डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनचा ‘समाज-साहित्य-संस्कृती’क्षेत्रातील कार्यासाठीचा गौरव पुरस्कार या वर्षी प्रा.भा.ल.भोळे यांना नुकताच प्रदान करण्यात आला, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे व कार्याचे मर्म उलगडून दाखवणारा हा लेख…

भास्कर लक्ष्मण भोळे यांनी बहुजनवादी चळवळ, साहित्य समीक्षा व राज्यशास्त्र या तीन क्षेत्रांत आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे.चळवळीतील कार्यकर्ते, साहित्याचे अभ्यासक व राज्यशास्त्राचे प्राध्यापक त्यांना आपला मार्गदर्शक मानतात.खानदेश, मराठवाडा व विदर्भ या विभागात शिक्षण झालेल्या व अध्यापन केलेल्या भोळेंनी वैचारिक क्षेत्रातील पुण्या-मुंबईच्या मिरासदारीला आव्हान देऊन आपले स्थान अशा प्रकारे निर्माण केले, की महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ, साहित्य व राज्यशास्त्र या प्रांतांनी त्यांची नुसती दखलच घेतली असे नव्हे, तर आपापल्या प्रांतांतील सर्वोच्च सन्मान व पुरस्कार त्यांना प्रदान केले गेले. इंग्रजी भाषेत चालणाऱ्या वैचारिक व्यवहाराला पूर्णपणे बाजूला सारून मराठी भाषेत हा व्यवहार समर्थपणे कसा करता येऊ शकतो, याचा आदर्श घालून देऊन प्रा.भोळे यांनी राजवाडे, लक्ष्मणशास्त्री व य.दि.फडके यांची परंपरा पुढे चालवली आहे. आज उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे एक साक्षेपी, निर्भीड व परिवर्तनवादी विचारवंत म्हणून पाहतो आहे.

भोळेंना साने गुरुजींना आदर्श मानणारे वडील व तारतम्य व स्पष्टवक्तेपणा असणारी आई लाभली.शाळेत सर्व जातीजमातींचे सवंगडी मिळाले. परंतु वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीचा पाया घातला गेला तो औरंगाबाद शहरात. मिलिंद महाविद्यालयातील पहिल्या वर्षात त्यांचा आंबेडकरी विचारप्रणालीशी परिचय झाला व शासकीय महाविद्यालयातील तीन वर्षांत त्यांना चंद्रकांत पाटील, मोईन शाकीर, चंद्रशेखर जहागीरदार, भालचंद्र नेमाडे, रवींद्र किंबहुने, ना.धों.महानोर, रावसाहेब कसबे, अरविंद देशपांडे, मा.गो.देशमुख, सुधीर रसाळ व गो.मा.पवार यांसारखे मित्र मिळाले.औरंगाबादमधील शिक्षण व अध्यापनाच्या दहा वर्षांत प्रा.भोळे यांनी सार्वजनिक व साहित्याच्या क्षेत्रात जेव्हा पदार्पण केले, तेव्हा या मित्रांबरोबर झालेल्या चर्चा वैचारिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने त्यांना अत्यंत उपयोगी पडल्या. भोळेंची सामाजिक बांधिलकीची भूमिका याच काळात आकार घेऊ लागली.

नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून 1970 साली रुजू झाल्यावर भोळेंचा औरंगाबाद शहराचा संबंध संपला, पण त्यांचे मन त्या शहरात कायमचे गुंतले गेले होते. नागपूरला आल्यावर त्यांनी वैचारिक व पाठ्यपुस्तक लेखनास प्रारंभ केला. राज्यशास्त्र नियमातील उच्च माध्यमिकपासून पदव्युत्तर पातळीपर्यंतची पाठ्यपुस्तकं तर त्यांनी लिहिलीच; पण बालभारतीच्या नागरिकशास्त्र व इतिहास या विषय समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम करून तिसरी ते आठवी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत पुढाकार घेतला. महाविद्यालयीन किंवा शालेय पाठ्यपुस्तकांच्या लेखनात वस्तुनिष्ठता व परिवर्तनवादी भूमिका यांचा मेळ घालण्यात भोळे यांनी बरीच बौद्धिक शक्ती खर्च केली आहे. त्याचप्रमाणेराज्यशास्त्रातील मूळ इंग्रजी संज्ञांना नेमके मराठी प्रतिशब्द तयार करून या विषयातील परिभाषा विकसित करण्यात ते यशस्वी झाले. एकूणच मराठीतून पाठ्यपुस्तके लिहिणे या गोष्टीला भोळे यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन इतरही प्राध्यापक या कामात रस घेऊ लागले आहेत.

समकालीन राजकीय घडामोडी व सामाजिक चळवळीतील भाष्य करण्याच्या लेखमाला वृत्तपत्रांत लिहून भोळे यांनी पाठ्यपुस्तकेतर वैचारिक लेखनास सुरुवात केली ती साधारणत:1975च्या आणीबाणीनंतर. नव्याने उदयाला आलेल्या नमुना पाहणीपद्धतीला व अमेरिकी राज्यशास्त्राच्या बडेजावाला शरण न जाता भोळे यांनी आपले लेखन केले व स्वत:चे खास स्थान निर्माण केले.

शास्त्रीय संशोधन पद्धती, संख्याशास्त्राचा वापर व मूल्यविरहित भूमिका या गोष्टींपासून ते दूरच राहिले. परकीय व उपरे राज्यशास्त्र या देशाला लागू पडणार नाही, एतद्देशीय संदर्भ हा जास्त महत्त्वाचा आहे, ही भूमिका घेऊन त्यांनी आपली लोकशाही समाजवादी व बहुजनवादी तत्त्वप्रणाली कधीच सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला धार आली. प्रत्यक्ष संशोधन करण्याकडे कमी कल असणाऱ्या भोळेंनी पीएच.डी.साठी शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासावर जोप्रबंध लिहिला तो संशोधनाची चौकट पूर्णपणे पाळूनच.य.दि.फडके सारखा ऐतिहासिक पुराव्याचा व तपशीलाचा आग्रह ते धरीत नाहीत, पण त्यांचे लेखन सहजासहजी खोडून काढता येण्यासारखे नसते. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, यशवंतराव चव्हाण व गोपाळ गणेश आगरकर या विचारवंतांवरील भोळेंचे लेखन चरित्रलेखनासारखे नाही. चरित्रलेखनात त्यांना तसा रस नाही. त्यांना प्रिय आहे या विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास; त्यांच्या वारसदारांच्या कामगिरीची समीक्षा; फुले- आंबेडकरी चळवळीच्या आजच्या अधोगतीची कारणमीमांसा. भोळे यांच्या टीकेचे एक लक्ष्य आहे, प्रतिगामी व हिंदुत्ववादी गट व दुसरे लक्ष्य आहे चळवळीतील नेते व कार्यकर्ते, जे त्यांचे मित्र आहेत, ज्यांच्याबद्दल त्यांना आस्था आहे. परिवर्तनवादी चळवळींना चुचकारून चळवळीचेच नुकसान होत असते, असे भोळे मानतात म्हणून ते चळवळीवर निर्भीडपणे टीका करतात. या भूमिकेवर खंबीर राहिल्याने चळवळीतील काही मंडळी त्यांच्यावर नाराज होण्याचा धोका पत्कारायला भोळे तयार असतात. 

जेव्हा दलित चळवळीतील काहीजण हिंदुत्ववाद्यांशी जवळीक करू लागले, तेव्हा त्यांच्यावर कठोरपणे टीका करण्यात व त्यांची हेटाळणी करण्यात भोळे सर्वात पुढेहोते. बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानापासून आजची चळवळ कशी दूर चालली आहे हे सांगताना भोळे म्हणतात, की दलित चळवळीतील विविध प्रवाहात इतर बाबतीत विस्तव जात नसला तरी आंबेडकरी विचार गाडून टाकण्याबाबत सर्वांचे संगनमत झालेले आहे. दलित चळवळीला विभूतीपूजा व पांढरपेशीय मानसिकतेने ग्रासलेले आहे. दलितांचे राजकारण विचारकेंद्री होण्याऐवजी व्यक्तिकेंद्री झाल्यामुळे त्यास गटबाजीची लागण झाली आहे. अशी मते स्पष्टपणे मांडणारे भोळेंसारखे विचारवंत आज महाराष्ट्रातहाताच्या बोटावर मोजण्याएवढेही नाहीत.

भोळेंनी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जे लेखन केले आहे, त्यात जवळजवळ सहा पुस्तके राजकीय घडामोडींवरील आहेत व नऊ पुस्तके व पुस्तिका फुले-आंबेडकर-शिंदे-आगरकर यांचे कार्य व तत्त्वज्ञान व त्यांचा वारसा यांविषयी आहेत. साहित्यसमीक्षा हा भोळे यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्यात त्यांचे एकच पुस्तक आहे पण ते महत्त्वाचे आहे. ‘साहित्यप्रत्यय’ या शीर्षकाच्या या पुस्तकात भोळेंच्या तेरा सैद्धांतिक लेखांचा व अकरा पुस्तक परीक्षणांचा समावेश केलेला आहे. सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांना अधिक अर्थपूर्ण दृष्टीने साहित्याकडे पाहणे शक्य होते असे भोळे यांचे मत आहे व त्यांचे वरील पुस्तक वाचताना त्याचा प्रत्यय येतो.फुले-शिंदे-राजवाडे-शेजवलकर-केतकर यांच्या साहित्यविषयक भूमिकेकडून प्रेरणा घेऊन भोळे यांनी साहित्य व समाजजीवन यांमधील आंतरसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. निशिकांत ठकार यांनी भोळेंच्या ‘साहित्यप्रत्यय’चे परीक्षण करताना म्हटले आहे, की साहित्याच्या सामाजिक आशयाला महत्त्व देताना भोळे आंधळी समाजवादी भूमिका घेत नाहीत व वाङ्मयीन निकषाचे महत्त्व अधोरेखित करतात; पण साहित्यकृती एकदा सामाजिक जीवनाचा भाग बनली की तिची सामाजिक व राजकीय समीक्षा झाली पाहिजे, असा आग्रह धरतात. मराठी साहित्य मुख्यत: मध्यमवर्गीय जाणीवा जोपासणारे व प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन करणारे आहे.तसेच विद्रोही वाङ्मयाची व्यासपीठे क्रांतिकारी जाणीवांचे वाहन होण्याच्या दृष्टीने थिटी पडली आहेत, असे भोळे स्पष्टपणे बजावतात. लोकप्रिय मराठी साहित्यास भोळे बेगडी, ठोकळेबाज, निर्जीव व स्थितीवादी म्हणतात तर दलित साहित्याचे वर्णन साचेबंद, शब्दबंबाळ व पोकळ या शब्दांत करतात.

‘साहित्यप्रत्यय’या पुस्तकास 2003चा महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार मिळाला होता तो किती योग्य होता, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचल्यावर येतो. साहित्यक्षेत्रातील भोळे यांचे दुसरे योगदान आहे अनुवाद करण्याबद्दलचे. चार भाषांतरित पुस्तके भोळे यांच्या खात्यावर आहेत व त्यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अनुभव आणि आठवणी’या पुस्तकास साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (2002) मिळालेला आहे.अलीकडेच त्यांनी पाकिस्तानी लेखक इंतजार हुसैन यांच्या एकवीस कथांचे भाषांतर साहित्य अकादमीसाठी केले आहे. महेश एलकुंचवार यांच्या मते हा अनुवाद इतका सरस आहे की तो अनुवाद वाटतच नाही. हुसैन यांनी मराठीतच कथा लिहिल्यात असे वाटते. भाषेवरील प्रभुत्व व समाजजीवनाची सखोल जाण असल्याशिवाय इतका चांगला अनुवाद होणे शक्य नसते. परंतु समाजजीवनाची नुसती जाण अपुरी पडते. विचारवंतांची वैचारिक बैठक पक्की असावी लागते. भोळे यांचा वैचारिक प्रवास विचाराच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या सोबतीने झाला. केवळ तत्ववैचारिक, अमूर्त व स्थलकालनिरपेक्ष विचार न करता तो अभावग्रस्ततेचे जीवन जगणाऱ्या माणसांच्या अनुषंगानेच करावा लागतो, याचे भान त्यांना फुले-शिंदे-आंबेडकरांच्या वाचनाने आले.

लोकशाही, स्वातंत्र्य अशा पुस्तकी परिभाषेत विचार करण्याच्या पद्धतीला त्यांनी छेद दिला. मार्क्स-लेनिन वाचल्यावर वर्गाधारित समाजात समता-स्वातंत्र्य या मूल्यांचे अर्थ वर्गनिहाय बदलतात, हेही ध्यानात आले. गांधीजींच्या वाचनाने भोळे यांच्या विचाराला एतद्देशीय संदर्भ प्राप्त झाला. फुले-शिंदे-आंबेडकरांच्या विचारांचा सखोल परिणाम भोळे यांच्या लेखनावर पडला व बहुजनवादी व वास्तववादी परिमाण त्यांच्या विश्लेषणाला मिळाले, असे म्हणता येईल. पाठ्यपुस्तकापासून ते स्तंभलेखनापर्यंत आणि साहित्य समीक्षेपासून ते अनुवादित पुस्तकांपर्यंत भोळे यांच्यावर बहुजनवादी विचाराचा प्रभाव स्पष्टपणे नजरेत भरतो.त्यांना फुले-आंबेडकरी विचाराची समकालीन संदर्भात फेरमांडणी करायची आहे. हे कार्य त्यांच्या हातून होईलच, यात शंका नाही.

(सौजन्य : ‘संवादिनी 2007’)

Tags: महाराष्ट्र फाउंडेशन महेश एलकुंचवार राजेंद्र व्होरा सुधीर रसाळ मा.गो.देशमुख अरविंद देशपांडे रावसाहेब कसबे ना.धों.महानोर रवींद्र किंबहुने भालचंद्र नेमाडे चंद्रशेखर जहागीरदार मोईन शाकीर चंद्रकांत पाटील राज्यशास्त्र साहित्य समीक्षा बहुजनवादी चळवळ भास्कर लक्ष्मण भोळे संवादिनी maharashtra foundation b l bhole rajendra vhora weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके