डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्री ही सर्वच काळात एक अगम्य, गूढ आणि तरीही सहजपणे समजल्यासारखं वाटणारं रहस्य राहिलं आहे. मानवी उत्क्रांतीमध्येही अत्यंत मूलभूत अशी भूमिका स्त्रीने बजावली. तरीही ती सदैव दुय्यम, बहिष्कृत आणि तिरस्कृत राहिली. खरे तर तिला अबला म्हणणे हा धैर्याचा, शौर्याचा आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेचा अपमान आहे. पण दुर्दैवाने, स्त्रीची सोशिकता आणि समाजाच्या संरक्षणाची एक नैसर्गिक जबाबदारीची जाणीव यातून तिला पुरुषांच्या गुलामीला सामोरे जावे लागले.  ‘बाई-जात’ या मालिकेतून असेच काही स्त्रियांच्या अनाकलनीय वाटणाऱ्या पण थोर गुणांचा शोध घ्यायचा प्रयत्न मी करणार आहे.

गर्दीचा एक विशेष असा की एकांतातल्या एकटेपणापेक्षाही आपण गर्दीत जास्त एकटे असतो. अर्थात ही गर्दी कुठल्या प्रकारची आहे हेही महत्त्वाचे. कारण गर्दीचेही अनेक प्रकार आहेत. बाजारातली गर्दी, धार्मिक स्थळांवरची गर्दी, खेळाच्या मैदानावरची गर्दी, चित्रपट-नाट्यगृहात जमणारी गर्दी, लग्न वा तत्सम सार्वजनिक कार्यक्रमांतून होणारी गर्दी, पर्यटन स्थळांवरची गर्दी ही एक प्रकारची. म्हणजे या गर्दीला गर्दी होण्यासाठी काही एक समान उद्देश असतो. ही गर्दी एकदा जमली की स्थिर होते आणि सामूहिक एकत्व पावून एखाद्या एकच एक विराट मानवासारखा व्यवहार करते. सुरवातीलाच मी गर्दीचा जो विशेष सांगितला आहे, तो या गर्दीचा नव्हे; दुसरी एक गर्दी आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण तिचा दररोजच अपरिहार्य घटक असतो.

ती म्हणजे प्रवासी गर्दी, रस्त्यावरली वा विविध वाहनांतून या गर्दीची ये-जा चालू असते. त्या अर्थाने ती कधीच स्थिर नसते. ती नेहमीच अथकपणे हलती असते. माणसं एकत्र दिसतात या गर्दीत, पण या गर्दीतला माणूस मात्र सुटा सुटाच असतो. ही गर्दी म्हणजे एक न संपणारी अखंड साखळी असते. एखादी कडी वा कड्या तुटल्या किंवा बाजूला झाल्या तरी साखळी अखंड राहते. गर्दीविषयी हे एवढं सारं सांगायचं कारण एवढंच की मी हे सारं नेहमीच रेल्वेच्या प्रवासात साक्षात अनुभवतो. रेल्वेच्या प्रवासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या पोटात गावंच्या गावं भरून धावताना, या अस्थिर गर्दीला निदान काही काळ गतिमान स्थिर बनवते. या गर्दीत शुष्क छातीला लुचणारं कळकट पोर घेऊन बाबा म्हणत, हात पसरणारी भिकारीण असते, तर तिच्याकडे दुर्लक्ष करून तृप्त पोटाने साखरपाकात डुंबलेली जिलेबी ओरपणारी, तुपाचा रांजण वाटणारी तुपाळ देहाची शेठाणी असते. 

गर्दीतल्या मादक भासणाऱ्या तरुण मादी देहांना नजरेने ओरबडणारा टपोरी असतो, तर दिवसभराच्या पोट भरण्याच्या धडपडीनं रात्री झोपायचंही त्राण देहात न उरलेला नोकरदार असतो. यांच्यामुळे माझ्या आयुष्याचा नाश झाला, असा कुटुंबीयांविषयी त्रागा करणारा जख्खड म्हातारा असतो. तर नातवासाठी भेळीचा पुडका सांभाळणारा कुणी निवृत्त जगणारा ज्येष्ठ नागरिक असतो. अगणित माणसं अगणित कथा आणि व्यथा घेऊन, बसून, उभे राहून, लोंबकळून या रेल्वेच्या गर्दीत गर्दी होऊन पण सुटी सुटीच प्रवास करत असतात. रेल्वेच्या या गर्दीतला मीही एक असतो कैक वेळा. पण माझा व्यवसायच असा आहे की मी मात्र या गर्दीपासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे मी काही फिरता विक्रेता नाही रेल्वेमधला. मी लेखक आहे आणि लेखक म्हणून ही माणसांची गर्दी माझ्या लेखनाचा कच्चा माल आहे. त्याच अधाशी लालसेने मी या गर्दीकडे पाहत असतो.

आताही मी या पॅसेंजरमधील एका डब्यात गच्च गर्दीनं भरलेल्या डब्यात, बरोबर खिडकीजवळची जागा सवयीच्या कौशल्यानं पकडून बसलोय. डब्यात वाढत जाणाऱ्या गर्दीला न्याहाळतोय. मला लगटूनच बसलेल्या मध्यमवयीन शेजाऱ्यानं बसल्याक्षणीच झोपेचा मंद स्वर लावलाय. रेल्वे डब्यातल्या बाकड्याचा स्पर्श बऱ्याच वर्षाच्या नियमित प्रवासाने त्याच्यासाठी झोपेचा हुकमी प्रेरक झाला असावा. मला रशियन मानसशास्त्रज्ञ पाव्हलोव्हच्या कुत्रा, मांसाचा तुकडा आणि घंटेच्या आवाजाचा प्रयोग आठवायला लागलाय. खरं तर कुत्र्याच्या तोंडाला सुटणारी लाळ ही मांसाच्या तुकड्यासाठी असते. पण नंतर सवयीने ती घंटीच्या आवाजानेही सुटायला लागते, असा काहीसा तो प्रयोग होता. आपले नैसर्गिक वर्तनही कसं ‘कंडिशनल’ बनवता येतं याचा तो दाखला.

माणसांचे समूहच्या समूह एका व्यक्तीचे, व्यवस्थेचे वा शक्तीचे गुलाम कसे बनवता येतात याचा हा प्रयोगशाळेतला पुरावा. शेजाऱ्याचं निद्रिस्त डोकं माझ्या खांद्याकडे झेपावतेय आणि माझा खांदा प्रतिक्षिप्त आक्रसतोय. त्याच्या शेजारी बसलेली नोकरदार महिला आपल्या हातातील चमकदार प्लॅस्टिक कागदाच्या पुड्यातील बटाटे वेफर्स पुडा आणि तोंड एकाच लयीत कुरकुर वाजवत खातेय. सहप्रवासी तिला, तिच्या खाण्याला, तिच्या भल्यारुंद पर्सला आळीपाळीने निरखताहेत. तिची नजर त्यांच्याकडे वळताच त्यांच्या नजरा खिडकीतून बाहेर प्लॅटफॉर्मवर जाऊन उभ्या राहताहेत.

एक म्हातारी गच्च झालेल्या बाकड्यांवर बसलेल्यांना जरा सरकायची विनंती करते आहे. बसलेल्यांना बाकडं नेहमीच गच्च झालेलं वाटतं, तर उभे असलेल्यांना थोडीतरी रिकामी जागा दिसत असतेच. म्हातारीसाठी कुठे जागा होईल याचा शोध घेत माझी नजर विरक्त सहानुभूतीने माझ्या कप्यातून फिरते. माझ्यासमोरच एक पंचविशीतला तरुण बसलायं. शेजारी आपली हँडबँग ठेवून. बहुतेक त्यानं कुणासाठी तरी जागा धरून ठेवलीय. तरीही मी त्याला म्हातारीला जागा देण्यासाठी टोकतो.  ‘‘नाही... नाही... लेडीजसाठी धरून ठेवलीय.’’ तरुणाचं थोडं नाराजीनं पण बरंचसं नम्र उत्तर. 

इंग्रजीतलं अनेक वचनी लेडीज मराठीत आता एकवचनी म्हणून रूढ झालंय. भाषेच्या देवाणघेवाणीत केवळ रूपांतर, शब्दांतर, अर्थांतरच होत नाही. असं वचनांतरही. त्याच्या ‘लेडीज’साठी मग माझ्या बाकड्यावरची गर्दी थोडी मागेपुढे होत, केवळ ती भल्यारुंद पर्सची नोकरदार महिला वगळता, त्या म्हातारीला सामावती झाली. भल्यारुंद पर्सच्या वेफर्सच्या कुरकुरीत थोडी नाराजीची कुरकुरही मला ऐकायला आली. काही इंच जागेचा संकोचही बहुधा मान्य नसावा तिला. 

मी त्या ‘लेडिज’ची वाट पाहणाऱ्या तरुणाला न्याहाळतोय. कुणीही सहज दोन मिनिटं पाहात राहावं असं त्या तरुणाचं व्यक्तिमत्त्व नक्कीच असावं. साडेपाच-पावणेसहा फूट उंची, अणकुचीदार नाक, भारतीय गोरा रंग, अमीरखानच्या जमान्यातही केसांचा देवानंद कोंबडा, चौकड्याचा शर्ट, जिन्स पँटवर टापटिप इनशर्ट केलेला, डोळे मात्र मलूल, पण निस्तेज नव्हते. डब्यातल्या मधल्या मार्गिकेतील गर्दीवर तो वारंवार आपली नजर टाकतो. प्रत्येक वेळी त्याची अस्वस्थता अंशाअंशाने वर चढतेय, जी त्याच्या देहभर पसरतेय.

गाडी सुटलीय. कुप्यामधल्या प्रत्येकाचा आणि त्याने अडवून ठेवलेल्या जागेवर ज्या उभ्या असलेल्या प्रवाशांचे लक्ष होते, त्यांचा चेहरा प्रश्नार्थक होत त्या तरुणाकडे पाहतोय. तरुणाच्या अस्वस्थेतेने परमोच्च बिंदू गाठलाय बहुतेक. तेवढ्यात गर्दीचं पोट फाडत तंग चुडीदार घातलेला एक पाय आणि पाठोपाठ रेशमी कलाकुसरीचं जरीकाम केलेला हिरवागार फ्रॉकसारखा खमीज घातलेली एक तरुण मुलगी त्या तरुणाकडे येतेय. तरुणाच्या चेहऱ्यावरचा शरमलेला ताण जाऊन तो आम्ही सहप्रवाशांकडे झुंजीत जिंकलेल्या कोंबड्याच्या तोऱ्यात पाहतोय. 

‘‘किती उशीर?’’ तरुणाचा प्रेमळ वैताग. ‘

‘काय करणार रे जयू? ऐन वेळी निघताना एक कस्टमर आलं. मोठं पॅकेज होतं. मग सगळ्या सहलीचं पॅकेज त्यांना समजावून द्यावं लागलं.’’

पोरगी कुठल्यातरी सहल कंपनीत नोकरी करतेय एवढा पत्ता गर्दीला क्षणात लागतो. तरुण आपली हँडबॅग उचलून मांडीवर घेतो. तरुणी त्या जागेवर त्याच्या मांडीवर बसल्यासारखी हुरूपाने बसते. त्या जागेवर हपापलेली गर्दी आता हिरमुसून पण अधिक समरसून त्या दोघांच्या परीक्षणात दंग. मी तर लेखक. माझा धंदाच तो.  

स्मिता पाटीलची आठवण करून देणारा चेहरा आणि अंगकाठी. स्मितासारखेच डोळे टपोरे, तेजस्वी, आक्रमक, लयदार लाटांसारखे कुरळे केस, त्यांची घनदाट पोनीटेल बांधलेली. एक छोटासा जेवणाचा डबा नि मोबाइल मावेल अशी छोटीशी चामड्याची काळी नक्षीदार पर्स. कुठल्याही कार्यालयात ‘स्वागतिका’ शोभेल एवढा चुणचुणीतपणा आणि उत्साह देहभर भरून.  दोघेही आपापसात काहीतरी मधुर बोलताहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यखुणांनी जाणवतंय. पण गाडीच्या खडखडाटात गर्दीला ते काही ऐकू येत नाहीय. त्याच्या चेहऱ्यावर केवळ स्मित, तर ती अधूनमधून मोकळेपणाने किणकिणतेयं. 

आता माझ्या लक्षात येतंय, ती मघापेक्षा त्याला अधिकच खेटलीय, नव्हे बिलगलीय. आपला एक हात तिनं त्याच्या हातात साखळीसारखा अडकवून त्याचा पंजा हातात घेतलाय. आजूबाजूची गर्दी विसरून तिरप्या नजरेने एकटक त्याला पाहतेय.  तो तरुण आता मात्र अस्वस्थ वाटू लागलाय. तिचं खेटणं, बिलगणं त्याला हवंही आहे आणि नकोही. आजूबाजूची गर्दी आपल्यावर लक्ष ठेवून आहे या जाणिवेने तो हवालदिल आहे. 

कपाळावर जमा होणारे तुरळक धर्मबिंदू रुमालाने पुसत तिच्या बिलगण्याची आपल्याला जाणीव नाही असं भासवण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय. बघता बघता त्या मुलीनं आपलं डोकं त्यांच्या खाद्यांवर विसावलं आणि अत्यंत सहज विश्वासाने त्याचा पंजा घट्ट पकडून ती झोपलीसुद्धा. तिच्या मिटल्या डोळ्यांवरही एक  सुखाचं स्वप्नपाखरू फडफडतंय. हे लख्ख जाणवतंय. तरुणानं आपली नजर आता खिडकीबाहेरच्या अंधारात मिसळून टाकलीय. गर्दी मात्र मनातल्या मनात रिकामा वेळ बरा चाललाय या समजुतीत हसत असावी. 

आपलं लाडकं खेळणं कुणी घेऊ नये म्हणून लहान मुलं झोपेतही ज्या घट्टपणे ते छातीशी धरून झोपतात, तसंच काहीसं मला त्या मुलीकडं पाहून वाटतंय. अधूनमधून डब्याला बसणाऱ्या हादऱ्यामुळे तिची त्याच्या हातावरची पकड अधिक घट्ट होते. तेव्हा तो आकसताना, तर गर्दी आतल्या आत खुसखुसताना दिसतेय. त्या झोपलेल्या मुलीला मात्र हा वेळ घट्ट पकडून ठेवायचाय हे नक्की. त्या तरुणाच्या खिडकीजवळ बसलेला नोकरदार प्रौढ गृहस्थ आता ‘थम्सअप’ पितोय. घुटक्या घुटक्यानं. माझ्या अनुभवी नजरेनं मी ओळखलंय, तो केवळ थम्सअप पीत नाही. त्याच्या डोळ्यातली चमक वाढत चाललीय. रेल्वेच्या शिटीवरून कळतं, कुठलंसं स्टेशन जवळ येऊ लागलंय. 

तो तरुण घाईघाईनं त्याच्या खांद्यावर रेललेल्या तिच्या डोक्याला जोराने हलवतोय. परिकथेतली ती शंभर वर्षं झोपलेली राजकन्या तिला शोधत आलेल्या राजकुमाराच्या स्पर्शाने जशी जागी झाली असेल, तशी ती जागी होतेय. स्वप्नभूमीतून वास्तवभूमीत पाऊल टाकताना सुरुवातीच स्वर्गीय स्मित वास्तवाच्या भानाने केवळ तरंगरूपाने उरल्यासारखे तिचा चेहरा तृप्त आणि बराचसा अतृप्त. त्याचा हात हातात घेऊन किंचित दाबत बहुधा त्याचा निरोप घेतेय.येतानाचा तिचा आतुर पाय आता जडशीळ होत गर्दीत शिरलाय. गर्दीनं तिला पोटात घेऊन आपलं पोट शिवून टाकलंय. तिच्या रिकाम्या झालेल्या जागेवर पांढऱ्या मिशांचा लाल मुंडासंवाला कुणी शेतकरी तोंडात तंबाखू धरून बसलाय. 

पहिल्यांदाच तो तरुण माझ्याकडे पाहून थोडासा लाजवट हसला. माझ्यासाठी एवढी संधी पुरेशी आहे. 
‘‘पुण्यात शिकतोयस की नोकरी करतोयस?’’ मी माझ्या पिकल्या दाढीचा आधार घेऊन नेहमीच तरुणांशी एकेरीवर बोलतो. त्यामुळे संवादात लौकर मोकळेपणा येतो असा माझा अनुभव. 

‘‘नाही. नोकरी करतोय एका आयटी कंपनीत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मी.’’  तरुणालाही माझ्याबद्दल विश्वास वाटला असावा.

‘‘आणि तुझी मैत्रीण?’’ बहुधा या वेळी माझ्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असावं. 

‘‘ती एका ट्रॅव्हलिंग एजन्सीत रिसेप्शनिष्ट आहे.’’ तरुणाचं लाजत उत्तर. माझा अंदाज खरा ठरला तर. 

‘‘छान आहे तुझी मैत्रीण. कधी लग्न करताय?’’ माझा माझ्या शैलीनं थेटच प्रश्न. 

या प्रश्नावर तो तरुण लाजला की गोरामोरा झालाय याचा मला नीटसा अंदाज आला नाही. 

‘‘नाही सर. लग्न नाही करणार.’’  तरुणाचं अडखळत, सांगावं की न सांगावं या दुविध्यात, मग अखेर स्पष्ट उत्तर. 

‘‘मग काय लिव्ह इन रिलेशनशिप?’’  मलाही बदलत्या, नव्या जगाचं भान आहे, हे दाखवण्याचा माझा तरुण प्रयत्न. 

आता मात्र तो तरुण माझ्याकडे थेट रोखून पाहतो. मग सांगतो, ‘‘नाही सर, आमच्या घरातील लोकांना तसलं नातं आवडणार नाही. खुद्द मलाही. बाई ठेवणं आणि असं राहणं यात काही फरक वाटत नाही मला. त्यामुळे तिला असा दर्जा देणं माझ्या मनाला पटत नाही.’’ 

‘‘पण तू तर लग्नही करणार नाही म्हणतोयस.’’ माझी उत्सुकता त्या मुलीच्या चिंतेत परिवर्तित होऊ लागली असावी. 

‘‘हो, कारण आमच्या स्टेटसशी तिचं घराणं जुळत नाही.’’ 

‘‘म्हणजे?’’ 

‘‘आम्ही शहाण्णव कुळी मराठे आणि ती हलक्या मराठ्यांपैकी, म्हणजे कुणबी वगैरे म्हणतात त्यांच्यापैकी.’’ 

‘‘पण तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर?’’ 

‘‘हो, आहे ना. एकमेकांना आवडलो तेव्हा लग्न वगैरे करायचं असतं याचं काही भान नव्हतं.’’ 

तो तरुण गंभीर तत्त्वज्ञानासारखं मला सांगू लागलाय. या तरुणाची मला गंमतच वाटतेय. खरं तर तो माझ्यासारख्या अनोळख्याला ‘करणार आहोत आम्ही लौकरच लग्न’ असं सांगून विषय बंद करू शकला असता. पण हा सरळच नाही म्हणून सांगतोय. हा त्याचा प्रामाणिकपणा समजू, सालसपणा ठरवू की भाबडी अपरिपक्वता? प्रश्नांचे भुंगे लेखकाच्या मेंदूभोवती फिरू लागलेत.

‘‘पण आता ती तुझी नैतिक जबाबदारी आहे ना? की घरातून हाकलून काढतील, वडिलार्जित संपत्तीवर पाणी सोडावं लागेल म्हणून घाबरतोहेस?’’ मुलीची चिंता मला आक्रमक बनवू लागलीय बहुतेक. 

‘‘संपत्तीची भीती नाही मला. खूप कमावतोय मी. पण आजवरच्या आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेचं काय होईल? माझे काका आमदार आहेत. त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचं काय? एका मुलीसाठी मी माझं अखंड कुटुंब-नातेवाईक तोडायचे काय?’’

‘‘पण ती मुलगीही आपलं कुटुंब त्यागूनच येणार ना तुझ्यासोबत?’’  आता मी त्या मुलीचा वकील झालो. 

‘‘ते काय, मुलींना आपलं कुटुंब सोडावंच लागतं.’’ 

‘‘त्या मुलीला तू हे सांगितलंयस?’’ माझा पराभूत प्रश्न. 

‘‘खूपदा. पण ती ऐकतच नाही. लग्न करीन तर तुझ्याशीच, नाहीतर तुझ्या हातानं विष दे म्हणते.’’ या वेळी तरुणाच्या आवाजात थोडी खिन्नता मला जाणवते. 

‘‘बायका बिनडोकच असतात सर. त्यांना वास्तवाचं भान कधी येतच नाही बघा.’’ अखिल पुरुषवर्गानं स्त्रियांविषयी ठरवलेलं एक सार्वकालिक सत्य पुन्हा एकदा हा आयटी युगातला तरुण मला सांगतो. 

‘‘मग त्या मुलीचं भविष्य...’’ मी अक्षरशः असहाय. 

‘‘सर, मला वाईट वाटतं. खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. ती सर्वस्व मला द्यायला तयार आहे. पण मी तिला कधी साधं किससुद्धा केलेलं नाहीय. इतकी नैतिकता मी पाळलीय तिच्यासाठी.’’ तरुण खूपच गहिवरून बोलत होता.  नैतिकता म्हणजे नेमकं काय, हा आणखी एक नवा भुंगा त्यानं लेखकाच्या मेंदूभोवती सोडला.

‘‘मग हा गुंता कसा सोडवणार आहेस?’’ 

‘‘माझं टेक्सासला पोस्टिंग झालंय. पुढच्याच महिन्यात निघतोय मी यु.एस.ए.ला सहकुटुंब.’’

‘‘सहकुटुंब?’’ माझा उरलासुरला चकित प्रश्न. 

‘‘हो, एक वर्षापूर्वीच माझं लग्न झालंय. नात्यातल्याच एका मुलीशी.’’  तरुण जागेवरून उठत उठत बोलतो. त्याचं स्टेशनजवळ आलंय.

‘‘तुझ्या मैत्रिणीला हे माहीत आहे?’’ 

‘‘नाही.’’

‘‘तूही सांगितलं नाहीस?’’ 

‘‘नाही. भीती वाटते, ती आत्महत्या करेल, नाहीतर माझ्या घरी येऊन गोंधळ घालेल.’’ गाडी स्टेशनवर थांबते. तरुण ‘भेटू सर’ म्हणत उतरत्या गर्दीत सामील होतो. 

खिडकीशेजारचा तो थम्सअपवाला आपली बाटली उंचावत माझ्याकडे पहात असतो. त्याला आता बऱ्यापैकी किक आलीय. डोळे बारीक करत माझ्याकडे झुकत कुजबुजतो, ‘‘बाई आणि बाटली दोन्हीही सारख्याच गूढ.’’ मी माझा मोबाईल काढून मेहंदी हसनची गझल लावतो, ‘जब भी मयखानेसे पीकर हम चलें, साथ लेकर सैंकडो आलम चले’, त्याच्यासमोर धरतो. तो खो खो हसतोय.  या स्टेशनवर तो तरुण उतरून गेलाय. ती तरुणी कुठल्या स्टेशनवर उतरली? 

Tags: लग्न यु.एस.ए. मैत्रिण टेक्सास नैतिकता Wedding USA Friendship Texas Ethics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके