डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विवाहितेची विजेचे शॉक देऊन हत्या. दूधसंस्थेच्या सेक्रेटरीला अटक. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी. तिप्पाण्णा पाटील वय चाळीस, यांचा विवाह सौ. इंदूशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुलं असून मुलगा इयत्ता पाचवीत शिकत आहे. श्री. तिप्पाण्णा यांचे गावात अनैतिक संबंध होते. या त्याच्या संबंधांना सौ. इंदूने आक्षेप घेतल्यामुळे चिडून तिप्पाण्णा याने विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली व तो फरार झाला.

तो माझा मित्र होता. अगदी जिवलग. हायस्कुलात असेपर्यंत. नंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. तो दहावीत नापास झाला. हुशार होता तो, एकत्रच अभ्यास करायचो आम्ही. त्याच्या वडिलांची दोन-तीन घरं होती गावात. त्यांतल्या एका घरात आमच्या वळकट्या. चौथीला स्कॉलरशिपसाठी चोथे गुरुजी शाळेत जादा तास घ्यायचे. तेव्हाच आमची वळकटी घरातून बाहेर पडली. लाईट नव्हती आली तेव्हा गावात. कंदील नाहीतर चिमणी. तेवढ्या उजेडात आठ दहाजण आम्ही डोळे फोडून एक एक अक्षर वाचायचो. सकाळी नाकात बोटं घातली की बोटं काळंकुट्ट होऊन यायचं. सगळी काजळीच. अभ्यास कमी, इतर उद्योग अधिक. त्यामुळे आमच्यापैकी कुणीच स्कॉलरशिपला बसलं नाही. पण आमची वळकटी पुन्हा घराकडं वळली नाही. तेच घर आमची अभ्यासाची खोली. घर देवळाजवळचं. देवळात आठ- पंधरा दिवसांतून कीर्तन, कोणकोण कुठले कुठले बुवा यायचे. सगळं गाव जमायचं. रात्रभर कीर्तन, टाळ-मृदंगाचा आवाज. कोणी तळाशीकर म्हणून महाराज गावात आठ दिवस तळ ठोकून होता. सप्ता साजरा करायला. रोज त्याचंच कीर्तन. देऊळ दोन मजली. म्हणजे दुसऱ्या मजल्यावर बरोबर मध्यभागी मोकळा चौक.

भोतेभोर फळ्या. लाकडी जिना. खाली चाललेलं कीर्तन वर बसूनही बघत ऐकता यायचं. गावची बारकी-सारकी पोरं वरच्या मजल्यावर बसून कीर्तन ऐकायची. ऐकता ऐकता तिथंच झोपायची. ह्या तळाशीकर महाराजाच्या कीर्तनानं आमच्या झोपेचं पार खोबरं करून टाकलं होतं. खोलीत तळमळत पडण्यापेक्षा कीर्तनच ऐकलेलं बरं म्हणून आम्ही देवळात. तर आमच्या मित्राचा तिथं रोज एक उद्योग. एकदा त्यानं माडीवर कीर्तन ऐकत झोपलेल्या पोरांच्या चड्या काढून खोलीत आणून ठेवल्या. गावभर बोंब. सगळ्या बायकांनी तळाशीकर म्हाराजालाच शिव्यांनी धुवून काढला. असले उद्योग. मग पास कसा होणार? त्यात त्याची म्हातारी म्हणजे आजी नव्हे. वडिलांच्या वडिलांची बहीण. गावातच दिलेली. तिला पोरबाळ झालं नाही. तिचा सगळा जमीनजुमला ह्यांनाच मिळाला. ती त्याला म्हणायची, 'न्हाई शिकलास तर चालतय आमाला. नुस्तं बांध हिंडून आलास, पोट भरल.' तिच्या असल्या बोलण्यानं त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालेलं. त्यामुळे झाला नापास. मला भयंकर वाईट वाटलं त्यावेळी. त्याला मी पुन्हा परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला. त्यानं त्या वेळेपुरती मान हालवली. नंतर काहीच नाही केलं. मला डी. एड्. ला अॅडमिशन मिळाली जिल्ह्याच्या गावात. गाव सुटलं. त्याच्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. मला शिकणं जरुरीचं होतं. तीन भावंडं, एक बहीण. सगळा ओढगस्तीचा संसार. डी.एड.ला महिना चाळीस रुपये स्टायपेंड मिळायचा. त्यात सगळं भागायचं.

...2...
पहिल्या वर्षाची परीक्षा संपवून मी सुट्टीला गावी आलो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच तिप्पाण्णा घरात हजर. ह्या आमच्या मित्राचं नाव तिप्पाण्णा. मध्ये मध्ये मी गावी यायचो. तेव्हा काही तो भेटला नव्हता. चौकशी केली तर कळलं होतं की त्यानं मुंबई गाठली. वास्तविक त्याला मुंबईला जायची काहीच गरज नव्हती. त्याला समोर बघताना माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. वर्षभरात त्याच्यात प्रचंड बदल झालेला. चांगला आडमापी सुटला होता आणि वयानं माझ्यापेक्षा चारपाच वर्षांनी मोठा वाटत होता. एकदम कडक इस्त्रीचे कपडे आणि पायात चकाकणारे काळे कुळकुळीत बूट. आमच्या कॉलेजात मास्तरही तसले घालत नव्हते. मला एकदम अवघडल्यासारखं झालं. अशा सुटाबुटातल्या माणसाला बसायला द्यायला आमच्या घरात खुर्ची नव्हती. तरी दांडीवरचं घोंगडं अंथरत मी त्याला म्हटलं,
‘अरे, एकदम सायेबच झालास.' 
तो कसाबसा अवघडून घोंगड्यावर टेकला. पाय लांब सोडले. बूट तसेच पायात. एवढ्यात शेजारची सखूकाकी आली. आत घुसतानाच म्हणाली, 'तिप्या, भाड्या बूट तरी भाईर काढून यायचं. बसलाय बघ कसा हेंगाडी. म्हमईत सगळी आशीच हाईत व्हय रंऽऽ‘

‘त्याचं काय हाय काकू, तुला न्हाय कलायचं. तिथं ना सगळं बूट घालूनच कलाय लागतंय.’ तिप्पाण्णाला 'र', 'ळ' ह्यासारखी अक्षरं म्हणायलाच यायची नाहीत. जीभच वळायची नाही.  

लागला बघ भाड्या ना ना करायला. व्हय रं तिप्या, तितं काय 'ना'चा कारखाना हाय, जो इल तो सारका ना ना कराय लागतोय?'

काकूच्या बोलण्यानं तिप्पाण्णा खळखळून हसला. मला काकूचं निरीक्षण आवडलंच. आमच्या गावात गल्लीला दहा- पंधराजण मुंबईत. पोट भराय मुंबईशिवाय पर्याय नव्हता. पोरगं कळतं सवरतं झालं की मुंबईला तिरपटायचं. तिथं कुठल्यातरी हॉटेलात बश्या धुवून पोट भरत, गावाकडंही दहा-पाच रुपय पाटवाय लागतं. नंतर कुठल्यातरी मिलमध्ये नाही तर कंपनीत डकून संसार कराय लागतं. त्यामुळं गावातली शंभर- दोनशे जणं मुंबईत. त्यातलं कोणीही गावाकडं आलं, की त्याचं बोलणं सारखं 'ना' जोडून. आलोना, गेलोना. काकूनं तिप्पाण्णाला चांगलाच झाडल्यामुळं गडी एकदम सरळ झाला. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मुंबईतल्या बर्याच गोष्टी तो मला भारावून सांगत होता. त्याला थांबवून, 'तू मुंबईला का गेलास?’ असं विचारायचं होतं, पण तो न थांबता बडबडत होता. मध्येच तो म्हणाला, 
'तुला सांगतो मितला. तुझ्या सालख्यानं मुंबईत असाय पायजे. दाबजोल पैसा.' मी जोरजोरात हसाय लागलो. एवढ्यात आई आणि सखूकाकू दोघी एकदम पुढ्यात. आई म्हणाली, 
'तिप्पाण्णा, तुला घेतलं व्हय रं घरात?’

‘न्हाई घीवून काय करत्यात?’ काकूनं उत्तर देऊन टाकलं. माझ्या भुवया उंचावल्या. म्हणजे काही तरी घडलं होतं. तिप्पाण्णाकडं बघितलं, तर त्याचा चेहरा एकदम काळवंडलेला.
'मदी आजी म्हणाल्ती, तो आमाला आनी आमी त्येला मेलाव, म्हणून इच्यारलं. आईनं पुन्हा खोचकरलं. 
'तसं म्हणायचं आस्तंय, बाई’, काकूनं सूर ओढला. मी न रहावून विचारलं, 'म्हणजे ह्यानं काय गोंधळ घातलाता?'
‘ऑऽऽ' करत सखूकाकू माझ्याकडं बघत म्हणाली,
'म्हणजे तुला काय बी ठाव न्हाई? मग कसला मैतर म्हणायचा तू? लई दांडगं रामायण झालं. म्हणून ह्यो पळाला म्हमईला. इचार की त्येला', म्हणत काकू, आई बाहेर पडल्या. तिप्पाण्णा एकदम अंग चोरून खाली मान घालून बसलेला. आई, काकू बाहेर पडताच तो एकदम अंग झटकून उठला आणि उंबऱ्याच्या बाहेर पडला.

'बोलू ले नंतलऽऽ' म्हणत वाटेला लागला. मी त्याच्याकडे पहातच राहिलो. त्यानं परतून बघितलंही नाही. 
नंतर कळलं तिप्यानं लक्ष्मीच्या देवळातल्या तांब्याच्या घागरीच चोरून नेऊन मोडीत विकल्या. गावभर बोंब. मग गावपंचायत. पोलिसात केस करायची ठरली. त्याच्या बापानं गावाच्या हातापाया पडून प्रकरण मिटवलं. त्याला घरातून हाकललं. म्हणून तो मुंबईला गेला. हे सगळं करायची त्याला काहीच गरज नव्हती. पैशाला त्याला तोटा नव्हता. मग त्यानं असं का केलं असेल? कळायला मार्ग नव्हता. सहज आईजवळ विषय काढला. तर म्हणाली,
'दरविशी हाय भाड्या. उधळायला पैसा पायजे आसंल म्हणून केल्यानं आसंल तसं, तसल्याची संगत बरी न्हवं.’

आईनं सल्ला दिला. पण माझं मन मानायला तयार नव्हतं. मनातून त्याचा विषय जायलाही तयार नव्हता. सरळ त्याचं घर गाठलं. तर माझ्याशी कोणच त्याच्या घरातलं नीट बोललं नाही. तो घरात नव्हता. कुठं गेलाय कोणास माहीत नव्हतं. परत फिरलो तर हा सापडला. गोठणाजवळ म्हशी फिरवणाऱ्या पोरांच्या घोळक्यात. मला बघितल्या बघितल्या घोळका सोडून आला. म्हणाला, 
‘आले. तू कसा काय इकडं?’ 
म्हटलं, 'तुझ्याकडंच.'
'चल तल', म्हणत तिप्या चालाय लागला. 
धीर करून म्हटलं, 
'तिप्याऽऽ नेमकं प्रकरण काय?’ 
म्हणाला, 'कुटलं लं?’ 
'तेच. देवळातल्या घागरी-हंड्याचं?’
'खलं सांगू? आलंऽऽ ते काय ठलवून न्हवतं केलाय. आप्या बलबल बोलत बोलत उललं. गावाची गम्मत कलू. तल झाली गम्मत जल्माची. खलं व्हतय त्ये चांगल्या कलताच. मुंबई दिसली. गड्या दांडगा श्याना झालो. आता न्हाई ल्हायचं गावात. मुंबै बेस्ट.'

'तिथं दोन-चार हजारांवर राबणार आणि इथं तुझ्या घरातले लोक पगारानं मान्स घेऊन शेती करणार. त्यापेक्षा तूच का नाही लक्ष घालत?’
'आलं तसंच व्हतं डोस्क्यात. खलं हे सगलं घडलं. आजून घलातली कोकलत्यात. मग काय कलतोस?’

विषय वाढत गेला. तिप्पाण्णाला मनापासून मुंबईत रहायचं नाही, हे दिसतच होतं. घरातले तर अजून विसरायला तयार नव्हते. तिप्याच्या बापाला समजावून काय अर्थ नव्हता. त्याच्या घरात सगळी सत्ता आजीच्याच हातांत. काही करून आजीचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं. तिप्यानं गावात रहावं, असं मला का वाटत होतं कुणास ठाऊक. मुंबई आणि तिप्या म्हटलं की एकदम मनात भलतंसलतंच यायचं. पण इलाज सुचत नव्हता.
जेवता जेवता आईला म्हटलं, 
'आई, तुला तिप्या एवढा वाईट हाय असं वाटतंय?'
'म्हणजे रंऽऽ? तुला म्हणायचं काय हाय? त्येनं केलं ते चांगलं केलं आसं म्हणायचंय तुला?' आईचे अनेक प्रश्न. 
‘असं कुठं म्हटलंय मी?’

'मग काय म्हणायचं तुला?’ 
'आईऽऽ तिप्या चोरटं न्हाई. गमती-गमतीत केलं ती चोरी कसली? पयल्या पास्नं त्येचं आसंच हाय. मनात आलं की कायबी करतंय. मनानं लई निर्मळ हाय.’
'आसू दे, आसू दे, त्येची साक नको भराय.' 
‘तसं न्हाई आई. म्हमईत त्ये काय धड र्हाईल आसं न्हाई वाटत. हातातनं जाईल पोरगं.'
'त्येचं नशीब. तुला कशाला काळजी. गप्प जेव की गाडऽ.’
‘तसं कसं आईऽऽ' 
'मग काय करूया म्हणतोस?’

'तू बघ की आजीची समजूत घालून. तिनं घेतलं मनावर तर त्ये रांक्कीला लागंल.’
आई काहीच बोलली नाही. जेवून तसाच बाहेर पडलो.

...3...
सुट्टी संपली. जायला निघालो. तरी तिप्या गावातच. म्हणजे बहुतेक त्याचं मुंबईला जाणं टळलं वाटतं, असं म्हणून आईसमोर विषय काढला. तर तिनंच सगळं घडवून आणल्याचं कळलं. वर म्हणाली,
'आता तू जाणार तर त्या भाड्याला सुद्दीन र्हायाचं सांगून जा. आईचा आदेश शिरसावंद्य मानून तिप्याला गाठला. सगळं सांगितलं, तर म्हणाला,
'नीट वागायचं म्हणजे कसं वागायचं?
कप्पाळावर हात मारून घेतला. आता ह्याला सांगायचं तरी काय? मग म्हणाला, 

‘फाल जीवाला नगो लावून घेऊस. पुन्हा काय न्हाई विकणाल. लक्ष्मीचा हंडा. आता शिल्लकच हाय कुठं?’ आणि एकटाच जोरजोरात हसाय लागला. कशाचाच याच्यावर परिणाम नाही असं मनात काय काय येत गेलं. अशात गदगदा हलवत तिप्या म्हणाला,
'तुजं बघ कसं सगळं लांक्कीला लागलं. आता कोलस झाला की मास्तल व्हशील. लगीन वल्हाड व्हईल. आमचं काय?’ 
म्हटलं, 'तुजं काय? तुला काय करायची गरज नाही. एवढं तुज्या वाडवडलानं मिळवून ठेवलंय. आमचं काय हाय सांग बघू?’
मग काहीच बोलला नाही. फक्त मान हालवत बसला. नंतर मी त्याला समजावणंच सोडून टाकलं. जिल्ह्याला कॉलेजात गेलो आणि तिप्पाण्णा प्रकरण पार विसरून गेलो.

...4...
'काय तिप्पूशेटऽऽ चाल्लंय काय सद्या?’ पाठीमागून आवाज आला. तसा थांबलो. म्हटलं, 'काय चालायचं?’
सदबा मिसाळ घाईघाईनं कुठंतली चालला होता.
म्हटलं, 'यलवाली गाऽऽ' तल गड्याचं तिसलंच. म्हणाला,
'मोकला किती दीस फिलत बसणाल? डेलीत येतोस काय?’
आता हेच्या डेलीत जाऊन मी कलणात्य काय? दूध घालाय कधी गेलं तली तिथल्या वासानं माझा जीव गुदमलून जातोय. तिथं कलणाल काय? तली चाचपावं म्हणून म्हटलं, डेलीत यीऊन मी काय कलू? तल म्हणाला,

'मापाड्याचं काम कलायचं. म्हयन्याला हजालभल पगाल पडंल.' बघू बघू म्हणत त्याच्यापासून काढता पाय घेतला. खलं म्हणजे मला बी मोकलं फिलून फिलून कंटाला आल्ता. घलातली काय कामंच सांगाय तयाल नव्हती. म्हणजे अजून त्यांनी मला जमेतच धलाय नव्हतं. सगलं हे असं. नंतल कशाबश्याचा भलपूल विचाल केला आणि सदबा मिसालाला म्हटलं, 'येतो गा डेलीत.’ त्याचं त्यालाच आबजूक वाटलं.

डेलीत मापाड्या म्हणून जाणाल हे घलात सांगायलाच नको, म्हणून ठलीवलं. पाटलाचं पोलगं मापाड्या म्हणजे आमच्या म्हाताल्याला तलास झाला असता. टिपल्या किसन्याल नुस्तं कानावल घातलं. त्यानं पुढचं काम केलंच. म्हातालीनं उल्टच केलं, कधी नव्हं ते बोलवून म्हणाली, 'तली कसा श्याना झालास.' हे म्हातालीच्या तोंडात म्हणजे गंमतच वाटली. तल म्हातालीच म्हणाय लागली, 
'आता कालमान बदाललंय. पाटीलकी म्हालाच्या घलात गेली म्हटल्यावल आपल्या पोलांना कसला आलाय मानापमान? जगायसाठी जमंल ते कलावं. म्हाताली असं म्हणेल असं न्हवतं मला वाटलं. एकदम डोकं चकलावलं. एवढा बदल म्हण्जे भयंकलच.

...5...
मापाड्या म्हणून डेलीत चांगलंच बस्तान बसवलं. तवल लागली निवडणूक. तुम्ही म्हणाल कशाची. तल आमच्या डेलीचीच. आमचा सेकलटली दत्ता नुल्ल्या गेला पलून. आता ह्या दोन्ही गोष्टी कशा घडल्या? हा तुमचा पलश्न. माझ्याजवळ उत्तल न्हाई. घडल्या एवढ्या खल्या. कलण्यासालखं माज्याकडं कायच न्हवतं. मापाड्या आणि सेकलटली मीच. त्यात काय अवघड न्हवतं. उल्टं बलं होतं. म्हणजे दत्ता नुल्ल्या मला सालखा दम दिऊन सांगायचा, उललं दूध तू नको हिशोबात धलू. तो काय सांगतोय कलायचंच नाही. मग हलूहलू लागलं कलाय. तवा त्याला म्हटलं, 'हे गड्या असं नाही चालायचं’, तल त्यानं माझाच खिसा भलला. नंतल वलकड खिशात यायला झाली सुलवात. नुल्ल्या पलाला. माझी चांदी. दिवसाकाठी कसंबी शंभल सुटाय लागले. एवढ्या पैशाचं कलायचं काय? घलात द्यायची जलूल नव्हती. आमच्या चेलमनला ह्यातलं काय सांगून उपयोग नव्हता. म्हणून व्हाईस चेलमन श्याम्या हाणवलला घेतला जवल. बेणं लई कडू, मला म्हणलं, 'आता आपण चांगलं कलू. र्हायचं तालुक्याला आणि बसायचं पित मेगड्याच्या खानावली.’ सगलं पैसं त्योच सपवाय लागला. म्हटलं, 'ह्यात माझा काय फायदा?’ तल म्हणाला,

‘तू बी पीत जा जला जला. तब्बेतीला बलं अस्तय.' अशात झाला गोंधळ. निवडणुकीत मिसालान वगलला श्याम्याला. गडी तलबत्तल. त्यानं केलं. शेपलेट पॅनेल. मला म्हणाला, 'हे पॅनेल आलं का डेली सगली तुझी. माझ्यावी तोंडाला सुटलं पाणी. गावातली पोलं घातली गोला. त्यास्नी घातलं मटनाचं जेवण. म्हटलं, गावात सगल्या पदावलनं हाकलून घालूया म्हाताल्यास्नी. तल पोलं एका पायावल तयाल. लागली कामाला. मिसाल एकदा घलात आला आणि लागला वाजवायला. तुल्ला घेतला डेलीत त्ये श्यान खाल्लं. म्हातालीला म्हणाला, तुज्या नातवानं डोस्क्यावर मिल्या वाटल्या. म्हातालीने काढला माझा बाक. तलीबी न्हाई बदलो. उल्टं लावला नेट मिसालाचं पॅनेल शाप आडवं. गावात घातला घुडीगोंधल. झटक्यात झालो नेता. आता सेक्लटली आणि मापाड्या दोन्ही मीच. भोतेभोल गावची उंडगी पोलं. नुस्ती चैन.

...6...
श्री कृपेकरून आमचे घरी आमचे ज्येष्ठ सुपुत्र चि. तिप्पाण्णा- पत्रिका वाचतानाच मी उडालोच. तिप्या आता गावात नेता झालाय. ग्रामपंचायतीत सदस्य आहे. डेरी त्याच्या ताब्यात आहे. सोसायटीत त्याचा वाटा आहे. असं सगळं कधी-कधी गावाकडं गेलं की कानावर यायचं. त्याला भेटायला गेलं तर तो तालुक्याच्या कुटल्यातरी नेत्याच्या पाठीमागनं फिरत गेलेला असायचा. त्याच्या दोस्त कंपनीतलं कोण कोण भेटायचं. काय काय नवीन नवीनच सांगायचं. हळूहळू माझा त्याचा संबंध जवळजवळ संपत आल्यातच जमा होता. वय वाढत गेलं की नाती बदलत जातात. त्यात मी गावापासून शंभर मैल दूर. एकाएकी नाही म्हणता यायचं तर बऱ्याच प्रयत्नांनंतर शिक्षक म्हणून ऑर्डर मिळाली होती. मध्ये त्यांच भानगडीत एकदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला गाठायचं होतं. म्हणजे वशिला लावायचा होता. म्हणून तिप्याकडं गेलो. तिप्यानं आपल्या करकरीत हिरो होंडावर बसवलं. तालुक्यात दाबजोर मटन खायला घातलं. जिल्ह्याला येऊन अध्यक्षाच्या समोर नेऊन उभं केलं. म्हणाला, 'सायेब, ह्या माझा क्लासमेट. ह्येला मास्तल कलायचा. देणं-घेणं आसंल तर सांगून टाका.' तिप्याचा वट बघून माझं डोळंच गरगरलं. त्याला बाहेर आल्यावर म्हटलं, 'तू म्हणजे आता मोठा पुढारीच झालास.’

तर म्हणतो कसा, पुढाली व्हयाला अक्कल लागत न्हाई. पैसा झाला की काम भागलं. ह्या अध्यक्षाला एकदा दालू पाजून उल्टा केल्ता. पंचायत समितीच्या गेस्ट हाऊसमध्ये. सगळी खोली वकून मुतून घाण केल्ल्यान.

तिप्याच्या प्रयत्नाला यश आलं नाही हा भाग वेगळा. पण त्यानं प्रयत्न केला होता. त्याचा बदललेला अवतार मला एकदम आश्चर्यचकित करत होता. त्याच्या लग्नाला जायला जमलं नाही. एक तर त्या वेळी आमच्या शाळेच्या परीक्षा सुरू होत्या आणि आमचा खत्रुड हेडमास्तर रजा द्यायला तयार नव्हता. माझ्या न जाण्यानं काय बिघडलं नव्हतं. तिप्याचं लग्न जोरात पार पडलं. चार हजार माणूस जेवलं म्हणं. सगळ्या गावानं तोंडात बोट घातलं. असं लगीनच गावात कुणाचं व्हायला नव्हतं. हे मला आईनं गावाकडं गेल्यावर सांगितलं. वर म्हणाली, आता तुझं बी ह्या उन्हाळ्यात टाकायचं. न्हाई, एकदा आटपून टाकूया.

आईचं म्हणणं खरं होतं, पण कर्जातली अजून दोन शेतं सोडवून घ्यायची होती. घर नवंजुनं तरी करायला हवं होतं. त्याशिवाय लग्नाचा विचार करण्यात काय अर्थ नव्हता. पण हे आईला सांगणार कोण?

झालं असं, की घराकडनं मी नोकरीच्या गावी चाललो होतो. तिट्ट्यावर एस. टी. ची वाट बघत थांबलेलो. एवढ्यात सदबा मिसाळ समोर आला. म्हटलं, 
'तात्या, काय केलं?’
म्हणाला, 'आता आमी करायचं काय? श्यात आणि घर. सगळं करायचं ते तुजा दोस्त कराय लागलाय.’
म्हणजे गाडी तिप्यावर घसरायच्या नादात. आता सुटका तर करून घ्यायला पाहिजे म्हणून म्हटलं, 'औंदा जरा पावसानं फसवलंच.’ तर त्यानं तेवढाच धागा पकडून सुरुवात केली. म्हणाला,
‘आरंऽऽ मान्संच फसवाय लागली. तितं पावसानं तरी का गप्प बसावं?’ आता त्याला थांबवणं कठीण.
'तुज्या त्या बोबड्या दोस्तानं लुटलं गावाला. कशात काय राकलं न्हाई. डेरी लुटली. गोरगरिबांचं सराप लागतील रांडच्याला. पोटच्या पोरांच्या तोंडचं दूध निरपून घालत्यात मान्स डेरीला आणि ह्यो त्येचं पैसे खातोय. कुटं फेडणार हाय कुणास धक्कल. रांडा करतोय रांडचा. घरात बायको खंगत बसलीया आणि ह्यो गावभर फिरतीय श्यान खाईत.'

एस.टी. आली म्हणून थांबला बोलायचा. मी गडबडीनं पाय उचलले. गाडीत बसलो. पण डोक्यात भुगा. सदबा मिसाळ म्हणत होता ते खरं असलं तर तिप्याचं काय खरं नाही.

...7...
‘कधी आलालं?’
'काल रात्री.’
'मग यलवाली कुठं मालली दौड?’ 
'तुझ्याकडंच. तुझ्याशी थोडं बोलायचंय.'

'बोल की गाऽऽ काय बदलीबिदलीचं हाय वाटतं?’
'न्हाई. पण तुझ्या एकट्याशीच बोलायचंय. बाहेर जाऊया.'
'चल तल.'
'शाळंच्या गोठणावर जाऊया.’ 
'तू म्हणशील तितं. आज कायबी काम नाही गड्या. कलच दांडगी तालांवला उडाली. बी.डी.ओ. आल्ता. जवाल योजनेतल्या दोन भावी मंजूल झाल्यात. स्वजलधालेचंबी एक काम व्हतं.
दिवसभल घोल घालत बसला लांडचा’. 
'तिप्या, तू म्हणजे एकदम मोठा नेताच झालास.’

'काय कलणाल? गावाला कोण धनी गोसावीच उलला न्हाई म्हटल्यावल कलणाल काय? कुणीतली बघाय नको? ह्या पाच वलसात काय काय आणलं बघ की गावात. गटालं बांधली. पाण्याची चिन्ता मिटीवली. गलामपंचायतीची बिल्डिंग बांधली. आता डेलीची तेवढी बिल्डिंग बांधली की झालं. गावाचं लस्तं डाबली केलं. गावाचा पांग फेडून टाकला.’

खरं हे बघून लोकांनी म्हणाय पाहिजे- तू चांगलं केलास, उलटं लोक काय वायलंच बोलाय लागल्यात.'

'आगा ते असायचंच. चांग्लं कुणाला बगावतय. त्यास्नी जमाय न्हाई ते आमी केलंय म्हटल्यावल कडू लागणालच की.'

'तुझ्या विरोधात असणाऱ्यांचं ठीक. पण तुझ्या बरोबरची माणसं पण त्येच बोलाय लागलेत त्याचं काय?’

'आलं, तू ल्हाणाल पल मुलकाला. कधी तली उगावणाल गावात. मग सदबा मिसाला सालखा कोणतली भेटणाल. त्यो सांगल त्ये सगलं खलं वाटणाल, मग तू बडबडणाल. त्यापेक्षा तू गावात फिलून बघ. गाव काय म्हणतंय?’

'गाव म्हणतंय तू डेरीत बक्कळ पैसा खाल्लास. सगळा पैसा बाई बाटलीत घालवाय लागलास. त्याचं काय?’ 
'असं म्हणणाल्याचं नाव सांग. खापलतो लांडच्याला. कुणाचं पाच पैसे खाल्या असतील तल हात झडल. आगा मी दालू पितोय हे खलं. माझ्या पैशाची पितोय. आलं माझ्या वाडवडलाचं जळता जळंना एवढं हाय. मला कशाला कुणाचं?
'मग तुला म्हातारीनं घरातनं का हाकललं?’
‘त्या विषयावर तू बोलायचं न्हाई.’ 
'अरे, त्याच विषयावर बोलायसाठी तुला इथं आणलाय.'

‘हे बघ गड्याऽऽ तू माझा दोस्त हाईस हे बलोबल. पण तू कशातबी नाक घालाय लागलास तल मला न्हाई जमणाल. माझ्यात आणि तुझ्यात आता तू फलक कलाय पायजेस. किती केलं तली तू मास्तल. तुला न्हाई कलायचं जगायचं कसं असतं. तवा तू माझ्या भानगडीत नको पडूस.’

'मी तुझ्या भानगडीत नाही पडत, पण तुझ्या भानगडी तुला फार दिवस तगवणार नाहीत. अजून वेळ गेलेली नाही. शाना हो.'

'झालं तुझं बोलून. आता लाग लस्त्याला. आनी एक ध्यानात ठेव- इथनं पुढं असा श्यानपणा शिकवायच्या भानगडीत नगो पडूस. दोस्त व्हतास आता न्हाईस. एवढं ध्यानात ठेव.'

आणि तिप्या तरातरा रस्त्याला लागला. त्यानं पाठीमागं वळूनही बघितलं नाही.

...8...
सागर बारचा टेरेस. फारशी वर्दळ नाही. पंधरावीस टेबलं. भोवती दोन-चार खुर्च्या, सामसूम. फक्त शामा हणबर आणि तिप्या तेवढे एक टेबल आडवून. वेटर त्यांच्यासाठी ताटकळत उभा. एक एक क्वार्टर संपलीय. अजून तिप्याला मुंगीही चावायला तयार नाही. 
'शामादाऽऽ आज दालूच चढाय तयार न्हाई.’
'सेक्रेटरी आसं म्हणून कसं चालेल. आपुन क्वार्टर पिलीय.’
'त्येच म्हणतोय गा मी.’
'काय बिघाडलंय', शामानं उरलेल्या पेल्याचा तळ गाठला.
'बिघाडतय कुठलं काय? त्ये मास्त भेटलं सक्काली. फुकट डोस्कं उठवून गेलं. म्हणं मी पैसा खाल्ला. त्या जान्या म्हाताल्यानं त्येचं कान भलल्यात. लांडच्याला सांगून टाकलं- पुना त्वाँड न्हाई दाकवायचं. माज्या भानगडी काढतोय? न्योट हाय म्हणून भानगडी कलतोय. ह्येला काय कलायच्या माझ्या भानगडी. म्हणं- म्हातालीन घलातनं भाईल का काढलं.’ कायबी बोलत्यात लांडची. वेटरऽऽ लीपट कर लीपीटऽऽ क्वालटल.’

'सेक्रेटरीऽऽ आपल्याला गावाकडं जायचंय. जास्त नको.'
'गप्प गाऽऽ, जरा मेंदूला मुंग्या चावू दे, म्हणजे डोस्क्यातनं जाईल सगलं. न्हाईतल झोप न्हाई लागायची. त्या मास्तलानं डोस्कं फिलीवलय.'

'लई नगो डोस्क्यात घीऊ. असली लिचडी काय बी बरळत्यात. किंमत न्हाई द्यायची.'
पुन्हा पेले भरले. तिप्या शून्यात पहात बसला. त्याला पेला हातात घेणंही जमत नव्हतं. शमा हणबर शांतपणे पीत राहिला. आता ह्या गड्याला उचलूनच न्यायला लागणार ह्या विचारानं तो एकदम भांबावला, म्हणाला-
'सेक्रेटरी, आता बासऽऽ बिल भागवून रस्त्याला लागू.’
तिप्या एकदम विस्कटला. त्यानं खिशातून शंभरच्या नोटा काढून टेबलभर पगळल्या. ओरडला-
'वेटलऽऽ ह्यातलं तुझं बील येचून घेऽऽ‘

तालामाला बघून शामा हणबरानं त्याच्या पेल्यातली दारू घटाघट पिऊन टाकली. उटून अंग झटकलं. नोटा गोळा केल्या. वेटरचं बील भागवलं. उरलेल्या खिशात घातल्या. म्हणाला-
‘सेक्रेटरी, लागा रस्त्याला', आणि बकोटीला धरून त्यानं तिप्याला उटवला. एक एक पायरी उतरत रस्त्यावर आणला. करकरीत उजेडात तिप्या ओरडला,
'त्या मास्तलाच्या आईलाऽऽऽ‘ 
जाणायेणारे त्याच्याकडे डोळे फाडून बघाय लागले.


...9...
माझं गावाकडं जाणं सणावारासाठीस उरलं. वय आणि व्याप एकदम वाढत जातात. जगण्यातले ताण-तणावही बदलत जातात. माझे व्याप आता पुरते व्यापून उरलेले. ह्यात तिप्पाण्णासारख्या राजकारणी माणसाला आठवणीत ठेवण्याइतपत जागा शिल्लक नव्हती. त्याचं कानावर काय काय यायचं. पण ज्याचा आपला काही संबंधच नाही, त्याची काळजी तरी कशाला करायची- अशातून मनाची समजूत आपोआपच निघायची.

माझं माझं स्वतंत्र जग. त्यात आता नव्या नव्या माणसांची ये-जा. त्यात शाळा ते घर आणि घर ते शाळा हा नित्याचा दिनक्रम. उरलेल्या वेळेत पोराबाळांचा अभ्यास आणि बायकोची उठाठेव. अशात गावाकडची आठवण कमीच. दुपारच्या चहाच्या वेळेत कधी नव्हे ते आमचे हेडमास्तर मोठ्यानं म्हणाले, तुमच्या गावची बातमी वाचली का?

पेपर तर कधीतरी बघायचो. त्याच त्याच बातम्या आणि तेच तेच लेख काय वाचायचं? अगदीच नाईलाज झाला तर पेपर उघडायचो. हेडमास्तरांच्या आवाजानं मी जागेवरून उठलो. तोवर त्यांनीच मोठ्यानं बातमी वाचायला सुरुवात केली.

विवाहितेची विजेचे शॉक देऊन हत्या. दूधसंस्थेच्या सेक्रेटरीला अटक. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी. तिप्पाण्णा पाटील वय चाळीस, यांचा विवाह सौ. इंदूशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुलं असून मुलगा इयत्ता पाचवीत शिकत आहे. श्री. तिप्पाण्णा यांचे गावात अनैतिक संबंध होते. या त्याच्या संबंधांना सौ. इंदूने आक्षेप घेतल्यामुळे चिडून तिप्पाण्णा याने विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली व तो फरार झाला.

बातमी ऐकता ऐकता माझे डोळे आपोआप बंद झाले. तिप्या शेवटी असा वाया गेला हे वाईटच. मनातच पुटपुटलो. तर बातमी पूर्ण झाल्यावर हेडमास्तर म्हणाले,
'तुमच्याच वयाचा दिसतो. काय राक्षस माणूस होऽऽ आणि विजेचे शॉक म्हणजे आरडबोंब झालीच असेल. तुमच्या गावात माणसं राहत का जनावरं? कोणीच धावलं नसेल मदतीला.'

तोवर दुसरा म्हणाला, 'अशांच्या घरात रोजच असते आरडओरड. कोण जाणार सारखं सारखं सोडवायला म्हणून गेली नसतील सोडवायला?’ नंतर ही चर्चा अशीच वाढत गेली. मला ऐकणंही असह्य वाटत होतं.

रविवारी गाव गाठलं. तर गावात सगळी तीच चर्चा. तिप्याच्या पोरांना त्याचा मेव्हणा गावाला घेऊन गेलेला. त्यानंच केस गुदरली होती. तिप्याला कोणी जामीन द्यायचा नाही, असं गावानं सभा घेऊन ठरवलेलं होतं. पोलिसांनी त्याला काढण्या लावून तपासासाठी गावात आणलं होतं. त्या वेळी सगळं गाव जमा झालेलं. तर सगळ्या गावासमोर तिप्या हसत उभा होता म्हणे. शेवटी बायकांनी छी-थू केली. तरी त्याचं नाक वरच.

आई म्हणाली, 'व्हतं म्हमईला त्ये बेस व्हतं. तुझं आईकलं आनी त्या म्हातारीच्या पाया पडलो.’
म्हटलं, 'हे पुढं होणार हे काय आपल्याला माहीत होतं? आपण काय कुणाचं वाईट व्हावे म्हणून केलं?’

आई म्हणाली, 'भाड्यानं बापाच्या जीवाला म्हातारपणी जळवा डशीवल्या. कुणाच्या वाळ्ळ्या पाचोळ्यावर पाय न ठेवणाऱ्या मान्साच्या नशिबाला हे असल बघायची पाळी आली. त्या शामा हणबरानंच लावली त्येची वाट, भाड्या सदानकदा संगट असायचा. त्येचं बी नाव घालाय पाहिजे व्हतं केशीत.’
आई सगळा संताप व्यक्त करीत होती. मला तिप्याचा रागही येत नव्हता.

...10...
गावात मी आलोय हे कळल्यावर सदबा मिसाळ घराकडं आला. आता त्याचं तिप्या पुराण सुरू होणार म्हणून मी थोडा सावधच होतो. सदबा मिसाळ, पिकलेला गडी. एकदम विषयाला न येता बाकीचच काय काय बोलाय लागला. मध्येच म्हणाला, 'तू गावाभाईर हाईस त्ये बेस हाय बग.’
म्हटलं, 'गावात आस्तो तरी तुमच्या राजकारणात नसतो आलो.'

'तुज्या दोस्तानं वडला असता गाऽऽ तुला राजकारणात भल्या भल्यास्नी गुतीवलंय तितं तुजं काय?’
‘आनी कुणाला गुतीवलंय गाऽऽ‘ आईनं काळजीत विचारलं.
'काय सांगायचं वयनी' म्हणत जानबा मिसाळ सांगाय लागला, 'जोत्या पाटलावर दीड लाख वावल्यात, तुका मोट्यावर पन्नास हजार, श्यामा हणबरावर पन्नास हजार एवढं आता तरी कागदावर आल्यात. आतून कोण कोण गावतंय कुणास धक्कल. नुसत्या हातउचली दिल्यात सही करून घीऊन. घुतली डेरी रांडच्यानं. धुईना व्हतं खरं. घरदार तरी सांबाळाय पायजे व्हतं. त्येचीबी लावली वाट.’

'एवढा पैसा केला काय म्हणायचा त्यानं', न राहवून विचारलं. तर सदबा मिसाळला सुरसुरी चढली. म्हणाला, 

'नाद केला गड्यानं नाद. बाईचा नाद, बाटलीचा नाद. पुढाऱ्यांचा नाद. गरिबांच्या पैशावर चैन केली आणि आता बसला तुरुंगात. बाई जीवानिशी गेली. पोरं भिकंला लागली. जल्माचा इदोस.' मग त्यानं बोलता बोलता गावाची पांढरी, ती जास्त वाईट कसं खपवून घेत नाही. पापाचा घडा कसा भरतो. असलं कीर्तन लावलं. माझे डोळे झाकाय लागले, तेव्हा त्यानं घर सोडलं. झोपताना आई म्हणाली,'मेल्यामागारी कायबी उटीवत्यात माणसं... म्हणजे आईला म्हणायचं काय आहे, हेच कळायला तयार नव्हतं. आई तिप्याची बाजू घेणं शक्य नव्हतं. मग ती असं का म्हणाली? असल्या तंद्रीतच झोप लागली.

तिप्याचा विचार करायची आता मला काहीच गरज नव्हती. तो जिल्ह्याच्या मध्यवर्ती कारागृहात निवांत होता. त्याला कोणी भेटायला जाणं शक्य नव्हतं. त्यानं केलं ते चांगलं असं म्हणणारा माणूसच नव्हता. पण तरी मन त्याच्यापासून हटत नव्हतं. उठल्या उठल्या मी श्यामा हणबराचं घर गाठलं. त्याची बायको मला बघितल्या बघितल्या म्हणाली, 'त्येनी गेल की तालुक्याला.' माघारी फिरलो. आपण तिप्याला विसरायला हवं. मनाला बजावलं. घराकडं वळलो. नोकरीचं गाव गाठणं गरजेचं होतं.

नंतर कधी कधी कानावर आलं, तिप्याच्या जमिनीला श्यामा हणबरानं जप्तीची नोटीस लावलीय. तिप्याच्या म्हाताऱ्यानं अंथरूण धरलंय. श्यामा हणबरानं तिप्याकडे कसला स्टॅम्प लिहून घेतलाय. जमीन लाटाय त्यानंच तिप्याच्या बायकोला मारलं. गावानं गावसभा घेतली. श्याम हणबराला सगळ्यासमोर आणलं. त्यानं तिप्याला दिलेल्या पैशाचा हिशेब गावासमोर ठेवला. गावानं हणबराला फैलावर घेतला. तिप्याच्या मेव्हण्यांनी त्याला गावाबाहेर बदडला. हणबरानं गाव सोडलं. असं बरंच काय काय. जे ऐकावं ते नवीनच. नंतर नंतर सगळंच हळूहळू विसरत गेलं. सहा महिन्यांनंतर तिप्या तुरुंगात आहे, हे ही मी विसरलो.

...11...
दिवाळीची सुट्टी लागली. पोराबाळांसह गावच्या तिट्टयावर उतरलो. तीन-चार पिशव्या, बायको, दोन पोरं आमची सर्कस रस्त्यानं चाललेली. एकदम तिप्या समोर बघून न बघितल्यासारखं करून मी पाय उचलला. तर बायको म्हणाली, सुटला वाटतं की ह्योऽऽ. मी प्रतिसादच दिला नाही. गतीनं पुढं झालो. पोरं जवळजवळ पळतच होती. बायको ओरडली, असं काय कुत्रं पाट लागल्यागत पळालाय. जरा दमानं चला.

मी पायाची गती कमी केली, पण वळून पाठीमागं बघितलं नाही. तिप्या मला गाठतच म्हणाला, 'तुझ्याशी मला बोलायचं व्हतं.’ माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. बायको गांगरून त्याच्याकडं विचित्र नजरेने बघत होती. तो पुन्हा म्हणाला, ‘वहिनी तुम्ही व्हा पुढं. मला त्याच्याशी बोलायचं हाय.'

बायको पुढं झाली. तिनं पोरांनाही बरोबर घेतलं.

तिप्या म्हणाला, 'मास्तल, तुज्या मुल हे झालं. माझ्या जल्माची वाट लागली.’
डोक्यात घण घातल्यागत झालं. मी फक्त त्याच्या डोळ्यांकडे पहातच राहिलो. त्याच्या डोळ्यांत हिंस्र श्वापद सैराट धावत होतं. अंगाला घाम फुटला. तोंड उघडलं पण आवाज फुटत नव्हता. मला म्हणायचं होतं- ‘माझं काय चुकलं?’ पण ते मला म्हणताच आलं नाही.
 

Tags: Rajan Gavas Mumbai Secretary Election D.Ed राजन गवस मुंबई सेक्रेटरी निवडणूक डी.एड् weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके