डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बिहारमधील आजच्या निवडणुका या जरी याच भूमिकेतून होत असल्या तरी भारतीय जनता पक्ष नावाचा चाणक्य आता अधिक सावधपणे बिहारमध्ये आपले हात-पाय पसरण्यात यशस्वी झाला आहे. एकंदर परिस्थिती पाहता, त्याला रोखण्यात नितीशकुमार अपयशी ठरताहेत, हेच पदोपदी जाणवते. त्यामुळे या निवडणुकीत नितीशकुमार पुन्हा एकदा कसेबसे सत्ताधारी होतीलही, पण त्यांचे आतापर्यंतचे खंबीर अस्तित्व मात्र या नव्या परिस्थितीत डळमळीत होणार आहे, हे नक्की. ते जुन्या पद्धतीने आपल्या मित्रपक्षांना वेसण घालू शकतील ही गोष्ट आता थोडी अवघड कोटीतील बनत चालले आहे, हे नक्की. पंधरा वर्षांच्या चाणक्यनीतीनंतर नितीशकुमारांना त्याच पद्धतीने पुढील राजकारण करता येईल, याबद्दलच्या सर्व शक्यता अगदी धूसर झाल्या आहेत- किंबहुना, भारतीय जनता पक्ष आता नितीशकुमारांना वेसण घालेल, हीच शक्यता जास्त आहे. 

बिहारच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कोरोना नावाच्या एका जागतिक अरिष्टात सापडूनही त्या रोगापेक्षा भारतीय माणसाला निवडणुकांचा ज्वर जास्त चढतो, याचा प्रत्यय इथेही येतो आहे. भाजपविरुद्ध काँग्रेस, जदयू आणि राजद यांनी 2015 मध्ये आघाडी केली होती, त्यात एरवी एकमेकांशी शत्रुत्व निर्माण झालेले लालूप्रसाद यादव व शरद यादवही होते. म्हणजेच शरद यादव अध्यक्ष असलेले व नितीशकुमार नेतृत्वस्थानी असलेले संयुक्त जनता दल आणि लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महागठबंधन या नावाने एकत्र आले होते. त्यात ते यशस्वी होऊन बिहारचे सत्ताधारीही झाले. नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. या मंत्रिमंडळात लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री होते.

दि.26 जुलै 2017 मध्ये नितीशकुमारनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याचे मुख्य कारण राजदचे लालूप्रसाद यादव व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यामागे सीबीआय चौकशी लागल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने त्यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता आणखी एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी ते या महिन्यात निवडणुकीला सामोरे जात आहेत.

हे सांगण्याचे कारण नितीशकुमार हे नेहमीच एक गूढ राजकारणी राहिलेले आहेत. बिहारमध्ये तर त्यांचे विरोधक त्यांना ‘निळा कोल्हा’ म्हणूनच ओळखतात. दहा वर्षांपूर्वी जवळपास निम्मा बिहार मी पायाखाली घातला आहे. प्रवासाची सांगता करताना नितीशकुमार यांना भेटलो. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. त्या वेळी ते मला म्हणाले होते की, मी तर आता ‘आउटगोइंग सीएम’ आहे. कारण त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाचा कालावधी संपला होता आणि आता ते नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, ‘‘एक प्रक्रिया म्हणून जरी तुमच्या विद्यमान मुख्यमंत्रिपदाचा कालावधी संपला असला, तरी पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच असणार आहात. कारण जेवढा बिहार मी पाहिला आहे, त्यावरून मला तुम्ही बिहारी माणसांच्या मनात किती रुजलेले आहात, याची खात्री पटलेली आहे.’’ माझे बोलणे ऐकून नितीशकुमार माझ्याकडे पाहून हसले आणि मला कवळा घालीत म्हणाले, ‘‘आपके अल्फाज हम याद रखेंगे.’’

निवडणुका झाल्या, नितीशकुमारांचा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या आघाडीबरोबर सत्तेत आला आणि नितीश-कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच्या आदल्या दिवशी मला त्यांच्या कार्यालयातून लाइटनिंग कॉल आला. खुद्द नितीशकुमार बोलत होते. त्यांनी मला शपथविधीसाठी निमंत्रित केले. इतक्या अचानक जाण्याची मी माझी असमर्थता व्यक्त केली, त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही समाजवादी आहात आणि जयप्रकाशजींचे अनुयायी आहात. तेव्हा तुमच्या राजकारणाची दिशा तीच असायला हवी आणि असेल, अशी अपेक्षा करतो.’’

हे सगळे आठवण्याचे कारण संपूर्ण भारतात एक विचित्र अशी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे आणि भारतीय राज्यघटनेपेक्षा सामान्य जनतेला धार्मिक संहिता जास्त महत्त्वाच्या वाटायला लावण्याची सत्ताधाऱ्यांची धडपड चालू आहे. दहा वर्षांपूर्वी मी बिहारमध्ये हिंडत होतो त्या वेळी नितीशकुमार यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष सत्तेत होता, पण नितीशकुमारांनी आपल्या चाणक्य शैलीने त्यांच्या मुसक्या बरोबर आवळून ठेवल्या होत्या. सत्ताधारी असूनही ते प्रभावी कसे होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्याच वेळी आपल्या इतर विरोधकांनाही पद्धतशीर आपापल्या ठिकाणी हात चोळीत बसवण्यात ते यशस्वी ठरत आले होते. बिहारमध्ये त्यांनी राबवलेल्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यरत होताना मी पाहिल्या. विशेषत: स्त्रिया, मागासवर्गीय व विद्यार्थी (अगदी बालवाडीपासून विद्यापीठीय स्तरापर्यंतचे) यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजना व शिक्षणवृद्धीसाठी केलेले विविध प्रयोग, त्यामागची प्रामाणिकता हे पाहिले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत होता, पण नितीशकुमारांच्या रांगेत तो अगदी शेवटच्या स्थानावर होता. सामान्य माणसामध्ये तो फारसा रुजला नव्हता. त्यामुळे लालूप्रसाद यांच्यासारखा आक्रमक आणि तळागाळातल्या लोकांना बऱ्यापैकी प्रिय वाटणारा माणूस फारसा प्रभावी ठरू शकला नाही. शिवाय त्यांना अडकवलेल्या कायदेशीर बंधनातून सुटका करून घेण्यातच त्यांचा बराचसा काळ गेला व जातो आहे.

त्या भेटीत नितीशकुमार मला जरी ते भारतीय जनता पक्षाबरोबर असले, तरी खूप आश्वासक नेतृत्व वाटत होते. पण हळूहळू भारतीय जनता पक्षाने सर्व देशभरच स्वत:चे एक राजकीय मायाजाल उभे केले. त्याला तथाकथित धर्माच्या नावे आशेचे लुकलुकते तारे लटकवले. येनकेन प्रकारे स्वत:ची सत्ता अधिकाधिक बळकट करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विरोधकांना तात्त्विक भूमिकेने संपवण्याऐवजी कुटील डावपेच वापरून आणि त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटून आपल्याला शाबूत ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. सध्याचा काळ तर देशाच्या आणि जगाच्या पातळीवर भयावह स्थितीचा एक आहे. ही स्थिती नैसर्गिक आपत्तीपेक्षा राजकीय आणि आर्थिक स्थितीने जास्त भयाण बनवली आहे. अशा परिस्थितीत नितीशकुमार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. जवळपास 1985 पासून राजकारणात सक्रिय असलेले आणि किमान 15 वर्षे मुख्यमंत्रिपद भोगलेले नितीशकुमार पुन्हा एकदा सत्तेच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. 2010 मधली स्थिती आता नाही, याचेही भान त्यांना असेल, अशी आशा करू या. त्यांनी बाटलीत ठेवलेल्या हैवानाचा आता बाटलीतून बाहेर पडून अवाढव्य असा अजस्र प्राणी झाला आहे. बिहारमधला भाजप हा 2010 मध्ये संघप्रभावित नव्हता, तर तो एकूणच प्रस्थापित सत्तेच्या विरोधातून संघटित झालेली शक्ती होता. पण आज स्थिती ती नाही. तिथे निर्माण झालेल्या या पक्षाच्या जोरावर संघाने आपला हिंदुत्ववादी अजेंडा इथे बऱ्यापैकी प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे. नितीशकुमार 2010 सारखे या जाग्या झालेल्या सर्पाला काबूत ठेवणारे कुशल गारुड्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीत, हे आजची बिहारमधील परिस्थिती पाहताना जाणवते. या निवडणुकीत भाजपने कुटील नीतीप्रमाणे आणखी एक चाल खेळली आहे. रामविलास पासवानांचे पुत्र चिराग व त्यांचा लोक जनशक्ती पक्ष मैदानात उतरवला आहे. भाजपची ही नेहमीचीच खेळी आहे. इसापनीतीतल्या कोल्ह्यासारखे दोन सिंहांना झुंजायला लावून त्यांना गलितगात्र करणे.

बिहारमधील राजकारणाकडे पाहिले की, आपल्याकडे ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांत जे स्थानिक गटांचे तत्त्वहीन युतीचे राजकारण चालते, तेच विधानसभेच्या पातळीवर तिथे चालताना दिसते. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षविचारांपेक्षा स्थानिक पातळीवरचे वैय्यक्तिक हितसंबंध अधिक प्रभावी ठरतात, तेच आपल्याला बिहारच्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळते. बिहारमधील आजच्या निवडणुका जरी याच भूमिकेतून होत असल्या, तरी भारतीय जनता पक्ष नावाचा चाणक्य आता अधिक सावधपणे बिहारमध्ये आपले हात-पाय पसरण्यात यशस्वी झाला आहे. एकंदर परिस्थिती पाहता, त्याला रोखण्यात नितीशकुमार अपयशी ठरताहेत, हेच पदोपदी जाणवते. त्यामुळे या निवडणुकीत नितीशकुमार पुन्हा एकदा कसेबसे सत्ताधारी होतीलही, पण त्यांचे आतापर्यंतचे खंबीर अस्तित्व मात्र या नव्या परिस्थितीत डळमळीत होणार आहे, हे नक्की. ते जुन्या पद्धतीने आपल्या मित्रपक्षांना वेसण घालू शकतील ही गोष्ट आता थोडी अवघड कोटीतील बनत चालली आहे, हे नक्की. पंधरा वर्षांच्या चाणक्यनीतीनंतर नितीशकुमारांना त्याच पद्धतीने पुढील राजकारण करता येईल, याबद्दलच्या सर्व शक्यता अगदी धूसर झाल्या आहेत- किंबहुना, भारतीय जनता पक्ष आता नितीशकुमारांना वेसण घालेल, हीच शक्यता जास्त आहे. नितीशकुमारांना 2010 मध्ये भेटताना तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे मला आवर्जून वाटले होते; पण बिहारमधल्या माझ्या मित्रांकडून परिस्थितीची माहिती घेतल्यावर नितीशकुमार नावाचा सिंह आता अशक्त होत चालला आहे, हेच मला प्रकर्षाने जाणवत आहे. बिहारमधील एके काळी नितीशकुमारांचे चाहते असलेले माझे समाजवादी मित्र आज पर्याय म्हणून काँग्रेसला साथ देताहेत, तर काही राजदला मदत करताहेत. पण त्यांच्याशी खोलवर चर्चा केल्यावर लक्षात आले की, त्यांना या परिस्थितीतही नितीशकुमारच यशस्वी होतील आणि बिहारच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला अग्रभागी आणतील, अशी भीती वाटते आहे.

नितीशकुमारांबद्दल माझ्या मनात 2010 मध्ये जी भावना होती, आजच्या परिस्थितीत ती आता नक्कीच उरलेली नाही. एक कार्यकर्ता म्हणून जनतेबद्दल माझे मत कायमच असे आहे की- जनता नेहमीच शहाणी असते, सावध असते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते. बिहारी जनता या निवडणुकीच्या निमित्ताने माझा हा विश्वास सत्य ठरवेल, अशी आशा करतो.

Tags: बिहार निवडणूक 2020 नितीशकुमार बिहार निवडणूक राजकारण बिहार राजा शिरगुप्पे bihar raja shirguppe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके