डिजिटल अर्काईव्ह

पुण्यातील मिल मजदूर सभेचा टाळेतोड सत्याग्रह होऊन मला सक्तमजुरीची शिक्षा झाली. माझेमागोमाग साथी एस. एम. आणि साथी शिरुभाऊ लिमये यांनाही पकडण्यात आले. अशावेळी लालजींनी स्वतःहून मिल मजदूर सभेचे ऑफिसवर येऊन पुढील कार्याचे व्यवस्थेची जबाबदारी अंगावर घेतली व युनियनच्या कामगारांच्या सत्याग्रहाचे काम पुढे चालू ठेवण्यास मदत केली.

लालजींच्या पश्चात लालजींच्या आठवणी लिहिणे ही कल्पनाच मनाला अजून पटत नाही.

पुण्यातील कार्यकर्ते एकमेकांना भेटले की काही ना काही कारणाने लालजींचा विषय निघतोच आणि मग त्यांच्याविषयी आपापसात गप्पा होतात. त्याच ह्या गप्पा!

लालजींचा आणि माझा परिचय सुरवातीला झाला त्यावेळी त्यांचे आणि माझे कार्यक्षेत्र अगदीच वेगवेगळे होते. लालजी सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते तर मी कामगार चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता. परंतु लालजी गणपती चौकातील जागेत त्यावेळी राहात असत आणि मी विश्रामबाग वाड्यासमोर वडिलांचे घरी राहात असे. लालजींना बुद्धिबळे खेळण्याची आवड होती हे फारच थोड्यांना माहीत आहे. बुद्धिबळे खेळण्यासाठी ते आमच्या वडलांकडे अधूनमधून येत असत. लालजी निगर्वी जाणि मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्यांत मिळून- मिसळून वागणारे कार्यकर्ते म्हणून आमचे वडलांना लालजींविषयी फार आदर व आपुलकी होती.

साधेपणाचा आदर्श

या काळात लालजींची आणि माझी गाठभेट फक्त रस्त्यात अथवा समारंभाच्या वेळीच होत असे. लालजींचा पोषाख त्यावेळी फक्त हाफपँट, हाफशर्ट, गांधी टोपी असा सेवादल सैनिकाचाच असे. ते सतत सेवादल सैनिकच असायचे. त्यांच्याजवळ कार्यक्षेत्रातील एक आणि खाजगी जीवनातील दुसरा असे दोन वेगवेगळे जीवनप्रवाह नव्हते. 

सेवादलाचे कार्यक्षेत्र बदलून लालजींनी समाजवादी पक्षाचे कार्य सुरू केल्यावरही त्यांचा पोषाख हा जणू त्यांचा ट्रेडमार्कच होता! अगदी साधा पायजमा, हाफशर्ट, जाकीट आणि पांढरी टोपी हाच आणि एवढाच त्यांचा पोषाख असावयाचा. याचे जोडीला त्यांचेजवळ सतत एक जुनाट सायकल असायची. वाहनावर त्यांनी कधीच पैसा उधळला नाही. त्यांची बॅगदेखील अगदी साधी शाळकरी मुलाच्या पिशवीसारखी असायची. रुबाबदार कातडी बॅग त्यांना कधी लागलीच नाही. त्यांनी साधेपणाचा आदर्शच जगून दाखवला, त्यांनी समाजवाद जगून दाखवला.

आक्रमक व्यक्तिमत्व

मी 1954 साली वकीलीला सुरवात केल्यावर काही विशेष पथ्य म्हणून पार्टीऑफीसवर अथवा सेवादल किंवा कामगार युनियनचे ऑफीसवर जाणे काही काळासाठी बंद केले होते. परंतु साधारण 1959 चे सुमाराला लालजींनी मला सांगितलं की, हॉस्पिटलमधील बरेच कामगार अन्यायनिवारणार्थ आपल्याकडे आले आहेत आणि त्यांची युनियन काढणेसाठी मला तुमची मदत पाहिजे. काही मर्यादा पाळून जमेल ती मदत व कायदेशीर सल्ला देण्याचे मी कबूल केले. यानंतर या युनियनचे उपाध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी मला सांगितले. तसेच डॉ. देशपांडे यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याचे कबूल केले. 

या युनियनचे अध्यक्षपदी कोणताही डॉक्टर मिळणे शक्य नाही असे मी लालजींना सांगितले होते. परंतु बहुधा लालजींची कार्यनिष्ठा आणि डॉ. वासू देशपांडे यांचा लालजींवरील विश्वास यामुळे हे शक्य झाले. या युनियनच्या कार्यात लढत व्हावयाची ती प्रस्थापित बड्या हॉस्पिटलच्या चालकांशीच! लालजी अशा चालकांना परखडपणे दम भरीत आणि बहुधा सर्व वादात तडजोडच होई. एकदा तर एका बड्या हॉस्पिटल चालकाने लेबर कमिशनरसमोर लालजींना आव्हान दिले की, हे हॉस्पिटल तुम्ही घेऊन चालवून दाखवा. लालजींनी लगेच आव्हान स्वीकारले आणि सांगितले की, आम्ही हॉस्पिटल अधिक चांगल्या तऱ्हेने चालवून दाखवू, परंतु तुमचे स्वार्थ त्यात इतके गुंतलेले आहेत की तुम्ही ते आमच्याकडे देणे शक्य नाही. अर्थातच यावर ते पोकळ आव्हानवाले गप्प बसले.

खंबीर आधार

यानंतर माझा लालजींशी पुन्हा संबंध आला तो हडपसरच्या साने गुरुजी रुग्णालयाच्या निमित्ताने. महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरुजी रुग्णालय स्थापन करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या मनात असलेल्या कल्पना मूर्तस्वरूपात आणण्यासाठी संस्थेची रचना कायद्याच्या दृष्टीने कशी करावी याची जबाबदारी माझेवर सोपवण्यात आली. मी निरनिराळ्या प्रकारच्या तरतुदी असलेल्या घटनांचे मसुदे साथी एस्. एम्. जोशी आणि डॉक्टर व कार्यकर्ते यांच्यासमोर ठेवले आणि त्यातून सर्वांच्या पसंतीने अंतिम मसुदा तयार करण्यात आला. बाकी सर्व तयारी झाली तरी आपला एखादा संघटक कार्यकर्ता सुरवातीच्या काळात तेथे हवाच आणि त्यासाठी संस्थापक सभासद नोंदवताना अर्थातच लालजींचे नाव पहिलेच होते. 

तेव्हापासून सतत आजतागायत लालजींचा खंबीर आधार महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरुजी रुग्णालय यांना मिळालेला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत निरनिराळ्या कमिट्यांत आम्ही दोघांनी मंडळाच्या निरनिराळ्या कार्याविषयी चर्चा केली आणि समिती म्हणून आमचेवर सोपवलेल्या कामांबाबत निर्णयही घेतले. निर्णय घेताना लालजींना गुळमुळीतपणा अजीबात खपत नसे. एक घाव दोन तुकडे हा त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे दिरंगाई टळण्यास त्यांची फार मदत होत असे.

तत्पर मित्र

प्रा. प्रधानांच्या आग्रहामुळे मी 58 साली पुणे विद्यापीठाच्या सेनेटची निवडणूक पदवीधर मतदार संघातून लढवावी असे ठरले. मला निवडणुकीचा काहीच अनुभव नाही आणि मतदार संघ सुमारे बारा जिल्ह्यांचा आणि मतदान केंद्रे सर्व जिल्ह्यांतून मिळून सुमारे 65 ठिकाणी! मला तर काय करावे ते सुचेना, कारण निवडणुकीला एक महिनादेखील अवधी नव्हता. अशावेळी लालजी आपण होऊन माझेकडे आले आणि त्यांनी बसल्या बैठकीला 65 केंद्रांवरची 65 कार्यकर्त्यांची नावे व पत्ते मला लिहून घेण्यास सांगितले आणि वेगाने कार्याला सुरवात केली. यावरून त्यांच्या कार्याचा व्याप व कार्यकर्त्यांशी सतत संपर्क केवढा होता याची प्रचीती आली. 

अर्थातच माझ्या निवडून येण्याचे श्रेय प्रा. प्रधानांसारखेच लालजींनाही आहे. त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा या दोघांनी मला ट्रेड युनियन मतदार संघातून उभे केले त्यावेळीही पुन्हा निवडून येण्यास लालजींचा हातभार होताच.

सुप्रसिद्ध सायकल आणि लूना

1949 साली लालजी सेवादलाचे कार्यकर्ते असल्यामुळे वास्तविक त्यांचा ट्रेड युनियन क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. परंतु पुण्यातील मिल मजदूर सभेचा टाळेतोड सत्याग्रह होऊन मला सक्तमजुरीची शिक्षा झाली. माझेमागोमाग साथी एस. एम. आणि साथी शिरुभाऊ लिमये यांनाही पकडण्यात आले. अशावेळी लालजींनी स्वतःहून मिल मजदूर सभेचे ऑफिसवर येऊन पुढील कार्याचे व्यवस्थेची जबाबदारी अंगावर घेतली व युनियनच्या कामगारांच्या सत्याग्रहाचे काम पुढे चालू ठेवण्यास मदत केली. 

तसेच संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीत माझे बरोबर आलेल्या बॅचमधील कार्यकर्त्यांना ते तुरुंगात भेटावयास आले आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींची त्यांना विचारपूस केली. विशेष म्हणजे हे सर्व त्यांचे काम त्यांच्या त्या 'सुप्रसिद्ध' सायकल वरच करीत असत. असा त्यांच्या कष्टाळूपणा पाहून लहानमोठे सर्वच कार्यकर्ते मनातल्या मनात चूर होऊन जात असत. त्यांच्या ह्या कनवाळूपणाची जाण ठेवून कार्यकर्त्या मित्रांनी त्यांना षष्ठ्यब्दिपूर्तीनिमित्त 'लूना' अर्पण केली. परंतु त्या सोयीचा उपभोग न घेऊन जणू काही आपल्या ब्रीदाला त्यांनी बट्टा लागू दिला नाही!

अगदी सुरवातीला पार्टीचे कार्यकर्त्याला चरितार्थासाठी काही सोय नसायचीच! त्याकाळी श्री गंगाधर ओगले, श्री बंडू गोरे, श्री अण्णा साने, श्री बागाईतकर वगैरे कार्यकर्ते नुसता भात एकत्र शिजवून मिरचीबरोबर खाऊन गुजराण करीत आणि कार्य करीत. या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या होत्या. अर्थातच कार्य करताना पार्टीकडून दोन वेळच्या जेवणाची सोय होईल अशा आमच्या कल्पना नव्हत्याच म्हणून लालजींनी विद्यार्थ्यांचे अभ्यास वर्ग घेण्याची कल्पना काढली आणि लालजी, मी व शिवाजी जवळकर अशा तिघांनी शाळा-कॉलेजचे क्लासेस सुरू केले. लालजी गणित विषय फारच चांगला शिकवत असत.

खरा स्वयंसेवक

लालजींचा मित्रपरिवार अक्षरशः असंख्य होता याचे मुख्य कारण म्हणजे लालजींची दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती! स्वतःची अडचण सांगण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी लालजींकडे जावे लागत नसे तर कोणाला कशाची केव्हा जरूर आहे हे स्वतःच ओळखून लालजी त्या व्यक्तीकडे ती मदत घेऊन स्वतःच जात असत. हे त्यांचे वैशिष्ट्य मी कोणत्याही पक्षाच्या अन्य कोणत्याही कार्यकर्त्यांजवळ पाहिलेले नाही. ही सर्व मदत ते अगदी निरपेक्ष भावनेने करीत असत आणि म्हणूनच असंख्य लोक त्यांना आपल्या कुटुंबातीलच एक असे मानीत असत. लालजींनी अनेकांच्या दवाखान्यांची, अनेकांच्या दुकानांची, अनेकांच्या नोकरीची आणि अनेकांच्या संसारांची व्यवस्था स्वतःहून लावून दिली. आणि यामुळे लालजींची स्मृती असंख्य संसारांतून सतत तेवत राहील.

Tags: शिरूभाऊ लिमये साने गुरुजी विश्रामबागवाडा एस. एम. जोशी पुणे राष्ट्र सेवा दल लालजी कुलकर्णी Shirubhau Limaye Sane Guruji Vishrambaug Wada S. M. Joshi Pune Rashtra Seva Dal Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी