डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आताही माझ्या घरात एक-दोन म्हशी असतात, पण...

आताही माझ्या घरात एक-दोन म्हशी असतातच, पण भाऊ रेडा जन्मला तर त्याला जगूच देत नाही. त्याचं दूध तोडून टाकतो.मग कसंबसं खुरटत चार दिवस ते रेडकू जगतं आणि मरून जातं. ते रेडकू तो शेतात पुरतो किंवा कोणीतरी लांब जंगलात नेऊन त्याचं चमडं काढून दोन-अडीचशे रुपये मिळवतं. आता-आता हा चमडं काढून विकण्याचा व्यवसाय फारसा कोणी करीत नाही.सगळीकडंच ही परिस्थिती. खेड्यापाड्यांत आता दूध धंद्याला व्यावसायिकपणा आलाय. ही चांगली गोष्ट आहे. कारण एक घर एक म्हैस चालवते. त्यामुळे घराघरात दुधाची एकतरी म्हैस काळजीपूर्वक बाळगली जाते. गावात एक-दुसरी डेअरी असायची, आता ही संख्या वाढलीय. प्रत्येक घरातून दोन-तीन लिटर दूध डेअरीला जातंय. त्या येणाऱ्या पैशावर आठवड्याचा बाजार चालतो. त्यामुळं घरात चहा पुरतं दूध ठेवून घेतलं जातं.बाकी सगळं दूध डेअरीला. त्यामुळं रेडा जन्मला की त्याला दूधपाजून मोठा करण्यापेक्षा त्याचं दूध तोडलेलं लोकांना अधिक फायद्याचं वाटतं.

आमच्या गावाच्या अवती-भोवती सकाळी सकाळी एक रिक्षा फिरत असते. सतत असं नव्हे, पण आठवड्यातून कधीही.या रिक्षेनं माझं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे, ती परत फिरताना मेलेल्या रेडकांनी खचाखच भरलेली असते. पुढे या रेडकांच्या मृतदेहाचे काय होते? याविषयी मला काहीच माहीत नाही.त्याविषयीच्या अनेक दंतकथा मी ऐकत असतो. काहीही असले तरी या रेडकांना बघताना मला माझं बालपण आठवतं. आमच्या घरात पाच-सहा म्हशी. त्यांतली कोणती ना कोणती म्हैस गाभण असायची. एखादी व्यालेली असायची. तिच्या इवल्याशा रेडकाशी खेळताना माझा दिवस कुठल्या कुठे निघून जायचा.नुकत्याच जन्मलेल्या रेडकाच्या नख्या आई खुडायची. पण त्या नख्यांचा काळाभोर रंग मला खूप आवडायचा. त्या रेडकाला म्हैस चाटायला लागली की तिच्या डोळ्यांतल्या तृप्तीनं मी एकदम बेहोश व्हायचो. अशा रेडकांना गवत घालणं,त्यांची निगा ठेवणं याची सगळी जबाबदारी आम्हा बच्चे कंपनीवर असायची. रेडकाच्या कपाळावर भात आणि भाकरीचा तुकडा ठेवून आम्ही त्याच नाव ठेवायचो. नाव आम्हाला जे आवडेल ते.

एका रेडकाचं नाव आम्ही गुळव्या ठेवलं होतं. गुळव्या हा कैफियत शब्द मला त्यावेळी गुऱ्हाळावर सापडला होता. गूळ करणारा तो गुळव्या. त्या गुळव्या रेडकाचा आणि माझा दिवस एकदम सुरू व्हायचा. उठल्या उठल्या  गोठ्यात गेलो की बराच वेळ त्याला कुरवाळत बरंच कायबाय सांगत बसायचो. मग सगळी जनावरं गोठ्यातून बाहेर काढली की सर्वांत शेवटी त्याला बाहेर काढायचो. गुळव्या दाव्यातून सुटलं की दारात जोरजोरात अंग झटकून उड्या मारायचा आणि गोठ्याकडं चालायला लागायचा.शाळेची वेळ होईपर्यंत सगळ्या म्हशी चारून हाळाच्या डोहात पाण्याला घालून घरी आणेपर्यंत गुळव्या मला चिकटून असायचा.सगळ्यांत चांगला चारा गुळव्याला. घरात उरलेल्या भाकरी त्यालाच. त्यामुळं गुळव्या हळूहळू चांगलाच मातत चालला. मग घरातून जनावरं बाहेर काढली की मी गुळव्यावर स्वार व्हायचो.गुळव्या मला अलगद गोठणावर नेऊन सोडायचा. तेथून पुन्हा घरात आणून सोडायचा.

सुट्टीच्या दिवशी त्याला घेऊन दिवसभर डोंगरात मी हुंदडत असायचो. शेवटी घरचेच आम्हा दोघांना शोधायला यायचे.कधीकधी बेदम मार दोघांनाही बसायचा. पण त्याचं आम्हा दोघांना काहीच वाटायचं नाही.त्यामुळे घरातले लोक मला रेडा आणि त्याला गुळव्या म्हणायचे. पण त्यानंही मला काही वाटायचं नाही. उलट त्याच्यात आणि माझ्यात खूप खोल नातं तयार झालं होतं. मला नवा शाळेचा ड्रेस आणला की पहिल्यांदा त्याच्या पाठीवर ठेवायचो. नवं पुस्तक आणलं की त्याच्या डोळ्याला लावायचो. कुठेही जाऊन आलो तरी त्याच्यासाठी काहीतरी आणायचो. हळूहळू गुळव्या मोठा झाला.त्याला वजवलं गेलं. तो शेतीची कामं करू लागला. मध्ये एकदोनदा त्याला विकून टाकण्याचा बेत घरात सुरू झाला. तो मी शिताफीनं उधळून लावला. मी पुढच्या शिक्षणासाठी गावाबाहेर गेलो. गुळव्यात आणि माझ्यात अंतर पडलं. तरी नातं कायम.नोकरीच्या गावी आलो तेव्हा धाकट्या भावाचं पत्र आलं आणि मी धाय मोकलून रडलो. गुळव्यानं आमच्या गोठ्यातच प्राण सोडला होता. त्याला आपल्या शेतातच पुरलंय असं भावाने कळवलं होतं. मी गावी जाऊन त्याच्या विसावल्या ठिकाणची माती कपाळाला लावून आलो होतो.

आताही माझ्या घरात एक-दोन म्हशी असतातच, पण भाऊ रेडा जन्मला तर त्याला जगूच देत नाही. त्याचं दूध तोडून टाकतो.मग कसंबसं खुरटत चार दिवस ते रेडकू जगतं आणि मरून जातं. ते रेडकू तो शेतात पुरतो किंवा कोणीतरी लांब जंगलात नेऊन त्याचं चमडं काढून दोन-अडीचशे रुपये मिळवतं. आता-आता हा चमडं काढून विकण्याचा व्यवसाय फारसा कोणी करीत नाही.सगळीकडंच ही परिस्थिती. खेड्यापाड्यांत आता दूध धंद्याला व्यावसायिकपणा आलाय. ही चांगली गोष्ट आहे. कारण एक घर एक म्हैस चालवते. त्यामुळे घराघरात दुधाची एकतरी म्हैस काळजीपूर्वक बाळगली जाते. गावात एक-दुसरी डेअरी असायची, आता ही संख्या वाढलीय. प्रत्येक घरातून दोन-तीन लिटर दूध डेअरीला जातंय. त्या येणाऱ्या पैशावर आठवड्याचा बाजार चालतो. त्यामुळं घरात चहा पुरतं दूध ठेवून घेतलं जातं.बाकी सगळं दूध डेअरीला. त्यामुळं रेडा जन्मला की त्याला दूध पाजून मोठा करण्यापेक्षा त्याचं दूध तोडलेलं लोकांना अधिक फायद्याचं वाटतं. त्यामुळं चार पैसे अधिक येणार असतात. रेडी जन्माला आली तर ती पुढं दुधासाठी उपयुक्त. म्हणजे तिचा सांभाळ उत्तम. ह्या सगळ्यात शेतकऱ्यांचं काही चुकतंय, असं नाही. पण गावा-गावांतून त्या रेडकांना मात्र हद्दपार केलं जातंय.रेडकं घेऊन जाणारी कसाबाची रिक्षा येते, ही कोवळी रेडकं त्यातून कसाबखान्यात जातात. आता गावात औषधालाही रेडा सापडत नाही. त्याची गरजही उरलेली नाही गावात. जनावरांचा डॉक्टर येतो गावागावांत, कृत्रिम रेतन केंद्र सुरू झालंय. त्याची उणीव भासावी असं काहीच उरलेलं नाही गावात.

उणीव फक्त कधी कधी मलाच भासते ती गुळव्याची. त्याच्यापाठीवर ऐटीत बसून घालवलेले क्षण, त्याच्या पाठीवर टाकून अंगात घातलेला शर्ट. त्याला भरवलेले भाकरीचे तुकडे. असं बरंच बरंच काही. त्यामुळं अशी रेडकांनी भरलेली रिक्षा समोर आली आणि त्यातल्या एखाद्या रेडकाच्या डोळ्याला डोळा भिडला तर मलाच कत्तलखान्यावर कोणीतरी नेतंय आणि मी जीवाच्या आकांतानं ओरडतोय असा भास होतो. मी तळामुळातून हादरून जातो. पुढचे काही दिवस मी माणसांत नसतोच. गुळव्या शप्पथ!

Tags: gulavya गुळव्या rajan gavas atahi majhya ghari eka don mhashi astat pan ….राजन गवस पण... आताही माझ्या घरात एक-दोन म्हशी असतात weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके