डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जुन्या पिढ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नव्या पिढ्यांच्या निसर्गदत्त अशा या प्रवृत्तीमुळेच आदिम काळापासून आजपर्यंत माणसाचं जगणं विकसन पावत गेलं. त्यात नव्या नव्या सुधारणांचा दर पिढीगणिक प्रादुर्भाव होत गेला, माणूस व समाज बदलत गेला, हे निश्चित. तरीही या पिढ्या एकमेकांच्या अस्तित्वाचा आधार असतात. त्यातला एक आधार निखळला तर नवी पिढी, मधली पिढी आणि जुनी पिढी या तिन्हीच्या तिन्ही पिढ्या अस्तित्वहीन होऊ शकतात. समाजरचना कोसळून भुईसपाट होऊ शकते, त्यामुळे तिन्ही पिढ्यांनाही एकमेकांना जपून राहण्याशिवाय, सांभाळून आणि समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.

पिढ्यांचं अंतर हे वयावर गृहीत धरलं जातं. पंधरा ते पंचवीस वर्षांचे अंतर म्हणजे दुसरी पिढी. माणसाच्या सरासरी वयोमानानुसार समाजात एकाच वेळी तीन पिढ्या नांदत असतात. एक जुनी पिढी, दुसरी मधली पिढी, तिसरी नवी पिढी. सध्या मी मधल्या पिढीत आहे आणि पिढ्यांमधलं अंतर म्हणजे नेमकं काय ते कळण्याच्या नेमक्या टप्प्यावर आहे. नव्या पिढीत असताना पिढ्यांमधलं अंतर या विषयाची जाण बहुधा त्या पिढीतल्या माणसाला नसते आणि असली तरी त्याचा गंभीरपणे विचार करावा अथवा पर्वा करावी असं त्या पिढीच्या वयाला वाटत नाही. ‘अंतरा’चा विचार करायला खरं तर पक्वच व्हावं लागतं आणि आपल्या मागं दुसरी पिढी उदित व्हावी लागते, तसं माझं आता झालेलं आहे. पण एक होतं, मी नव्या पिढीत असतानाही बरंच वाचायचो. लोकांचं ऐकायचो. त्यात पिढ्यांच्या अंतराचा विषय कधी कधी काना-डोळ्यांवरून जायचा, डोक्यात नीट शिरायचा नाही, पण तो विषय मला तेव्हा ज्ञात होता, हे खरं आणि आता त्याची नेमकी समज येत चाललीय हेही खरं. 

पिढ्यांच्या अंतराबद्दल खूप लिहिलं जातं, लिहिलं जाईल. पण त्या विषयातला एक अगदी बारकुटा पण फार मूलभूत मुद्दा मला छेडावासा वाटतो. तो म्हणजे जुन्या पिढीनं नव्या पिढीबद्दल कुरकूर करण्याचा! जुन्या पिढीचं हे जे कुरकुरणं अपरिहार्य असतं; आणि ‘फार कुरकुरते बुवा जुनी पिढी’, असं जे सतत बोललं-लिहिलं जातं, ते कुरकुरणं म्हणजे काय, ते एकदा खळबळून काढलं पाहिजे असं वाटतं. नव्या पिढीत असताना जुन्या पिढीचं कुरकुरणं मीही साक्षात ऐकलेलं आहेच, पण तेव्हा ते निरर्थक वाटण्याचा, त्याच्या खोल न जाण्याचा किंवा तशी फुरसत नसण्याचा काळ होता. आता मात्र कुरकुरीचा अर्थ शोधण्याइतकं पिकलेपण आयतंच आलेलं आहे तर (आणि कुरकूर करण्याचा गुणधर्म माझ्यातही येत चालल्याचं जाणवू लागलेलं आहे तर) त्याची स्वतःसाठी तरी नीट तपासणी होणं आवश्यक वाटतं. जुन्या पिढ्यांनी नव्या पिढ्यांना शहाणपणा शिकवणं हा जसा जुन्या पिढ्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे, तसाच नव्या पिढ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणं, काणाडोळा करणं, सांगितलेलं कानामागं टाकणं, किंवा सांगितलं गेलेल्यातलं आपल्याला पूरक तेवढंच घेऊन बाकीचं फेकून देणं, हा नव्या पिढ्यांचाही नैसर्गिक गुणधर्म आहे असं म्हणावं लागेल. तो गुणधर्म अनाठायी किंवा अनुपयुक्त आहे असं अजिबात नाही.

नव्या पिढ्यांच्या जुन्या पिढ्यांकडं दुर्लक्ष करण्याच्या निसर्गदत्त अशा या प्रवृत्तीमुळंच आदिम काळापासून आजपर्यंत माणसाचं, समाजाचं जगणं विकसन पावत गेलं, त्यात नव्या नव्या सुधारणांचा दर पिढीगणिक प्रादुर्भाव होत गेला, माणूस व समाज बदलत गेला, हे निश्चित. नाही तर तुम्हीच बघा, कुठल्यातरी एका जुन्या पिढीचं सांगणं, शिकवणं पुढच्या नव्या पिढ्यांनी लक्षात ठेवलं असतं, केवळ तेवढ्या सांगण्यावरच नव्या पिढ्या अढळ राहिल्या असत्या किंवा अंमल करत राहिल्या असत्या तर आज आपण कुठे असतो? काय असतो? तसं झालं असतं तर आज आपण, आपला समाज कुठल्यातरी एकाच जुन्या काळावर' अडकून पडलेला दिसलो असतो. अजूनही आपण ‘मागास’च असतो. आपल्या एखाद्या आदिम पिढीच्या आदिम शिकवणीचा वस्तुपाठ आपण जसाच्या तसा गिरवत राहिलो असतो, तर आज आपण आदिमच असतो. कुठल्यातरी एकाच काळाच्या टप्प्यावर ओठंगून गेलेले दिसलो असतो.

थोडक्यात. जुन्या पिढीनं सांगत राहणं आणि आपले नीट ऐकलं जात नाही म्हणून कुरकुरत राहणं याची जशी निसर्गदत्त परंपरा आहे, तशीच नव्या पिढीनं त्याकडं दुर्लक्ष करण्याचीही परंपरा निसर्गदत्त आहे आणि तिच्यामुळंच जगाचा दिवसेंदिवस विकसित होण्याचा प्रवास अबाधित चालू आहे. (पण विकास म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगल्या घडतात, असा मात्र इथं दावा नाही. विकास म्हणजे नवं घडणं. ते साधकही असू शकेल, बाधकही असू शकेल. नाही का?) असं असलं तरी जुन्या पिढीनं सांगत राहणं आणि ते ऐकलं जात नाही अशी कुरकूर करत राहणं, ही गोष्ट वाईट असते, असं इथं अजिबात म्हणायचं नाही. त्या कुरकुरण्याच्या अखंड परंपरेलाही आपली एक अर्थपूर्णता आहे, उपयुक्तता आहे, हेच इयं सांगायचं आहे. किंबहुना नवी पिढी जगात जो विकास किंवा सुधारणा करते, तो करण्याची त्यांची मूळ किंवा पायाभूत प्रेरणा ही कुरकूरच असते. प्रत्येक नव्या पिढीला नैसर्गिकपणे नव्या गोष्टीचं आकर्षण असतं. आपल्या नव्या काळाच्या संदर्भात आपण नवं काहीतरी केलं पाहिजे अशी त्या पिढीला ऊर्मी असते. पण त्या वेळी नव-जुनं कळण्याची त्यांना योग्य समज नसते. अशा वेळी जुनी पिढी जी कुरकूर करते, त्या कुरकुरीतून ती आपला काळ आपल्या काळाचे संदर्भ व्यक्त करत राहते. 

‘आम्ही अमुक अमुक पद्धतीचं जगायचो’, असं सांगून ती पिढी मानवी जगण्याचा भूतकाळ नव्या पिढीसमोर कुरकुरीतून मांडत राहते. साहजिकच नव्याची आस असणाऱ्या नव्या पिढीला ‘जुनं’ काय ते कळून येतं आणि नवं वागण्याच्या नावाखाली ती पिढी ते जुनं स्वतःतून, स्वतःच्या जगण्यातून वगळायचा प्रयत्न करते. जुनं काय होतं, याचं ज्ञान नव्या पिढीला त्या कुरकुरीमधून घडतं आणि आपसूकच ते जुनं टाकून त्यांची नवं शोधण्याची धडपड सुरू होते. या धडपडीतूनच विकासाच्या, सुधारणेच्या किंवा काळ पुढं नेण्याच्या नवनव्या गोष्टी जन्माला येतात. म्हणजे खरं तर जुनी पिढी आपल्या काळाप्रमाणे आणि मनाप्रमाणे काही घडत नाही म्हणून तक्रार करत असते. पण त्या तक्रारीचा उलटाच परिणाम नव्या पिढीवर होतो. 

आपण काय वागू नये किंवा वागावं ते नवी पिढी जुन्या पिढीच्या कुरकुरीतूनच ठरते. निश्चित करते. बहुधा ती जुन्यांच्या सांगण्याच्या विरोधातच काहीतरी वागते खरी, पण त्यातूनच नवनव्या गोष्टी जन्माला येण्याची प्रक्रियाही आपोआप घडते, ही गोष्ट महत्त्वाचीच आहे.  जुन्या पिढीला ही जी निसर्गाकडून कुरकूर करण्याची देणगी मिळालेली असते, ती मानवी जगण्याच्या भूतकाळाचे संदर्भ जितेजागते ठेवायला आणि मानवी पिढ्यांचा इतिहास पिढी-दर-पिढी संक्रमित होत राहायला उपयोगी ठरते.

त्यातून इतिहासातल्या कोणत्या गोष्टींची पुनरुक्ती होऊ देऊ नये किंवा होऊ द्यावी, याचेही धडे नव्या पिढीला मिळू शकतात. कोणतीही नवी पिढी ही आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जगण्यावागण्यात एक पाऊल पुढे असते किंवा जास्त उद्रेकी असत्ते. आपण नव्या पिढीत असताना आपल्यातला उद्रेकीपणा आपल्या स्वतःला जाणवत नाही, त्या वेळी जुनी पिढी त्या उद्रेकीपणाला नावं ठेवते, कोसते तेही आपल्याला आवडत नाही. पण जेव्हा आपण मधल्या पिढीत येतो आणि आपल्या मागून एक नवी पिढी डोके वर काढून स्वतःचा उद्रेकीपणा दाखवू लागते, तेव्हा नैसर्गिकपणे आपल्याला ते पटत, आवडत नाही आणि त्याच वेळी मग आपल्या आधीची पिढी ही आपल्यावर एके काळी का रागवायची, कोसायची याचा साक्षात्कार होऊ लागतो. मधल्या पिढीतल्या माणसानं नव्या पिढीत असताना, जुन्या पिढीतल्या लोकांना ज्या तिखट धारेनं विरोध केलेला असतो त्या धारेतला तिखटपणा मधल्या पिढीत आल्यावर बऱ्यापैकी कमी होतो. ती धार बऱ्यापैकी बोथट होते आणि बाकी काहीच नाही तरी, मधल्या पिढीला आपल्या आधीच्या पिढीबद्दल किमान सहानुभूती तरी वाटू लागते. प्रत्येक जुन्या पिढीकडून नव्या पिढीच्याच बाबतीत कुरकूर घडते असं नाही, तर नवी पिढीही जुन्या पिढ्यांबद्दल आपल्या कुवतीनुसार कुरकुरतच असते. जुन्या पिढीला नव्या पिढीचं नवं वागणं पसंत नसतं, तर नव्या पिढीला जुन्या पिढीचं जुनं वागणं पसंत नसतं. मग कुरकुरीला वाव सापडतो. फक्त घडतं एवढंच की, नवी पिढी फारशी कुरकुरत बसलेली दिसत नाही. ती त्यापेक्षा इतर उद्योगांतच जास्त मग्न दिसते. याचं कारण असं की, तेव्हा ती नव्यानं ‘जगणं शिकत’ असते. तिला सगळंच नवं नवं असतं आणि तिच्या अजाणपणाला आयुष्याच्या आणखी आणखी मितींची उत्सुकता असते. तिला नवं नवं वाटणारं जाणून घेण्याची ऊर्मी असते. त्या नवलाईत ती रमलेली असते. त्यामुळे कुरकुरत बसण्यासाठी तिच्याकडं फारसा वेळ नसतो. तो मधल्या आणि जुन्या पिढीकडे मात्र असतो. कारण त्यांचं ‘जगणं-शिकणं’ बहुधा झालेले असतं. जुन्या पिढीचं तर जगण्याचं शिक्षण पूर्णच झालेलं असतं. नवं शिकायचं फारसं काही राहिलेलं नसतं.

जगण्यातल्या सर्व मूलभूत गोष्टी तोवर ‘शिळ्या’ झालेल्या असतात. नवं काही जाणून घेण्यासारखं, त्यासाठी उत्सुकता वाटण्यासारखं काही उरलेलं नसतं. जगण्याबद्दलचा ‘इमानीपणा’ आलेला असतो. मधली पिढी तोवरही आयुष्याशी थोडीफार झुंजतच असते, पण नव्या गोष्टी जाणून घेण्यात तिचा पूर्वी जो वेळ जायचा, तो आता बरंचसं ‘कळल्यामुळे’ शिल्लक राहू  लागलेला असतो. म्हणजे जगणं शिकण्यातनं थोडी सवड मिळू लागलेली असते. जुन्या पिढीकडं तर जगणं पूर्णच कळल्यामुळं सवडच सवड निर्माण झालेली असते. मग या सवडीच्या वेळात करायचं काय? तर कळालेलं इतरांना सांगण्याच्या मूलभूत गुणधर्मानुसार इतरांना ‘जगणं शिकवणं!’ सवडीचा सदुपयोग. म्हणजे तिन्ही पिढ्या आयुष्याच्या मूलभूत गरजा भागण्या भागवण्यासाठी झगडत-झोंबत असतात, पण स्याचबरोबर आपल्या बरोबरच्या हयात पिढ्यांवर टीका करताना आधीच्या दोन्ही पिढ्यांना जगून झालेल्या आयुष्यातल्या अनुभवांचे दाखले द्यायची सोय असते. पण नव्या पिढीची त्या बाबत गोची होते. आयुष्यावर बोलण्याइतपत संचित त्यांच्याकडं जमा झालेलं नसतं. त्यामुळे त्यांची टीका मुद्यांच्या बाबतीत अपुरी ठरते. दुबळी पडते. त्यामुळे तिची चिडचिडही होते आणि बचावासाठी ती मग ‘जुन्या पिढ्यांना आमच जगणंच कळत नाही’, असा बेधडक आरोप करते. 

तिन्ही पिढ्यांच्या या आरोप-प्रत्यारोपात किंवा टीकेत खरं तर विस्मय आणि असूया दडलेली असते. सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धतीनं या मुद्याचं विश्लेषण केलं तर तो अधिक नीट लक्षात येईल. प्रत्येक व्यक्तीला नेहमी दुसरी व्यक्ती ही आपल्यापेक्षा वेगळं जगते, असा गंड असतो. यातच दुसरी व्यक्ती ही आपल्यापेक्षा जास्त सुखात जगते आणि आपल्याला मात्र दुःखात जगावं लागतं असाही एक छुपा गंड असतो. हा गंड म्हणजे मानसिक दुखणंच असतं आणि ते प्रत्येक व्यक्तीत कमीजास्त प्रमाणात हमखास असतंच. त्यामुळे कोणतीही एक व्यक्ती कोणत्याही दुस-या व्यक्तीच्या जगण्याकडे विस्मयानं आणि असूयेनंच बघते. जे ती दुसरी व्यक्ती सुखाचं जगतेय, तसं आपल्याला जगता येत नाही, असा तो विस्मय आणि असूयेचा मामला असतो. हाच नियम तिन्ही पिढ्यांनाही लागू होतो. मानवी जगण्याचा हा अपरिहार्य असा राजकीय भाग असतो. तो प्रत्येक व्यक्तीत असतोच आणि पर्यायानं प्रत्येक पिढीतही असतो. कोणत्याही दोन व्यक्ती किंवा कोणत्याही दोन पिढ्या, यांत जे ‘अंतर’ असतं ते हे असं राजकीय अंतर असतं. व्यक्तीच्या आणि व्यक्तिसमूहांच्या आपापसांतल्या अंतराला त्यांचे राजकारणीपणच कारणीभूत असतं. (राजकारण म्हणजेच असूया, अशी एक साधी व्याख्या इथं करता येते. ) खरं तर माणसाच्या समूहानं जगण्यात किंवा समाजरचनेच्या निर्मितीत दोन व्यक्ती आणि दोन पिढ्या यांच्यात कोणतंही राजकारण नसावं, हे गृहीत आहे. 

आपल्यातलं राजकीय अंतर सोडून सगळा समाजसमूह एकवटावा अशी समाजरचनेच्या निर्मितीमागची मूळ भूमिका आहे. पण प्रत्येक माणसात आजच्या काळातही आपापल्या जगण्याचे ‘स्वार्थ’ आणि ‘सुखाचे आत्मकेंद्री हेतु’ अस्तित्वात आहेत. ते मरत नाहीत. माणसाच्या मूलभूत भुका त्यांना मरू देत नाहीत. आपली भूक ही आपलीच असते; ती आपली आपणच भागवावी लागते आणि भूक भागवल्याशिवाय तर जगता येत नाही, अशा नैसर्गिक सत्याचा त्या 'स्वार्थाला' आणि सुखाच्या आत्मकेंद्री हेतू ला पाया असतो. हा पाया नष्ट होण्याची-करण्याची काहीच सोय नाही. तो कधी नष्ट होणारही नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाचं जगणं हे कोणत्याही काळात अंतिमतः ‘स्वार्थी’ आणि ‘आत्मकेंद्री’च राहणार. त्याला पर्याय नाही. आणि हेच सत्य पिढ्यांनाही लागू आहे. समाजरचनेनं माणसाला ही राजकीयता प्रदान केली आहे. खरं तर माणसाचं मूळ किंवा आदिम जगणं हे एकमेकांचं हिसकावून घेणं आणि फक्त स्वत:च्याच भुका प्राथमिकतेनं भागवणं असं आहे. आदिम माणूस त्या बाबतीत तडजोडवादी नव्हता. पण माणसाच्या सुख-संरक्षणासाठी, संवर्धनासाठी समाजरचना तयार झाली आणि समाजरचनेनं माणसाला स्वतःच्या भुकेबरोबर इतरांच्या भुकेचाही विचार करायची शिकवण दिली. सुख आणि संरक्षणाची हमी अथवा आमिष असल्यानं माणसानं (पुन्हा स्वार्थीपणेच) ती शिकवण मान्य केली. तिथं आचरण करण्याचा प्रयत्न केला. भुकेशी काही तडजोडी करायलाही तो शिकला. भूक काही वेळ सहन करायला शिकला. पण भूक ही कायमची मिटणारी, मरणारी गोष्ट नाही.

भूक काही वेळ पुढं ढकलता येऊ शकते. कायमची संपवता येत नाही. त्यामुळे जेव्हा भूक कडाक्याला पोचते, असह्य होते तेव्हा सगळ्या तडजोडी थिट्या पडतात आणि माणूस मूळ स्वार्थाकडं नैसर्गिकपणे वळतो. पण त्याच वेळी त्याच्यावर समाजरचनेचे आणि भविष्यातल्या सुरक्षिततेचं दडपण असतं. त्यामुळे तो होता होईतो भूक भागविण्याचे गोडीगुलाबीचे मार्ग शोधतो. ही गोडीगुलाबी म्हणजेच त्याचं राजकारण. (जेव्हा हे राजकारणही साधत नाही, तेव्हा तो आपल्या मूळ आदिम स्वभावानुसार हिंसक आणि हिसकावणारा होतो. भुकेपायी शांतपणे जीव सोडायला तो तयार होत नाही. तेवढी उदारता त्याच्यात येणं कधीही शक्य नाही व नैसर्गिकही नाही.) त्यामुळे हे राजकारणही कायम चालत राहणार. ते जोवर आहे तोवर कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांशी पूर्ण संम्मीलित होऊन, मिसळून, केवळ प्रेम आणि प्रेम स्वार्थभावनेनं जगू शकणार नाहीत. एकमेकांबद्दल कितीही आपुलकी असली तरी कोणत्याही दोन संबंधांत ती स्वार्थकेंद्री राजकीय फट कायम अस्तित्वात राहणारच.

हेच गणित कोणत्याही दोन पिढ्यांच्या संदर्भात आहेच. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये बाकी कोणत्याही प्रकारची ‘अंतरं’ असली तर ती एक वेळ मिटवता येऊ शकतील, पण त्यांच्यातलं ‘राजकीय अंतर’ कोणत्याही काळात कशानंही मिटवता येणार नाही. पण ते मिटवता येणारच नाही म्हणून समाजरचनेची शिकवणी घेतलेल्या मानवी पिढ्या एकमेकांचं साहचर्याचं आयुष्य सहजासहजी त्यागतील असंही नाही. पिढ्यांनाही गोडीगुलाबीनं एकत्र राहण्याचे फायदे कळतच असतात. त्या फायद्यासाठी समाजरचनेनं नात्यांची, संबंधांची जी साखळी गुंफलेली असते, तिचं महत्त्वही कळत असतं. एकमेकांवर अवलंबित्वाचे मोल सगळेच जाणत असतात. त्यामुळे पिढ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची ‘अंतरं’ राहिली तरी एकमेकांना एकमेक कितीही नकोसे झाले तरी, कुणी साहचर्याचं, एकत्र आयुष्य जगायचं सोडणं शक्य नाही. इथं एक उदाहरण घेता येईल स्त्री-पुरुष संबंधांचं. या स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी उघडपणे बोलण्यावर किंवा मैत्री करण्यावर तिन्ही पिढ्यांचे अनुभव वेगवेगळे असतात. पहिली पिढी या अनुभवाच्या बाबतीत स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी उघड्यावर बोललं तरी पाप समजलं जाण्याच्या काळातली होती. मधली पिढी त्या बाबत थोडी मोकळी, तर थोड़ी बंधनात होती. तर तिसरी पिढी त्या बाबतीत मुक्त आहे. तिसऱ्या पिढीच्या स्त्री-पुरुषांत साधं बोलणंच काय, पण थेट मैत्रीसुद्धा होऊ शकते. पण तिच्यातल्या मुक्त संबंधांवर मात्र अजूनही काही बंधनं आहेत. या परिस्थितीत पहिली पिढी इतर दोन पिढ्यांकडे विस्मयानं पाहते. दुसरी तिसरीकडं विस्मयानं पाहते. पहिल्या दोन्ही पिढ्या तिसऱ्या पिढीला आपल्यापेक्षा अधिक भाग्यवान समजतात. आपल्या वेळी एवढा ‘मुक्तपणा’ नव्हता याचं त्यांना वाईट वाटतं, तर तिसरी पिढी मैत्रीचा खुलेपणा असूनही त्यापुढची मजल मारायची परवानगी नाही म्हणून हळहळत असते. आणि मोठ्या पिढ्या हवं तेव्हा ती मजल मारू शकतात. संबंधांचा शारीर आनंद सहज घेऊ शकतात. त्या बाबतीत आपल्याला अजून योग्य तेवढं ‘मोठं’ समजलं जात नाही याचं तिस-या पिढीला वाईट वाटतं. आदल्या दोन्ही पित्यांना असलेल्या शरीरसुखाच्या परवानगीचा तिला विस्मय वाटतो. आणि तिन्ही पिढ्या, दुस-या दोन्ही पिढ्या या आपल्यापेक्षा अधिक सुखात आहेत असे समजून मनात ‘जळत’ राहतात. एकमेकींना नावं ठेवतात. पण असं ‘जळणं’ असलं तरी या पिढ्या एकमेकींचा कायमचा खातमा करायला किंवा एकमेकींच्या सुखांचा पूर्ण नष्टावा करायला टपलेल्या असतात, असं मात्र नाही. तिन्ही पिढ्या एकमेकींच्या सुखाच्या आड सहसा येत नाहीत. पण सुख म्हणजे काहीतरी अतिरेकी कृत्य असं काही वागूही देत नाहीत. तिन्ही पिढ्या हा एकमेकींच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्याचं कामही करतात. एकमेकींना ‘शिस्ती’त ठेवतात. त्यासाठी समाजरचनेनं प्रत्येक वयोगटासाठी निहित कर्तव्यं नेमून दिली. तारुण्यात काय करावे, प्रौढत्वात काय आणि वृद्धत्वात काय करावं, याची विभागणी केली. पिढ्यांचीही विभागणीही वयावरच अवलंबून असल्यानं प्रत्येक पिढी आपलं काम नीट करत्येय की नाही, यावर लक्ष ठेवण्याचं काम आपोआपच इतर पिढ्यांकडं आलं. प्रत्येक पिढी आपापले नीतिनियम पाळतेय की नाही, यावरही लक्ष ठेवण्याचं काम आयतं होऊ लागलं, आपण आपल्या कर्तव्यापासून किंवा नीतिनियमांपासून ढळलो तर ‘नावं’ ठेवली जातील, ही भीती निर्माण झाली. त्या वेळी पिढ्यांची वाढ, संगोपन, सांभाळ यांची जबाबदारीही तिन्ही पिढ्यांकडं वाटून देण्यात आली. यात माणसाचं जगणं सुरक्षित, सुरळीत आणि स्थैर्यपूर्ण करणं हा उद्देश होता. उदाहरणार्थ, तरुण पिढीचं कर्तव्य म्हणून जगण्याचं शिक्षण घेण्याचं काम तिच्याकडे सोपवण्यात आलं. ते शिकलेलं जे काही आहे त्याचा वापर करून जगण्याला आधार आणि सुरक्षितता देण्याचं काम वृद्ध पिढीकडे सोपवण्यात आलं. जगून झाल्यावर जमलेल्या अनुभवांच्या शिदोरीच्या आधारावर मागून येणाऱ्या पिढ्यांना जगण्याचं शिक्षण देण्याचं काम वृद्ध पिढीकडे देण्यात आलं.

आयुष्याला स्थैर्य देण्याचं महत्त्वाचं काम मधल्या पिढीच्या खांद्यावर देण्यात आलं. आपल्यानंतरची येणारी पिढी जन्माला घालणं, तिचं भरणपोषण करणं ही जबाबदारी तिच्यावर असते. वृद्ध पिढी आणि तरुण पिढी यांच्यातला दुवा होणं, वृद्ध पिढीकडून मिळणारं ज्ञान स्वतः माध्यम होऊन तरुण पिढीकडं पोचवणं, त्याच वेळी थकलेल्या वृद्ध पिढीच्याही जीविताची, भरणपोषणाची जबाबदारी घेणं आणि जोडीला स्वतःच्याही अस्तित्वाचं, भरणपोषणाचं काम सांभाळणं अशी फार मोलाची कर्तव्यं मधल्या पिढीच्या खांद्यावर असतात. मधल्या पिढीला खऱ्या अर्थानं खूप राबावं आणि कष्टावं लागतं. आपल्या बरोबरच आपल्या आधीच्या आणि नंतरच्या- अशा दोन्ही पिढ्यांना सांभाळण्याचं, त्यांच्याही जीविताची हमी घेण्याचं कर्तव्य पाळावं लागतं. त्यामुळे समाजरचनेची बरीचशी सूत्रं याच पिढीच्या हातात असतात.

या पिढ्या एकमेकींच्या अस्तित्वाचा आधार असतात. त्यातला एक आधार निखळला तर तिन्हींच्या तीनही पिढ्या अस्तित्वहीन होऊ शकतात. समाजरचना कोलमडून भुईसपाट होऊ शकते. त्यामुळे तिघींनाही एकमेकींना जपून राहण्याशिवाय, सांभाळून घेण्याशिवाय, एकमेकींची भीती बाळगण्याशिवाय आणि एकमेकींशी आपुलकीचं नाटक केल्याशिवाय पर्यायच नसतो. युद्धापेक्षा कुरकूर निश्चित सुसह्य आणि कमी वेदनादायी असते. त्यामुळे कुरकूर होत राहणं, सतत होत राहणं, ही चांगलीच गोष्ट आहे. माणसं, त्यांच्या पिढ्या, पिढ्यांची समाजरचना यांचं सुखचैन आणि स्थैर्य टिकवायला आणि युद्धाच्या भीतीतून सगळ्यांना ‘मुक्त’ ठेवून, वर नियमित- पण बारीकसा वचक ठेचायला, वचकाच्या बंधनात ठेवायला कुरकूर हेच माध्यम मोलाचं आहे. त्याला पर्याय नाही. त्यामुळे माणसाला जे निसर्गतः अनेक गुणावगुण प्राप्त झालेले आहेत, त्यांतल्या कुरकूर करत राहण्याच्या गुणाला किंवा अवगुणाला (ज्यान त्यानं आपल्या सोयीनं अर्थ घ्यावा.) एकूणच मानवी जगण्यासाठी उपकारकच म्हटलं पाहिजे. कुरकूर करण्याची माणसाची जी जन्मजात परंपरा आहे, ती अखंडित राहिली पाहिजे. माझ्या भावी पिढ्यांच्या आणि जगाच्या अंतापर्यंतच्या पिढ्यांच्या सुखशांतीसाठी ही परंपरा मीही निष्ठेनं पाळणं, तिचा दुस्वास न करणं, हे माझं कर्तव्यच आहे. असं मी समजतो.
 

Tags: निष्कर्ष समजूतदारपणा तीन पिढ्यांतील अंतर जनरेशन गॅप conclusion understanding gap in three generations generation gap weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन खान

लेखक, कादंबरीकार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके