डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रगल्भ वाटेवरचा पुर्वाविष्कार

आपण सारेच लोककला विसरत चाललेले लोक आहोत. ‘सोंगी’, ‘भजन’, ‘गोंधळ’, ‘खडीगंत’, ‘पारड्यात’ या साऱ्यांचं अस्तित्व आता जवळजवळ संपलेलं आहे. ते पूर्ण नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या संहिता, त्यातील सामर्थ्यस्थळं (प्रयोगातील आणि अभिनयातील) शोधली पाहिजेत. त्या बळावरच मराठी नाटक उंच भरारी मारू शकेल, संपूर्ण मराठी समूहाचं नवं नाटक आकारू शकेल. ही वाटचाल सुरू झाल्याचं आश्वासन ‘दलपतसिंग येती गावा...’ हे नाटक देतं. म्हणून ते मला महत्त्वाचं नाटक वाटतं.

‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकात इतर नाटकांपेक्षा वेगळं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं येण्याची शक्यता आहे. कोणी म्हणेल, त्यात जगण्याचे प्रश्न मांडले आहेत. कोणी म्हणेल, यात माहिती अधिकार कायद्यासाठीचा सामान्यांचा लढा अधोरेखित केला आहे. असं बरंच काय-काय सांगितलं जाण्याची शक्यता आहे. हे नाटक बघण्यासाठी आलेले जाणकार नाटक संपल्यानंतर प्रतिक्रिया देऊ लागतात : अजून बरंच कच्चं आहे (कच्चंपण हे या नाटकाचं बलस्थान आहे.). फारच प्रचारकी वाटतं. प्रायोगिक असं काहीच नाही या नाटकात. किंवा, बेहद्द आवडलं. या स्वरूपाच्या किंवा अन्य प्रतिक्रिया ऐकण्यात येतात. यात काही कसबी नाटकवाले असतात. काही सतत प्रायोगिक नाटक बघणारे असतात. तर काही फक्त आपल्यालाच नाटक कळतं, असं मानणारे असतात.

माझ्यासारख्या सामान्याला अशात काही रस नसतो. त्यामुळे चर्चिकांना टाळून आपली वाट धरलेली बरी, असं मनात ठरवून रस्ता शोधला जातो. पण तरीही या नाटकाबाबत प्रत्येकाची मनातल्या मनात चर्चा चाललेलीच असते. म्हणजे प्रत्येकाला स्वत:शी चर्चा करायला लावणारं हे नाटक आहे. आपलं जगणं, आपली निष्क्रियता, आपलं सवंगपण, आपला कोडगेपणा, संवेदनशून्यता या साऱ्यांविषयीच हे नाटक प्रश्न विचारायला लावतं. त्यातील बहुतेक पात्रांत आपण आपल्याला पाहिलेलं असतं. आपण दुसऱ्या कुणाशी जरी बोललो नाही, तरी आत हे नाटक काहीतरी हालचाल घडवतं, हालवतं. थेट घरी जाऊच देत नाही. असा हा प्रयोग अतुल पेठे यांनी परिश्रमपूर्वक साकारला आहे. अर्थात, अतुल पेठे नव्याच्या शोधात भटकणारा अस्वस्थ दिग्दर्शक. त्यांना नाटकाचा नवा रूपबंध शोधायचा आहे. त्यासाठी त्यांची झटापट चाललेली आहे. त्यांच्या या साऱ्या धडपडीत ‘दलपतसिंग...’ मला एक महत्त्वाचा टप्पा वाटतो.

मराठी नाटक आपल्या मुळाचा पुन्हा शोध घेतं आहे, याचा प्रत्यय ‘दलपतसिंग’ देतं. मध्यंतरीच्या बऱ्याच मोठ्या काळाच्या पट्‌ट्यात, मराठी नाटकाला आपल्या मुळांचा विसर पडलेला होता. त्यामुळे मराठी नाटक एकदम चिंचोळं आणि परीघ आक्रसून अशक्त झाल्याचं  ढळढळीत जाणवत होतं, ‘प्रायोगिकता’ आवर्तात सापडलेली होती. विष्णुदास भावे किंवा किर्लोस्कर ही लोकपरंपरेची भक्कम परंपरा घेऊन आलेली मंडळी होती. त्यांच्या लोकपरंपरेच्या वारशाबाबत नंतरच्या काळात कोणास काही सोयरसूतक उरलं नाही. परिणामी नाटक एका वर्गात, एका भोवऱ्यात सतत फिरत राहिलं. त्याच समस्या, तीच भाषा, तेच ते विनोद. फारतर रंगमंचीय प्रॉपर्टीत फेरबदल. यातच कोणी काही थोडं वेगळं केलं की झालं प्रायोगिक. अशा थांबल्या नाटकाला अतुल पेठेंनी भर चौकात आणण्याचं काम ‘चौक’च्या प्रयोगातून केलं होतं. त्याचवेळी जाणवत होतं की या दिग्दर्शकाला नव्या वाटेचा शोध घेण्याची ऊर्मी आहे. पण फक्त महानगरातल्या भर चौकात हा शोध कसा काय घेता येईल, असा प्रश्न आपसूकच मनात निर्माण झाला होता. पण हा दिग्दर्शक भर चौकातून उठून (व्हाया कणकवली) जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ या खेड्यात पोहोचतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नाचे आपोआपच तीनतेरा वाजतात.

अतुल पेठे जांबसमर्थ गावातल्या नाटकवेड्या माणसांत गेल्यानंतर चौकातल्या नाटकाची संहिता त्यांच्या हातात देत नाहीत. तयार संहितेतून गावात पोहोचण्यानं आपल्या हाती काही लागणार नाही, याची खात्री त्यांना असावी. त्यामुळे तिथल्या लोकपरंपरांचा शोध त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. आजच्या खेड्यात जीव राखून असणाऱ्या लोककला म्हणजे शाहिरी, या शाहिरीची शक्तिस्थळं पेठे यांनी आपल्या परीने शोधली आहेत. ही शक्तिस्थळं आपल्या नाटकाला काय देऊ शकतात, त्यांचा वापर सजगपणे करता येईल का, याचा विचार त्यांनी गांभीर्याने केलेला आहे आणि मग संहितेची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात राजकुमार तांगडेची त्यांना मदत झालेली आहे. ही संहिता लोककलेच्या शक्तिस्थळांच्या योग्य वापरामुळे सशक्त तर होतेच, पण त्याबरोबरच ती नवं रूप धारण करते - जे मराठी नाटकाला किंचित अपरिचित आहे.

‘पोवाडा’ या लोककला प्रकाराचा थेट वापर करत असताना दिग्दर्शक सुरत्यांना वगळतो. ‘पोवाडा’ भूतकाळाला जिवंत करतो. हे त्याचं सामर्थ्य ध्यानात घेऊन संहिता फ्लॅश-बॅक तंत्र स्वीकारते, राजस्थानात घडलेल्या लढ्याची गोष्ट प्रेक्षकांसमोर ठेवायला लागते. ‘तमाशा’ या लोककला प्रकारातील काही सामर्थ्यस्थळांचा वापरही दिग्दर्शक मोठ्या खुबीने या नाटकात करतो. त्यामुळे ‘पोवाडा’, ‘तमाशा’ यांच्यातील आविष्कारतंत्रांच्या वापरातून एक नवंच ‘सादर रूप’ आपल्यासमोर येतं. नाटकाच्या नव्या रूपबंधाच्या घडणीच्या खुणा आपल्याला दिसू लागतात. या रूपबंधाच्या नव्या खुणा अधोरेखित होतात, त्या पार्श्वसंगीतासाठी केलेल्या लोकवाद्यांच्या वापरातून. या लोकवाद्यांशी भाषासंवेदन एकरूप करण्याची अनोखी किमया अतुल पेठे करतात. ती पूर्ण साधलेली आहे असं नाही, पण त्या वाटेवरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो. या साऱ्यातून घडतं असं की, हे नाटक मला उद्याच्या नव्या संहितेच्या, नाटकाच्या परिपूर्ण प्रगल्भ वाटेवरचा पूर्वाविष्कार वाटतो. अर्थात, हे मत व्यक्तिगत मत आहे.

मराठी नाटकाने लोककला परिपूर्णरीत्या शोधल्या, त्यातील शक्तिस्थळं अधोरेखित केली आणि सामर्थ्यानिशी पचवून वापरल्या तर मराठीतील नाटक अधिक सामर्थ्यशील होईल अशी माझी धारणा आहे. फक्त मध्यमवर्गीय संचितावर मराठी नाटकाला फार काही गाठता येईल असं मला कधीच वाटलेलं नाही. त्यामुळे ‘दलपतसिंग...’ मला एकदम आकर्षित करून गेलं. भावे-किर्लोस्कर हे लोकपरंपरेतून आलेले व लोककला पाहिलेले, जगलेले असल्यामुळे त्यांना अभ्यासाची गरजच नव्हती. आज आपण सारेच लोककला विसरत चाललेले लोक आहोत. ‘सोंगी’, ‘भजन’, ‘गोंधळ’, ‘खडीगंत’, ‘पारड्यात’ या साऱ्यांचं अस्तित्व आता जवळजवळ संपलेलं आहे. ते पूर्ण नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या संहिता, त्यातील सामर्थ्यस्थळं (प्रयोगातील आणि अभिनयातील) शोधली पाहिजेत. त्या बळावरच मराठी नाटक उंच भरारी मारू शकेल, संपूर्ण मराठी समूहाचं नवं नाटक आकारू शकेल. ही वाटचाल सुरू झाल्याचं आश्वासन ‘दलपतसिंग येती गावा...’ हे नाटक देतं. म्हणून ते मला महत्त्वाचं नाटक वाटतं.

Tags: अतुल पेठे नाटक संहिता दलपतसिंग येती गावा राजन गवस प्रगल्भ वाटेवरचा पुर्वाविष्कार atul pethe natak sanhita dalpatshing ye to gava rajan gawas Praghalb vatevarcha purva vishkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके