हैद्राबाद मुक्तिसंग्राम भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारे सुवर्णपान आहे. पण या संग्रामाला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. माणूस जन्मत: स्वतंत्र आहे, हा विचार थोर विचारवंत रूसो यांनी मांडला. स्वतंत्रतेच्या पोटी माणसे स्वार्थी बनली, त्यातून अन्याय, अत्याचार, शोषण, गुलामी अशा कृती जन्माला आल्या आणि मग त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी जगाच्या पाठीवर अनेक मुक्तिलढे लढले गेले. मराठवाडा मुक्तिलढा- हैद्राबाद मुक्तिलढा अशा लढ्यांपैकीच एक होय. मुक्तिलढा म्हणजे मराठवाड्याला निझामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी केलेला संघर्ष. हा लढा लढला गेला नसता तर हैद्राबाद संस्थान कायम पारंतत्र्यात राहिले असते, आजचा मराठवाडा शिल्लकच राहिला नसता. हिंदुस्थानच्या पोटात आणखी एक पाकिस्तान घातक ठरला असता. हा लढा लढला गेला म्हणूनच आजचा हिंदुस्थान अस्तित्वात आला हे ऐतिहासिक सत्य आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र मराठवाड्याला तब्बल 1 वर्ष 17 दिवसांनी उशिरा म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हैद्राबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळेपर्यंत टिकून असलेले सर्वांत मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते. तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, विदर्भाचा काही भाग हा भारताच्या दक्षिण मध्य भागातील प्रदेश या संस्थानाची व्याप्ती होती.
इ.स.1724 ते इ.स.1948 पर्यंत निझामाची राजवट होती. निजामशाहीची राजवट ब्रिटिशांपेक्षाही अधिक काळ सत्ता भोगणारी होती. निजामाच्या घराण्याच्या ताब्यात जवळपास 650 वर्षे हैद्राबाद होते. धर्माच्या नावाखाली माणुसकीला काळीमा फासणारे अत्याचार निजामशाहीकडून झाले. 1947 साली ब्रिटिश सत्तेचा अस्त झाला. त्यावेळी हैद्राबादचा निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता. उर्दू भाषा हीच शिक्षणाची माध्यमे होती. जनता किती अन्याय सहन करणार.
मराठवाड्यात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तिसंग्राम सुरू झाला. अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राण पणाला लावले, त्यामध्ये बाबासाहेब परांजपे हेही अग्रणी होते. परांजपे हे अंबेजोगाई येथे राहात. शैक्षणिक कार्यात त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा. स्वामी रामानंद व बाबासाहेब हे दोघेही खांद्याला खांदा लावून शैक्षणिक कार्यात उतरले होते. अंबेजोगाईची योगेश्वरी, लातूरचे पूरणमल लाहोटी तंत्रज्ञान, हिप्परगाची राष्ट्रीय शाळा, मुरुडचे जनता विद्यालय अशा अनेक ठिकाणी शिक्षणाची पेरणी या दोघांनी केली, त्याला आता चांगली फळे येऊ लागली आहेत.
बाबासाहेब परांजपे अंबेजोगाईहून लातूरला स्थायिक झाले. पुढे ते लोकसभेचे खासदारही होते. लातूरशी समरस होण्यास हैद्राबाद मुक्तिलढ्याने त्यांना साथच दिली. त्यांच्या निधनानंतर 1993 साली लातूरला बाबासाहेब परांजपे फाउंडेशन स्थापन केले. गेली 25 वर्षे ते स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेबांच्या विचाराधारा घेऊन कार्य करत आहेत. तसेच लातूरच्या क्रिडा संकुलावर मोफत वाचनालय, भाषणे, दृकश्राव्य फिती यातून सामाजिक भान देणारे विचार रूजवण्याचा प्रयत्न केला जातो.
यंदाचे वर्ष पंचविसावे/रौप्यमहोत्सवी आहे. त्यानिमित्ताने हैद्राबाद मुक्तिलढा तरुण मुलांना समजावा, असा प्रयत्न चालू आहे. कारण हा ऐतिहासिक सत्याचा मागोवा अनेक लोकांना, तरुणांना माहीतच नाही. फक्त 1947 साली भारत स्वतंत्र झाला एवढीच माहिती- परंतु त्यात पुढे किती अडचणी आल्या! इंग्रजांनी अनेक संस्थानिक जहागिरी देऊन निर्माण केले होते, ही पिलावळ 600च्या आसपास होती. सरदार पटेलांनी त्यासाठी कठोर भूमिका घेऊन ही पिल्ले भारतात विलीन करून घेतली. परंतु काश्मीर, जुनागड व हैद्राबाद ही संस्थाने अटीतटीची होती, ती सामील करून घेण्यास सरदार पटेलांना खूप युक्त्या कराव्या लागल्या.
शेवटी काश्मीर व जुनागड विलीन झाले, पण हैद्राबादचा निजाम आपले संस्थान भारतात विलीन करण्यास तयार होईना. म्हणून स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, नारायणराव चव्हाण, अनंत भालेराव, पुरुषोत्तम चपळगावकर, राघवेंद्र दिवाण, फूलचंद गांधी, गंगाप्रसाद अग्रवाल, बेथूजी गुरुजी, डॉ.देवीसिंग चव्हाण, माजी खासदार उद्धवराव पाटील, आ.रावसाहेब जामकर, विनायकराव चारठाणकर, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे सर्व आणि त्यांना सहकार्य करणारे अगणित कार्यकर्ते यांनी निजामाची खुर्ची खिळखिळी केली. त्यामुळे निजामाची सत्ता कमकुवत होऊ लागली. निजामाला शरण येण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
ही हैद्राबादची शौर्यगाथा समाजापुढे मांडावी, हैद्राबाद मुक्तिलढा लढणाऱ्या वीर पुरुषांचे स्मरण करावे, समाजात जागृती करावी हे काम रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने फाउंडेशनच्या माध्यमातून गेली सहा महिने गावागावात मांडत आहेत. (ग्रामीण) शाळा-कॉलेजमध्ये व्याख्याने देऊन कुठे चित्रफिती दाखवून, पदयात्रा काढून हा विचार समाजातील तरुणांना सांगण्याच्या प्रयत्नाला फळही चांगले मिळत आहे. अंबेजोगाई, औरंगाबाद येथे सुंदर कार्यक्रम झाले. अंबेजोगाईला डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांचे व्याख्यान अप्रतिम झाले. औरंगाबाद येथे नरेंद्र चपळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तम झाला. डॉ.जनार्दन वाघमारे हाडाचे प्राध्यापक-प्राचार्य व रामानंद तीर्थ विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, त्यांच्या भाषणावर काय बोलणार! प्रत्येक प्रसंग त्यांनी जनमानसाच्या डोळ्यांसमोर उभा केला.
दि.8 सप्टेंबर रोजी पुण्यात मराठवाडा मित्रमंडळाच्या सहकार्याने उल्हासदादा पवार, गिरीष बापट, दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. चौफेर वक्तृत्व असलेले प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या भाषणाने पुणेकरही भारावले. निबंधस्पर्धा, परिसंवाद, गौरव ग्रंथ, बाबासाहेबांच्या लोकसभेतील भाषणांचे पुस्तक, त्यांच्या नावे व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रमांतून खरा इतिहास समाजापुढे ठेवणे हा या फाउंडेशनचा ध्यास- त्याला प्रतिसाद उत्तम मिळतोय. कारण इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार असतो, तो लोकांना आवडतो. हे कार्यक्रम कर्नाटक, तेलंगणातही घेतले.
हैद्राबादचा निजाम जरी तेवढा क्रूर नसला तरी त्याच्या मंत्रिमंडळातील लातूरचा कासीम रझवी हा अतिशय क्रूर व भयानक होता. तो आणि त्याची अत्याचारी सेना म्हणजेच रझाकार, हे अमानुष व धर्मांध होते. ‘बम्मनको काटो, बनिओंको लुटो और मराठोंको पिटो’ अशा वल्गना रझाकार सैनिक करत. त्यांनी स्त्रियांवर, लहान मुलांवर, जनसामान्यांवर अत्याचार केले. गावेच्या गावे लुटली. अनेक हिंदूंना मारले. अनेकांना गुलाम केले. अनेक गावे ओस पडू लागली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात जेवढा रक्तपात झाला, त्याच्यापेक्षा जास्त उग्ररूप या स्वातंत्र्यलढ्याचे होते. म्हणून ही गुलामी झुगारून घरावर तुळशीपत्र ठेवून अनेक माणसे या लढ्यात सामील झाली.
आमच्या लातूरचे जीवनधर शहरकर गुरुजींनीही अनेक कामे गुप्तपणे केली. तो इतिहास ते फार रंगवून सांगतात. सध्या त्यांनी नव्वदी पार केली आहे, पण अजूनही न थकणारे तडफदार गुरुजी लातूरचे भूषण आहेत. त्यांच्या कार्याचे तेज, भाषेचा ओघ, उत्साह आपल्याला लाजवतो. या संग्रामाचा एक भाग म्हणून हैद्राबाद संस्थानाच्या सीमेवर सोलापूरजवळ मुस्ती येथे क्रांतिकारकांनी कँप उभारला होता. गुप्तपणे रझाकारांशी कसा मुकाबला करायचा याची रणनीती तिथे आखली जायची. दारूगोळा, हत्यारे जमवणे, असा सशस्त्र लढा होता. यावेळी फुलचंद गांधी, अहंकारीगुरुजी, हणमंतराव बेल्लरकर यांच्या प्रेरणेने उमरग्याचे व्यंकट देवराव कुलकर्णी यांनी चपळाईची चुणूक दाखवून मुस्तीला दारुगोळा पुरविण्याचे काम केले. त्यावेळी मृत्यूला हातावर घेऊन फिरावे लागे. नळदुर्गच्या चेकपोस्टमध्ये तपासणी होई. व्यंकटरावांनी तो अभ्यास केला व एक विशिष्ट प्रकारचा अस्तर लावलेला कोट शिवला. काही वस्तू अंतरवस्त्रात ठेवून त्या प्रसंगातून सहीसलामत कँपवर पोहोचले. अशा अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कल्पकतेच्या आवाक्यातून निझामाला शरण येण्यास भाग पाडले, 17 सप्टेंबर 1947 रोजी निझाम शरण आला.
शेवटी सरदार वल्लभभाईंनी लष्कर पाठवून निझामाच्या राजवटीचा खातमा केला व हैद्राबादला मुक्त केले व मराठवाडाही मुक्त केला. भावी पाकिस्तानची स्वप्ने बेचिराख झाली. या लढ्यात पुरुषांबरोबर अनेक महिलांनी साथ दिली. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून, गरोदरपणाचे सोंग घेऊन महिला गुप्त बातमीपत्रे पुरवीत. त्यात आशाताई वाघमारे, दगडाबाई शेळके, सुशिलाबाई दिवाण, गीताबाई चारठाणकर अशा अगणित महिलांनी साथ दिली. या महिला कणखर व कल्पक होत्या. तीव्र क्रांतिकारी संघर्ष आणि भारतीय सत्ताधाऱ्यांनी दाखविलेला मुत्सद्दीपणा यातून हैद्राबाद मुक्तिसंग्राम यशस्वी झाला.
अर्थात ज्या सुराज्याची स्वप्ने मराठवाड्याने पाहिली आहेत ती अजूनही कोसोमैल लांब आहेत, याची खंत वाटते. तरीही खचून न जाता या वीरांना स्मरणात ठेवणे, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करणे व हा वारसा जनसामान्य व तरुणांपुढे ठेवणे आवश्यक आहे.
Tags: निजाम हैदराबाद मुक्ती संग्राम हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम nijam freedom struggle hyderabad mukti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या