डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘सवाल’ ही एका मुसलमानी प्रथेवरची कथा आहे. पण ती प्रथा हा कथेचा मुख्य आधार असला तरी, त्यातली पात्रं, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातलं एक खेडं, त्याखेड्याची मनोवृत्ती यांचेही स्वतंत्र-स्वतंत्र, पण कथेत एकजीव झालेले आधार त्या कथेला आहेत. माणसं, माणसांचे स्वभाव, धर्म- त्याचं माणसांमधलं अस्तित्व, यांचा एक भन्नाट गोळामेळा या कथेत झाला आहे.

1980 च्या काळापासून मी बऱ्याच कथा मुस्लिम पात्रांच्या लिहिल्या. (पुढं मात्र त्या थांबल्या). पण या मुस्लिम कथा नव्हत्या. कथांना मुस्लिम, हिंदू असं काही म्हणता येत नाही. ‘कथा’ या फक्त कथाच असतात आणि त्यातली पात्रं ही माणसं असतात. पण माणसं कोणतीतरी एक जात, धर्म, संप्रदाय असं काहीतरी बाळगतातच. आणि त्या जाती धर्मांच्या काहीतरी प्रथाही असतात. तर तशा प्रथा-पद्धतींचे संदर्भ गुंफून मुसलमान पात्रांच्या काही कथा मी लिहिल्या. 80 चा एकूण काळच जाती, धर्म, प्रथा, रूढी यांच्यावरच्या साहित्याचाच काळ होता. तेव्हा अनेक लेखक तसंच काहीतरी ‘सामाजिक आशयाचं साहित्य’ म्हणवलं जाणारं लिहीत होते. सगळीकडं तशाच साहित्याची चर्चा असायची. तर त्या वातावरणाचा परिणाम होऊन मी ही निरनिराळ्या जाति-धर्म-प्रथांचं कथा, कादंबरी या माध्यमातलं काहीकाही लिहीत होतो. (त्याच काळात मी कोल्हाटी या जातीवरची कादंबरी लिहिली. पण पुनर्लेखना अभावी ती न छापता अजूनही तशीच पडून आहे.) तर या लाटेतच मी एका मुसलमानी प्रथेवरची एक कथा साधारण 82-83-84 च्या काळात आधी की, मग पक्की अशी लिहिली, तिचं नाव ‘सवाल’. ती 84 च्या मध्यावर ‘किर्लोस्कर’च्या ‘नवे कथाकार’ या विशेषांकात छापली गेली. ह.मो.मराठे हे तेव्हा त्या मासिकाचे संपादक होते. त्यांनी कथा वाचून कौतुकाचं पत्र पाठवलं होतं आणि कथे सोबत छापायला माझा परिचय आणि छायाचित्र मागवलं होतं. तेव्हा देण्यासारखा परिचय माझ्याकडे फारसा काही नव्हताच. साधा पोरगा होतो आणि कशातच काही नाही असा होतो. सर्वार्थानं मोकळा आणि आयुष्याला भिडायला सुरुवात केलेला. स्वत:ची ओळख अशी काही तयार झाली नव्हती आणि मुळात स्वत:लाच स्वत:ची ओळख तोवर लागायची होती. (ती अजूनही लागली आहे असं पक्कं सांगता येत नाही. पण चाळिशीनंतर मला वाटायला लागलं की, आपण लिहू शकू; कदाचित आपण लेखक होऊ शकू.)

तर तेव्हा मी एकदोन ओळींचा काही छाटछूट परिचय आणि तेवढंच छाटछूट छायाचित्र पाठवून दिलं. ते माझं छापून आलेलं पहिलं छायाचित्र. छपाई यंत्रणा तेव्हा आजच्याएवढी प्रगल्भ नव्हती, तरीही त्या पेरभर मापाच्या छायाचित्रात मी मीच आहे हे स्पष्ट ओळखू येत होतं आणि स्वत:ला असं छापलेलं पाहणं याचा एक उमंगी, पण काही क्षणच टिकलेला आनंद घेता आला. (नंतरच्या काळात छायाचित्र छापून येण्याचं काही कौतुक राहिलं नाही, उलट छापण्यासाठी छायाचित्र मागणारांचा वैतागच येऊ लागला. मराठी लेखक ही एक अशी जात आहे, जिला स्वत:ची छायाचित्रं स्वत:च्याच खर्चानं काढून ठेवून, समाजाला पुरवत राहण्याची पीडा सहनकरावी लागते. प्रसारमाध्यमं किंवा छायाचित्रं छापण्याचं ठिकाण असलेले कुणीही

लोक मराठी लेखकांकडं अतिशय निर्लज्जपणे ‘तुमचं एक छायाचित्र द्या’ अशी सरळ मागणी करतात. लेखकानं ते स्वत:च पुरवावं अशी अपेक्षा करतात. परवडत असो-नसो, लेखक ती छायाचित्रं आयुष्यभर पुरवत राहतात. गरीब लेखकांना प्रसिद्धीची संधी देणारे हेच लोक गबरगंड अशा नटनट्या, राजकारणी, क्रिकेटीयर्स, गुन्हेगार यांच्याकडं मात्र ‘छापायला तुमचं एक छायाचित्र द्या’ असं म्हणायची हिंमत करत नाहीत. तो उद्योग स्वत:च आणि आवडीनं करतात. यालाच मराठी लेखकांचं कमनशीब म्हणायचं. असो.)

‘सवाल’ ही कथा मी अत्यंत रसाळपणे आणि माणसांच्या जगण्याच्या अनेक बारकाव्यांनिशी लिहिलेली आहे असं मला वाटतं. फार रमून जाऊन ती कथा मी उभी केली आहे. स्वत:च स्वत:च्या लिहीत असलेल्या कथेत रमणं, ही गोष्ट काही काही कथांच्याच बाबतीत जमते. ‘पिवळट लुगडं, मळकट पिशवी’,‘अलमा’, ‘मन्नत’, ‘पुण्याचा पिरपिऱ्या पाऊस’ अशा काही कथा लिहिताना, मी त्यांच्यात मन, मेंदू, भान, चेतना यांनी जबरदस्त रमून गेलो होतो, हे मला आठवतं न्‌ त्या कथा आठवताना आजही मनाशी रमायला होतं. छानच वाटतं. ‘सवाल’ ही एक तशीच कथा. कथेत व्यक्त झालेले पात्रांचे, स्थळांचे तपशील मला आजही रम्म वाटतात.

‘सवाल’ ही एका मुसलमानी प्रथेवरची कथा आहे. पण ती प्रथाहा कथेचा मुख्य आधार असला तरी, त्यातली पात्रं, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातलं एक खेडं, त्या खेड्याची मनोवृत्ती यांचेही स्वतंत्र-स्वतंत्र, पण कथेत एकजीव झालेले आधार त्या कथेला आहेत. माणसं, माणसांचे स्वभाव, धर्म-त्याचं माणसांमधलं अस्तित्व, यांचा एक भन्नाट गोळामेळा याकथेत झाला आहे. लेखकाला स्वत:च्या काही काही कथा खासकरून आवडतात. प्रत्येक आवडीची कथा आवडण्यामागं वेगवेगळी कारणंही असतात. ‘सवाल’ मला आवडते, तिच्यात गोष्ट सांगणं या प्रकारातली कथात्मकता फार एकजीव होऊन जमून आलीय म्हणून. तिच्या निवेदनाची भाषा, पात्रांची भाषा, पात्रांची मनं, त्यांचे स्वभाव, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती, माणसांचे समूह, त्यांचे व्यवसाय, माणसांच्या व्यक्तिगत, सामूहिक समस्या आणि आनंद, माणसांतली करुणा आणि रगेल पणा, माणसांची घरं, माणसं राहण्याचा परिसर, त्यांचा दिनक्रम, कथेला आवश्यकवेळांची आणि खेड्याची वर्णनं असा सगळा गोत आणि पोत याकथेत गोष्ट सांगणं म्हणून फार रसाळपणे आणि प्रवाहीपणे जुळून,जमून आला आहे.

प्रथा अशी की, एक मुसलमान फकीर गावात येतो आणि बहुधा मुसलमानांसमोर किंवा शक्यतो हिंदू-मुसलमान अशा दोघांसमोर,किंवा एखाद्या व्यक्तीसमोर किंवा सगळ्या समूहासमोरसुद्धा आपला सवाल मांडतो, ठेवतो. किंवा याला सवाल लावणं असं म्हणतात. सवाल लावणं म्हणजे काय, तर त्या फकिराची जी गरज किंवा अडचण असेल, ती त्यानं लोकांसमोर मांडणं आणि ती त्यांनी सोडवावी यासाठी लोकांना धर्माच्या नावानं गळ घालणं. असा एखादा फकीर मुसलमानांच्या जमातसमोर सवाल मांडतो. (जमात म्हणजे एकत्र नमाज पढणारे, एका मशिदीतले लोक किंवा एखाद्या गावातला मुस्लिम समाज.) लोक त्याचा सवाल पुरा करतात. त्याची गरज भागवण्याला सवाल पुरा करणं म्हणतात. बऱ्याचदा फकिरांचे हे सवाल अवघड आणि लोकांना पूर्ण करायला कठीणही असतात.

मी लहान होतो तेव्हापासून फकिरांनी गावात येऊन सवाल लावण्याचे अनेक किस्से आणि कहाण्या मुसलमानांच्या तोंडून ऐकलेल्या होत्या. प्रत्यक्ष सवाल लावणारा फकीर मी आजवरच्याहयातीत फक्त एकदाच पाहिला. तोही वयाच्या सातव्या-आठव्यावर्षी. त्यानंतर मी कधीही तसा फकीर कुठंच पाहिला नाही आणि नंतरच्या आयुष्यात अशा फकिरांच्या किस्से-कहाण्याही ऐकल्या नाहीत. कदाचित सवाल लावणारे फकीर अजूनही मुस्लिम वस्त्यांमध्ये येत असतील आणि मुसलमानांमध्ये त्यांच्या किस्से-कहाण्याही चघळल्या जात असतील. माझा आता त्या गोष्टींशी फारसा संबंध राहिलेला नाही.

हे फकीर लोकांनी आपला सवाल पूर्ण करावा म्हणून बऱ्याचदा हटवादीपणा ही करतात. लोकांनी त्यांचा सवाल पूर्ण केला, तर ते शांतपणे निघून जातात. कधी कधी सवाल पूर्ण नाही झाला तरी शांतपणे माघार घेऊन निघून जातात. लोकही बऱ्याचदा देवाधर्माचं काम म्हणून फकिराचा सवाल पूर्ण करण्याची धडपड करतात. बऱ्याचदा हे फिरस्ते फकीर आपला एकच सवाल घेऊन गावोगाव फिरतात आणि दर गावात तुकड्यातुकड्यांनी आपला सवाल पूर्णकरून घेत जातात. आणि बऱ्याचदा हे सवाल पैशांशी संबंधितच असतात. फकीर त्याच्या कुठल्या तरी धार्मिक कृत्यासाठी पैशांची मागणी करतो आणि लोक शक्यतो एकट्यानं किंवा सामुदायिक मिळून ती मागणी पुरवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी मात्र लोक अशा फकिरांकडे लक्ष देत नाहीत. मुद्दाम दुर्लक्ष करतात किंवा बऱ्याचदा सवाल पूर्ण करणं त्यांना अवघड वाटतं. बऱ्याचदा अशक्य होऊन बसतं. त्यावर फकीर शांत निघून गेला तर बरं, पण बऱ्याचदा फकीर सवाल पुरा व्हावा म्हणून थटूनच बसतात आणि लोकांनी आपलं ऐकावं म्हणून निरनिराळ्या धमक्या देतात. देवाधर्माचं किंवा शाप देण्याचं भय घालतात. आणि तरीही आपलं ऐकलं जात नाही असं वाटलं तर काहीही अघोरी प्रकार करतात. त्यात बऱ्याचदा ते स्वत:ला काही शिक्षा करून घेतात. त्या शिक्षेचे प्रकार काहीही आणि अतक्र्य असू शकतात. एका पायावर अखंड उभं राहणं, दोन्ही पायांवर सतत उभं राहणं, सतत अन्न पाण्याशिवाय बसून राहणं, जिभेला दाभण लावणं, गळ्याला गळ लावणं, डोक्यावर उभं राहणं... असे काहीही ते प्रकार असतात. ते फकिराच्या मेंदूवर अवलंबून. पण लोकांना घाबरवणारे आणि स्वत:कडं लक्ष वेधून घेणारेच ते प्रकार असतात. एखादा फकीर त्यातला एखादाच प्रकार करतो, तर एखादा जास्तच हट्टाला पेटलेला फकीर एकाच वेळी अनेक प्रकारही करू शकतो.

मी मुसलमानांमध्ये वावरलोय. फकिरांनी आणि इतर कुणीही धर्माच्या माणसांमध्ये असा सवाल लावणं योग्य असतं की अयोग्य असतं, अशा चर्चा मी त्या लोकांमध्ये चाललेल्या अनेकवार ऐकलेल्या आहेत आणि सवाल लावणं योग्य की अयोग्ययावर मुसलमानांमध्ये एकमत होताना कधीच ऐकलेलं नाही. काही लोक म्हणतात योग्य. कारण फकीर ही देवाची माणसं असतात, देवाच्या वाटेवर चालत असतात, त्यांचे सवाल पूर्ण करणं हे मुसलमानांचं कर्तव्यच आहे. तर काही लोक म्हणतात, अयोग्य. कारण देवाच्या नावानं लोकांना कोंडीत पकडणं हे पाप आहे न्‌ फकीर लोक देवाधर्माच्या नावावर स्वत:च्या तुंबड्या भरून घेतात.

मुसलमानांची एक गोष्ट खास आहे. समाजातली एखादी बाब धर्ममान्य आहे की नाही, याचा निकाल लावायला (एका अक्षराचाही कधी बदल झाला नाही, असं म्हटलं जाणारं) ‘कुराण’ त्यांच्याकडं आहे. अर्थात कुराणात लिहिलेलं सगळ्यांनाच वाचता येतं असं नाही न्‌ ज्यांना वाचता येतं त्यांना कुराणातलं सगळंच कळतं असं नाही. पुन्हा कुराणातल्या एकाच मुद्‌द्याचे वेगवेगळे अर्थ काढून दाखवण्याचीही पद्धत आहेच. त्यात एकवाक्यता होईलच असं नाही.

फकिरांची ही जी सवाल लावण्याची प्रथा आहे त्याला काही धार्मिक आधार आहे का, म्हणून मी कुराण चाळलं. धार्मिक यथितार्थ सांगणारे काही ग्रंथही चाळले. पण मला तसा काही आधार सापडला नाही. काही ग्रंथांमध्ये मात्र असा सवाल लावणं ही अयोग्य गोष्ट आहे असं लिहिलेलं आढळलं. म्हणजे सवाल लावणंही केवळ लोकप्रथा आहे. ही लोकप्रथा कुठून आली, कधी आणि कशी सुरू झाली वगैरे गोष्टी शोधायचा मी प्रयत्न केला, पण माझ्याहाती काहीच लागलं नाही. अनेक मुसलमानांना मी या प्रथेच्या उगमाबद्दल विचारलं, पण कुणालाच काही सांगता आलं नाही. आज (हे लेखन करताना) मला वाटतं की, फकिरी वगैरे गोष्टी सुफींशी संबंधित आहेत आणि हटवादीपणे आपल्याला हव्यात्याच मार्गाने (अगदी इस्लामच्या बाहेर जाऊन सुद्धा- अगदी हिंदू देवांचीसुद्धा) भक्ती करणं न्‌ त्यातला खास हटवादीपणाचा गुणहीसुद्धा सुफींशी संबंधित गोष्ट आहे. तर फकिरांचं सवाल लावणं वगैरे सुफींकडून आलं असावं की काय?

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात सवाल लावणारा एकमेव फकीर पाहिला, तो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या माळेगाव बुद्रुक या खरोखरच बुद्रुक गावात. तेव्हा फकीर, त्यांचं सवाल लावणं वगैरे गोष्टी माझ्या आकलना बाहेरच्या होत्या. हे सवाल लावणारे फकीर बहुधा मुसलमान एकगठ्ठा सापडतात म्हणून मशिदीसमोर किंवा मुसलमान वस्तीत बसून सवाल लावतात. सर्वांना आपण दिसू अशी बसायची जागा निवडतात. माळेगावातला फकीर मात्र मशिदीसमोर बसला नव्हता, मशिदीच्या आसपास मुस्लिम वस्ती नव्हतीच फारशी न्‌ मुळात माळेगावात मुसलमानांची स्वतंत्र वस्तीच नव्हती. तर हा फकीर माळेगावातल्या पेठेसारख्या भर रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बसलेला होता न्‌ मोठमोठ्यानं काहीतरी ओरडत होता. त्याचा सवाल काय होता, की होता की नव्हता, मला आठवत नाही. पण रंगीबेरंगी कपडे, रंगीबेरंगी माळा, दाढी, रुमालात बांधलेल्या झिपऱ्या, मोरचेल आणि ऊद दान, त्यात ऊद टाकून धुमसत असलेला धूर, एकपोतडी असा तो माझ्या लहान वयाला गूढ वाटणारा बसला होता. करकरत्या संध्याकाळी अंधार-उजेडाच्या मध्यावर मी त्याला पाहिलं. त्यामुळं तो जास्तच गूढ झाला. भोवती गर्दी, लोकांची रहदारी. मी ही त्या गर्दीत. ऊददानात ऊद टाकून धूर करणं न्‌ मोरचेल हलवून धूर पांगवणं न्‌ तोंडानं दमदार मोठ्यानं बोलणं असं त्याचं चाललं होतं. चालत्या गर्दीतलं कुणीतरी म्हणालं, ‘त्यानं सवाल लावलाय’.

अचानक त्या फकिरानं आपल्या पोतडीत हात घातला आणि दहा का वीस पैशाचं नाणं काढून गर्दीतल्या माझ्यासमोर धरलं न्‌ दमदारपणेच म्हणाला, ‘ए बच्चा, जा दुकानमेसे भारत बिलेट लेके आ.’

आपण लहानपणी वयस्करांचं ऐकण्यासाठीच असतो. मीही ते पैसे घेऊन धावतपळत गेलो न्‌ दहा का वीस पैसे देऊन एका दुकानातून लालभडक कागदातलं एक भारत ब्लेड त्या फकिराला, आपण त्याचं काम केलं, ते कसं छान झालं, या श्रद्धेनं दिलं. त्याला ब्लेड कशाला हवंय, तो त्याचं काय करणार हे मला काहीच माहीत नव्हतं.

फकिरानं कागदातनं ब्लेड काढलं न्‌ ऊददानातल्या लालभडक इंगळावर तापायला ठेवलं. तो वर त्यानं आपला उजवा पाय पुढं पसरला आणि त्यावरची लुंगी मागं सरकावून आपली केसाळ, दांडगी मांडी भर लोकांसमोर उघडी केली. मग इंगळावरचं तापलेलं ब्लेड त्यानं खालच्या वाटीत निवायला ठेवलं. न्‌ तोंडानं ओरडत लोकांना कसलं तरी आवाहन करू लागला. त्याच वेळी दणादणा मांडीवर चापट्याही मारून घेत राहिला न्‌ अचानक त्यानं ते ब्लेड घेऊन अगदी हळुवारपणे आपल्या मांडीवर फिरवलं. मांडीला चीर पडली न्‌ तिच्यातून भळाभळा लालभडक रक्त बाहेर येऊन खालच्या मातीत सांडू लागलं. तोंडानं आवाहनी ओरडा चालूच.

मी दादरलो. मागं सरलो. नंतर खूप काळ मला (आपण त्याला ब्लेड आणून दिलं ते चुकलंच असं) अपराधी वाटत राहिलं. आपण ते ब्लेड आणून दिलं नसतं, तर तसलं भयानक काही घडलं नसतं असं वाटत राहिलं. ती संध्याकाळ आणि ते दृश्ययी अजून विसरलेलो नाही.

ते दृश्य आणि लोकांच्या तोंडून ऐकलेल्या सवाला संदर्भाच्या किस्से-कहाण्या यातून पुढं खूप वर्षांनी माझी ‘सवाल’ ही कथा उभी राहिली. त्या कथेतली पात्रं, प्रसंग, वर्णनं, स्थळं हे सगळं मी माझ्या मनानं उभं केलं. अनेक गावं, त्यांच्यातली घरं, शाळा, मशिदी अशा अनेक रचना, अनेक ठिकाणी पाहिलेली माणसं यांच्या काल्पनिक मिश्रणातून ती कथा रचली गेली. त्या फकिराचं मांडी कापणं सोडल्यास कथेतला फकीरही मी अनेक येतेजाते फकीर पाहून काल्पनिकच उभा केला. कथेतला सवाल लावण्याच्या प्रथेचा प्रकारही मी अनेक लोकांच्या तोंडून ऐकून त्यांच्या संमिश्रणातून काल्पनिक असा रचला. कथा पूर्णपणे काल्पनिकच आहे, पण ती सजीव उभी राहिली. तिचा प्रत्येक बारकावा खरा रचला गेला.

गावात दुष्काळ पडलेला. एक मराठी शाळा. त्यात शिकवणारा आतार मास्तर. शाळेमागं मशीद. त्या मशिदीसमोर येऊन एक फकीर सव्वाशे रुपयांचा सवाल लावतो. गावातल्या मुसलमानांनी सव्वाशे रुपये गोळा करून द्यावेत म्हणतो. गाव दुष्काळानं खंगलेलं. त्यात कुणाकडं फुटका दमडा नाही. तशात मशिदीचा मौलाना सांगतो, ‘हे फकीर भोंदू असतात. लोकांना धर्माच्या नावानं लाटतात. काही देऊ नका त्याला, एक पैसुद्धा.’ फकीर मुसलमानांना धमकावायला लागतो. एका बाजूला धर्ममार्तंड मौलाना न्‌ दुसऱ्या बाजूला धर्ममार्तंड फकीर, या दोघांच्या कोंडीत गावातले मुसलमान सापडतात. सगळे मुसलमान हातावर पोट असलेले. गरीब. दुष्काळामुळं तर जास्तच बेहाल आणि बेजार झालेले. आतार मास्तर एकटाच पगारदार. पण पगार अपुरा. त्याच्या घरात दोन बायका-पोरं. थोरलं पोरगं दमेकरी. ते पडून. पगार घरालाच पुरत नसलेला. तशात आतार मास्तर गावातल्या मुसलमान जमातचा एक प्रमुख. लोक म्हणतात, ‘तू पगारदार, तर तूच फकिराचा सवाल भागव.’ फकिराची न्‌ मौलानाची भांडणं. लोकांचा गोंधळलेपणा. फकिराच्या शापवाण्या न्‌ स्वत:ला शिक्षाकरून घेणं. शेवटी लोक चिडून, लोकांच्याच जिवावर जगणाऱ्या मौलानाला गावातून हुसकतात. आतार मास्तर धाकट्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र, मोजून सव्वाशे रुपयांना गहाण ठेवून फकिराचा सवाल पुरा करतो न्‌ त्याचवेळी त्याचा पोरगा दम्मानं हैराण होतो. इलाजाला पैसे नाहीत... अशी ती अनेक छोट्यामोठ्या गोष्टी ठासून भरलेली लंबीचौडी कथा.

खूप लोकांना ती कथा आवडली. पुढं माझ्या अनेक कथा-कादंबऱ्यांवर चित्रपट, नाटक, एकांकिका करण्याच्या परवानग्या अनेक लोकांनी मागितल्या. पण ‘सवाल’ ही पडद्यासाठी मागितली गेलेली माझी पहिली कथा. या कथेवर दूरचित्रवाणीसाठी एक तासाचा चित्रपट करू अशी मागणी झाली. अमोल पालेकर, सई परांजपे यांचा साहाय्यक म्हणून मी काम केलंय असं सांगणारा भोळे का गोळे नावाचा तरुण मला, मी एका मासिकाचं संपादन करामचो, तिथं शोधत आला न्‌ चित्रपट करतो म्हणाला. वर मला प्रत्यक्ष पाहून यातल्या आतार मास्तरची भूमिका तुम्हीच करायला हवी म्हणाला, पुढं काहीच घडलं नाही. (त्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी माझ्या भलत्याच कथेवर भलताच चित्रपट आला. वीस वर्षे अनेक कथा-कादंबऱ्यांवरच्या चित्रपटीय आणि नाटकीय अशा नुसत्याच गप्पा. त्यांच्याही काही अडचणी असतील.)

‘किर्लोस्कर’ मधल्या ‘सवाल’ कथेवर काही प्रतिक्रिया आल्या. त्यात एक होती प्रा.मुमताज रहिमतपुरे यांची. त्या मुस्लिम चळवळीतल्या आहेत, एवढंच मला ऐकून-वाचून ज्ञात होतं. ‘राजन खान यांनी खूप लिहायला हवं,’  असं त्या चार ओळींच्या प्रतिक्रियेत म्हटलेलं होतं. प्रतिक्रिये खाली ‘माढा, जि.सोलापूर’ असा अल्प पत्ता होता.

एकदा मी खूप अपुऱ्या पैशात एका मुसलमान मित्राच्या बायकोला तिच्या माहेरी सोलापूरला सोडायला गेलो. तिला तिच्याघरी सोडलं, रात्रभरचा प्रवास करून, तेव्हा सकाळी माझ्या खिशात फक्त तीन रुपये उरलेले न्‌ स्वत:च्या गावी परतायला पैसे नाहीत. मित्राच्या सासरच्या घरी पैसे कसे मागणार? त्यात मित्राची शान जाईल, म्हणून मी मुकाट तिथून निघालो. पायी भटकत राहिलो सोलापुरात. साहित्याशी संबंधित काही लोक आपलं नाव सांगितलं तर आपल्याला ओळखतील न्‌ जायला पैसे देतील असं वाटून मी किल्ल्याजवळ अचानक दिसलेल्या सार्वजनिक वाचनालयात शिरलो. तिथल्या ग्रंथपालांशी ओळख लावून गप्पामारत बसलो. किर्लोस्कर, त्यातली माझी ‘सवाल’ कथा अशा प्रतिष्ठेच्या गप्पा झाल्या न्‌ मी पैसे मागायला संकोचलो. सोलापुरातली दोन नावं आठवत होती, वाचलेली, श्रीराम पुजारी आणि शरणकुमार लिंबाळे. मग त्या दोघांचे पत्ते शोधत हिंडलो. पुजारींचा पत्ता सापडला नाही न्‌ लिंबाळेंचा पत्ता सापडूनही ते सापडले नाहीत. निराश भटकत राहिलो न्‌ आपोआपच रेल्वेस्थानकावर आलो. एक रेल्वे लागली होती. ती माढ्यावरून जेऊर, दौंड मार्गे जाते असं कळालं. दौंडला एक मित्र होता, पण खिशात दौंडच्या तिकिटाचे पैसे नव्हते. विनातिकिट जायला अनैतिकता अंगात नव्हती. तेवढ्यात एका पाटीवर ‘माढा-तिकिट तीन रुपये’ असं दिसलं. मला एकदम आठवलं, प्रा.मुमताज रहिमतपुरे हे नाव. माढा छोटं गाव असणार, तिथं एकच महाविद्यालय असणार, त्यामुळं प्रा.रहिमतपुरे सहज भेटतील असं वाटलं न्‌ खिशातल्या अंतिम तीन रुपयांचं तिकिट काढून मी रेल्वेत बसलो. त्या आपल्याला ओळखतील का, आपलं नाव त्यांच्या लक्षात असेल का, आणि अजून त्या त्याच गावात राहत असतील का, त्या तिथं नसल्या तर माढ्याच्या पुढं कसं जायचं, तिथंच अडकून पडलो तर काय करायचं, असे बिकट प्रश्न मनात घेऊन मी माढ्यात उतरलो. आधी महाविद्यालय शोधून काढलं. ते बंद. सुट्टी असावी. दाराशी एक माणूस दिसला. त्याला रहिमतपुरे-बार्इंचं नाव सांगितलं. त्यानं त्यांच्या घरी कसं जायचं ते सांगितलं, पण त्या सुट्टीमुळं कोल्हापूरला गेल्या असतील असंही सांगितलं. माझं मन बसलं.

प्रवासातलं जागरण, पोटात अन्न नाही, आंघोळ नाही, झिपऱ्या वाढलेल्या असा मी. रहिमतपुरे बार्इंचं घर शोधलं. त्या घरी होत्या. मी दिलासलो. थेट घरातच शिरलो. थकून बसकण मारली. फार अधिकारानं पाणी सांगितलं. त्या जरा बिचकलेल्या. पाणी पोटात गेल्यावर मी सांगितलं, ‘मी राजन खान’... त्यांच्या तोंडावर सुटकेचा न्‌ आपुलकीचा आनंद. मग खूप गप्पा. मग मी पैशांची सगळी कथा सांगितली. मला परत जायला तीस रुपये हवेत म्हणालो. त्यांनी फार मायेनं जास्त देऊ केले. मी ‘नको’ म्हणालो. पैसे मिळाल्यानं मनाला आधार न्‌ पोटाला भरतं आलेलं. मनाचं अनाथपण सनाथपणात बदललेलं. त्यामुळं त्यांनी देऊ केलेलं ‘खाणं नको, पण चहा द्या’ असं म्हणालो न्‌ तेवढाच घेऊन पुन्हा मोजक्याच पैशांत स्वत:च्या घरी आलो. (त्यानंतर दोनदा ते तीस रुपये त्यांना देण्याचा प्रयत्न केला. पण ‘असू दे रे, धाकटा भाऊचंस माझा तू.’ असं म्हणून त्यांनी पैसे परत घेतले नाहीत .

मुमताजतार्इंचं ते ऋण आयुष्यावर कायमचं राहिलं.) पण ‘सवाल’ कथेच्या एका अल्प पुण्याईवर मला एक थोर बहीण लाभली न्‌ एकदा हुकलेला मी, माझा घरी परत येण्याचा सवालही त्या कथेमुळंच सुटला. पुढं ही कथा माझ्या ‘हिलाल’ (मॅजेस्टिक प्रकाशन) या पुस्तकात समाविष्ट झाली.

Tags: muslim katha मुस्लिम कथा Marathi lekhak मराठी लेखक muslim pratha मुस्लिम प्रथा fakiracha saval फकिराचा सवाल fakir फकीर bhondu fakir भोंदू फकीर saval katha सवाल कथा katha कथा rajan khan राजन खान hilal हिलाल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन खान

लेखक, कादंबरीकार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके