डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले. त्यानंतर फक्त तीन-चार महिन्यांनी यदुनाथ थत्ते यांनी ‘साने गुरुजी जीवन परिचय’ हे पुस्तक लिहिले. ते कदाचित साने गुरुजींचे पहिले चरित्र असावे. या दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती हर्मिस प्रकाशनाच्या वतीने चार महिन्यांपूर्वी प्रकाशित झाली. ती आवृत्ती आता संपली असून हर्मिसची दुसरी आवृत्ती या आठवड्यात प्रकाशित होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हर्मिस’च्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात राजन गवस यांनी केलेले भाषण प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

प्रास्ताविकात ‘हर्मिस’चे प्रकाशक सुशील धसकटे म्हणाले की, ‘हायस्कूलच्या वयात मी साने गुरुजींच्या साहित्याच्या जवळ आलो. याच काळात राष्ट्र सेवादलाशी संबंधित होतो.’ त्यांनी किती तरी मैलांचा प्रवास करून यदुनाथ थत्ते यांची भेट घेतली. यदुनाथजी किती मायेने बोलले. त्यांचा आयुष्यावर कसा परिणाम झाला, याबाबत सुशीलचे विवेचन नीट ऐकत असताना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्याविषयी मी आपल्याशी किंचित सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपल्याकडे बालसाहित्यासंदर्भात गंभीर चर्चा होत नाही. ती का? लहान मुलांच्या भावविश्वात बालसाहित्याला महत्त्वाचे स्थान असते. मुलांच्या भावविश्वाचे भरणपोषण ज्या अनेक गोष्टींमुळे होत असते, त्यात बालसाहित्याचा वाटा मोठा आहे. त्याच्या गुणवत्तेबद्दल मला बोलायचे नाही. किमान हे लिहिणारे लोक प्रयत्नपूर्वक लहान मुलांना काहीतरी दिले पाहिजे, या विचाराने त्यांना सुचेल व त्यांचा जो जीवनविषयक दृष्टिकोन असेल त्या त्या पद्धतीने लिहीत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

त्यामुळे एक-दुसरा दिवाळी अंक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून काढला जातो आहे. वर्षाकाठी काही पुस्तके लहान मुलांसाठी म्हणून निघत आहेत. म्हणजे आपल्याकडे बालसाहित्य किमान तग धरून आहे.

मात्र परिस्थिती फारशी आशादायक नसली तरी पूर्ण निराशा करणारी नाही. पण कुमारवयीन वाचकांना मराठी साहित्य काय देते आहे, असा प्रश्न आपण चर्चेस घेतला तर आपल्या हाती काय येईल? आपल्या साहित्यविश्वात कुमारवयीन वाचकांना गृहीत धरले जाते का? या प्रश्नाचा विचार खोलात जाऊन करावयास हवा. 

आपण बालसाहित्य वाचणाऱ्यांचा वयोगट सहा ते अकरा वर्षांचा कल्पिला तर ही मुले पहिली ते सातवीपर्यंतच्या इयत्तेत शिकणारी असतील. सहावी-सातवी या इयत्ता सीमारेषेवरच्या आहेत. या काळात मुलांच्या भावविश्वातल्या बदलाला नवे आयाम मिळत असतात. सातवी ते बारावी या काळात मुलांच्या भावविश्वात प्रचंड गतीने बदल घडत असतात. शारीरिक आणि मानसिक वाढीचा हा महत्त्वाचा काळ. मानसिक ताणतणावात शारीरिक बदल भर घालत असतात.

या कुमारवयीन वाचकांना आपण आपल्या साहित्यात महत्त्वाचे कधी मानणार? या काळातील भावावस्थेचे चित्रण मराठीत चांगल्या प्रकारे आलेले आहे. मिलिंद बोकील, प्रकाश संत, राजेंद्र मलोसे, कृष्णात खोत या लेखकांनी आपल्या कादंबऱ्यांतून, जी.ए.कुलकर्णी, भाऊ पाध्ये या लेखकांनी आपल्या कथांतून या कुमारवयीन भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवून त्याचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपण त्या कलाकृतींविषयी भरभरून बोललो. पण या कुमारवयीन मुलांबाबत मात्र काहीच बोललो नाही. म्हणण्यापेक्षा आपल्या भाषेतला आपला वाचक तयार करण्याविषयी आपण काहीच बोलत नाही. वाचक एकदम आभाळातून पडतो का? वाचक हेतुपूर्ण परिश्रमाने तयार करता येतो का? या गोष्टी थोड्या विचारात घेतल्या पाहिजेत, ज्या साने गुरुजी, यदुनाथ थत्ते, ताम्हणकर, राजा मंगळवेढेकर यांनी ध्यानात घेतल्या होत्या. त्या दृष्टीने त्यांनी जाणीवपूर्व निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या वर्तमानात त्याचा विसर पडलेला आहे असे मला वाटते.

कुमारवयीन वाचकांसाठी लिहिणारे लेखकच आपल्यात नाहीत ही परिस्थिती चिंता उत्पन्न करणारी आहे. या वयात मुलांचा आवाज बदलतो. आपलाच हळुवार असणारा आवाज एकदम फाटायला सुरुवात झाली आहे. तो बदलतो आहे, ही जाणीव त्या मुलांच्या मनात कोणते प्रश्न, गंड निर्माण करीत असेल? हे वास्तव त्यांच्यासमोर ठेवणारी एखादी उत्तम कथा आपल्याकडे लिहिली जाते का? किंवा आठवी, नववीपर्यंत मुलीच्या शारीरिक बदलाबाबत तिला समंजस करणारी कथा- कादंबरी त्या वयाचे, अनुभवाचे, भाषेचे भान बाळगून लिहिली गेली आहे का? असा विचार केल्यास आपल्या हाती फारसे काही लागत नाही. ह्या मुलांना आपण अल्लाभरोसे सोडून दिलेले आहे. आणि आजची मुले वाचतच नाहीत अशी जबाबदारी झटकणारी विधाने आपण बिनधास्तपणे करत असतो. याचाही आपण जरूर विचार केला पाहिजे असे मला वाटते. कारण या मुलांना आज ज्या वर्तमानातून जावे लागते आहे, ते वर्तमान भयावह आहे. आज मुलांना बालपण उरले आहे का? असा प्रश्न उपस्थित करू लागल्यास हादरून जावे असे वास्तव आहे.

माझ्या पिढीला, माझ्या आधीच्या पिढीला- खेड्यात असो वा शहरात- सांगण्यासारखे बालपण होते. घडणीच्या काळात, संवेदनशील म्हणण्यापेक्षा अतिसंवेदनशील अशा या काळात तणावाशिवाय मुलांच्या भोवती दुसरे काही आहे असे दिसत नाही. रांगणे-चालणे संपले की मुलाला प्ले, के.जी, बालवाडी असल्या ठिकाणी भरती केले जाते. त्याला मुक्त वावरणे कठीण, मुक्त खेळणे कठीण. अशी विचित्र परिस्थिती जन्मास आली आहे. संस्कार शिबिरांनी व्यावसायिक रूप धारण केले आहे. अपवाद आहेत, पण ते सगळ्यांच्या वाट्याला येत नाहीत. सगळीकडे काच. हा काच इतका असह्य की मुलाला गुदमरून जायला व्हावं. ज्या वयात मुक्तपणे भटकावं, हरहुन्नरी अनुभवांनी आपल्या आतल्या जगण्याला समृद्ध करावं त्या वयात मुलांना स्पर्धेच्या खाईत लोटून त्यांच्या बालभावनांचा चुराडा करण्याची कोण स्पर्धा चाललेली आहे.

दृश्य माध्यमातल्या रिॲलिटी शोपासून ते खेड्यापाड्यांत पोहोचलेल्या वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षा मुलांची किती प्रकारांनी नासधूस करत आहेत हे पाहिले की अंगावर शहारे उभे राहतात. फक्त पहिली ते सातवीपर्यंत माझ्या परिसरात 130 स्पर्धापरीक्षा पसरलेल्या आहेत. पालकाला अशा परीक्षेला आपल्या मुलाला बसवण्याची कोण घाई. हे सारे पैसे काढण्याचे उद्योग मुलाच्या बालपणाच्या चिणचिण्या करत आहेत. याकडे कधी प्रदूषण म्हणून आपण पाहणार आहोत की नाही? पालक वाईट अर्थाने मुलाच्या भवितव्याविषयी सजग झालेले आहेत. आपण चूक करत आहोत असे त्यांना वाटतच नाही. हा बथ्थडपणा घालवायचा कसा? पहिलीपासून खाजगी शिकवणी. मुलाला मुक्त श्वास घेताच येऊ नये अशी जीवघेणी परिस्थिती. शाळेत तर याहीपेक्षा भयावह स्थिती. मुलाला चिणून मारण्याची ठिकाणे आपल्या शाळा होत आहेत का? याचा गंभीर विचार करायला हवा. महाराष्ट्रभरच्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. प्रामाणिक, समरसून शिकवणारे, प्रयोग करणारे, मुलांचे शिक्षण आनंददायी करणारे शिक्षक आहेत. पण त्याचे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे.

शाळेतील पाठ्यपुस्तके कुमारवयीन मुलांच्या दृष्टीने योग्य आहेत का, याची खुली चर्चा एकदा महाराष्ट्रात व्हायला हवी. कारण या पाठ्यपुस्तकांबाबत आपण सार्वत्रिक बोलण्याचे टाळल्यामुळे कुमारवयीन मुलांच्या भरणपोषणाचा उरलासुरला रस्ताही त्यांच्या शोषणाचे हत्यार बनणे निरोगी समाजाच्या निर्मितीस अपायकारक आहे. हे विस्ताराने सांगितले याचे कारण आपण आज यदुनाथजी थत्ते यांच्या ‘साने गुरुजी-जीवन परिचय’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करीत आहोत. साने गुरुजींच्या, श्यामची आई, श्याम : भाग 1 व 2, सुधास पत्रे ते भारतीय संस्कृती या पुस्तकांनी महाराष्ट्राच्या कुमारवयीन वाचकांना भरभरून दिले.

गुरुजींचे लेखन सर्व वयाच्या वाचकांची भूक भागवते. असा प्रतिभावंत शतकात एखादाच. तसे सर्वांनाच लिहिता येईल असे नाही. यदुनाथजींनी कुमारवयीन वाचकांसाठी साने गुरुजींचा जीवन परिचय लिहिला. गुरुजींच्या जाण्यानंतर लगेचच यदुनाथजींनी त्या विशिष्ट अवस्थेत हे पुस्तक पूर्ण केले. श्रद्धा, भक्ती, आत्यंतिक प्रेम या साऱ्यांसह अखंड जिव्हाळा या पुस्तकात ओतप्रोत भरलेला आहे. साने गुरुजींचे हे परिपूर्ण चरित्र आहे, असे मी म्हणत नाही. पण यदुनाथजींना जे गुरुजी जाणवले, जे आठवले, पाहिले, अनुभवले, मनात साठले ते सारे कागदावर आणण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. गुरुजींच्याविषयी असणारे असीम प्रेम, श्रद्धा या पुस्तकातील शब्दाशब्दांत भरलेली आहे. या पुस्तकाची पाने पालटताना प्रकरणांच्या शीर्षकावरून जरी नजर फिरवली तरी याची साक्ष पटते. मातृत्वाचा नंदादीप, मायेच्या छायेत, विद्येसाठी वनवास, खडतर जीवन, सद्‌गुणांचा बगीचा, अश्रूंची उपासना, तुरुंगातली तगमग, अमृताचा पुत्र इत्यादी.

गुरुजींच्याविषयी सश्रद्ध भावनेने लिहीत असताना यदुनाथजी वाचकाला विसरत नाहीत. त्यामुळे गुरुजींचे जीवन सांगताना ते कथेकरी होतात. गुरुजींच्या सोबतच आपण वावरत आहोत असे हे पुस्तक वाचताना सतत वाटत राहते. गुरुजींचे जीवन म्हणजे एक कविता. या कवितेजवळ यदुनाथजी तितक्याच तरल संवेदनशीलतेने जातात. ती कविता आकळण्याचा प्रयत्न करतात. जिथे धग जाणवते तिथे थबकतात, गुरुजींच्या जगण्यातली करुणा, प्रेम, हळुवारपणा, माणसाविषयीची गाढ आस्था नेमकेपणाने शब्दबद्ध करतात. यदुनाथजींची भाषा सहज, सुंदर, काव्यात्म होत जाणारी भाषा आहे. ती वाचकाला भुरळ घालते. एकदा या पुस्तकाचे पहिले पान उघडले की, शेवटच्या पानापर्यंत ही भाषा आपल्याला खिळवून ठेवते. कधी प्रेमाने ओथंबते, श्रद्धेने भारावते, करुणेने भारित होते, तर कधी प्रियेशी बोलावे इतकी हळुवार होते. मुळात गुरुजींचे जीवनच अशा भाषेला जन्म देणारे. 

यदुनाथजींच्या प्रतिभेने गुरुजींच्या जगण्यातील शुभ्र काही मराठी वाचकांच्या हाती अत्यंत निर्मळपणे, नितळपणे दिलेले आहे. जो पहिला मुद्दा मी मांडलेला होता, तिथे पुन्हा येऊ. हे पुस्तक कुमारवयीन वाचकांचे भावविश्व समृद्ध करते. अशा पुस्तकांची निर्मिती मराठीत जास्तीत जास्त व्हायला हवी. आजची ती सर्वांत जास्त गरज आहे. सुशील प्रकाशन व्यवसायात जाणीवपूर्वक उतरलेला आहे. तो खेड्यात वाढलेला आणि शहरात आलेला प्रकाशक आहे. त्याला शहरातल्या, खेड्यातल्या वाचकांना काय दिले पाहिजे याचे भान आहे. त्याला चांगल्या वाचकांप्रत मुलांचा प्रवास व्हावा म्हणून जाणीवपूर्वक पुस्तकं काढायची आहेत, हे चांगले सुचिन्ह आहे असे मला वाटते.

भोवताल भांबावून टाकणारे असले तरी असे प्रयत्न त्या भांबावलेपणातून बाहेर काढणारे आहेत. असे प्रयत्न वाढावेत.

Tags: राजन गवस हर्मिस प्रकाशन साने गुरुजी यदुनाथ थत्ते आस्था प्रेम करुणा rajan gavas Faith Love Compassion Sane Guruji Yadunath Thatte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके