डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लाड्याला मुख्याध्यापकांसमोर उभं करून गुर्जी म्हणाले, ‘हा रोज नवा प्राणी घेऊन येतो. सगळा वर्ग नासवला यानं.’मुख्याध्यापकांनी लाड्याला नखशिखान्त न्याहाळलं. गुर्जींचे तोंड सुरूच - ‘ह्याच्या पालकांना बोलावून घ्या.’ लाड्याला भीती वाटू लागली. तो पायाच्या नखावर नजर रुतवून उभा राहिला. गुर्जी म्हणाले, ‘परवा यानं मुंगसाचं पिल्लू आणलं होतं.’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘मुंगसाचं पिल्लू?’ ‘होय, मुगसाचं पिल्लू.’ गुर्जी ओरडले. म्हणाले, ‘विचारा हवं तर मुलांना. मारलं तरी परिणामच नाही त्याच्यावर. त्याच्या पालकांना बोलावून घ्या.’

लाड्या धावत-पळत शाळेजवळ पोहोचला, तर प्रार्थना सुरू झालेली. निलगिरीच्या उंच झाडाच्या आडोशाला तो थांबला. दप्तरातल्या खारूडीला हातात घेतलं. गोंजारलं. निलगिरीच्या बुंध्यावर सोडतच म्हणाला, ‘दुपारच्या सुट्टीपर्यंत इथंच खेळायचं.’ त्याचं काही न ऐकताच खारूडी सरसर झाडाच्या शेंड्याला पोहोचली. एवढ्यात राष्ट्रगीत सुरू झालं. तो हळूच रांगेत शिरला आणि दप्तर सावरतच सावधानमध्ये उभा राहिला. खारूडी त्याला वरून एकटक बघत होती. सरसर खाली आली. त्यानं तोंडानंच फुर्ररऽऽ केली. ती शेपूट हालवत वर पळाली. राष्ट्रगीत संपलं.

त्यानं पुन्हा खारूडीकडं बघितलं. ती निलगिरीच्या फांद्यांवर खेळत होती. शिक्षक सर्व मुलांना ओरडून काहीतरी सूचना देत होते. सूचना संपली. मुलं आपापल्या वर्गाकडं निघाली. लाड्यानं आपल्या वर्गाकडं धूम ठोकली. दप्तर जागेवर ठेवलं. तर सेक्रेटरी त्याच्याजवळ येतच म्हणाला, ‘प्रार्थना चुकवलेल्यांची नावं गुर्जींनी घेतलीत लिहून.’ लाड्याचा चेहरा उतरला. म्हणजे दोन छड्या ठरलेल्या. एवढ्यात गोट्या त्याला शोधतच आला. म्हणाला, ‘तुझी खारूडी आलो बघून. उंच टिक्कीला हाय. लाड्या, बोलव की रेऽऽ तिला वर्गात.’ ‘मग मला काय देशील?’ लाड्यानं त्याला विचारलं. अशात गुर्जी वर्गात आले. ‘एक साथ नमस्ते!’ सगळ्यांनी जोरात ओरडून घेतलं.

गुर्जींनी सगळ्या वर्गावर नजर टाकली. बसायला सांगितलं. टेबलावरच्या फडक्यानं फळा पुसून घेतला. हजेरी घ्यायला सुरुवात केली. लाड्याने त्याचा नंबर आल्यावर ‘हजर’ म्हटलं, तेव्हा गुर्जींनी हजेरी बंद केली. त्याला उभं केलं, म्हणाले, ‘बोला लाडासाहेब! आज काय आणलंय दप्तरातून?’ ‘कायबी न्हाई’, लाड्यानं शांतपणे उत्तर दिलं. ‘प्रार्थनेला कुठं होता?’ लाड्यानं उत्तर न देताच हात पुढं केला. गुर्जी चिडले. वर्ग चिडीचिप. लाड्यावर काहीच परिणाम नाही. गुर्जींनी नेहमीच्या छडीनं तीन-चार रट्टे ओढून घेतले. लाड्यानं कळ आतल्या आत दाबली. चेहरा निर्विकार. गुर्जी आणखीनच चिडले. म्हणाले, ‘दगड आहे दगड.’ तसा सगळा वर्ग हसायला लागला.

लाड्याला ह्या साऱ्याचीच सवय झालेली. रोज गुर्जी वर्गात आले की हा ठरलेला कार्यक्रम. लाड्याचं घर गावापासून दूर. जंगलात. तिथं तीन-चारच घोलराक्याची घरं. पूर्वीपासूनच जंगलात वसलेली. गावात यायचं म्हणजे अर्धा तास चालायला लागायचं. आजूबाजूला किर्ररऽऽ जंगल. गावातल्या माणसांना एकटं जायला भीती वाटायची. लाड्याला आणि लाड्याच्या भावकीला मात्र सवयीची वाट. या वाटेनं लाड्या एकटाच यायचा. सोबत फक्त खारूडी. तिच्याशी बोलत वाट केव्हा संपते त्याचं त्यालाच कळत नसे. पहिली-दुसरीत त्याच्या बरोबर पोपट असायचा. त्याचं नाव डंगू. डंगूला तो वर्गात घेऊन आला, तेव्हा त्यानं भरपूर मार खाल्ला होता. त्यानंतर त्यानं डंगूला वर्गात आणलं नाही. मग त्यानं खारूडीची सोबत धरली. पण तिला वर्गात न आणता झाडावरच सोडून यायचा. ती इतकी शहाणी की दिवसभर खेळत बसायची झाडावर.

गुर्जींना तो रानवटच वाटायचा. त्यामुळं सर्वांत अधिक मार त्यालाच. माराची त्यालाही सवय झालेली. एखाद्या दिवशी गुर्जी प्रेमानं बोलले तर त्याला आश्चर्यच वाटायचं. गुर्जींनी शिकवायला सुरुवात केली. त्यांना लाड्याचा पुन्हा संशय आला. शिकवणं बंद करून त्यांनी त्याचं दप्तर उलटं केलं. तर फक्त पुस्तकं व पाटी. त्यांनी परत शिकवायला सुरुवात केली. लाड्या आज्ञाधारकपणे शांत बसला. त्यानं एकटक फळ्याकडं बघायला सुरुवात केली. अचानक त्याला फळ्यावर बेडूक दिसला. लाड्यानं डोळे चोळून घेतले. पुन्हा बघितलं, तर बेडूक मोठा झालेला. तो आता गुर्जींच्या अंगावर उडी घेणार. लाड्यानं गच्च डोळे मिटून घेतले. इऽऽऽ इऽऽऽ करून ओरडला. गुर्जींनी जवळ येतच त्याच्या पाठीत धप्पकन रप्पाटा घातला. ‘उठ, उभं रहा. ओरडायला काय झालं?’ गुर्जी ओरडले. लाड्यानं फळ्याकडं बघितलं. बेडूक पसार. तो काहीच बोलला नाही. गुर्जींनी कान पकडला. जोरानं पिरगळला. कळ डोक्यात गेली. ‘वर्ग नासवणार गधड्या तू.’ गुर्जी पुन्हा ओरडले. शांत झाले.

सगळा वर्ग लाड्याकडं चोरून-चोरून बघत होता. त्याला एकदम शरमल्यासारखं झालं. तो अंग चोरून बसला. दोनची घंटा झाली. लाड्याला एकदम सुटल्यासारखं झालं. गुर्जी वर्गातून बाहेर पडल्या-पडल्या त्यानं लांबलचक उडी मारली. गोट्या पाठीमागून. लाड्यानं निलगिरीच्या झाडाजवळ जाताच चॅकऽऽ चॅकऽऽ आवाज काढला. तर खारूडी सर्रकन उतरून त्याच्या अंगावर आली. मुलांचा घोळका त्याच्या भोवती गोळा झाला. लाड्या प्रत्येकाच्या अंगावरून खारूडीला फिरवत हिंडू लागला. सुट्टी कधी संपली कुणालाच कळलं नाही. घंटा झाल्या झाल्या त्यानं खारूडीला झाडावर सोडलं. वर्गात पाऊल टाकलं, तर गुर्जी थांबलेलेच. म्हणाले, ‘लाड्या, खारूडी कुठंय?’ लाड्या एकदम घाबरला. गुर्जींनी त्याचे खिसे तपासले. त्याच्या बकोटीला धरलं. आणि त्याला ओढत मुख्याध्यापकांकडं घेऊन गेले. सगळा वर्ग पाठीमागून.

लाड्याला मुख्याध्यापकांसमोर उभं करून गुर्जी म्हणाले, ‘हा रोज नवा प्राणी घेऊन येतो. सगळा वर्ग नासवला यानं.’मुख्याध्यापकांनी लाड्याला नखशिखान्त न्याहाळलं. गुर्जींचे तोंड सुरूच - ‘ह्याच्या पालकांना बोलावून घ्या.’ लाड्याला भीती वाटू लागली. तो पायाच्या नखावर नजर रुतवून उभा राहिला. गुर्जी म्हणाले, ‘परवा यानं मुंगसाचं पिल्लू आणलं होतं.’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘मुंगसाचं पिल्लू?’ ‘होय, मुगसाचं पिल्लू.’ गुर्जी ओरडले. म्हणाले, ‘विचारा हवं तर मुलांना. मारलं तरी परिणामच नाही त्याच्यावर. त्याच्या पालकांना बोलावून घ्या.’ मुख्याध्यापकांनी गुर्जींना शांत केलं. पुन्हा लाड्याला न्याहाळलं. त्याचं संपूर्ण नाव विचारून घेतलं. मग स्वत:शीच हसले. त्यांनी लाड्याला जवळ बोलावून घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, ‘तू बंड्या नायकाचा पोरगा?’ लाड्यानं फक्त मान हालवली. म्हणाले, ‘बंडाची भट्टी चालू हाय का रे?’ लाड्यानं पुन्हा मान हालवली. म्हणाले, ‘मुंगसाचं पिल्लू कुठं पकडलास?’ लाड्याला त्यांच्या आवाजात एकदम आपलेपणा जाणवला. लाड्या म्हणाला, ‘गुर्जी, घराभोत्यात भरपूर मुंगसं आहेत आमच्या. त्यांची पिल्लं घाबरत नाहीत मला. खेळतात माझ्याबरोबर.’ गोट्या म्हणाला, ‘गुर्जी, मी बघितलंय. हा डालग्याखाली झाकून ठेवतो त्यास्नी. खारूडी पण आणलीय शाळेला त्यानं.’ मुख्याध्यापक एकदम हसायला लागले.

गुर्जी संतापून लालेलाल. लाड्याला एकदम उत्साह संचारला. तो मुख्याध्यापकांना म्हणाला, ‘गुर्जी, बोलावू खारूडीला?’ मुख्याध्यापकही एकदम मजेत आले. म्हणाले, ‘बोलव तर.’ लाड्या शाळेच्या व्हरांड्यात गेला. त्यानं जोरानं चॅकऽऽ चॅकऽऽ केलं. तर खारूडी एकदम पळत येऊन सर्रकन त्याच्या खांद्यावर चढली. पोरांनी ओरडून एकदम शाळा डोक्यावर घेतली. गुर्जींचा संताप अनावर झाला. ते मुख्याध्यापकांना म्हणाले, ‘तुम्ही ह्याला शिक्षा करावी म्हणून घेऊन आलोय, तर तुम्ही त्यालाच पाठिंबा देताय.’ मुख्याध्यापकांनी गुर्जींच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करतच लाड्याला सांगितलं, ‘माझ्या अंगावर दे रेऽऽ खारूडी.’ लाड्यानं पटकन त्यांच्या अंगावर खारूडी सोडली. तर मुख्याध्यापक गांगरून खुर्चीत उभे राहिले. खारूडी मिटूमिटू डोळ्यानं लाड्याकडं पहात होती. मुख्याध्यापकांनी मुलांना वर्गाकडं पाठवलं. खारूडी लाड्याच्या हवाली केली. मग शांतपणे गुर्जींना म्हणाले, ‘अहो, तो रानात रमणारा पोरगा. त्याच्या वडिलांचा दारू गाळण्याचा व्यवसाय. ह्या जंगलात त्यांच्या भट्‌ट्या आहेत. अशा घरातला मुलगा आपल्या शाळेत येतोय. त्याला तुम्ही जीव लावा. त्या मुलानं त्या मुक्या प्राण्यांना कसा जीव लावलाय, हे तरी ध्यानात घ्या.

गुर्जी, आपण मुलांना शिकवत नाही, मुलंच आपल्याला शिकवतात. एवढं तरी समजून घेता येईल का तुम्हांला?’ गुर्जी एकदम वरमले. वर्गाकडं वळले. त्यांनाही वाटू लागलं, लाड्यानं खारूडीला आपल्याही हातांत द्यावं. एकदम मऊशार असेल ती! कसा असेल तिचा स्पर्श? मग त्यांचं त्यांनाच हसू आलं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके