डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आणि सगळे गाव शांताबाईच्या गुडघ्यावर डोके ठेवून दाढीडोई करून लागले !...

गावगाडा बदलतोय.  ‘तशी टाकावूच होती गावगाड्याची व्यवस्था’  अशा आशयाची विधाने आपण सतत ऐकत असतो. ‘शिक्षणामुळे नवी जीवनदृष्टी येते’, हे खरे; पण या नव्या जीवनदृष्टीतच सारे सत्व आहे, असे ठाम मानून खेड्यातल्या सर्वव्यापी जीवनाला हद्दपार करण्याचा चंग भारतातील नवसाक्षरांनी बांधला आहे. मेकॅलेप्रणित शिक्षणातील पिलावळ यात अग्रेसर आहे. यातूनच खेड्याविषयी, खेड्यातील जीवन व्यवहाराविषयी तुच्छतादर्शक शब्दांची उधळण सर्वत्र होत आहे.

‘श्रीमती शांताबाई यादव : वय वर्षे 60. मुक्काम पोस्ट हासूर सासगिरी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर.’ या पत्त्याची शांताबाईला काहीच गरज नाही. कारण तिला कोणी पत्र पाठवणार नाही की, शासनाचा कुठला भ्रष्टाचारात गुंतलेला अधिकारी मदत पाठविणार नाही. अर्थात अशा भिकेची तिला गरजही नाही. ‘काम न करता मिळालेली दिडकीही हरामाची असते’ ही तिची मूल्य धारणा. मनगटावर तिचा पुरेपूर विश्वास, त्यामुळेच पंचक्रोशीतील लोकांसमोर शांताबाई हे एक महत्त्वाचे उदाहरण. खेड्यापाड्यातल्या आया-बायांच्या ओठावरचे नाव.

कोण ही शांताबाई ? असे कुतूहल कोणासही वाटावे इतके तिचे जगणे वेगळे आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. शांताबाई परकरी वयात लग्न होऊन हासूर सासगिरीत यादवांच्या घरात आली. यादवाचे घर बलुतेदाराचे. नाभीकाचा पिढीजात व्यवसाय. हे नाभीक यादवाचे घर हासुरात आले, तेही दोन पिढ्यांपूर्वी.

सामानगडच्या पायथ्याशी असणारे हासूर सासगिरी हे दोन अडीचशे उंबऱ्याचे गाव. गावातील नाभीकाचे एकमेव घर निर्वंश झाले. गावात नाभीक उरला नाही. त्यामुळे गावकऱ्यात चिंता. मग गावच्या पाटलाने शेजारच्या गावातील नाभीकाला आवातनं दिलं आणि सन्मानानं गावात आणलं. त्याच्या कुटुंबकबिल्याची जबाबदारी घेतली. त्या घरात आलेल्या शांताबाईसमोर नशीबाचे वेगळेच भोग वाढून ठेवलेले होते. सुखात चाललेला तिचा संसार अचानक दृष्ट लागावी तसा कोलमडला. तिच्या पतीचे निधन झाले. वैधव्याच्या घाल्याने अख्खा संसार लोंबकळणीस लागला.

पदरात चार कच्चीबच्ची घेऊन जगणाऱ्या शांताबाईला आपल्या मुलाबाळांचे भवितव्य अंधकारमय वाटू लागले. जगायचे असेल तर कोणाच्या बळावर आणि भरवशावर ? जमिनीचा तुकडा नाही, मोलमजुरीस जावे तर दोन हात राबणार आणि दहा हात बसून खाणार. अशा विचित्र परिस्थितीत हाय खाल्लेल्या शांताबाईला धीर दिला तो गावातील प्रतिष्ठित व जाणत्या हरिभाऊ कडुकर यांनी.

हरिभाऊ कडुकर शेती संस्कृतीतला, भक्कम पोशिंदा पुरुष. कधीकाळी ते गडहिंग्लज तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी शांताबाईच्या हतबलतेवर मार्ग शोधला. गल्लीतले आठ दहाजण गोळा करून शांताबाईच्या दारात आणले. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या घरात स्मशानशांतता. कडुकर साहेबांनी शांताबाईला उंबऱ्याला बोलावले. पांढऱ्या फटफटीत कपाळाची शांताबाई डोळ्यातील पाणी आवरत त्यांच्या समोर उभी राहिली. त्यांनी तिला नवऱ्यांचे केशकर्तनालयासाठी लागणारे साहित्य धोपटीतून बाहेर काढायला लावले. बसायला पाट घेऊन, डोक्यावरची टोपी काढून स्वतः तिच्यासमोर बसले. म्हणाले-‘लेकी ! गावाला न्हावी नाही. मग गाव कुठं जाईल ? आता तूच बळ जमा कर आणि गावाची सेवा कर. तुझ्या घरात बळ एकवटेल.’ कडुकर साहेबांचा शब्द शांताबाईने खाली पडू दिला नाही. त्यांची दाढीडोई केली आणि मग सगळे गाव शांताबाईच्या गुडघ्यावर डोके ठेवून दाढीडोई करू लागले. गावच्या बैत्यावर शांताबाईने दोन मुलींचे विवाह केले. घरात कधीच काही कमी पडले नाही.

शहराच्या आक्रमणाने गाव हळूहळू बदलू लागले. नव्या शिकणाऱ्या पोरांना सिनेमातल्या हिरोंच्या हेअरस्टाईलची भुरळ पडू लागली. अशातच गावात टीव्हीचे आगमन झाले आणि मग सगळा बट्ट्याबोळ झाला.

शांताबाईकडे केस कापणे, ‘जीन पँटवाल्या’ जमातीला कमीपणाचे वाटू लागले. बाईने केस कापणे हास्यास्पद ठरू लागले. शांताबाईकडील गिऱ्हाईकांचा राबता कमी होत गेला, तिच्या जगण्यापुढे नवे प्रश्नचिन्ह उभे ठाकले. बाया-बापड्या आपल्या घरातील पोराबाळांना समजून सांगू लागल्या, पण त्यांचे ऐकणार कोण ? व्यवसाय न करता गावातल्या लोकांकडून ‘बैते’ गोळा करणे, शांताबाईला नकोसे वाटू लागले. मग यावर गावातल्याच आयाबायांनी मार्ग शोधला. त्यांनी शांताबाईसमोर नवा पर्याय ठेवला. गावातल्या प्रत्येक गोठ्यात एकतरी म्हैस-रेडकू असतेच. गावकरी महिन्या दोन महिन्यातून शांताबाईला बोलावून गोठ्यातील म्हैस, रेडकू भादरून घेऊ लागले. यातूनच शांताबाई आजूबाजूच्या गावात जाऊन रेडा म्हैस, रेडकू भादरण्याचा व्यवसाय करू लागली. त्यामुळे पंचक्रोशीत तिच्या वस्तऱ्याने ख्याती पसरत गेली.

आज वयाच्या साठाव्या वर्षीही शांताबाई काखोटीला धोपटी मारून ‘खर्डायची का म्हैस’ अशी आरोळी देत, आसपासच्या खेड्यापाड्यांतून फिरत असते. संसाराचा गाडा तिने स्वत:च्या हिंमतीवर काठापर्यंत आणला. हे शक्य झाले ते फक्त, कृषीजन संस्कृतीतील ‘सहानुभव आणि समूहभाव’ यामुळेच.

गावगाडा बदलतोय. ‘तशी टाकावूच होती गावगाड्याची व्यवस्था’ अशा आशयाची विधाने आपण सतत ऐकत असतो. शिक्षणामुळे नवी जीवनदृष्टी येते, हे खरे; पण ‘या नव्या जीवनदृष्टीतच सारे सत्व आहे,’ असे ठाम मानून खेड्यातल्या सर्वव्यापी जीवनाला हद्दपार करण्याचा चंग भारतातील नवसाक्षरांनी बांधला आहे. मेकॅलेप्रणित शिक्षणातील पिलावळ यात अग्रेसर आहे. यातूनच खेड्याविषयी, खेड्यातील जीवन व्यवहाराविषयी तुच्छतादर्शक शब्दांची उधळण सर्वत्र होत आहे.

गावगाड्यातील जातीच्या भिंती, अंधश्रद्धा वगैरे बऱ्याच गोष्टी टाकावू आहेत हे मान्य. त्या गावगाड्यातून हद्दपार झाल्या पाहिजेत, याविषयीही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण गावगाड्यातील सगळे जगणेच टाकावू आहे, असे मानणे कितपत योग्य आहे ? येथेही जगण्याचे ज्ञान लोकांनी पिढ्यानपिढ्याच्या धडपडीतून जमवलेले आहे. पण याचा आपणास सोईस्कर विसर पडला आहे. त्यामुळे अनेक घोटाळे निर्माण झाले आहेत. निसर्गालाच हद्दपार करण्याचा नागरी सोस, खेड्यापाड्यांत पाझरू लागला आहे. यातूनच खेड्यातल्या ‘सहानुभाव’ आणि ‘समूहभाव’ यांच्या चिरेबंदी गढीला भेगा पडू लागल्या आहेत. पण सहानुभाव आणि समूहभाव थोडाफार शिल्लक असल्याची साक्ष शांताबाईसारखे काहीजण देतात. स्त्री-मुक्ती झेंडे घेऊन आकाशव्यापी गर्जना करणाऱ्या स्त्री-मुक्तिवाल्या बायका आणि स्त्री उद्धाराच्या आरोळ्या राज्यभर मारत फिरणारे राजकारणी व प्रशासक यांना शांताबाईसारखा विचार करता येईल का ?

Tags: नाभीक स्त्री कैफियत राजन गवस हासूर सासगिरी श्रीमती शांताबाई यादव weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके