डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तर रशियन क्रांतीला विधायक दिशा सापडली असती !

माणूस हा केंद्र न राहिल्यामुळे ज्या सत्तेने कम्युनिझमचा झेंडा दाखवण्यापुरता हातात धरला होता, त्यांचा मुखवटा लवकर गळून पडला आणि अतिक्षीणही झाला, तेवढेच अमानुषपण अंगी बाळगणाऱ्या भांडवलशाहीने मात्र अपंग व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत ठेवून स्वत:लाही शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. गांधी आणि मार्क्स या दोन मानवतावादी विचारवंतांचा साक्षेपाने विचार होण्याची गरज असताना एकाचा भांडवली उपयोग, तर दुसऱ्याचा भांडवल-हितासाठी नायनाट करण्याचाच सातत्याने प्रयत्न चालला आहे. खरे तर, या दोन कृतिशील विचारवंतांचा (खरे म्हणजे लेनिन धरून तीन) गंभीरपणे विचार करण्याच्या काळात आजच्या प्रस्थापित व्यवस्था स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी या दोघांचाही खूप उथळ वापर करत आहेत, असेच दिसते.

संपूर्ण जग किंवा अधिक शास्त्रीय बोलायचे, तर तीन-चतुर्थांश जग हे आज कोरोनाग्रस्त आहे. मराठी भाषेत अशा रोगाच्या साथीला ‘मानवी जीवनाचा कर्दनकाळ’ या अर्थाने महामारी म्हटले जाते. या महामारीने अतिविकसित, विकसित आणि अर्धविकसित देशांमध्ये प्रचंडच हाहाकार उडवला आहे. अविकसित देशांत नेमकी काय परिस्थिती आहे, याची नीट खबरबात मिळत नसल्यामुळे तिथे या रोगाचे स्वरूप काय आहे, याची नेमकी कल्पना नाही. पण गम्मत अशी आहे की- ज्यांनी सुरक्षित असायला हवे होते असा सर्वसाधारण समज आहे, त्या अतिप्रगत देशांत या महामारीने प्रचंड हाहाकार माजवला आहे, असे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या बातम्यांतून दिसते आहे. हे नेमके कशाचे चित्र आहे? म्हणजे विकासाची अयोग्य दिशा की विकासाचे व्यापारीकरण, की मानव आणि मानवी समूहांचे केवळ स्वहितदर्शी राजकारण- असा मूलभूत चिंतनाचा व चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजेच हा प्रश्न निसर्गनिर्मित की मानवनिर्मित, याचा विचार करण्याची गंभीर स्थिती आली आहे. खरे तर, मानवी उत्क्रांती (आजच्या परिभाषेत तथाकथित विकासात) हा प्रश्न मानवी इतिहासात वारंवार उपस्थित झालेला आहे आणि त्याकडे काही मूठभर संवेदनशील महात्मे सोडून बाकी सत्ताग्रस्त मानवी समाजाने गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही.

नेमका याच काळात दोन महामानवांनी- ज्यांनी जगाचा माणसासाठी केवळ मानवी जीवन निरामय, सुखदायक होण्याचा विचार व प्रयत्न केला, ते महात्मा गांधी आणि कॉ. लेनिन. जग सुखी बनवण्याचा दोघांच्याही  विचारधारांचा जगभर जेवढा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे होता, तेवढा झालेला दिसत नाही. महात्मा गांधींच्या वरवर वाटणाऱ्या राजकीय निरुपद्रवामुळे त्यांचे मानवी जीवन बदलणारे मूलभूत विचार वगळून केवळ त्यांच्या स्वच्छता अभियानाची आणि अहिंसेची सोईपुरती चर्चा जगभर करून, त्यांची आठवण जागवण्यात आली. तर, लेनिनला खुद्द त्याच्याच देशातील नव्या पिढीने ‘क्रूरकर्मा’ ठरवून, त्याचे पुतळे उखडून त्याला इतिहासातून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. एकूणच या दोघांनी जगाला मानवी चेहरा देण्यासाठी केलेले प्रयत्न मातीमोल ठरवून, त्यांचे क्रांतिकारकत्व क्षूद्र ठरवत दोघांचेही नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न झाला व होत आहे.

महात्मा गांधींची 150 वी जयंती संपून अजून वर्षही झालेले नाही आणि लेनिनची 150 वी जयंतीही या एप्रिलमध्ये संपते आहे. खरे तर, जग बदलण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या संस्था आणि त्याचबरोबर अशा संस्थांना अनुरूप होण्यासाठी घडवले जाणारे मेंदू समांतरपणे बदलणे गरजेचे आहे. दुसरी प्रक्रिया अधिक मूलभूत आहे आणि संपूर्ण जगात ख्रिस्त, पैगंबर, कन्फ्युशियसच्या आधीही बुद्ध व महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी या भूमीवर मांडली होती. शस्त्रे सत्ता बदलवू शकतात, पण ती सत्ता राबवणारे मेंदू नाही. विचार करण्याची प्रक्रिया बदलूनच विचार करणारा मेंदू बदलवता येतो. याचे भान बुद्ध आणि महावीर या दोन्ही शस्त्रधारी जमातीत जन्माला आलेल्या महामानवांना नेमके आले होते. त्यांचाच पाझरलेला विचार महात्मा गांधींना लाभला होता आणि म्हणून शस्त्रापेक्षा विचारांचे व विचारांना वाहणाऱ्या शरीराला क्षती न पोहोचवण्याचे सामर्थ्य गांधीजींना अहिंसेच्या रूपाने  कळले होते. लेनिनच्या एकूण व्यवहारात त्याला याची जाणीव नव्हती, असे दिसत नाही. पण ज्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत तो सापडला होता, ती बदलण्यासाठी त्याला ताबडतोबीने का होईना, सत्ता ताब्यात घेणे हाच रास्त पर्याय वाटत असावा. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने ती कृती करून त्याने  ती मिळवली. महात्मा गांधींना जसे बुद्ध आणि महावीर हे आधीच पर्याय म्हणून उपलब्ध होते, तसे त्याला नसल्यामुळे ते  सोईचे वाटले असावे. पण लेनिनचा पुढचा अल्प प्रवास पाहिला, तर तो निश्चितच अशा विधायक मार्गाने गेला असता, असा तर्क करायला वाव आहे. मात्र, आता अशा प्रकारच्या कल्पना-चिंतनाला काळाने फारसे महत्त्व शिल्लक ठेवलेले नाही.

या देशात महावीर, गौतम बुद्ध ते महात्मा गांधी अशी राज्यसत्ता वगळून माणसाबद्दल निखळ विचार करणारी  एक परंपरा आहे. तशीच पुष्यशृंग-मित्रापासून हेडगेवार, डॉ. मुंजे-सावरकरांपर्यंतची जात व वंशश्रेष्ठत्व सांगणारी परंपरा आहे. अर्थात शोषक व शोषितांमध्ये शोषित हे नेहमीच बहुसंख्य असतात. त्यामुळे बुद्धापासून गांधींपर्यंत जरी हा वर्ग सत्य अर्थाने सत्ताधारी होऊ शकला नाही, तरी त्यांच्या मनात ते कायम आदर्श म्हणून राहिले. त्यांच्या ल0ोकशाहीवादी मानसिकतेतूनच पुष्यशृंग-मित्राच्या वारसांना बुद्ध आणि गांधींचे नाव घेतच सत्ता मिळवावी लागली. दोघांचे चेहरे व पोशाख समोर ठेवून  विचार मात्र ते पायदळी तुडवत, सर्वसामान्यांची दिशाभूल करत, सुखनैव सत्ताकरण करत आहेत. कारण बुद्ध आणि गांधी यांनी वर्गशत्रूची संकल्पना म्हणजे शत्रुत्वाचीच संकल्पना मोडीत काढत माणूसपणाची कास धरली होती.

व्यवस्थेपेक्षा व्यवस्था चालवणारे मेंदूच जास्त महत्त्वाचे, या महावीर- बुद्धांना कळलेल्या विचारांची सत्यता त्यांना पटली होती. दुर्दैवाने मानवी समाज शोषणमुक्त करण्यासाठी झपाटलेल्या लेनिनसारख्या महामानवाला तत्कालीन परिस्थितीच्या मर्यादांत हे कळले नाही आणि केवळ भौतिक परिस्थिती बदलली की संस्कारित मेंदूही बदलतील, असा त्याचा भौतिकवादी समज होता. पण या विचारांची मर्यादा उमजण्याइतकी नियतीने त्याला सवड दिली नाही. त्याचा उण्यापुऱ्या चोपन्न वर्षांच्या आयुष्याचा प्रवास पाहता, त्याला थोडे अधिक आयुष्य लाभले असते तर त्याला याही मर्यादेचे भान आले असते, हे निश्चित. कारण उत्पादनव्यवस्थेवरती सामूहिक सत्ता असे; त्यामध्ये लोकशाहीचा अभाव असेल तर पुन्हा एकदा एकचालकानुवर्ती सत्तेचेच दुसरे रूप बनते, हे नंतर रशियात आणि आता चीनमध्येही सिद्ध होते आहे.  हे एकचालकानुवर्तित्व हे इतके ढोबळ आणि ढळढळीत असते की, मग या राजसत्ता त्यामागे असलेल्या सामाजिक विचारांना विकृत व विनाशकारी बनवतात. आज जगभर कम्युनिझमचे असे विकृतीकरण झालेले आहे, ते एकानुवर्ती (व्यक्ती आणि पक्ष) सत्तेने केले आहे. त्याचा दुर्दैवी परिणाम असा- लोकशाही या अतिशय सर्वश्रेष्ठ अशा सामाजिक -राजकीय व्यवस्थेचा गैरफायदा भांडवलशाही घेते आणि मानवजातीच्या कल्याणाचा सर्वंकष विचार करणाऱ्या कम्युनिझमला बदनाम करत रद्दबातल ठरवते. खरे तर, भांडवलशाही ही दोन  बलिष्ठांमधील स्व-अस्तित्वाची लढाई असते आणि त्यांच्या झुंजीत ज्यांच्या जोरावर हे दोन पुष्ट लढत असतात, ते अमानुषणे तुडविले जातात, हेही तितकेच खरे. अर्थात सत्ताही कुठलीही संकल्पना घेऊन राज्य करू लागली, तरी अंतिमत: ती स्वहितासाठी आड येणारी स्वत:ची पिलेही खाते, हे तितकेच सत्य आहे.

त्यामुळे भांडवलशाहीमधील वरवर दिसणारे व्यक्ति-स्वातंत्र्य कम्युनिझमच्या लेबलाखाली कार्यरत असलेल्या एकाधिकारशाहीमध्ये थेटच लोप पावल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यप्रेमींना कम्युनिझम ही एक भयकारी व्यवस्था वाटू लागते. तसे खरे तर, भांडवलशाहीबद्दलही वाटायला हवे. कारण सत्ता ही गोष्ट केंद्रीभूत व्हायला लागली की, तिला कुठलेही आदर्श उरत नाहीत, सत्ता टिकवणे या एककेंद्री विचाराशिवाय आणि सत्ता स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी  आपल्या विरोधी विचारांना बदनामीच्या गर्तेत नेहमीच ढकलत असते. माणूस हा केंद्र न राहिल्यामुळे ज्या सत्तेने कम्युनिझमचा झेंडा दाखवण्यापुरता हातात धरला होता, त्यांचा मुखवटा लवकर गळून पडला आणि अतिक्षीणही झाला, तेवढेच अमानुषपण अंगी बाळगणाऱ्या भांडवल-शाहीने मात्र अपंग व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत ठेवून स्वत:लाही शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. गांधी आणि मार्क्स या दोन मानवतावादी विचारवंतांचा साक्षेपाने विचार होण्याची गरज असताना एकाचा भांडवली उपयोग, तर दुसऱ्याचा भांडवल-हितासाठी नायनाट करण्याचाच सातत्याने प्रयत्न चालला आहे. खरे तर, या दोन कृतिशील विचारवंतांचा (खरे म्हणजे लेनिन धरून तीन) गंभीरपणे विचार करण्याच्या काळात आजच्या प्रस्थापित व्यवस्था स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी या दोघांचाही खूप उथळ वापर करत आहेत, असेच दिसते. हे दोन्हीही विचारवंत अंतिमत: राज्य ही संकल्पना नाकारण्याच्या, म्हणजेच अराजकवादाच्या दिशेने जातानाच स्पष्टपणे दिसतात. त्यांच्या अंतिम ध्येयाकडे जाण्यापूर्वीच त्यांचे भौतिक अस्तित्व प्रस्थापित व्यवस्थेने संपवले आहे.

‘साप्ताहिक साधना’ने लेनिनच्या 150 व्या जयंतीनिमित्त एका चांगल्या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल संपादकांचे आभार. वरवर कम्युनिझमला विरोधी वाटणारा कुमार केतकर यांचा एक महत्त्वाचा लेख या विषयाच्या अंगाने वाचता आला. त्यांनी इतिहासाची मांडणी बऱ्यापैकी  केली आहे. पण त्या इतिहासाचे त्यांना जाणवणारे विश्लेषण त्यांनी अधिक खोलवर केले असते, तर आजच्या रशियाच्या अवनतीचे आणि मार्क्सच्या विचारांचे अपुरे आकलन अधिक सुस्पष्ट झाले असते. गॉर्कीचा लेख वाचताना ज्या पद्धतीने लेनिन आपल्या विरोधकांकडेही मानवी विकासासाठी मार्गदर्शक म्हणून पाहतो, हे खूपच स्पृहणीय वाटले. त्या लेनिनला आणखी आयुष्य लाभले असते, तर रशियन क्रांतीला एक विधायक दिशा सापडली असती, हे निश्चित.

संपूर्ण जग एका घोर अशा दिशाहीनतेत सापडले असताना, ज्यांचे माणूसपण जागे आहे ते मूठभर असले तरी एकूणच जगाच्या आणि तदनुषंगाने मानवतेच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार मांडत कृतिप्रवण होतील, एवढा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला साधनेच्या या विशेषांकाने दिला, यासाठी साप्ताहिक साधना व त्याच्या संपादकांचा कृतज्ञपूर्वक आभारी आहे.
 

Tags: राजा शिरगुप्पे कुमार केतकर महात्मा गांधी मार्क्स लेनिन lenin marx mahatma gandhi raja shirguppe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके