डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ती आई किंवा बायको किंवा बाप, न थांबला बक्कळ काय-काय सांगायचे. मग त्यातील गरजेचे तेवढे लिहून, मी पत्र वाचून दाखवायचो. यात गुप्तता पाळायची जबाबदारी आसायची ती वेगळीच. दिवसात वेगवेगळ्या वेळी तीन-चार पत्रं तरी लिहायचोच. सासरवासी सुना शाळेतच बोलवायला यायच्या. असा सगळा कारभार. पण ह्यातून प्रत्येकांच मन माझ्यासमोर मोकळं व्हायचं. कधीकधी ऐकताना डोळ्यातून पाणी यायचं. मला लिहितं केलं, या सासूरवाशी सुनांनी. वेदनेची कोठारं म्हणजे ह्या बायका. त्यांनी मला अकाली प्रौढ केलं!

'मंथन' नावाचे भित्तीपत्रक गडहिंग्लजच्या सार्वजनिक वाचनालयात दादा सबनीस हे पत्रकार चालवायचे. दर पंधरा दिवसांनी एक अंक. आम्ही त्यावेळी हायस्कूलमध्ये शिकत होतो. तेही 'अत्याळ’ सारख्या खेड्यात. गडहिंग्लज येथून चार मैल. मोठी बाजारपेठ, पण आमच्या वाट्याला जायचा योग क्वचित. आम्हाला शिकविणारे शिक्षक गडहिंग्लजमध्ये रहायचे. शिक्षकही सारखे बदलत, दर दोन-चार महिन्याला नवा शिक्षक. असेच एक मदन हजेरी आम्हाला मराठी शिकवायला आले. तेव्हा ते कॉलेजात शेवटच्या वर्षाला होते. ते वक्तृत्व स्पर्धेत बक्षीसे मिळवीत, कविता लिहीत. त्यांनीच आम्हाला 'मंधन'चं नाव सांगितलं. कोणी कविता वगैरे लिहिल्या तर आपण प्रसिद्ध करू असं म्हणाले. नुकताच बेंदर आला होता.

मी बैलाबर एक कविता लिहिली. त्यांच्याकडं दिली. त्यांनी ती एकदम दादा सबनीसांच्याकडं दिली आणि पंधरा दिवसानं म्हणाले, तुझी कविता 'मंथन मध्ये प्रसिद्ध झाली. 'मंथन' वाचायला आम्ही तडक तालुक्याला. दुसऱ्या दिवशी शाळा चुकवल्याबद्दल मारही खाल्ला. पण इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर आपल्या सहा ओळी त्या काचेच्या चौकटीत बघितल्यामुळे माराचं काहीच वाटलं नाही. हजेरीसर कुठली कुठली पुस्तकं आणायचे. मला वाचायला लावायचे. त्यावेळीच साने गुरुजी आणि चि.वि.जोशी वाचले. हायस्कूलमध्ये आणि गावात वाचनालय नव्हतं, त्यामुळे शिक्षक आणून देतील तेवढीच पुस्तकं. पण त्या काळात पुस्तकं वाचण्यापेक्षा बाकीचे नादच अधिक केले. म्हणजे असेल त्या गावाला तमाशा बघायला जाणं. संग्या-बाळ्या, पारज्याट असे कन्नड खेळ व्हायचे. तिथंही आमची हजेरी ठरलेली. गावात आणि पंचक्रोशीत कुठंही सोंगीभजन, कीर्तन असले की रात्र त्यातच. शाहीर तर अत्याळात तीन- चार. त्यांच्या शाहिरकीला रात्र पुरी पडायची नाही. त्यामुळे शाळेत लक्ष कमीच. पण शिक्षक बरंच कायकाय करून घ्यायचे. मला वक्तृत्व स्पर्धेलाही पाठवायचे. पण आमचं लक्ष शाळेपेक्षा बाकीच्या उद्योगातच अधिक, असे आम्ही तिथे-चौघे होतो.

आमच्या हेडमास्तरांनी आमच्या मुसक्या आवळण्यासाठी आम्हांला दिवाळीच्या सुट्टीत राष्ट्र सेवादलाच्या शिबिरास पाठवलं. तिथं तर गाणीच गाणी. अनेक नवे दोस्त. नंतर शिबिरास जायचा नादच लागला. नवंनवं ऐकण्यात मन गुंतत चाललं. मोठमोठे लोक यायचे. काय-काय सांगायचे. भारावून जाऊन ऐकायचो. कळत काहीच नव्हतं. पण उत्साह प्रचंड. त्याचवेळी दादा सबनीसांनी मला बोलावून घेतलं. खांद्यावर हात टाकला. तिथं असणाऱ्या साऱ्यांना 'हा कविता लिहितो अशी ओळख करून दिली. गाडी एकदम भरधाव हवेतच सुटली.

अत्याळ हे माझं आजोळ. पण माझे गाव म्हणून अजूनही याच गावाचे नाव सांगतो. इतकं या गावानं मला झपाटलेलं. गाव तीन-चारशे उंबऱ्याचं. गावातले शंभर-दोनशे लोक मुंबईला हॉटेलात, गिरणीत काम करणारे. त्यांची बायका- पोरं गावाकडे. सगळ्या गावाचा मी जावई. प्रत्येकालाच मी मामा-मामी- मावशी म्हणायचो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरचाच. मुंबईवाल्याच्या घरातली पत्र लिहिण्याचं, आलेली पत्रं वाचून दाखविण्याचं काम माझ्याकडे. सगळ्यांचा विश्वासू माणूस. एकाच घरातली तीन- तीन पत्रं वेगवेगळ्या वेळी लिहायला लागायची.

आई मुंबईत असणाऱ्या मुलाला पत्र लिहायला लावायची. मुंबईवाल्याची बायको सासूला न कळता नवऱ्याला पत्र लिहून घ्यायची. तर बाप सगळ्यासमोर बसवून मुलाला पत्र लिहून घ्यायचा. सगळा मजकूर पत्रात न मावणारा. म्हणून आधी मी 'काय काय लिहू' म्हणून विचारून घ्यायचो. ती आई किंवा बायको किंवा बाप, न थांबला बक्कळ काय-काय सांगायचे. मग त्यातील गरजेचे तेवढे लिहून, मी पत्र वाचून दाखवायची. यात गुप्तता पाळायची जबाबदारी आसायची ती वेगळीच. दिवसात वेगवेगळ्या वेळी तीन-चार पत्रं तरी लिहायचोच. सासरवासी सुना शाळेतच बोलवायला यायच्या. असा सगळा कारभार, पण ह्यातून प्रत्येकाचं मन माझ्यासमोर मोकळं व्हायचं. कधीकधी ऐकताना डोळ्यातून पाणी यायचं. मला लिहितं केलं, या सासूरवाशी सुनांनी. वेदनेची कोठारं म्हणजे ह्या बायका, त्यांनी मला अकाली प्रौढ केलं! 

कॉलेजात आलो तर तिसरंच झंगाट पाठीमागं. सेवादलाच्या शिबिरात प्रा.विठ्ठल बन्ने, श्रीपतराव शिंदे ओळखीचे झालेले. तेच शिबिराचे संयोजक असायचे. हेच बन्नेसर कॉलेजात शिकवायला. शिवराज हे आमचं कॉलेज. तीन तालुक्यात एकमेव, त्यामुळे चिक्कार मुलं. वर्ग जोंधळ्याच्या पोल्यागत भरलेला असायचा शिकवणारे सारे प्राध्यापक कोणत्या ना कोणत्या चळवळीशी जोडलेले. बन्नेसर वर्गात आले की, त्यांचं सुरू- 'अरे. कसली पुस्तके वाचता गधडयांनो, माणसं वाचा, आणि मग सांगायचे, 'त्या तहसीलदारानं तालुक्यातल्या सगळ्या कुंभारांना माती काढण्यास बंदी केलीय. माती काय त्याच्या बापाची? माती मिळाली नाही तर कुंभार गाडगी कशी भाजणारं? त्यांची पोरंबाळ उपाशी मरणार!' असे बरंच कायकाय... मग कॉलेज सुटलं की आम्ही प्रांत कार्यालयासमोर ठाण मांडून, घोषणा काय- तर 'कुंभारांना माती द्या!' असे सतत काही ना काही. एकदा सरांनी सगळ्या गावठी दारू गाळणाऱ्या तालुक्यातील हातभट्टीवाल्यांनाच प्रांत कार्यालयासमोर आणलं. 'सरकार जर दारूची दुकानं उघडत असेल तर पोलीस आम्हाला का पकडतात? आम्हाला दारूचे परवाने द्या! रस्त्यावरून जाणारे-येणारे लोक आम्हाला हसायचे. पण आमचे आपले सुरू... कुंभारांना माती द्या. आम्हाला दारूचे लायसन द्या...

एकदा सर तावातावाने वर्गात आले. म्हणाले, 'हा देश आहे का मसणवटा?' सगळ्यांच्या धान्यात आलं. आज काय तरी नवीन झंगाट आणलंय यांनी. तर त्यांचा सरळ सवाल- 'आपल्या सगळ्यांच्या नावापुढं बापाचं नाव लावतो आपण. पण ज्याला बापच नसेल त्यानं कुणाचं नाव लावायचं?' आमच्या चक्कीत जाळ. असं असेलच कसं? बाप तर प्रत्येकाला असणार. मग सरांनी सुरू केलं, 'आपल्या गावात जोगतिणी आहेत.' अंगावर काटा. जोगतिणी म्हटलं की एकदम धसकाच बसायचा. इतकी भीती. लहानपणापासून बरंच काय काय मनावर ठसत गेलंल. त्यांना चिडवायचं नाही. नाकारायचं नाही, यल्लूआई भयंकर वाईट. लगेच माणसाचे वाटोळं करते. पुरुषाची बाई करते. या बायकांच्या अंगात देव येतो. या बायका देव उठवून घालतात.... असलं प्रचंड काय काय. सरांनी या देवाची कळ काढू नये असे मनातून वाटत होतं, पण ते सांगत होते ते पटतही होतं.

झालं होतं असं की जोगतिणीच्या पोरीला तहसीलदारचा दाखला हवा होता. तर बापाचं नाव नसल्यामुळे तहसीलदार दाखला यायला तयार नव्हता. बाई आली सरांच्याकडं. याचं तापले डोके. तडक गाठला तहसीलदारांला. द्यातून नवंच जग आमच्यासमोर आलं. पुण्याहून बाबा आढाव आले. त्यांनी 'ह्यावर लढायचं' असं सांगून टाकलं. नंतर त्यांच्याबरोबर आले अनिल अवचट, मी पहिल्यांदा लेखक बघितला. अवचटांबरोबर फिरताना, बोलताना मनातली लिहिण्याची उर्मी उचल खात गेली. देवदासी चळवळ उभी राहिली. कळत-नकळत त्या चळवळीचा सहप्रवासी बनलो. एक नवं जग समोर आलं. त्यातून परिषदा, मोर्चे, सुरू झाले. कॉलेजपेक्षा ह्यातच मन अधिक गुंतत गेलं. 

तेव्हा कॉलेजचे प्राचार्य होते कवी, समीक्षक बलवंत देशमुख. त्यांचा माझ्यावर भारी जीव, महिन्याला एक तरी साहित्याचा कार्यक्रम घ्यायचेच. आम्हा लिहिणाऱ्या मुलांसाठी ग्रंथालय पूर्णवेळ मोकळे. आम्हाला पुस्तकं शोधून घ्यायची मुभा. कोणत्याही कवीसंमेलनास ते बोलावून घेऊन पाठवायचे. पैसे स्वतःच्या खिशातले द्यायचे. वक्तृत्वस्पर्धेत अथवा काव्यवाचन स्पर्धेत ढाल मिळवून आणली की कॉलेजच्या प्रत्येक वर्गात फिरवून आणायचे. कॉलेजच्या तीन वर्षांत कधीच अॅडमिशन फी, फॉर्म फी मला भरावी लागली नाही. उलट बक्षीसाची रक्कम, अधिक त्यात प्राचार्यांचे शंभर रुपये अशी चैन असायची. ‘शिवराज’ नावाचे उत्तम वार्षिक आमच्या कॉलेजचे निघायचे. मधुमालती कोटीभास्कर आमच्या शिक्षिका.

मी छान लिहावे म्हणून सतत प्रयत्न करणाऱ्या, प्रत्येक कविता, कथा आत्मीयतेने वाचाणाऱ्या. त्यावर भरभरून बोलायच्या. वाचायला पुस्तक आपणच विकत आणून द्यायच्या. त्यांना वाटायचं, मी इतर उद्योग करण्यापेक्षा फक्त लिहावं. चांगलं वाचावं, पण माझे उद्योग थांबत नव्हते....आज काय तर, जोगतिणी तालुक्यात किती? याचा सर्व्हे. काढा सायकली की निघाले गावंगावं पालथी घालत. त्यात बन्नेसरांच्या नव्यानव्या संघटना. कधी माकडवाले, कधी भंगारवाले, कधी गोसावी, कधी बेरड तर कधी भंगी. त्यांना उत्साह प्रचंड. महाराष्ट्रात ज्या ज्या चळवळी नंतर फार गाजल्या. स्वतःचा आकार धारण केला, त्याच्या कैक आधी गडहिंग्लजमध्ये त्या त्या प्रश्नांवर बारीक का असेना मोर्चा निघालेला आहे. पण त्याची नोंद कुठंच नाही. बन्नेसर आणि श्रीपती शिंदे यांना मोर्चे काढायचा नादच होता. पण त्या साच्याने मला भरघोस केले, जगण्याचे भान दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यात त्या काळात रणजित देसाई, शिवाजीराव सावंत, महादेव मोरे, शंकर खंडू पाटील असे मोठे लेखक वर्तमानपत्रातून भेटायचे. शंकर खंडू पाटील तेव्हा रविवार ‘पुढारी’ ची पुरवणी संपादित करायचे. देशमुख सरांनी माझ्या दोन कविता त्यांच्याकडे दिल्या होत्या. त्या छापून आल्या आणि शंकर खंडूंनी माझ्या पाठीमागं लिहिण्याचा तगादा लावला. पत्रावर पत्रे पाठवायचे. मग कविताच कविता. पण यातल्या कोणत्याच मोठ्या लेखकाला भेटावंसं वाटलं नाही. एकदा कॉलेजात बक्षीस वितरणाला महादेव मोरे यांना आणलं होतं. त्या भेटीत ते खूपच आवडले. घरचे वाटले, पण इतर लेखकांचे आणि माझे काही जुळले नाही. अवचटांना मात्र सतत पत्र पाठवीत असायचो.

याच काळात कथा लिहायला सुरुवात केली होती. त्यावेळी 'केसरी 'ची रविवार पुरवणी प्रसन्नकुमार अकलूजकर बघत. त्यांच्याकडे कथा म्हणून मी लिहिलेलं काहीही पाठवायचो. ते जसंच्या तसं छापायचे. याचा आनंद असायचाच, पण कोटीभास्करबाई कथा कुठं बिघडली, कशी बिघडली ते समजून द्यायच्या. वर्तमानपत्रात लिहिण्यापेक्षा मासिकांकड़ कथा पाठव असे म्हणायच्या. पत्ते आणून द्यायच्या. पण पोस्टाचा खर्च भयंकर वाटायचा. वर्तमानपत्राचं सोपं होतं. दादा सबनीसांकडं कथा-कविता दिल्या की ते आपल्या बातमीच्या पाकिटात घालून एस.टी.च्या पार्सलने पाठवायचे. मला खर्च काहीच नाही. एकदा 'उचकी' ही कथा बाईंना वाचून दाखवली. त्यांनी स्वतःकडंच ठेवून घेतली. नंतर महिन्यानं मौज च्या पाकिटातून कथा व राम पटवर्धनांचे पत्र. कथा जमलीय, पण ‘असं असं हवं,’ असं पत्र घेऊन बाईकडे गेलो. पटवर्धनांनी हजार ठिकाणी खुणा केलेल्या. बाई म्हणाल्या, ते म्हणतात तशा सुधारणा कर, तोवर बन्नेसरांनी 'घिसाडी' लोकांचा रेशनकार्डसाठी मोर्चा काढायचं ठरवलं. आठ दिवस सगळ्या घिसाड्यांना एकत्र करण्यासाठी सरांच्याबरोबरच. तोवर एक जर्मन बाई देवदासींच्या मुलाखती द्यायला आली. तिला घेऊन फिरण्याची लटांबळ माझ्याच गळ्यात. ह्यात पंधरा दिवस गेले.

कॉलेजच्या ग्राऊंडवर बाई भेटल्या. म्हणाल्या, 'तुला काय कळतं का? लिहिणाऱ्यानं एवढं बेफिकीर असू नये. शिस्त हवी.' बाईचा राग ओळखला. तिरमिरीत जाऊन कथा नव्यानं लिहिली. दुसऱ्या दिवशी बाईंच्या हातात. बाईंचा राग अजून उतरलेला नव्हता. काहीच बोलल्या नाहीत. तशाच निघून गेल्या. पुन्हा कधी कथेविषयी बोलल्याही नाहीत. एकदम ‘सत्यकथे’ चा अंक आमच्या घरात आला. कथा छापलेली. अंक घेऊन बाईचे घर गाठले. तर त्यांनी दडपे पोहे खाऊ घातले. म्हणाल्या, "लिहिणं ही जबाबदारीची गोष्ट असते. तू ती जबाबदारीनं केली पाहिजे. चळवळी करायला, मोर्चे काढायला इतर लोक आहेत, तू लिही..." त्यानंतर काहीच न बोलता त्यांच्या घरातून निघालो. मला उगाचंच लेखक झाल्यासारखं वाटू लागलं...

Tags: मराठी साहित्य मराठी लेखक राजन गवस अनिल अवचट Writer Marathi Books Literature Memories Rajan Gavas Anil Awchat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके