डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘... ही किडलेली, सडलेली वांगी गोळा करून शिजवून खायचो. धान्यबाजार ह्या गल्लीला भरतो. इथं सांडलेलं सगळं गोळा करून नेलं की आई पाखडून दळण करायची. हा आमचा दर बुधवारचा सततचा कार्यक्रम.

‘घरात ताप नको म्हणून वहिनी लवकर हाकलतात. ते बिचारे तरी कुठं जातील? म्हणून येतात आपले लवकर.’ पुन्हा हशा. बहुलकरांची शीर उठली. त्यांनी स्वतःला आवरलं. संयम राखून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला.

बहुलकरांचं डोकं एकदम सटकलं. त्यांनी हाताला सापडेल ती खोपड्याची काठी उचलली आणि, ‘सटवी. मला अक्कल शिकवतेस काय?’ म्हणत जोरजोरानं बायकोला बडवायला सुरुवात केली. पोराच्या आणि बायकोच्या आवाजानं अख्खी गल्ली जागी झाली.
 

पहाटेच्या पाचच्या गजराला राया बहुलकरांनी आपल्या मुलाला उठवलं. पाणी बंबात उकळत असतानासुद्धा त्यांनी थंड पाण्यानं त्याला आंघोळ करायला लावली. तेरा-चौदा वर्षांचं पोर पार कुडकुडलं. हे बाथरूमच्या दारात जातीनं हजर. त्यामुळं त्याला अंगावर भसाभस पाणी ओतून घेणं भाग पडलं. बाथरूममधून बाहेर पडल्यापडल्या देवाला नमस्कार, मग पाटावर अभ्यासासाठी? सूर्योदय झाल्याशिवाय. घातलेली मांडी काढायची नाही. त्यांच्या सारख्या त्याच्या भोवतीनं येरझाऱ्या. ही काही आजचीच गोष्ट नाही. रोजचीच. मुलाला दहावीला बोर्डात आणायचं असेल तर आतापासून खस्ता खाल्ल्या पाहिजेत; चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, हे त्यांचं मत. मुलाची दिनचर्या त्यांनी भिंतीवर मोठ्या अक्षरांत लिहून लावलेली. यात मिनिटाचा फरक पडला, तर राया बहुलकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मग मुलाची नव्हे, कुणाचीच गय नाही.

आज त्यांनी दिनक्रमात थोडासा स्वतःच्या अधिकारात बदल केला. मुलाला सूर्योदयानंतर अभ्यासाला न बसवता आपल्याबरोबर घेऊन बाहेर पडले. वास्तविक सूर्योदयानंतर शाळेत सांगितलेला अभ्यास दिनचर्येत लिहिलेला होता. मुलालाही कळेना, आज आपले वडील आपल्याला बाहेर का घेऊन चाललेत पण विचारायची सोय नव्हती. तो गुमान पाठीमागून चालत राहिला. गावाच्या बाजारपेठेत आल्यानंतर त्यांनी आपल्या हाताला झटका दिला. रस्त्यात सगळे भाजीपाल्याच्या कचऱ्याचे ढीग पडलेले होते. कांद्याची टरफले, प्लास्टिक पिशव्या, वांगी, टोमॅटो असा उरलेला कचरा व्यापारी रस्त्यावरच टाकून गेले होते. कालच आठवड्याचा बाजार झाल्यामुळे सगळीकडं कचराच कचरा. रस्ता सगळा घाणेघाण झालेला. रस्ता या कडेपासून त्या कडेपर्यंत डोळ्यांत येईल, अशा ठिकाणी बहुलकर थांबले. मुलाला उद्देशून म्हणाले, ‘दीपूsss रस्त्याच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत तुला काय दिसतं?' मुलगा संभ्रमात पडला. काय उत्तर पावं? शेवटी चाचरत म्हणाला, ‘सगळा कचराच कचरा दिसतोय.’ ते म्हणाले, ‘नीट बघ.’ मग त्यानं जे जे दिसलं त्याची यादी सांगितली. त्यांनी हातानंच खूण केली. मग दीपू पाठीमागून चालायला लागला. त्यांच्या तोंडाची टकळी सुरू झाली. म्हणाले, ‘हा पाला नगरपालिकेचे कामगार यायच्या आधी मी गोळा करून नेऊन टाकायचो. आई त्याची आठवडाभर भाजी करायची. ही किडलेली, सडलेली वांगी गोळा करून शिजवून खायचो. धान्यबाजार ह्या गल्लीला भरतो. इथं सांडलेलं सगळं गोळा करून नेलं की आई पाखडून दळण करायची. हा आमचा दर बुधवारचा सततचा कार्यक्रम.' म्हणत ते थांबले. आपले वडील आपल्याला हे सगळं का सांगत आहेत, हेच त्याला कळत नव्हतं. विचारायची सोय नव्हती... फक्त तो ऐकत राहिला. मध्येच ते म्हणाले, ‘हे सगळं तुला का सांगतोय, तुझ्या ध्यानात आलं का?’ मग स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटत म्हणाले, ‘नाही येणार. तुला सगळं कळणार पण नाही. पण ध्यानात ठेव, असे दिवस काढलेत आम्ही. पोटभर कधी खायलाही मिळालं नाही. पण चिकाटी सोडली नाही. रात्रंदिवस अभ्यास केला. म्हणून हे दिवस तुझ्या नशिबाला आलेत. आता तू कसं वागायचं, कसा अभ्यास करायचा हे ठरव. अभ्यास केलास तर चार घास सुखानं खाशील, नाहीतर तुझी धडगत नाही. भीक मागत फिरायची पाळी येईल.’ त्यांनी तोंड एकदम बंद केलं. फक्त झपाझप चालत राहिले. 

दीपू आपल्या बाबाची ठेंगणी मूर्ती, तुरूतुरू पडणारे पाय आणि टक्कल झाकण्यासाठी राखलेले लांबलचक केस वाऱ्यानं कसे मजेशीर उडत आहेत, हे पाहात जवळजवळ पळतच चालला. घर आल्यावर बहुलकरांनी सुस्कारा सोडला. हॉलमध्ये गेल्यावर खुर्चीवर बसले. एवढयात त्यांच्या बायकोनं, ‘पाणी थंड झालं. आंघोळ कधी करता’, अशी हाक दिल्यावर ते भानावर आले. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. त्यांना एकदम घाई झाली. सगळे आवरून साडेनऊला घरातून बाहेर पडलं पाहिजे! ‘आज वेळ होणार वाटतं’, म्हणतच ते बाथरूममध्ये घुसले. पाच मिनिटांत कावळ्याची आंघोळ करून आवरतच स्वयंपाकघरात घुसले. बायको त्यांचा डबाच तयार करत होती. म्हणाले, ‘थोडं जास्तीचं घाल आत. इथं फक्त चहा घेतो. शाळेत जाऊनच डबा खातो. आवर लवकर.' त्यांच्या आदेशानं तिच्या हालचाली वाढल्या. बिचारीला इलाजच नव्हता! थोडा जरी विलंब झाला, तरी बहुलकर घर डोक्यावर घेत. तिच्या सात पिढ्यांचा उद्धार करत. हाताला सापडेल त्याची आदळआपट करत. पुन्हा तीन-चार दिवस बोलणं बंद, असा सगळा डोकेफिरूचा कारभार. त्यापेक्षा आपण आपल्याकडं चुकवून घ्याच कशाला? म्हणून ती बाई जिवाचं रान करायची. तिनं चहा ठेवला; डबा भरला. त्यांचे इस्त्रीचे कपडे बाहेर काढून ठेवले. पाण्याची बाटली भरून ठेवली. हे सगळं तिनं इतक्या कमी वेळेत केलं की बहुलकरांना आपोआपच ठरल्या वेळेच्या आत घरातून बाहेर पडता आलं. त्यांनी दारात लावलेल्या सायकलच्या रीमा पुसता पुसताच दीपूला आदेश सोडला, ‘आज शाळेत सांगितलेला अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय जेवायला उठू नको.’ मुलगा काहीच बोलला नाही. तो फक्त वडील कधी दारातून हालतात याचीच वाट बघत थांबला, बहुलकर रस्त्याला लागल्या लागल्या तो आईला म्हणाला, ‘आज बाजारातल्या कचऱ्यावर व्याख्यान झालं.’ 

आई म्हणाली, ‘अरे, त्ये काय तुझ्या वायट्याला सांगत्यात? तुला चांगलं वळण लागावं, तू खूप मोठा व्हावास, म्हणून बोलतात.’ आईनं दीपूची समजूत काढली. दीपूनं दप्तर कोपऱ्यात गुंडाळून टाकलं आणि कानात वारं शिरल्यासारखा उड्या मारत रस्त्यावर आला. कोणीच मित्र नव्हता. त्यानं एकट्यानंच खेळणं सुरू केलं. 

बहुलकर हायस्कुलात पोहोचले तेव्हा साडेदहा वाजून गेलेले. शिपाई पिंप धुवून पाणी भरत होता. अजून वर्गाच्या काही खोल्यांचे दरवाजे उघडायचे होते. स्टाफरूममध्ये कोणीच दिसत नव्हतं. शिपायानं टेबलखुर्चीही पुसली नव्हती. त्यांच्या कपाळाला आठया पडल्या. आपला लॉकर उघडून त्यांनी मोठा रुमालवजा टॉवेल काढला. डबा, पाण्याची बाटली लॉकरमध्ये ठेवली, स्वतःची खुर्ची नीट झाडूनपुसून घेतली. आरशात बघून टक्कलावरून बाजूस गेलेले केस पुन्हा पुन्हा नीट बसवले. चेहरा निरपून घेतला. चष्मा स्वच्छ केला. मग त्यांना एकदम छान वाटायला लागलं. ते खुर्चीवर टेकले. एवढ्यात एकेक स्टाफमेंबर यायला लागला. बहुलकरांच्या भुवया उंचावायला लागल्या. हिस्ट्रीचे जाधव आल्या आल्याच म्हणाले, ‘काय बहुलकर, मुक्कामालाच होता वाटतं?’ तर बाकीचे तिथे- चौघे मोठ्यानं हसले. त्यातला गणिताचा पाटील म्हणाला, ‘घरात ताप नको म्हणून वहिनी लवकर हाकलतात. ते बिचारे तरी कुठे जातील? म्हणून येतात आपले लवकर. पुन्हा हशा. बहुलकरांची शीर उठली. त्यांनी स्वतःला आवरलं. संयम राखून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला. पण संताप त्यांना चेह-यावरून लपवता आला नाही. ते खुर्चीतच वळवळायला लागले. त्यांचे टकलावरचे केस पुन्हा विस्कटले. एवढयात प्रार्थनेची बेल झाली. बहुलकर सगळ्यांत आधी स्टाफरूममधून बाहेर पडले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत त्यांचा एक सहकारी म्हणाला, ‘टिंय्या शेठ, यांचा कालचा पराक्रम समजला का?’ लगेच जाधव त्याच्याजवळ येत म्हणाले, ‘काय केली नवी लावालावी?’ मराठीचा कांबळे म्हणाला, ‘नेहमीचीच चमचेगिरी, दुसरा उद्योग कुठंय त्याला? नुस्तं आपले चुगल्या करणं एवढाच धंदा.’ बाकीचे सगळेच एकत्र आले. ग्राऊंडवर पोरं रांगेत उभी होती आणि पी.टी.च्या सरोटकरांची शिट्टी वाजत होती म्हणून विषय तिथंच थांबला. सगळे प्रार्थनेला उभे राहिले. 

प्रार्थना संपल्या संपल्या प्रत्येकाची तासावर जाण्याची घाई. अशात मराठीच्या कांबळेला गाठत बहुलकर म्हणाले, ‘कांबळेसर, तुमच्या गावात भलतंच घडलं म्हणे. ऐकणाऱ्या सगळ्यांचेच डोळे विस्फारले. बहुलकर बोलत आहेत म्हणजे नक्कीच काही घडलं असणार. कांबळेनी दुर्लक्ष केलं. म्हणाले, ‘तास घेऊन येतो मग बोलू.' बहुलकर काहीच न बोलता पुन्हा खुर्चीवर टेकले. त्यांना तास नव्हता. सगळे तासावर पळाले. जाधव आणि ते दोघेच स्टाफरूममध्ये उरले. बहुलकरांना चैन पडत नव्हतं. ते उठून जाधवांजवळ गेले. हळू आवाजात म्हणाले, मघाशी मी कांबळेची पंचायत केली. बोलायला तोंड कुठे आहे? पळाले. तुम्हाला माहीत नसेल, ‘ह्या कांबळेच्या भावकीतल्या एकानं पाण्याच्या तीन-चार मोटरी चोरल्या. गावच्या लोकांनी हाग्या मार दिला. पळता भुई थोडी झाली. सगळं गाव चाल करून आलं होतं.’ जाधव रसिकतेनं ऐकण्याचा प्रयत्न करत होते. म्हणाले, ‘कधी झालं हे?’ बहुलकर खाकरले. स्वतःवरच खुश होत म्हणाले, ‘आज सकाळीच. आता येता येता समजलं.’ जाधव म्हणाले, ‘फार लवकर कळतात बुवा तुम्हाला सगळ्या बातम्या.’ मग त्यांना आणखी उत्साह आला. त्यांनी समजलेली सगळी घटना संपूर्ण तपशिलांसह सांगितली. त्यांना मोकळं वाटायला लागलं. त्यांनी पेलाभर पाणी प्यालं. मग लांबलचक सुस्कारा सोडला. नंतर त्यांचा दिवस अत्यंत शांत, मोकळा मोकळा गेला.


डोळ्यांत प्रचंड झोप आलेली. पापणी कितीही ताणून पगळली तरी पुन्हा मिटायचीच. एकदा जाऊन तोंडावर पाणी मारून बघितलं. पुन्हा तेच. समोरच्या पुस्तकातलं अक्षरही दिसत नव्हतं. फक्त संशय येऊ नये म्हणून पान पालटायचं, असा दीपूचा खेळ चाललेला. समोर बहुलकर उघडेबंब नुसत्या चड्डीवर बसलेले. त्यांच्याकडे बघण्याचं धाडसही दीपूला होत नव्हतं. मध्येच बहुलकरांनी हातांतला शाळेतून उचलून आणलेला पेपर बाजूला केला. म्हणाले, ‘दीप्या, ही बातमी वाच.’ वडिलांच्या आवाजानं तो खडबडून जागा झाला. त्यानं गुमानं वडिलांच्या हातांतून पेपर घेतला. त्यांनी दाखवलेली बातमी वाचायला सुरुवात केली. कोणातरी कुलकर्णी नावाच्या माणसाची भारतीय प्रशासन सेवेत निवड, असं काहीतरी होतं त्यात. त्यातलं त्याला काहीच कळलं नव्हतं. घटकाभरानं बहुलकर मुलाला म्हणाले, ‘बघितलंस काय? आता त्या मुलाच्या जन्माचं कल्याण झालं, पोतं भरून पगार, वर खोऱ्यानं वरकड रकम. अशी परीक्षा तुलाही पास व्हायची आहे. आमच्या वेळी अशा परीक्षा असतात, हेही आम्हाला माहीत नव्हतं. कोण शिकलेलंच नव्हतं आमच्या गावात. म्हणजे असलं काय कळणारं नव्हतं कोणी. म्हणून मास्तर व्हायची पाळी आली, नाहीतर कलेक्टरच झालो असतो. असल्या परीक्षा कळल्या, तेव्हा आमचं वय उलटून गेलेलं. काय उपयोग?' त्यांच्या स्वगताला चांगला सूर लागलेला. एवढयात दीपू एकदम आडवाच झाला. मुळात ते बोलत होते तेव्हाच त्याचा डोळा लागला होता. बहुलकरांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ते एकदम ओरडत उठले. तरी दीपू गाढ झोपेत. ते तसेच तणतणत आत गेले. त्यांची बायको आणि पोरगी गाढ झोपलेली. त्यांनी पाण्याची भरलेली घागर उचलली. बाहेरच्या खोलीत आले. मुलानं तिथेच टाकलेलं पुस्तक उचलून खिडकीत ठेवलं आणि सगळी घागर भडभडा पोराच्या डोक्यावर ओतली. दीपू एकदम किंचाळत उठला. बायको आतून पळतच आली. बहुलकरांनी घागर मोकळी झाल्यावर दीपूला लाथा घालत तोंडाचा पट्टा सुरू केला. ‘नुस्ता खाऊन वळूसारखा झालाय भोसडीचा. अशानं डोक्यात राख घालून जायला लावल हे पोरगं. हरामी अवलाद.' असं बरंच काय काय. दीप्याचं ओरडणं, बहुलकराचं ओरडणं एकमेकांत मिसळल्यामुळे त्यांच्या पत्नीला काहीच कळेनासं झालं. तिनं गडबडीनं टॉवेल आणला. मुलाचं डोकं ती पुसू लागली. बहुलकरांनी तिच्या हातातला टॉवेल खस्सकन् ओढून घेतला. म्हणाले, ‘खबरदार, त्याचं अंग पुसशील तर. रात्रभर असाच पाण्यात झोपवतो त्याला, म्हणजे अक्कल येईल.’ 

कळवळ्यानं ती म्हणाली, 'अहो, असं कसं? पोरगं आजारी पडंल. त्याचं वय काय? त्याला काय कळतंय? सगळं तुमच्या मनासारखंच कसं व्हईल? वाजलेत किती बघा. अकरा वाजून गेल्यात. तरी तुमी त्येला झोपू दिलं नहाईसा.’ बहुलकरांचं डोकं एकदम सटकलं. त्यांनी हाताला सापडेल ती खोपडयाची काठी उचलली आणि, ‘सटवी. मला अक्कल शिकवतेस काय?' म्हणत जोरजोरानं बायकोला बडवायला सुरुवात केली. पोराच्या आणि बायकोच्या आवाजानं अख्खी गल्ली जागी झाली. माणसं घरातून बाहेर आली, गल्लीत जमली. बहुलकरांच्या घरातला आरडा-ओरडा वाढला. पण कोणी दार वाजवायचं धाडस केलं नाही. विकतचं  भांडण कुणी अंगावर घ्यायचं? हाच प्रत्येकाच्या मनातला विचार. हा तमाशा तसा त्यांना नित्याचाच. त्यामुळे आया बायाही आपसांतच खुसपुसत राहिल्या. एवढ्यात शेजारच्या माळ्याची म्हातारी सगळ्यांना ओरडून म्हणाली, ‘आगा, असे गप्प काय ऱ्हायल्यासा. भाडया बायका-पोरास्नी ठार मारंल, आनी गल्लीचं वडावनं लागंल. त्येला भाईर वडा. चांगला कुमलूया. मास्तर हाय भाड्या. मास्तर काय फिस्तर.  श्यान घाला त्येच्या तोंडात.' म्हातारीच्या आवाजानं तिघा- चौघांना स्फुरण चढलं. त्यांनी दारावर लाथा घालायला सुरुवात केली. बहुलकरांच्या बायकोनं आवाज दाबला पण पोराचा दुप्पट वाढला. शेवटी बहुलकरांनी वैतागून दार उघडलं आणि दारातूनच ओरडले, ‘आमच्या घरात आम्ही काय पण करू. आमच्यात कोणी भाग घ्यायचं कारण नाही.’ माळ्याची म्हातारी एकदम धावली, म्हणाली, ‘ये भाड्या, तुला मास्तर कुणी केलाय रं सुडक्या? म्हणं आमच्यात कुणी पडायचं न्हाई. कुणाचं नडलंय तुज्या वाचून रं? भाड्या, आमची झोपमोड का करतोस? तुजा गल्लीला ताप का? कुठंतरी डोंगरात घर बांधून रहायचा व्हतास...' म्हातारीच्या आवाजानं बहुलकरची बोलतीच बंद झाली. एवढ्यात त्यांची पत्नी रडतच बाहेर आली. म्हणाली, ‘आत्यासाब, जावा आता. माझंच नशीब फुटकं! त्येला कोण काय करणार?’ 

म्हातारी खवळली. म्हणाली, ‘गप ग शांती. तुला न्हाई कळत. सारकं मार खाईत गप्प बसतीस, म्हणून येचं तेगार. चांगली आद्दाल घड़ीव, म्हणजे येतोय वटणीवर.’ म्हणत म्हातारी पाठीमागं सरली. लोक पांगले. बहुलकरांनी दार झाकलं. दीपू रडून रडून आतल्या सोप्यात जाऊन झोपला होता. त्यांच्या पत्नीच्या-शांताच्या डोळ्याचं पाणी हटत नव्हतं. बहुलकर ताळ्यावर आले. रागाच्या भरात आपण असे का वागतो, हे त्यांचे त्यांनाही कळेना. त्यांनी सगळ्या खोलीभर झालेलं पाणी फडक्यानं निरपून काढलं. सगळे स्वच्छ झाल्यावर त्यांनी सतरंजी अंथरली. बायकोजवळ जाण्याची हिंमत झाली नाही त्यांना. दिवे घालवले. अंधारात डोळे टक्क उघडे... आपल्याला असं का होतंय? पण चुकले तरी काय? आतापासून मुलाला योग्य सवयी नाही लागल्या, तर त्याचं भवितव्य काय? आपण किमान दोन घास खाण्याची तरी तजवीज केली. काय होतं आपल्याजवळ?... त्यांनी एकदम डोकं झिंजडलं. केस कचकचा ओढले. डोळे मिटायचे प्रयत्न सुरू केले. त्यांना कोणतीच जुनी आठवण नको होती; आणि ते स्वाभाविकही होतं. 

नाना बहुलकर ह्या जिल्हा बँकेतल्या शिपायाच्या घरात रायाप्पा बहुलकरांनी जन्म घेतला आणि साडेसाती सुरू झाली. वडिलांची जिल्ह्यात कुठंही बदली व्हायची. त्यात बाप अस्सल दारुकस. पाच वेळा ड्युटीवर पिऊन गेल्याबद्दल कामावरून कमी केलं होतं. तरी मरेपर्यंत म्हाताऱ्यानं दारू सोडली नाही. सात पोरं आणि तीन पोरींचा बाळंतपणाचा भार सोसण्यात त्यांच्या आईला कोणत्याच पोराकडं लक्ष देता आलं नाही. त्यात नवरा दारू पिऊन आला, की सगळ्या घरात हैदोस, पोरं त्यांच्या त्यांच्या नशिबानं मोठी झाली. म्हाताऱ्यानं कुणाकडंच लक्ष नाही दिलं. रायाप्पा उर्फ रा. ना. बहुलकर योगायोगानं शाळेच्या वाटंला गेला. तेव्हा त्याचे वडील गडहिंग्लजात बदली होऊन गेलेले. त्या शाखेचे मॅनेजर मुसळे भला माणूस. त्यांनी रायाप्पाला स्वतः नेऊन शाळेत घातलं आणि नाना बहुलकरला तंबी दिली, याची शाळा बंद केलीस की तुला नोकरीवरून घरी घालवतो. नोकरीच्या भीतीनं रायाप्पाची शाळा बंद झाली नाही. मॅट्रिकनंतर रायाप्पानं स्वतःच्या शिक्षणाचे स्वत:च मार्ग शोधले. त्यामुळे सात भावांत तो एकटाच शिकला. त्यावेळी हायस्कुलात शिकवायला माणसंच मिळत नव्हती. त्यामुळे नोकरीला लागला. मग ट्रेनिंगला जाऊन ट्रेंड झाला. पण त्याच्या स्वभावानं त्याला एका ठिकाणी स्थिर नोकरी करता आली नाही. दर दोन वर्षानं हायस्कूल सुटायचंच. अशात लग्न झालं. लटांबर गळ्यात पडल्यावर आपोआप तो बदलेल असा सगळ्यांचा अंदाज होता, पण तसंही घडलं नाही. लग्न झाल्या झाल्या त्याची त्यावेळची नोकरी सुटली. वडिलांनी घरात घेतलं नाही. त्यामुळे गावातच घर घेऊन राहावं लागलं. त्याच्या स्वभावाची इतकी ख्याती की जिल्ह्यात कुठे नोकरीस घेतलं नाही, त्यावेळी बायकोच्या - शांताच्या आईबापांनी धान्य, आठवड्याचा बाजार पुरवून त्याला जगवलं. ती दोन वर्षे म्हणजे रा. ना. बहुलकरांची सत्वपरीक्षा घेणारी वर्षे. पण गड्यानं चिकाटीनं दिवस ढकलले. सासऱ्यानंच हातापाया पडून ही नोकरी मिळवून दिली. दिवस बदलले. तसं नोकरीचं गाव घरापासून चार-पाच किलोमीटर. त्यामुळे सायकलवरून जाणं-येणं सोयीचं. त्यानं त्यानंतर घर, मुलंबाळं यांना घडवायचा चंग बांधला, म्हणूनच त्यांना दीपूची साधी चूकही खपत नव्हती. ‘एकदा का वय निघून गेलं, की मागाहून पश्चात्ताप काय कामाचा’, असं त्यांचं मत होतं. हे मत त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरूनच बनलं होतं. 

मॅट्रिकमध्ये असताना बहुलकरांनी ठरवलं असतं तर ते किमान सत्तर टक्क्यांच्यावर मार्कस् काढू शकले असते. ते ज्या हायस्कुलात होते, तिथं आठवी ते दहावीला पाच तुकड्यांत त्यांचा पहिला नंबर होता. अकरावीला पूर्वपरीक्षेपर्यंत त्यांना सर्वात अधिक मार्कस् होते. हायस्कुलातले सगळे शिक्षक त्यांना, तू इंजीनिअरिंगला जा, मेडिकलला जा, असे सल्ले द्यायचे. त्यांना खात्री होती. हा किमान तालुक्यात सेंटरला  पहिला येणार. पण अचानक बहुलकरांचं डोकं कसं काय एकदम चक्रम झालं, आता आपण पहिलेच आहोत ही नशा चढली. बिडीकाडीचा, सिनेमाचा असे कैक नाद लागले. भैकू पोरांच्या संगतीत हिंडता हिंडता फक्त चाळीस टक्क्यानं पास व्हावं लागलं. तेव्हा झटक्यात जमिनीवर आले होते; पण त्याचा काही उपयोग नव्हता. त्यांना सारखं वाटायचं, घरात कोणी लक्ष ठेवणारं असतं तर असल्या नादाला आपण लागलो नसतो. आपल्या बापामुळंच आपण वाया गेलो. तरी बरं मॅट्रिकचा झटका बसल्यामुळे किमान मास्तर तरी झालो. अन्यथा कुठे वहात गेलो असतो, कुणास ठाऊक. आपल्याबाबत घडलेली चूक आपल्या मुलाबाबत घडू नये, या बाबत ते दक्ष होते. त्यामुळंच अचानक डोकं सणकायचं आणि नको तेच हातून घडायचं. त्याला त्यांचाही इलाज नसायचा. 

प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नव्हती, म्हटल्यावर ते अंथरुणावर उठून बसले. सगळ्या खोलीभर अंधाराची जाळकांडं.  आतला सासूल घेतला, तर सगळी गाढ झोपेत. त्यांनी लाईट लावला तर रात्रीचे तीन वाजलेले. अजून दोन तास घालवायचे होते. त्यांनी आवाज न करता पुढच्या दाराची कडी काढली. गल्लीत म्युनिसिपालटीचे दिवे झगमगत होते. दार नीट लावून ते रस्त्याला लागले. अचानक गल्लीतल्या कुत्र्यांनी एकदम गलबलाट केला. ते एकदम दचकले. एक भला मोठा दगड घेऊन त्यांनी कुत्र्यांच्या दिशेने भिरकावला. कुत्री पांगली. स्टॅन्डच्या दिशेनं त्यांची पावले आपोआप वळली. कुठंच जाग नाही. तीन चार गल्ल्या ओलांडून गेल्यावर मुख्य रस्ता आला. मग त्यांनी पायाची गती वाढवली. गावाच्या पार बाहेर गेल्यानंतर गच्च अंधाराची त्यांना भीती वाटायला लागली. आपोआप पायाची गती मंदावली. दम लागल्याची जाणीव झाली. रस्त्याच्या कडेलाच त्यांनी बैठक मारली. सताड मोकळ्या रानात भरलेला अंधार आणि ते. स्वतःतच हरवून गेलेले. एक ट्रक त्यांच्या जवळून घरघरत निघून गेला. ते एकदम भानावर आले. उठून परत फिरले. त्यांच्या पायाची गती वाढली. हळूहळू भगटायला सुरुवात झालेली. मग त्यांनी जवळजवळ पळायलाच सुरुवात केली. त्यांना जाऊन दीपूला उठवायचं होतं.... 

‘बहुलकर, तुम्ही जगाची उगाच काळजी करता. तुम्हांला कशाला पाहिजे, नको ते? ह्यामुळं होतं असं, की तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्हीच गोत्यात येता.’ जाधव कळकळून बोलत होते. गणिताचे पाटील म्हणाले, ‘तुमच्या स्वभावानं तुमीबी मार खाल आणि आमालाबी खायला लावाल. म्हणून हे धंदे बंद करा.’ बहुलकर फक्त ऐकत होते आणि त्यांच्या नाकाच्या पाळ्या फुरफुरत होत्या. सगळा स्टाफ गंभीर झालेला होता. हेडमास्तरनी खास मिटींग बोलावली होती. सगळे बोलून बोलून थांबल्यावर बहुलकर खुर्चीवरून उठले. म्हणाले, ‘तुमचं सगळ्यांच मी ऐकून घेतलं. तुम्हा सगळ्यांनाच वाटतं की, मी खोटं बोलतोय.’ त्यांना थांबवत कांबळे म्हणाले, ‘असं कुणीही म्हटलेलं नाही. आमचं म्हणणं, तुमचा हा उद्योग बरोबर नाही.’ 

‘आहोss  काय बरोबर नाही?’ बहुलकर खवळले. म्हणाले, ‘त्या पोरीला सरळसरळ पकडलंय मी आणि तुम्ही म्हणताय हा तुमचा उद्योग बरोबर नाही. म्हणजे ही काय पद्धत झाली? असं जर तुम्ही दुर्लक्ष करायला लागला तर शाळेत कोण पोरींना घालणार नाही. पोरीवर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या जबाबदारीवर पालकांनी मुलींना शाळेत घातलेलं असतं.त्या काय करतात, कशा वागतात हे शिक्षकांनी बघायला नको?’ 

‘एक मिनिट बहुलकर’, म्हणत जाधवांनी त्यांना थांबवलं. 
म्हणाले, ‘तुम्हाला ती मुलगी कुठ दिसली? 
ते म्हणाले, ‘गावाच्या वरच्या बाजूला, तळ्याजवळ.’
‘तुम्ही तिचं कशाला गेला होता?’ जाधवांचा पुन्हा प्रश्न.

‘अहो, कशाला म्हणजे? पहिल्यापासूनच मला त्या मुलीचं वागणं बरोबर वाटत नव्हतं. त्यामुळे पाळतच ठेवून होतो मी. कालच्या सुट्टीत ती गडबडीत दिसली, म्हणून तिचा माग काढला. तर ती तळ्याकडं सरकली. मग मीही गेलो. तर तिथे तिचा हा उद्योग. आधीच ठरलेलं असणार त्यांचं. नालायक आहे हो ती कार्टी.’ 
हेडमास्तर म्हणाले, ‘बहुलकर, तुम्ही मास्तर आहात का पोलिस? तुम्हांला कुणी सांगितलं होतं तिच्या पाठीमागून तळ्यावर जायला? आणि ती मुलगी उद्या म्हणाली, की तुम्हीच तिला तळ्याकडं बोलावून नेलं, तर तुम्ही काय सांगणार? शिकवायचं सोडून हे धंदे सांगितलेत कुणी तुम्हांला?’ 

‘म्हणजे?’ बहुलकर एकदम बावचळले. हेडमास्तरांच्या बोलण्यानं त्यांना घाम सुटला. म्हणाले, ‘तुम्ही सरळ सरळ माझ्यावर आरोप करता. मी शाळेसाठी जीव तोडून काम करतो आणि तुमचा माझ्यावरच संशय?’ पुढे काय बोलावं हेही त्यांना सुचेनासं झालं. एकदम चक्रावलेच. हेडमास्तर म्हणाले, ‘बहुलकर, तुम्हांला आम्ही सगळे विनंती करतो. तुमची फौजदारी आता फार झाली. सहनशक्तीच्या पलीकडे गेली. तुम्ही फक्त तुमचं नेमून दिलेतं काम करत जा. उगाच कुणाच्याही वैयक्तिक भानगडीत नाक खुपसू नका. ही शेवटची वॉर्निंग.’ 

‘अहो, पण मी कुणाच्या भानगडीत नाक खुपसलं?' बहुलकर एकदम चवताळले. म्हणाले, ‘आता तुम्ही विनाकारण मला बदनाम करत आहात.’ त्यांना आडवतच गणिताचे पाटील एकदम उठले. म्हणाले, ‘बहुलकर, आता विषयाला तोंड फुटलंय, तर सांगतोच. तुम्ही माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय अशी बातमी उठवून, आम्ही घटस्फोट घेणार आहोत, असं सगळ्या स्टाफला सांगितले. हे खरं आहे का?’ ‘मी कुठं?’ म्हणत बहुलकर गार पडले. त्यांचा चेहरा एकदम उतरला. अंग थरथरायला लागले. मान खाली गेली. पार मेल्याहून मेल्यासारखं झालं त्यांना. येथून पळून जावं असं वाटायला लागलं. एवढयात हेडमास्तरांनी तोंडाचा पट्टा सुरू केला. म्हणाले, ‘असं प्रत्येकाविषयी काही ना काही तुम्ही बोलत सुटता. एक माणूस चांगलं बोलत नाही तुमच्याविषयी. या तुमच्या स्वभावामुळेच तुमच्या तीन-चार नोकऱ्या सुटल्या. तरी तुमच्यात सुधारणा नाही. सहनशक्तीच्या पलीकडं गेलं बुबा सगळं, आता जर तुम्ही बदलला नाहीत तर आम्ही सगळे मिळून संस्थेकडं तक्रार करू. झालं हे चिक्कार झालं. आता तुमचं तुम्ही बघा. सांगितलं नाही म्हणाल, म्हणून सांगतो. आता थोडे बदला. अहो, ही मुलगी कुठं जाते आणि तो पोरगा कुठे हिंडतो. हे बघायला सांगितलंय कुणी तुम्हाला? अकरा ते पाच आपली ड्यूटी. चार चांगल्या गोष्टी सांगाव्या. संपली आपली जबाबदारी. कुणा स्टाफ मेंबरचं बायकोशी भांडण झालं; कुणाचा मुलगा वाया गेला, या चांभारचौकश्या सांगितल्यात कुणी?’ हेडमास्तर न थांबता बोलत होते. सगळा स्टाफ गंभीर होऊन ऐकत होता.बहुलकरांनी खाली घातलेली मान शेवटपर्यंत वर काढली नाही. 

मिटींग संपली. बहुलकरांनी सायकल काढली. एकटेच रस्त्याला लागले. कधी नव्हे तो त्यांचा भयंकर अपमान झाला होता आणि ह्या सगळ्याला कारण ती तांबटाची पोरगी ठरली होती. त्यांनी दातओठ खातच
सायकलवर टांग टाकली. भरधाव सायकल पळवायला सुरुवात केली. आतडी गळ्यात येईपर्यंत ते पायडेल मारत होते. चिकार दमल्यावर त्यांनी पायाची गती कमी केली. त्यांना मोकळं मोकळं वाटायला लागलं… 

रविवार सुट्टीचा दिवस. बहुलकर कधी नव्हे ते भरदुपारी घोरत होते. त्यांच्या बायकोनं त्यांना गडबडीनं हलवून जागं केलं. ते एकदम वैतागले. उठून बायकोला एकदम शिव्यांचा भडिमार करणार, एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की ती घाबरीघुबरी होऊन हाका मारतेय. ते गडबडीनं उठले. म्हणाले, ‘झालं काय?’ ‘खालच्या घराकडून थोरल्याचा वसन्ता आलाय. तुकाभावोजींना दवाखान्यात नेलंय. उठा लवकर.’ त्यांनी पटकन तोंडावर पाणी मारून घेतलं. वसन्ताकडून सगळं ऐकून घेतलं. तुका हा त्यांचा पाच नंबरचा भाऊ. गवंड्याच्या हाताखाली काम करता करता गवंडीकाम शिकून आता स्वतंत्र गवंडीकाम करणारा. तब्बेतीनं दणकट, त्याला चक्कर आली म्हटल्यावर बहुलकर गडबडीनं दवाखान्याकडं पळाले. तर दवाखान्याच्या दारात ही गर्दी. म्हणजे झालं तरी काय, म्हणत ते गर्दीतून वाट काढत पेशंटजवळ पोहोचले, तर तुका कॉटवर झोपलेला आणि त्याच्या छातीला मशीन जोडलेलं. डॉक्टर गंभीरपणे तपासण्या करत होते. म्हणजे हार्टचं दुखणं दिसतंय, बहुलकर मनात पुटपुटले. त्यांनी तीन नंबरच्या भावाला बाहेर बोलावले. तर तो सांगायला लागला, ‘काय न्हाई. रोजच्यागत सकाळी कामावर गेलाय. तितंबी काय न्हाई. आनी एकदम छातीत कळ आली म्हणून भित्तीवरनं उतरला, आडवाच झाला.

कामावरच्या लोकांनी उचलून पळवतच हितं आणला. आमाला कळालं. मग आमी आलाव.. सगळं ऐकून बहुलकर पुन्हा पेशंटजवळ उभे राहिले. त्यांना डॉक्टरांनी तपासण्या संपल्यावर आत बोलावलं. म्हणाले, माईल्ड अॅटॅक येऊन गेलाय. घाबरायचं कारण नाही, पण काळजी घ्यायला पाहिजे.’ बहुलकरांनी सगळ्या नातेवाईकांना, भावांना घराकडे पाठवलं. तुकाच्या बायकोला फक्त थांबवलं. डॉक्टरांनी, जा म्हणून सांगेपर्यंत स्वतः थांबले. नंतर घराकडे परतले. दीपूला अभ्यासाला बसवून संध्याकाळी एक चक्कर दवाखान्यात टाकली. नंतर आठ दिवस त्यांचा सततचा हाच कार्यक्रम. हायस्कूलला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर. डॉक्टर दररोज तब्येत सुधारत आहे, म्हणायचे. आणि एकेक दिवस वाढवायचे. तब्बल दहा दिवसांनंतर डॉक्टरांनी सांगितलं, उद्या पेशंटला घराकडं न्यायला हरकत नाही. बहुलकरांनी आपल्या भावजयीला सगळी कल्पना दिली. घराकरडे परतले. बायकोला म्हणाले, ‘शांती, उद्या देणार डिस्चार्ज. तू सकाळी दवाखान्यात जाऊन ये, म्हणजे पुन्हा घराकडं बघायला जायची गरज नाही.' आपला नवरा असं काय सांगायला लागलाय, हे त्या बिचारीला कळालं नाही. त्यात विचारायची सोय नव्हती. ती गप्प बसली. 

बहुलकर नेहमीप्रमाणे उठले. त्यांना शाळेकडे जायची फारच गडबड होती. त्यांनी आज दीपूला अभ्यासाला बैस, असंही म्हटलं नाही. बायकोनं डबा भरल्या भरल्या त्यांनी सायकल रस्त्याला लावली. दारातनंच शांता म्हणाली, जातेवेळी दयाखान्यातनं जाणार न्हवं?’ त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं करत सायकल रेटली. रस्त्याला त्यांनी इकडन तिकडंही बघितलं नाही. गाव ओलांडल्यावर त्यांना मोकळं वाटायला लागलं. त्यांनी सायकलची गती एकदम कमी केली. एक तर त्यांच्याजवळ मुबलक वेळ होता आणि दुसरं म्हणजे त्यांना उगाचच दमल्यासारखं वाटत होतं. रोज जे अंतर कापायला अर्धा तास लागायचा ते अंतर कापण्यात त्यांनी तास घालवला. शाळेत आल्या आल्या त्यांनी खळखळून तोंड धुतलं. त्यांना शांत शांत वाटायला लागलं. त्यांनी डोळे मिटून खुर्चीवर बसून टाकलं. बेल झाल्या झाल्या लोक तासावर गेले. बहुलकर तिथंच बसून. मराठीचे कांबळे त्यांच्याजवळ आले. म्हणाले, बहुलकर, आज काय तब्येत बिघडलीय वाटतं?' त्यांनी नाईलाजानं डोळे उघडले. म्हणाले, ‘तसं काय नाही. पण थोडं दमल्यासारखं वाटतंय.’

कांबळे म्हणाले, ‘बघा बुवा, पन्नाशी आली की एकदा सगळं चेक करून घ्यावं. शरीराचं काही सांगता येत नाही.' नको तोच विषय कांबळेंनी सुरू केला. ‘बेल झाली वाटतं’ म्हणत बहुलकर जाग्यावरून उठले. अनिच्छेनं आठवीच्या वर्गावर जाऊन थांबले. मुलं आधीच पुस्तकं उघडून बसलेली. त्यांनी त्यांना पुन्हा वाचत बसायला सांगितलं. ते फक्त वर्गातून इकडून तिकडे घिरट्या घालत राहिले. त्यांच्या डोक्यात भलताच गोंधळ चाललेला होता. 

सलग तीन तास त्यांनी न शिकवता घालवले. चौथ्या तासाला त्यांनी जाधवांना चहाला चला, म्हणून बाहेर काढलं. हायस्कूलपासून चार कासरं अंतरावर हॉटेल. जाधवांबरोबर चालता चालता म्हणाले, ‘तुमच्या सगळ्या भावांचं आता कसं काय चाललंय?'

जाधवांना आश्चर्यच वाटलं. म्हणाले, ‘अगदी चांगलं चाललंय. जो तो तांग्याला लागलाय. मुलं-बाळं, संसार ह्यांत सगळे गुरफटलेत. आता कुणाची काय चिंता नाही हो. एकदम उत्तम.’

नशीबवान आहात राव. हे आमच्याच पाठीमागं काय लागलंय बघा. सगळ्या भा्वाचं सगळीकडून इस्कोट-रामायण. कुणाचंच काय सरळ नाही. सगळे ओढगस्तीत. मला तर कंटाळा आलाय, सगळयांचं सगळं करून.' बहुलकर कातर आवाजात पुटपुटले. 

‘पण तुम्ही तर स्वतंत्र राहिलाय ना? मग कसला ताप? बघा म्हणायचं ज्याचं त्याला.’ 

‘तसं नाही ना होत. बहुलकर गडबडीनं बोलले. नंतर त्यांनीच तो विषय तिथंच थांबवला. मग इकडतिकडच्या गप्पा मारत चहा पिऊन ते स्टाफरूमकडं परतले, तर बहुलकरांच्या मोठ्या भावाचा मुलगा वसन्ता दारात थांबलेला. त्याला बघितल्या बघितल्या त्यांच्या काळजात धस्स झालं. एकदम अंगातून पाणी गेल्याचा भास झाला. त्यांनी गडबडीनं त्याला ग्राउंडच्या एका कोपऱ्यात नेले. हळू आवाजात म्हणाले, ‘दिला ना डिस्चार्ज?' वसन्ता म्हणाला, ‘न्हाई. बिल भरल्याशिवाय सोडणार न्हाई म्हणत्यात. म्हणून लावून दिलंय. धा हजार केलंय बिल. चार हाजार जमीवल्यात. तुमच्याकडं काय जमत्यात बघाय सांगीटलंय.’ बहुलकर काहीच बोलले नाहीत. नंतर म्हणाले, ‘आता माझ्याकडं काय नाहीय. गावात आल्यावर थोडं बघतो. तोवर आणि थोडं जमवा म्हणावं. त्यांनी वसन्ताला जवळजवळ हाकललंच. स्टाफरूममध्ये आले. डोळे मिटून गप्प बसले. 

संध्याकाळी घरात आल्या आल्या त्यांनी बायकोकडून सगळा वृत्तांत फांगसून फांगसून विचारून घेतला. तिनं काय अंदाज दिलाय का, चाचपडून बघितलं. मग म्हणाले, ‘आता हे पाचशे घेऊन तू जा दवाखान्यात. म्हणावं आमच्याकडं एवढंच आहेत. बाकीचं तुमचं तुम्ही जमवा.’

‘काय द्देशीला ते मागनं फेडतो म्हणत्यात. मग द्या जावा की. असल्या वेळला द्यायचं नाहीत तर कधी? शेवटी किती केलं तरी भाऊच आहे की तुमचा!’ बहुलकरांचं मस्तक फिरलं. म्हणाले, ‘तोंड फारच लिवलिवाय लागलंय की तुझं? म्हणे द्या जावाकी. द्यायला साठवाय नाहीत पैसे पोट मारुन, लईच कळवळा असला तर देजा मिळवून तुझं तू. पुन्हा असं बोललीस तर तोंड फोडीन.’ शांता एकदम गार पडली. तिला हे अपेक्षितच होतं. तिनं बहुलकरांनी हातात घेतलेल्या पैशाला हातही लावला नाही. म्हणाली, ‘पैसे तुमचे तुम्ही दवाखान्यात देऊन या जावा.’ बहुलकर दगडागत जाग्यावरच बसले. त्यांनी खिशातून बाहेर काढलेले पैसे पुन्हा तसेच ठेवले. बायकोशी सणकून भांडावं असं क्षणभर वाटलं. पुन्हा त्यांनी संयम पाळला. काय करावे? त्यांचं त्यांना सुचायला तयार नव्हतं.

रात्रीचे आठ वाजायला आले. बहुलकर तसेच जाग्यावर बसलेले. पुढचं दार वाजलं. बहुलकरांचे डोळे विस्फारले. त्यांचा थोरला भाऊ अंग चोरून आत आला. खुर्चीवर न बसता खाली फरशीवरच टेकला, ‘वर बस की', कसंबसं बहुलकर पुटपुटले. त्यांच्या भावानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दोन्ही गुडघ्याभोवती हाताचा विळखा देऊन आपलं थकलेलं शरीर आवरून घेतलं. मग इकडेतिकडं बघतच थकलेल्या आवाजात म्हणाला, ‘आज सोडलं न्हाई तुक्याला. मग कसं करायचं म्हणतोस?' 

‘मी एकटा काय करणार? माझ्याकडं तरी कुठे आहेत पैसे? फार फार तर पाच सहाशे जमतील?’

‘तेवढ्यानं काय कात व्हतोय? आगा, तुजं पैसं काय आम्ही राकत न्हाई. चार म्हयन्यांत फेडताव. एवढी नड मार.’ थोरला एकदम काकुळतीला आला. ‘तुका काय माझा भाऊ नाही? पण पैसे पाहिजे का नको? असल्यावर नाही म्हणतोय?’ 

‘बघ गड्या. तू जरा पगारदार म्हटल्यावर कोणबी उस्नंपास्नं देतय. उस्नपास्नं करून तरी नड मार. याज दीऊया लईतर.’ 

‘तसलं काय झंगाट नको माझ्या पाठीमागं, तुमचं तुम्हीच काढा कुठं तरी. मला काय जमणार नाही कुणाकडं मागायला.’ 

थोरल्याचा संयम सुटला. म्हणाला, ‘तुला कसं जमल गाss? गांडीखाली पैसा झालाय म्हणून तुला रगात वळकंना. आरं, तू न्हाई दिलास पैसा तर त्यो काय दवाखान्यातच मरणार हाय, आसं समजू नगो. आजून हिम्मत हाय माज्यात. पर तुला सांगून ठेवतो. राजालाबी नड लागतीया. कधी तरी येशील गब्रु. तवा बघतो तुला. मातलास हाईस. येळ पडल. नाक घासत येशील’, म्हणत थोरला झटक्यात उठला. रस्त्याला लागला. शांताला वाटलं, दीराला थांबवावं. ती जाग्याला वळवळली. पुन्हा गण्प बसली. तिनं बहुलकरांकडं बघितलंही नाही. ती आतल्या सोप्याला वळली.

दीपू सभोवताली पुस्तकं पसरून गंभीरपणे प्रश्नसंच पालथे घालत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या आईचं घरात जेवणखाण चाललेलं. बहुलकर शाळेतून आल्याआल्याच घरातून बाहेर पडले होते. गावात दोन माणसंसुद्धा त्यांनी बोलायला टिकवली नव्हती. तरी गावाच्या सगळ्या गल्ल्या आठवड्यातून एकदा पालथ्या घातल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही. पण भावाच्या दवाखान्यानंतर त्यांनी घरातून बाहेर पडणंच बंद केलं होतं. कधी नव्हे ते आज ते बाहेर पडले होते. दीपूच्या आईचा स्वयंपाक आवरला. ती दीपूजवळ येऊन बसली. दीपूशेजारीच अभ्यासाला बसलेल्या आपल्या मुलीला तिनं जवळ घेतले. म्हणाली, ‘मिटवून ठेव दीपू आता दप्तर. किती सारकं सारकं पुस्तकात डोकं घालून बसशील?’ ‘म्हणजे मरेपर्यंत मार मी खातो. तू काय आपली मोकळीच.’ दीपू पुस्तकातून डोकं वर काढत म्हणाला. ती त्यावर काहीच बोलली नाही. एवढ्यात बहुलकरांनी घरात पाय ठेवला. आज स्वारी खुशीत दिसत होती. आल्याआल्या दीपूला म्हणाले,

‘तुझ्या सगळ्या मास्तरांकडे जाऊन आलो.’ कोणी काहीच त्यावर बोललं नाही. बहुलकरांनी कपडे बदलले. अर्ध्या चड्डीवर येऊन दीपूसमोर बसले. ‘थोडं गणित जमत नाही म्हणतात, तुझे गणिताचे सर’, म्हणत त्यांनी स्वतःच त्यांच्या पुस्तकातून गणिताचं पुस्तक शोधून काढलं. म्हणाले, ‘उद्यापासून तुझी गणिताची तयारी मीच करून घेतो. कुठवर झालंय शिकवून?’ मग दीपूनं त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी शांतपणे पुस्तक चाळायला सुरुवात केली. त्यांच्या ध्यानात आलं की तयारी करूनही हे आपल्याला नाही शिकवता येणार. मग त्यांनी पुस्तक मिटलं. त्यांनी गावात गणिताच्या ट्यूशन कोण कोण घेतं, याची चौकशी सुरू केली. दीपून पटापट सगळी नावं सांगितल्यावर एकही माणूस त्यांच्या मनात बसला नाही. मग एकदम गंभीर झाले. म्हणाले, ‘तुझ्या मास्तरलाच सांगून ठेवतो. रोज तास तासभर त्यांच्याच घरी जायला सुरुवात कर.’ दीपू म्हणाला, ‘वर्गात शिकवतात, तेच घरी शिकवणार. मग पुन्हा घराकडं कशाला?’ 

‘असं नसतं रे. तुला न समजलेला भाग ते घरात घटवून घेतील. गणित महत्त्वाचं. तेच कच्च राहिलं तर तू पुढं काय करणार? त्यामुळे तुला गणिताला आत्तापासूनच जादा वेळ द्यावा लागणार.’ बहुलकर समजुतीच्या स्वरात सांगत होते. दीपू त्यावर काहीच बोलला नाही. फक्त बसून राहिला. आपले वडील आज बऱ्या मूडमध्ये आहेत असं हेरून तो म्हणाला, ‘शाळेची सहल जाणाराय. सरांनी माझंही नाव घेतलय.’ 

बहुलकर चटकन म्हणाले, भेटले तुझे तेही सर. त्यांना सांगितलंय, आपल्याला काय जमणार नाही म्हणून. सहल दहावीनंतर. आता फक्त अभ्यास. फुक्कट चारपाचशे घालवायला पैसे आहेत कुणाकडं?’ 

दीपू म्हणाला, 'माझे सगळे मित्र जाणारहेत.'

‘मित्र जाणार म्हणजे तू जायला पाहिजे असं कुठंय? आणि नको त्या बेकार पोरांत तू फिरत असतोस, असं तुझे सर म्हणत होते. पहिली त्यांची संगत बंद कर.' 

‘तुम्हांला पैसे द्यायला लागतात म्हणून काय पण बोलू नका. कुठले सर म्हणाले तुम्हांला? आणि कुणाशी संगत केली मी? काय पण बडबडायचं आपलं.’ दीपूला आपल्या वडिलांचा चिक्कार राग आला. त्यानं सरळ सगळी पुस्तकं मिटवली. बहुलकर म्हणाले, ‘झाला आजचा अभ्यास? आता तर दहाच वाजले की.’

‘मला करायचा नाही अभ्यास’, दीपू एकदम गुरगुरला.
‘काय म्हणालास?’ बहुलकरांचा आवाज बदलला. दीपू काहीच बोलला नाही. तो जेवणघरात गेला. पेलाभर पाणी प्याला. पुन्हा हॉलमध्ये येऊन बसला. बहुलकर त्याची समजूत घालण्यासाठी एकदम प्रेमानं म्हणाले, ‘दीपू, सहल काय कधीही करता येईल. पण अभ्यासाचे दिवस पुन्हा नाहीत येणार. थोडंसं समजून घे.’ ‘काय समजून घ्यायचं?’ दीपू एकदम चिडला. म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला मरायला लागला होता, तर पैसे दिले नाहीत. मग मला सहलीला कुठलं द्याल? तुमचं सगळं माहितीय मला.’ बहुलकरांना कोणीतरी जोरानं आपल्या मुस्काडात मारतंय असा भास झाला. एकदम सणकलेच. पण त्यांना बोलता येईना. शांता पोराच्या बोलण्यानं अवाकच झाली. आता धडगत नाही हे ओळखून ती उठून आत गेली. एवढ्यात बहुलकर किंचाळले, ‘काय म्हणालास?’ 

थंडपणे दीपू म्हणाला, ‘ऐकलंय की तुम्ही. का आणि एकदा सांगू?’ 
‘मुस्काड फोडून ठेवीन’, बहुलकर पुन्हा किंचाळले. 

‘फोडा की. आडवलंय कुणी? दुसरं जमतंय काय तुम्हांला?’ दीपू न हालता, शांत आवाजात पुटपुटला. बहुलकरांना सगळी खोली आपल्याभोवती फिरतेय असं वाटायला लागलं. त्यांनी गच्च डोळे मिटले. आपला पोरगा आपल्याला उलट बोलायला लागला. तेही अत्यंत थंडपणे. आपण मारलं तरी तो आता हेच बोलेल. त्यांनी उलटे अंक मोजायला सुरुवात केली. तरीही त्यांना स्वतःला आवरता येईना. ते उठले. आत जाऊन त्यांनी सपासप तोंडावर पाणी मारून घेतलं... कधी नव्हे ते त्यांना आपला चेहरा आरशात भेसूर दिसायला लागला…

शाळा सुटल्या सुटल्या दीपू मित्रांच्या घोळक्यातून सरळ गावात घुसला. खालच्या घराकडं त्याला चक्कर टाकायची होती. हे त्याच्या मनानं कसं काय घेतलं होतं, कुणास ठाऊक. तो दारात पोचला तर तुकातात्या उंबऱ्यालगत गळ्यात गुड्घ घेऊन बसलेला. दवाखान्यानंतर कितीतरी दिवसांनी तो त्यांना बघत होता. एकदम थकलेलं शरीर. आत ओढलेले डोळे. हाताच्या शिरा स्पष्ट दिसणाऱ्या. टॉवेलाची टापशी बांधून मुंडाश्यात त्यांनी आपलं शरीर लपवलं होतं. दीपूला बघितल्या बघितल्या त्यांचा चेहरा एकदम ताजातवाना झाला. म्हणाले, ‘दीपू! सुटली व्हय गा शाळा?’ त्यानं मान हालवली. तात्याजवळच्या कट्टीवर टेकतच त्यानं लोंबकळणाऱ्या  पायांना झोके द्यायला सुरुवात केली. ‘कसा काय फिरलास लेकरा?’ तात्यांचा कातर आवाज. एवढ्यात काकू,
नवरा कुणाशी बोलतोय बघाय उंबऱ्याजवळ आली. दीपूला बघून तिच्या कपाळाला आठ्या पडल्या, हे दीपूच्या नजरेतून सुटलं नाही. ‘काकू, काय करालीस?’ त्यानं काकूचे पुन्हा लक्ष वेधून घ्यायला विचारलं. काकू एकदम त्याच्या समोर आली. म्हणाली, ‘भाऊ जीवंत हाय, काय मेलाय, बघाय बाबानं लाऊन दिलं आसंल तुला. त्याशिवाय तू कसा फिरकशील?’


‘आगं गप्प, त्या पोराला काय कळतंय? त्येला कशाला बोललीस? त्येनं काय घोड़ मारलंय तुजं? बाळ राजा, यावंसं वाटलं, आला आसंल. चार शेंगा दे त्येला खायाला’, तुकातात्या पुटपुटला. पण त्याची नजर गल्लीत स्थिर होती. एवढयात थोरल्याचा वसन्ता दीपूजवळ आला. त्यानं दीपूला हाताला धरून आत नेलं. वसन्ताच्या आईनं दीपूला समोर बसवून घेतलं. म्हणाली, ‘काय बघून येजा, म्हणून लाऊन दिलंय, काय तुजं तू आलास?’ ‘माझं मी आलोय’ दीपून सांगून टाकलं.  

‘बघ, ह्या लेकराला समाजतंय त्ये त्या भाड्याला कळत न्हाई. न्हाई दीना व्हता पैसाआडका, निदान भाऊ कसा हाय बघाय तरी यायचा व्हता. कदी घरात तरी बोलतोय व्हय रं सरळ?’

दीपू काहीच बोलला नाही. वसन्ता त्याला अभ्यासाचं काय काय विचारत होता. दीपूनं मध्येच त्याला विचारलं. ‘दादा, तू का सोडलीस शाळा?’ 

वसन्ताची आई एकदम भडकली. म्हणाली, ‘तुज्या बालाच इच्यार की रं, वसन्तानं का सोडली शाळा. भाड्याला पन्नास रुपयं द्यायला जड़ झालं. पैसेवान झालाय गा तुजा बा. त्येला गोतावळा नगो.’ वसन्तानं आईला एकदम थांबवलं, दीपूला आश्चर्य वाटायला लागलं. तुकातात्या, वसन्ता मला काय कळतच नाही, असे का समजतात, हेच त्याला कळायला मार्ग नव्हता. त्यानं दप्तर उचललं. बाहेर बसलेल्या तुकातात्याला जातो, म्हणून सांगितलं. रस्त्याला लागला. घराकडं जाऊच नये असं त्याला वाटाय लागलं.

घरात आल्या आल्या त्यानं आईला सांगितलं, ‘खालच्या घराकडे गेलतो. तुकातात्या लई थकलाय.’ मग त्याच्या आईनं फांगसून फांगसून विचारायला सुरुवात केली. त्यानं घडलेलं सगळंच सांगितलं. शेवटी म्हणाला, ‘आई, बाबा असं का वागत असतील गs?’ 

‘त्यांचे त्यांनाच माहीत बाबा’, म्हणत -त्याच्या आईनं बोलणं तोडलं. ‘शाळेत आमचे शिक्षकही सरळ बोलत नाहीत बाबांविषयी. तू समजून का सांगत नाहीस त्यांना?’ दीपूनं विषय वाढवला. ‘माझं कोण ऐकतंय बाळा? त्यांच्या मनाचे त्ये ताबेदार. आता तू मोठा झाल्यावर तुझं ऐकलं तर ऐकलं’, म्हणत दीपूची आई आत गेली. ‘मुलाला सगळं समजायला लागलंय, तरी वागण्यात काय बदल नाही. असाच जायाचा आता जन्म.’ ती स्वतःशीच पुटपुटली. 

बहुलकर दमूनभागून घरात आले. आज थोडा उशीरच झाला होता. पण तसं त्यांना कुणीही म्हटलं नाही. आल्या आल्या त्यांनी दीपूसमोर कागदांचा गठ्ठा टाकला. दीपूनं त्याकडं  ढुंकूनही बघितलं नाही.  

‘तुझ्यासाठी आणलंय ते. बोर्डत आजवर आलेल्या निवडक मुलांच्या पेपरच्या झेरॉक्स आहेत, बघून ठेव. पेपर कसा सोडवावा, हे चांगलं कळेल तुला.’ 

दीपूनं आपलं दप्तर उघडलं. त्यातली पुस्तकं भोवती पगळली. ‘तुझ्याशी बोलतोय मी. समजलं ना?’ दीपूचा प्रतिसाद नाहीच. बहुलकरांनी स्वतःला आवरलं. कपडे बदलले. स्वयंपाकघरात जात बायकोला म्हणाले, ‘काय बिनसलंय याचं?’ 

‘कुणाचं?’ शांतानं सहज विचारलं. 
‘कुणाचं म्हणजे?’ दीप्याचं. तो सरळ बोलायलाही तयार नाही.

‘बिनसतंय कुठलं. कंटाळला असंल अभ्यास करून’, तिनं विषय वाढू नये म्हणून काहीतरी बोलून टाकलं. बहुलकर नेहमीसारखे आपल्या उद्योगाला लागले. दीपूचं अभ्यासात लक्षच लागायला तयार नव्हतं. सारखा डोळ्यांसमोर तुकातात्याचा चकलेला चेहरा. काकूच्या कपाळाच्या आठया. दीपूनं गच्च डोळे मिटले. हे बहुलकरांच्या नजरेतून सुटलं नाही. ते एकदम गरजले, ‘दीप्या, आज तुला झालंय काय नेमकं? असं काय कराय लागलायस?’ दीपू एकदम सावरला. त्याला सणक आली होती. पण आवरलं, त्यानं दप्तर गुंडाळून ठेवलं. हातपाय स्वच्छ धुऊन घेतले. आईला म्हणाला, ‘मला जेवायचंय.’ नंतर तिथंच बैठक मारून बसला. बहुलकर एकदम संतापले. पाय आपटत घरभर फिरत राहिले... अचानक त्यांना कशाची तरी आठवण झाली. ते थबकले. गप्पगार खुर्चीवर बसले.... तेव्हा ते आठवीत असतील. संध्याकाळी खेळून दमून घरात आल्या आल्या त्यांना भयंकर भूक लागली. आईचं जेवण अजून आटपायचं होतं. ते चुलीच्या सोप्याला आडवे झाले. चुलीत फुललेले इंगळ. आईचं भाकरी बडवणं तालात चाललेले. पहिली भाकरी भाजल्या भाजल्या तिनं ताटात ठेवली. भानुशीवरच्या भांडयातले कोरडयास वाढून घ्यायला लावलं. कसबसा एक घास तोंडात घातला, एवढयात म्हातारा ल्हास होऊन घरात आला. एकदम नजरेसमोर जेवणारा राय्याप्पा. म्हातारा तिरीमिरीत जेवणसोप्यात आला. त्यानं लाथेनंच जेवणाचं ताट उडवलं. भाकरी पाकाड्यात, वाटी बरोबर आईच्या डोक्यात. म्हातारा लवंदाडतच चिक्कार काय काय बडबडत होता. म्हाताऱ्याचा जीव घ्यावा असा बहुलकरांना राग आला. कोनाड्यातलं मुसळ त्या संतापातच उचललं. एवढ्यात म्हातारी आडवी झाली... एकदम चित्रच त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत गेलं. दीपू जेवून उठेपर्यंत त्यांनी तोंडातून चकार शब्द सुद्धा काढला नाही. 

दीपूनं सवयीनं दप्तर पाठीवर टाकलं. शाळेचा रस्ता धरला. आजही त्याला शाळेकडे फिरकावं असं वाटेना. मनाला आवरत कसबसा निम्मा रस्ता संपल्यावर त्याचे पाय आपोआपच जड व्हायला लागले. गेल्या काही दिवसांपासून हे असंच चाललेलं. त्यातूनही मनाचा हिय्या करून शाळेत पाय टाकला तरी समोरचा शिक्षक काय बडबडतोय हे त्याच्या टाळक्यात घुसतच नसे. मग आपलं गप्प टाळ पगळून बसणं. किंवा दुपार झाली की दप्तर घेऊन पळत सुटणं. हे असं का होतंय, त्याचं त्यालाही कळायला तयार नव्हतं. पुस्तक समोर धरलं की त्याला प्रचंड जांभया यायला सुरुवात व्हायची. आता टाळा फाटतोय की काय अशी भीती वाटायला सुरुवात व्हायची. वडिलांना समजू नये म्हणून जांभया दाबता दाबता पुरेवाट व्हायची. आज त्यानं आपल्या मनाला जोरदार समजावलं. जड झालेले पाय पुन्हा शाळेकडं वळवले. शाळेच्या समोर जाऊन तो पुन्हा रेंगाळला. मनात काहीतरी उलटापालट झाली आणि त्याचे पाय गतीने माघारी वळले. त्यानं नदीचा रस्ता धरला. 

गावापासून जवळच नदीचा घाट, घाटावर दत्ताचं भलं मोठं देऊळ, मध्ये कितीतरी मोठ्या घेराची जॅकवेल. नदीच्या काठानं चिक्कर गच्च झाडी. तो पोहोचला तेव्हा घाटावर कोणच दिसत नव्हतं. घाटाच्या खालच्या बाजूला मोठया दगडांवर परटांचे कपडेच कपडे. तो सरसरा घाट उतरून पाण्याजवळ गेला. पायरीवर बसुन पाय पाण्यात सोडले. एक थंड लहर अंगभर भिनत गेली. हळूहळू पायाला बारक्या मासळ्या डिवचू लागल्या. त्याला एकदम गंमत वाटाय लागली. मग पायाभोवती आलेल्या मासोळ्या पकडायचा त्यानं खेळ सुरू केला. कितीतरी वेळ, पण त्याला एकही मासोळी पकडता आली नाही. शेवटी नाद सोडून टाकला. त्यानं समोर संथ वाहणाऱ्या पाण्यावर नजर रुतवली. कुठंच कशाची हालचाल नाही. त्यानं पायरीवरचा वाळूचा मोठाला खडा उचलला. पाण्यात भिरकावला. टुबूऽऽक आवाज झाला. त्याला तो आवाज प्रचंड आवडला. मग त्यानं तो खेळ सुरू केला. असा एक एक खेळ. त्याचा त्यालाच कंटाळा आला. तो दत्ताच्या देवळाच्या गाभाऱ्यात आला. फरशीवर दप्तर ठेवलं. अष्टगंध लावलं. फरशीवरच आडवा झाला. एवढयात कोणी भक्तानं जोरानं घंटा बडवली. तो गप्पकन उठला, दप्तर तिथंच टाकून मंदिराच्या बाजूला घुसला. 

उंचउंच झाडे. त्याची गार सावली. मध्येच झाडावर सर्रकन पळणारी खारूटी. एवढयात त्याची नजर धावडयाच्या बुंध्यावरच्या सरडयावर गेली. लालभडक तोंड. मान ताठ करून तो सरडा त्याच्याकडे डोळे रोखून बघत होता. त्यानं उगाचच हातवारे करून बघितले. सरड्यानं दाद दिली नाही. मग एक बारीक दगड उचलून त्याच्या दिशेनं फेकला. त्यानं तो शिताफीनं चुकवला. मान पुन्हा उंच केली आणि डोळे त्याच्यावर रोखले. आता त्याला सरड्याचा भयंकर राग आला. तो हळूहळू सरकत झाडाजवळ पोहोचला. सरडा सर्रकन् वर सरकला. आपली तुर्रेबाज शेपटी हालवून त्यानं पुन्हा त्याच्यावर नजर रोखली, त्याचें डोक एकदम भिरंबाटलं. त्यानं दगड त्याच्या दिशेनं फेकायला सुरुवात केली. सरडा दगड चुकवायचा. पुन्हा त्याच्यावर नजर रोखायचा. चिडून तो एकदम सरसर झाडावर चढला. तो निम्म्यावर आल्यावर सरड्यानं सुळकी मारली. दुसऱ्या झाडाच्या बुंध्याजवळ जाऊन थांबला. तो चिडीला पडला. ‘आता तू मेलासच’ म्हणत त्यानं झाडावरून उडी टाकली. धप्पकन गवतात आपटल्यावर त्याला सणकून सडी बोचली.

त्या तिरीमिरीतच तो उठला. दुसऱ्या झाडाच्या बुंध्याजवळ गेला तर कितीतरी वेळ त्याला सरडा दिसायलाच तयार नव्हता. त्यानं झाडावर झेप घेतली. सरडा खाली. पुन्हा उडी टाकली. सरडा दुसऱ्या झाडाच्या बुंध्याला पोहोचायच्या आत त्यानं दगड भिरकावला. सरडा एकदम जाग्यालाच आडवा झाला. त्यानं शेपटी धरून त्याला उचललं. अजूनही अर्धमेला असणारा सरडा तडफडाय लागला. पळत पळतच तो घाट उतरत पाण्याजवळ आला. त्यानं सरडयाला पाण्यात बुडवलं. तो आणखी तडफडला. मग त्यानं तोच खेळ सुरू केला. शेवटी सरडा हालायचाच बंद झाला. त्यानं त्याला लांब नदीच्या पात्रात भिरकावला. पण त्याचे लालबुंद तोंड अजूनही आपल्या हातात आहे असं त्याला वाटाय लागलं. मग त्यानं घासून घासून हात धुतले. दत्ताच्या देवळात आला. दप्तर पाठीला लावलं आणि चालायला सुरुवात केली. 

‘दीपूऽऽ ए दीपूऽऽ अरे असं किंचाळायला काय झालं?’ आई त्याला झोपेतून जाग करत विचारत होती. ‘कुठं काय?’ तो अर्धवट जागा झाल्यावर पुटपुटला. 

‘आरं, असं काय? किती मोठयानं किंचाळलास तू? दडपान पडले वाटतं. उठ. जागा हो’, म्हणत आईनं त्याला उठवून बसवला. पूर्ण जाग आल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण भयंकरच स्वप्नात होतो तर. तो उठून पाणी पिऊन आला. पुन्हा झोपला. क्षणात तोच खेळ. लालबुंद तोंडाचा सरडा नदीतून वर येतोय आणि पाठलाग सुरु. तो पळतोय. घाटावरून शाळेत. शाळेतून घरात. घरातून पुन्हा घाटावर. तो वडिलांना ओरडून सांगतोय, या सरड्याचा काहीतरी बंदोबस्त करा. तर ते मोठमोठ्यानं हसताहेत, नाचताहेत आणि त्यांच्या टकलावरचे केस भयंकर उडताहेत... शेवटी दीपू जीवाच्या आकान्तानं किंचाळतोयच किंचाळतोय… 

त्याच्या पाठीत धप्पकन रपाटा बसला. खडखडीत जागा झाला. आई त्याला ओरडून म्हणत होती, ‘दीप्या, किती वेळा तुला जागा करायचा? ऊठ, आता पाच वाजायलाच आले. आंघोळ कर. अभ्यासाला बस.’ म्हणजे रात्रभर आपण नुसते पळतच होतो तर. त्यानं अंग झटकलं. वडील उठलेलेच होते. थंड पाण्याची आंघोळ केल्यावर त्याला एकदम मोकळ वाटाय लागलं. पण पुस्तक समोर घेतल्यावर पुन्हा जांभयांना सुरुवात. आता हे आपल्या टाळक्याच्या बाहेर गेलंय. काय तरी इलाज करायला पाहिजे. 

बहुलकर शाळेत पोहोचले. त्यांचं डोकं थाऱ्यावर नव्हतं. भयंकर काय काय चाललेलं. आपल्या रक्तातच काहीतरी दोष असावा, असा त्यांना दाट संशय वाटत होता. नाही तरी बापाची हयात अशी सणक्यासारखीच गेली. आपण आपल्या टाळक्यातली सणक आवरत आवरत कसबशी घडी बसवली. नाहीतर आपणही त्याच वाटेला गेलो असतो. पाच नंबरचा भाऊ परागंदा झाला, त्याचा अद्याप पत्ता नाही. कुणाचंच काय सरळ नाही. फक्त ह्या डोक्यातल्या सणकीनं सगळ्याचं वाटोळ केलंय. आपण आपल्यातच कुढत बसण्यापेक्षा कुणाशी तरी बोलावं. म्हणून त्यांनी गणिताच्या पाटलांना बाहेर काढलं. ग्राऊंडच्या कोपऱ्यावर गेल्यावर म्हटलं, ‘पाटीलसर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.’ 

पाटील एकदम चक्रावले. म्हणजे बहुलकरांनी नवीन कायतरी उठाठेव सुरू केलेली दिसते. ते म्हणाले, ‘कशाच्या संदर्भात?’ बहुलकर म्हणाले, ‘थोडी घरगुती अडचण.’ नंतर ते थांबले. पुन्हा धीर करून म्हणाले, ‘सकाळी शाळेकडे निघालो आणि आमच्या दीपूचे शिक्षक भेटले.

नेहमीसारखी चौकशी केल्यावर म्हणाले, तुमच्या दीपूचा आता घरात अभ्यास घ्यायला सुरुवात केली का? म्हटलं, नाही. तर म्हणाले, गेले महिनाभर तो शाळेत नसतोच. आलाच तर एकदम गप्प गप्प. विचारले तर काहीच बोलत नाही. काहीतरी बिनसलंय त्याचं. एकदम हबकलोच. घरात तर व्यवस्थित असतो. पाचला उठतो. अभ्यासाला बसतो. संध्याकाळी नियमित अभ्यास करतो. मला तर बिल्कुल शंका नाही आली. त्याच्या शिक्षकांच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. पण ते तरी खोटं कशाला सांगतील? तसंच घरी परतावं म्हटलं. मन आवरलं. म्हटलं, संध्याकाळी बघू. पण डोक्यात नुसत्या मुंग्या झाल्यात. असं का करू लागला असेल हा आमचा दीपू. नेमकं काय बिनसलं असेल त्याचं? मला तर काहीच सुचायला तयार नाही.’ पाटील म्हणाले, ‘तुम्ही त्याला घरात काही बोलत नाही का?’ ‘अहो, घरात तर त्याच्यावर चौवीस तास वॉच असतो. आता तर माझ्या नजरेसमोरून बाजूला होऊ देत नाही त्याला. सतत अभ्यासात असतो. घरात त्याचं वागणं बदललेलं नाही.’ बहुलकर दम न घेता बोलत राहिले. त्यांना थांबवत पाटील म्हणाले, ‘त्याच्याबरोबर कोण कोण मुलं असतात? ती काय करतात? ह्याचा कधी शोध घेतला का?’ 
‘नाही हो. पण त्याचे शिक्षक म्हणत होते. ह्याचे सगळे मित्र नियमित शाळेत असतात. शिक्षकांनी त्यांना पण विचारलं. पण हा नसतोच कुणाबरोबर. एकटाच असतो म्हणे. 

‘मग बहुलकर, प्रकरण गंभीर आहे. पोराला अशीच सवय लागली, तर पोरगा हातातून जाईल. जरा काळजीपूर्वक हाताळा. फार लाडावून ठेवलेलं दिसतं तुम्ही पोरगं. पोराला धाक म्हणून असावा. जगाच्या पोरांची माप काढत असता; आणि घरातल्या  पोराला धाकात ठेवता येत नाही.’ पाटलांनी बहुलकरांची तासाताशी सुरू केली. बहुलकर एकदम रडकुंडीला आले. मग पाटलांनी धीर दिला. पण बहुलकरांचं चित्त थाऱ्यावर आलंच नाही.


शाळेतून घरात आल्याआल्या बहुलकरांनी दीपूची चौकशी केली. तो बाजार आणायला पेठेत गेलेला. ते दारातच थांबले. अंधार पडला तरी दीपूचा पत्ता नाही. त्यांची तगमग वाढली. बायकोला सांगून बाजारात जाण्यासाठी त्यांनी चप्पल चढवली. एवढ्यात दीपू येताना त्यांना दिसला. ते आत आले. खुर्चीवर टेकले. दीपूनं बाजारची पिशवी आईकडं दिली. बहुलकरांनी त्याला बोलवलं. दीपू समोर येऊन उभा राहिला. ते म्हणाले, ‘आज तुझे सगळे तास झाले?’ 

‘झाले की’ –
‘शाळेला गेला होतास?’ वडिलांच्या अचानक प्रश्नानं दीपू गोंधळला. काहीच बोलला नाही. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. तरीही उत्तर नाही. म्हटल्यावर बहुलकरांनी बायकोला बोलावून घेतलं. म्हणाले, ‘हा शाळेतून घराकडे कितीला येतो?’ शांता म्हणाली, ‘शाळा सुटल्यावर. काय झालं. 

‘विचारा तुमच्या चिरंजीवांना.' बहुलकरांचा आवाज एकदम वाढला. म्हणाले, ‘गेल्या महिनाभरात तो शाळेलाच गेलेला नाही.’ 
‘काय?’ त्यांच्या बायकोचा टाळाच मिटेना.
‘विचारा तुमच्या दिवट्याला.’ 
‘काय रे दीपू? हे म्हणतात ते खरं?’ दीपू पुन्हा गप्प. ‘अरे, बोल की. आम्ही काय विचारालोय.’ बहुलकरांचा आवाज पाकाड्यातून बाहेर पडला. दीपूवर काहीच परिणाम नाही. बहुलकर भडकून उठले. त्यांनी दीपूच्या मुस्काडात लगावली. त्यानं तोंड उघडलं नाही. ते मारतच राहिले. दीपू स्तब्ध, मग त्यांनी नेहमीची काठी ओढली. हात दुखेपर्यंत दीपूला बडवत राहिले. दीपूच्या तोंडातून शब्द नाही. ते एकदम चक्रावलेच. तो रडतही नाही आणि बोलतही नाही. आपल्या मारानं याला काहीच वेदना झाली नसेल? त्यांची बायकोही एकदम घाबरली. म्हणाली, ‘आरं बोलू नको. निदान रड तरी. दीपूनं नजरही हालवली नाही. बहुलकरांनी त्याच्या बकोट्याला धरलं. ओढत नेऊन बाथरूममध्ये उकललं, बाहेरून कडी लावली. बायकोला म्हणाले, ‘आजपासून याचं जेवण बंद. खरंखोटं ह्यानं सांगितल्याशिवाय कडी नाही काढायची. मस्तीला आलाय भडवा. चकार शब्दही बोलत नाही.’ त्यांचं डोकं गरगराय लागलं. मारून मारून ते थकले होते. त्यांचा चेहरा भयंकर केविलवाणा झाला होता. ते खुर्चीवर टेकले. तांब्याभर पाणी मागून घेतलं. दीपूरची आई म्हणाली, ‘काय झालं आसंल हो पोराला?’ ती एकदम घाबरीघुबरी झालेली. हातापायातलं आवसानंच संपलं होतं तिच्या. बहुलकर जागा सोडून उठले. त्यांनी चप्पल चढवली. 

‘कुठं चाललाय?’ दीपूची आई म्हणाली. 
‘ह्याच्या मास्तरांना, मित्रांना भेटून येतो. ते तरी काय सांगतात काय बघू.’ 

ती काहीच बोलली नाही. बहुलकर बाहेर पडल्यापडल्या ती बाथरूमजवळ आली. धाडसानं कडी काढली. दीपू भिंतीला टेकून बसलेला. दीपूच्या आईन दीपूला एकदम जवळ घेतलं. म्हणाली, ‘दीपू, ते म्हणतात ते खरंय?’ दीपूनं होकारार्थी मान हालवली. दीपूच्या आईच्या डोळ्यांचा बांध फुटला. त्या धाय मोकलून रडायला लागल्या. दीपूनं आईला समजावलंही नाही. तो तसाच बसून राहिला. 

बहुलकर रात्री उशिरा परतले. जेवणावर कुणाचंच लक्ष नव्हतं. आल्या आल्या त्यांनी दीपूला पुन्हा तीन-चार लाथा घातल्या. त्याच्या आईला म्हणाले, ‘मी गेल्यावर तुझ्याशी तरी बोलला का काही?’  तिनं ‘नाही’ म्हणताच म्हणाले, ‘कुणालाच यानं कशाचा पत्ता लागू दिलेला नाही. कसा थंड डोक्यानं बसलाय बघ. सगळी मेहनत पाण्यात घालवली.’ नंतर बोलून बोलून ते थकले. न जेवताच आडवे झाले. दीपूच्या आईनं जबरदस्तीनंच सगळ्यांना उठवलं. दोन-दोन घास सतक्तीनं जेवाय लावलं. तिला स्वतःला मात्र नरड्याखाली घासच उतरला नाही. तशीच पाणी पिऊन झोपली. दिवस उगवल्यावर त्यानं अंगावर कपडे घातले. कुणाचं लक्ष नाही असं बघून तो घरातून बाहेर पडला. आपण कुठं चाललोय, हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं...

बहुलकरांनी संगळ्या पाहुण्यांची घरं, दीपूच्या मित्रांची, त्यांच्या नातेवाईकांची घरं पालथी घातली. त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. शोधायचं असं एकही ठिकाण राहिलं नव्हतं. बहुलकर एकदम गळाठून गेलेले. दीपूच्या आईनं अंथरूण घातलेलं. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी नुसत्या चौकशीनं जीव हैराण करून टाकलेला. कोण म्हणायचं, पोलिसांत तक्रार करा. कोण म्हणायचं, देवऋषी बघा. कोण म्हणायचं, आसंल इथंच कुठंतरी. एक ना हजार. जो जे सांगेल ते करायला सुरुवात केली होती. पोलिसात, वर्तमानपत्रांत सगळीकडं दिलं होतं. पण ठावठिकाणा लागायचा पत्ता नव्हता. बहुलकरांनी तीन महिन्यांची रजाच टाकली होती. बोलणाऱ्यांची हजार तोंडं.  गल्लीत म्हणायचे, ‘पोरगं पळून जाईना तर काय करंल. भाडया ढोराला बडीवल्यागत पोराला बडवायचा. काय करंल पोरगं?’ तर कोण म्हणायचं, ‘सारका आब्यास, आब्यास. पोरगं कुटलं टीगल गाऽऽ? गेलं पळून.’ एक ना हजार. बहुलकरांनी घरातून बाहेर पडायचंच बंद केलं. सारखे कॉटवर पडून राहायचे.  

ते छताकडं बघत पडून होते. अशात दार वाजलं. बहुलकर अनिच्छेने उठले. दार उघडलं. दारात तुका. न बोलताच बहुलकर वळले. तुका आत येऊन टेकला. बहुलकर आडवे झाले. तुकानं खाकरू-खोकरून बघितलं. मग शेवटी आपणहून म्हणाला, ‘शांता कुठाय?’
‘झोपलीय.’

‘आगाss  तू आसा कित्ती दीस घरात बसणार? घरात बसून पोरग गावतंय? उठ. सांगतो त्ये ऐक.’ तुकानं दमदार आवाजात सुरुवात केली. म्हणाला, ‘उद्या कोल्हापूरला जाऊ, तिथल्या कुठल्या हाटेलात-बिटेलात आसंल. इत्तकी दिवस कुठे हातंय पोरगं. वसन्ता आनी थोरला कोकणात गेल्यात. त्या भागात बघून येवा जावा म्हटलंय. आपुन ह्या भागात बघू. गावंलच की कुठे ना कुठं. आता इतक्या दिवसांत काय दूम न्हाई म्हणजे जित्तं हाय घेतू पोरगं. उठ. तिला जेवाय वाढ. तू बी जेव. मालकीनीनं भाकरी बांधून दिल्यात, खाऊन घेवा.’ म्हणत हातातल गठलं पुढं सरकवलं. बहुलकरना एकदम गदगदून आलं. न बोलताच ते उठले. फरशीवरचं गठलं उचललं. आतल्या सोप्याला गेले. बायकोच्या उशाला बसले आणि त्यांच्या गळ्यातला आवंढा एकदम बाहेर आला....
 

Tags: राग प्रार्थना शाळा दीपू राया बहुलकर राजन गवस rag prarthana shala dipu raya bahulkar rajangawas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके