डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आईनं माजं सुक बगितलं न्हाई. कुकवाच्या धन्यानं दिलं न्हाई. मी लई साजरी दिसती म्हंत्यात, म्हंजे काय मला आजून कळल्यालं न्हाई बग. कारन बायका मला बगून नाकं मुरडत्यात, तर समदं पुरुष ही बाई आपल्या शेजंला मिळावी म्हून जिभल्या चाटत्यात. सिद्दूला ठेंबभर दूद मिळायची बी चुरी झाली. मग पोरासाठी आणि पोटासाठी त्या मगा आलेल्या ‘सायबा’ला जवळ केलो. इथल्या साकर फॅक्टरीचं डायरेक्टर हाईत त्ये. त्येंच्या मदतीनं इथपतर तर कड लागली. न्हाईतर सिद्दूला घिऊन कुठलीतर हिर जवळ करायचीच पाळी हुती बग. मी आशी जगलो म्हुन मला गावं रांड म्हंतयं. जीव दिला आसता तर काय पुतळा हुबारला आसता?

मला सख्खी मावशी नाही. चुलत चुलत नात्यानं सांगता येतील अशा खूप. पण सख्खी चुलत मात्र एकुलती. माझ्या आज्जीच्या-आईची आई - सख्ख्या एकुलत्या एक बहिणीची एकुलती एक मुलगी. म्हणजे तसा तिला एक सख्खा भाऊ आणि एक सावत्र म्हणजे तिच्या आईच्या पहिल्या नवऱ्यापासूनचा. असे दोन भाऊ होते. पण मुलगी म्हणून मावशी एकटीच.

मी प्रथम तिला पाहिली तेव्हा सहा-सात वर्षांचा होतो. मावशी असावी सोळा-सतरा वर्षांची. खूपच देखणी. गोरापान आरस्पानी रंग, पातळ लालचुटूक जिवणी, चाफेकळी वगैरे वाटणारं धारदार नाक, नाकपुडीवर चमकणारी चमकी, टपोरे पण अपार मायेने भरलेले पाणीदार डोळे, आठ आण्याच्या नाण्याएवढं भलमोठं कुंकू, केसांचा भरगच्च अंबाडा, गळ्यात मोठ्या सोनेरी मण्यांची बोरमाळ, हिरवंगार नऊवारी लुगड्याचा चापून चोपून घातलेला पायघोळ कासोटा.

आमच्या इतिहासाच्या पुस्तकात बाल शिवरायांना तलवार चालवायला शिकवणाऱ्या जिजाऊंचं चित्र होतं. त्या चित्रातली साक्षात जिजाऊच उभी आहे पुढ्यात असं बराच वेळ वाटत होतं.

मावशीनं मला जवळ ओढलं. कानशीलावर कडाकडा बोटं मोडली. ‘इडा पिडा टळो...’ असं काहीतरी बडबडली. (मीठ-मोहऱ्या मुठीत घेऊन आई किंवा आज्जी आमच्या चेहऱ्याभोवती हात फिरवत असंच काहीतरी इडापिडा टळो, माझ्या लेकरांची दृष्ट जावो. बळीचं राज्य येवो म्हणायच्या. त्याला दृष्ट वगैरे काढणं म्हणत. मग त्या मुठीतल्या मीठ-मोहऱ्या चुलीतल्या इंगळावरती फेकायच्या. चुलीत ‘तडतड’ आवाज उठायचा मीठ-मोहऱ्या फुटण्याचा. आई किंवा आजीच्या चेहऱ्यावर खूप समाधानाचं हास्य पसरायचं आम्हां पोरांना मात्र त्या ‘तडतडी’ची गंमत वाटायची.) मग ‘माझाशाणा ल्योक’ म्हणत मटामटा मुकेच घेतले तिने माझ्या दोन्ही गालांचे.

अर्थात माझ्या आजोळच्या आईच्या सगळ्याच मैत्रिणी, आणि ज्येष्ठ बायका अशीच कृती करत माझं कोडकौतुक करायच्या. त्यामुळे अशा प्रकारच्या कौतुकाला पहिल्यांदा मी कदाचित बावरलो असेन, पण आता सवयीनं न लाजण्याइतका निगरगट्ट झालो होतो. फक्त यावेळी वेगळेपण एवढंच होतं की यावेळी हा कौतुकसोहळा घडवणारी बाई चक्क पुस्तकातल्या चित्रातल्या ‘जिजाऊ’ इतकी सुंदर होती आणि ती मला ‘माजा शाणा ल्योक’ म्हणत होती.

मला नक्कीच त्यावेळी मी बालशिवाजी असल्यासारखं भासलं असणार, असं आज वाटतंयं!  पण त्या प्रथम भेटीतच मावशीबद्दल एक विलक्षण आकर्षण मनात तयार झालं, ते कायमचंच! आपली एक अतिशय सुंदर चित्रातली वाटणारी अशी मावशी आहे ही भावना रापलेल्या चेहऱ्याच्या आई-आज्जीकडे पाहताना उगीचच सुखवायची. कारण पुस्तकातली चित्रांनी आमची ‘सौंदर्यदृष्टी’ तयार होत होती. कामात मग्न, घामेजल्या, चुलीतल्या धुराने कळकटल्या, शेतातल्या कामानं कळकटल्या, आमच्या आया-आज्ज्या पुस्तकातल्या राक्षसिणींच्या चेहऱ्याशी विनाकारणच जुळल्यासारख्या वाटायच्या.

मला आठवतं, मग मावशी त्या भेटीत बराच वेळ मला कवळा घालून ओट्यात येऊन बसली होती आणि आईशी बराचवेळ काहीवाही बोलत होती. निघताना तिनं आपल्या कनवटीला मारलेली पातळाची गुंडाळी सोडली, त्यातून गोल सुरळी झालेली पाच रुपयांची नोट काढली.

माझ्या हातात कोंबत म्हणाली, ‘‘घाईत तुला काय खाय आणाय जमलं न्हाई. खरं तर तू, आक्का इथं भेटशील असं वाटाय नव्हतं. आक्का, त्येला काय खाय आवडतं त्ये द्ये घिऊन त्येला.’  मी संस्कारीत विनयानं आईबरोबरच ‘नको.. नको..’ म्हणत होतो. पण मावशीनं बळजोरीनं पैसे माझ्या खिशात कोंबले. मग आईची गळाभेट घेत डोळ्यांत पाणी आणत म्हणाली, ‘‘आक्का, एकडाव सगळ्या लेकरास्नी घिऊन तुज्या या गरीब भनीकडं ये की.’’

तिच्या या बोलण्यावर आईला जोराचा हुंदका आलेला तेवढा स्मरतोयं मला. मावशीच्या या प्रथम प्रसन्न भेटीनंतर आणि तिच्या त्या अगत्त्याच्या निमंत्रणानंतरही तब्बल दोन-अडीच वर्षांनी तिच्या गावी जायची संधी आली. म्हणजे आईला माहेरकडच्या कुणाच्यातरी नातेवाईकाच्या लग्नासाठी कुठच्यातरी आडगावात जायचं होतं. ते गाव नेमकं मावशीच्या गावाच्या अगलबगल असावं. त्यामुळे मावशीच्या गावावरून जाणं अपरिहार्य होतं.

आम्हां भावंडापैकी मला आणि माझ्या थोरल्या बहिणीला आईनं सोबत वऱ्हाडी मंडळीत घेतलं. मावशीचं गाव घाटात कोकणात उतरण्याच्या घाटरस्त्यावर होतं. जवळच एक सहकारी साखर कारखाना नुकताच उभारला असल्याने शहरी सुधारणांची चाहूल घेत वर्दळ वाढू लागली होती रस्त्यावर.

आधी बसनं मावशीच्या गावच्या बसथांब्यावर, जी एक छोटीशी शेडच होती, एका चहाचिवड्याच्या टपरीवर. तिथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून लग्नाच्या गावी आणि लग्नसमारंभ उरकून पुन्हा परत मावशीच्या गावात. पण आता मात्र वऱ्हाडी मंडळींची सोबत सोडून आईबरोबर कुठल्याशा एका आडगल्लीत आलो. सांडपाणी, खाचखळगे, चिखल आणि दगडधोंडे, हे सारं ओलांडून चालता येतं म्हणून रस्ता म्हणायचं.

एक काळ्या कौलारू, मातीच्या, पहाताक्षणी दिनवाणं वाटावं अशा एका दगडी उंबऱ्याच्या घरासमोर थांबलो. एवढ्या गरीब घरात हे ‘सुखवस्तू’ वाटणारे पाहुणे कोण आलेत म्हणून अख्खी गल्ली उत्सुकतेने आम्हांला न्याहाळत होती.

शेजारची एक परकरी मुलगी धावतच आम्ही उभ्या असलेल्या घरात घुसली. ‘‘मामी, तुमच्यात कोन पाव्हणं आल्यात बगा..’’ओरडतच. 

मावशी परसात काहीतरी, बहुधा भांडी घासण्याचं काम करत होती. पदराला हात पुसतच उंबऱ्याजवळ येत आनंदानं गहीवरलीच. ‘अव्वा! आक्का आशी अवचित? माजी लेकरंबी आल्यात.’’ आम्हा बहीण भावाकडं कौतुकानं न्याहाळत म्हणाली.

मग आम्हांला दारातच थांबवून आत गेली. तांब्याभर पाणी आणि भाकरीचा तुकडा घेऊन आली. आमच्याभोवती ओवाळून उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन तुकडे फेकत आमच्या पायांवर पाणी ओतलं. आईशी गळाभेट घेतली.

मग मला जवळ घेऊन कानशीलावर बोटं मोडत मायेनं म्हणाली, ‘‘मावशीची आटवन हाय तर ल्येकाला..’’ मग लगबगीनं आमच्या येण्याची वर्दी देणाऱ्या त्या परकरी मुलीकडं वळत म्हणाली, ‘‘इमले, शिवाच्या दुकानात जाऊन एक बिस्कूट पुडा घेऊन ये. आणि आर्दा किलो फव्हं. मांडून ठिवायला सांग.’’

मावशीनं तंबाखूचे सड आणि काटक्या सारून चुल पेटवली. तंबाखूचा खाट उठला, तसं आम्ही पाव्हणे मंडळी सारेच खोकायला लागलो. पण मावशी फक्त माझ्याकडं पाहत अपराधी स्वरातच म्हणाली, ‘‘ल्येका, तुमच्यासारका गॅस न्हाई बाबा माज्या घरात. तंबाकूचं सड हायेत ना. जरा तिखाट खाट उठतू. पण ‘च्या’ मातर गोडच व्हतो तुमच्या गॅसीवरला सारकाच’ मावशी मिश्किल हसत चहाचं आधण ढवळत म्हणाली.

मावशीनं जर्मनच्या वाटीत फडक्यानं चहा गाळला. ‘‘तुला कपानं प्याची सवं आसंल न्हवं का? योकच कप हाय. त्योबी बिनदांड्याचं. दिवू का त्येच्यात?’’

आईनंच फटक्यात उत्तर देऊन टाकलं.‘ पितोयं की वाटीनं. त्याला काय होतंयं?’’

‘‘आक्का, माज्या ल्येकाला इचारतोयं मी. त्येला जे आवडंल ते दिन मी तू का मदीच बोलायलीस?’’

‘‘मग त्यालाच त्येवढं इचारतीयास? रेखीनं काय घोडं मारलंय?’’ आई कृतककोपानं. आल्यापासून मावशी माझ्याकडं जेवढं लक्ष देत होती, तेवढं माझ्या बहिणीकडं नाही, असं मलाही वाटत होतं. ‘‘ती बी माजीच ल्येक हाय. पन तिला लई सुकाची सवय लावली तर व्हनारा जावई खुश ऱ्हाईल का? आनि माज्या नशिबाला जे आलं, तसं व्हवू नये अजाबात, पण झालंच तर त्येला सुक म्हनायची दानत तिची ऱ्हाईल काय?’’ पण मावशीनं तिच्या घरातल्या बिनदांड्याच्या एकुलत्या एक कपात बहिणीसाठी चहा गाळला.

चहा पिता पिता आईनं विचारलं, ‘‘पोरगं कुठायं? भाऊजी कुठायेत?’’ आईच्या या विचारण्यावरवनं कळलं की मावशीला एक मुल आहे, तिला एक नवरा आहे, तिचं लग्न झालंयं.

अगदी याच क्रमानं माझ्या मनात प्रतिक्रिया उठल्या हे नक्की. मग तिचं पोरगं, तिचा नवरा यांच्याबद्दल मनात प्रचंड उत्सुकता दाटून आली. या उत्सुकतेच्या तळाशी त्या घराचं कळकटलेपण आणि मावशीचं श्रीमंत सौंदर्य या दोन्हींची सरमिसळ असावी.

‘‘सिद्दू व्हय? गल्लीतल्या पोरी त्येला खाली ठिवत्यात कुठं. त्यो बी सोकावलाय आता त्येंच्या खाकंत बसून. कुटंतरी फिरवित आसतील गल्लीतच.’’

तेवढ्यात बाहेर कुणीतरी खाकरल्याचा आवाज आला. स्वयंपाक खोलीच्या उंबऱ्याशीच बसलेली आई बाहेर पाहत सावरून बसत म्हणाली, ‘‘भाऊजी आलं.’’

मी विनाकारण सावध झालो. थोडा एक्साईटही बहुतेक. क्षण दोन क्षणात एक मळकट दुटांगी धोतर नेसलेला, तीन बटणांचा झब्बा सदृश्य ग्रामीण पद्धतीचा सदरा, तेवढीच मळकट डोक्यावर तिरकी गांधीटोपी घातलेला, गालावर दाढीची खुंटं जागजागी, क्षयी वाटावा असा बारीक, रोगट चणीचा, बेताच्या उंचीचा, सावळ्या पण तरतरीत नव्हे तर कळकलेल्या रंगाचा वाटणारा एक माणूस आत आला.

पाहताक्षणी गोजिरवाण्या सशांच्या सभेत कुणा उंदराचा प्रवेश व्हावा, तसं काहीसं विचित्र वाटलं मला. ‘‘हा मावशीचा नवरा? शीऽऽ’’ अशी एक नकाराची लाट तत्क्षणी माझ्या मेंदूत उठली.

‘‘कवा आलासा आक्कानूं?’’ त्या माणसानं आईला विचारणा करत मग आमचीही चौकशी केली. काय नावं? कुठल्या वर्गात? वगैरे. पण मी जरा नाखुशीनंच उत्तरं देत होतो. मावशीचा हा नवरा हे सत्य पटवून घ्यायलाच मुळी मी तयार नसावा.

‘‘मुलं हुषार हाईत हां आक्का तुमची. आता बाबाच ह्येंचा बृहस्पती. मग पोरं आशी झाली तर त्यात काय नवलं?’’ मावशीचा नवरा अर्धवट आईशी, अर्धवट स्वतःशी बोलत हसला.

मला फक्त यातून आप्पांबद्दलचा त्याच्या मनातला आदर आणि कौतुकभाव जाणवला. आई निघण्याचा आग्रह करीत होती. पण मावशीनं आणि काकानं (मी मावशीच्या नवऱ्याला संस्काराने ‘काका’ म्हणायला सुरुवात केली होती.) आम्हा सर्वांना प्रेमाच्या जबरदस्तीनं मुक्कामाला ठेवून घेतलं.

गल्लीतल्या पोरीना कंटाळा आल्यावर की. ‘सिद्दू’ला भूक लागल्यावर त्यांनी मावशीच्या या ‘सिद्दू’ला घरी आणून सोडला. जसा ‘काका’ च्या भेटीनं हिरमोड झाला होता, तसं सिद्दूच्या दर्शनानं अपेक्षाभंग झाला. नगाऱ्यासारखं पोटं आणि तो वाजवण्यासाठी जणू हातापायांच्या काड्या असा मुडदूशी, कुपोषित देह, शेंबूडानं बरबटलेलं चेहरा, डोक्यावर केसांचं हिंस्र जावळ, फरशी पुसायच्या कपड्यापेक्षाही गलिच्छ सदरा आणि ढुंगणावर काहीच नाही. दिड वर्षांचा पण वर्षाचाही न वाटणारा, किलो सवा किलोचा जिवंत मासांचा गोळा. पण आईनं त्याला सहज जवळ घेतला. बहीणही त्याला ‘सिद्दू, सिद्दू’ म्हणून छान खेळवायला लागली. मी मात्र सोवळ्यासारखा त्याच्यापासून दूर. जणू त्याला हात लावला तर झडून पडेल की काय अशी अमानुष भीती, माझ्या पांढरंपेशा जगानं माझ्यात भिनवलेली.

माणूसपण म्हणजे काय हे त्या वयात मला कळत नव्हतं. हे जरी खरं असलं तरी नैसर्गिक संवेदनशिलताही माझ्या या संस्कृतीनं संपवून टाकली होती हे खरंच. कारण त्या मुक्कामात तरी मी ‘सिद्दू’च्या जवळ जाऊ शकलो नाही.

मावशी मग आमच्यासाठी दिवसभर खूपच कसली कसली धावपळ करत होती. काकाला बाजूला घेऊन काय काय तरी सुचना केल्या. दुपारी मावशीनं नाचण्याची भाकरी, आमटी, भात, कसलीशी पालेभाजी असं तिच्यामते घाईतलं आणि साधंच जेवण केलं.

आईला म्हणाली, ‘‘तू नुसतं गप्पा मारत बस. भनीकडं याचं म्हणजे माहेरलाच याचं. रानीवानी ऱ्हायचं. तिकडं न्हवऱ्याच्या घरी रातध्याड राबनं हायच की.’’

मावशीनं आईला कुठल्याच कामाला हात लावू दिला नाही. मावशीनं आम्हा तिघांना स्टीलच्या ताटांतून जेवायला वाढलं. खरंतर मावशीच्या घरात मला एकही स्टीलचं भांडं दिसलं नव्हतं. स्वतः मावशी, काका जर्मन ताटल्यातून जेवत होती. मला त्यावेळी तरी एवढाच प्रश्न पडला होता, मावशीनं ही स्टीलची ताटं का दडवून ठेवली होती आणि आम्हांलाच वाढण्यासाठी का वापरली? लहानपणी दारिद्र्याचा अर्थ कळत नसतो, हे किती चांगलंयं!

संध्याकाळच्या सुमारास मावशी काकाबरोबर बाजारात गेली. काहीतरी पिशवी भरून घेऊन आली. काकानं मला जवळ बोलावलं. एक छोटासा पुडका खोलला. माझ्या हातात ठेवत म्हणाला, ‘‘राजू, रेखा, आमच्या गावचा मेवा हाय! खावा.’’ चुरमुऱ्याचे लाडू होते ते. पण काकाच्या डोळ्यांत आम्हाला मोतीचुराचे लाडू चारल्याचा निष्पाप आनंद होता.

रात्री मावशीनं डोंगरी आंब्याचं शिकरण, चपात्या, मसाला भात आणि सांडगे, कुरडया असा ‘मेजवानी’ चा बेत केला. शेजारच्या दोन बायांना मदतीला घेतलं, पण लाडक्या ‘आक्काला’ मात्र कशाला हात लावू दिला नाहीच.

रात्री चिमणीच्या ढणढण उजेडात आम्हांला वाढताना, विशेषतः मला, तिच्या हाताला वाढपाचा न आटणारा झराच फुटल्यासारखं झालं होतं. सकाळी निघताना मावशीनं आईची ओटी भरली. तिच्या ओट्यात साडीचोळी घातली. मला तयार शर्ट-चड्डी आणि बहिणीला फ्रॉक असा सारा सरंजाम.

आईचा सारखा एकच धोशा, ‘कशाला गं एवढं सारं मालू?’’ आईनं सिद्दूच्या बालमुठीत काही पैसे ठेवले तर मावशीचा नको नकोचा सूर. पण आईनं ऐकलं नाहीच. तिनंही मावशीनं केलेल्या एकूण आटापिटीचा काहीतरी हिशेब घातला असणारच.

काकानं आमची सामानाची पिशवी उचलली. बारक्या सिद्दूला काखेत घेऊन मावशीही थेट स्टँडपर्यंत आम्हांला पोचवायला. तिथवर येईलपर्यंत मला एक गोष्ट कटाक्षानं जाणवत होती की आजूबाजूची पुरुषमंडळी माझ्या मावशीकडं फारच टवकारून पाहताहेत.

गाडी सुटताना मावशीनं मला पुन्हा जवळ घेतलं. माझ्या कानशीलावरून बोटं मोडत म्हणाली, ‘‘ल्येका, लई मोठा हो ल्योका, तुज्या आप्पांवानी.’’ मावशीला माझे आप्पां हे तिच्या पाहण्यातल्या पुरुषातले बहुधा एकमेव थोर पुरुष वाटत असावेत. मग बरीच वर्षे गेली मधे. वाढत्या वयाबरोबर समज आली की नाही हे सांगता येणार नाही. पण माहिती वाढत गेली. आजूबाजूने गोळा होणाऱ्या या माहितीबरोबर मावशीचे चरित्र कळत गेलं.

मावशी तिच्या आईच्या दुसरेपणातली, म्हणजे दुसऱ्या नवऱ्यापासून झालेली लेक. तिचा बाप अत्यंत देखणा, राजबिंडा, पण त्याला महारोग झाला. सारी सुंदरता सडत गेली. गावाच्या रेट्यानं मावशीच्या आईनं आपल्या दुर्दैवी बाशिंगबळाला दोष देत महारोगी नवऱ्याला गावाबाहेर शेतावर नेऊन बहिष्कृत केलं.

एक बरं आहे, झाडा-झुडांना-पाना-फुलांना महारोगाचा संसर्ग वाटत नाही. मावशीला पदर आला. पण या देखण्या पोरीला महारोग्याची पोरगी म्हणून जातीतली स्थळंच मिळेनात. मावशीच्या आईला तर ही ‘जोखीम’ लवकर उजवून टाकायची घाई झालेली.

कुणीतरी काकाचं बिजवर स्थळ आणलं. मावशीच्या आईनं फक्त तो पुरुष आहे, एवढ्याच भांडवलावर आपली जबाबदारी फेकून दिली.  काका कळकट, कर्तृत्त्वशून्य आणि मटक्याचा नादी होता, असंही थोडीफार अधिक माहिती पुरवणीदाखल.

अकरावीत होतो मी. सामाजिक कामाची, लोकांत मिसळण्याची आवड तयार व्हायला लागलेली. गरीबी - गरिबांबद्दल एक कनवाळू भाबडी सहानुभूती आणि संवेदनशीलता तयार व्हायला लागलेली. श्रीमंताच्या भौतिक श्रीमंतीपेक्षा गरिबांच्या मनाची श्रीमंती अधिक तपासायची आणि कौतुकायची वृत्ती होऊ लागलेली.

मावशीच्या गावाच्या परिसरात आमच्या पुढारी आणि पुरोगामी सरांचं व्याख्यान होतं. सोबत त्यांनी मलाही नेलं. परतताना मावशीचं गाव लागलं. सरांना ‘मावशीला भेटून येतो’ सांगत त्यांच्या गाडीतून उतरलो.

गावाला आता शेजारच्या साखर कारखान्यानं बरंच शहरी स्वरूप दिलेलं. मी पाहिलेला आधीचा रस्ता खाचखळगे -दगडगोट्यांचा होता. आताचा रस्ता सपाट, गुळगुळीत, डांबरी होता. पत्ता विचारत गेलो. मावशीच्या घराता आता सिमेंटचा गिलावा झाला होता. पण दगडी उंबरा तसाच होता. मावशी दारातच उंबऱ्यावर बसून शेजारणींबरोबर गप्पा मारत बसलेली.

मी पहाताक्षणीच मावशीला ओळखलं. एवढ्या काळानंतर आणि मी ऐकलेल्या तिच्या ओढगस्तीनंतरही तिचं सौंदर्य अबाधित होतं. मला पाहताच ‘कोणतरी पाव्हणा आलाय बाई तुझ्याकडं’ पुटपुटत शेजारणी चटाचट उठून गेल्या.

मावशीनं क्षणभरच माझ्याकडं पाहिलं, मग कौतुकानं पुढं होत माझ्या कानशीलावर बोटं मोडत म्हणाली, ‘‘अव्वन्‌ शिवनं. राजू, माजा ल्योक? आता आटवन झाली व्हय रे तुज्या गरीब मावशीची? आनि एकटाच?’’ मला दारातच थांबवून मावशी लगबगीनं आत गेली. तांब्यातून पाणी आणि भाकरीचा तुकडा घेऊन आली. यावेळी तांब्या स्टीलचा होता. माझ्यावर तुकडा ओवाळून, माझ्या डोळ्यांना पाण्याचा हात लावत पायांवर पाणी घातलं. आत गेलो.

बाहेरच्या खोलीतच काकांचा फोटो लावलेला आणि त्याला हार घातलेला. हार घातलेल्या फोटोतील व्यक्ती ही मृत झालेली असते, एवढं अनुभवानं माहीत झालेलं. म्हणजे ‘काका’ आता हयात नाहीत. पण मावशीच्या कपाळावर तेच जुनं आठ आणे नाण्याच्या आकाराचं ठसठशीत कुंकू आणि गळ्यात चक्क सोन्याचं चमचमणारं मंगळसूत्र.

मावशीनं तिच्या आईसारखंच पुन्हा लग्न केलं की काय? मी हा प्रश्न मनातच गिरवत राहिलो. थोड्याच वेळात एक दहा वर्षांचा अर्ध्या चड्डीतला पण स्वच्छ चौकड्याच्या शर्टातला एक मुलगा ‘आये’ अशी हाक मारत आत आला.

मावशी कौतुकानं त्याच्याकडं पाहत मला सांगू लागली. ‘‘ह्या सिद्दू. सिद्धेश्वर आणि ह्यो तुजा दादा, राजू. माजा शाणा ल्योक. साळंत काई पैला लंबर काढतोयं. आणि गाणी रचतोयं. गोष्टी लिवतोयं.’’

मग मावशी बराचवेळ त्याला माझं, आमच्या घराचं, तिच्या आक्काचं आणि पुरुषोत्तम आप्पांचं कौतुक सांगत होती. त्या साऱ्याचा एकूण मतितार्थ ‘तू ही यांच्यासारखा व्हावासं अशाच सुरातला होता. सिद्दूची प्रतिक्रिया आमच्याबद्दलचं कौतुक सरून आता आमच्याबद्दलच्या रागातच परिवर्तीत होऊ लागली होती. तो मग दिवसभर माझ्यापासून तसा लांबच रहायचा प्रयत्न करत होता. मावशीच्या आग्रहानं मी त्या दिवशी मुक्काम करायचं ठरवलं.

दिवेलागणीच्या वेळीला मावशीबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सिद्दूही अभ्यास करण्याचं सोंग करत जरा दूरवरच आमचं बोलणं ऐकत असावा. यावेळी मावशीच्या घरात इलेक्ट्रिक बल्ब लागले होते. घरात गॅस शेगडी आणि चार स्टीलच्या भांड्यांनीं भरलेलं फडताळही दिसत होतं. पण पहिल्यावेळी जाणवलेला कळकटपणा फारसा कमी झालेला दिसत नव्हता. फक्त बराचकाळ आंघोळ न झालेल्या माणसाला उपलब्ध थोड्याशा पाण्यात आंघोळ घातल्यासारखं घर दिसत होतं.

मावशीला माझे ‘बाल’ कर्तृत्व सांगण्यात रमलो होतो. तेवढ्यात एका पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी विजार, मिशाळू धारदार नाकाचा, आणि वहाणाही पांढऱ्याशुभ्र असलेला, साधारण ग्रामीण पुढाऱ्याचा अभिनिवेश असलेला एक माणूस पण थोडा दबकतच आत आला.

बोलता बोलता मी एकदम थांबलो. मावशी तटकन्‌ उभी राहिली. घाईघाईनं त्या गृहस्थाकडं जात म्हणाली, ‘‘सायेब आज माजा ल्योक आलाय किती वर्षांनी. आज ईऊ नका. उंद्या मी निरूप देतो.’ तो गृहस्थही बरंबरं म्हणत निघून गेला. मावशी मग अगदी गप्प होत माझ्याजवळ आली. बराचवेळ मुक राहिली.

मग ‘इथल्या फॅक्टरीचं डायरेक्टर व्हते ते.’ असं माझ्याकडं न बघताच पण मला सांगत उठली.

‘तू भुक्यावला आसशील न्हवं?’ म्हणत चुलीकडं-नव्हे गॅस शेगडीकडं वळली. रात्री सिद्दूलाआणि मला जेवायला वाढतानाही ती गप्पच होती. आम्हां दोघांनाही स्टीलची ताट-वाटी आणि महत्त्वाचं म्हणजे ‘अमुल’चं आम्रखंडही. मावशी मुक झाली होती. पण तिचा तो वाढपी हात तसाच पहिल्यासारखा स्रवता होता यावेळीही. दिवसभर खेळून दमलेला सिद्दू नेहमीप्रमाणे लौकरच गाढ झोपून गेला. मीही अंथरूणावर पडून झोपेची वाट पाहत होतो.

तेवढ्यात मावशी उशाशी येऊन बसली. माझं डोकं कुरवाळत मायेनं म्हणाली, ‘‘झोपलास ल्येका?’’

‘‘नाही अजून.’’

‘‘तुज लई कवतिक आइकतोयं मी. तुज्या काकालाबी तुजं ते कवतिक आईकून लई आनंद व्हयचा बग. आपला सिद्दूबी राजूसारका व्हायला पायजे म्हणायचे, पन आदीच टी.बी.चं पेशंट. सिद्दू मोठा व्हायचा आदीच मला आसं आर्द्यात सोडून गेलं बग. आईनं माजं सुक बगितलं न्हाई. कुकवाच्या धन्यानं दिलं न्हाई. मी लई साजरी दिसती म्हंत्यात, म्हंजे काय मला आजून कळल्यालं   न्हाई बग. कारन बायका मला बगून नाकं मुरडत्यात, तर समदं पुरुष ही बाई आपल्या शेजंला मिळावी म्हून जिभल्या चाटत्यात. सिद्दूला ठेंबभर दूद मिळायची बी चुरी झाली. मग पोरासाठी आणि पोटासाठी त्या मगा आलेल्या ‘सायबा’ला जवळ केलो. इथल्या साकर फॅक्टरीचं डायरेक्टर हाईत त्ये. त्येंच्या मदतीनं इथपतर तर कड लागली. न्हाईतर सिद्दूला घिऊन कुठलीतर हिर जवळ करायचीच पाळी हुती बग. मी आशी जगलो म्हुन मला गावं रांड म्हंतयं. जीव दिला आसता तर काय पुतळा हुबारला आसता? मी तुला ह्ये का सांगतोय? मला आक्काचा, तुझ्या आईचा दुस्वास न्हाय वाटत. पर हेवा वाटतो. चांगला पुरुस भेटला तर लेकरं बी चांगली निपजत्यात. चांगला पुरूस भेटाय देखणंपण लागत न्हाय. नशीब लागतयं, हेच खरं. तू माजा आगदी शाणा ल्योक. गाणी लिवतोस. गोष्टी लिवतोस. आसं म्हंत्यात, लिवणाऱ्या माण्साला दुसऱ्याच्या काळजातलं बी कळतं. माज्या जीवनाची बी तू गोष्ट लिव. जगाला कळू दे. गरिबाचं देखणेपण त्येला आनकी लाचार करतं.’’ बोलता बोलता मावशीचा गळा भरून आला.

मीही काय बोलावं हे न उमजून डोळे मिटून घेतले. सकाळी बरचंसं मुक्यानं आवरत मावशीला नमस्कार करून बाहेर पडत होतो. तर ‘थांब मीबी येतो स्टँडपतूर’ म्हणत सिद्दूला सोबत घेऊन ती आलीच मला पोचवायला.

स्टँडवर तिनं कनवटीची गुंडाळी सोडली, त्यातून दोनशे रुपये काढले. माझ्या हातात देऊ लागली. मी अगदी कणखर नकार देत होतो तर एकदम म्हणाली, ‘‘तुलाबी मी ‘तसलीच’ बाई वाटाय लागली न्हवं?’’ मी पटकन्‌ पैसे घेऊन खिशात टाकले.

पुढं पाच -सहा वर्षांनी उडत उडत कळलं की मावशी खूप आजारी आहे. सारखी माझी देखील आठवण काढतेयं. आज जाऊ, उद्या जाऊ असं करत काही दिवस गेले, तर थेट तिच्या मृत्यूचीच वार्ता आली. सिद्दूच्या सांत्वनाला जायचंही मग राहून गेलं कार्यबाहुल्याच्या नावाखाली.

परवा सिद्दूची अचानक भेट झाली. काकांच्या चेहरेपट्टीचा पण मावशीच्या डोळ्यांचा आणि भरदार शरीराचा. आता तो कुणाच्यातरी ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतोयं. डोळ्यांत पाणी आणत म्हणाला, ‘‘दादा, आई तुमची लई आठवण काडत व्हती मरताना. माज्यासुदीक तुमची. लई जीव व्हता तुमच्यावर तिचा.’’ सिद्दूच्या डोळ्यांतून मावशीच पाहत होती मला जणू आणि पहिल्यांदाच मावशीच्या आठवणीनं भडभडून आलं मला...

आज लेखक म्हणून प्रस्थापित झाल्यावर मी मावशीच्या इच्छेला स्मरून मावशीवर लिहिलंय. पण ही नेमकी कुणाची गोष्ट मी लिहिलीय याचा बोध होत नाहीयं मला याक्षणी....

Tags: आदिमायेच्या पारंब्या राजा शिरगुप्पे लेखक मावशी मृत्यू raja shirguppe literature writer death aunt weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात