डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आणि मग मी जवळ जवळ हाकललाच त्याला...

आम्ही खूप पुढं आलो. नंतर शिक्षकाला सहज छेडलं. तर तो अजूनही रागातच. बडबडायला लागला, ‘अहो, इथली पोरं भयंकर गावठी. कितीही समजून सांगा, समजतच नाही यांना. गेले महिनाभर मी प्रयत्न करतोय, मुलांनी ‘गुरुजी’ म्हणायचं बंद करावं यासाठी, पण यांच्या काही अंगवळणी पडायला तयार नाही. जग कुठल्या कुठं गेलंय. कॉम्प्युटरचा जमाना आलाय. तरी यांचं आपलं एकच-गुर्जी! सुधरायचे नाहीत साले. हे असेच मरायचे. कुजून मरणार. यांना दुसरी जागा नाही. हे इथंच सडणार.’ असं बरंच काही.

अलीकडेच जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेल्या एका शिक्षकासोबत, तो नोकरी करत असलेल्या गावातून फिरत होतो. गाव कोणकोणत्या बाबतीत पुढे गेलंय, हे तो तन्मयतेनं सांगत होता. गावात इतक्या राजकीय पार्ट्या आहेत, इतक्या संस्था आहेत, असं बरंच काही. त्याला ते सगळे बदल हवेहवेसे वाटणारे होते. बोलता बोलता तो प्राथमिक शिक्षकांचे हाल माझ्यासमोर ठेवत होता. प्राथमिक शिक्षकाने शाळेत शिकवूच नये, अशी व्यवस्था प्रशासनाने निर्माण केल्याचे त्याचे म्हणणे होते. ‘सर्वशिक्षा अभियान, लेक वाचवा अभियान, शाहू अभियान’ अशी नामावली तो उच्चारत होता. त्यात करावी लागणारी कागद भरण्याची कामं, केंद्र शाळेतले लोक, त्यांना हवे असणारे रिपोर्ट, त्यांची दादागिरी, गटशिक्षण अधिकारी, त्यांचा भ्रष्टाचार असं बरंच काय काय... एकूण त्याच्या बोलण्यावरून प्राथमिक शिक्षण पूर्ण कोलमडून गेलंय, असं जाणवत होतं.

मध्येच त्यानं ‘प्राथमिक शिक्षणातील भ्रष्टाचार’ याविषयी माझ्या ज्ञानात भर घालायला सुरुवात केली. एखाद्या केंद्रशाळेचा, शाळेचा मुख्याध्यापक आहारयोजना, सर्वशिक्षा मोहीम यात लाखभर रुपये कसे मिळवतो याचा वृत्तांत. या सगळ्या सांगण्यात तळमळ होती. पण या सगळ्यात आपल्या वाट्याला काहीच येत नाही, याची बोचही दिसत होती. आपल्याला फक्त पगारावर नोकरी करावी लागते हे त्याचे भळभळणारे दुःख. त्यावर माझ्याकडे इलाज नव्हता. फक्त मान डोलवत ऐकणे, एवढंच मी करू शकत होतो. मला ते गाव, ती शाळा बघायची होती. कारण तिथं माझा एक जिवलग मित्र शिकलेला होता. त्याने शिक्षणाच्या क्षेत्रात बरीच कामगिरी केली होती. भारतीय शिक्षणाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेला होता. युनेस्कोपर्यंत त्याचं नाव पोहोचलेलं होतं. जगातल्या काही देशांनी त्याचं शैक्षणिक धोरण स्वीकारून प्रगती केली होती. भारतातल्या राजकीय इच्छाशक्तीला मात्र तो माणूस (जे.पी.नाईक) पेलवलेला नव्हता.

त्याचं बालपण या गावातलं. इंग्रज काळात या गावात शिक्षण असं नव्हतंच. इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम यातून तो माणून शिकत गेला. त्याचे दुडदुडणारे पाय ज्या गल्लीतून फिरले होते, त्या गावाच्या गल्लीतून मी हिंडत होतो. मनात श्रद्धाभाव, अंगभर पसरणारे त्या माणसाचे मोठेपण. मी ज्या कादंबरीची जुळवाजुळव करतोय त्यातले बरेच काही आणि माझ्याबरोबरच्या या प्राथमिक शिक्षकाने सुरू केलेले आजचे शिक्षण. काही विचित्र अनुभवत होतो मी. मध्येच त्या शिक्षकाने थांबवले. म्हणाला, ‘ही इमारत केंद्र सरकारच्या अनुदानातून बांधली. बांधलेली त्या दिवसापासून ह्या इमारतीत शाळा भरत नाही. बांधकामातला सगळा पैसा आमक्या-तमक्यांनी खाल्ला. फक्त सांगाडा उभा केला’, असं बरंच काही. त्यात मला कोणताच रस नव्हता. आपल्या रोमरोमात भिनलेला भ्रष्टाचार. त्याचं कौतुक तरी किती करायचं? मी त्याला थांबवून, या गावातून आजवर शिकलेल्या लोकांची यादी करण्याच्या प्रयत्नात होतो. काही इंजिनियर, काही प्राध्यापक अशी नावं तो माझ्यासमोर ठेवत होता. मध्येच ‘आज शिकणाऱ्यांना नोकऱ्या कुठं आहेत’, अशी एक नवी टेप त्यानं लावली. त्याच्याकडं मी लक्ष देत नाही, हे लक्षात आल्यावर त्यानं टकळी बंद केली. फक्त शांतपणे तो चालायला लागला.

गावातली एक एक गल्ली आम्ही पार करीत होतो. माझं बालपण माझ्यासमोर सहजपणे येत चाललं. चाळीस वर्षांपूर्वीच्या प्राथमिक शाळा. जीव ओतून शिकवणारे शिक्षक. चौथीत आमची घराबाहेर पडलेली वळकट, कंदिलाच्या प्रकाशात पुस्तक पगळून बसलेलं बालपण. आम्ही गल्लीतून जात होतो. गल्लीच्या शेवटच्या टोकाला लहान मुलांचा घोळका खेळत होता. आम्हाला बघितल्या बघितल्या तो मुलांचा घोळका, खेळ थांबवून आमच्याकडं सरकायला लागला. बहुतेक ती मुलं माझ्याबरोबर चालणाऱ्या शिक्षकाचे विद्यार्थी होते. कुतूहल, दबलेपण, मुलं आमच्याजवळ आली. निरागस, निर्विकार, नितळ. त्यांच्याशी माझा बोलण्याचा प्रयत्न, ती बुजलेली. आम्ही पुढं चाललो. काही मागं. त्यांची कुजबूज. थोडं अंतर गेल्यावर त्यांच्यातील एक ओरडला- ‘ते आमचे गुर्जी.’

माझ्याबरोबरचा शिक्षक गर्रकन मागे वळला. पळत जाऊन त्या ओरडणाऱ्या विद्यार्थ्याला पकडलं. बकोट्याला गच्च धरलं आणि त्याच्या कानशिलात लगावली. पोरगं कळवळलं. तसा शिक्षक ओरडला; ‘शाळेत काय सांगितलंय? गुरुजी नाही सर म्हणायचं!’ 

त्या मुलाला बोलताही येत नव्हतं आणि रडताही. बिचारं कसनुसा चेहरा करून थांबलं. या शिक्षकाला ‘गुर्जी’ म्हटल्याचा भयंकर राग आला. तो अजूनही रागानं फणफणलेला. त्याला एवढा राग का आला, हे मात्र मला कळत नव्हतं. पोरं दिसेनासी झाली. आम्ही खूप पुढं आलो. नंतर शिक्षकाला सहज छेडलं. तर तो अजूनही रागातच. बडबडायला लागला, ‘अहो, इथली पोरं भयंकर गावठी. कितीही समजून सांगा, समजतच नाही यांना. गेले महिनाभर मी प्रयत्न करतोय, मुलांनी ‘गुरुजी’ म्हणायचं बंद करावं यासाठी, पण यांच्या काही अंगवळणी पडायला तयार नाही. जग कुठल्या कुठं गेलंय. कॉम्प्युटरचा जमाना आलाय. तरी यांचं आपलं एकच- गुर्जी! सुधरायचे नाहीत साले. हे असेच मरायचे. कुजून मरणार. यांना दुसरी जागा नाही. हे इथंच सडणार.’ असं बरंच काही.

माझे मन एकदमच सुन्न, बोलायची इच्छाच संपलेली. त्या शिक्षकाची मात्र टकळी सुरूच, ‘ह्या मुलांच्या घरचेच लोक त्यांना गुर्जी म्हणायची सवय लावतात. त्यांच्याच डोक्यातून गुर्जी निघत नाहीत. तेच बरळतात गुर्जी. गुर्जी मग पोरं त्यांचंच उचलतात’ असं बरंच काही.

त्या सगळ्या प्रकाराने मी पार हादरलो होतो. त्या शिक्षकाने त्या मुलाच्या थोबाडीत मारली नव्हती, माझ्याच थोबाडीत हानली होती. इतका विव्हळ झालो. कळ मेंदूपर्यंत पोहोचलेली. गुरुजी माझं परमदैवत. मराठी शाळेतले गुरुजी, आज जरी रस्त्यात दिसले तरी लहान मूल होऊन मी नतमस्तक होतो. पुढे हायस्कूलात, कॉलेजात कैक शिक्षक भेटले. त्यांनी कैक गोष्टी शिकविल्या, यशाच्या पायऱ्या त्यांच्या आधारावरच चढत गेलो. पण लक्षात राहिले, मनावर कोरले गेले, ते प्राथमिक शाळेतले गुर्जीच. साध्या विजार-शर्टातले, काही धोतर-टोपीतले. हरिभाऊ आर्दाळकर नावाचे गुरुजी पंचा आणि काळा कोट घालत. शाळा चुकविली की पाच-सहा पोरं घेऊन घरी येत. असेल त्या अवस्थेतच पालखी करून शाळेत नेऊन टाकत. कधीकधी हातपाय दोरीने एकत्र बांधून शाळेतल्या खुंटीला अडकवून देत आणि प्रेमही तितकेच करत. एखादा मुलगा आजारी पडला, तर गुरुजी त्याच्या घरात हजर. गुरुजींची आणि आमची वळकट शाळेतच. विहिरीवर पोहायला घेऊन जाणारे, डोंगरावर वनस्पतींचे कुळजुळ सांगणारे, क्रीडांगणावर आमच्यासह रांगणारे आणि वर्गात ‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या.’ ही कविता शिकविताना डोळ्यातून घळघळा वाहणारे पाणी आवरण्याचा प्रयत्न करणारे. त्यांच्याशिवाय आज आठवतच नाही कुणाचा तास.

पुढे साने गुरुजींच्या पुस्तकांचा परिचय झाला. शाम सोबत वावरू लागला. मग गुरुजी घरंच करून बसले मनात. पुढल्या आयुष्यात फक्त ज्ञानी माणसालाच आम्ही ‘गुरुजी’ हा शब्द वापरला. आम्ही मित्र-मित्र आजही बोलायला लागलो की म्हणतो, ‘नेमाडे गुरुजींची मुलाखत वाचली का? पवार गुरुजींची भेट झाली होती.’ इतकी ‘गुरुजी’ ह्या शब्दावर आमची भक्ती, तोच शब्द या नव्या शिक्षकाला का डाचला असेल? या शब्दाचा तिरस्कार त्याच्या मनात कसा भरला असेल? माझ्या डोक्यात प्रश्नांची गुंतावळ. मला त्याच्यासोबत चालणेही नको वाटायला लागलं. त्याला मी मध्येच थांबवून. म्हटलं ‘मला एकट्याला इथं फिरायचं आहे, तुम्ही निघून जा.’ तो एकदम चक्रावलाच. गप्पगार उभा राहिला आणि मग मी जवळजवळ हाकललाच त्याला. तो दिसेनासा झाल्यावर मला थोडं मोकळं-मोकळं वाटू लागलं.

Tags: गुर्जी हरिभाऊ आर्दाळकर कैफियत नेमाडे गुरुजी साने गुरुजी राजन गवस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके