डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

माझी, आम्हा चळवळ्या मुलांची, कार्यकर्त्यांची मावशी. ‘माय मरो पण मावशी उरो’ या उक्तीचा नेमका अर्थ आत्ता मला कळतोय. आपल्या उदरातून आलेल्या पोरांवर माया करणं नैसर्गिक आहे, पण साऱ्यांच पोरांवर आईसारखं प्रेम करता येणं हे मानवतेचं लक्षण आहे. आई निसर्गाचं देणं आहे तर मावशी संस्कृतीचं, मानवतेचं लेणं आहे.

 

‘‘व्हय राजाभौ, मग धनू आसाच फिरायचा म्हंतोस?’’ मावशी हातातील काळ्याशार मशेरीत हाताची तर्जनी घोळत माझ्याकडे रोखून सहज विचारल्यागत विचारायची.

तिला खरोखरीच या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असायचं की नसायचं, मला कधीच कळलं नाही.

‘‘तुजा ल्योक जगाचं कल्याण कराय भाईर पडलाय मावशे.’’ असं माझंही तिच्याच शैलीत उत्तर.

मावशी कृतककोपानं माझ्याकडं बघायची. तोंडातली मशेरी बाहेर थुंकून देत तिथं जमलेल्या आम्हा सगळ्यांना ऐकू येईल एवढ्या मोठ्यानं स्वतःशीच पुटपुटायची.

‘‘व्हय भाड्यानू, तुमाला वाढवाय आम्ही रगताचं पाणी करायचं आणि तुमी जगाची धुणी धुवायची. तुचा बी काय दोस? खान तशी माती. च्या ठिवतो. मग भाकरी टाकतो खाऊन मग कुट उधळायचं त्ये उधळा.’’

मावशीची चिता धडाड पेटली होती आणि ज्वालांसमोर बसलेल्या माझ्या मनात आमच्या मावशीच्या प्रत्येक भेटीत घडणारा हा प्रसंग अधिक-अधिकच ठळक होत होता.

ऐंशीच्या दशकात निपाणी आणि निपाणीच्या परिसरात वेगवेगळ्या चळवळींना चांगलीच धार आली होती. प्रा.सुभाष जोशी, प्रा.अच्युत माने, मोहन बुडके, गडहिंग्लजचे प्रा.विठ्ठल बन्ने, गारगोटीचे प्रा.आनंद वास्कर यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाजकार्याची चांगलीच पेरणी सुरू केली होती.

त्यांच्या शिक्षकपणामुळे त्यांचा विद्यार्थिगण त्यांच्या प्रभावाखाली येत होता. चळवळीत गुंतत होता. आम्हीही त्या वेळी निपाणीजवळच्या अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात शिकत होतो.

वडिलांच्या प्रभावामुळे, वाचनाच्या आणि राष्ट्रसेवादल, बालवीर पथकामुळे आधीच मनोभूमी तयार होती. या वातावरणाची लागण सहजच झाली आणि ‘‘समानशीले, समान व्यसनेषु’’ या न्यायाने परिसरातील विद्यार्थ्यांशी मैत्री होत आधी एक सार्वजनिक कामात भाग घेणारं मित्रांचं टोळकं आणि थोडी प्रगल्भता (जिला डॉ.भारत पाटणकर, कॉ.कुमार शिराळकर आणि डॉ.ध्रुव मांकड प्रमुख कारणीभूत ठरले.) आल्यावर निर्मिती ग्रुप या नावाने एक कुटुंब तयार झालं.

कारण आता केवळ सामाजिक कार्यात, आंदोलनात भाग घेणारी मित्रमंडळी एवढंच स्वरूप न राहता आम्हा मित्रांची कुटुंबं म्हणजेच प्रत्येकाचे आई-वडील, बहीण-भाऊ या साऱ्यांशीच आमचं एक रक्ताच्या नात्यापलीकडचं अगदी खरंखुरं भावनिक नातं तयार झालं आणि हे नातं, आजतागायत आम्हा प्रत्येकाच्याच आयुष्यात अनेक वादळं येऊन गेली, पण अबाधित राहिलं.

धनाजी, वसंत, शिवानंद, साताप्पा, विठ्ठल, भागवत, रमेश, मीना आणि सुभाष, प्रताप, सर्जेरावसह कित्येक तरुण मुलांचा परिवर्तनवादी विचारांनी भारलेला ग्रुप. (यातील प्रत्येकजण आता वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवून आहेत. कुणी प्राध्यापक, संपादक, सामाजिक कार्यकर्ता, नामवंत वकील, लेखक, कवी वगैरे. काही दिवंगतही झाले.)

पण या तरुण मुलांचं हे भारलेपण उतरवणारा पहिला घटक असतो- त्यांचं स्वतःचं कुटुंब. या बाबतीत मात्र आम्ही भलतेच सुदैवी निघालो. आमच्या कुटुंबीयांना आमची काळजी वाटणं नैसर्गिक होतं, कारण आपली पोरं परंपरेपेक्षा काही वेगळं करताहेत हे त्यांना दिसत होतं,  त्यामुळे चिंता असायचीच पण काहीतरी आगळं करताहेत याचं कौतुकही अमाप असायचं.

फक्त असं वेगळेपणाचं कौतुक नसलेलं एकच घर होतं, धनाजीचं. त्याचं घराणंच स्वातंत्र्यसैनिकाचं. धनाजीचे वडील कृष्णा- आम्ही त्यांना बाबा म्हणतो- 1942 च्या प्रतिसरकार चळवळीत सक्रिय होते.

गारगोटीच्या सुप्रसिद्ध सरकारी खजिना लुटीत त्यांचा हुतात्मा वारके, स्वामी आणि दे.भ.रत्नापाण्णा कुंभार यांच्याबरोबर सक्रिय सहभाग होता. त्यासाठी ते भूमिगतही होते.

त्या भूमिगत काळात नुकतंच लग्न झालेल्या, अजून अंगाची हळदही न निघालेल्या त्यांच्या अगदीच कोवळ्या वयाच्या बायकोनं म्हणजे धनाजीच्या आईनं, आमच्या मावशीनं या भूमिगत क्रांतिकारकांना अन्न पुरवताना क्रांतिकारकांच्या निरोपांची आपापसात देवाण-घेवाण करताना पोलिस आणि त्यांच्या खबऱ्यांपासून ससेमिरा कसा चुकवला, त्यासाठी काय काय क्लुप्त्या लढवल्या याच्या अद्‌भुत आणि सुरस वाटणाऱ्या कथा आम्ही मावशीकडून व बाबाकडून ऐकत कित्येक रात्री जागवल्या होत्या.

चळवळीची आग आणि नंतरचीही सारी होरपळ या कुटुंबानं साक्षात अनुभवली, भोगली असल्याने मावशी आणि बाबाला आमची जरा जास्तच काळजी वाटायची.

पण शिवाजी जन्मू दे, खरं शेजारच्या घरात असली मध्यमवर्गीय मानसिकता हे कष्टकरी घर असल्यामुळे कधीच नव्हती. त्यामुळे कामगार संघटनेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत कुठल्याही लढ्यात भाग घेताना ‘धनू’ला त्यातून त्यांनी वेगळा काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

आमची सगळ्यांची शिक्षणं संपली आणि परंपरेनुसार नोकरी, धंद्याच्या मागे लागलो. धनाजीही एल.एल.बी. झाला. कुठल्याही आई-वडिलांना आता मुलानं घर सांभाळावं, चारचौघांसारखं संसार करून जगावं, म्हातारपणाची आपली काठी व्हावं असं वाटणं साहजिकच आहे.

धनाजीनं ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ व्हायचा निर्णय घेतला.

एक प्रकारे मावशीच्या घरादारावर हा आघातच होता. कारण अख्खं आयुष्य मावशीनं आणि बाबानं खस्ता खाऊन मुलांना वाढवण्यात घातलं होतं. धनाजीच्या पोलिस झालेल्या दादानं पोलिसी खाक्याप्रमाणे ‘हे कसले पुन्हा एकदा भिकेचे डोहाळे?’ अशीच प्रतिक्रिया दिली आणि राजकारण करायचंच असेल तर पांढरी टोपीवाल्यासारखं करावं असा आगाऊ सल्लाही दिला.

बाबा काहीच बोलला नाही. मावशीनं मात्र आम्हा सगळ्यांनाच पट्‌ट्यात घेतलं, ‘तुम्ही सगळे पोटापाण्याला लागला, बरं झालं. तेला काय वकिली करत चळवळ कराय ईत नाही? शिवानंद करतोयच नव्हं वकिली? बरं ते असू दे. आढ्याचं पाणी वळचणीलाच जायाचं. एवढंच सांगतो, त्यो काय वाईट करत नाही. त्येला काय करायचं हाय ते करू दे. तुमी त्येचा जिवाभावाचं मैतर. त्येला सांभाळायचं काम तुमचं.’

म्हातारीनं एका फटक्यात प्रश्न सोडवून टाकला. खरं तर धनाजीनं नंतर आपल्या कामातून, निष्ठेतून, कर्तृत्वानं स्वतःलाच काय, चळवळींनाही सांभाळायचा आवाका मिळविला. पण त्या क्षणी मात्र मावशीनं धनाजीशी आम्हांला एका अनामिक नात्याच्या शपथेनं कायमचं बांधून टाकलं एवढं मात्र खरं.

मावशीचं असं सगळं बोलणं आणि वागणं थेट, रोख ठोक. भाषेत उगीच मायेचा खोटाखोटा गहिवर नाही. पण शिवीमध्येसुद्धा एक रांगडी माया काठोकाठ भरलेली.

समाजाचा प्रपंच करण्यासाठी घरच्या प्रपंचापासून धनाजीनं संन्यास घेतला. पण घरचा प्रपंच करणाऱ्या संसारी पोरांपेक्षा या आपल्या सन्याशी पोरावर मावशीचा जास्त भरवसा होता. त्यामुळे घरचा कुठलाही निर्णय घेताना ती धनाजी आणि आम्हांला म्हणजे तिच्या भाषेत तिच्या चळवळ्या मुलांनाच साकडं घालायची.

आपल्या हयातीतच तिनं घरच्या वाटण्या करून टाकल्या. त्यात तिचं साधं तर्कशास्त्र होतं की, ‘माझ्यानंतर माझ्या या संन्याशी पोराला कोणी चुना लावू नये. आधीच त्यो मला काय वाटणी नको म्हणतोय! त्या बाकीच्या भाड्यास्नी तेच पाहिजे हाय. (खरं तर असं काही नव्हतं) त्येच्या बायकोला वाटायचं की आपणच त्याला पोसतोय. (धनाजीची प्राध्यापक बायको खरं तर खूपच प्रेमळ आणि परोपकारी मनोवृत्तीची आहे) तिला बी कळू देत, धन्या काय आकाशातनं पडलेला न्हाय. त्याची बी भाकरी हाय म्हणावं हिथं.’ मावशीनं धनाजी नको नको म्हणत असताना वाटणी ठेवलीच.

धनाजीच्या पावलावर पाऊल ठेवून धाकटा भाऊ वाकोजी गावच्या समाजकारणात पडला आणि गावातले तट-गट मिटवत सांभाळत जैन्याळ गावानं आदर्श गाव होत महाराष्ट्र पातळीवर ख्याती मिळविली. आदर्श गाव म्हणून ते कार्यकर्त्यांचं तीर्थक्षेत्र तर झालंच, पण इतरांसाठी पर्यटनक्षेत्रही झालं. या सर्वांमागे, वाकोजी आणि त्याच्या तरुण कार्यकर्त्यांमागे, मावशी अदृश्यपणे उभी होती. हे साऱ्या गावाला ठाऊक असलेलं उघड सत्य.

मावशीची एक आदरयुक्त ‘दहशतच’ अख्या गावावर होती. सगळं गाव त्यामुळे मावशीला माघारी ‘वांड बाई’ म्हणूनच ओळखायचं. वावगं तिला खपायचं नाहीच. त्यासाठी तिनं आपल्या नवऱ्यालादेखील सैल सोडलं नव्हतं.

फार पूर्वी कधीतरी मित्रांच्या संगतीनं दारू पिऊन बाबा घरी आला. मावशी खवळलीच. बाबाला रात्रभर तिनं पडवीतल्या खांबाला बांधून घालून वर उपवासही घडवला.

आदर्श गाव योजनेतील गाव समितीतील एका पुढाऱ्याचं लक्ष योजनेतील पैशांवर आहे असं कळताचं मावशीनं त्याला भर चौकात असा फैलावर घेतला, ‘भाड्या, पूर्वीला गाव लुटलासा ते लुटलासा, आता जरा कुठं बरं व्हायलंय तर तुला हे डवाळं लागल्यात. जरा या पोरांचा (तरुण कार्यकर्ते)......खा.’

वाकूकडून हा प्रसंग ऐकत असताना मला आमच्या कॉलेजच्या दिवसात आम्ही जैन्याळमध्ये घडवून आणलेला ‘एक गाव एक पाणवठा’ कार्यक्रम आठवला.

त्या विद्यार्थीवयातल्या उत्साहात गावकऱ्यांशी चर्चा न करता, त्यांना विश्वासात न घेताच आम्ही हा कार्यक्रम जाहीर केलेला. सगळा सवर्ण गाव एका बाजूला विहिरीभोवती कडं करून उभा राहिलेला.

हरिजन वाडा घाबरून आपापल्या खुराड्यात. आम्ही काय करावं असे हवालदिल. आमची अवस्था बघून मावशी उठली. सरळ महारवाड्यात गेली. तिथं एका घराच्या दारातच बसलेल्या दोन बायकांना हुचकावलं, ‘चला गं व्हैयमाल्यांनू, बघतो कोण आडवा येतोय ते?’ तिथलीच एक कळशी तिनं उचलली. त्या दोघींना सोबत घेतलं. काय घडतंय हे पाहायला सारा महारवाडा पाठोपाठ.

ही वांड बाई विहिरीभोवती जमलेल्या सवर्णांचं कडं भेदून त्या दोघी बायकांसह रहाटाकडं गेली. तिचा आवेशच असा होता की आपण त्यांना आडवायला जमलोय हे विसरून गर्दी आपसूक बाजूला झाली.

मावशी ओरडली. ‘लावा गं कळशी दोराला’ आणि आम्ही आनंदानं बेहोश ओरडलो, ‘एक गाव एक पाणवठा जिंदाबाद!’

नंतरही ती सार्वजनिक विहीर साऱ्यांसाठी कायमपणे खुली राहिली. 

चितेच्या उंच वाढणाऱ्या ज्वालांबरोबर माझे डोळेही मावशीच्या आठवणीने अनावर भरून आले. आयुष्यभर कष्टात रापलेलं ठेंगण ठुसकं शरीर, बनहट्टी काठाचं लुगडं नेसलेली, कपाळावर आठ आण्याच्या नाण्याएवढं ठसठशीत कुंकू, एक डोरलं आणि सोन्याची एकुलती एक बोरमाळ, सुरकुतलेला सावळा चेहरा पण डोळे मात्र विलक्षण तेजस्वी, करारी आणि दबाव टाकणारे.

माझी, आम्हा चळवळ्या मुलांची, कार्यकर्त्यांची मावशी. ‘माय मरो पण मावशी उरो’ या उक्तीचा नेमका अर्थ आत्ता मला कळतोय.

आपल्या उदरातून आलेल्या पोरांवर माया करणं नैसर्गिक आहे, पण साऱ्यांच पोरांवर आईसारखं प्रेम करता येणं हे मानवतेचं लक्षण आहे. आई निसर्गाचं देणं आहे तर मावशी संस्कृतीचं, मानवतेचं लेणं आहे.

देशभरातून चळवळीत काम करणारा कुठलाही कार्यकर्ता मावशीच्या घरी आला की त्याला हे मावशीचं प्रेम लाभायचंच.

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी एक शिक्षणसंस्था निर्मिण्याचा प्रयत्न केला होता आणि काही कारणास्तव मला ती शिक्षणसंस्था सोडावी लागली. खूप वाईट काळ होता तो माझ्यासाठी. विमनस्क घरी बसलो होतो.

अचानक मावशी आली. येताना नेहमीप्रमाणे काहीतरी खायला आणि शेतातला भाजीपाला घेऊन आली होती. माझ्या हातात फणसाचे गरे देत तिनं माझ्याकडं निरखून पाहिलं. तिला माझ्या रंजिशीचं कारण माहीत होतं.

माझ्या खांद्यावर मायेनं हात टाकत मावशी म्हणाली, ‘राजाभाऊ, शेतात लावल्याला झाडावर आपला हक्क सांगतो येतो. ते आपलं पोटपाणी असतं. जंगलात लावल्यालं झाडं आपलं नसतं. आपल्या हातानं लागलं हे फकस्त निमित्त्य, ते जंगलातल्याच पक्ष्याप्राण्याचं असतंय. समाज ह्यो जंगलासारखा असतोय आणि समाजातलं काम हे जंगलात लावल्याल्या झाडासारखं असतंय.’

मावशीनं किती साध्या शब्दांत, रूपकात अवघं समाजकारण सांगितलं होतं. मावशी नेहमी तसं काहीतरी सूत्रबद्ध सांगत असायची. आमच्या पुस्तकी शाळेपेक्षा तिची ही अनुभवाची शाळाच जास्त समृद्ध होती. आमच्यावर त्या समृद्धीचे काही शिंतोडे उडाले. धनाजीच्या आजच्या शहाणपणाचं खतपाणी तर तीच होती. जिवंत माणसाला स्मशानातून कधीतरी परतावंच लागतं. तराळानं आमच्या हातात दूर्वा दिल्या. मग चितेकडं पाहात ओरडला, ‘झाडाझुडांचा संसार केला, पाप पुण्याचा निवाडा रविवारच्या दिवशी बसवाची शेपटी धरून गेली कैलासाला.’

सत्तर वर्षांची माझी मावशी नक्कीच एवढ्यात कैलासाला जायला तयार नसणार. माझ्या माघारी ‘बाबाला’ माझ्यासारखं बघणारं कोणी नाही असंच तिला वाटायचं. याच जिद्दीनं पोरांना आणि सुनांना न जुमानता ती बाबाला घेऊन ‘स्वतंत्र’ राहत होती. बाबाच्या दुखावलेल्या गुडघ्याला दररोज तेल चोळून लेप लावत होती.

तिला अजून आम्हा चळवळ्या पोरांचे उपद्‌व्याप बघायची आस होती. तिला अजूनही आपण धडधाकट शंभरी गाठणार याची खात्री होती. आमच्यातला एक कार्यकर्ता तिला गंमतीनं म्हणायचा, ‘मावशी, तुमचं कोणाबरोबर पटत नाही. तुमची तिरडी कोण उचलणार?’

मावशी उसळून म्हणायची, ‘भाड्या, तू निसतं बघच, माझं मरान, कुणाला एवढीशी तोशीस लागू देणार नाही मी. तेवढी वांड आहेच मी.’

मावशी घरासमोरच एस.टी.ला वळसा घालून रस्ता पार करताना गाडीच्या चाकाखाली आली. पोटावरून चाक गेलं. तरीही मावशी दवाखान्यापर्यंत आपल्या देहाचं लोक काय करताहेत हे पाहायला जिवंत होती. मावशीनं म्हटल्याप्रमाणं इथंही वांडपणा दाखवलाच!

Tags: राजा शिरगुप्पे महिला शाळा पुस्तकं समाज जंगल झाड शेत woman adimayechya parambya raja shirguppe schools books society forest tree farm weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात