डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय परंपरेत तर बायकांची कामं करणारांना अपमानदर्शक असे खूप शब्द आहेत. ते शिव्यांसारखे वापरले जातात. एकूण बाईनं बाई असणं हेच आपल्या देशी वातावरणात नीचतेचं मानलं जातं न्‌ पाळलंही जातं. ते पुरुषांकडून तर केलं जातंच, पण स्वत: स्त्रियांकडूनही केलं जातं. त्यातल्या दोघांच्या कामांबद्दलच्या भेदांचा भागही कथा मांडते. त्यातही विशेषत: नवरा-बायको या नात्यातल्या संसार म्हणून असणाऱ्या यंत्रणेतल्या घरकामं या विषयावर जास्त केंद्रित होते.

मला स्वत:ला जाणवतं की, 1983 पासून माझ्या ज्या कथा छापल्या गेल्या, त्या 2000 पर्यंत आशयविषयांनी हळूहळू बदलत गेल्या. म्हणजे सुरुवातीला मी सामाजिक आशयविषयांच्या किंवा सामाजिक वातावरण, सामाजिक समूह, सामाजिक गट यांच्या कथा खूप लिहिल्या. अर्थात, दुसऱ्या बाजूला एकटदुकट माणसांच्या गोष्टी लिहिणंही चालूच होतं, पण मुख्य जोर कथा-कादंबऱ्यांमध्ये सामाजिक विषय रचणेकडंच होता. नंतर हळूहळू माझ्या कथांचे विषय सामाजिकतेकडून कुटुंबव्यवस्थेकडं, मग कुटुंबव्यवस्थेकडून कुटुंबातल्या नातेसंबंधांकडे, तिथून मग कुटुंबातल्या विशिष्ट व्यक्तिचरित्राकडं असे सरकत गेले. तिथूनही पुढं मग मी माणसाच्या मनाच्या, माणसाच्या विचारांच्या गोष्टी लिहू लागलो. आधी खूप माणसं, मग थोडी माणसं, मग काहीच माणसं, मग दोनच माणसं, मग एखादाच माणूस, मग एखाद्याच माणसाचं मन असा मी लिहिण्याच्या विषयांबद्दल बदलत गेलो. अर्थात, याही काळात मी सामाजिक धर्तीचं लिहायचं पूर्णच सोडलं होतं असं नाही.

हे जे माझ्या कथाविषयांचं मोठ्या समूहाकडून छोट्या समूहाकडं, छोट्या समूहाकडून आणखीछोट्या समूहाकडं, तिथून कुटुंबाकडं, कुटुंबाकडून दोन व्यक्तींकडं, दोनकडून एका व्यक्तीकडं, मगएका व्यक्तीच्या मनाकडं असं सरकणं आहे, ते मला वाटतं, माझ्या स्वत:तच होत गेलेल्या बदलांमुळं झालं असावं. ऐन कोवळ्या वयात मी एकटा होतो, पण मोठ्या सामाजिक समूहांमध्ये वावरत होतो. मन रिकामं होतं न्‌ तिथे अनेक संदर्भ जुळवायची ताजी ताजी हौस होती न्‌ उत्सुकता होती. नकळत मी त्या काळात निरनिराळ्या सामाजिक संघटनांच्या कायातही ओढला गेलो. राष्ट्र सेवा दल,छात्रभारती, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, भटक्या विमुक्तांची चळवळ असं एकेक किंवा एकमेकांत गुंतलेलं माझ्याशी येऊन भिडत होतं. त्याचाही एक व्यापक परिणाम माझ्यावर होतअसावा न्‌ परिणामत: मी मोठ्या समूहांचं लिहीत असावा. पोट होतंच तेव्हाही, पण त्याबाबत फार गांभीर्य नव्हतं. पंचविशीनंतर मात्र मी आयुष्यासाठी एक स्त्री स्वीकारली आणि मग खऱ्या अर्थानं पोट, स्वत:वर, कुटुंबावर, नातेसंबंधांवर केंद्रित होत निघालो. तोवर दूरस्थासारखा या गोष्टींकडं पाहणारा मी, त्या गोष्टींमध्ये स्वत:च गुंतत निघालो. 1994 साली मला पहिलं मूल झालं न्‌ तो गुंता मग जास्तच वाढला. नातेसंबंधासंदर्भातलं एक विचारीपण येत निघालं न्‌ लिहिण्याच्या विषयांमध्येपण आपोआप बदलाव होत गेले.

आज माझ्या लक्षात मेतं की, कौटुंबिक जबाबदाऱ्या घेतल्यावर माणूस स्वत:वर, आपल्यावर अवलंबून किंवा गुंतून असलेल्या माणसांवर केंद्रित होत जातो आणि तो जर लिहिणारा माणूस असेल, तर त्या केंद्रावरच्याच गोष्टी तो लिहितो. अर्थात, हे केंद्र काही छोटं नसतं. त्याला असंख्य पैलू, अनेक कंगोरे, अगणित विचार, बऱ्याच शाखा असतात. त्या केंद्रातही भावनांचे मुबलक आणिविविध आविष्कार असतात आणि त्या केंद्राच्याच मग गोष्टी होत राहतात. लिहिणारा माणूस स्वत:चं जगणं लिहीत राहतो म्हणतात. अर्थात हे जगणं त्यानं स्वत: प्रत्यक्ष अनुभवलेलंच असावं लागतं असं नाही. मानवी जगण्याबद्दलचे स्वत:च्या नजरेतले विचार त्याच्या मेंदूत सतत चालू असतात. न्‌ त्या विचारांच्याही गोष्टी होत राहतात. लिहिणाराचं वय वाढतं तसं त्याचं ज्ञान आणि आकलनही वाढतं.

त्याला माणूसपणा, माणसाचे नातेसंबंध यांचे बारकावे जास्त उलगडत जातात. आणि ते उलगडे त्याच्या लिहिण्यात येत राहतात. हे उलगडे त्यानं प्रत्यक्ष स्वत:च्या दैहिक किंवा व्यवहारी पातळीवर अनुभवलेले नसतील, तरीही मेंदूच्या-वैचारिक पातळीवर तो ते अनुभवतो न्‌ त्यातूनच ज्या गोष्टी होतात, त्या त्याच्या मेंदूच्या जगण्याच्या गोष्टी असतात.

लिहिणाराच्या वाढत्या वयाचे परिणाम त्याच्या लिहिण्यावर होत असावेत असं मला वाटतं. मी मोठ्या सामाजिक समूहापासून सरकत माणसाच्या मनापर्यंत येऊन त्याच्या गोष्टी लिहू लागलो, यात मला वाटतं माझ्या वाढणाऱ्या वयाचाही हातभार असावा. कोवळ्या वयात जगण्याबद्दलच्या फारशा जबाबदाऱ्या नसतात आणि जगण्याला एक मोघमपण असतं, ते सगळं वाढत जाणाऱ्या वयाबरोबर बदलत निघतं. वयाबरोबर अक्कल वाढत निघते, समज वाढत जाते, जगण्याचे बारकावे कळत निघतात आणि मोघमपणाकडून, ढिलेपणाकडून केंद्रीकरणाकडं,विशिष्टपणाकडं प्रवास सुरू होतो. असं म्हणू या की, मोठ्या विशाल समुदायाकडून स्वत:कडं प्रवास सुरू होत असावा. त्यामुळं मग आधी समुदायाचं लिहिण्याकडून नंतर स्वत:चं लिहिण्याकडं आपोआपच लेखणी सरकत असावी. समुदायाचं चित्रण करताना फार बारकाव्यांची,विचक्षणपणाची मोठी दृष्टी लागत नाही, पण जसजसं आपण समुदायाकडून लिहिणं स्वत:कडं वळवत निघतो, तसतशी आपली दृष्टी अधिक सूक्ष्मतेकडं वळत असावी. म्हणजे असंही म्हणता येईल की, माणूस मोघम वयात, जगण्याच्या फार जबाबदाऱ्या नसताना समुदायाचा शोध घेत असावा, तेवढा त्याला फावलेपणा घावत असावा आणि तेच त्याचं वय वाढत निघताना, त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात तसतसा तो स्वत:चा शोध घेत निघतो, या सगळ्या पसाऱ्यात आपण कोण आहेत, काय आहोत इकडं त्याची उत्सुकता वळत असावी आणि तीच उत्सुकता त्याच्या लिहिण्यात येऊ लागत असावी.

असा करत करत मी 2000 च्या आसपास माणसाच्या मनाची गोष्ट लिहिण्यापर्यंत येऊन पोहोचलो. त्यातली मला महत्त्वाची वाटणारी एक गोष्ट आहे ती- ‘असणं नसणं तीव्र असह्य.’

‘मी’ हा निवेदक घेऊन मी आजवर अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या. पण प्रत्येक  ‘मी’ काही एकाच पद्धतीनं किंवा धाटणीनं लिहिण्यात आला नाही. त्यातल्या काही ‘ती’नी स्वत:च्या नजरेतून भोवतीच्या इतरांची गोष्ट सांगितली. काही ‘मी’नी इतरांबरोबर स्वत:चीही गोष्ट सांगितली. काही ‘मीं’नी फक्त स्वत:ची गोष्ट सांगितली. ‘असणं नसणं तीव्र असह्य’चा निवेदक ‘मी’च आहे, पण या ‘मी’नं मात्र स्वत:च्या मनाची गोष्ट सांगितली आहे. हा निवेदक कथाभर आपलं मन मांडत राहतो. वरवर या कथेचं मुख्य पात्र निवेदक आहे असं वाटतं, पण खरं तर या कथेचं मुख्य पात्र निवेदकाचं मन आहे. (अशा कथांना मनोविश्लेषणात्मक म्हणायची पद्धत आहे, पण मनोविश्लेषण हा शब्द मला स्वत: पचनी पडत नाही. घटनाप्रधान आणि मनोविश्लेषणात्मक अशी कथा-कादंबऱ्यांची विभागणी केली जाते. मला प्रश्न पडतो,घटनाप्रधान साहित्यातल्या पात्रांना मनं नसतात का आणि त्यांची  मनं मांडली जात नाहीत का? दुसरं म्हणजे, मनोविश्लेषणात्मक साहित्यातल्या पात्रांना देह नसतात का आणि मनाबाहेरचे व्यवहार ते करीत नाहीत का जगण्याचे? प्रत्येक  पात्राला मन असतं न्‌ ते कोणत्या ना कोणत्या रूपात लिखाणात उमटतंच, त्या अर्थानं कोणतीही साहित्यकृती ही मनोविश्लेषणात्मकच असते आणि त्याहीपुढं जाऊन सांगायचं तर मुळात लिखाण कोणत्याही प्रकारचं असो, त्या प्रत्येक लिखाणात लेखक आपलं मनच मारत असतो. लेखक आपल्या मनचंच आणि मनाचंच लिहीत असतो. त्या अर्थानं जगातलं प्रत्येक  लिखाण मनोविश्लेषणात्मकच असतं.) त्यामुळं या कथेला मनोविश्लेषणात्मकवगैरे म्हणत बसण्यापेक्षा ती एका माणसाच्या मनाचं चित्रण करणारी गोष्ट आहे - ते गोष्ट असणं महत्त्वाचं - एवढंच म्हणेन.

सतत लिहीत राहिल्यानं काही काही गोष्टी लिहिण्याच्या बाबतीत माझ्या प्रयोगात आपोआप येत राहिल्या. उदाहरणार्थ- पूर्वी लिखाणातल्या पात्रांच्या संवादांना मी दुहेरी अवतरणं घालायचो. पुढंपुढं आपोआपच ही अवतरणं उडत गेली. बोलणाराच्या समोर एक स्वल्पविराम टाकायचा न्‌ सलग कुठलंही अवतरण न टाकता, त्याच ओळीत त्याचं बोलणं लिहायचं असं मी करू लागलो. म्हणजे लिखाणातलं निवेदन, प्रसंगवर्णन आणि संवाद असं सगळं एकाच पातळीवर. त्यातच एकाच लिखाणात अनेक पात्रं असतील आणि ती एकमेकांशी बोलणार असतील, तर त्यांना स्वतंत्र ओळी किंवा परिच्छेदन देता, एकाच परिच्छेदात, लागोपाठच्या ओळींमध्ये त्यांचं एकमेकांशी बोलणं - पुन्हा अवतरणचिन्ह अजिबात न वापरतात - मी लिहू लागलो. त्यामुळं लिखाणातल्या पात्रं, प्रसंग, घटना, निवेदन, विचार,संवाद यांतल्या एका बाबीला विशेषत्व न येता, सर्व बाबींना समतलता येऊ लागली न्‌ लिहिण्यातला ओघ आणि प्रवाह सर्वत्र एकसारखा राहू लागला. वर्णन किंवा संवाद संपवण्याच्या ठिकाणी कधीतरी थोडं तुटकपण दाखवायचं असलं तर मग - खास करून पूर्णविरामाच्याऐवजी- मी तीन ठिपके वापरू लागलो. (अगदी सुरुवातीला मी प्रत्येक वाक्यानंतर ठिपके-तेही जास्तीत जास्त ठिपके वापरण्याचा सोस बाळगला. प्रत्येक  लिहिणाराचं सुरुवातीला हेच होत असावं. पुढं हा सोस मी ठरवून सोडला- मुळात पुन्हा पुन्हा ठिपके वापरणंच सोडलं. त्यातही तीनपेक्षा जास्त ठिपके वापरणं तर पूर्णच सोडलं. जास्त ठिपके वापरण्यानं जागा तर वाया जातेच आणि लिखाणाला भरपूर तुटकपणा न्‌ विस्कळीतपणा येतो. लिहिण्यातला ठामपणा हरवतो. लिखाणात पुन्हापुन्हा ठिपके वापरणं हे मला कमकुवत मनाचं लक्षण वाटतं. संवादाला एकेरी अवतरण घालणंही मला आवडत नाही न्‌ योग्य वाटत नाही. संवाद हे अवतरणात घ्यायचेच असतील तर प्रत्येक  पात्राचे स्वतंत्र ओळीत घ्यावेत आणि दुहेरी अवतरणातच घ्यावेत.  प्रत्येक  पात्राच्या संवादाला स्वतंत्र परिच्छेद द्यावा. एखाद्या पात्राला आपल्या बोलणयातल्या एखाद्या वाक्यावर किंवा एखाद्या शब्दावर विशेष किंवा स्वतंत्र जोर द्यायचा असेल, तर मग तो जो संवाद बोलतोय, त्या मुख्य संवादाला दुहेरी अवतरण द्यावं आणि त्या संवादाच्या पोटात एकेरी अवतरणात त्या पात्राला विशेषत्वानं जे बोलायचंय ते टाकावं. एखाद्या प्रसंगात दोन पात्रं बोलत असताना, तिथं हजर नसलेल्या पात्राचं बोलणं एकमेकांना सांगत असतात, तेव्हा मुख्य दोन पात्रांच्या दुहेरी आवतरणातल्या संवादात त्या तिसऱ्या गैरहजर पात्राचे संवाद एकेरी अवतरणात देणं सोपं जातं. तीच गोष्ट उद्‌गारचिन्हांची. मी बहुतेक लिखाण पूर्णविरामावर भागवतो. उद्‌गारचिन्हं क्वचितच वापरतो आणि ते एकच वापरतो. एकापुढे एक अनेक अनेक उद्‌गारचिन्ह वापरणं मला किळसवाणं आणि लिहिणाराला आत्मविश्वास नसण्याचं किंवा मूर्ख आत्मविश्वास असण्याचं लक्षण वाटतं. एक उद्‌गारचिन्ह हे सुद्धा दमदारच असतं, त्यामुळे ते एक वापरलं काम किंवा अनेक वापरली काम, अर्थ तोच होतो. मुळात लिहिणं हा अक्षरांचा खेळ आहे, चिन्हांचा नाही. त्यामुळं लिहिण्यात संकेतचिन्हांचा अतिरेक टाळणं बरं, असं मला वाटतं.)

‘असणं नसणं तीव्र असह्य’ ही कथासुद्धा मी नंतरच्या काळात प्रमोगम्हणून वापरलेल्या अवतरणं आणि स्वतंत्र परिच्छेदात्मक ओळींचा कमी वापर करण्याच्या धाटणीतलीच आहे. नंतरच्या काळात मी पात्रांना नावं द्यायचं टाळू लागलो आणि आख्खं लिखाण पात्रांच्या नावांशिवाय करू लागलो, तरीही - आणि ही कथा एका माणसाच्या मनाची कथा असली तरीही - त्यातल्या दोन मुख्य पात्रांसाठी नावं आहेत. त्यातलं कथानिवेदकाचं पात्र आहे - नवरा, त्याचं नाव अनंत आहे. ते कथेत खूप कमी वेळाच उल्लेखित झालंय. दुसरं पात्र आहे - बायको. तिचं नाव मंजिरी. ते नाव मात्र नवरा या पात्राच्या निवेदनात खूप वेळा – त्या पात्राची ती नैसर्गिक आणि व्यवहारी गरज म्हणून - उल्लेखित झालेलं आहे. कोणताही नवरा स्वत:च्या बायकोचा स्वत:शी सतत बायको असा उल्लेख करत नाही, तर त्याच्या मनमस्तिकात (जेहन) तिचं नाव असतं किंवा तो तिला जे संबोधन वापरतो तेच असतं, या गोष्टीचा वापर या कथेत झालाय. बाकी मग कथेतल्या एकाही पात्राला नाव नाही. त्यांची  जी मुख्य पात्रांशी नाती आहेत, त्या नात्यांनीच ती कथेत ओळखली जातात, तीच त्यांची  नावं.

ही सुद्धा तशी एक संसार कथाच आहे किंवा नातेसंबंधाची कथा आहे. ‘एकूट समूह’, ‘एका अटीचा संसार’ किंवा ही ‘असणं नसणं तीव्र असह्य’ या कथा मला जमलेल्या काही वेगळ्या प्रकारच्या संसारकथा आहेत असं मला वाटतं. किंवा नातेसंबंधांचा त्यात वेगळा वेध आहे असंही म्हणता येईल. मी माझ्या संसार, नाती या संदर्भातल्या काही कल्पना किंवा काही स्वप्नं या कथांमध्ये पेरली आहेत असं वाटतं. कुटुंब, नवराबायकोचं नातं यातला व्यवहार कसा असावा, कसा नसावा असा काही एक विचारसुद्धा या कथांमध्ये मांडला गेला असावा.

‘असणं नसणं तीव्र असह्य’ ही सुद्धा काल्पनिकच गोष्ट आहे आणि तिच्यात माझ्या स्वत:च्या आयुष्याचाही आधार घेतला आहे. संसारासाठी लागणारी सर्व कामं - घरातली आणि बाहेरचीसुद्धा – फार मनापासून आणि फार नैसर्गिकपणे करणारा पुरुष ही या कथेची मध्यवर्ती संकल्पना आहे. ही संकल्पना सुचायला मला फार अवघड गेलं नाही. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात भोवताली दिसणारी एक गोष्ट आहे. पुरुषांची कामं आणि स्त्रियांची कामं असा कामांमधला भेद. (तसा तो भेद आपण प्रत्येक च बाबतीत करतो.) रोजच्या व्यवहारातली माणसांची जी ढिगानं कामं असतात, त्यातल्या काही कामांना पुरुषी कामं म्हटलं जातं, तर काही कामांना बायकांची कामं असं म्हटलं जातं. तशी स्पष्ट विभागणीच असते न्‌ पुरुषांची कामं स्त्रियांनी केली किंवा स्त्रियांची कामं पुरुषांनी केली, तर त्याकडं अतिशय आश्चर्यानं आणि हलकटपणानं पाहिलं जातं समाजाकडून. बायकांची कामं करणारा पुरुष दिसला तरत्याला नावं ठेवली जातात आणि पुरुषांची कामं करणारी स्त्री दिसली तर तिला भलंबुरं म्हटलं जातं. विशेषत: बायकांनी घरकामं करावीत अशी आपली एक रिवाजी परंपरा आहे. ती परंपरा मोडणारा पुरुष दिसला किंवा स्त्री दिसली तर मग नामकरणाला- नावं ठेवण्याला पारावार राहत नाही. ‘असणं नसणं तीव्र असह्य’ या कथेचा विषय ह्यासुद्धा बाजूनं मांडला गेला आहे. किंवा किंबहुना खोल सार्वत्रिक परंपरेनं चालत आलेली पुरुषी कामं, बायकी कामं यातली भेदाभेद नीती हाच विषय या कथेचा मुख्य आधार आहे. (बायकांची कामं, पुरुषांची कामं – अगदी घरामधली कामं आणि घराबाहेरची कामं - यातली तफावत जगभर सगळीभर आहे. माझ्या माहितीनुसार कथासाहित्यात या विषयावर दुसरी कथा नाही.) भारतीय परंपरेत तर बायकांची कामं करणारांना अपमानदर्शक असे खूप शब्द आहेत. ते शिव्यांसारखे वापरले जातात. एकूण बाईनं बाई असणं हेच आपल्या देशी वातावरणात नीचतेचं मानलंजातं न्‌ पाळलंही जातं. ते पुरुषांकडून तर केलं जातंच, पण स्वत: स्त्रियांकडूनही केलं जातं. त्यातल्या दोघांच्या कामांबद्दलच्या भेदांचा भाग ही कथा मांडते. त्यातही विशेषत: नवरा-बायको या नात्यातल्या संसार म्हणून असणाऱ्या यंत्रणेतल्या घरकामं या विषयावर जास्त केंद्रित होते.

ही सर्व कथा त्या संसारातल्या पुरुषाच्या- म्हणजेच नवऱ्याच्या मनात घडते. किंवा असं म्हणता येईल की नवऱ्याचं मन ही कथा बोलतं. आणि जास्त करून ही त्याच्या मनाची व्यथाच आहे. हा नवरा स्वत:चं घर, घरातली माणसं, आपलं कुटुंब, आपला संसार यांच्यासाठी मनापासून राबणारा आहे. ते राबणं दोन्हीकडं. घराबाहेरही आणि घरातही. त्याला घरकामाची आवड आहे, त्यापेक्षा घरकामांची सवय आहे. तो ती अतिशय नैसर्गिकपणे आणि अतिशय सहजतेनं करतो. त्यात आपण बायकी कामं करतो न्‌ पुरुषी कामं करतो असं काहीही त्याच्या डोक्यात नाही न्‌ ध्यानीमनी नाही. कामांच्या बाबतीत त्या भेदांच्या तो मनानं, मेंदूनं बाहेर आहे. त्याचं बायकोवर प्रेम आहे, मुलांवर प्रेम आहे, आपण घरासाठी करतो, त्या बाहेरच्या न्‌ घरातल्या प्रत्येक  कामावर प्रेम आहे.  आणि ते खरं आहे. नाती तो तन्मयतेनं सांभाळतो. फार आनंदानं सगळ्यांचं सगळं करतो. संसार करण्यात अफाट आनंदानं रमलेला तो माणूस आहे. लहानपणी त्यानं आपल्या आईबापांच्या संसाराची कामं केली आहेत, मोठेपणी स्वत:च्या संसाराची कामं करतो. त्याचा त्याचा जगण्याचा न्‌ रमण्याचा स्वत:चा आनंद आहे आणि तो तो घेतो. पण भोवतीच्या लोकांना त्याचं असं एकाच वेळी पुरुषी आणि बायकी कामं करणं खटकत असतं. विशेषत: बायकी कामं करण्यावरून भोवतालचे लोक त्याच्यावर टीकाटिप्पणी करत असतात. तो त्यांच्याकडं कधीच लक्ष देत नाही. पण ज्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून आहे तो, त्या नात्यातले लोक काही बोलले तर मात्र तो नाराज होतो. त्याच्या पूर्वायुष्यात त्याचा बाप काही हिणकस बोलतो त्याच्याशी, तेव्हा तो बापाला शिक्षा द्यायला कमी करत नाही. नंतरच्या आयुष्यात अतिशय भोळेपणानं त्याची बायको एकदा चुकून तसंच काही बोलून जाते, तेव्हाही तो नाराज होतो आणि तिलाही तो शिक्षा करतो. अशी एकूण ती कथा आहे.

तो नवरा आहे, पुरुष आहे, परंपरेनं संसारासाठी लागणारी घराबाहेरची कामं तो करतो. माणसं जी कामं किंवा जे व्यवसाय करतात,त्यांचे संदर्भ लिहिताना देण्याची मला सवय आहे. पण या कथेत त्याच्या पैसे कमवण्याच्या कामाचे फारसे संदर्भ आलेले नाहीत आणि त्याच्या बाहेरच्या व्यवसायाशी संबंधित भाषाही कथेत आलेली नाही. मुळात कथेचा झोत त्या विषयावर नाहीच. त्यामुळं ते आपोआप टाळलं गेलं आहे. पुरुष बाहेर कमवायला जाणारच, त्यात वेगळं, विशेष काही नाही, ती नर-मादीच्या मानवी जगाची परंपराच होऊन बसली आहे, हे गृहीत धरून, तो पैसा कमवतो, याची कथेला आवश्यक तेवढी माहिती दिली आहे. बाकी पसारा टाळला आहे. मुख्य विषय आहे तो, तो घरकामं करतो हा, त्यावर मात्र कथेत मुख्य झोत आहे आणि त्या अनुषंगानंच कथेची भाषा रचली गेली आहे. मुळात एकूण कथेची भाषाच साधी आहे. कारण कथा साध्या माणसांचीच आहे. तिच्यात साहित्यिक अलंकरणं नाहीत, व्याकरणीय चातुर्य नाही, भाषेचे चमत्कृतीपूर्ण प्रयोग नाहीत. कथेची, कथेच्या पात्रांची ती गरजच नाही. साधी माणसं रोजच्या आयुष्यात जेवढी भाषा वापरतील तेवढीच भाषा या कथेत वापरली गेली आहे.

ही कथा सुचायला मला फार लांब जावं लागलं नाही. ती कथा माझ्यातच होती, माझ्याभोवतीच होती. मी अनेक गावांमध्ये राहिलो. तिथं प्रत्येक  गावात मी स्त्री आणि पुरुषांच्या कामांमधले भेदप्रकार पाहत आलो. उदाहरणार्थ, काही गावांमध्ये घरातलं पाणी पुरुषांनी भरलेलं चालत नाहीत, ते बायकी काम असतं, तर काही गावांमध्ये बायकांनी घरातलं पाणी भरलेलं चालत नाही, ते पुरुषी काम असतं. काही गावांमध्ये स्त्री-पुरुष दोघंही घरातलं पाणी भरतात, पण त्यांच्या पाणी भरण्याच्या भांड्यांमध्ये बायकी भांडी, पुरुषी भांडी असा भेद असतो. एकमेकांची कामं करण्याचा कुणा स्त्री-पुरुषांनी प्रयत्न केला, तर ते भोवतालाकडून हमखास नावं ठेवून घेणार. त्यातली गावोगावची नेहमीची दृश्यं माझ्यासमोर होतीच.

दुसरं, मी स्वत:च घरातली कामं अगदी लहानपणापासून करत आलो होतो. वडिलांची बदलीची नोकरी. त्यानिमित्त गावोगावी फिरणं. परकंगाव. परकी माणसं. मी ज्येष्ठ. आईला मदतीला कुणी नाही. सगळा जिम्मा मग माझ्यावर. भावंडं लहान. वडील घराबाहेर. वखारीतनं लाकडं आणणं, किराणा सामान आणणं, बाकीचा बाजार आणणं,घराची स्वच्छता, अंथरुणं-पांघरुणं, पाणी भरणं, धुणी-भांडी, भांडीघासणं, स्वयंपाक करणं, भावंडांची शी-शू पासून देखभाल ही कामं वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून सुरू झाली. ती घराच्या श्रद्धेनं केली. आईची बाळंतपणंसुद्धा सांभाळली. पुढं मला बायको आल्यावर न्‌ मुलं झाल्यावर, बाहेरच्या चाकऱ्या सांभाळून स्वत:ची पोरं वाढवली. असं सगळं त्या विषयांचं पाठांतर होतं न्‌ कडेच्या माणसांची कौतुकं आणि चेष्टा लहानपणापासून अनुभवत होतो, तेही होतंच.

तिसरं म्हणजे मी दैनिकांपासून वार्षिकांपर्यंत सर्वच प्रकारच्या आणि विषयाच्या नियतकालिकांची संपादनं केली. त्यात तेसंबंध, कुटुंब,समाज या विषयांवरचीही नियतकालिकं खूप होती. त्यातून समकालीन स्त्री-पुरुष नात्यांमधले विषय आणि भेद कळत होते. स्वत: मीही माझ्या मगदुराप्रमाणे त्या विषयावर लिहीत होतो.  स्त्री-पुरुष समानता-असमानता हा विषय तर सूज्ञपणे जगणाऱ्या प्रत्येक  मानवाला पीडतच असतो. मी तर लिहिणारा-वाचणारा-संपादन करणारा माणूस म्हणून त्या गर्तेत कायम गरगरतच होतो.

या सगळ्या मुद्यांची खिचडी होऊन ही कथा उभी राहिली. म्हणायचं झालं तर ही कथा माझ्या प्रत्यक्ष अनुभवातली कथा आहे. अर्थात, कथेतला नवरा बापाशी आणि बायकोशी शिक्षेचं जे वागतो, तसं माझ्या आयुष्यात काही घडलं नाही. कथेतलं नवरा हे पात्र आणि त्याची मानसिकता उभी रहावी म्हणून मी तो भाग काल्पनिक जोडला.

जगभर स्त्री-पुरुषांमधलं नवरा-बामको हे नातं प्रचलित आहे. संसार, कुटुंब, त्यातली घरकामं आणि घरकामामधले बायकी-पुरुषीभेदसुद्धा जगभर प्रचलित आहेत. त्या प्रचलनातली भेदनीती स्पष्ट करणारी न्‌ तिच्यावर आपल्या परीनं भाष्य करण्याचा प्रयत्न करणारी ही कथा आहे. बायकांनी केलेल्या घरकामांची वर्णनं जगभरच्या साहित्यात सापडतात, पण पुरुषांनी केलेल्या न्‌ त्यातही बायकी म्हणून गणल्या जाणाऱ्या घरकामांमध्ये पुरुषी सहभाग असलेल्या विषयावरची, माझ्या माहितीतली ही एकमेव कथा आहे.

ही कथा एका माणसाच्या मनातून येते हे खरं असलं तरी, जगभरच्या स्त्री आणि पुरुषांचीसुद्धा मानसिकता निर्देशित करते, असं मला वाटतं. त्यामुळं ही केवळ एका माणसाची किंवा त्याच्या मनाची गोष्ट राहत नाही, तर जगभरच्या स्त्री-पुरुषांची न्‌ त्यांच्या पारंपरिक मनाचीसुद्धा गोष्ट होते न्‌ त्याचबरोबर जगात स्त्रीनं कसं असावं आणि पुरुषानं कसं असावं याची स्वप्नी संकल्पनासुद्धा ही कथा मांडते. स्त्री-पुरुष नातं, नवरा-बायको नातं, त्या नात्यामुळं निर्माण होणारी कुटुंबातली इतर नाती, चांगला संसार, अशा चांगल्या संसारांमुळं उभा राहणारा भेदरहित चांगला समाज अशा गोष्टींबद्दलची माझी स्वप्नं ही कथा पेरते असं मला वाटतं. माणूस एकमेकांशी कुठं जोडून घेऊ शकतो न्‌ एकमेकांपासून तुटण्याच्या त्याच्या जागा कोणत्या हे सुद्धा ही कथा सांगते. माणसांचं असणं काम असतं न्‌ ते कुठल्या मुद्यांवर असह्य होऊ शकतं न्‌ त्या असह्यतेला कुठं तीव्रता येऊ शकते, त्याच वेळी माणसाचं नसणं काम असतं न्‌ तेही कुठल्या मुद्यावर असह्य होऊ शकतं न्‌ त्याही असह्यतेला कुठं तीव्रता येऊ शकते, याचा छेद या कथेत मांडला गेलेला आहे. कथा लिहिता लिहिताच मला या कथेचं शीर्षक सुचलं. माणूस आणि त्याच्या भावना यांच्यात शब्दांच्या बाहेर जाणारंही काही असतं, आपण जे करतोय, ते का करतोय, हे खूपदा कळत नाही, पण जगण्याच्या कोणत्यातरी एका अनामिक तीव्रतेतून आपण ते करतो, त्या तीव्रतेच्या भावनेलाही कथा स्पर्श करते. नवऱ्याची घरकामं करण्याच्या भावनेतली तीव्रता आणि भोवतीच्या नात्यांशी तो जे जे वागील- त्या भावनांमधील तीव्रता अशा दोन्हींचं निदर्शन या कथेत आहे.

आधी ही कथा 2004 च्या बेळगाव ‘तरुण भारत’च्या दिवाळीअंकात छापून आली आणि नंतर ती मॅजेस्टिक प्रकाशनानं काढलेल्या माझ्या ‘जिनगानी’ या कथासंग्रहात समाविष्ट झाली. अनेक लोकांना ही कथा आवडली, अनेकांनी कथेच्या अतिशम साध्यासुध्या भाषेचं मनभरून कौतुक केलं.

(या लेखाबरोबरच ‘कथेमागची कथा’ ही लेखमाला समाप्त होत आहे. हे सर्व 14 लेख आणि मूळ 14 कथा यांचा एकत्रित संग्रह असलेले पुस्तक प्रकाशित झाले. )

Tags: कथासंग्रह जिनगानी मानवी मनाची गोष्ट प्रकाशक लेखक कथालेखक राजन खान असणं नसणं तीव्र असह्य Picture of human mind Mind Human nature Story about human Own Story Experience Publisher Writer Author Rajan Khan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजन खान

लेखक, कादंबरीकार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके