डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सयाजीराव महाराजांनी सव्वीस वेळा जगप्रवास केला. प्रवासात पाहिलेल्या अनेक गोष्टींना भारतीय स्वरूप देऊन बडोद्यात अंमलबजावणी केली. याचा फायदा बडोद्यातील प्रजेला- पर्यायाने भारतातील लोकांना झाला. जागतिक पर्यटन दिनाच्या (27 सप्टेंबर) निमित्ताने महाराजांनी केलेला जगप्रवास आणि ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समिती’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आणि बाबा भांड यांनी संपादित केलेल्या महाराजांच्या जगप्रवासाच्या ग्रंथांचा आढावा सदर लेखात घेतला आहे.

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।

शास्त्रग्रंथ विलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार॥

कवी मोरोपंत यांच्या या काव्यपंक्ती महाराजा सयाजीराव गायकवाड यांना शब्दशः लागू पडतात. इंग्रज राजवटीत इ.स. 1875 मध्ये त्यांचे दत्तकविधान होऊन बडोदा राज्याचे नृपती झाले. त्यानंतर सहा वर्षे उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना सर्वोत्तम राज्यकारभारासाठी तयार करण्यात आले. पुढे इ.स. 1881 मध्ये राज्यकारभार ताब्यात देण्यात आला. मिळालेल्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे प्रजेच्या उन्नतीचे ध्येय उराशी बाळगून महाराजांनी पहिली सात-आठ वर्षे अविश्रांत श्रम घेऊन राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. शारीरिक परिश्रम, पहिल्या राणीसाहेबांचा मृत्यू आणि इतर कौटुंबिक अडचणींमुळे त्यांचे आरोग्य बिघडले आणि निद्रानाश जडला. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना थंड हवेच्या ठिकाणी प्रवासाचा सल्ला देण्यात आला. भारतातील एक-दोन ठिकाणी प्रवास करूनसुद्धा काहीएक फायदा होत नाही म्हटल्यावर त्यांनी परदेशांत जाण्याचा निश्चय केला. त्यांच्या या निश्चयाला गुरू एफ.ए.एच. इलियट यांनी बळ दिले. समुद्र ओलांडणे तेही एका राजाने म्हटल्यावर सनातनी आणि धर्मांध लोकांनी ओरड सुरू केली. वरिष्ठ अधिकारी आणि जवळच्या नातेवाइकांनी मातुःश्री महाराणी जमनाबाईसाहेब यांचे कान भरण्यास सुरुवात केली; परंतु त्यांनी केलेला निश्चय ढळू न देता सर्वांना समाधानकारक खुलासा करून पहिल्या परदेशप्रवासाला 31 मे 1887 रोजी निघाले आणि पुढे संपूर्ण कारकिर्दीत सव्वीस वेळा जगप्रवास केला.

महाराज प्रत्येक प्रवासाअगोदर बडोद्यातील राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक ती सक्षम व्यवस्था करूनच प्रवासाला प्रारंभ करत. दिवाण, धारासभा आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचे तंतोतत पालन करण्यास हुकूम करत. दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, अपवादात्मक परिस्थितीत उद्भवणारी पेचप्रसंगावर मार्ग काढण्यासाठी महाराज युरोपमध्ये जेथे असतील तेथे बडोद्यातून टपाल जात असे. त्यावर महाराज योग्य तो निर्णय देऊन टपाल बडोद्यास रवाना करत असत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बडोद्याच्या कारभारात व्यवस्थित चालत असे किंवा कोणत्याही निर्णयाला विलंब होत नसे. महाराज प्रवासात असतानाही हुजूरहुकूम काढून बडोद्याला पाठवत.

सामान्यपणे कोणताही प्रवास म्हटला म्हणजे निखळ पर्यटन असा वरवरचा अर्थ होतो. निसर्गसौंदर्य आणि मानवनिर्मित गोष्टी पाहणे हा प्रथमदर्शनी प्रवासाचा उद्देश असतो. हा उद्देश असला तरी जे पर्यटक ज्ञानप्राप्तीसाठी आणि विशिष्ट उद्दिष्ट ठेवून प्रवास करतात, ते पर्यटनस्थलांबरोबर अनेक ज्ञानप्राप्तीच्या बाबींचा समावेश प्रवासाच्या यादीमध्ये करतात. या बाबींमध्ये काही नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करतात, तर या आधारावर आपले, समाजाचे आणि एकूणच राष्ट्राचे जीवन संपन्न करण्याचा प्रयत्न करतात. या दुसऱ्या प्रकारच्या पर्यटकांमध्ये महाराजा सयाजीराव यांचा समावेश होतो. त्यांनी सर्वच प्रवासामध्ये प्रगत देशामधील ज्ञानवर्धक बाबी पाहण्यास प्राधान्य दिले. उदाहरणच पाहायचे झाले तर पहिल्या जगप्रवासात महाराजांनी नैसर्गिक सौंदर्यस्थळे तर पाहिलीच त्याचबरोबर सर्वप्रथम एडन इथे बोटीवरून उतरून शुष्क आणि ओसाड प्रदेशात पिण्याच्या पाण्याची केलेली व्यवस्था आणि हिंदी व्यापाऱ्यांच्या वखारीस भेट दिली. बडोदा राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष महाराजांनी भेट दिलेल्या स्थळाएवढे नसले तरी मुबलकताही नव्हती. पाण्याचा काटकसरीने केलेला वापर आणि पुनर्वापर याची महाराजांनी प्रामुख्याने नोंद घेतली. याच पहिल्या प्रवासात त्यांनी प्रसिद्ध स्त्री लेखिका मादाम-ए-स्ताएल यांचे राहण्याचे ठिकाण, जोसेफाईन (नेपोलियन राजाची राणी) यांचे वसतिगृह, सुप्रसिद्ध ग्रंथकार व्हाल्टेअरचे घर, इंग्रज कवी बायरन यांनी चाइल्ड हॅरल्ड हे प्रसिद्ध काव्य लिहिलेले ठिकाण, रूसो या प्रसिद्ध लेखकाचा पुतळा असलेले बेट, फ्रान्समधील जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालय, घड्याळाचा कारखाना, कलाशिक्षण देणारी ‘ईकोल-द-हॉरॉलजी’ ही संस्था आणि स्वातंत्र्याचे मंदिर पाहिले. स्वित्झर्लंडमधील झ्युरिक शहरातील कलाभवन, जुने ग्रंथालय, लिमा नदी, विद्यापीठ, बॉल शहरातील मातीच्या रंगापासून बनवलेला चित्रसंग्रह, व्यापारी पेठा, निरनिराळे कारखाने, फ्रान्स देशाची राजधानी पॅरिसमधील सर्वच प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळे (आयफेल टॉवर, नेपोलियनचा जयस्तंभ आणि कमान, नानाविध बागा, मृत वीरांचे समाधिस्थान असलेले पॅन्थीयन, प्रसिद्ध लेखक आणि मुत्सद्दी पुरुषांची समाधी असलेले पेअर-ला-शेज ही इमारत) पाहिली. त्यानंतर इंग्लंड देशात जाऊन तेथील उपयुक्त आणि प्रेक्षणीय स्थळांना महाराजांनी भेटी दिल्या. ज्या ज्या देशांतून त्यांनी प्रवास केला तेथील सर्व प्रकारची ज्ञानमंदिरे (शाळा, गुरुकुल, विद्यापीठे आणि ग्रंथालये) पाहिली. विविध कारखान्यांना भेटी दिल्या. पुढील सर्व सव्वीस प्रवासातील स्थळांची यादी केल्यास मोठा ग्रंथच निर्माण होईल. सर्व जगप्रवासात त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, नॉर्वे, जर्मनी, स्कॉटलंड, ऑस्ट्रिया, इटली, तुर्कस्थान, अमेरिका, चीन, जपान, कॅनडा, स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क, सिंगापूर या आणि इतर देशांना भेटी दिल्या. एकदा त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणाही पूर्ण केली.

परदेशांत जाण्यासाठी महाराज तत्कालीन परिस्थितीनुसार प्रवासी जहाजांचा वापर करत. प्रवास मुंबईतून सुरू करून शेवटही मुंबईतच केला. शेवटच्या दोन प्रवासाची सुरुवात मात्र त्यांनी जोधपूर येथून विमानाने करून प्रवासाचा शेवट जहाजाने मुंबई येथे केला.

सयाजीराव महाराजांना निसर्गसौंदर्याचे सूक्ष्म अवलोकन करण्याची सवय लहानपणापासूनच होती. त्यांच्याकडे कुतूहलबुद्धी होती. पुढे भारतातील आणि जगप्रवासाने ती अधिक प्रगल्भ बनली. प्रत्येक प्रवासात त्या त्या देशातील सर्वोत्तम बाबींकडे त्यांचे लक्ष असे. या बाबी आपल्या राज्यात कशा प्रकारे उभ्या करता येतील यासाठी त्यांच्या मनात लगेच विचार सुरू होत असे. अशा बाबींची उपयुक्तता पडताळून पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. तसेच राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी सत्ताही त्यांच्याकडे होती. पहिल्याच जगप्रवासात त्यांनी स्वित्झर्लंड देशातील झ्युरिक शहरातील कलाभवन पाहिले. अशी औद्योगिक आणि कलाविषयक शिक्षण देणारी संस्था बडोद्यात असावी असे महाराजांनी ठरवले. पुढे इ.स. 1890 मध्ये बडोद्यात कलाभवन सुरू केले. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. याचबरोबर बडोद्यातील मध्यवर्ती ग्रंथालय, कारखाने, वस्तुसंग्रहालय, कीर्ती मंदिर अशा अनेक संस्थांची उभारणी करावी ही कल्पना परदेशांतील वास्तू पाहून महाराजांना सुचली. परंतु या सर्व संस्थांत भारतीयत्व आणल्याशिवाय कोणत्याही बाबींचे अंधानुकरण त्यांनी केले नाही. कलाभवनातील अभ्यासक्रम हे मातृभाषेत असावेत हा त्यांनी केलेला बदल त्यांच्या अभ्यासाचे द्योतक होय. त्याचबरोबर देशप्रेम व देशोन्नतीसाठी उभारली जाणारी प्रत्येक बाब भारतीयांसाठी कशी उपयुक्त ठरेल याच निकषांतून उभारली.

महाराजांनी प्रवासात ईप्सित स्थळी पोहोचल्यावर त्या देशामधील नावाजलेल्या लेखकांच्या, समाजकारणी व्यक्तींच्या, निरनिराळ्या खेळांत प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंच्या, नानाविध विषयांतील माहीतगार व्यक्तींच्या भेटी घेतल्या. त्या देशातील शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षक, राजकारणी, समाजसुधारक आणि तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून घेत किंवा स्वतः भेटायला जात. त्यांच्याबरोबर चर्चा करत. त्या विषयांतील नवीन बाबी, आधुनिकता जाणून घेत. त्याचा उपयोग बडोद्यासाठी कसा करता येईल, बडोदा राज्यातील प्रजेचे जीवनमान कसे सुधारता येईल याचा विचार करत. याच चर्चेतून त्यांनी अनेक प्रतिभावंत बडोद्यात आणले. यामध्ये ग्रंथालयासाठी डॉ.डब्ल्यू.ए. बॉर्डन, प्लेग प्रतिबंधक लसीचे संशोधक डॉ.हाफकिन, दिवाण सी. सेडन, चित्रांच्या निवडीसाठी स्पीलमन, वस्तुसंग्रहालयातील चित्रांच्या मांडणीसाठी डिबडिन, इटालिअन मूर्तिकार फेलिची अशा अनेक प्रतिभावान व्यक्ती बडोद्यात आणल्या. त्याचबरोबर भारतातील गुणीजनांचीही कदर त्यांनी केली. या सर्वांच्या मदतीने त्यांनी बडोद्याचा कायापालट केला.

महाराज ज्या भागातून प्रवास करत तेथे असलेल्या भारतीय लोकांना, विद्यार्थ्यांना आवर्जून भेटत; त्यांच्याशी मुद्दामहून चर्चा करत. त्यांना मदत करत, प्रोत्साहन देत. याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे 26 जानेवारी 1935 रोजी प्रवासात असताना भारतीय हॉकी संघाला (इंडियन हॉकी फेडरेशन) 100 पौंड रुपयांची देणगी दिली. फक्त मदत केली नाही तर पुढे बर्लिन (जर्मनी) ऑलिम्पिकमध्ये 1936 मध्ये भारतीय संघाच्या सर्वच सामान्यांना उपस्थित राहत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. शेवटच्या सामन्यात भारताने विरोधी संघावर 8-1 असा विजय साजरा करत ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले. (याच वेळी महाराजांनी हुकूमशहा हिटलरची भेट घेतली. यामुळे बरीच खळबळ उडाली होती.)

महाराज परदेशांत अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत करत. यामध्ये व्यापारी किंवा परदेशांत पर्यटनासाठी आलेल्यांना मदत केली. राजपुताना क्रिकेट क्लबचे खेळाडू इंग्लंड येथे खासगी दौऱ्यावर इंग्लंड येथे आले होते. त्यांना प्रवासी एजंटने फसवले. एकूण सतरा तरुण खेळाडू अडचणीत आलेले होते. त्यांच्याजवळील सर्वच पैसे संपले होते. सचिव आणि संघप्रमुखांनी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्यांचे हॉटेलचे थकीत बिल भरायला ताबडतोब 25 पौंड दिले. तसेच त्यांच्या परतीची व्यवस्था इंडियन क्रिकेटच्या मित्रांमार्फत केली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. अशा अनेक गरजूंना त्यांनी मदत केली.

युरोपमध्ये फ्रेंच या एकाच राष्ट्रीय भाषेस महत्त्व आहे हे महाराजांनी पाहिले होते. त्याचप्रमाणे भारतातही सर्वत्र हिंदी ही एकच राष्ट्रभाषा व्हावी यासाठी महाराजांनी भरपूर प्रयत्न केले. यासाठी लागणारा निधी बडोदा राज्यातून मंजूर केला. हिंदी साहित्य संमेलनाला मदत केली. 19 जानेवारी 1931 रोजी हिंदुस्थानातील सर्व भाषांना एक लिपी तयार करण्यासाठी मि. लतिफ यांना 500 पौंड देणगी दिली. नोव्हेंबर 1932 मध्ये सर फ्रान्सिस यंग हजबंड यांना लिहिलेल्या पत्रात ‘सर्व हिंदुस्थानसाठी एक भाषा आणि एक लिपी’ करण्यासाठी काय करता येईल याची विचारणा केली. म्हणजे महाराज फक्त परदेशांतील बाबी पाहत नव्हते; तर त्या बाबींची स्वदेशात कशा प्रकारे अंमलबजावणी करता येईल याचा विचार करून अंमलबजावणी करत होते. त्यांनी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, तौलनिक धर्मअभ्यास, कला, क्रीडा, साहित्य आणि इतरही अनेक क्षेत्रात पुढारलेल्या देशात असणाऱ्या स्थितीचे अवलोकन केले. त्यात बदल करत बडोद्यात अंमलबजावणी केली.

प्रवासाचा मुख्य उद्देश आरोग्यरक्षण असा असला तरी या प्रवासातून अनेक फायदे बडोदा राज्याला झाले. प्रवास म्हणजे ज्ञानप्राप्तीचा एक आश्वासक मार्ग आहे असे महाराजांना वाटत होते. महाराज एकदा म्हणाले, ‘‘जर डबक्यातील पाण्याप्रमाणे आपल्याला कुजावयाचे नसेल तर आपल्या व्यापारी उन्नतीच्या आड येणारा परदेशगमन निषेध आपण दूर झुगारून दिला पाहिजे. भाटिया लोकांसारखे जन्मत:च व्यापारी प्रतिभा असलेले लोक या वेडगळ विवेकामुळे परदेशाला जाऊ शकत नाहीत, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.’’ प्रवासामुळे सामाजिक आणि धार्मिक गैरसमजुतींचे निरसन होते याविषयी महाराजांना खात्री होती. याबद्दल ते म्हणाले, की आपल्या देशाबाहेर सुसंस्कृत असे अनेक मोठमोठाले देश आहेत व त्यांच्यातील पुष्कळशा चांगल्या गोष्टी आपल्यालाही घेता येण्यासारख्या आहेत; परंतु त्या वेळी या माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास माझे लोक बिलकूल कबूल नसत. आपल्या देशाशी तुलना करण्याइतका जगात दुसरा कोणताही चांगला देश असू शकेल असे त्यांना त्या वेळी वाटतच नसे; पण आमच्या दरेक पुढील सफरीत आमच्या लोकांच्या गैरसमजुती कमी कमी होत चालल्या व आज तर त्या वेळची परिस्थिती सर्वस्वी बदलून गेली आहे. विशेषत: बडोद्यात या गोष्टीची जाणीव पुष्कळ दिसून येते. येथे आज मराठे व ब्राह्मण, दक्षिणी व गुजराथी, नागर व चित्पावन, प्रभू, पंजाबी, मद्रासी, हिंदू, मुसलमान वगैरे सर्व प्रकारचे लोक एकत्र जमून सहव्यवहार करीत असताना दिसून येतात व ही गोष्ट नि:संशय त्यांच्या सुज्ञतेची साक्ष आहे. महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी चालवलेल्या चळवळीला जगप्रवासाने निश्चितच फायदा झाला. एकंदर प्रवास हा डोळसपणे करून आपण त्यातून फक्त मनोरंजन न करता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनात फायदा करून घेतला पाहिजे याकडे महाराजांचा कटाक्ष होता. यासाठी स्वतःबरोबर बडोदा राज्यातील अधिकाऱ्यांच्या परदेशप्रवासाला त्यांनी उत्तेजन देत आर्थिक मदतही केली.

जगभरातील उच्च शिक्षणाच्या उत्तम सोयी आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पाहून अशा संस्थांमधून भारतीय विद्यार्थ्यांना पाठवले तरच भारताची प्रगती होऊ शकते यावर महाराजांचा पूर्ण विश्वास होता. याची पुनरुक्ती त्यांनी अनेक भाषणांतून केली. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन जगभरातील संस्थांमध्ये पाठवले. यामध्ये खासेराव जाधव (शेती), महर्षी वि.रा. शिंदे (धर्मशिक्षण), डॉ.बाबासाहेब आंबेडकर (उच्च शिक्षण), ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर (जातींवरील उच्च शिक्षण), राधाबाई पोवार (अध्यापन-शास्त्र), स्नेहलता पगार (बाल संगोपनशास्त्र), पी.आर. नंदुरबारकर (मूकबधिर मुलांचे शिक्षण), नामदेवराव कदम (सूप-शास्त्र), आप्पासाहेब पवार (उच्च शिक्षण), जनार्धन कुडाळकर (ग्रंथालय) अशा अनेक विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील शिक्षणासाठी परदेशांत पाठवले. त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा फायदा बडोदा राज्यासाठी करून घेतला.

महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी आयुष्यभर विद्याव्यासंग सोडला नाही. त्यांच्या विचारात, लेखनात आणि चिंतनातही प्रदीर्घ काळाची तपश्चर्या होती. त्यामुळे जगभर त्यांची ‘प्रज्ञावंत राजा’ अशी ओळख होती. ते ज्या देशात जात तेथील वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्ती त्यांना कार्यक्रमासाठी बोलावून घेत. त्यांचा सन्मान करत. इ.स. 1906 मध्ये त्यांनी इंग्लंडमधून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. ते प्रथमच अमेरिकेला निघाले होते, त्या वेळी अमेरिकेचे लंडनमधील वकील मि.व्हाईट लॉ यांनी अमेरिकेतील सेक्रेटरी ऑफ स्टेट यांना पत्रातून कळवले, ‘महाराज गायकवाड व त्यांच्या महाराणी हे दोघे अमेरिकेस येत आहेत. महाराज हे फार बुद्धिमान राजे असून, त्यांना ब्रिटिश राजकारण व संस्था यांची उत्तम माहिती आहे. अमेरिकेला त्यांचा येण्याचा हेतू तेथील शिक्षणसंस्थांचे निरीक्षण करून त्या देशात आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना पाठवण्याची सोय कशी करता येईल हे पहावे हा आहे. महाराणी याही सुबुद्ध असून सुशिक्षित आहेत.’ महाराजांना वेगवेगळ्या संस्थांनी आणि क्लब यांनी मानद सभासदत्व बहाल केले. ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथे पहिली जागतिक मानववंश परिषद (1911), शिकागो येथील दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद (1933), पहिली जागतिक शांतता परिषद आणि जागतिक सर्वधर्म परिषदेची कार्यकारी सभा (1935) हे जागतिक पातळीवरील महत्त्वाचे समारंभ त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. वेगवगेळ्या देशांचे प्रमुख त्यांचा सन्मान करण्यासाठी समारंभाचे आयोजन करत. त्यांना नानाविध संस्थांनी मानपत्रे दिली. ग्रेट ब्रिटनचे ग्रंथालय संचालक आणि प्रतिनिधींनी 30 मे 1935 रोजी ब्रिटिश क्लेरीज हाउस लंडन येथे शाही भोजन दिले. तसेच महाराजांची 25 ऑक्टोबर 1935 रोजी ब्रिटिश लायब्ररी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. हे सर्व सन्मान त्यांच्या नियोजनबद्ध प्रवासामुळे, बहुविध व्यक्तिमत्त्वामुळे, चाणाक्ष बुद्धिमत्तेमुळे व बडोद्यात केलेल्या सर्वांगीण सुधारणांमुळे मिळाले.

आजही बडोद्यात फिरताना दरवाजे (गेट), मोठमोठ्या आकर्षक इमारती, प्रशस्त रस्ते, विविध बागा, वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, राजवाडे पाहून आपण पाश्चात्त्य प्रगत देशात फिरत असल्याचा भास होतो. भव्य आणि आकर्षक वास्तू पाहून महाराजांच्या सौंदर्यदृष्टीची आणि दूरदृष्टीची कल्पना येते. महाराजांच्या प्रवासाबद्दल चरित्रकार वि.पां. दांडेकर म्हणतात, ‘जगात जे जे काही उच्च, न्याय्य व सुंदर असेल ते ते आपल्या देशात असावे असे महाराजांना वाटे. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले असताना हीच गोष्ट प्रत्ययास येते. समाज, कायदा, राज्यतंत्र व धर्मतंत्र या बाबतींत त्यांनी अग्रणी बनून ज्या सुधारणा घडवून आणल्या, त्याचे बव्हंशी श्रेय त्यांच्या पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांत झालेल्या प्रवासालाच द्यावे लागेल.’ बडोद्यातील सर्वच सुधारणा परदेशप्रवासामुळे निर्माण झाले असे म्हणता येणार नाही; तरीसुद्धा याची पायाभरणी मात्र जगप्रवासामुळे घडली हे मात्र निश्चितपणे म्हणता येईल.

महाराजा सयाजीरावांच्या जगप्रवासाचे अहवाल

सयाजीराव महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेली प्रशासकीय शिस्त होय. त्यांच्या राज्यकारभारातील सर्वच गोष्टी लिखित स्वरूपात ठेवण्याची शिस्त होती. अगदी त्यांच्या प्रवासाचे इतिवृत्त (देशातील आणि परदेशांतील) आजही उपलब्ध आहे. पहिल्या तीन प्रवासाची टिपणे तर महाराजांनी स्वतः काढली होती. तेथून पुढच्या प्रवासाचे इतिवृत्त सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या त्या वेळी लिहून ठेवले. यातून महाराजांतील जिज्ञासू पर्यटक, संशोधक आणि त्यांची चिकित्सक वृत्ती समजते. एकूणच त्यांचे परदेशातील चरित्र आणि बडोद्यात त्याचे उमटलेले प्रतिबिंब समजण्यास जगप्रवासाचे इतिवृत्त हा अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.

हे सर्व प्रवासवृत्तान्त म्हणजे ‘प्रवासवर्णने’ या साहित्यप्रकारातील लेखन नव्हे. इतर प्रवासवर्णनांसारखे त्यात लालित्य नाही; तर साधार, समग्र आणि सत्यनिष्ठ सामग्री आहे. हा मौल्यवान दस्तऐवज दुर्मीळ झाला होता. तसेच तो फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध होता. अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’च्या वतीने हे सर्व प्रवास अहवाल पुनर्प्रकाशित करण्यात आलेले आहेत. समितीच्या वतीने 25 खंडांतून 62 ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यातील खंड क्रमांक 15 मध्ये हे अहवाल प्रकाशित केले आहेत. आता ते सर्वांना उपलब्ध आहेत. या पुनर्प्रकाशनामध्ये नामांकित अनुवादकांकडून अनुवाद करवून हा दस्तऐवज मराठीमध्येही उपलब्ध झाला आहे. यामध्ये खंड क्र. 15 मधील भाग एकमध्ये एक ते चौदा (पृ.329), दुसऱ्या भागामध्ये पंधरा ते बावीस (पृ.464) तर तिसऱ्या भागामध्ये तेवीस ते सव्वीस (पृ.418) जगप्रवासाचे अहवाल मराठीत आहेत. तर मूळ इंग्रजी अहवाल खंड क्रमांक 15 मधील भाग चार (पृ.513), पाच (पृ.748) आणि सहामध्ये (पृ.648) आहेत. महाराजांनी केलेल्या जगप्रवासाचे अहवाल एकूण सहा भागांमध्ये प्रकाशित केले आहेत. प्रत्येक खंडाची किंमत प्रतिभाग 120/- रुपये ठेवली आहे.

जगप्रवासाचे मराठी अहवाल समितीचे सचिव बाबा भांड यांनी, तर इंग्रजी अहवाल डॉ. विशाल तायडे यांनी संपादित केले आहेत. हा सर्व दस्तऐवज म्हणजे एका खेडेगावात जन्मलेल्या शेतकऱ्याचा मुलगा ते जागतिक स्तरावर प्रज्ञावंत ठरलेल्या सयाजीराव महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे. प्रारंभी आरोग्यरक्षण करणे हेच एकमेव प्रवासाचे कारण होते; परंतु पुढे मात्र ज्ञानसंपादक, चांगल्या बाबी (संस्था आणि व्यक्ती) बडोद्यात आणणे आणि राज्यात सर्वोत्कृष्ट बाबी निर्माण करण्यासाठी विद्यार्थी परदेशांत पाठवणे अशा अनेक कारणांची जोड मागून मिळाली.

महाराजांच्या या जगप्रवासाच्या अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक बाबीची, भेटलेल्या प्रत्येक विद्वान व्यक्तीची आणि प्रवासात मदत केलेल्या मदतीची नोंद विस्तृतपणे घेतली आहे. प्रवासात केलेल्या ग्रंथवाचनाची आणि खरेदीची नोंद घेतली आहे. या अहवालावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचा उलगडा होतो. त्यांचे प्रगमनशील व्यक्तित्व समजून घ्यायचे असल्यास हे अहवाल वाचायलाच हवेत.

महाराजांनी पहिले एक-दोन जगप्रवास अनेक व्यक्ती आणि मोठ्या लवाजम्यासह केले. त्यामुळे प्रवासखर्चही अधिक झाला. ही बाब महाराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी पुढील सफरीत पाच-सहा अधिकाऱ्यांसह प्रवास केले. यामुळे अर्थातच बडोद्याच्या तिजोरीवर खर्चाचा अधिक बोजा पडला नाही. त्याच वेळी भारतातील इतर काही संस्थानिक परदेशांत जाऊन जनतेच्या पैशातून मौजमजेत मश्गूल होते. अशा ऐषआरामी संस्थानिकांना महाराजांनी जगप्रवास कसा करावा, त्यातून आपल्या देशासाठी काय करण्यायोग्य आहे याचा आदर्श घालून दिला. आजही जगप्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे अहवाल नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

(लेखक महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीमध्ये ‘संशोधन सहायक’ आहेत.)

(25 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस आहे, त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजेंद्र मगर

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद येथे संशोधन सहायक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके