश्यक ते सर्व घटक पुरेसे नसले वा त्यांतील काहींचा अभाव असला तरी चव मात्र त्या पदार्थाचं व्यक्तित्व घेऊनच. किंबहुना काकणभर चढच. त्यामुळे आप्पांचा चवदार मधुमेह, आम्हा पोरांच्या आणि साऱ्यांच्या चवचाल जिभा तिनं याच ‘चवी’नं सांभाळल्या.

तिच्या पाककौशल्याबद्दल एवढं सारं आठवतोय, कारण दोन परस्परविरोधी जगात जगताना तिनं साऱ्याचा कसा मेळ घातला, सगळं जगणं ‘चवदार’ कसं केलं, याचा शोध घेतोय.

एका उच्चभ्रू जगात राहूनही आमची नाळ तिनं सहजपणे तळागाळातल्या  कष्टकरी वर्गाशी बांधून ठेवली. आप्पा पुस्तकांच्या विश्वात होते. सामाजिक चळवळीत होते. आम्ही पुस्तकांचे नादी झालो. सामाजिक चळवळखोर झालो.

पण आईनं आम्हांला माणसांशी, विविध संस्कृतींनी आणि सामाजिक स्तरांनी लपेटलेली असूनही अगदी अस्सल माणसांशी, जोडून ठेवलं. तिच्या स्वयंपाकात, संगोपनात आणि जगण्यात हेच एकमेव महत्त्वाचं सूत्र असावं. पदार्थ दिसण्यावरून नाही, चवीवरून समजतो.

0 0

इतर सर्वच नवरा-बायकोंसारखं आई-आप्पा भांडायचे. अगदी कडाडून भांडायचे. आप्पा संतापाने मुसमुसायचे, आई असहायतेने मुसमुसायची. आम्ही मुलं अशा वेळी एका प्रचंड तणावाखाली चिडीचूप.

मी आता सारखं आठवून पाहतोयं, काय विषय असायचे त्यांच्या भांडणाचे? स्मरणशक्तीला खूप ताण देऊनसुद्धा खरंच आठवत नाहीत त्यांच्या भांडणांची कारणं! घरात अमुक नाही, तमुक नाही, माझी मेलीची हौसच पुरवली जात नाही, तुमचं घराकडं लक्षच नाही वगैरे वाक्यं तर चुकूनसुद्धा आईच्या तोंडून ऐकलेली मला आठवत नाहीत.

केवळ आप्पांच्या पगारात आई सात अधिक माहेरचा एखादा भाऊ अधिक दररोजच्या पाहुण्यांचा संसार कसाबसा नव्हे तर ‘श्रीमंती’ वाटावा असा चालवत होती. आप्पांच्या काळात मास्तरांना पगारही कसाबसा गडी जगावा एवढाच.

त्यात सवत वाटावी असा आप्पांचा पुस्तक खरेदीचा सोस. आईच्या दृष्टीने सोन्याच्या भावाने घेतलेली रद्दी. पण आईने आप्पांच्या या वेडाचा दुस्वासही कधी केला नाही. आपला नवरा संसारोपयोगी खर्च करत नसला तरी अयोग्य वा अनाठायी खर्च करत नाही एवढा विश्वास तिला पुरेसा होता.

आपल्यातल्याच एका सहकारी प्राध्यापक गटावर अन्याय होतोय असं दिसल्यावर स्वतःचा थेट काही एक संबंध नसताना आप्पांनी संस्थेशी संघर्ष घेत आंदोलनात उडी घेतली. वर्ष-दीडवर्ष संप चालू. पगार बंद.

खूपच धकाधकीचा आणि ओढाताणीचा, कस पाहणारा काळ असेल तो. पण आम्हां मुलांना हे त्या वेळी काहीच कळलं नाही, इतकं सगळं आमचं छान चालल होतं. त्या काळात घर चालवण्यासाठी आई- आप्पांनी काय त्रास सोसला असेल या कल्पनेनेच माझा आताचा वर्तमान भेदरतो.

त्या काळात ही दोघं भांडलेलीही स्मरत नाही. आप्पा तो संघर्ष जिंकले; इतिहास बनले. जगाला माहीत झाले. पण तो इतिहास बनायला आई पायाचा दगड झाली हे आप्पांनी तरी लक्षात ठेवलं असेल का?

आप्पा कधीच आमच्यावर चिडले नाहीत. कधी रागानं बोटदेखील लावलं नाही. आई वेळप्रसंगी धबाधब रपाटे घालायची, पण भीती मात्र आप्पांचीच वाटायची.

आमच्यावर चिडली की आई सर्वच आयांसारखी एक वाक्य हटकून ऐकवायची, ‘‘सगळीच कशी बापाच्या वळणावर गेलाय रे?’’

आई, आमचं तुझ्याशी वागणं पुरुषांसारखंच होतं का गं मग? तुमच्या भांडणासारखाच हा सवालही आता अनाकलनीय झाला बघ.

0 0

विद्यार्थी वयात चळवळ म्हणजे एक बेजबाबदार उद्योग असतो खरं तर. कारण आम्ही जो अन्याय समजून लढा लढवत असतो, तो लढताना आपण कुणावर तरी सर्वस्वी विसंबून हे करतोय याचं खचितच आपल्याला भान नसतं किंवा तसं भान असण्याइतकी अक्कलही नसते आलेली, हे अधिक खरंय!

नाही तर दिवसाच्या चोवीस तासांत कधीही आठ-दहा समवयस्क ‘कार्यकर्ता’ मित्रांना घेऊन येणं, त्यांना जेवण करून घाल, कपडे धुऊन दे असं अमानुष काम करून घेण्याचा आंधळा उद्दामपणा हातून झाला नसता.

राजा-शिवाची आई, आपलीही आई असं वाटण्यासारखं आई श्रमाचा भार विसरून राबत राहिली त्या काळात आणि पुढे आयुष्यभरही. आम्ही चळवळी करत होतो. आई आमची ऊर्जा कायम ठेवत होती. निपाणीत तंबाखूच्या रास्त भावासाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन झालं तब्बल तेरा दिवस. आम्ही विद्यार्थी मित्र अत्यंत भारावल्या मनःस्थितीत आता ‘क्रांती’ होणार या भाबड्या आणि कोवळ्या उत्साहात त्यात मग्न.

दररोज घराकडं पंचवीस एक पोरं घेऊन येत होतो. शेतकरी, कामगार नॅशनल हायवेवर चोवीस तास बसून आणि इकडे आईही चोवीस तास धगधगत्या चुलीपुढे भाकऱ्या थापत नाही तर चपात्या लाटत.

एका पोरानं विचारलं, ‘खूप दमत असाल ना मावशी?’

आई शांतपणे चुलीत लाकूड सरकवत म्हणाली होती, ‘दमायला वेळ कुठायं बाबा? एवढं गोरगरिबासाठी करायला लागलाय. तुम्ही उपाशी राहून कसं चालंल?’ आंदोलन संपून गेलं. जो तो पुन्हा आपआपल्या ठायी झाला. मार्गी लागला.

पण पंधराच दिवसांत आईला अतिश्रमानं अर्धांगवायूचा झटका आला. सहा महिने लागले तिच्या अर्ध्या शरीराला पुन्हा रुळावर यायला. त्या काळात, इतरांकडून सेवा करून घ्यायला लागतेय म्हणून आई घळाघळा रडत बसायची.

0 0

आपली पोरं इतर पोरांपेक्षा जरा अधिक हुषार आहेत, म्हणजे वर्गात पहिला दुसरा वगैरे नंबर असतो त्याचं खचितच कौतुक असावं आईला. पण त्याचं जाहीर गुणगान करत बसणाऱ्या संस्कृतीतून ती आलेली नव्हती.

त्यामुळे नंबर आलाय पेक्षा धडपणे शिकताहेत याचंच अप्रूप तिला जास्त असावं बहुतेक. नंबर येण्याचा आणि जगण्याचा जो घोडदौडीचा नातेसंबंध तयार झाला आहे आताशा, सुदैवानं तिला कधीच कळला नाही. त्यामुळे ‘अभ्यास करा’ म्हणून ओरडायची पण अभ्यासाची शिक्षा मात्र तिनं केली नाही.

आज या रोगट पांढरपेशा जगात आम्ही थोडेफार अजून निरोगी आहोत, ते आईच्या या ‘अडाणी’ संस्कृतीमुळेच असं कृतज्ञपणे नोंदवायलाच हवं!

अभ्यासाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतही आमची जी काही थोडीफार लुडबूड चालायची, पुढारपण चालायचं याचंही थोडंफार कौतुक होतंच तिला. पण बहुधा धास्तीही वाटत असावी.

मिळालेल्या संधी वापरून चारचौघासारखं निमूट, सुरक्षित जगावं आम्ही असं तिच्याही अंगवळणी पडत चाललेल्या मध्यमवर्गीय जीवनशैलीमुळं तिला वाटत असावं. हां कदाचित लायकी असूनही तुमचा बाप मिळवण्यापेक्षा घालवतोयच फार. किमान तुम्ही तरी शहाण्यासारखं वागा. असं तिचं प्रत्येक त्राग्यावेळी ‘भरतवाक्य’ असायचं.

पण हे चारचौघांप्रमाणे ‘शहाण्या’सारखं वागायला आम्हा भावंडांना कधीच जमलं नाही. त्यालाही कारण खरं तर आईच. कारण आमच्या कुठल्याही कृतीला, साहसवादाला तिनं निर्णायक विरोध केला नाही की अडसर झाली नाही. उलट एकदा आम्ही कृतीला उतरल्यावर ती प्रोत्साहक ऊर्जा बनून राहिली. निराश होण्याच्या ऐन क्षणाला ती आशेचा मजबूत आधार होऊन राहिली.

माझ्या यशाच्या क्षणांच्या धुंदीत माझ्या ती लक्षात नसायची. पण अपयशाच्या एकाकी अनुभवात ती सावलीसारखी एकटीच सोबत उभी होती हे आज लख्ख दिसतंय. माझ्या आणि भावाच्या शिक्षण संस्था उभारणीच्या उद्योगाला तिची काळजीयुक्त चिंता होती, पण त्यानंतर संस्थेत बेदिली होऊन ‘राखणं विरुद्ध बळकावणं’ असा घोर संघर्ष सुरू झाला; तेव्हा मात्र आई ‘माघार घेऊ नका’ अशी जिद्द आम्हांला पुरवत राहिली.

आई आयुष्यभर अशीच वागली. समस्या निर्माण होऊ शकणारी परिस्थिती हेरून ती समस्येपासून दूर राहण्याचा उपदेश करायची. सावधपण, सुरक्षितपण दाखवायची. पण समस्या अंगावर आलीच तर सहजपणे झेलायची. लढाईला सिद्ध व्हायची.

काही वेळा आप्पा अशा परिस्थितीत हतबल व्हायचे. पराभूत मानसिकतेत जायचे. पण आई अशी किंकर्तव्यमूढ झालेली नाही आठवत. चार चौघांसारखं सरळसोट, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी आम्हां भावंडाना जगता आलं नाही हेच खरं! म्हणजे हे जाणीवपूर्वक झालं असंही नाही.

पण आप्पांमुळे, त्यांनी ओळख करून दिलेल्या वेगळ्या पुस्तकांच्या, कलावंतांच्या, चळवळीच्या जगामुळं रूढ विचार करायची सवयच नव्हती. तिथंच आम्ही कमी पडलो.

‘आ बैल मुझे मार’ या स्वेच्छेने जगलो. त्यामुळे दुःखी नाही झालो, पण जगाच्या रूढ अर्थाने फारसे सुखीही नाही राहिलो.

आप्पांच्या पुस्तकी जगानं आम्हांला परंपरेवेगळा विचार करण्याचं सामर्थ्य लाभलं हे जरी खरं असलं तरी विचार निभवण्याची क्षमता आईच्या अडाणी जगानंच दिली हे त्रिवार सत्य. कारण तिच्या अडाणी जगाचा पाया जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खऱ्याखुऱ्या श्रमांवर उभा होता.

आम्हा भावंडांच्या आयुष्यात बऱ्याच सरळसोट आयुष्यवंतांच्या वाट्याला न येणाऱ्या, घडामोडी झाल्या. त्याआधीच आप्पा गेले हे बरं झालं. कारण आईनं ज्या पद्धतीनं या साऱ्याला तोंड दिलं, स्वीकारलं ते आप्पांच्या बाबतीत त्यांनी जगाचा इतिहास वाचला होता हे मान्य करूनही माझ्या मनात हे सारं कसं पेलवलं असतं याबद्दल शंकाच आहे.

जातीतल्याच उच्चशिक्षित वाटणाऱ्या एका मुलाशी माझ्या सर्वांत धाकट्या आणि ‘हुशार’ गणल्या गेलेल्या, विद्यापीठाचं सुवर्णपदक विजेत्या उच्चशिक्षित बहिणीचं लग्न झालं. आप्पांनीच मोठ्या कौतुकानं करून दिलं. मग बहीणही नोकरी शोधत गावोगाव नवऱ्याला घेऊन भटकत राहिली आणि अखेर एका दूर खेडेवजा शहरात स्थिर झाली.

काही दिवसांनी हा मेव्हणा तक्रार करत आला, माझ्या बहिणीची तिच्या नोकरीतीलच एका सहकाऱ्याबरोबर ‘भानगड’ सुरू आहे. आम्ही कितीही वेगळा विचार करत असलो तरी होतो शेवटी जनरीत पाळणारे मध्यमवर्गीयच. सटपटलोच हे ऐकून.

एकदोन कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही शूर भाऊ बहिणीच्या गावी गेलो. बहिणीला शिव्या घातल्या. त्या तिच्या सहकाऱ्याला दमदाटी केली. स्वतःच्या बायका मुलांचा विचार करण्याचा सल्ला दिला. असा आमच्या  पद्धतीनं समस्येचा निकाल लावून आलो. नंतर मात्र एक एक सत्य बाहेर येत गेलं. हा मेव्हणा काहीच कामधंदा करत नव्हता. बहिणीच्याच जिवावर जगत होता. तिच्याकडून मोठ्यामोठ्या रकमा उकळत होता. बाहेर बरीच कर्जं आणि उसनवारी केली होती. बहिणीला मारझोड करत होता.

या तणावकाळात आणि नोकरीच्या अस्थिरतेत तिचा तो सहकारी तिला बरीच मदत करत होता. मानसिक आधार बनला होता. तिच्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी संघटनेचा नेता म्हणून लढत होता.

एका रात्री हा मेव्हणा आपल्या एका मित्राला घरी सोडून बाहेर निघून गेला. मग त्या प्रसंगातून वाचण्यासाठी बहिणीला या सहकाऱ्याकरवी पोलिसांना बोलवावं लागलं...

अनेक चिंतांबरोबर आता आईला आपल्या या लेकीचं कसं होणार हा आणखी एक घोर. बहिणीनं घटस्फोट घेतला. आपल्या दोन मुलांना घेऊन स्वतंत्र जगू लागली. मुलांना बापाच्या ठिकाणी स्वतःचं नाव आणि माहेरचं आडनाव दिलं. अधूनमधून आई तिच्याकडं जाऊन राहायची काळजी म्हणून.

एक दिवस बहिणीनं मला फोन करून सांगितलं, ‘मी लग्न केलं त्या माझ्या सहकाऱ्याबरोबर.’

माझ्या पुरोगामी मनाला चटकन प्रतिक्रिया सुचेना.

मग विचारलं, ‘ पण आईला..’

‘‘तिनंच करायला सांगितलं. तिचाच पहिला आशीर्वाद घेतला.’’

हे काय अद्‌भुत ऐकतोय आपण? आईचा हा निर्णय आईपणातून की बाईपणाच्या अपरिहार्यतेतून? मला निर्णय करता आलेला नाहीयं अजून.

0 0

मला माहीत आहे, मी शंभर टक्के नास्तिक आहे. पाप-पुण्याच्या तथाकथित आध्यात्मिक संकल्पनांची व्यर्थता जाणतो. शुभ- अशुभाची टर उडवतो. दैव, नशीब यांतला पोकळपणा समजतो पण आई म्हणायची, ‘माझा राजा सगळ्यात हुषार आहे. पण त्याच्या हाताला यश नाही.’

या वाक्याचा मला आईसकट खूप संताप यायचा. खूप ओरडायचो. मग आई एखाद्या घाबरलेल्या लहान मुलीसारखी गप्प बसून राहायची.

आईचे अखेरचे सहा महिने हॉस्पिटलमध्येच गेले. त्यांतला एक-दीड महिना मी आईजवळ राहिलो. तिला जेवण भरवणं, हॉस्पिटलच्या आवारात व्हीलचेअरवरून फिरवणं अशी लहानसहान कामं करायचो.

सारखं शरमिंदं वाटत राहायचं त्या काळात, आपण आईची आतापर्यंत काहीच सेवा केली नाही. शक्य होतं तेव्हा तिला आवडणाऱ्या तीर्थक्षेत्राला नेलं नाही, कधी एखादी साडी आणली नाही, अशा अनेक गोष्टी आठवत राहायच्या.

वेंगुर्ल्यात आईकडून भुणभूण लावून सिनेमासाठी आठ आणे घेण्यापासून अगदी परवापर्यंत म्हणजे आता राजा काही कमवत नाहीय हे माहीत असल्यामुळे वडिलांच्या पेन्शनीमधले हजारपाचशे माझ्या शबनममध्ये ठेवणारी आई, मी किंवा माझे कुणीही मित्र घरी गेले की आपल्या अपंग झाल्या पायाने खुरडत जाऊन चहा आणि सोबत काहीतरी खायला देणारी आई, आपली नातवंडं कधी येणार आहेत सुट्टीला असं सारखं विचारत राहणारी आई, दिवाळीला, चतुर्थीला सारा गोतावळा जमावा म्हणून आसुसणारी आणि त्यासाठी लग्नाची तयारी केल्यासारखी फराळाची तयारी करणारी आई, पेपरमधून झळकणारं माझं नाव, दूरदर्शनवर मला आबालाल रहमानांच्या भूमिकेत पाहताना आनंदविभोर झालेली आई, माझी छापून आलेली पहिली कविता वाचून गदगदणारी आई.

तिच्या भावांची आक्का, स्नेह्यांची वहिनी, मित्रांसाठी शिवानंदची आई, आप्पांची सुशी आणि आमची आई. एकाच रूपाचे अनेक कंगोरे. हॉस्पिटलमधून आईला घरी आणलं. तिच्या भावजयींनी सेवेसाठी कौतुकानं तिला आपल्याकडं- तिच्या माहेरी- नेलं. तिचं अखेरचं माहेरपणच. एक दिवस भल्या पहाटे किरणचा- माझ्या मामेभावाचा- फोन आला, ‘राजूदादा, आत्या गेली.’

मला ग्रेस कधी भावले नाहीत. आताही नाही. पण त्या क्षणी त्यांचीच ती प्रसिद्ध ओळ घुमली कानात, ‘ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मीही रडलो.’ आयुष्यात खूप कमी वेळा रडलोय. त्यांतलीच ही एक वेळ. घनव्याकुळ रडणं म्हणजे काय ते या वेळी कळलं. आईला मूठमाती देताना मात्र एकदम अलिप्त होतो. यंत्रमानवासारखा भावनाशून्य हालचाल करत. इथून पुढचं आयुष्य असं भावनाशून्य जगायचंय याची रंगीत तालीम!

0 0

आई, तुला माझ्या लेखनाचं कौतुक. त्या लेखनानंच आज तुझ्या राजाला तुला अपेक्षित असलेलं ‘यश’ मिळवून दिलंय. आताचा हा सन्मान तुला नक्कीच सुखावून गेला असता. माझा पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास नाही असं मी म्हणतोय. पण माझ्या हातून तुझ्या अखेरच्या काळात जी किंचितशी सेवा झाली त्याचं इतकं ‘फळ’ असेल तर मग किती मोठं भाग्य गमावलं गं तुझ्याकडं दुर्लक्ष करून! हे सारं खरं तर तू असताना बोलायला, लिहायला हवं होतं ना आई? मग आता हे माझं अरण्यरुदन कोणासाठी? कशासाठी?

Tags: राजा शिरगुप्पे आई पुण्य पाप सन्मान यश लेखन raja shirguppe virtue sin honor success writing mother weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके