डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे भान माझ्यात सहजी आलं, असंही नाही. पहिल्या पहिल्या स्थितीत माझ्या लेखनाच्या प्रेमात मीही असायचो. कोणी चांगलं म्हटलं की मोहरून जायचो. वाईट म्हटलं की मन उदास व्हायचं. पण एकदा रंगनाथ पठारे यांनी पत्रात लिहिलं, 'आपण आपल्या बाबतीत एकदम क्रूर असलं पाहिजे. ' या एका वाक्यानं माझा माझ्या लेखनाकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.

एम. ए. च्या काळात शिवाजी विद्यापीठात मराठी साहित्यावर पॉप्युलर प्रकाशनाच्या सहकार्याने भलेमोठे चर्चासत्र भरलेले. त्यावेळी साहित्य-समीक्षा यातलं फार काही कळत होतं, असं नाही. पण ऐकण्याचा उत्साह प्रचंड. त्या चर्चासत्रात एकाच वेळी शंभरएक लेखक एकदम बघितले. रा. नेमाडे, रा. दिलीप चित्रे, गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलिक असे सगळे. घणाघाती चर्चा. पाठीमागे बसून आमचं हाऽऽ हुऽऽ चाललेलं. पण त्या चर्चासत्रातील निबंधांनी वाङ्मयाकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. आपण वाचतो ते किती सुमार; या शिवाय अस्सल बरंच आहे.

आपण ज्याच्या प्रेमात पडतो, ते तर इथं चर्चेतही आलं नाही, असलं काय काय मनात सुरू झालं. त्या चर्चासत्रात ज्या लेखनाचा उल्लेख झाला ते मिळवून वाचणं सुरू झालं. यातून नवीच दृष्टी विकसित होत गेली. त्या आधी कुठंही बारकं संमेलन, शिबिर असलं की खांद्यावर शबनम टाकून आम्ही पळायचो. व्यासपीठावरच्या टाळ्याखाऊ भाषणांना दादही द्यायची. टाळ्या मिळवणाऱ्या कविता पाठ करायचो. शिबिरात कथा कशी लिहावी, अनुभव कसा फुलवावा, टोक कसं काढावं, असं बरंच काय काय ऐकून भारावून जायचो. पण हे सगळंच या चर्चासत्रानं थांबवून टाकलं. कोल्हटकर, डहाके, ढसाळ हे कवी आहेत, महत्त्वाची कविता लिहितात. हे ऐकून आपण आजवर काय वाचत होतो; असा प्रश्न पोखरू लागला. वाचनाची, विचार करण्याची सारी वर्तुळंच बदलली. आपल्या अज्ञानाची तीव्र जाणीव नवं वाचण्यास प्रवृत्त करू लागली. चळवळ, मोर्चे, परिषदा थोड्या बाजूस झाल्या. भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकांनी झपाटून टाकले. लिहिण्यापेक्षा वाचलेलं बरं, असं वाटू लागलं. या काळातच गंभीर वाचणारे, विचार करणारे निशिकांत गुरव, सुमित्रा जाधव असे मित्र मिळाले. त्यांनी बरंच काय काय माझ्याकडून करवून घेतलं. माझा मीच बदललोय, हे मला थेटपणे जाणवायला लागलं. 

'चौंडकं' (1985) प्रसिद्ध झाली. त्या लेखनाकडे मी सहजी वळलो, असं नाही. आपण लिहितो त्या साऱ्याची बीजे आपल्या वर्तमानात असतात. आपण वरवर सरळ आणि सहजी जगत असतो, असा आपला भास. पण आत, लिहिणाऱ्याच्या किंवा कोणाच्याही, अनेक ओरखडे उठत असतात. कळत न कळत. सतावणाऱ्या गोष्टी दर्शनी असतातच असे नाही. आतल्या आत खोलवर तुम्हाला काही पोखरत असतं. ती यातना सोसणं, सांभाळणं भयावह आणि जीवघेणं असतं.

वास्तवात, देवदासींचा प्रश्न धसास लावण्यासाठी सर्व पातळ्यांवर सर्व माणसं लढत होती. वेगवेगळ्या ठिकाणी. मोर्चे, परिषदा, महाराष्ट्र-कर्नाटक शासन दरबारी अर्ज, विनंत्या असं सगळं चाललेलं. अगदी मनःपूर्वक. त्यात खोटं कोणीच नव्हतं. सगळे प्रामाणिक. पण व्यवस्था इतकी दगडी की तिला पाझर फुटणं अशक्य. यात या गावोगावच्या बायका उत्साहानं यायच्या. आपलं थोडं तरी भलं होणार असं त्यांना वाटायचं. नंतर नंतर त्यांनाही वास्तव समजायला लागलं. त्यातली एखादी वैतागून म्हणायची. तुमची भाषणं व्हत्यात, तुमची नावं, फोटो पेपरात छापून येत्यात. आमचं काय? सगळं हाय तसंच हाय की! हे सगळंच अंगावर येणारं. आतल्या आत हादरवून टाकणारं. 

अशात एक लेखक म्हणवून घेणारे गृहस्थ देवदासींवर कादंबरी लिहिण्यासाठी माहिती जमा करावी, म्हणून आले. त्यांनी डॉ. अनिल अवचटांचे लेख वाचलेले. कुठं कुठं भेटी-गाठी घेऊन ऐकीव माहिती गोळा केलेली. देवदासी म्हणजे वेश्या असं घट्ट समीकरण त्यांच्या मनात. ते आले आणि त्यांना सगळीकडे फिरवण्याचं कंत्राट आमच्यावर सोपवलं गेलं. त्यांना अनेक देवदासींच्या भेटी घालून दिल्या. महाशय अचानकच गायब झाले. यानंतर आमची बन्नेसरांशी लेखकांचे वर्तन आणि लेखन यावर जोरदार वादावादी झाली. बायका तर म्हणायला लागल्या, आमच्या उंबऱ्याला उगाच कोणालापण आणू नका. नंतर काय घडलं कुणास ठाऊक. त्या तिरीमिरीत 'चौंडकं' लिहून झाली. प्रकाशक मिळायला दोन-तीन वर्षे गेली. 

एम. ए. नंतर एका कॉलेजात नोकरी मिळाली. आपण कॉलेजात मास्तर झालो, याचा आनंद होता. पण त्या आनंदावर पाणी पडलं. खेड्यापाड्यांतल्या कॉलेजात नोकरी म्हणजे भयावह अनुभव. संस्था फारच नावाजलेली. पण राजकारणानं पार सडलेली. तिथं हजर झालो तेव्हा प्रमुखांच्या चमच्यांनी कोणाशी बोलायचं, कोणाशी बोलायचं नाही, याची यादी दिली. पुन्हा माझ्यावर नजर ठेवण्यासाठी दोन वेगळे चमचे नेमले. ते प्रमुखाला मी उठतो केव्हा, झोपतो केव्हा, याचे तपशील पुरवायचे. वाटेत कोणी थांबवलं, कोणाशी बोललो याची नोंद प्रमुखाकडं अद्ययावत. सगळीकडं आणीबाणी. पंधरा ऑगस्टला कॉलेज सुरू. दिवाळीला बंद. महिन्यानं पुन्हा सुरू. 26 जानेवारीचं झेंडावंदन केलं की सर्व कामकाज संपलं. त्यातही वर्षभर तास न घेणारे आठ-दहा जण. त्यांनी करायचं काय? तर साहेबांची सेवा. राजकारण. स्टाफरूममध्ये चर्चा काय? तर पगारात नवीन काय काय वाढलं! चुकून कधी पुस्तकाचा विषय निघाला तर सगळे खोऽऽ खोऽऽ हसायचे.

आपण उगाच आलो ह्या कॉलेजात. ही सतावणारी भावना. अज्ञात भीतीनं गारठलेलं वातावरण. तरीही लोक म्हणायचे, इथं लोकशाही आहे. एकदा प्रमुखांनी केबिनमध्ये बोलावलं, म्हणाले, वर्गात मुलांना परीक्षेपुरतं लिहून द्यायचं. जास्त शहाणपणा करायचा नाही. माझं काय चुकलं, मलाच कळत नव्हतं. केबिनच्या बाहेर आलो तर धिप्पाड चमचे जोरजोरात हसत उभे. या वातावरणात असाच राहिलो तर आपल्याला वेड लागेल असं वाटायला लागलं. 

सभोवार सगळी कणा हरवलेली लाचार माणसं. प्रत्येकाला जगण्याबाबत अविश्वास. प्रत्येकजण धास्तावलेला. आपण उत्तम लाचार कसे ठरू, यासाठी स्पर्धा. सत्याला सत्य म्हणण्याची हिंमत हरवलेले. स्वाभिमानी माणूस दिसला की लांडगे सामूहिक तुटून पडावेत, तसे सगळे तुटून पडायचे. त्या माणसाला लोळागोळा करून छाती फुगवून फिरायचे. अशी सगळी सैतानाची फौज. त्यात माझी मास्तरकी. शिकवणं नाहीच. नसते फालतू उद्योग. गोरगरीब मुलं केविलवाणे चेहरे करून वर्गात यायची. तर यांची गुंडाची फौज त्यांना भयभीत करून सोडायची. गुंडांचे पेपर खास केबिनमध्ये. तर वर्षभर मरमर मरून अभ्यास करणारी पोरं नापास. असा सगळा अजब कारभार. कोणाशी दबक्या आवाजात बोलावं, तर लगेच बातमी गुंडांच्या फौजेत. अशा वातावरणात श्वास गुदमरायला लागला. लिहिणं तर हळुहळू सुटतच चाललेलं. नोकरी सोडावी तर प्रश्न पोटाचा. त्यात शेतकऱ्याच्या घरातून आल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या. सहन होत नव्हतं; सांगता येत नव्हतं. 

एकदा दादू जोगता खोलीवर आला. तसा नेहमीच भेटणारा. उंचा-पुरा देखणा. सवड असली की भेटायचा. बरंच काय-काय सांगून पोट धरून हसवायचा. पण त्या दिवशी एकदम उदास, जगण्यातला रस संपल्यासारखा बोलायला लागला. त्याला कृतक बोलून धीर द्यायला लागलो. दादू एफ. वाय. बी. ए. शिकलेला. वर्गात एका मुलीच्या प्रेमात पडला. ही बातमी मुलीच्या घरापर्यंत पोहोचली. मुलीच्या घरच्यांनी दादूला घेरलं. सामान्य कुटुंबातला चारचौघांसारखा पुरुषपण असलेला दादू गांगरला. त्यानं अंथरूण धरलं. दवाखाना झाला. बरं वाटायला तयार नव्हतं.

आईनं देववाल्या बाया गाठायला सुरुवात केली. एका देववाल्या बाईनं यलू आईचा कोप सांगितला. पोराला देवाला सोडा म्हणून आदेश दिला. दादूच्या आईनं दादूचं कपाळ भंडाऱ्यानं माखलं. त्याला रीतसर देवाला सोडलं. खचलेला दादू त्या सगळ्या धार्मिक दडपणात अधिकच खचत गेला. त्याच्यातलं पुरुषपण कसं संपत गेलं त्याचं त्यालाही कळलं नाही. दादू माझ्याशी बोलताना म्हणत होता, 'त्यावेळी मी घरातून पळून जायला हवं होतं. ' हे म्हणताना तो आतून ढवळून गेलाय हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. दादू निघून गेला.

मला माझ्यात आणि दादूत फरकच वाटेनासा झाला. दादूला अंधश्रद्धाळू धार्मिक व्यवस्थेनं नपुंसक केला. मलाही बिनडोक दडपशाहीची शिक्षणव्यवस्था, त्यातील आंधळे भस्मासूर नपुंसक करत आहेत. माझ्यात आणि दादूत फरक काय? या प्रश्नानं झोप उडवली. सरळ काहीच व्यक्त करता येत नव्हतं. आतली अस्वस्थता मात्र कमालीची वाढत चाललेली. प्रश्न भाकरीचा होता. मग यल्लम्मादेवीला पुरुष जोगते कसे वाहिले जातात, हे प्रारूप स्वीकारून व्यवस्था माणसाला कशी नपुंसक करते, याचा शोध सुरू केला. मदतीला दादू आणि त्याचे अनेक जोगते मित्र माझ्या मदतीला धावून आले. 'भंडारभोग' आकाराला आली. तृतीय पंथीयांचे जगण्याचे वास्तव कल्पितात स्थित्यंतरित करून मला माझ्या भोवतालच्या वर्तमानाविषयी काही म्हणायचे होते. ती माझी आंतरिक निकड होती. लिहिणाऱ्याला पडलेले प्रश्न त्याच्या जगण्याचा सारा कालावकाश व्यापून टाकतात. त्याला त्या प्रश्नांच्या विळख्यातून सुटका हवी असते. सुटकेचे वास्तव मार्ग हे त्याच्यासाठी उपलब्ध नसतात. असले तरी त्याचा त्याला फारसा उपयोग नसतो. त्याला त्याच्या अवकाशातच कल्पित व्यूहाची निर्मिती करून स्वतःला पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी पोहोचण्याची धडपड करून उत्तराचा शोध घेता घेता स्वतःची सुटका करून घ्यावी लागत असते. हे किमान माझ्यापुरते तरी सत्य आहे. आजवरच्या लेखनात असे मला पोखरणारे प्रश्न माझ्यापुरते शोधण्याचा खटाटोप मी केला आहे. त्याचे यश-अपयश ठरवणारा मी कोण? आणि यश-अपयशाचा हिशोब मांडायचा तरी कशासाठी? आपल्याला भेटलेल्या माणसांविषयी, पडलेल्या प्रश्नांविषयी, आपल्या भोवतालला प्रतिक्रिया देण्याविषयी आपण किती मनापासून प्रयत्न केला, हे महत्त्वाचं. 

हे भान माझ्यात सहजी आलं, असंही नाही. पहिल्या पहिल्या स्थितीत माझ्या लेखनाच्या प्रेमात मीही असायचो. कोणी चांगलं म्हटलं की मोहरून जायचो. वाईट म्हटलं की मन उदास व्हायचं. पण एकदा रंगनाथ पठारे यांनी पत्रात लिहिलं, 'आपण आपल्या बाबतीत एकदम क्रूर असलं पाहिजे. ' या एका वाक्यानं माझा माझ्या लेखनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आपणच आपल्याविषयी बोलणं,

सभा- समारंभातून मिरवणं, आपल्यावर लिहा, आपली पुस्तकं वाचा असं सांगणं म्हणजे आपणच आपली प्रतारणा करणं. असं काही पूर्वी कधी मनात बसलेलं. ते आजही कायम. या साऱ्याचा फायदा असा की आपण सगळ्यांत असतानाही स्वतःचे असतो. त्यामुळे कोण्या प्रकाशकाचे कधी उंबरे झिजवावे लागले नाहीत. ज्यांच्याशी पटलं नाही त्यांच्याशी उभा दावा मांडला. एकदा एका कादंबरीचं हस्तलिखित माझ्या मित्रांनी एका दबदबा असणाऱ्या प्रकाशकाकडं दिलं. त्यांनी पहिली पंधरा पानं वाचून कादंबरी छापायची ठरवलं.

पण त्यांना मी दिलेलं नाव मार्केटिंगसाठी पसंतीस उतरले नाही. म्हणून त्यांनी कादंबरीचं नाव स्वतःच बदललं. हे मला कळलं कधी-तर पुस्तक छापून लेखकाच्या प्रती पोस्टाद्वारे घरात आल्या तेव्हा. तडक प्रकाशकाचं दुकान गाठलं. त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. तर तोही तितकाच माजलेला. शेवटी हसून म्हणाला, झालं ना समाधान! चहा घ्या आणि जा घरला. असला आपला प्रकाशन व्यवहार. त्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. ही आमच्या प्रकाशकांना लेखनाची किंमत. असल्या व्यवस्थेत लेखकाचे लेखन बंद पाडणारे घटकच अधिक. हे सगळं मन पोखरणारं असलं तरी कोठून तरी मध्येच एखादं पत्र येतं. तुमचं पुस्तक आवडलं बरं का! असं सांगणारं. कोणी जाणते भरभरून दाद देतात. हेही आहेच आपल्याकडे. मराठी समूहाचे एकूण स्वरूपच व्यामिश्र. कोणतेच एक ठाम विधान इथल्या व्यवस्थेत निर्णायकपणे करता येत नाही. तुम्हाला वाढवणारे भेटतात. खुरटवणारे भेटतात. अर्थात ह्यातल्या मोहात कधी गुंतावसं वाटलं नाही. लिहिणारे म्हणून आपण एकटेपण सांभाळत जगले पाहिजे, याचे भान चार चांगल्या लेखकांनी दिले. हा एकटेपणा सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न मी करत आलोय. मध्येच माझ्यातला कार्यकर्ता उसळी मारतो. नानाविध उद्योग सुरू होतात. पण त्यातलं पोकळपणही लगेच ध्यानात येतं. असं सततचं चाललेलं असतं. त्या साच्यातून माझा मीच वाढत असतो. 

ह्या साऱ्या जगण्या-वाढण्यात सामान्य माणसांना मात्र मी पुरता बांधला गेलोय. कारण तेच माझं भावविश्व. तीच माझी जगण्याची- वाढण्याची आस्था केंद्रे. त्यांनीच मला लिहितं केलं. त्यांनीच माझं काही थोडंफार वाचलं. दाद दिली. त्यांच्यात वावरताना मी अस्वस्थ होत गेलो. त्यांच्या शब्दांनी मला बळ दिलं. त्यांनीच मला लिहितं केलं. त्यांच्या नजरेतून ही सारी व्यवस्था बघण्याचं भान मिळालं. व्यवस्था विच्छेदित करून तिचं अंतरंग आकळण्याचं, संगती- विसंगती, ताण-तणाव शोधता शोधता तळ गाठण्याचं नवं आत्मभान निर्माण केलं. ती सामान्य माणसं माझ्यातून वजा केली तर उरेल बाकी शून्य!

Tags: भंडारभोग यल्लामा तृतीयपंथी वसंत डहाके शिवाजी विद्यापीठ रंगनाथ पाठारे राजन गवस  लेखन Bhandarbhog Yallama Transgender Vasant Dahake Shivaji University Rangnath Pathare Rajan Gavas Writing weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके