डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मदरशाच्या ओसरीतच इरफान बसला होता. मला पाहताच लगबगीनं जवळ आला. डोळे पाण्याने भरले होते. माझा हात पकडून म्हणाला, ‘सर, अब मालूम हुआ, गलत लोग गलत किताबे क्यूं लिखते है. अबसे मै पैसा मिलता है करके ‘सनातन प्रभात नही बेचूंगा!’.

ऊन, पाऊस, थंडी, या तिन्ही ऋतूंचा दररोजच अनुभव घेत इरफान गावच्या मुख्य बसस्थानकावर सकाळी 5 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्तमानपत्रे विकतो. हातातल्या भल्या मोठ्या तागाच्या  पिशवीतील शेवटचे वर्तमानपत्र संपल्यावरच तो स्टँडचे आवार सोडतो. मला कौतुक वाटतं ते की, सकाळी येणारे वृत्तपत्र सूर्य माथ्यावर यायच्या आधीच गिऱ्हाईकाच्या दृष्टीने शिळे झालेले असताना, थेट संध्याकाळी देखील‘ताजे’ म्हणून विकू शकतो या त्याच्या विक्री कौशल्याचं. आणि संध्याकाळी 5 वाजता ते वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारा वाचकही केवळ ‘वाचन संस्कृती’ जोपासणाऱ्या वाचन चळवळीचा यंदा समर्थकच असणार!

माझ्या भटकंतीमुळे जवळपास दररोजच मी कुठल्या तरी गावाला जाण्यासाठी स्टँडवर असतो. इरफानचं मी हक्काचं गिऱ्हाईक. त्यामुळे एक-दोन दिवस जरी मी स्टँडवर दिसलो नाही, तरी इरफान अस्वस्थ होतो. मग भेटला की लगेच या एक-दोन दिवसांचे ‘बरेच प्रश्न’ होतात आणि ‘सर, बरेच दिवस दिसला नाहीत, कुठे दौऱ्यावर होता का?’ असा प्रश्न. इरफानच्या या नियमित प्रश्नाला एकदा मी वैतागून कृतकक्कोपाने म्हटलं,

‘दौरे करायला मी काम पुढारी आहे, इरफान?’

‘पण लेखक हाईसाच की!’

मी लेखक आहे, हे तुला कसं कळलं?’ माझा चकित प्रश्न.

‘त्याशिवाय काम तुम्ही इतकं वाचता?’

‘पण मी खूप वाचतो म्हणून तुला कुणी सांगितलं?’ मी बऱ्यापैकी गोंधळात.

‘मग या पिशवीत एवढी पुस्तकं घेऊन कशाला फिरता?’

अस्सं आहे तर! म्हणजे लेखक केवळ त्याच्या लेखनावरून ठरतो, असा जो माझा समज होता, तो इरफाननं क्षणात पुसून काढला. वाचण्यावरूनही लेखकपणाची ओळख होऊ शकते, असा एक नवा सिद्धांत इरफानमुळे मला समजला.

‘मग मी तुला पुस्तक विक्रेता का वाटलो नाही?’ मलाही थोडी चेष्टेची लहर आलेली.

‘पुस्तक विक्रेता अशी रद्दी पुस्तके घेऊन फिरत नाही.’ इरफान अत्यंत भाबड्या गंभीरतेने माझी दांडी उडवतो. पुस्तकांना कान नसतात, हे बरंय! नाहीतर माझ्या शबनममधल्या अर्नेस्ट हेमिंग्वेने पुन्हा एकदा खचितच आत्महत्या केली असती. पुढं काहीच न बोलता मी पेपरचे पैसे इरफानच्या हातात ठेवले आणि पेपर उघडून माझा खजिल चेहरा दडवण्याच्या मिषाने त्यात घुसवला.

इरफानशी अशा होत जाणाऱ्या संवादांतून त्याच्याशी माझी दोस्ती घट्ट होत गेली. एकमेकाला चहा ऑफर करण्यापर्यंत आमची मैत्री वृद्धीगंत झाली. एस.टी. कँटीनमध्ये

चहा घेताना एकदा मी त्याला सहज विचारल्यासारखं विचारलं,

‘किती वर्षे झाली, पेपर विकतोस?’

‘चार-पाच वर्षे तरी झाली असतील.’

‘वय काम आता तुझं?’

‘आसंल की पंधरा.’ इरफान लाजत म्हणाला. ओठावर कोवळी लव दिसू लागलीच होती.

‘शिक्षण किती झालंय?’

‘पाचवीच्या मध्यातच शाळा सोडली सर.’ यावेळी इरफानची नजर जरा खाली झुकलेली. स्वरांत थोडासा अपराधीपणाचा भाव. मग मी पुढं काही विचारायच्या आधी स्वत:च सांगू लागला, ‘म्हणजे, माझं गाव हे न्हवं. मी हुपरीकडं, तिकडं कर्नाटकात चांदशिरदवाड गाव हाय न्हवं का, तिथला. मी लई लहान असतानाच अब्बा वारला. मग अम्मी मला आणि माझ्या थोरल्या भनीला घेऊन हितं मामाकडं आली. मी पाचवीला गेलो, तवाकायतरी खोकंचा आजारा होऊन अम्मी आला प्यारी झाली. मग मामू म्हणाला, ‘शाळा शिक, पण काय तरी कामधंदा पण कर.’ त्येनच या वाळके पेपरवाल्याकडं पेपर इकायला ठेवलं. या कामातनं शाळंला येळ कामी मिळंना. तवा ऱ्हायली ती ऱ्हायलीच.’ मग गडबडीनं एकदम उठून ‘सर, एस.टी.आली. बगतो कोण गिऱ्हाईक गावतंय का?’ म्हणत फलाटाच्या दिशेने धावला.

अशा अधूनमधून होणाऱ्या गप्पातून इरफानचं पूर्वायुष्य मला उलगडत होतं. त्याचा बाप कर्नाटकातल्या त्याच्या गावच्या पंचक्रोशीत गवंडी काम करामचा. एक पडकं घर आणि पंधरा गुंठे जमिनीवर बाप आणि त्याचे तीन सावत्रभाऊ बायका-पोरांसह गुजराण करत होते. इरफान एक वर्षाचा होता तेव्हा त्याचा बाप कुठल्याशा घराचं बांधकाम करताना भिंत कोसळून तिच्यात गाड लागेला. मग बाकीचे ‘चाचे’ अम्मीला त्रास देऊ लागले, म्हणून इरफानचा मामू बहिणीला आणि भाचरांनाघेऊन इकडं आजोळात आला. इथंही इरफानची अम्मी त्याच्या समाजातल्या शेठ लोकांकडे धुणी-भांडी करून स्वत:चा आणि भावाचाही संसार चालवायची. मामू काहीच कामधंदा करायचा नाही. आताही करीत नाही. नुसतं बिड्या फुंकत गावातल्या मशिदी बाहेरच्या कट्‌ट्यावर ‘गपशप लडवत’ बसतो. इरफान चार-पाच वर्षांचा झाला, तसं त्याच्या अम्मीनं समाजातल्याच एका श्रीमंताच्या सांगण्यावरून त्याला कोल्हापूरच्या मदरशात ठेवलं. तेवढंच घरातलं एक ‘खानेवाला मूँह’ कमी.

मदरशात एकूण सात वर्ग. त्यानुसार अभ्यास क्रम वाढत जायचा. पहिल्या वर्गाला अरबी भाषा, कुराण पाठांतर, थोडंसं गणित आणि तवारिख-ए-हिंद म्हणजे भारताचा इतिहास एवढे विषय शिकवले जात. शिकवायला बहुतेक यु.पी.-बिहारकडलेच मौलाना होते. इकडल्या भागातील एक-दोघे होते, पण ते याच मदरशात शिकून नंतर इथेच ‘जनाब’ झालेत. कुराण पाठांतर घेणारे मौलाना खूपच कडक. कलमा पाठ झाला नाही तर अंगठे धरून पाठीवर कुराण ठेवून कलमा पाठ करून घ्यायचे. तोपर्यंत जेवणसुद्धा द्यायचे नाहीत. पाठांतराचा अर्थ कळायचा नाहीच, मग बिनचूक म्हणतोय की नाही हे तरी कसं कळणार? पण इतिहास शिकताना मात्र बरं वाटायचं. जनाब इथलेच. कोल्हापूरचे होते. गोष्ट सांगितल्यासारखे इतिहास शिकवायचे.

ते शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या खूप गोष्टी सांगायचे. ‘इतिहास ध्यानसे पढो, क्योंकी किताबें गलत तरीकेसे, गलत लोगोंने लिखी है।‘ असं काहीबाही सांगायचे. हे सांगताना इरफान मधेच एकदम थांबला. माझ्याकडे तीव्र नजरेने पहात म्हणाला, ‘सर, गलत लोग किताबे लिखते है? और लिखते है तोमो लिखते है?’ इरफानच्या या प्रश्नाला त्यावेळी तरी मला उत्तर द्यायचं धाडस झालं नाही.

सकाळी 4 पासून रात्री 11 पर्यंत शिकणं आणि शिकवणं, इरफानच्या शब्दात ‘रटरट’ चालायची. सोबत पाठांतराच्या वैतागामुळे जनाबजींच्या शिक्षेचा दौर. ईदच्या सुट्टीला आलेला इरफान मग पुन्हा मदरशात गेलाच नाही. ‘मुझे वोरटरट अच्छी नही लगती.’ सांगत त्यानं अम्मी जवळ मदरशात जायचं ठाम निकरानं नाकारलं. मग अम्मीनं त्याला इथल्याच जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत पहिलीत नेवून बसवलं.

तो मदरशातून आलेला मुलगा आहे. हे कळल्यावर त्याचे वर्गशिक्षक त्याला थेट ‘तालिबानी’ म्हणूनच हाक मारायचे... अधूनमधून कुत्सितपणे विचारायचे, ‘याउधर भारत के खिलाफ कुछ सिखकर आमा है की नही? बॉम्ब वगैरे बनवाने को सिखाया है कीनही?’ बाकीची पोरं फिदीफिदी हसायची. सरांच्या या बोलण्यापेक्षा इरफानला या वर्गसाथींच्या हसण्याची लाज वाटायची आणि रागही यायचा. पोरंही त्याला कधीकधी भांडणात ‘लादेन की औलाद’ आणि एरवी ‘लांड्याऽऽ लांड्या’ म्हणून चिडवायची. अम्मीला सांगितलं तर अम्मी उलट इरफानलाच डाफरायची. ‘मुसलमानोंको बाकी सब लोग ऐसाच बोलते है. आपून ध्यान देने का नही. चूपचाप पढाई करते सो रहना.’ वर्गात नेहमीच मुसलमान मुलं शेवटच्या रांगेत बसायची. सरही आमचा अभ्यास कधी तपासायचे नाहीत. किंवा केलाय की नाही विचारायचे नाहीत. कधी उत्तर सांगायला एखाद्या मुसलमान मुलानं बोट वर केलं तर दुर्लक्ष करायचे किंवा अशा काही नजरेनं बघायचे की पुन्हा त्यानं बोट वर करायचं धाडस करू नये.

सातवीपर्यंत नापास करायचं नाही, या शैक्षणिक धोरणामुळं इरफान पाचवीपर्यंत कसा पोहोचला, ते इरफानलाही कळलं नाही. मग टी.बी.नं त्याची आई वारली, तेव्हा त्याच्या खुशाल चेंडूमामानं त्याला वाळके पेपर एजंटकडे प्रती पेपर चार आणे कमिशनवर सोपवला. दररोज पंचवीस रुपये तरी मजुरी पडावी म्हणून इरफान त्यावेळी जो बसस्थानकाच्या आवारात आला तो आजतागामत त्या आवारातून बाहेर पडू शकलेला नाही. शाळेची वाट तर केव्हाच विस्मरणात गेलेली.

‘सर, फक्त एक रुपया. आज ह्यो नवा पेपर घ्या .’ इरफाननं ‘सनातन प्रभात’चा अंक माझ्या हातात ठेवला आणि मी उडालोच!

‘हा पेपर?... तू विकतोस?’ मी थोडासा भांबावत... थोडासा सावरत त्याला प्रश्न केला.

‘का? बाकीच्या पेपरना मला चार आने कमिशन हाय. या पेपराला आठ आने. सकाळपास्नं पन्नास अंक खपिवलं मी.’ इरफानच्या चेहऱ्यावर विक्रेत्याचा गर्व दिसत होता.

‘अरे पण, या पेपरात सगळं तुमच्या विरुद्ध... म्हणजे मुसलमानांविरुद्ध लिहिलेलं असतं.’

‘मग काय झालं? प्रत्येक पेपरात कुनाच्या तरी इरुद्धच लिवलेलं आसतं की! उलट सगळे पेपर इकून मला जेवढे पैसे रोज मिळतात, तेवढे आज या एका पेपरमुळे मिळाले.’

इरफानच्या या व्यावसायिक शहाणपणापुढे मी काय बोलणार?

इरफानच्या बरोबरीनं आता आणखीही काही पेपर विक्रेते बसस्टँडच्या आवारात दिसू लागले आहेत. कधी कधी इरफान त्याच्या ‘धंद्यात’ वाढत चाललेल्या या स्पर्धेबद्दल त्रागा व्यक्त करतो. पण आपण सहानुभूती व्यक्त करण्याच्या आधीच म्हणून मोकळा होतो, ‘नशीबातलं कोन काढून घेणार हाय का सर? आसबको रोटी देता है.’ अनाथ इरफानमध्ये हा विश्वास मदरशातून आला की प्रत्यक्ष जगण्यातून आला, हा माझ्यासाठी एकतत्त्व चिंतनाचा विषय आहे.

मध्ये गावात काही समाजकंटकांमुळे हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होऊन दंगल सदृश्म वातावरण तयार झालं. गावात सात-आठ दिवस कर्फ्यू होता. कार्य कर्त्यांच्या भूमिकेतून शांतता कमिटी सदस्य म्हणून मी दोन्ही समाजाच्या बैठकांना जात होतो. गावातल्या मदरशांमधील मुस्लिम समाजाच्या एका बैठकीला गेलो. मदरशाच्या ओसरीतच इरफान बसला होता. मला पाहताच लगबगीनं जवळ आला. डोळे पाण्याने भरले होते. माझा हात पकडून म्हणाला, ‘सर, अब मालूम हुआ, गलत लोग गलत किताबे युं लिखते है. अबसे मै पैसा मिलता है करके ‘सनातन प्रभात नही बेचूंगा!’.

त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून मी न बोलताच पुढे सरकलो. न दिलेलं उत्तर काळच कधी ना कधी देतो, हेच खरं.

अलीकडं;एकदा एस.टी. कँटीनमध्ये चहा पिताना चेहऱ्यावर काळजीचे भाव आणून मी इरफानला विचारलं, ‘इरफान, हे असं स्टँडवर पेपर विकून तू कसं आयुष्य काढणार? अजून तुझं, तुझ्या बहिणीचं लग्नही व्हायचं आहे, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत...’

‘हाँ, फिर?’ इरफान शांतपणे.

‘नाही म्हणजे... या एवढ्याशा उत्पन्नात तुझं कसं चालणार? थोडाफार शिकला असतास, काही व्यावसायिक शिक्षण घेतलं असतंस तर तू काही स्वतंत्र धंदा किंवा नोकरी करू शकला असतास. तुला आता या पेपर धंद्याची चांगली माहिती झालीय. तू स्वत:च पेपरची एजन्सी का घेत नाहीस?’

‘सर, सिखता तो कुछ बन जाता की नाम माहिती नाम, लेकिन सिखता तो मे पेप्रं विकायची शरम आली आसती, इत्ता नक्कीच! तुम्ही खूप आगेकी सोचताय. मुजे तो रात के खाने की तकलीफ मिटानी होती है. आगेकी सोचता रहूं तो आजका भी काम नही होगा. आनी पेपरमधली मला आता माहिती झालेली हाय, पन डिपॉझिटला पैसे कुठनं आनू, आनी या स्टँडवाल्यास्नी इथं धंदा करायला लायन्ससाठी वरनं आनी खालनं कुठनं पैसे देऊ? निस्ता पेपर इकतोय तर भाड्यास्नी फुकट पेपर द्यायला लागतो. त्यापेक्षा हाय ते बरं चाललंय नव्हं? आगेकी आ देखेगा!’ उपहासानं की निराशेने कळलं नाही, इरफान चक्क हसला.

इरफान मला नियमित भेटतो. निममितपणे आमच्यात वेगवेगळ्या विषयांवर संवाद होतो, इरफान माझे ‘व्यावहारिक प्रबोधन’ करतो आणि शेवटी व्यावहारिकदृष्ट्या आपण किती ‘अडाणी’ आहोत या जाणीवेने मी इरफानकडून घेतलेल्या पेपरमध्येच तोंड दडवतो. त्याला बिचाऱ्याला मात्र वाटतं, सर खूपच वाचनप्रेमी आहेत, कारण ते लेखक आहेत...

Tags: इरफान न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे irfan raja shirguppe na petlele dive weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके