डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेवटी त्याला निर्माता भेटला. तो नवं स्क्रिप्ट घेऊन आला. या वेळी थोडा जास्त उत्साही, पण माझ्या बाजूने गारठा कायम. तर त्याने लोकेशन निश्चित करण्यासाठी दिग्दर्शक राजीव पाटील यांना बरोबर आणलेले.  मला त्याची टिंगल करता येईना.  आम्ही डोंगराला गेलो. भागात फिरलो. सिनेमावाल्यांबाबत माझे ज्ञान वाढत गेल्यामुळे, माझे मन विश्वास ठेवायला तयार नव्हते. अशात अचानक एके दिवशी चित्रिकरण सुरू झाले. चित्रपट झाला.

1985 साली ‘चौंडकं’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘भंडारभोग’ प्रसिद्ध होण्यासाठी 1987 हे साल उजाडावे लागले. या दोन्ही कादंबऱ्या लिहिल्या त्या कालावधीत देवदासी चळवळ महाराष्ट्रभर पसरली होती. चळवळीत भारावलेपण होते. प्रश्नाचे गांभीर्य तर प्रचंडच होते. डॉ.बाबा आढाव, प्रा.विठ्ठल बन्ने, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी या चळवळीचे नेतृत्व केले. अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यांनी या चळवळीची व्याप्ती वाढवली.

या दोन्ही कादंबऱ्यांना वाचकप्रियता लाभलेली होती. प्रामुख्याने खेड्यापाड्यांतील नवीन तयार झालेला वाचक या  कादंबऱ्यांकडे आकर्षित झालेला होता. याच काळात बबन चहांदे हे कविमित्र सांगली आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांनी ‘चौंडकं’चे क्रमश: वाचन आकाशवाणीवरून सुरू केले. या वाचनास प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. आम्ही त्यावेळी जटमुक्तीची चळवळ खेडोपाडी सुरू केली होती. डॉ. आनंद वास्कर, डॉ.पुष्पा वास्कर हे दाम्पत्य ‘जटमुक्ती’ चळवळीचे आद्य प्रणेते. जेव्हा चळवळीत काम करणारे लोकही जटेला हात लावायला घाबरायचे, तेव्हा डॉ. आनंद वास्कर यांनी अरगडे डॉक्टरांच्या मदतीने पहिली जट सोडवली. ‘डॉ.वास्करांना यल्लूआई बघून घेणार!’ अशी सर्वांची अपेक्षा. पण घडले काहीच नाही. मग जटमुक्तीचा धडाका सुरू झाला. हजारो मुलींना जटमुक्त केले. या कामात आकाशवाणी सांगली केंद्राची भरपूर मदत झाली. तेव्हा ह्या माध्यमाची ताकद माझ्या ध्यानात आली. प्रबोधनासाठी यासारखी माध्यमे कशी उपयुक्त ठरतात, हे जाणवले. त्या वेळेपासून या विषयावर चित्रपट व्हावा, तो चळवळीस उपकारक ठरेल असे वाटत होते. पण या विषयाकडे कोणी वळत नव्हते.  हिंदीत ‘गिद्द’चा प्रयत्न झाला. पण तो खेड्यापाड्यांत येणे आणि लोकांच्या पसंतीस उतरणे दुरापास्तच होते. त्या चित्रपटाची गुणवत्ता वादातीत, पण तो खेड्यात येणे कठीण. त्यामुळे त्या चित्रपटाची चर्चाही वरच्या पातळीवरच वावरत राहिली.

‘चौंडकं’ कादंबरीवर चित्रपट करण्यासाठी एक-दोघांनी विचारले. त्यांची अपेक्षा पटकथा, संवाद मी लिहावेत अशी होती. माझ्याकडून थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी तो नाद सोडला. अशातच चारुता सागर यांच्या ‘दर्शन’ कथेवर चित्रपट होत आहे, असे वाचले. एकदम आनंद झाला. कारण त्यावेळी चळवळ डोक्यात होती. नंतर या चळवळीचे, इतर चळवळींचे जे होते ते झाले आणि हळूहळू या साऱ्यापासून मी तटस्थ होत गेलो. अशा काळात संजय कृष्णाजी पाटील माझ्याकडे आला. त्याला या कादंबऱ्यांवर चित्रपट करायचा होता. पूर्वानुभवानुसार मी काही प्रतिसाद दिला नाही, पण त्याची चिकाटी अचाट. त्याने दहा वर्षे ह्या विषयाचा ध्यास घेतला. दरवेळी तो पटकथेचे एक स्क्रिप्ट माझ्याकडे घेऊन यायचा. मी न वाचताच ते ठेवून द्यायचो. अशी पाच-दहा स्क्रिप्ट माझ्याकडे जमा झाली. त्याला माझा थंड प्रतिसाद निराश करत नव्हता, हे विशेष. संजय पाटील दर वेळी एका नव्या निर्मात्याचे नाव सांगायचा. मी फक्त हसून विषय टाळायचो.

शेवटी त्याला निर्माता भेटला. तो नवं स्क्रिप्ट घेऊन आला. या वेळी थोडा जास्त उत्साही, पण माझ्या बाजूने गारठा कायम. तर त्याने लोकेशन निश्चित करण्यासाठी दिग्दर्शक राजीव पाटील यांना बरोबर आणलेले.  मला त्याची टिंगल करता येईना.  आम्ही डोंगराला गेलो. भागात फिरलो. सिनेमावाल्यांबाबत माझे ज्ञान वाढत गेल्यामुळे, माझे मन विश्वास ठेवायला तयार नव्हते. अशात अचानक एके दिवशी चित्रिकरण सुरू झाले. चित्रपट झाला.

या साऱ्यात संजय पाटीलची चिकाटी, ध्यास, त्याची धडपड सार्थकी लागली एवढाच आनंद. बाकी या चित्रपटाबाबत मला काहीच वाटले नाही. कारण तो ऐन चळवळीच्या काळात आला असता तर चळवळ अधिक बळ धारण करू शकली असती. देवदासींचे भोग संपवण्यास चित्रपट कारण ठरला असता. ते विशेष महत्त्वाचे होते, एवढेच!

 

Tags: देवदासी जोगवा भंडारभोग चौंडक राजन गवस Jogva Sanjay Patil. Rajiv Patil Film Marathi Cinema Jogwa Superstitions Bhandarbhog Chaundak Writer Author Rajan Gawas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके