डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आम्ही मात्र मायकलच्या या कौशल्याच्या जिवावर रानमेव्यावर भरपेट ताव मारायचो. मायकलची नेमबाजी बहरात यायची ती गोट्या खेळताना आणि आबाधुबी खेळताना. आबाधुबी खेळताना मायकलचा नेम एकदा जरी चुकवता आला तरी खेळणाऱ्या प्रत्येकाला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद व्हायचा. मायकलने ‘शूटिंग'मध्ये करिअर केलं तर तो देशाला ऑलिंपिकमध्ये नक्कीच सुवर्णपदक मिळवून देईल, असे आम्हालाच काय, आमच्या शाळेतल्या शिक्षकवर्गालाही त्याचा खेळ पाहताना वाटायचं. पण वर्गात मात्र हाच मायकल या  शिक्षकवर्गाला एकदम मठ्ठ वाटायचा. दगड फोडायच्या योग्यतेचाही वाटायचा नाही, हे विशेष.

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. दादर टी. टी.स्टेशनवरून अंधेरीला चाललो होतो. दुपारची वेळ असल्याने ऐसपैस उभं राहण्याइतपत जागा मिळेल एवढी कमी गर्दी होती. मुंबईत माणूस एकतर पावसाने भिजतो किंवा घामाने. एप्रिल महिन्याच्यात्या उकाड्याने अंग घामानं चिकचिकलं होतं. लोकलच्या पंख्याखाली स्वतःला वाळवत डुगडुगत कसल्यातरी हैराण तंद्रीत उभा होतो. तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचं जाणवलं. दचकून मागे पाहिलं, तर साडेचार-पावणेपाच फूट उंचीचा, थोडासा अपऱ्या नाकाचा आणि मिशीचे कल्ले खाली वळवलेला, लालभडक टी शर्ट आणि निळ्या रंगाची विटकी वाटणारी जीन घातलेला माझ्याच वयाचा एक मनुष्य माझ्याकडे पहात स्मित करत होता.

‘‘राजू शिरगुप्पे ना तू?'' त्यानं हसत हसत एकदमच मला प्रश्न केला आणि मी धाडकन्‌ तीस-चाळीस वर्षे भूतकाळात मागे ढकलला गेलो.

माझ्या लहानपणी म्हणजे माध्यमिक शाळेत असेपर्यंतच मला माझे घरचे आणि मित्रमंडळी ‘राजू' म्हणून संबोधायचे. पुढे कथा-कविता लिहायचा धाडसी उपद्‌व्याप सुरू केला तेव्हा जरा भारदस्त वाटावं म्हणून ‘राजा' झालो आणि आता टक्कल, पिकलेल्या दाढीमुळे आपसुकच ‘राजाभाऊ'. हा समोरचा बुटबैंगण मला राजू म्हणून हाक मारतोय, म्हणजे माझ्या बालपणाचाच याच्याशी काहीतरी संबंध असणार अशी मी अटकळ बांधत माझ्या स्मरणशक्तीला ताणू लागलो. माझं गोंधळलेपण हेरत तो आपल्या नकट्या चेहऱ्यावर रुंद हास्य पसरवत पुन्हा एकदा म्हणाला, ‘‘राजूच ना तू?'' मी अभावितपणे होकारार्थी मान डोलावली. तसा आणखी मोठ्याने हसत म्हणाला, ‘‘ओळखलं नाहीस मला, अरे मी मायकल. मायकल डिसोझा, मिशन हॉस्पिटलमधला.''

‘‘मायकल?''

माझ्या मनात आणि तोंडात एकदमच आश्चर्य उमटलं. झरझर स्मरणातला सगळा मधला काळ विरला आणि थेट कोंकणातल्या समुद्रकाठच्या वेंगुर्ल्यातल्या मिशन हायस्कूलच्या पाचवीच्या वर्गात जाऊन बसलो. मायकल, माझा पाचवीपासूनचा बालमित्र. शालेय अभ्यासात मी त्याचा मार्गदर्शक होतो, तर शाळेबाहेरचं जग मला समजावून देणारा तो माझा गुरूच होता. मी पटकन्‌ त्याचा खांदा एका हातानं गच्च पकडून आवेगानं विचारलं. ‘‘मायकल... तू? किती वर्षांनी भेटतोय आपण. मी तर तू नाव सांगितलं नसतंस तर अजिबातच ओळखू शकलो नसतो तुला. तू कसं काय ओळखलंस मला?'' त्यानं एवढ्या वर्षांनी माझ्यात बालपणाच्या काहीच खुणा उरल्या नसताना मला ओळखलं याचंच मला अप्रूप वाटत होतं. मायकलनं आपल्या डाव्या हाताची करंगळी आपल्या नकट्या नाकाच्या शेंड्यावर घासली. मला आठवलं, अगदी लहानपणापासून त्याला ही सवय होती. मग स्मित करत म्हणाला,‘‘तुझी तंद्री लावून उभं रहायची सवय अजून तशीच आहे.''

मी खळखळून हसलो. म्हणजे आम्ही नक्कीच जिवलग बालमित्र होतो. खरं तर मायकलला अजून पुढेच जायचं होतं, पण तीस वर्षांपूर्वीच्या बालपणाला कुरवाळण्यासाठी तो अट्टहासानं अंधेरी स्टेशनवरच माझ्याबरोबर उतरला. स्टेशनसमोरच्या रस्त्याला ओलांडून पायऱ्या चढत एका हॉटेलात शिरलो. कोपऱ्यातली निवांत जागा शोधून समोरासमोर बसलो. जवळ आलेल्या वेटरला मायकलनेच काहीबाही ऑर्डर दिली.पण आम्ही देाघेही आमचे वेंगुर्ल्यातले दिवस आळवायला अधीर झालो होतो, एवढं बरीक निश्चित!

‘‘मायकल, पाय कशे हत रे?'' कित्येक वर्षांनंतरही मी सहज मालवणी बोलून गेलो.

‘‘तुया वेंगुर्ला सोडलंस, ते वक्ताचे आसपास पाय वारलो.'' रेडिओवर बातमी सांगावी, इतक्या अलिप्तपणे मायकलचं उत्तर. मीच थोडासा अस्वस्थ झालो. मायकलचे वडील मिशन हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये आचारी होते.मायकलची माय हॉस्पिटलमध्येच आया म्हणून काम करायची. मायकल एकुलता एक आणि आशामा, ऑलिव्हा, मेरी या  तीन थोरल्या बहिणी. चौघांचही शालेय शिक्षणच चाललं होतं.

मी मिशनच्या हायस्कूलमध्येच इयत्ता पाचवीत शिकत होतो आणि मायकलही माझ्याच वर्गात होता. मायकलच्या आईवडिलांचं उत्पन्न फारसं नसावं, कारण खूपच ओढग्रस्तीत त्या साऱ्यांचं जगणं चाललेलं दिसत होतं. पण आपल्या साऱ्या मुलांनी खूप शिकावं यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा जाणवत होता. त्या छोट्याशा गावातल्या आणि तालुक्यातल्या एकमेव महाविद्यालयात शिकवणाऱ्या गुरुजींचा मी सभ्य मुलगा (कदाचित माझ्या मध्यमवर्गीय शामळूपणालाच सभ्यपणा समजला जात असावा) आणि वर्गात वासरात लंगडी गाय या  न्यायानं दिसून येणारी माझी निरुपद्रवी हुषारी. या कारणाने मायकलनं नेहमी माझ्याच दोस्तीत राहावं असं माय, पाय आणि त्याच्या तिन्ही मानांना (बहिणींना)मनापासून वाटत असावं. त्यामुळेच मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेलो, की कँटीनमधले पदार्थ खाऊ घालून माझं खूपच कोडकौतुक व्हायचं.

हॉस्पिटलच्याच आवारात एका बाजूला पत्रे लावून कामगारांसाठी उभ्या केलेल्या एका चाळीत दोन टीचभर खोल्यांच्या जागेत मायकलचा सारा परिवार राहायचा. कँटीनमध्येच तयार होणारे जेवण जेवायचे आणि शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हॉस्पिटलच्या आवारात किंवा समोर चर्चच्या पिछाडीच्या स्मशानभूमीत अभ्यास आणि खेळ चालायचा.

‘‘सगळ्या मानांची लग्न झाली असतील नाही?'' कुठूनतरी बोलायला सुरुवात करायला हवी म्हणून माझा प्रश्न.

‘‘दोघींचं... ऑलिव्हा आणि मेरीचं झालं. इथं मुंबईतच असतात त्या. दोघींचेही नवरे कुठे कुठे रोजंदारीवर कामाला जातात. ठीक चाललंय त्यांचं.''

‘‘आणि आशामा माना? तीच सर्वांत थोरली ना? मला आठवलं, आशामा शिक्षण सोडून वडिलांना कँटीनच्या त्या धुरानं भरलेल्या काळ्याभोर भिंतींच्या भटारखान्यात स्वयंपाक करायला मदत करायची.''

‘‘पायच्या मागेच वर्षभरात ती वारली. फुफ्फुसाच्या विकारानं. पायही त्यामुळेच वारला.''

भटारखान्यात कोंडून राहिलेला तो धूर याक्षणी मला एकदम आठवून घुसमटल्यासारखं झालं. मायकल किती तटस्थपणे हे सांगतोय! मला करली नीट खाता यावा म्हणून त्यातील काटे अलगद सोडवून देणाऱ्या आशामा मानाच्या अनपेक्षित आणि अकल्पित बातमीनं मी मात्र गलबलून गेलो.

‘‘राजू, तुला जॉन आठवतो?''

मायकलच्या या अचानक प्रश्नानं मला एकदम डॉक्टर स्टिव्हन्स, मिशन हॉस्पिटलचे अमेरिकन प्रमुख आठवले. उंच, गोरेपान. येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांमधलं कारुण्म डॉक्टरांच्या डोळ्यांतही तसंच भरून. येशू ख्रिस्ताच्या मानव सेवेचं तत्त्व नसानसात भिनलेले. एका रूग्णाच्या घशात अडकलेला कफ स्वतःच्या तोंडाने खेचून काढणारे. परिसरातील सर्व जनतेला ते देवदूतच वाटायचे. त्यांचा आमच्या वयाचा मुलगा जॉन. तो शिकत होता इंग्रजी माध्यमात.पण आमच्यात राहून छान मालवणी बोलायचा. शाळेपेक्षा गावाजवळच्या डोंगरातून, जंगलातून, शेतवाडीतून, आंब्याच्या-काजूच्या बागांतून भटकण्यात, ओहोळाच्या खळाळत्या पाण्यात आंघोळण्यात, मासे पकडण्यातच आमचा तिघांचा जीव जास्त रमायचा. त्यासाठी दुपारनंतर शाळेला बुट्टी मारण्याचा ‘गुन्हा'ही आम्ही कैकदा करायचो. त्यासाठी शिक्षाही भोगल्या. आमच्यातलं नैसर्गिकपण मारून आम्हांला त्यांच्या कृत्रिम संस्कृतीचे आदर्श पाईक बनवण्यासाठी त्या आवश्यकही होत्या.

या शाळेबाहेरच्या शाळेत मायकल आम्हा दोघांचाही पिंजराबंद सुखवस्तू मध्यमवर्गीय पुस्तकी पोरांचा नैसर्गिक गुरू होता. त्याच्याबरोबर आम्ही डोंगरातून करवंदीच्या जाळ्यांतून स्वतःला ओरबाडून घेत टच्च काळी पण गोड करवंदे खात भटकायचो.वाटेत भेटणारी भली उंच वारुळं बघायचो. त्यांची टोकं मोडून आतली मुंग्यांची वसाहत न्याहाळायला मायकलनंच शिकवलं. ज्या वारुळावर मुंगी दिसत नाही, त्या ‘आयत्या बिळावर' नागोबा असतात हे मायकलनंच समजावलं. नंतर जेव्हा जेव्हा ही म्हण वापरायची वेळ आली तेव्हा या आयत्या बिळामागचं मुंग्यांचं कष्ट आठवण्याचं शाळेत न कळलेलं साक्षात्कारी तत्त्वही मायकल गुरूजींचीच देण होती, हे आता कळतंय. फांद्यांवर बसणारे पक्षी,खोडाला चिकटलेले पक्षी, जमिनीवर टुणटुण उडणारे पक्षी असेपक्ष्मांचे विविध प्रकार. ‘पक्षी म्हणजे चोच असलेला दोन पंखांचा उडू शकणारा जीव' या आमच्या ज्ञानाला विस्तारित करणाराच धडा होता. शेतजमिनीत इंचभर खोलीचा अगदी बारीक मातीचा खड्डा करून कुणी सावज घसरून थेट तळाशी येईल या आशेने दबा धरून बसलेला पाऊस किंवा मोरकिडा त्यानेच आम्हाला दाखवला. आम्ही एक लहानशी काडी घेऊन त्या मोरकिड्याच्या खड्ड्यातून फिरवत ‘‘मोरा मोरा मुंबईची वाट'' असा मुंबई कुठल्या दिशेला आहे हे धड माहीत नसताना मुंबईचं आमिष दाखवत तो किडा खड्ड्यातून बाहेर काढून मातीने भरलेल्या काडीपेटीत कैद करायचो.

ओहोळाच्या तळाशी ‘डेमका'नावाचा पाणबुडीसारखा फिरणारा मासा पकडायचं कसब मायकल तळमळीनं शिकवायचा, पण पाण्यात धप्पकन्‌ पडून तळ गाठण्याव्यतिरिक्त आम्ही दोन्ही शिष्य त्यात काही प्रगती करू शकलो नाही. काजूच्या बागेतून हिंडताना काजूची फळं खाऊन बी मात्र झाडाच्या आळ्यातच टाकायचं, जर चुकून घरी नेलं तर बीतून साप येतो अशी भीतिदायक ताकीदही न विसरता तो द्यायचा. या ताकदीची दहशत आम्हाला काही काळ तरी इतकी होती की गावातून फिरताना कुणा घराच्या अंगणातून रचलेल्या काजूबींचा ढीग दिसला की तो सापांचाच ढीग वाटून धडकी भरायची. आंब्याच्या बागेतून फिरताना मात्र मायकलचं एक निसर्गदत्त कौशल्य आमच्या मनात ठसून राहायचं, ते म्हणजे त्याचा अचूक नेम. कितीही उंचावर आणि कितीही फांदोऱ्यात दडलेला आंबा वा कैरी असो, मायकलचा दगड ते घेऊनच खाली यायचा. एका दगडाच्या फेकीत चिंचांचा, आवळ्यांचा, जांभळांचा सडा पसरावा तर मायकलनंच.

आम्ही मात्र मायकलच्या या कौशल्याच्या जिवावर रानमेव्यावर भरपेट ताव मारायचो. मायकलची नेमबाजी बहरात यायची ती गोट्या खेळताना आणि आबाधुबी खेळताना. आबाधुबी खेळताना मायकलचा नेम एकदा जरी चुकवता आला तरी खेळणाऱ्या प्रत्येकाला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद व्हायचा. मायकलने ‘शूटिंग'मध्ये करिअर केलं तर तो देशाला ऑलिंपिकमध्ये नक्कीच सुवर्णपदक मिळवून देईल, असे आम्हालाच काय, आमच्या शाळेतल्या शिक्षकवर्गालाही त्याचा खेळ पाहताना वाटायचं. पण वर्गात मात्र हाच मायकल या  शिक्षकवर्गाला एकदम मठ्ठ वाटायचा. दगड फोडायच्या योग्यतेचाही वाटायचा नाही, हे विशेष.

एकदा शाळेच्या मैदानावर आम्ही कसला तरी खेळ खेळत होतो, बहुधा क्रिकेटच. आकाशात एक छोटीशी घार घिरट्या घालत होती. आम्हा मुलांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मायकलच्या हातात चेंडू होता. आम्ही मायकलला डिवचलं,‘‘बघूया तुझा नेम. त्या घारीला मारून दाखव.''  

मायकलनंही कसलाच विचार न करता क्षणार्धांत चेंडू फेकला. नेमकं काय होतंय हे कळायच्या आधीच ती घार जीवघेणा कलकलाट करत फडफडत्या पंखांनी मैदानावर कोसळली. काहीवेळ पंखांनी आपले शरीर इकडून-तिकडे हलवत आचके देत राहिली. मग हळूहळू शांत झाली. काहीशा बालसुलभ कुतुहलाने पण बऱ्याचशा भगचकीत, सुन्न अवस्थेत आम्ही मुलं तिचं मरण अनुभवत होतो. घार निष्प्राण झाल्यावर आम्ही मायकलकडं पाहिलं. पण मायकल तिथं नव्हता, नंतर वर्गातही नव्हता. शाळा सुटल्यावर हॉस्पिटलमधल्या त्याच्या चाळीत गेलो. कँटीनमध्ये गेलो. कुठेच नव्हता.

जॉन म्हणाला, ‘‘बहुतेक चर्चच्या ग्रेव्हयार्डमध्ये असेल.''

दोघे मिळून चर्चकडे गेलो. चर्चच्या मागे जाण्यापूर्वी जॉन सवयीने प्रार्थनेसाठी चर्चमध्ये शिरला. पाठोपाठ मीही. समोर क्रुसावर येशूची करुणामयी मूर्ती. त्या भव्य हॉलमध्ये एक प्रचंड वेदनादायी पण अंगावर येणारी शांतता भरून राहिलेली. अचानक त्या शांततेलाही थरथरवणारं एक मुसमुसणं कानावर आलं. आम्ही दोघेही दचकलो. कन्फेशन बॉक्ससमोर बेंचवर मायकलच मुसमुसत होता. आम्ही जवळ गेलो. जॉनने त्याच्या पाठीवर हात ठेवला. मायकलनं वळून आमच्याकडं पाहिलं. हाताच्या बाहीनं डोळे पुसले आणि मग काहीच न बोलता चर्चबाहेर निघून गेला.

माझ्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा मा क्षणी उभा राहिला.

‘‘आता कुठं असतो रे जॉन? आणि काय करतो तो?'' आमच्या मौन संवादाला मी आवाज दिला.

‘‘डॉक्टर आणि पाळक झाला होता. ओरिसात कुठेतरी आदिवासी इलायात मिशनमध्येच काम करत होता. बजरंग दलवाल्यांनी मारलं त्याला.'' मायकलचं थंड आवाजात उत्तर.अशुभ वेळ किंवा दिवस यावर माझा विश्वास नाही, पण मायकलच्या या भेटीत मी हे सगळं अशुभच का ऐकतोय?

‘‘मायकल, तुझी नेमबाजी काम म्हणते? खरं तर आतापर्यंत तुझं नाव ऑलिंपिक वीर म्हणून कानावर यायला हवं होतं.'' मी मलाच आलेला ताण सैलावण्यासाठी म्हणालो.

‘‘मायकल डोळे बारीक करीत हसला. आपल्या धुरकट डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला, ‘‘मी अभ्यासात फारसा चांगला नव्हतोच तुला माहितीय! पाय वारल्यावर मायच्या पैशात काही भागेना, म्हणून शाळा सोडून कामधंद्यासाठी मुंबईत आलो.रात्र शाळेतून पुढे शिकता येईल असंही वाटत होतं. गॅरेजमध्ये, हॉटेलमध्ये, किराणा दुकानात, जिथं मिळेल तिथं काम केलं.कचरा वेचला, भंगार गोळा करून विकलं, दिवसभर कामानं जीव थकून जायचा, मग शाळेची उमेद राहायची नाही. बांदऱ्याच्या झोपडपट्टीत एका टपरीत माय आणि बहिणींसह राहायचो. माय तिथंच टी.बी.नं मेली. एका बिहाऱ्यानं टॅक्सी चालवायला शिकवली. शिकलो. चालवता चालवता स्वतःची टॅक्सी केली. धंदा जमला, एकाच्या दोन टॅक्शा झाल्या. विरारला एक फ्लॅटही घेतलाय. बायको हाऊस वाइफच आहे, बांदऱ्याच्या झोपडपट्टीतलीच. दोन मुलं आहेत. कॉन्व्हेंटमध्ये शिकताहेत.''

मायकलनं एका झटक्यात मी काही प्रश्न विचारायच्या आधीच आपला बायोडेटा सांगून माझं तोंड बंद केलं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पुन्हा भेटायचं ठरवून उठलो. उठता उठता त्याच्याकडं पत्ता मागितला. त्यानंही एका कागदाच्या तुकड्यावर आपला पत्ता लिहून माझ्या हातात दिला. हॉटेलचं बिल त्यानं देऊ दिलं नाहीच.

हॉटेलबाहेर आलो. पायऱ्या उतरून रस्त्यावर आलो. निरोपासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आवाजही किंचित कातर घोगरा झाला.

‘‘राजू...'' मायकलचा गळा अक्षरश: भरून आला होता.

‘‘भेटू... नक्कीच.'' मी त्याच्या हातावर थोपटून पाठमोरा झालो. मलाही जाणवलं, आपल्यालाही हुंदका अनावर होतोय.

‘‘एक मिनिट राजू...'' मला पाठीमागून मायकलचा थांबवणारा आवाज आला.

‘‘काय मायकल?'' मी त्याच्याकडे वळत म्हणालो.

‘‘तो पत्याचा कागद आण जरा इकडं...'' मला वाटलं, काहीतरी दुरुस्ती करायची असेल त्याला. मी कागद त्याच्या हातात दिला. त्यानं त्याचे फाडून बारीक बारीक तुकडे केले आणि हवेत भिरकावून दिले.

मी स्तंभितच! माझा चेहरा अस्वस्थ प्रश्नार्थक. मायकलनं माझा हात हातात घेतला, पण यावेळी त्यानं आपली नजर माझ्या नजरेला भिडवली नाही. खाली पहातच म्हणाला, ‘‘राजू, मला माफ कर. ही आपली अखेरचीच भेट. इथून पुढे आपण भेटलो तरी एकमेकाला ओळख दाखवायची नाही. मी मघाशी खोटं बोललो तुला. मी आता तो तुझा बालपणीचा आंबे पाडणारा नेमबाज मायकल राहिलेला नाही. टॅक्सी हा माझा दाखवायचा धंदा आहे. परिस्थितीचा दोष म्हण किंवा नशिबाचा, मी आता अंडरवर्ल्डमधल्या एका गँगसाठी ‘शार्पशूटर' म्हणून काम करतोय. आतापर्यंत पाच ‘गेम' झालेत माझ्या हातून. तुझ्यासारख्या साध्यासरळ माणसाची माझ्याशी ओळख असणं हेही खतरनाक आहे तुझ्यासाठी. पण राजू, खरं सांगतो, मला असला शूटर व्हायचं नव्हतं रे...''

एवढं बोलून मायकल गप्पकन्‌ वळून चालू लागला. चालताना त्याच्या झुकलेल्या खांद्यातून त्याचा नावरता भावनावेग भळाळत होता.

मी सुन्न की भिन्न, मला काहीच कळत नव्हतं. आपल्या हातून घार मेली म्हणून चर्चमध्ये पश्चात्तापाने रडणारा तेव्हाचा बाल मायकल खरा की माणसं मारण्याची सुपारी घेणारा आताचा प्रौढ मायकल? माझ्या मेंदूत एक पोकळीच निर्माण झाली, आणि त्यात मी अंतराळी भिरभिरलो. समोर मायकलनं टरकावलेल्या पत्त्याच्या कागदाचे काही कपटे हवेत गिरक्या घेत होते...

Tags: न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे साहित्य ललित मायकल maykal lalit raja shirguppe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके