डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्याच्या घरात आठ लाख पडून आहेत, त्याला नोकरीची गरज काय?

शेतीत लक्ष घातलेल्या या तरुणाने आपल्या शेतीचा कायापालट केलेला. चारशे टन ऊस दरवर्षी. अधिक इतर पिके. खातेपिते घर.कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. तरीही कोणत्याच चांगल्या मुलीचा बाप त्याला मुलगी द्यायला तयार नाही. प्रत्येकाची इच्छा एकच - मुलगा नोकरीस हवा. म्हणून मुलाने शोधलेला हा पर्याय.

अगदी सतत घडणारा प्रसंग.तुमच्या अवती-भवतीअसे सततच घडत असते. तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? पण त्या प्रसंगाने काही प्रश्न माझ्यासमोर उभे केलेत.याची उत्तरे माझ्याकडे नाहीत. कदाचित तुमच्याकडे असू शकतील.

फार सौंदर्यवादी समीक्षकांच्या कठीण भाषेत न बोलता तो प्रसंग तुमच्यासमोर ठेवला तर - कदाचित तुम्ही काही उत्तरे सुचवू शकाल.

प्रसंग असा-

माझ्या जवळचेच गाव. गावाला नाव हवेच कशाला? या गावात एक माध्यमिक शाळा आहे. ती माध्यमिक शाळा अलिकडेच सुरू झाली आहे. ‘अलीकडे’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण अलीकडे आणि पलीकडे यामध्ये वसंतदादा पाटील नावाचे मुख्यमंत्री आहेत. आता हे कोण वसंतदादा पाटील हे सांगायची गरज नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. आदराची कारणे अनेक आहेत. ते कृषिजनसंस्कृतीतील अल्पशिक्षित पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचे मुरब्बी राजकारणी होते.याविषयी तुमच्याही मनात संशय नसावा. कणखर, द्रष्टे! आणखीही काही विशेषणे मलासुचतील. त्यांनी विनाअनुदान शैक्षणिक धोरणात किंचित पुढाकार घेतला आणि त्यानंतर विनाअनुदानित शाळा- महाविद्यालयांचे अक्षरश: पेव फुटले.

या धोरणानुसारच ही माध्यमिक शाळा आमच्या शेजारच्या गावातील एका पुढाऱ्याने सुरू केली. हे पुढारी कोणत्याही पक्षाचे असतील. कारण आता पक्षाच्या नावात फरक असला तरी सर्वांचे चेहरे सारखेच. वैचारिक भूमिकेचा प्रश्न पर कधीच निकालात निघालाय. तर या पुढाऱ्याचा ‘राजकारण’ हा धंदा. धंदा म्हटलं की फायदा-तोटा आलाच. कोणीही, कोणताही धंदा तोट्यात चालावा म्हणून करत नाही; एवढे गृहीत धरले तर ह्या पुढाऱ्याने सुरू केलेल्या हायस्कुलबाबतचे अनेक प्रश्न निकालात निघतात.

या हायस्कुलची भूगोल या विषयाच्या शिक्षकाची जागा रिक्त झाली. रीतसर जाहिरात काढल्याशिवाय शासकीय मान्यता मिळत नाही. अर्थात, या रीतसर शासकीय कार्यात शासकीय यंत्रणा पैसा मिळवत असते. पण आता हे काही महत्त्वाचे उरलेले नाही. तर जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. मुलाखतीच्या तारखा ठरल्या. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना बोलावण्यात आले. मुलाखत या शब्दाचे अर्थ आता शिक्षणखात्यात बदललेले आहेत. मुलाखतीच्या वेळी ज्ञानाची ‘चाचणी’अपेक्षित नसून, कोण किती पैसे देऊ शकतो याची ‘चाचपणी’ केली जाते. ज्ञानाचा आणि शिक्षणाचा आता संबंध संपलेलाच आहे.

माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आता ज्ञानाची गरज नसून पैशांची गरज असते. ही अलीकडच्या शिक्षणातील पात्रता. त्यानुसारपात्र उमेदवारांना बोलावण्यात आले. मुलाखती सुरू झाल्या.कोणाची देण्याची क्षमता किती याची चाचपणी सुरू झाली.पण यातील एका उमेदवाराने सांगून टाकले की“तुम्हाला सर्वाधिक रक्कम जो कोणी देईल, त्याच्यापेक्षा पंचवीस हजार जास्त देण्यास मी तयार आहे.”अखेरचे तीन उमेदवार रिंगणात. यातील शेवटच्या उमेदवाराने संस्थेस सात लाखरुपये देण्याची तयारी दर्शवली. आठ दिवसांचा वेळ द्यावा अशी विनंती केली. पंचवीस हजार जास्तवाल्या त्या उमेदवारास संस्थाचालकांनी आत बोलावले. त्यास अंतिम दर सात लाख रुपये आल्याचे सांगितले. त्याचे म्हणणे विचारले.त्याने सात लाख पंचवीस हजार रुपयांचा चेक त्यांच्यासमोर ठेवला. संचालक मंडळ तयार. आजचे पुढारीच म्हणाले, ‘चेक नको, रोख रक्कम हवी.’उमेदवाराने तासाची वेळ मागून घेतली आणि तासाच्या आत सात लाख पंचवीस हजारांची रक्कम त्यांच्यासमोर टाकली. संचालक मंडळ आवाक झाले.संचालक मंडळातील ‘पलीकडच्या शिक्षण व्यवस्थेतील’ एक संचालक म्हणाले, ‘बाळ, ज्याच्या घरात आठ लाख पडून आहेत, त्याला नोकरीची गरज काय?’

उमेदवार काहीच न बोलता म्हणाला, ‘ऑर्डर कधी देताय?’त्याला ऑर्डर दिली गेली. निवडला गेलेला उमेदवार एकदमखुष. संस्थाचालक त्याहून खुष. ही बातमी काही दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचली.आश्चर्य वाटले नाही; पण सात लाख पंचवीस हजार रुपये एका तासात हजर करण्यानं मला धक्का दिला होता, बोच वाढली होती. चौकशी करायला गेल्यावर आणखी वास्तव समोर आलं. ते असं-

सात लाख पंचवीस हजार देणारा उमेदवार माझ्या गावा जवळचाच. सधन शेतकऱ्याचा मुलगा. वय वर्षे तेहतीस.बी.एड्. नंतर नोकरी मिळत नाही म्हणून शेतीकडे वळलेला. शेतीत त्याने आपल्या इच्छेप्रमाणे प्रगती केली.घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. मुली शोधण्याची मोहीम हातांत घेतली गेली. पण जावे तिथे अपयश. ‘मुलाला नोकरी आहे का?’ हा काळजाची खपली काढणारा प्रश्न.प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न. नंतर ठरलेला नकार. शेतीत लक्ष घातलेल्या या तरुणाने आपल्या शेतीचा कायापालट केलेला. चारशे टन ऊस दरवर्षी. अधिक इतर पिके.खातेपिते घर. कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. तरीही कोणत्याच चांगल्या मुलीचा बाप त्याला मुलगी द्यायला तयार नाही. प्रत्येकाची इच्छा एकच - मुलगा नोकरीस हवा. म्हणून मुलाने शोधलेला हा पर्याय.

वास्तवावर तुमचा किंवा माझाही विश्वास बसणे कठीण.पण हे आपल्या अवतीभवतीच घडते आहे. खेड्यापाड्यात नोकरी असणाऱ्या तरुण मुली देण्यास कोणताच बाप तयारनाही. मुलीला नोकरीवाला नवराच हवा आहे. कृषिजन संस्कृतीतल्या मुलाला आता नोकऱ्या उरलेल्याच नाहीत.शासकीय नोकरभरती बंद. सहकारी संस्था मोडकळीस आलेल्या. शहरातील नोकरीसाठी गरजेचे असलेले कौशल्य नाही. अशा तरुणांना आता शेतीशिवाय पर्याय नाही.

पण शेती करणाऱ्याला आता मुलगी मिळणे कठीण झाले आहे. आता लग्नाचे वय तीस वर्षाच्या पुढे गेले आहे.तेही नोकरी असणाऱ्यांसाठी. मग नोकरी नसणाऱ्यांचे काय?खेड्यापाड्यांतील हा नवा प्रश्न आहे : शेती करणाऱ्या शिक्षित मुलांच्या लग्नाचे काय? आठवी-नववी शिकलेल्या मुलीलाही आता नोकरदार नवरा हवा आहे. त्यात आता आईवडिलांनी लग्न ठरवण्याचा जमाना इतिहासजमा झालाय. बदल घडणे स्वाभाविक, पण हे बदल नवे प्रश्न निर्माण करत आहेत त्याचे काय?

पदवी घेतलेल्या तरुणांची संख्या ढीगभर.पण नोकरीच्या संधी जवळपास नाहीत. शिक्षण आणि नोकरी यांचा संबंध काय? शिक्षण नोकरी यांचा संबंध कोणी जोडला? हा संबंध तोडायचाअसेल तर काय करायला हवे? असल्या प्रश्नांचा विचार करण्यास आता वेळ आहेच कुणाला?

पण खेड्यापाड्यात मात्र हा नवा जीवघेणा प्रश्न उभा ठाकलाय.

यातून समाजात नवी विकृती तर जन्म पावणार नाही ना? नवा हिंसक समूह तर जन्मास येणार नाही? तुमच्या माझ्या मुली निर्भयपणे जगायच्या असतील तर या नव्या प्रश्नाचा विचार करायला हवा. पण कोणी?

Tags: कैफियत राजन गवस समाज लग्न नोकरी शिक्षण शेती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके